[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ त्रयत्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
आत्मानं परिचाययन्त्या सीतया स्ववनागमनापहरणयोर्वृत्तान्तस्य वर्णनम् -
हनुमन्तास सीतेने आपला परिचय देणे आणि आपले वनगमन आणि अपहरणाचा वृत्तान्त सांगणे -
सोऽवतीर्य द्रुमात् तस्माद् विद्रुमप्रतिमाननः ।
विनीतवेषः कृपणः प्रणिपत्योपसृत्य च ॥ १ ॥

तामब्रवीन्महातेजा हनूमान् मारुतात्मजः ।
शिरस्यञ्जलिमाधाय सीतां मधुरया गिरा ॥ २ ॥
इकडे पोवळ्यासारखे लालमुख असलेला महातेजस्वी पवनपुत्र हनुमान त्या अशोक वृक्षावरून खाली उतरला आणि मस्तकावर अञ्जळी बान्धून विनीतभावाने दीनतापूर्वक जवळ जाऊन सीतेस प्रणाम करून मधुर वाणीने तिला म्हणाला - ॥१-२॥
का नु पद्मपलाशाक्षि क्लिष्टकौशेयवासिनि ।
द्रुमस्य शाखामालम्ब्य तिष्ठसि त्वमनिन्दिते ॥ ३ ॥

किमर्थं तव नेत्राभ्यां वारि स्रवति शोकजम् ।
पुण्डरीकपलाशाभ्यां विप्रकीर्णमिवोदकम् ॥ ४ ॥
प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या हे देवी ! हे मलीन रेशमी पीतवस्त्र धारण केलेली तू कोण आहेस ? हे अनिन्दिते, या वृक्षाच्या शाखेचा आधार घेऊन तू येथे का बरे उभी आहेस ? कमळाच्या पानावरून खाली ओघळणार्‍या जलबिन्दूप्रमाणे तुझ्या नेत्रातून हे शोकाश्रू-दुःखाश्रू का बरे ओघळत आहेत ? ॥३-४॥
सुराणामसुराणां च नागगन्धर्वरक्षसाम् ।
यक्षाणां किंनराणां च का त्वं भवसि शोभने ॥ ५ ॥

का त्वं भवसि रुद्राणां मरुतां वा वरानने ।
वसूनां वा वरारोहे देवता प्रतिभासे मे ॥ ६ ॥
हे शोभने ! तू देवता, असुर, नाग, गन्धर्व, राक्षस, यक्ष, किन्नर, रूद्र, मरूद्‍गण अथवा वसु यापैंकी कोण आहेस ? यापैकी कुणाची कन्या अथवा पत्‍नी आहेस ? हे सुमुखी ! हे वरारोहे ! मला तर असे वाटते आहे की तू कुणी देवताच आहेस. ॥५-६॥
किं नु चन्द्रमसा हीना पतिता विबुधालयात् ।
रोहिणी ज्योतिषां श्रेष्ठा श्रेष्ठा सर्वगुणाधिका ॥ ७ ॥
तू चन्द्रापासून वियोग होऊन देवलोकातून पतन पावलेली, नक्षत्रान्त श्रेष्ठ आणि गुणांमध्येही सर्वश्रेष्ठ रोहिणी देवी तर नाहीस ना ? ॥७॥
कोपाद् वा यदि वा मोहाद् भर्तारमसितेक्षणे ।
वसिष्ठं कोपयित्वा त्वं वासि कल्याण्यरुन्धती ॥ ८ ॥
हे अनिन्दितलोचने, हे कल्याणी ! तू कोण आहेस बरे ? अथवा काळेभोर डोळे असणार्‍या हे देवी ! तू कोपाने अथवा मोहाने आपले पति वसिष्ठ यांना कुपित करून येथे आलेली कल्याणस्वरूपा सतीशिरोमणी अरून्धती तर नाहीस ना ? ॥८॥
को नु पुत्रः पिता भ्राता भर्ता वा ते सुमध्यमे ।
अस्माल्लोकादमुं लोकं गतं त्वमनुशोचसि ॥ ९ ॥
हे सुमध्यमे ! तुझा पुत्र, पिता, भाऊ अथवा पति या पैकी कुणी या लोकातून जाऊन परलोकवासी तर झाले नाही ना ? आणि म्हणून तर तू शोक करीत नाहीस ना ? ॥९॥
रोदनादतिनिःश्वासाद् भूमिसंस्पर्शनादपि ।
न त्वां देवीमहं मन्ये राज्ञः सञ्ज्ञावधारणात् ॥ १० ॥

व्यञ्जनानि हि ते यानि लक्षणानि च लक्षये ।
महिषी भूमिपालस्य राजकन्या च मे मता ॥ ११ ॥
रडणे, दीर्घ श्वास घेणे आणि पृथ्वीला स्पर्श करणे या गोष्टीमुळेच मी तुला देवी मानत नाही. तू वारंवार कुणा राजाचे नाव घेत आहेस; तसेच तुझी चिह्ने आणि लक्षणे यावर दृष्टी टाकली असता हेच अनुमान होत आहे की तू कुठल्या तरी राजाची महाराणी तथा कुणा नरेशाची कन्या आहेस. ॥१०-११॥
रावणेन जनस्थानाद् बलात् प्रमथिता यदि ।
सीता त्वमसि भद्रं ते तन्ममाचक्ष्व पृच्छतः ॥ १२ ॥
रावणाने जनस्थानान्तून बलपूर्वक जिचे हरण केले, ती सीताच जर तू असशील तर तुझे कल्याण असो. तू मला नीटपणे स्पष्ट काय ते सांग, मी तुझ्या विषयी जाणू इच्छितो. ॥१२॥
यथा हि तव वै दैन्यं रूपं चाप्यतिमानुषम् ।
तपसा चान्वितो वेषस्त्वं राममहिषी ध्रुवम् ॥ १३ ॥
दुःखामुळे तुझ्या ठिकाणी जी दीनता आली आहे, जसे तुझे अलौकिक रूप आहे आणि जसा तपस्विनी प्रमाणे तुझा वेष आहे त्या सर्व गोष्टींच्या द्वारा तू श्रीरामचन्द्रांची महाराणीच असावीस असे वाटते. ॥१३॥
सा तस्य वचनं श्रुत्वा रामकीर्तनहर्षिता ।
उवाच वाक्यं वैदेही हनुमन्तं द्रुमाश्रितम् ॥ १४ ॥
हनुमन्ताचे भाषण ऐकून, श्रीरामचन्द्रांची चर्चा ऐकून, वैदेही सीता अत्यन्त प्रसन्न झाली आणि म्हणून वृक्षाचा आधार घेऊन उभा असलेल्या हनुमन्तास या प्रमाणे म्हणाली - ॥१४॥
पृथिव्यां राजसिहानां मुख्यस्य विदितात्मनः ।
स्नुषा दशरथस्याहं शत्रुसैन्यप्रणाशिनः ॥ १५ ॥

दुहिता जनकस्याहं वैदेहस्य महात्मनः ।
सीतेति नाम्ना चोक्ताहं भार्या रामस्य धीमतः ॥ १६ ॥
हे कपिवर ! जे भूमण्डलावरील श्रेष्ठ राजांमध्ये मुख्य होते, ज्यांची सर्वत्र ख्याती होती आणि जे शत्रूंच्या सैन्याचा संहार करण्यास समर्थ होते त्या महाराज दशरथांची मी सून आहे, विदेहराज महात्मा जनकांची मी कन्या आहे आणि परम बुद्धिमान भगवान श्रीरामांची मी धर्मपत्‍नी आहे. माझे नाव सीता आहे. ॥१५-१६॥
समा द्वादश तत्राहं राघवस्य निवेशने ।
भुञ्जाना मानुषान् भोगान् सर्वकामसमृद्धिनी ॥ १७ ॥
अयोध्येमध्ये श्रीरघुनाथाच्या अन्तःपुरात बारा वर्षे पर्यन्त मी सर्व प्रकारच्या मानवीय भोगांचा उपभोग घेत होते आणि माझ्या सर्व अभिलाषा सदैव पूर्ण होत होत्या. ॥१७॥
ततस्त्रयोदशे वर्षे राज्ये चेक्ष्वाकुनन्दनम् ।
अभिषेचयितुं राजा सोपाध्यायः प्रचक्रमे ॥ १८ ॥
त्यानन्तर तेराव्या वर्षी महाराज दशरथांनी राजगुरु वसिष्ठांसह इक्ष्वाकु कुळभूषण भगवान श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास आरंभ केला. ॥१८॥
तस्मिन् सम्भ्रियमाणे तु राघवस्याभिषेचने ।
कैकेयी नाम भर्तारमिदं वचनमब्रवीत् ॥ १९ ॥
ज्यावेळी ते श्रीरघुनाथाच्या अभिषेकासाठी आवश्यक सामग्री एकत्रित करीत होते, त्यावेळी त्यांची कैकेयी नावाची भार्या याप्रकारे म्हणू लागली - ॥१९॥
न पिबेयं न खादेयं प्रत्यहं मम भोजनम् ।
एष मे जीवितस्यान्तो रामो यद्यभिषिच्यते ॥ २० ॥
आता मी पाणीही पिणार नाही अथवा अन्नही ग्रहण करणार नाही. जर श्रीरामास राज्याभिषेक झाला तर तोच माझ्या जीवनाचा अन्त ठरेल. ॥२०॥
यत् तदुक्तं त्वया वाक्यं प्रीत्या नृपतिसत्तम ।
तच्चेन्न वितथं कार्यं वनं गच्छतु राघवः ॥ २१ ॥
नृपश्रेष्ठा ! तुम्ही प्रसन्नतापूर्वक मला जे वचन दिले आहे ते जर असत्य करावयाचे नसेल, तर श्रीराम वनात निघून जाईल. ॥२१॥
स राजा सत्यवाग् देव्या वरदानमनुस्मरन् ।
मुमोह वचनं श्रुत्वा कैकेय्याः क्रूरमप्रियम् ॥ २२ ॥
महाराज दशरथ अत्यन्त सत्यवादी होते. त्यांनी देवी कैकेयीला दोन वर देण्याचे कबूल केले होते. त्या वरदानाचे स्मरण होऊन कैकेयीचे क्रूर आणि अप्रिय वचन ऐकून ते मूर्च्छितच झाले. ॥२२॥
ततस्तं स्थविरो राजा सत्ये धर्मे व्यवस्थितः ।
ज्येष्ठं यशस्विनं पुत्रं रुदन् राज्यमयाचत ॥ २३ ॥
त्यानन्तर सत्यधर्मात स्थित असणार्‍या वृद्ध महाराजांनी आपल्या यशस्वी ज्येष्ठ पुत्र श्रीरामाकडे भरतासाठी राज्याची याचना केली. ॥२३॥
स पितुर्वचनं श्रीमानभिषेकात् परं प्रियम् ।
मनसा पूर्वमासाद्य वाचा प्रतिगृहीतवान् ॥ २४ ॥
श्रीमान रामास पित्याचे वचन राज्याभिषेकापेक्षा श्रेष्ठ वाटले, म्हणून त्यांनी प्रथम ते वचन मनाने ग्रहण केले आणि नन्तर वाणीने ग्रहण केले. ॥२४॥
दद्यान्न प्रतिगृह्णीयात् सत्यं ब्रूयान्न चानृतम्म् ।
अपि जीवितहेतोर्हि रामः सत्यपराक्रमः ॥ २५ ॥
सत्य पराक्रमी भगवान श्रीराम केवळ देतात, घेत नाहीत. ते नेहमी सत्यच बोलतात, स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी सुद्धा ते कधी असत्य खोटे बोलू शकत नाहीत. ॥२५॥
स विहायोत्तरीयाणि महार्हाणि महायशाः ।
विसृज्य मनसा राज्यं जनन्यै मां समादिशत् ॥ २६ ॥
त्या महायशस्वी श्रीरामांनी बहुमूल्य उत्तरीय वस्त्रे उतरवून ठेवली आणि मनाने राज्याचा त्याग करून, मला आपल्या मातेच्या स्वाधीन केले. ॥२६॥
सा ऽहं तस्याग्रतस्तूर्णं प्रस्थिता वनचारिणी ।
न हि मे तेन हीनाया वासः स्वर्गेऽपि रोचते ॥ २७ ॥
परन्तु मी तात्काळ त्यांच्याही पुढे वनात जाण्यास निघाले. कारण त्यांच्याशिवाय स्वर्गात राहाणे सुद्धा मला चांगले वाटत नाही. ॥२७॥
प्रागेव तु महाभागः सौमित्रिर्मित्रनन्दनः ।
पूर्वजस्यानुयात्रार्थे कुशचीरैः अलङ्‌कृतः ॥ २८ ॥
आपल्या सुहृदांना आनन्द देणारे सुमित्रानन्दन महाभाग लक्ष्मणही आपल्या वडील बन्धूचे अनुसरण करण्यासाठी त्यांच्याही आधी कुश आणि चीरवस्त्र धारण करून तयार झाले होते. ॥२८॥
ते वयं भर्तुरादेशं बहुमान्य दृढव्रताः ।
प्रविष्टाः स्म पुरादृष्टं वन गम्भीरदर्शनम् ॥ २९ ॥
याप्रकारे आम्ही तिघांनी आमचे स्वामी महाराज दशरथ यांच्या आज्ञेचा आदर करून दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करीत अशा घनदाट अरण्यात प्रवेश केला की जे आम्ही पूर्वी कधींही पाहिलेले नव्हते. ॥२९॥
वसतो दण्डकारण्ये तस्याहममितौजसः ।
रक्षसापहृता भार्या रावणेन दुरात्मना ॥ ३० ॥
तेथे दंडकारण्यात राहात असता अमित तेजस्वी श्रीरामांच्या भार्येचे, माझे सीतेचे दुरात्मा राक्षस रावण याने अपहरण करून मला येथे आणले आहे. ॥३०॥
द्वौ मासौ तेन मे कालो जीवितानुग्रहः कृतः ।
ऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां ततस्त्यक्ष्यामि जीवितम् ॥ ३१ ॥
त्याने अनुग्रहपूर्वक मला जीवन धारण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे (निश्चित केली आहे). त्या दोन महिन्यानन्तर मला आपल्या प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तेहतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३३॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP