श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य सदस्यैः सह राजसभायां उपवेशनम् -
श्रीरामांचे सभासदांसह राजसभेत बसणे -
अभिषिक्ते तु काकुत्स्थे धर्मेण विदितात्मनि ।
व्यतीता या निशा पूर्वा पौराणां हर्षवर्धिनी ॥ १ ॥
काकुत्स्थ आत्मज्ञानी श्रीरामचंद्रांनी धर्मपूर्वक राज्याभिषेक झाल्यावर पुरवासी जनांचा हर्ष वाढविणारी त्यांची पहिली रात्र व्यतीत झाली. ॥१॥
तस्यां रजन्यां व्युष्टायां प्रातर्नृपतिबोधकाः ।
वन्दिनः समुपातिष्ठन् सौम्या नृपतिवेश्मनि ॥ २ ॥
ती रात्र संपून जेव्हा प्रातःकाल आला तेव्हा महाराज श्रीरामांना जागविणारे सौम्य बंदीजन राजमहालात उपस्थित झाले. ॥२॥
ते रक्तकण्ठिनः सर्वे किन्नरा इव शिक्षिताः ।
तुष्टुवुर्नृपतिं वीरं यथावत् सम्प्रहर्षिणः ॥ ३ ॥
त्यांचे कण्ठ अत्यंत मधुर होते. ते संगीत कलेमध्ये किन्नरांप्रमाणे सुशिक्षित होते. त्यांनी अत्यंत हर्षाने भरून यथावत्‌-रूपाने वीर नरेश श्रीरघुनाथांचे स्तवन करण्यास आरंभ केला. ॥३॥
वीर सौम्य प्रबुध्यस्व कौसल्याप्रीतिवर्धन ।
जगद्धि सर्वं स्वपिति त्वयि सुप्ते नराधिप ॥ ४ ॥
श्री कौसल्या (मातेचा) आनंद वाढविणार्‍या, सौम्य-स्वरूप वीर राघवा ! आपण जागे व्हा ! महाराज ! आपण झोपून राहिलात तर सारे जगतही झोपूनच राहील. (ब्राह्म मुहूर्तावर उठून धर्मानुष्ठानात लागू शकणार नाही.) ॥४॥
विक्रमस्ते यथा विष्णो रूपं चैवाश्विनोरिव ।
बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यः प्रजापतिसमो ह्यसि ॥ ५ ॥
आपला पराक्रम भगवान्‌ विष्णुंच्या समान, तसेच रूप अश्विनीकुमारांसारखे आहे. बुद्धिमध्ये आपण बृहस्पतितुल्य आहात आणि प्रजापालनांत साक्षात्‌ प्रजापति सदृश्य आहात. ॥५॥
क्षमा ते पृथिवीतुल्या तेजसा भास्करोपमः ।
वेगस्ते वायुना तुल्यो गाम्भीर्यमुदधेरिव ॥ ६ ॥
आपली क्षमा पृथ्वीसमान आणि तेज भगवान्‌ भास्करासमान आहे. वेग वायुतुल्य आणि गंभीरता समुद्र सदृश्य आहे. ॥६॥
अप्रकम्प्यो यता स्थाणुः चन्द्रे सौम्यत्वमीदृशम् ।
नेदृशाः पार्थिवाः पूर्वं भवितारो नराधिप ॥ ७ ॥
नरेश्वर ! आपण भगवान्‌ शंकरासमान युद्धात अविचल आहात. आपल्या सारखी सौम्यता फक्त चंद्रम्याच्या ठिकाणीच दिसून येते. आपल्या सारखा राजा पूर्वी कधी नव्हता आणि भविष्यातही नसेल. ॥७॥
यथा त्वमसि दुर्धर्षो धर्मनित्यः प्रजाहितः ।
न त्वां जहाति कीर्तिश्च लक्ष्मीश्च पुरुषर्षभ ॥ ८ ॥
पुरूषोत्तमा ! आपल्याला परास्त करणे केवळ कठीणच आहे असे नाही तर असंभव आहे. आपण सदा धर्मामध्ये संलग्न राहून प्रजेच्या हित साधण्यात तत्पर राहाता, म्हणून कीर्ती आणि लक्ष्मी आपल्याला कधी सोडत नाहीत. ॥८॥
श्रीश्च धर्मश्च काकुत्स्थ त्वयि नित्यं प्रतिष्ठितौ ।
एताश्चान्याश्च मधुरा वन्दिभिः परिकीर्तिताः ॥ ९ ॥
काकुत्स्थ ! ऐश्वर्य आणि धर्म आपल्या ठिकाणी नित्य प्रतिष्ठित आहेत. बंदीजनांनी ह्या आणि अशाच आणखीही बर्‍याच सुमधुर स्तुति ऐकविल्या. ॥९॥
सूताश्च संस्तवैर्दिव्यैः बोधयन्ति स्म राघवम् ।
स्तुतिभिः स्तूयमानाभिः प्रत्यबुध्यत राघवः ॥ १० ॥
सूतही दिव्य स्तुतिंच्या द्वारा राघवांना जागवत राहिले. याप्रकारे ऐकविल्या गेलेल्या स्तुतिंच्या द्वारे भगवान्‌ राघव जागे झाले. ॥१०॥
स तद्विहाय शयनं पाण्डराच्छादनास्तृतम् ।
उत्तस्थौ नागशयनाद् हरिर्नारायणो यथा ॥ ११ ॥
जसे पापहारी भगवान्‌ नारायण सर्पशय्यैवरून उठतात त्याच प्रकारे तेही श्वेत आच्छादनांनी झाकल्या गेलेल्या शय्येला सोडून उठून बसले. ॥११॥
तमुत्थितं महात्मानं प्रह्वाः प्राञ्जलयो नराः ।
सलिलं भाजनैः शुभ्रैः उपतस्थुः सहस्रशः ॥ १२ ॥
महाराज शय्येवरून उठताच हजारो सेवक विनयपूर्वक हात जोडून उज्ज्वल पात्रांत जल घेऊन त्यांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले. ॥१२॥
कृतोदकः शुचिर्भूत्वा काले हुतहुताशनः ।
देवागारं जगामाशु पुण्यमिक्ष्वाकुसेवितम् ॥ १३ ॥
स्नान आदि करून शुद्ध होऊन त्यांनी वेळेवर अग्निमध्ये आहुति दिली आणि शीघ्रच इक्ष्वाकुवंशीयांच्या द्वारा सेवित पवित्र देवमंदिरात ते आले. ॥१३॥
तत्र देवान् पितॄन् विप्रानर्चयित्वा यथाविधि ।
बाह्यकक्षान्तरं रामो निर्जगाम जनैर्वृतः ॥ १४ ॥
तेथे देवता, पितर आणि ब्राह्मणांचे विधिवत्‌ पूजन करून ते अनेक कर्मचार्‍यांबरोबर बाहेरील देवडीवर आले. ॥१४॥
उपतस्थुर्महात्मानो मन्त्रिणः सपुरोहिताः ।
वसिष्ठप्रमुखाः सर्वे दीप्यमाना इवाग्नयः ॥ १५ ॥
त्यासमयी प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी वसिष्ठ आदि सर्व महात्मे, मंत्री आणि पुरोहित तेथे उपस्थित झाले. ॥१५॥
क्षत्रियाश्च महात्मानो नानाजनपदेश्वराः ।
रामस्योपाविशन् पार्श्वे शक्रस्येव यथामराः ॥ १६ ॥
त्यानंतर अनेकानेक जनपदांचे स्वामी महामनस्वी क्षत्रिय श्रीरामांच्या जवळ इंद्रासमीप देवता येऊन बसतात त्याप्रमाणे येऊन बसले. ॥१६॥
भरतो लक्ष्मणश्चात्र शत्रुघ्नश्च महायशाः ।
उपासाञ्चक्रिरे हृष्टा वेदास्त्रय इवाध्वरम् ॥ १७ ॥
महामनस्वी भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न - हे तिघे भाऊ अत्यंत हर्षाने तीन वेद ज्याप्रमाणे यज्ञाच्या सेवेत उपस्थित होतात त्याप्रमाणे श्रीरामांच्या सेवेत उपस्थित झाले होते. ॥१७॥
याताः प्राञ्जलयो भूत्वा किंकरा मुदिताननाः ।
मुदिता नाम पार्श्वस्था बहवः समुपाविशन् ॥ १८ ॥
यासमयी मुदित नावाने प्रसिद्ध बरेचसे सेवकही, ज्यांच्या मुखावर प्रसन्नता खेळत होती, हात जोडून सभाभवनात आले आणि श्रीरघुनाथांजवळ बसले. ॥१८॥
वानराश्च महावीर्या विंशतिः कामरूपिणः ।
सुग्रीवप्रमुखा रामं उपासन्ते महौजसः ॥ १९ ॥
नंतर महापराक्रमी, महातेजस्वी तसेच इच्छेनुसार रूप धारण करणारे सुग्रीव आदि वीस(*) वानर येऊन श्रीरामांच्या समीप बसले. ॥१९॥
(* - सुग्रीव, अंगद, हनुमान्‌, जाम्बवान्‌, सुषेण, तार, नील, नल, मैंद, द्विविद, कुमुद, शरभ, शतबलि, गंधमादन, गज, गवाक्ष, गवय, धूम्र, रंभ तसेच ज्योतिमुख - हे प्रधान प्रधान वानर-वीर वीसच्या संख्येमध्ये उपस्थित होते.)
विभीषणश्च रक्षोभिः चतुर्भिः परिवारितः ।
उपासते महात्मानं धनेशमिव गुह्यकः ॥ २० ॥
आपल्या चार राक्षस मंत्र्यांनी घेरलेले विभीषणही जसे गुह्यकगण धनपति कुबेरांच्या सेवेमध्ये उपस्थित होतात त्याप्रमाणेच महात्मा श्रीरामांच्या सेवेत उपस्थित झाले. ॥२०॥
तथा निगमवृद्धाश्च कुलीना ये च मानवाः ।
शिरसाऽऽवन्द्य राजानं उपासन्ते विचक्षणाः ॥ २१ ॥
जे लोक शास्त्रज्ञानात वरचढ आणि कुलीन होते ते चतुर मानवही महाराजांना मस्तक नमवून प्रणाम करून तेथे येऊन बसले. ॥२१॥
तथा परिवृतो राजा श्रीमद्‌भिः ऋषिभिर्वृतः ।
राजभिश्च महावीर्यैः वानरैश्च सराक्षसैः ॥ २२ ॥
याप्रकारे बरेचसे श्रेष्ठ तसेच तेजस्वी महर्षि महापराक्रमी राजे, वानर आणि राक्षसांनी घेरलेल्या राजसभेत बसलेले श्रीरघुनाथ फारच शोभून दिसू लागले. ॥२२॥
यथा देवेश्वरो नित्यं ऋषिभिः समुपास्यते ।
अधिकस्तेन रूपेण सहस्राक्षाद् विरोचते ॥ २३ ॥
जसे देवराज इंद्र सदा ऋषिंनी सेवित असतात त्याच प्रमाणे महर्षि मंडळीनी घेरलेले श्रीरामचंद्र अत्यंत शोभून दिसत होते. ॥२३॥
तेषां समुपविष्टानां तास्ताः सुमधुराः कथाः ।
कथ्यन्ते धर्मसंयुक्ताः पुराणज्ञैर्महात्मभिः ॥ २४ ॥
जेव्हा सर्व लोक सभास्थानी बसून गेले तेव्हा पुराणवेत्ते महात्मे भिन्न भिन्न धर्म-कथा सांगू लागले.॥२४॥
( या सर्गा नंतर काही प्रतिंमध्ये प्रक्षिप्तरूपाने आणखी पाच सर्ग उपलब्ध होत आहेत, ज्यात वाली आणि सुग्रीवाच्या उत्पत्तिचे तसेच रावणाच्या श्वेतद्वीपांत गमनाचा इतिहास वर्णिला आहे. या इतिहासाचे वक्तेही अगस्त्यच आहेत. परंतु यापूर्वीच्या सर्गातच अगस्त्यांना निरोप दिल्याचे वर्णन आलेले आहे, म्हणून येथे त्या सर्गांचा उल्लेख असंगत प्रतीत होत आहे. म्हणून हे सर्ग येथे लिहिले गेले नाहीत. )
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥

याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सदतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP