[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वितीयः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दशरथकर्तृकः श्रीरामराज्याभिषेकप्रस्तावः संसत्सदस्यैः श्रीरामगुणानां वर्णनं कुर्वद्‌भिरुक्तप्रस्तावस्य सहर्षं युक्तियुक्तं समर्थनम् - राजा दशरथांचा द्वारा श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा प्रस्ताव तथा सभासदांच्या द्वारा श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करीत प्रस्तावाचे सहर्ष युक्तियुक्त समर्थन -
ततः परिषदं सर्वामामन्त्र्य वसुधाधिपः ।
हितमुद्धर्षणं चैवमुवाच प्रथितं वचः ॥ १ ॥

दुन्दुभिस्वरकल्पेन गम्भीरेणानुनादिना ।
स्वरेण महता राजा जीमूत इव नादयन् ॥ २ ॥
त्यावेळी राजसभेत बसलेल्या सर्व लोकांना संबोधित करून महाराज दशरथांनी मेघासमान (गंभीर) शब्द करीत दुंदिभिच्या ध्वनि सदृश्य अत्यंत गंभीर आणि गुंजत राहणार्‍या उच्च स्वराने सर्वांचा आनंद वाढविणारी ही हितकारी गोष्ट सांगितली- ॥१-२॥
राजलक्षणयुक्तेन कान्तेनानुपमेन च ।
उवाच रसयुक्तेन स्वरेण नृपतिर्नृपान् ॥ ३ ॥
राजा दशरथांचा स्वर राजोचित स्निग्धता आणि गंभीरता आदि गुणांनी युक्त होता, अत्यंत कमनीय आणि अनुपम होता. ते त्या अद्‍भुत रसमय स्वराने समस्त नरेशांना संबोधित करून म्हणाले - ॥३॥
विदितं भवतामेतद् यथा मे राज्यमुत्तमम् ।
पूर्वकैर्मम राजेन्द्रैः सुतवत् परिपालितम् ॥ ४ ॥
'सज्जनांनो ! आपण सर्वांना हे विदितच आहे की माझ्या पूर्वज राजाधिराजांनी या श्रेष्ठ राज्याचे (येथील प्रजेचे) कशा प्रकारे पुत्रवत पालन केले आहे. ॥४॥
सोऽहमिक्ष्वाकुभिः सर्वैर्नरेन्द्रैः परिपालितम् ।
श्रेयसा योक्तुच्छामि सुखार्हमखिलं जगत् ॥ ५ ॥
समस्त इक्ष्वाकुवंशी नरेशांनी ज्याचे प्रतिपादन केले ते सुख भोगण्यायोग्य संपूर्ण जगतास आता मी ही कल्याणाचे भागी बनविण्याची इच्छा करीत आहे. ॥५॥
मयाप्याचरितं पूर्वैः पन्थानमनुगच्छता ।
प्रजा नित्यमनिद्रेण यथाशक्त्यभिरक्षिताः ॥ ६ ॥
माझे पूर्वज ज्या मार्गावरुन चालत आले आहेत त्याच मार्गाचे अनुसरण करीत मी ही सदा जागरुक राहून समस्त प्रजाजनांचे यथाशक्ति रक्षण केले आहे. ॥६॥
इदं शरीरं कृत्स्नस्य लोकस्य चरता हितम् ।
पाण्डुरस्यातपत्रस्य च्छायायां जरितं मया ॥ ७ ॥
समस्त संसाराच्या हिताचे साध्य ठेवून मी या शरीराला श्वेत राजछत्राच्या छायेत वृद्ध केले आहे. ॥७॥
प्राप्य वर्षसहस्राणि बहून्यायूंषि जीवतः ।
जीर्णस्यास्य शरीरस्य विश्रान्तिमभिरोचये ॥ ८ ॥
अनेक सहस्त्र (साठ हजार) वर्षांचे आयुष्य मिळाल्याने जिवंत जीवित राहिले- त्या आपल्या या जराजीर्ण शरीराला आता मी विश्राम देऊ इच्छितो. ॥८॥
राजप्रभावजुष्टां हि दुर्वहामजितेन्द्रियैः ।
परिश्रान्तोऽस्मि लोकस्य गुर्वीं धर्मधुरं वहन् ॥ ९ ॥
जगताच्या धर्मपूर्वक संरक्षणाचा भारी भार राजांच्या शौर्य आदि प्रभावांच्या योगाने उचलणे संभव आहे. अजितेंद्रिय पुरूषांसाठी हा भार वाहणे अत्यंत कठीण आहे. मी दीर्घकाल पर्यंत हा भारी भार वहन करता करता थकून गेलो आहे. ॥९॥
सोऽहं विश्राममिच्छामि पुत्रं कृत्वा प्रजाहिते ।
सन्निकृष्टानिमान् सर्वाननुमान्य द्विजर्षभान् ॥ १० ॥
म्हणून येथे जवळच बसलेल्या या संपूर्ण श्रेष्ठ द्विजांची अनुमति घेऊन प्रजाजनांच्या हिताच्या कार्यात आपला पुत्र राम यास नियुक्त करून आता मी राजकार्यापासून विश्राम घेऊ इच्छितो. ॥१०॥
अनुजातो हि मां सर्वैर्गुणैः श्रेष्ठो ममात्मजः ।
पुरन्दरसमो वीर्ये रामः परपुरञ्जयः ॥ ११ ॥
माझे पुत्र श्रीराम माझ्यापेक्षा सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहेत. शत्रुंच्या नगरीवर विजय मिळविणारे श्रीराम बल-पराक्रमात देवराज इंद्र समान आहेत. ॥११॥
तं चन्द्रमिव पुष्येण युक्तं धर्मभृतां वरम् ।
यौवराज्ये नियोक्तास्मि प्रीतः पुरुषपुङ्‌‍गवम् ॥ १२ ॥
पुष्य- नक्षत्राने युक्त चंद्रम्याप्रमाणे समस्त कार्य साधण्यात कुशल तथा धर्मात्म्यांच्यात श्रेष्ठ त्या पुरुषश्रेष्ठ रामास मी उद्या प्रातःकाळी पुष्य नक्षत्रावर युवराजाच्या पदावर नियुक्त करीन. ॥१२॥
अनुरूपः स वै नाथो लक्ष्मीवाँल्लक्ष्मणाग्रजः ।
त्रैलोक्यमपि नाथेन येन स्यान्नाथवत्तरम् ॥ १३ ॥
'लक्ष्मणाचे मोठे भाऊ श्रीमान राम आपणा (सर्वा) साठी योग्य स्वामी सिद्ध होतील, त्यांच्या सारख्या स्वामींच्यामुळे संपूर्ण त्रैलोक्य सनाथ होऊ शकते. ॥१३॥
अनेन श्रेयसा सद्यः संयोक्ष्येऽहमिमां महीम् ।
गतक्लेशो भविष्यामि सुते तस्मिन् निवेश्य वै ॥ १४ ॥
श्रीराम कल्याणस्वरूप आहेत, त्यांचा शीघ्रच राज्याभिषेक करून मी या भूमण्डलास तात्काळ कल्याणाचे भागी बनवीन. आपला पुत्र श्रीरामावर राज्याचा भार सोपवून मी सर्वथा क्लेषरहित- निश्चिंत होईन. ॥१४॥
यदीदं मेऽनुरूपार्थं मया साधु सुमन्त्रितम् ।
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम् ॥ १५ ॥
जर माझा हा प्रस्ताव आपल्याला अनुकूल वाटला आणि जर माझा हा प्रस्ताव चांगला व योग्य वाटत असेल तर आपण यासाठी मला सहर्ष अनुमति द्यावी अथवा हे तरी सांगावे की मी कुठल्या प्रकारे कार्य करूं ? ॥१५॥
यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्यद् विचिन्त्यताम् ।
अन्या मध्यस्थचिन्ता तु विमर्दाभ्यधिकोदया ॥ १६ ॥
यद्यपि हा श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा विचार माझ्यासाठी अधिक प्रसन्नतेचा विषय आहे तथापि जर याच्या अतिरिक्त काही सर्वांसाठी हितकर गोष्ट असेल तर आपण त्या संबंधी विचार करावा कारण मध्यस्थ पुरूषांचा विचार एकपक्षीय पुरूषापेक्षा विलक्षण असतो. कारण तो पूर्वपक्ष आणि अपरपक्षाला लक्ष्य करुन केला गेलेला असल्याने अधिक अभ्युदय करणार असतो'. ॥१६॥
इति ब्रुवन्तं मुदिताः प्रत्यनन्दन् नृपा नृपम् ।
वृष्टिमन्तं महामेघं नर्दन्त इव बर्हिणः ॥ १७ ॥
राजा दशरथ ज्यावेळी असे म्हणत होते, त्यासमयी तेथे उपस्थित नरेशांनी अत्यंत प्रसन्न होऊन महाराजांचे अशा प्रकारे अभिवादन केले की ज्या प्रकारे मोर मधुर केकारव करीत वर्षा करणार्‍या महामेघाचे अभिनंदन करतो. ॥१७॥
स्निग्धोऽनुनादः सञ्जज्ञे तत्र हर्षसमीरितः ।
जनौघोद्‍घुष्टसंनादो मेदिनीं कम्पयन्निव ॥ १८ ॥
तत्पश्चात समस्त जनसमुदायाचा स्नेहमयी हर्षध्वनी ऐकू येऊ लागला. तो इतका प्रबल होता की समस्त पृथ्वीला कंपित करत आहे की काय असे वाटले. ॥१८॥
तस्य धर्मार्थविदुषो भावमाज्ञाय सर्वशः ।
ब्राह्मणा बलमुख्याश्च पौरजानपदैः सह ॥ १९ ॥

समेत्य ते मन्त्रयितुं समतागतबुद्धयः ।
ऊचुश्च मनसा ज्ञात्वा वृद्धं दशरथं नृपम् ॥ २० ॥
धर्म आणि अर्थाचे ज्ञाता असलेल्या महाराज दशरथांचा अभिप्राय पूर्णरुपाने जाणून संपूर्ण ब्राह्मण आणि सेनापति, नगर आणि जनपदातील प्रमुख व्यक्तिंच्या सह-एकत्र जमून परस्पर सल्लामसलत करण्यासाठी बसले आणि मनाने सर्व काही समजून घेऊन ज्यावेळी ते एका निश्चयावर पोहोंचले, तेव्हा वृद्ध राजा दशरथांना या प्रमाणे बोलले - ॥१९-२०॥
अनेकवर्षसाहस्रो वृद्धस्त्वमसि पार्थिव ।
स रामं युवराजानमभिषिञ्चस्व पार्थिवम् ॥ २१ ॥
"पृथ्वीनाथ ! आपली अवस्था कित्येक हजार वर्षांची झाली आहे आपण वृद्ध झाला आहात. म्हणून पृथ्वीचे पालन करण्यास समर्थ आपला पुत्र श्रीराम याचा अवश्यच युवराज पदावर अभिषेक कारावा. ॥२१॥
इच्छामो हि महाबाहुं रघुवीरं महाबलम् ।
गजेन महता यान्तं रामं छत्रावृताननम् ॥ २२ ॥
रघुकुलाचे वीर महाबलवान महाबाहु राम महान गजराजावर बसून यात्रा करीत आहेत आणि त्यांच्यावर श्वेत छ्त्र धरले गेलेले आहे या रूपात आम्ही त्यांचे दर्शन करू इच्छितो. ॥२२॥
इति तद्वचनं श्रुवा राजा तेषां मनःप्रियम् ।
अजानन्निव जिज्ञासुरिदं वचनमब्रवीत् ॥ २३ ॥
त्यांचे हे म्हणणे राजा दशरथांच्या मनाला प्रिय वाटणारे होते. ते ऐकून राजा दशरथ अज्ञानी असल्या सारखे भासवून त्या सर्वांचा मनोभाव जाणण्याच्या इच्छेने या प्रकारे बोलले - ॥२३॥
श्रुत्वैव वचनं यन्मे राघवं पतिमिच्छथ ।
राजानः संशयोऽयं मे तदिदं ब्रूत तत्त्वतः ॥ २४ ॥
'राजे लोक हो ! माझे म्हणणे ऐकून आपण सर्वांनी जी श्रीरामाला राजा बनविण्याची इच्छा प्रकट केली आहे, त्यावरून मला जो संशय येत आहे तो मी आपल्या समोर प्रकट करीत आहे. आपण तो ऐकून त्याचे यथार्थ उत्तर द्यावे. ॥२४॥
कथं नु मयि धर्मेण पृथिवीमनुशासति ।
भवन्तो द्रष्टुमिच्छन्ति युवराजं महाबलम् ॥ २५ ॥
मी धर्मपूर्वक या पृथ्वीचे निरंतर पालन करीत आहे. तरी मी असतानांच आपण लोक महाबली श्रीरामाला युवराजाच्या रूपात का पाहू इच्छिता ? ॥२५॥
ते तमूचुर्महात्मानं पौरजानपदैः सह ।
बहवो नृप कल्याणगुणाः सन्ति सुतस्य ते ॥ २६ ॥
हे ऐकून ते महात्मा नरेश, नगर आणि जनपदांतील लोकांच्यासह राजा दशरथांना याप्रकारे म्हणाले - "महाराज ! आपला पुत्र श्रीराम, याच्या ठिकाणी खूपच कल्याणकारी सद्‌गुण आहेत. ॥२६॥
गुणान् गुणवतो देव देवकल्पस्य धीमतः ।
प्रियानानन्दनान् कृत्स्नान् प्रवक्ष्यामोऽद्य ताञ्शृणु ॥ २७ ॥
'देव ! देवतातुल्य बुद्धिमान आणि गुणवान श्रीरामचंद्रांचे सारेच गुण सर्वांना प्रिय वाटणारे आणि आनंददायक आहेत. आम्ही या समयी त्यांचे यत्किञ्चित वर्णन करत आहोत, आपण ते ऐकावे. ॥२७॥
दिव्यैर्गुणैः शक्रसमो रामः सत्यपराक्रमः ।
इक्ष्वाकुभ्योऽपि सर्वेभ्यो ह्यतिरिक्तो विशाम्पते ॥ २८ ॥
'प्रजानाथ ! सत्यपराक्रमी राम देवराज इंद्राप्रमाणे दिव्य गुणांनी संपन्न आहेत. इक्ष्वाकुकुळांतही हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. ॥२८॥
रामः सत्पुरुषो लोके सत्यः सत्यपरायणः ।
साक्षाद् रामाद् विनिर्वृत्तो धर्मश्चापि श्रिया सह ॥ २९ ॥
राम संसारात सत्यवादी, सत्यपरायण आणि सत्पुरूष आहेत. साक्षात श्रीरामानीच अर्थाबरोबरच धर्मालाही प्रतिष्ठित केले आहे. ॥२९॥
प्रजासुखत्वे चन्द्रस्य वसुधायाः क्षमागुणैः ।
बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यो वीर्ये साक्षाच्छचीपतेः ॥ ३० ॥
'ते प्रजेला सुख देण्यामध्ये चंद्रम्याची आणि क्षमारूपी गुणामध्ये पृथ्वीची बरोबरी करीत आहेत. बुद्धीमध्ये बृहस्पति आणि बल-पराक्रमात साक्षात शचीपति इंद्रासमान आहेत. ॥३०॥
धर्मज्ञः सत्यसंधश्च शीलवाननसूयकः ।
क्षान्तः सान्त्वयिता श्लक्ष्णः कृतज्ञो विजितेन्द्रियः ॥ ३१ ॥

मृदुश्च स्थिरचित्तश्च सदा भव्योऽनसूयकः ।
प्रियवादी च भूतानां सत्यवादी च राघवः ॥ ३२ ॥
श्रीराम धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, शीलवान, अदोषदर्शी, शांत, दीन-दुःखी लोकांना सांत्वना प्रदान करणारे, मृदुभाषी, कृतज्ञ, जितेंद्रिय, कोमल स्वभावाचे, स्थिरबुद्धी, सदा कल्याणकारी, असूयारहित, समस्त प्राण्यांच्या प्रति प्रिय वचन बोलणारे आणि सत्यवादी आहेत. ॥३१-३२॥
बहुश्रुतानां वृद्धानां ब्राह्मणानामुपासिता ।
तेनास्येहातुला कीर्तिर्यशस्तेजश्च वर्धते ॥ ३३ ॥
ते बहुश्रुत विद्वानांचे, मोठ्या आणि वृद्ध लोकांचे आणि ब्राह्मणांचे उपासक आहेत- सदा त्यांचा संग करतात म्हणून या जगतात श्रीरामांची अनुपम कीर्ति, यश आणि तेज यांचा विस्तार होत आहे. ॥३३॥
देवासुरमनुष्याणां सर्वास्त्रेषु विशारदः ।
सम्यग् विद्याव्रतस्नातो यथावत् साङ्‌‍गवेदवित् ॥ ३४ ॥
'देवता, असुर आणि मनुष्यांच्या संपूर्ण अस्त्रांचे त्यांना विशेषरूपाने ज्ञान आहे. ते सांग वेदांचे यथार्थ विद्वान आणि विद्यांमध्ये उत्तम प्रकारे निष्णात आहेत. ॥३४॥
गान्धर्वे च भुवि श्रेष्ठो बभूव भरताग्रजः ।
कल्याणाभिजनः साधुरदीनात्मा महामतिः ॥ ३५ ॥
भरताचे मोठे भाऊ श्रीराम गांधर्ववेदा (संगीतशास्त्रा) तही या भूतलावर सर्वांहून श्रेष्ठ आहेत. कल्याणाची तर ते जन्मभूमी आहेत. त्यांचा स्वभाव साधुपुरूषांप्रमाणे आहे. हृदय उदार आणि बुद्धी विशाल आहे. ॥३५॥
द्विजैरभिविनीतश्च श्रेष्ठैर्धर्मार्थनैपुणैः ।
यदा व्रजति संग्रामं ग्रामार्थे नगरस्य वा ॥ ३६ ॥

गत्वा सौमित्रिसहितो नाविजित्य निवर्तते ।
धर्म आणि अर्थाच्या प्रतिपादनात कुशल अशा श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्यांना उत्तम शिक्षण दिलेले आहे. ते ग्राम अथवा नगरांच्या रक्षणासाठी लक्ष्मणासह जेव्हां संग्रामभूमीवर जातात, त्या समयी तेथे जाऊन विजय प्राप्त केल्याशिवाय मागे परत येत नाहीत. ॥३६-१/२॥
सङ्‌‍ग्रामात् पुनरागत्य कुञ्जरेण रथेन वा ॥ ३७ ॥

पौरान् स्वजनवन्नित्यं कुशलं परिपृच्छति ।
पुत्रेष्वग्निषु दारेषु प्रेष्यशिष्यगणेषु च ॥ ३८ ॥
संग्रामभूमीतून हत्ती अथवा रथद्वारा पुन्हा अयोध्येस परत आल्यावर ते पुरवासी लोकांशी स्वजनांप्रमाणे प्रतिदिन त्यांचा पुत्रांचा अग्निहोत्रांच्या अग्निंचा, स्त्रिया, सेवक आणि शिष्यांचा कुशल-समाचार विचारत राहतात. ॥३७-३८॥
निखिलेनानुपूर्व्या च पिता पुत्रानिवौरसान् ।
शुश्रूषन्ते च वः शिष्याः कच्चिद् वर्मसु दंशिताः ॥ ३९ ॥

इति वः पुरुषव्याघ्रः सदा रामोऽभिभाषते ।
जसे पिता आपल्या औरस पुत्रांचे कुशल-मंगल विचारतो त्याचप्रकारे ते समस्त पुरजनांना क्रमशः त्यांचा समाचार विचारत असतात. पुरूषसिंह राम ब्राह्मणांना सदा विचारत राहातात की- 'आपले शिष्य आपली सेवा करत असतात ना ? क्षत्रियांशी ही जिज्ञासा करतात की आपले सेवक कवच आदिनी सुसज्जित होऊन आपल्या सेवेमध्ये तत्पर राहातात ना ? ॥३९-१/२॥
व्यसनेषु मनुष्याणां भृशं भवति दुःखितः ॥ ४० ॥

उत्सवेषु च सर्वेषु पितेव परितुष्यति ।
नगरांतील लोकांवर संकट आल्यावर ते फार दुःखी होतात आणि त्या सर्वांच्या घरांतून सर्व प्रकारचे उत्सव होत असतां त्यांना पित्याप्रमाणे प्रसन्नता वाटत असते. ॥४०-१/२॥
सत्यवादी महेष्वासो वृद्धसेवी जितेन्द्रियः ॥ ४१ ॥

स्मितपूर्वाभिभाषी च धर्मं सर्वात्मनाश्रितः ।
सम्यग्योक्ता श्रेयसां च न विगृह्यकथारुचिः ॥ ४२ ॥
ते सत्यवादी, महान धनुर्धर, वृद्ध पुरूषांचे सेवक आणि जितेंद्रिय आहेत. श्रीराम प्रथम स्मित करुन नंतर वार्तालाप आरंभ करतात. त्यांनी संपूर्ण हृदयापासून धर्माचा आश्रय घेतलेला आहे. ते कल्याणाचे सम्यक आयोजन करणारे आहेत. निंदनीय गोष्टींची चर्चा करण्यात त्यांना कधी रुचि असत नाही. ॥४१-४२॥
उत्तरोत्तरयुक्तौ च वक्ता वाचस्पतिर्यथा ।
सुभ्रूरायतताम्राक्षः साक्षाद् विष्णुरिव स्वयम् ॥ ४३ ॥
उत्तरोत्तर उत्तम युक्ति देत वार्तालाप करण्यात ते साक्षात बृहस्पतिसमान आहेत. त्यांचा भुवया सुंदर आहेत, डोळे विशाल आणि थोडा लालिमा असणारे आहेत. ते साक्षात विष्णु प्रमाणे शोभत असतात. ॥४३॥
रामो लोकाभिरामोऽयं शौर्यवीर्यपराक्रमैः ।
प्रजापालनसंयुक्तो न रागोपहतेन्द्रियः ॥ ४४ ॥
संपूर्ण लोकांना आनंदित करणारे राम, शूरता, वीरता आणि पराक्रम आदिंच्या द्वारे सदा प्रजेचे पालन करण्यात गुंतलेले असतात. त्यांची इंद्रिये राग आदि दोषांनी दूषित होत नाहीत. ॥४४॥
शक्तस्त्रैलोक्यमप्येष भोक्तुं किन्नु महीमिमाम् ।
नास्य क्रोधः प्रसादश्च निरर्थोऽस्ति कदाचन ॥ ४५ ॥
या पृथ्वीची गोष्टच कशाला, ते संपूर्ण त्रैलोक्याचेही रक्षण करू शकतात. त्यांचा क्रोध आणि प्रसाद कधी व्यर्थ होत नाही. ॥४५॥
हन्त्येष नियमाद् वध्यानवध्येषु न कुप्यति ।
युनक्त्यर्थैः प्रहृष्टश्च तमसौ यत्र तुष्यति ॥ ४६ ॥
जे शास्त्रास अनुसरुन प्राणदण्ड मिळण्याचे अधिकारी आहेत त्यांचा हे नियमपूर्वक वध करुन टाकतात तथा जे शास्त्रदृष्टीने अवध्य आहेत त्यांच्यावर हे कदापि कुपित होत नाहीत. ज्यांचावर हे संतुष्ट होतात त्याला आनंदाने मोहरून धनाने परिपूर्ण करुन टाकतात. ॥४६॥
दान्तैः सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसञ्जननैर्नृणाम् ।
गुणैर्विरोचते रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः ॥ ४७ ॥
जसा तेजस्वी सूर्य आपल्या किरणांनी सुशोभित होतो त्याप्रमाणे हेही समस्त प्रजेसाठी कमनीय तथा मनुष्यांचा आनंद वाढविणारे मन आणि इंद्रियांचा संयम आदि सदगुणांच्या योगे शोभा पावतात. ॥४७॥
तमेवंगुणसम्पन्नं रामं सत्यपराक्रमम् ।
लोकपालोपमं नाथमकामयत मेदिनी ॥ ४८ ॥
अशा सर्वगुण संपन्न, लोकपालांच्या प्रमाणे प्रभावशाली आणि सत्यपराक्रमी रामाला या पृथ्वीची जनता आपले स्वामी बनवू इच्छिते. ॥४८॥
वत्सः श्रेयसि जातस्ते दिष्ट्यासौ तव राघवः ।
दिष्ट्या पुत्रगुणैर्युक्तो मारीच इव काश्यपः ॥ ४९ ॥
आमच्या सौभाग्याने आपले पुत्र राघव प्रजेचे कल्याण करण्यास समर्थ झालेले आहेत तथा आपल्या सौभाग्याने ते मरीचिनंदन कश्यपाप्रमाणे पुत्रोचित गुणांनी संपन्न आहेत. ॥४९॥
बलमारोग्यमायुश्च रामस्य विदितात्मनः ।
देवासुरमनुष्येषु सगन्धर्वोरगेषु च ॥ ५० ॥

आशंसते जनः सर्वो राष्ट्रे पुरवरे तथा ।
आभ्यन्तरश्च बाह्यश्च पौरजानपदो जनः ॥ ५१ ॥
देवता, असुर, मनुष्य, गंधर्व आणि नागांपैकी प्रत्येक वर्गाचे लोक तथा या राज्य आणि राजधानीतही आत-बाहेर येणारे जाणारे नगर आणि जनपदातील सर्व लोक सुविख्यात शील स्वभावाने संपन्न अशा श्रीरामचंद्रांसाठी सदाच बल, आरोग्य आणि आयुष्याची शुभकामना करीत आहेत. ॥५०-५१॥
स्त्रियो वृद्धास्तरुण्यश्च सायं प्रातः समाहिताः ।
सर्वा देवान्नमस्यन्ति रामस्यार्थे मनस्विनः ।
तेषां तद् याचितं देव त्वत्प्रसादात्समृद्ध्यताम् ॥ ५२ ॥
या नगरातील वृद्ध आणि तरूण- सर्व प्रकारच्या स्त्रिया, प्रातःकाळी आणि सायंकाळी, एकाग्रचित्त होऊन परम उदार श्रीराम युवराज व्हावेत म्हणून देवतांची नमस्कारपूर्वक प्रार्थना करीत असतात. देव ! त्यांची प्रार्थना आपल्या कृपा-प्रसादाने आता पूर्ण झाली पाहिजे. ॥५२॥
राममिन्दीवरश्यामं सर्वशत्रुनिबर्हणम् ।
पश्यामो यौवराज्यस्थं तव राजोत्तमात्मजम् ॥ ५३ ॥
नृपश्रेष्ठ ! जे नीलकमलासमान श्यामकांतिने सुशोभित तथा समस्त शत्रूंचा संहार करण्यास समर्थ आहेत त्या आपल्या ज्येष्ठ पुत्र रामांना आम्ही युवराज पदावर विराजमान झालेले पाहू इच्छितो. ॥५३॥
तं देवदेवोपममात्मजं ते
     सर्वस्य लोकस्य हिते निविष्टम् ।
हिताय नः क्षिप्रमुदारजुष्टं
     मुदाभिषेक्तुं वरद त्वमर्हसि ॥ ५४ ॥
म्हणून वरदायक महाराज ! आपण देवाधिदेव श्रीविष्णु समान पराक्रमी संपूर्ण लोकांच्या हितात संलग्न राहाणारे आणि महापुरूषांच्या द्वारा सेवित आपले पुत्र श्रीरामचंद्र यांना जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर प्रसन्नतापूर्वक राज्याभिषेक करावा, यातच आम्हा लोकांचे हित आहे. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा दुसरा सर्ग पूरा झाला. ॥२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP