[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कबन्धस्यात्मकथा स्वशरीरस्य दाहानन्तरं तेन सीतान्वेषणे श्रीरामाय साहाय्यं दातुमाश्वासनम् -
कबंधाची आत्मकथा, आपल्या शरीराचा दाह झाल्यावर त्याचे श्रीरामांना सीतेच्या अन्वेषणात सहायता देण्याचे आश्वासन -
पुरा राम महाबाहो महाबलपराक्रमम् ।
रूपमासीन्ममाचिन्त्यं त्रिषु लोकेषु विश्रुतम् ॥ १ ॥
महाबाहु श्रीराम ! पूर्वकाळी माझे रूप महान्‌ बलपराक्रमाने संपन्न, अचिन्त्य तसेच तीन्ही लोकात विख्यात होते. ॥१॥
यथा सूर्यस्य सोमस्य शक्रस्य च यथा वपुः ।
सोऽहं रूपमिदं कृत्वा लोकवित्रासनं महत् ॥ २ ॥

ऋषीन् वनगतान् राम त्रासयामि ततस्ततः ।
सूर्य, चंद्रमा आणि इंद्राचे शरीर जसे तेजस्वी आहे, तसेच माझेही होते. असे असूनही मी लोकांना भयभीत करणार्‍या या अत्यंत भयंकर राक्षस रूपास धारण करून इकडे तिकडे हिंडत असे आणि वनात राहाणार्‍या ऋषिंना घाबरवीत असे. ॥२ १/२॥
ततः स्थूलशिरा नाम महर्षिः कोपितो मया ॥ ३ ॥

स चिन्वन् विविधं वन्यं रूपेणानेन धर्षितः ।
तेनाहमुक्तः प्रेक्ष्यैवं घोरशापाभिधायिना ॥ ४ ॥
आपल्या या आचरणाने एक दिवस मी स्थूलशिरा नामक महर्षिला कुपित केले. ते नाना प्रकारचे जंगली फल-मूल आदिचा संचय करीत होते, त्या समयी मी त्यांना या राक्षसरूपाने घाबरविले. मला अशा विकट रूपात पाहून त्यांनी घोर शाप देत म्हटले- ॥३-४॥
एतदेवं नृशंसं ते रूपमस्तु विगर्हितम् ।
स मया याचितः क्रुद्धः शापस्यान्तो भवेदिति ॥ ५ ॥

अभिशापकृतस्येति तेनेदं भाषितं वचः ।
दुरात्मन ! आजपासून तुझ्यासाठी कायमच तुझे हेच क्रूर आणि निंद्य रूपच राहील. हे ऐकून मी त्या कुपित महर्षिंना प्रार्थना केली - भगवन्‌ ! या अभिशाप ( तिरस्कार) जनित शापाचा अंत झाला पाहिजे. तेव्हा त्यांनी या प्रकारे म्हटले- ॥५ १/२॥
यदा छित्त्वा भुजौ रामस्त्वां दहेद् विजने वने ॥ ६ ॥

तदा त्वं प्राप्स्यसे रूपं स्वमेव विपुलं शुभम् ।
श्रिया विराजितं पुत्रं दनोस्त्वं विद्धि लक्ष्मण ॥ ७ ॥
जेव्हा श्रीराम (आणि लक्ष्मण) तुझ्या दोन्ही भुजा कापून तुला निर्जन वनात जाळून टाकतील; तेव्हा तू पुन्हा आपल्या त्या परम उत्तम, सुंदर आणि शोभासंपन्न रूपास प्राप्त करून घेशील. लक्ष्मणा ! या प्रकारे तू मला एक दुराचारी दानव समज. ॥६-७॥
इन्द्रकोपादिदं रूपं प्राप्तमेवं रणाजिरे ।
अहं हि तपसोग्रेण पितामहमतोषयम् ॥ ८ ॥

दीर्घमायुः स मे प्रादात् ततो मां विभ्रमोस्पृशत् ।
दीर्घमायुर्मया प्राप्तं किं मे शक्रः करिष्यति ॥ ९ ॥
माझे जे हे असे रूप आहे ते समरांगणात इंद्राच्या क्रोधाने प्राप्त झालेले आहे. मी पूर्वकाळी राक्षस झाल्यानंतर घोर तपस्या करून पितामह ब्रह्मदेवांना संतुष्ट केले आणि त्यांनी मला दीर्घजीवी होण्याचा वर दिला. त्यामुळे माझ्या बुद्धिमध्ये हा भ्रम अथवा अहंकार उत्पन्न झाला की मला तर दीर्घकाळपर्यंत टिकून राहाणारे आयुष्य प्राप्त झाले आहे; मग इंद्र मला काय करणार आहे ? ॥८-९॥
इत्येवं बुद्धिमास्थाय रणे शक्रमधर्षयम् ।
तस्य बाहुप्रमुक्तेन वज्रेण शतपर्वणा ॥ १० ॥

सक्थिनी च शिरश्चैव शरीरे संप्रवेशितम् ।
अशा विचार करून एक दिवस मी युद्धात देवराजावर आक्रमण केले. त्या समयी इंद्रांनी माझ्यावर शंभर आरे असणार्‍या वज्राचा प्रहार केला. त्यांनी सोडलेल्या त्या वज्राने माझ्या जांघा आणि मस्तक माझ्याच शरीरात घुसून गेले. ॥१० १/२॥
स मया याच्यमानः सन् नानयद् यमसादनम् ॥ ११ ॥

पितामहवचः सत्यं तदस्त्विति ममाब्रवीत् ।
मी खूप प्रार्थना केली, म्हणून त्यांनी मला यमलोकात धाडले नाही आणि सांगितले- पितामह ब्रह्मदेवांनी जे तुला दीर्घजीवी होण्याचे वरदान दिले आहे, ते सत्य होवो. ॥११ १/२॥
अनाहारः कथं शक्तो भग्नसक्थिशिरोमुखः ॥ १२ ॥

वज्रेणाभिहतः कालं सुदीर्घमपि जीवितुम् ।
तेव्हा मी म्हटले- देवराज ! आपण आपल्या वज्राच्या माराने माझ्या जांघा, मस्तक आणि तोंड ही तोडून टाकले आहे. आता मी आहार कसा ग्रहण करूं आणि निराहार राहून कशा प्रकारे सुदीर्घ कालपर्यंत जीवित राहू शकेन ? ॥१२ १/२॥
स एवमुक्तः शक्रो मे बाहू योजनमायतौ ॥ १३ ॥

प्रादादास्यं च मे कुक्षौ तीक्ष्णदंष्ट्रमकल्पयत् ।
मी असे म्हटल्यावर इंद्रांनी माझ्या भुजा एकेक योजन लांब केल्या आणि तात्काळच माझ्या पोटात तीक्ष्ण दाढा असलेले एक तोंड बनविले. ॥१३ १/२॥
सोऽहं भुजाभ्यां दीर्घाभ्यां संक्षिप्यास्मिन् वनेचरान् ॥ १४ ॥

सिंहद्वीपमृगव्याघ्रान् भक्षयामि समन्ततः ।
याप्रकारे मी विशाल भुजांच्या द्वारा वनात राहाणार्‍या सिंह, चित्ते, हरीण आणि वाघ आदि जंतुंना सर्व बाजूनी पकडून खाऊन टाकत असे. ॥१४ १/२॥
स तु मामब्रवीदिंद्रो यदा रामः सलक्ष्मणः ॥ १५ ॥

छेत्स्यते समरे बाहू तदा स्वर्गं गमिष्यसि ।
इंद्राने मला हेही सांगितले होते की जेव्हा लक्ष्मणासहित श्रीराम तुझ्या भुजा कापून टाकतील तेव्हा तू स्वर्गात जाशील. ॥१५ १/२॥
अनेन वपुषा तात वनेऽस्मिन् राजसत्तम ॥ १६ ॥

यद् यत् पश्यामि सर्वस्य ग्रहणं साधु रोचये ।
तात ! राजशिरोमणे ! या शरीराने या वनामध्ये मी ज्या ज्या वस्तु पहातो त्या सर्व ग्रहण करणे मला योग्य वाटते. ॥१६ १/२॥
अवश्यं ग्रहणं रामो मन्येऽहं समुपैष्यति ॥ १७ ॥

इमां बुद्धिं पुरस्कृत्य देहन्यासकृतश्रमः ।
इंद्र तसेच मुनिंच्या कथनानुसार मला हा विश्वास होता की एक दिवस श्रीराम अवश्य माझ्या पकडीत येतील. हाच विचार समोर ठेवून मी या शरीराचा त्याग करण्यासाठी प्रयत्‍नशील होतो. ॥१७ १/२॥
स त्वं रामोऽसि भद्रं ते नाहमन्येन राघव ॥ १८ ॥

शक्यो हन्तुं यथा तत्त्वमेवमुक्तं महर्षिणा ।
राघव ! अवश्य आपणच राम आहात. आपले कल्याण होवो. मी आपल्या शिवाय दुसर्‍या कुणाकडूनही मारला जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट महर्षिंनी ठीकच सांगितली होती. ॥१८ १/२॥
अहं हि मतिसाचिव्यं करिष्यामि नरर्षभ ॥ १९ ॥

मित्रं चैवोपदेक्ष्यामि युवाभ्यां संस्कृतोऽग्निना ।
नरश्रेष्ठ ! आपण दोघे जेव्हा अग्निद्वारा माझा दाह-संस्कार कराल त्यावेळी मी आपली बौद्धिक सहायता करीन. आपणा दोघांसाठी एका चांगल्या मित्राचा पत्ता सांगेन. ॥१९ १/२॥
एवमुक्तस्तु धर्मात्मा दनुना तेन राघवः ॥ २० ॥

इदं जगाद वचनं लक्ष्मणस्य च पश्यतः ।
त्या दानवाने असे सांगितल्यावर धर्मात्मा राघवांनी लक्ष्मणा समोर त्यास याप्रकारे सांगितले - ॥२० १/२॥
रावणेन हृता भार्या मम सीता यशस्विनी ॥ २१ ॥

निष्क्रान्तस्य जनस्थानात् सह भ्रात्रा यथासुखम् ।
नाममात्रं तु जानामि न रूपं तस्य रक्षसः ॥ २२ ॥
कबंधा ! माझी यशस्विनी भार्या सीता हिला रावण हरण करून घेऊन गेला आहे. त्यावेळी मी आपला भाऊ लक्ष्मण यासह सुखपूर्वक जनस्थानाच्या बाहेर निघून गेलो होतो. मी त्या राक्षसाचे नाम मात्र जाणतो. मी त्याचे रूप वगैरेशी परिचित नाही. ॥२१-२२॥
निवासं वा प्रभावं वा वयं तस्य न विद्महे ।
शोकार्तानामनाथानामेवं विपरिधावताम् ॥ २३ ॥

कारुण्यं सदृशं कर्तुमुपकारेण वर्तताम् ।
तो कोठे राहातो आणि त्याचा प्रभाव कसा आहे या गोष्टिंविषयी आम्ही सर्वथा अनभिज्ञ आहोत. यासमयी सीतेचा शोक आम्हाला फार पीडा देत आहे. आम्ही असहाय होऊन याप्रकारे सर्व बाजूस धावतो आहोत. तू आमच्यावर समुचित करूणा करण्यासाठी या विषयी आमच्यावर काही उपकार कर. ॥२३ १/२॥
काष्ठान्यानीय भग्नानि काले शुष्काणि कुञ्जरैः ॥ २४ ॥

धक्ष्यामस्त्वां वयं वीर श्वभ्रे महति कल्पिते ।
वीरा ! नंतर आम्ही हत्तींच्या द्वारा तोडली गेलेली वाळलेली लाकडे आणून स्वतः खोदलेल्या एका फार मोठ्‍या खड्ड्यात तुझे शरीर ठेवून जाळून टाकू. ॥२४ १/२॥
स त्वं सीतां समाचक्ष्व येन वा यत्र वा हृता ॥ २५ ॥

कुरु कल्याणमत्यर्थं यदि जानासि तत्त्वतः ।
म्हणून आता तू आम्हांला सीतेचा पत्ता सांग. यासमयी ती कोठे आहे ? तसेच तिला कोण कोठे घेऊन गेला आहे ? जर ठीक ठीक जाणत असशील तर सीतेचा समाचार सांगून आमचे अत्यंत कल्याण कर. ॥२५ १/२॥
एवमुक्तस्तु रामेण वाक्यं दनुरनुत्तमम् ॥ २६ ॥

प्रोवाच कुशलो वक्ता वक्तारमपि राघवम् ।
श्रीरामांनी असे म्हटल्यावर वार्तालाप करण्यात कुशल त्या दानवाने त्या प्रवचनपटु राघवास ही परम उत्तम गोष्ट सांगितली- ॥२६ १/२॥
दिव्यमस्ति न मे ज्ञानं नाभिजानामि मैथिलीम् ॥ २७ ॥

यस्तां ज्ञास्यति तं वक्ष्ये दग्धः स्वं रूपमास्थितः ।
योऽभिजानाति तद् रक्षस्तद् वक्ष्ये राम तत्परम् ॥ २८ ॥
श्रीरामा ! या समयी मला दिव्यज्ञान नाही आहे. म्हणून मी मैथिलीच्या विषयी काहीही जाणत नाही. जेव्हा माझ्या या शरीराचा दाह होऊन जाईल तेव्हा मी आपल्या पूर्व रूपास प्राप्त होऊन कुणा अशा व्यक्तीचा पत्ता सांगू शकेन जो सीतेच्या विषयी आपल्याला काही सांगेल. तसेच जो त्या उत्कृष्ट राक्षसासही जाणत असेल अशा पुरुषाचा आपल्याला परिचय करून देईन. ॥२७-२८॥
अदग्धस्य तु विज्ञातुं शक्तिरस्ति न मे प्रभो ।
राक्षसं तु महावीर्यं सीता येन हृता तव ॥ २९ ॥
प्रभो ! जो पर्यंत माझ्या या शरीराचा दाह होत नाही तो पर्यंत माझ्यात हे जाणण्याची शक्ति येऊ शकत नाही की हा महापराक्रमी राक्षस कोण आहे ज्याने आपल्या सीतेचे अपहरण केले आहे. ॥२९॥
विज्ञानं हि महद् भ्रष्टं शापदोषेण राघव ।
स्वकृतेन मया प्राप्तं रूपं लोकविगर्हितम् ॥ ३० ॥
राघवा ! शाप-दोषामुळे माझे महान्‌ विज्ञान नष्ट झालेले आहे. आपल्याच करणीमुळे मला हे लोकनिंदीत रूप प्राप्त झाले आहे. ॥३०॥
किन्तु यावन्न यात्यस्तं सविता श्रान्तवाहनः ।
तावन्मामवटे क्षिप्त्वा दह राम यथाविधि ॥ ३१ ॥
परंतु श्रीराम ! जो पर्यंत सूर्यदेव आपली वाहने थकल्याने अस्तास जात नाहीत तो पर्यंत मला खड्‍ड्यात घालून शास्त्रीय विधिस अनुसरून माझा दाह संस्कार करावा. ॥३१॥
दग्धस्त्वयाहमवटे न्यायेन रघुनन्दन ।
वक्ष्यामि तं महावीर यस्तं वेस्यति राक्षसम् ॥ ३२ ॥
महावीर रघुनंदन ! आपल्या द्वारे विधिपूर्वक खड्‍ड्यात माझ्या शरीराचा दाह झाल्यावर मी अशा महापुरुषाचा परिचय देईन; जो त्या राक्षसास जाणत असेल. ॥३२॥
तेन सख्यं च कर्तव्यं न्याय्यवृत्तेन राघव ।
कल्पयिष्यति ते वीर साहाय्यं लघुविक्रम ॥ ३३ ॥
शीघ्र पराक्रम प्रकट करणार्‍या वीर राघवा ! न्यायोचित आचार संपन्न त्या महापुरुषांबरोबर आपल्याला मित्रता केली पाहिजे. ते आपली सहायता करतील. ॥३३॥
न हि तस्यास्त्यविज्ञातं त्रिषु लोकेषु राघव ।
सर्वान् परिवृतो लोकान् पुराऽसौ कारणान्तरे ॥ ३४ ॥
राघवा ! त्यांच्यासाठी तीन्ही लोकात काहीही अज्ञात नाही कारण काही कारणाने ते पूर्वीच समस्त लोकात फेरी मारून चुकले आहेत. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकसप्ततितमः सर्गः ॥ ७१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP