श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ त्रिपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
निवर्तनाय नियतमवधितमतीत्यापि कार्यस्यासाधनात् सुग्रीवस्योग्रदण्डतो विभ्यतामङ्‌गदप्रभृतीनां कपीनामुपोष्य प्राणान् परित्यक्तुं निश्चयः - परतण्याची मुदत उलटून जाऊनही कार्य सिद्ध न झाल्यामुळे सुग्रीवाच्या कठोर दण्डास घाबरण्यार्‍या अंगद आदि वानरांचा उपवास करून प्राणत्याग करण्याचा निश्चय -
ततस्ते ददृशुर्घोरं सागरं वरुणालयम् ।
अपारमभिगर्जंतं घोरैरूर्मिभिराकुलम् ॥ १ ॥
त्यानंतर त्या श्रेष्ठ वानरांनी वरुणाची निवासभूमी असलेल्या भयंकर महासागराला पाहिले, ज्याचा कोठे पारच लागत नव्हता आणि जो भयानक लहरींनी व्याप्त होऊन निरंतर गर्जना करीत होता. ॥१॥
मयस्य मायाविहितं गिरिदुर्गं विचिन्वताम् ।
तेषां मासो व्यतिक्रांतो यो राज्ञा समयः कृतः ॥ २ ॥
मयासुराने आपल्या मायेद्वारा बनविलेल्या पर्वताच्या दुर्गम गुहेमध्ये सीतेचा शोध करीत असलेल्या त्या वानरांचा एक महिना निघून गेला, जो काल सुग्रीवाने परत येण्याची मुदत म्हणून निश्चित केला होता. ॥२॥
विंध्यस्य तु गिरेः पादे संप्रपुष्पितपादपे ।
उपविश्य महात्मानः चिंतामापेदिरे तदा ॥ ३ ॥
विंध्यगिरिच्या पाश्ववर्ती पर्वतावर बसून, जेथील वृक्ष फुलांनी लगडलेले होते, ते सर्व महात्मा वानर चिंता करू लागले. ॥३॥
ततः पुष्पातिभाराग्रान् लताशतसमावृतान् ।
द्रुमान् वासंतिकान् दृष्ट्‍वा बभूवुर्भयशङ्‌किदताः ॥ ४ ॥
जे वसंत ऋतूत फळतात त्या आम्र आदि वृक्षांच्या डहाळ्या मंजिरी आणि फुलांच्या अधिक भाराने वाकलेल्या तसेच शेकडो लता-वेलींनी व्याप्त पाहून ते सर्व सुग्रीवाच्या भयाने कापू लागले. (ते शरद ऋतुमध्ये निघाले होते आणि शिशिर ऋतु आला होता, म्हणून त्यांचे भय वाढले होते.) ॥४॥
ते वसंतमनुप्राप्तं प्रतिवेद्य परस्परम् ।
नष्टसंदेशकालार्था निपेतुर्धरणीतले ॥ ५ ॥
ते एक दुसर्‍याला असे सांगून, की आता वसंताचा समय येत आहे, राजाच्या आदेशानुसार एका महिन्यात जे काम करावयास पाहिजे होते. ते कार्य न झाल्यामुळे भयामुळे ते सर्व पृथ्वीवर कोसळले. ॥५॥
ततस्तान् कपिवृद्धांश्च शिष्टांश्चैव वनौकसः ।
वाचा मधुरयाऽऽभाष्य यथावदनुमान्य च ॥ ६ ॥

स तु सिंहवृषस्कंधः पीनायतभुजः कपिः ।
युवराजो महाप्राज्ञ अङ्‌गपदो वाक्यमब्रवीत् ॥ ७ ॥
तेव्हा ज्यांचे खांदे सिंह आणि बैलाप्रमाणे मांसल होते, भुजा मोठ मोठ्या आणि गोल होत्या तसेच जे अत्यंत बुद्धिमान् होते ते युवराज अंगद त्या श्रेष्ठ वानरांना तसेच वनवासी कपिंना यथोचित सन्मान देऊन मधुर वाणीने संबोधित करून म्हणाले- ॥६-७॥
शासनात् कपिराजस्य वयं सर्वे विनिर्गताः ।
मासः पूर्णो बिलस्थानां हरयः किं न बुध्यत ॥ ८ ॥

वयमाश्वयुजे मासि कालसंख्याव्यवस्थिताः ।
प्रस्थिताः सोऽपिचातीतः किमतः कार्यमुत्तरम् ॥ ९ ॥
’वानरांनो ! आपण सर्व जण वानरराजाच्या आज्ञेने अश्विन महिना सरता सरता एक महिन्याचा निश्चित अवधि मान्य करून सीतेच्या शोधासाठी निघालो होतो, परंतु आपला एक महिना गुहेतच पूरा झाला, काय आपण ही गोष्ट जाणत नाही ? आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा येण्यासाठी जो काल निर्धारित झाला होता, तोही निघून गेला आहे, म्हणून आता पुढे काय करायला हवे ? ॥८-९॥
भवंतः प्रत्ययं प्राप्ता नीतिमार्गविशारदाः ।
हितेष्वभिरता भर्तुः निसृष्टाः सर्वकर्मसु ॥ १० ॥
’आपल्याला राजाचा विश्वास प्राप्त आहे. आपण नीतिमार्गात निपुण आहात आणि स्वामिच्या हितात तत्पर असता. म्हणून आपण यथा समय सर्व कार्यांत नियुक्त केले जाता. ॥१०॥
कर्मस्वप्रतिमाः सर्वे दिक्षु विश्रुतपौरुषाः ।
मां पुरस्कृत्य निर्याताः पिङ्‌गाशक्षप्रतिचोदिताः ॥ ११ ॥

इदानीमकृतार्थानां मर्तव्यं नात्र संशयः ।
हरिराजस्य संदेशं अकृत्वा कः सुखी भवेत् ॥ १२ ॥
’कार्य सिद्ध करण्यात आपणा लोकांची बरोबरी करणारे कोणी नाही. आपण सर्व आपल्या पुरुषार्थासाठी सर्व दिशांमध्ये विख्यात आहात. या समयी वानरराज सुग्रीवाच्या आज्ञेने मला पुढे करून आपण सर्व ज्या कार्यासाठी निघालो होतो, त्यांत आपण आणि आम्ही सफल होऊ शकलो नाही. अशा स्थितिमध्ये आपणास आपले प्राण गमावून बसावे लागेल यात संशय नाही. भले, वानरराजाच्या आदेशाचे पालन न करता कोण सुखी राहू शकतो ? ॥११-१२॥
अस्मिन्नतीते काले तु सुग्रीवेण कृते स्वयम् ।
प्रायोपवेशनं युक्तं सर्वेषां च वनौकसाम् ॥ १३ ॥
’स्वतः सुग्रीवांनी जो समय निश्चित केला होता, तो उलटून गेल्यावर आम्हा सर्व वानरांनी उपवास करून प्राण त्याग करावा, हेच ठीक वाटते आहे. ॥१३॥
तीक्ष्णः प्रकृत्या सुग्रीवः स्वामिभावे व्यवस्थितः ।
न क्षमिष्यति नः सर्वान् अपराधकृतो गतान् ॥ १४ ॥
’सुग्रीव स्वभावानेच कठोर आहेत. त्यात या समयी ते आपल्या राजाच्या पदावर स्थित आहेत. जेव्हा आपण अपराध करून त्यांच्या जवळ जाऊ, तेव्हा ते कधी आपल्याला क्षमा करणार नाहीत. ॥१४॥
अप्रवृत्तौ च सीतायाः पापमेव करिष्यति ।
तस्मात्क्षममिहाद्यैव गंतुं प्रायोपविशनम् ॥ १५ ॥

त्यक्त्वा पुत्रांश्च दारांश्च धनानि च गृहाणि च ।
’उलट सीतेचा समाचार न मिळाल्याने ते आमचा वधच करून टाकतील. म्हणून आपल्याला आजच येथे स्त्री, पुत्र, धन-संपत्ति आणि घरादाराचा मोह सोडून प्राणांत उपवासास आरंभ केला पाहिजे. ॥१५ १/२॥
ध्रुवं नो हिंसिता राजा सर्वान् प्रतिगतानितः ॥ १६ ॥

वधेनाप्रतिरूपेण श्रेयान् मृत्युरिहैव नः ।
’येथून परत गेल्यावर राजा सुग्रीव निश्चितच आपणा सर्वांचा वध करून टाकतील. अनुचित वधापेक्षा येथे मरून जाणे आम्हा लोकांसाठी श्रेयस्कर आहे. ॥१६ १/२॥
न चाहं यौवराज्येन सुग्रीवेणाभिषेचितः ॥ १७ ॥

नरेंद्रेणाभिषिक्तोऽस्मि रामेणाक्लिष्टकर्मणा ।
’सुग्रीवांनी युवराज पदावर माझा अभिषेक केला नाही. अनायासेच महान् कर्म करणार्‍या महाराज श्रीरामांनीच त्या पदावर माझा अभिषेक केला आहे. ॥१७ १/२॥
स पूर्वं बद्धवैरो मां राजा दृष्ट्‍वा व्यतिक्रमम् ॥ १८ ॥

घातयिष्यति दण्डेन तीक्ष्णेन कृतनिश्चयः ।
’राजा सुग्रीवांनी तर प्रथमपासूनच माझ्याशी वैर बांधून ठेवले आहे. या समयी आज्ञा-उल्लंघनरूपी माझा अपराध पाहून पूर्वोक्त निश्चयास अनुसरून तीक्ष्ण दंड द्वारा मला मारतील. ॥१८ १/२॥
किं मे सुहृद्‌भिर्व्यसनं पश्यद्‌भिर्जीवितांतरे ।
इहैव प्रायमासिष्ये पुण्ये सागररोधसि ॥ १९ ॥
’जीवन कालात माझे संकट (राजांच्या हातांनी माझे मरण) पहाणार्‍या सुहृदांशी मला काय कर्तव्य आहे ? येथेच समुद्राच्या पावन तटावर मी मरणांत उपवास करीन.’ ॥१९॥
एतच्छ्रुत्वा कुमारेण युवराजेन भाषितम् ।
सर्वे ते वानरश्रेष्ठाः करुणं वाक्यमब्रुवन् ॥ २० ॥
युवराज वालीकुमार अंगदाचे हे बोलणे ऐकून ते सर्व श्रेष्ठ वानर करूण स्वराने म्हणाले- ॥२०॥
तीक्ष्णः प्रकृत्या सुग्रीवः प्रियारक्तश्च राघवः ।
समीक्ष्याकृतकार्यांस्तु तस्मिंश्च समये गते ॥ २१ ॥

अदृष्टायां तु वैदेह्यां दृष्ट्‍वा चैव समागतान् ।
राघवप्रियकामाय घातयिष्यत्यसंशयम् ॥ २२ ॥
’खरोखरच सुग्रीवाचा स्वभाव फार कठोर आहे. तिकडे राघव आपल्या प्रिय पत्‍नी सीतेप्रति अनुरक्त आहेत. सीतेचा शोध लावून परतण्यासाठी जो अवधि निश्चित केला होता तो समय व्यतीत होऊन गेल्यावर जर आम्ही कार्य केल्याशिवाय तेथे उपस्थित होऊ तर त्या स्थितिमध्ये आम्हांला पाहून आणि वैदेही सीतेचे दर्शन केल्याविनाच आम्ही परत आलो आहोत हे जाणून राघवांचे प्रिय करण्याच्या इच्छेने सुग्रीव आम्हांला मारवतील यात संशय नाही. ॥२१-२२॥
न क्षमं चापराद्धानां गमनं स्वामिपार्श्वतः ।
प्रधानभूताश्च वयं सुग्रीवस्य समागताः ॥ २३ ॥
’म्हणून अपराधी पुरुषांचे स्वामींजवळ परत जाणे कदापि उचित नाही. आपण सुग्रीवांचे प्रधान सहयोगी अथवा सेवक असल्यामुळेच इकडे त्यांनी धाडल्यावरून आलो होतो. ॥२३॥
इहैव सीतामन्विष्य प्रवृत्तिमुपलभ्य वा ।
नो चेद् गच्छाम तं वीरं गमिष्यामो यमक्षयम् ॥ २४ ॥
’जर येथे सीतेचे दर्शन करून अथवा तिचा समाचार जाणून वीर सुग्रीवांजवळ गेलो नाही तर अवश्यच आम्हांला यमलोकात जावे लागेल.’ ॥२४॥
प्लवंगमानां तु भयार्दितानां
श्रुत्वा वचस्तार इदं बभाषे ।
अलं विषादेन बिलं प्रविश्य
वसाम सर्वे यदि रोचते वः ॥ २५ ॥
भयाने पीडित झालेल्या त्या वानरांचे हे वचन ऐकून तारने म्हटले- ’येथे बसून विषाद करण्याने काही लाभ होणार नाही. जर आपण लोकांना ठीक वाटले तर आपण सर्वजण स्वयंप्रभेच्या त्या गुहेमध्येच प्रवेश करून निवास करू. ॥२५॥
इदं हि मायाविहितं सुदुर्गमं
प्रभूतवृक्षोदकभोज्यपेयम् ।
इहास्ति नो नैव भयं पुरंदरान्
न राघवाद्वानरराजतोऽपि वा ॥ २६ ॥
’ही गुहा मायेने निर्मित असल्याने अत्यंत दुर्गम आहे. तेथे फळे-फुले, जल आणि खाण्या पिण्याच्या दुसर्‍या वस्तुही प्रचुर मात्रे मध्ये उपलब्ध आहेत. म्हणून तिच्यामध्ये आपल्याला देवराज इंद्रापासून, राघवापासून अथवा वानरराजा सुग्रीवापासून ही भय नाही.’ ॥२६॥
श्रुत्वाऽङ्‌गादस्यापि वचोऽनुकूलं
उचुश्च सर्वे हरयः प्रतीताः ।
यथा न हन्येम तथा विधानं असक्तमद्यैव विधीयतां नः ॥ २७ ॥
तारने सांगितलेली पूर्वोक्त गोष्ट, जी अंगदालाही अनुकूल होती, ऐकून सर्व वानरांना तिच्याविषयी विश्वास वाटला. ते सर्वच्या सर्व एकदम म्हणाले- ’बंधुंनो ! आपण असे कार्य आजच अविलंब केले पाहिजे, ज्यायोगे आम्ही मारले जाणार नाही.’ ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP