| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय चौदावा ॥  रावणसैन्याचा विध्वंस
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
रावण आपल्या चतुरंग सैन्यासह अलकावती नगरीला पोचला :  
पूर्वप्रसंगीं रावण । रथावरी आरूढोन । सवें सेना प्रधान । जेथें वैश्रवण तेथें आला ॥१॥
 तदनंतरें विबुधारीं । चालिला अतिक्रोधेंकरीं ।
 समवेत प्रधान साही भारी । ब्रह्मांड उलथिती पैं ऐसे ॥२॥
 तयांची नांवे कोण कोण । मारीच महादेव प्रहस्त शुक सारण ।
 सहावा धुम्राक्ष ऐसे जाण । संग्रामीं बळ दारूण ज्यांचें ॥३॥
 जयांच्या पुरूषार्थापुढें । रावण कोणासी नातुडे ।
 जैसे साही ऋतु गाढे । आपुलेनि काळे शोभती॥४॥
 तेही साही प्रधान कैसे । क्रोधें सृष्टि जाळिती ऐसे ।
 चालिले अति आवेशें । नद्या पर्वत उल्लंघिती ॥५॥
 पुरें पाटणें ग्राम नगरें । लंघित वने उपवनें थोरें ।
 एका मुहूर्तें अति त्वरें । कैलसप्रति येते झाले ॥६॥
 अति पापिष्ठ रजनीचर । पावोनि कैलसपठार ।
 वेढिते झाले अलकानगर । तें कुबेरदूतीं देखीलें ॥७॥
 दूत म्हणती कुबेरबंधु । रावण आला करावया युद्ध ।
 तेणें सांडोनि सुहृदसंबंधु । यासीं आम्हीं झगडों नये ॥८॥
 राया जाणवूं हे मात । म्हणोनि दूत निघले त्वरित ।
 शीघ्र वैश्रवणा जाणवित। लंकनाथ युद्धा आला ॥९॥
 
 कुबेराची रावणाबरोबर युद्ध करण्याची सैन्याला आज्ञा :  
ऐकोनि दूतांचें वचन । कुबेर झाला क्रोधायमान । वेगीं म्हणे सैन्यालागुन । करा म्हणे संग्राम ॥१०॥
 ऐकोनि धनेशाची वचनावळी । वीर चालिले आर्तुबळी ।
 जैसी सागराची नव्हाळी । तैसे ते काळीं चालिले ॥११॥
 अश्वी चढले एक वीर । एकीं पालाणिले कुंजर ।
 एकीं सज्जले रहंवर । पायांचे मोगर धांवती ॥१२॥
 दोहीं सैन्यां झाली मिळणी । जैशा दोनी एक होती पुष्करिणी ।
 वर्षती उभयतां बाणीं । वीरश्रेणी लक्षोनियां ॥१३॥
 
कुबेर सैन्याकडून स्वतःच्या सैन्याचा संहार झालेला पाहून रावण स्वतः युद्ध करू लागला :
 
यक्षीं केला थोर मार । जैसा गगनीं वर्षे जळधर । रावणाचे प्रधान थोर थोर । रणीं घायाळ पाडिले ॥१४॥
 आणीक राक्षस पडिले रणीं । हें दशमुखें देखोनि नयनीं ।
 क्रोधें नेत्र आरक्त करूनी । परवीरांवरी लोटला ॥१५॥
 गर्जना करोनी अत्यंत गाढी । पाताळीं शेष हडबडी ।
 वराहाची दाढ तडतडी । कूर्म करी गाढ पृष्ठीतें ॥१६॥
 गगनीं नक्षत्रें कळकळिती । शशिसूर्य चळचळां कांपती सुरासुर ।
 ते काळीं प्रधानवीर । समस्त जाण एकवटले ॥१८॥
 पुनरपि रणीं मिसळले । घोरांदर युद्ध करिते झाले ।
 एकैक सहस्त्रेसीं भिडते झाले । रणमंडळीं ते काळीं ॥१९॥
 गदा परिघ शक्ति तोमर । घेवोनियां दशशिर ।
 करिता झाल विकट मार । परवीरांते देखोनी ॥२०॥
 
रावणाकडून यक्षसैन्याची दाणादाण :  
रावण रणीं खवळला । कुबेरसैन्या मारिता झाला। कित्येक वीरां निःपात केला। कित्येक निर्जीव केले रणभूमीं ॥२१॥
 जेंवी वर्षे माधव । तेंवी सोडोनी शर सर्व ।
 व्यथाभूत । करोनी सर्व । वीरां वीर आटिला ॥२२॥
 यक्षनायकाचें सैन्य। रणमंडळीं होवोनी भग्न ।
 जैसा वन्हि करी दहन । काष्ठांलागोन पर्वतीं ॥२३॥
 मारूत वन्हीस समस्त प्रधानेसीं रावण । कुबेरसैन्या करूनि भग्न ।
 कित्येक  भग्नांग होऊन । समरांगणीं उलंडले ॥२५॥
 कित्येक होटांसहित दांत । पडोनि रणीं कुंथत ।
 एक भयंकरोनि जीव देत । एक तळमळित मस्तकघातें ॥२६॥
 एकांचे तुटले कर । एकांचे फ़ुटलें शिर ।
 एकांचे घायाळ शरीर । चेंदाचेंद होवोनि ठेली ॥२७॥
 एकंसि भय अद्भुत । धवोंनि  प्रेतमाजि लपत ।
 एक ते फ़ळफ़ळां मूतत । राक्षसमार देखोनी ॥२८॥
 एकांची गेली शस्त्रसंपत्ती । एक मेलीं मढीं होवोनी ठाती ।
 ऐसी रावणें केली ख्याती । सीतापति अवधारिजे ॥२९॥
 शेषसैन्य जें उरलें । तें हळुहळु संग्राम करितें झालें ।
 त्यामध्यें कित्येक पळाले । नगरामाजि श्रीरामा ॥३०॥
 यक्षसैन्या झाली भंगाणी । उरले वीर रणमेदिनीं ।
 सांडोनीं प्रवेशले पुरी तत्क्षणीं । कुबेरा मात जाणविली॥३१॥
 
त्यामुळे संतप्त होऊन कुबेरने मारिचाला पाडले :  
स्वसैन्य भंगले ऐकोन । कुबेर झाला क्रोधायमान । संयुगकटक बोलवून । तयतें संग्रमा पाठविलें ॥३२॥
 संयुगकटकें रणभूमीसीं । मारीचास भेदिलें वर्मांगासीं ।
 बणीं भेदोनियां त्यासी । रणभूमीसीं पाडीलें ॥३३॥
 मुरारीनें मुर मारिला । षडाननें तारकासुर वधिला ।
 शक्रें वृत्र निःपातिला । तैसा यक्षें मारिला मारीच ॥३४॥
 मारीच पडला रणमेदिनीं । जैसा स्वर्गीहूनी पडे च्यवोनी ।
 पुण्यक्षयें मृत्युलोकीं प्राणी । तैसा प्रधान पाडिला ॥३५॥
 मारीच पडिला देखोन । रक्षसेंद्र कोपायमान ।
 वर्षता झाला शर दारूण । संयुगकटका घायाळ केलें ॥३६॥
 
रावणाच्या भीतीने कुबेर पळुन गेला :  
रक्तें डवरला यक्ष । दिसे जैसा वसंतिचा पळस । रण सांडोनी पुरीं  प्रवेश । पाठी देवोनी पळाला ॥३७॥
 पाठी लागले राक्षसगण । नगरद्वारासमीप येऊन ।
 पुढें झाला रावण । तंव द्वरपाळें देखिलें ॥३८॥
 
कुबेरच्य द्वारपाळाने  रावणासह सैन्याला पळवून लावले :  
श्रीरामचंद्रा अवधारीं । रावण प्रवेशतां अलकपुरीं । समवेत राक्षस सुरारी  । ते द्वारपाळनें निवारले ॥३९॥
 द्वारपाळ तो कैसा म्हणसी । ज्यासि यम कांपे चळचळासीं ।
 तेजें तरी सूर्यसद्दशी । रावणासीं भिडता झाला ॥४०॥
 ते द्वारींचें तोरण तोडून । सूर्यभानुनामें द्वारपाळ जाण ।
 झोडिता झाला राक्षसेंद्रालागून । रावण पळोन पैं गेला ॥४१॥
 सूर्यभानु द्वारपाळ । रावणासि मारिता तत्काळ ।
 ब्रह्मवचन होईल निष्फळ । म्हणोनि जीत सोडिला ॥४२॥
 द्वारपाळमाराभेण । राक्षससैन्या दाणादाण ।
 पळाले जीव घेवोन । पर्वत पाठारीं रिघाले ॥४३॥
 एक विंवरीं प्रवेशले । एक गिरिकंदरीं रिघाले ।
 एक नदी उतरोन गेले। आपुलिया स्वस्थळाप्रति ॥४४॥
 एक वृक्षी वळंघले । एक वृक्षबुदात रिघाले ।
 एक पर्वताकडे बैसले । धाक घेवोनि राक्षस ॥४५॥
 रावणें देवोनि पाठी । तेथोनि पळाला उठाउठीं ।
 पुढील कथा सुरस गोमटी । भवबंधच्छेदक ॥४६॥
 एका विनवी जनार्दनी ।जनार्दनाची एकपणीं ।
 सुरस कथा रामायण् । सावधान संती परिसावी ॥४७॥
 स्वस्ति श्रीभावार्थामायणे उत्तरकांडे एकाकारटिकायां
 रावणसैन्यभंगो नाम चतुर्दशोऽध्यायः॥१४॥ ओंव्या ॥४७॥
 GO TOP 
 
 |