श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ पञ्चचत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मंत्रिणः सप्तपुत्राणां वधः -
सात अमात्यपुत्रांचा वध -
ततस्ते राक्षसेन्द्रेण चोदिता मंत्रिणः सुताः ।
निर्युयुर्भवनात् तस्मात् सप्त सप्तार्चिवर्चसः ॥ १ ॥
त्यानंतर राक्षसाधिपती रावणाची आज्ञा मिळताच, ते अग्नीसारखे तेजस्वी सात मंत्रीपुत्र राजमहालातून बाहेर पडले. ॥१॥
महद्‌बलपरीवारा धनुष्मन्तो महाबलाः ।
कृतास्त्रास्त्रविदां श्रेष्ठाः परस्परजयैषिणः ॥ २ ॥
त्यांच्या बरोबर फार मोठी सेना होती. ते अत्यंत बलाढ्‍य, धनुर्धर, अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ, तसेच परस्परांत चढाओढ करून शत्रूवर जय मिळविण्याची इच्छा करणारे होते. ॥२॥
हेमजालपरिक्षिप्तैः ध्वजवद्‌भिः पताकिभिः ।
तोयदस्वननिर्घोषैः वाजियुक्तैर्महारथैः ॥ ३ ॥

तप्तकाञ्चनचित्राणि चापान्यमितविक्रमाः ।
विस्फारयन्तः संहृष्टाः तडिद्वन्त इवाम्बुदाः ॥ ४ ॥
त्यांच्या रथास घोडे जोडलेले होते व ते सोन्याने मढविलेले असून ध्वज आणि पताकांनी युक्त होते, त्या रथांच्या चाकांचा मेघगर्जनेप्रमाणे गंभीर आवाज येत होता. अशा विशाल रथांवर आरूढ होऊन ते अतुलपराक्रमी मंत्रीपुत्र आनंदीत होऊन सोन्याने मढविलेल्या धनुष्यांचा टणत्कार करू लागले असता विद्युल्लतेने युक्त असलेल्या मेघांप्रमाणे शोभू लागले. ॥३-४॥
जनन्यस्ताः ततस्तेषां विदित्वा किंकरान् हतान् ।
बभूवुः शोकसम्भ्रान्ताः सबांधवसुहृज्जनाः ॥ ५ ॥
त्यावेळी प्रथम जे किंकर नावाचे राक्षस मारले गेले होते, त्यांच्या मृत्युचा समाचार मिळाल्यामुळे या सर्वांच्या माता अमंगलाच्या आशंकेने, बंधु-बांधव आणि सुहृदजनांसह शोकाने व्याकुळ झाल्या. ॥५॥
ते परस्परसङ्घर्षात् तप्तकाञ्चनभूषणाः ।
अभिपेतुर्हनूमन्तं तोरणस्थं अवस्थितम् ॥ ६ ॥
त्याचवेळी इकडे जय प्राप्त करून घेण्याविषयी एकमेकाशी स्पर्धा करीत असलेले आणि उत्कृष्ट सोन्याची भूषणे धारण केलेले मंत्रीपुत्र दरवाजावर बसलेल्या हनुमंतावर चालून गेले. ॥६॥
सृजन्तो बाणवृष्टिं ते रथगर्जितनिःस्वनाः ।
प्रावृट्काल इवाम्भोदा विचेरुर्नैर्ऋताम्बुदाः ॥ ७ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळात मेघ वृष्टी करीत विचरण करीत असतात त्याप्रमाणेच हे राक्षसरूपी मेघ बाणांची वृष्टी करीत तेथे विचरण करू लागले. त्यांच्या रथांचा घडघडाट हीच त्या मेघांची गर्जना होती. ॥७॥
अवकीर्णस्ततस्ताभिः हनुमान् शरवृष्टिभिः ।
अभवत् संवृताकारः शैलराडिव वृष्टिभिः ॥ ८ ॥

त्यानंतर एखादा शैलराज जलवृष्टीने झाकला जावा त्याप्रमाणे त्या राक्षसांच्या द्वारा झालेल्या बाणांच्या वृष्टीमुळे हनुमान आच्छादित झाले. ॥८॥
स शरान् वंचयामास तेषामाशुचरः कपिः ।
रथवेगं च वीराणां विचरन् विमलेऽम्बरे ॥ ९ ॥
त्यावेळी निर्मळ आकाशात शीघ्रगतीने संचार करीत कपिवर हनुमान त्या राक्षसवीरांचे बाण आणि त्यांच्या रथांचे वेग यांना निष्फळ करीत आपला स्वतःचा बचाव करू लागले. ॥९॥
स तैः क्रीडन् धनुष्मद्‌भिः व्योम्नि वीरः प्रकाशते ।
धनुष्मद्‌भिर्यथा मेघैः मारुतः प्रभुरम्बरे ॥ १० ॥
ज्याप्रमाणे व्योममंडलात शक्तिशाली वायुदेव इंद्रधनुष्ययुक्त मेघांशी क्रीडा करीत असतो, त्याप्रमाणेच वीर मारूती त्या धनुर्धर वीरांबरोबर जणु खेळच करीत करीत या आकाशात अद्‍भुत शोभा प्राप्त करीत होते. ॥१०॥
स कृत्वा निनदं घोरं त्रासयंस्तां महाचमूम् ।
चकार हनुमान् वेगं तेषु रक्षःसु वीर्यवान् ॥ ११ ॥
पराक्रमी हनुमंताने राक्षसांच्या त्या विशाल सेनेला भयभीत करीत अत्यंत घोर गर्जना केली आणि त्या राक्षसांवर अत्यंत वेगाने आक्रमण केले. ॥११॥
तलेनाभिहनत् कांश्चित् पादैः कांश्चित् परंतपः ।
मुष्टिभिश्चाहनत् कांश्चिन् नखैः कांश्चिद् व्यदारयत् ॥ १२ ॥
शत्रूंना संताप देणार्‍या त्या वानरवीराने काहींना थप्पड मारून ठार केले, काहींना पायाने तुडवून टाकले तर काहींना गुद्दे मारून ठार केले तर आणखी कांहीना नखांनी विदारून फाडून टाकले. ॥१२॥
प्रममाथोरसा कांश्चिद् ऊरुभ्यामपरानपिः ।
केचित् तस्यैव नादेन तत्रैव पतिता भुवि ॥ १३ ॥
काहींना वक्षःस्थळाने ताडण करून त्यांचा वध केला तर कुणाला लाथा मारूनच परलोकी धाडले. कित्येक निशाचर तर त्यांच्या गर्जनेनेच प्राणहीन होऊन तेथेच जमिनीवर कोसळले. ॥१३॥
ततस्तेष्ववसन्नेषु भूमौ निपतितेषु च ।
तत्सैन्यमगमत् सर्वं दिशो भयार्दितम् ॥ १४ ॥
याप्रकारे ज्यावेळी सर्व मंत्रीपुत्र मारले जाऊन धराशायी झाले तेव्हा त्यांचे उरले सुरले सर्व सैन्य भयभीत होऊन दशदिशास पळून गेले. ॥१४॥
विनेदुर्विस्वरं नागा निपेतुर्भुवि वाजिनः ।
भग्ननीडध्वजः छत्त्रैः भूश्च कीर्णाभवद् रथैः ॥ १५ ॥
त्यावेळी हत्ती वेदनांनी अत्यंत वाईट तर्‍हेने गर्जना करू लागले. घोडे जमिनीवर मरून पडले होते आणि ज्यांची बैठक, ध्वज आणि छत्र आदि मोडून तोडून गेलेली होती अशा भग्न झालेल्या रथांनी रणभूमी व्याप्त झाली होती. ॥१५॥
स्रवता रुधिरेणाथ स्रवन्त्यो दर्शिताः पथि ।
विविधैश्च स्वरैर्लङ्का ननाद विकृतं तदा ॥ १६ ॥
राक्षसांच्या शरीरांतून रक्त वाहू लागल्यामुळे मार्गामध्ये रक्ताच्या नद्याच दृष्टीस पडू लागल्या आणि नाना प्रकारच्या आरोळ्यांनी लंका भेसूर नाद करू लागली. ॥१६॥
स तान् प्रवृद्धान् विनिहत्य राक्षसान्
महाबलश्चण्डपराक्रमः कपिः ।
युयुत्सुरन्यैः पुनरेव राक्षसैः
तमेव वीरोऽभिजगाम तोरणम् ॥ १७ ॥
ते महाबलाढ्‍य आणि अत्यंत पराक्रमी वानरवीर हनुमान त्या मत्त राक्षसांचा वध करून इतर दुसर्‍या राक्षसांशी युद्ध करण्याच्या इच्छेने पुन्हा त्या दरवाजावरच जाऊन बसले. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा पंचेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP