श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुर्दश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य अजेयतां प्रतिपाद्य, विभीषणेन रावणं प्रति सीताया रामपार्श्वे प्रेषणायैव सम्मतिदानम् - विभीषणाने श्रीरामांना अजेय म्हणून सांगून त्यांच्यापाशी सीतेला परत देण्यास सम्मति देणे -
निशाचरेन्द्रस्य निशम्य वाक्यं
स कुम्भकर्णस्य च गर्जितानि ।
विभीषणो राक्षसराजमुख्यं
उवाच वाक्यं हितमर्थयुक्तम् ॥ १ ॥
राक्षसराज रावणाची ही वचने आणि कुंभकर्णांच्या गर्जना ऐकून विभीषणाने रावणाला ही सार्थक आणि हितकारक वचने सांगितली- ॥१॥
वृतो हि बाह्वन्तरभोगराशिः
चिन्ताविषः सुस्मिततीक्ष्णदंष्ट्रः ।
पञ्चाङ्‌गुलीपञ्चशिरोऽतिकायः
सीतामहाहिस्तव केन राजन् ॥ २ ॥
राजन्‌ ! सीता नामधारी विशालकाय महान्‌ सर्पाला कोणी आपल्या गळ्यात बांधून टाकले आहे ? तिच्या हृदयाचा भागच त्या सर्पाचे शरीर आहे; चिंता हेच विष आहे, सुंदर हास्य हीच तीक्ष्ण दाढ आहे आणि प्रत्येक हाताची पाच पाच बोटे हीच त्या सर्पाची पाच शिरे आहेत. ॥२॥
यावन्न लङ्‌कां समभिद्रवन्ति
बलीमुखाः पर्वतकूटमात्राः ।
दंष्ट्रायुधाश्चैव नखायुधाश्च
प्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ ३ ॥
जो पर्यंत पर्वत शिखरासमान उंच वानर, ज्यांचे दात आणि नखे ही आयुधे आहेत, लंकेवर चढाई करत नाहीत तो पर्यंतच आपण दशरथनंदन श्रीरामांच्या हाती मैथिली सीतेला सोपवावी. ॥३॥
यावन्न गृह्णन्ति शिरांसि बाणा
रामेरिता राक्षसपुङ्‌गवानाम् ।
वज्रोपमा वायुसमानवेगाः
प्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ ४ ॥
जोपर्यंत श्रीरामांनी सोडलेले वायुप्रमाणे वेगवान्‌ तसेच वज्रतुल्य बाण राक्षसपुंगवांची शिरे कापून टाकत नाहीत, तो पर्यंत आपण दाशरथी रामांच्या सेवेमध्ये मैथिलीला समर्पित करावे. ॥४॥
न कुम्भकर्णेन्द्रजितौ च राजन्
तथा महापार्श्वमहोदरौ वा ।
निकुम्भकुम्भौ च तथातिकायः
स्थातुं समर्था युधि राघवस्य ॥ ५ ॥
राजन्‌ ! हे कुंभकर्ण, महापार्श्व, महोदर, निकुम्भ, कुम्भ आणि अतिकाय - कोणी ही समरांगणात राघवासमोर उभे राहू शकत नाहीत. ॥५॥
जीवंस्तु रामस्य न मोक्ष्यसे त्वं
गुप्तः सवित्राप्यथवा मरुद्‌भिः ।
न वासवस्याङ्‌कगतो न मृत्योः
नभो न पातालमनुप्रविष्टः ॥ ६ ॥
जरी सूर्य अथवा वायु आपले रक्षण करतील, इंद्र अथवा यम आपल्याला अंकावर लपवून ठेवतील अथवा आपण आकाश अथवा पाताळात घुसून जाल तरीही श्रीरामांच्या हातून आपण जिवंत वाचू शकणार नाही. ॥६॥
निशम्य वाक्यं तु विभीषणस्य
ततः प्रहस्तो वचनं बभाषे ।
न नो भयं विद्म न दैवतेभ्यो
न दानवेभ्योऽप्यथवा कुदाचित् ॥ ७ ॥
विभीषणाचे हे बोलणे ऐकून प्रहस्ताने म्हटले- आम्ही देवता अथवा दानवांनाही कधी घाबरत नाही. भय काय वस्तु आहे, हे आम्ही जाणत ही नाही. ॥७॥
न यक्षगंधर्वमहोरगेभ्यो
भयं न सङ्‌ख्ये पतगोरगेभ्यः ।
कथं नु रामाद् भविता भयं नो
नरेंद्रपुत्रात् समरे कदाचित् ॥ ८ ॥
आम्हांला युद्धात यक्ष, गंधर्व, मोठमोठे नाग, पक्षी आणि सर्पांपासूनही भय वाटत नाही मग समरांगणात राजकुमार रामापासून आम्हाला कधी ही कसे भय वाटेल ? ॥८॥
प्रहस्तवाक्यं त्वहितं निशम्य
विभीषणो राजहितानुकाङ्‌क्षी ।
ततो महार्थं वचनं बभाषे
धर्मार्थकामेषु निविष्टबुद्धिः ॥ ९ ॥
विभीषण राजा रावणाचे खरे हितचिंतक होते. त्यांची बुद्धि धर्म, अर्थ आणि काम यात उत्तम प्रकारे स्थित झालेली होती. त्यांनी प्रहस्ताचे अहितकारक वचन ऐकून ही महान्‌ अर्थाने युक्त गोष्ट सांगितली- ॥९॥
प्रहस्त राजा च महोदरश्च
त्वं कुम्भकर्णश्च यथार्थजातम् ।
ब्रवीत रामं प्रति तन्न शक्यं
यथा गतिः स्वर्गमधर्मबुद्धेः ॥ १० ॥
प्रहस्ता ! महाराज रावण, महोदर, तुम्ही आणि कुंभकर्ण - श्रीरामांसंबंधी जे काही सांगत आहात ते सर्व तुमच्या कडून होणे शक्य नाही, ज्याप्रमाणे पापात्मा पुरूष स्वर्गामध्ये पोहोचू शकत नाही, त्याप्रमाणेच हे समज. ॥१०॥
वधस्तु रामस्य मया त्वया च
प्रहस्त सर्वैरपि राक्षसैर्वा ।
कथं भवेदर्थविशारदस्य
महार्णवं तर्तुमिवाप्लवस्य ॥ ११ ॥
प्रहस्ता ! श्रीराम अर्थविशारद आहेत. समस्त कार्ये साधण्यात कुशल आहेत. जसे जहाजाशिवाय अथवा नौकेशिवाय कोणी महासागराला पार करू शकत नाही त्याचप्रकारे माझ्याकडून, तुझ्याकडून अथवा समस्त राक्षसांकडूनही श्रीरामांचा वध होणे कसे संभव आहे ? ॥११॥
धर्मप्रधानस्य महारथस्य
इक्ष्वाकुवंशप्रभवस्य राज्ञः ।
पुरोऽस्य देवाश्च तथाविधस्य
कृत्येषु शक्तस्य भवन्ति मूढाः ॥ १२ ॥
श्रीराम धर्मालाच प्रधान वस्तु मानतात. त्यांचा प्रादुर्भाव इक्ष्वाकुकुळात झाला आहे. ते सर्व कार्ये संपादण्यास समर्थ असून महारथी वीर आहेत. (त्यांनी विराध, कबंध आणि वाली सारख्या वीरांना बघता बघता यमलोकात धाडून दिले होते) अशा प्रसिद्ध पराक्रमी राजा श्रीरामांशी प्रसंग पडल्यावर तर देवताही आपला हेकेखोरपणा (दांडगाई) विसरून जातील (मग आमची तुमची काय कथा आहे ?) ॥१२॥
तीक्ष्णा न तावत् तव कङ्‌कपत्रा
दुरासदा राघवविप्रमुक्ताः ।
भित्त्वा शरीरं प्रविशन्ति बाणाः
प्रहस्त तेनैव विकत्थसे त्वम् ॥ १३ ॥
प्रहस्ता ! अद्याप पर्यंत रामांनी सोडलेले कंकपत्रयुक्त, दुर्जय आणि तीक्ष्ण बाण तुझ्या शरीरास विदीर्ण करून आत घुसलेले नाहीत, म्हणूनच तू फुलवून फुलवून बोलत आहेस. ॥१३॥
भित्त्वा न तावत् प्रविशन्ति कायं
प्राणान्तिकास्तेऽशनितुल्यवेगाः ।
शिताः शरा राघव विप्रमुक्ताः
प्रहस्त तेनैव विकत्थसे त्वम् ॥ १४ ॥
प्रहस्ता ! राघवाचे बाण वज्रासमान वेगवान असतात. ते प्राणांचा अंत करूनच सोडतात. राघवाच्या धनुष्यांतून सुटलेले ते तीक्ष्ण बाण तुझ्या शरीरास छेदून आत घुसलेले नाहीत, म्हणूनच तू इतकी शेखी मिरवत आहेस. ॥१४॥
न रावणो नातिबलस्त्रिशीर्षो
न कुम्भकर्णोऽस्य सुतो निकुम्भः ।
न चेन्द्रजिद् दाशरथिं प्रवोढुं
त्वं वा रणे शक्रसमं समर्थः ॥ १५ ॥
रावण, महाबली त्रिशिरा, कुंभकर्णकुमार निकुम्भ आणि इंद्रविजयी मेघनादही समरांगणामध्ये इंद्रतुल्य तेजस्वी दाशरथि रामांचा वेग सहन करण्यास समर्थ नाहीत. ॥१५॥
देवान्तको वापि नरान्तको वा
तथातिकायोऽतिरथो महात्मा ।
अकम्पनश्चाद्रिसमानसारः
स्थातुं न शक्ता युधि राघवस्य ॥ १६ ॥
देवांतक, नरांतक, अतिकाय, महाकाय, अतिरथ तसेच पर्वतासमान शक्तिशाली अकंपनही युद्धभूमीमध्ये राघवासमोर टिकू शकत नाहीत. ॥१६॥
अयं हि राजा व्यसनाभिभूतो
मित्रैरमित्रप्रतिमैर्भवद्‌भिः ।
अन्वास्यते राक्षसनाशनार्थे
तीक्ष्णः प्रकृत्या ह्यसमीक्ष्यकारी ॥ १७ ॥
हे महाराज रावण तर व्यसनांना (*) वशीभूत आहेत; म्हणून विचार करून काम करीत नाहीत. याशिवाय हे स्वभावानेही कठोर आहेत तसेच राक्षसांच्या विनाशासाठी, तुमच्या सारख्या शत्रुतुल्य मित्रांच्या सेवेत उपस्थित राहात असतात. ॥१७॥
(*-राजांमध्ये सात व्यसने मानली गेली आहेत -
वाग्दंदयोस्तु पारूष्यमर्थदूषणमेव च । पान स्त्री मृगया द्यूतं व्यसनं सप्तधा प्रभो ॥ - (कामंदक नीतिचे वचन गोविंदराजाची टीका रामायण-भूषण मधून) वाणी आणि दंडाची कठोरता, धनाचा अपव्यय, मद्यपान, स्त्री, मृगया आणि द्यूत- ही राजाची सात प्रकारची व्यसने आहेत.)
अनन्तभोगेन सहस्रमूर्ध्ना
नागेन भीमेन महाबलेन ।
बलात्परिक्षिप्तमिमं भवन्तो
राजानमुत्क्षिप्य विमोचयन्तु ॥ १८ ॥
अनंत शारिरीक बलाने संपन्न, सहस्त्र फण्यांच्या आणि महान्‌ बलशाली भयंकर नागाने या राजाला बलपूर्वक आपल्या शरीराने वेढून टाकलेले आहे. तुम्ही सर्व लोक मिळून याला बंधनातून मुक्त करून प्राण संकटातून वाचवावे. (अर्थात श्रीरामांशी वैर बांधणे महान सर्पाच्या शरीराने वेढले जाण्याप्रमाणे आहे. हा भाव व्यक्त करण्यामुळे येथे निदर्शना अलंकार व्यंग आहे.) ॥१८॥
यावद्धि केशग्रहणात् सुहृद्‌भिः
समेत्य सर्वैः परिपूर्णकामैः ।
निगृह्य राजा परिरक्षितव्यो
भृतैर्यथा भीमबलैर्गृहीतः ॥ १९ ॥
या राजाकडून आत्तापर्यंत तुम्हां लोकांच्या सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत. आपण सर्व लोक यांचे हितैषी सुहृद आहात. म्हणून जसे भयंकर बलशाली भूतांनी झपाटलेल्या पुरूषास त्याचे हितैषी आत्मीय जन त्याच्या प्रति जबरदस्ती करूनही त्याचे रक्षण करतात, त्या प्रकारे आपण सर्व लोक एकमत होऊन - आवश्यकता वाटली तर ह्याचे केस पकडूनही याला अनुचित मार्गावर जाण्यापासून रोखावे आणि सर्व प्रकारांनी याचे रक्षण करावे. ॥१९॥
सुवारिणा राघवसागरेण
प्रच्छाद्यमानस्तरसा भवद्‌भिः ।
युक्तस्त्वयं तारयितुं समेत्य
काकुत्स्थपातालमुखे पतन् सः ॥ २० ॥
उत्तम चारित्र्यरूपी जलाने परिपूर्ण राघवरूपी समुद्र याला बुडवून राहिला आहे अथवा असे समजा की हा काकुत्स्थ (राम) रूपी पाताळाच्या खोल गर्तेमध्ये पडत आहे. अशा दशेमध्ये तुम्ही सर्व लोक मिळून याचा उद्धार करावयास पाहिजे. ॥२०॥
इदं पुरस्यास्य सराक्षसस्य
राज्ञश्च पथ्यं ससुहृज्जनस्य ।
सम्यग्घि वाक्यं स्वमतं ब्रवीमि
नरेंद्रपुत्राय ददातु मैथिलीम् ॥ २१ ॥
मी तर राक्षसांसहित या सार्‍या नगराच्या आणि सुहृदांसहित स्वत: महाराजांच्या हितासाठी आपली ही उत्तम सम्मति देत आहे की या राजकुमार श्रीरामांच्या हाती मैथिली सीतेस सोपवून द्यावे. ॥२१॥
परस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्वा
स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् ।
तथा स्वपक्षेऽप्यनुमृश्य बुद्ध्या
वदेत् क्षमं स्वामिहितं च मंत्री ॥ २२ ॥
वास्तविक जो आपल्या आणि शत्रुपक्षाच्या बल पराक्रमाला समजून घेऊन तसेच दोन्ही पक्षांची स्थिती, हानि आणि वृद्धिचा आपल्या बुद्धिद्वारा विचार करून जो स्वामीसाठी हितकारक आणि उचित असलेलीच गोष्ट सांगतो तो खरा मंत्री असतो. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौदावा सर्ग पूर्ण झाला. ॥१४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP