श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्वात्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता चिंताकुलस्य सुग्रीवस्य प्रबोधनम् - हनुमानांनी चिंतित झालेल्या सुग्रीवास समजाविणे -
अङ्‌गदस्य वचः श्रुत्वा सुग्रीवः सचिवैः सह ।
लक्ष्मणं कुपितं श्रुत्वा मुमोचासनमात्मवान् ॥ १ ॥
मंत्र्यांसहित अंगदांचे वचन ऐकून आणि लक्ष्मण कुपित झाल्याचा समाचार मिळून मनाला वश ठेवणारे सुग्रीव आसन सोडून उभे राहिले. ॥१॥
स च तानब्रवीद् वाक्यं निश्चित्य गुरुलाघवम् ।
मंत्रज्ञान् मंत्रकुशलो मंत्रेषु परिनिष्ठितः ॥ २ ॥
ते मंत्रणेचे (कर्तव्यविषयक विचाराचे) परिनिष्ठीत विद्वान् असल्याने मंत्र प्रयोगात अत्यंत कुशल होते. त्यांनी श्रीरामचंद्रांची महत्ता आणि त्यांच्या तुलनेत आपली क्षुद्रता यांचा विचार करून मंत्रज्ञ मंत्र्यांना म्हटले- ॥२॥
न मे दुर्व्याहृतं किञ्चित् नापि मे दुरनुष्ठितम् ।
लक्ष्मणो राघवभ्राता क्रुद्धः किमिति चिंतये ॥ ३ ॥
’मी तर कुठलीही अनुचित गोष्ट मुखावाटे उच्चारली नाही अथवा कुठले दुष्कर्मही केलेले नाही, तरीही राघवभ्राता लक्ष्मण माझ्यावर का कुपित झाले आहेत ? या गोष्टीचा मी वारंवार विचार करीत आहे. ॥३॥
असुहृद्‌भिर्ममामित्रैः नित्यमंतरदर्शिभिः ।
मम दोषानसंभूतान् श्रावितो राघवानुजः ॥ ४ ॥
’जे सदा माझे छिद्र पहाणारे आहेत आणि ज्यांचे हृदय माझ्यासंबंधी शुद्ध नाही, अशा शत्रूंनी निश्चितच राघवांचे लहान भाऊ लक्ष्मणांना माझे असे दोष ऐकविले आहेत की जे माझ्या ठिकाणी कधी प्रकट झालेले नाहीत. ॥४॥
अत्र तावद् यथाबुद्धि सर्वैरेव यथाविधि ।
भावस्य निश्चयस्तावद् विज्ञेयो निपुणं शनैः ॥ ५ ॥
’लक्ष्मणांच्या क्रोधाच्या विषयासंबंधी प्रथम तुम्ही सर्व लोकानी हळू हळू कुशलतापूर्वक त्यांच्या मनोभावासंबंधी विधिवत् निश्चय करून घ्यावयास हवा होता, की ज्यायोगे त्यांच्या कोपाचे यथार्थ रूपाने ज्ञान होईल. ॥५॥
न खल्वस्ति मम त्रासो लक्ष्मणान्नापि राघवात् ।
मित्रं त्वस्थानकुपितं जनयत्येव संभ्रमम् ॥ ६ ॥
’निश्चितच मला लक्ष्मणापासून तसेच राघवापासून काहीही भय नाही आहे, तथापि अपराधाशिवायच कुपित झालेला मित्र हृदयात भिती उत्पन्न करतोच. ॥६॥
सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् ।
अनित्यत्वात् तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते ॥ ७ ॥
’कुणालाही मित्र बनविणे सर्वथा सोपे आहे; कारण मनांतील भाव सदा एक सारखा राहात नाही. कुणाकडून थोडीशी जरी चहाडी केली गेली तर प्रेमात अंतर पडते. ॥७॥
अतो निमित्तं त्रस्तोऽहं रामेण तु महात्मना ।
यन्ममोपकृतं शक्यं प्रतिकर्तुं न तन्मया ॥ ८ ॥
’याच कारणाने मी अधिकच घाबरलो आहे, कारण महात्मा रामांनी माझ्यावर जो उपकार केला आहे, त्याची भरपाई करण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही आहे.’ ॥८॥
सुग्रीवेणैवमुक्ते तु हनूमान् हरिपुंगवः ।
उवाच स्वेन तर्केण मध्ये वानरमंत्रिणाम् ॥ ९ ॥
सुग्रीवांनी असे म्हटल्यावर वानरांमध्ये श्रेष्ठ हनुमान् आपल्या युक्तिचा आधार घेऊन वानर मंत्र्यांसमक्ष याप्रकारे बोलले- ॥९॥
सर्वथा नैतदाश्चर्यं यत् त्वं हरिगणेश्वर ।
न विस्मरसि सुस्निग्धं उपकारं कृतं शुभम् ॥ १० ॥
’कपिराज ! मित्राकडून अत्यंत स्नेहपूर्वक केला गेलेल्या उत्तम उपकाराला आपण जे विसरत नाही आहात यात सर्वथा काहीही आश्चर्याची गोष्ट नाही. (कारण चांगल्या पुरुषांचा असा स्वभावच असतो.) ॥१०॥
राघवेण तु वीरेण भयं उत्सृज्य दूरतः ।
त्वत् प्रियार्थं हतो वाली शक्रतुल्यपराक्रमः ॥ ११ ॥

सर्वथा प्रणयात् क्रुद्धो राघवो नात्र संशयः ।
भ्रातरं संप्रहितवान् लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ॥ १२ ॥
’वीरवर राघवांनी तर लोकापवादाचे भय सारून आपले प्रिय करण्यासाठी इंद्रतुल्य पराक्रमी वालीचा वध केला आहे. म्हणून ते निःसंदेह आपल्यावर कुपित नाहीत. श्रीरामांनी शोभा-संपत्तिची वृद्धि करणार्‍या आपला भाऊ लक्ष्मण यांस जे आपल्यापाशी धाडले आहे त्यास सर्वथा आपल्या प्रतिचे प्रेम कारण आहे. ॥११-१२॥
त्वं प्रमत्तो न जानीषे कालं कालविदां वर ।
फुल्लसप्तच्छदश्यामा प्रवृत्ता तु शरच्छुभा ॥ १३ ॥
’समयाचे ज्ञान ठेवणार्‍या श्रेष्ठ कपिराजा ! आपण सीतेचा शोध करण्यासाठी जो समय निश्चित केला होता, त्याचा आपल्याला सध्या प्रमादात पडल्यामुळे विसर पडला आहे. पहा न, सुंदर शरद ऋतुचा आरंभ झाला आहे जो विकसित झालेल्या सप्तच्छाच्या फुलांनी श्यामवर्णाने प्रतीत होत आहे, जो विकसित झालेल्या सप्तच्छाच्या फुलांनी श्यामवर्णाने प्रतीत होत आहे.’ ॥१३॥
निर्मलग्रहनक्षत्रा द्यौः प्रनष्टबलाहका ।
प्रसन्नाश्च दिशः सर्वाः सरितश्च सरांसि च ॥ १४ ॥
’आकाशात आता ढग नाहीत. ग्रह, नक्षत्र निर्मल दिसून येत आहेत. संपूर्ण दिशांमध्ये प्रकाश पसरला आहे तसेच नद्या आणि सरोवरांचे जल पूर्णतः स्वच्छ झालेले आहे. ॥१४॥
प्राप्तमुद्योगकालं तु नावैषि हरिपुंगव ।
त्वं प्रमत्त इति व्यक्तं लक्ष्मणोऽयमिहागतः ॥ १५ ॥
’वानरराज ! राजांसाठी विजय यात्रेची तयारी करण्याचा समय आलेला आहे; परंतु आपल्याला तर काही पत्ताही नाही आहे. यावरून स्पष्ट प्रतीत होत आहे की आपण प्रमादात पडला आहात, म्हणून लक्ष्मण येथे आले आहेत. ॥१५॥
आर्तस्य हृतदारस्य परुषं पुरुषांतरात् ।
वचनं मर्षणीयं ते राघवस्य महात्मनः ॥ १६ ॥
’महात्मा राघवांच्या पत्‍नीचे अपहरण झालेले आहे म्हणून ते फार दुःखी आहेत. म्हणून जर लक्ष्मणांच्या मुखाने त्यांचे काही कठोर वचन ऐकावे लागले तरी आपण ते गुपचुप सहन करावयास पाहिजे. ॥१६॥
कृतापराधस्य हि ते नान्यत् पश्याम्यहं क्षमम् ।
अंतरेणाञ्जलिं बद्ध्वा लक्ष्मणस्य प्रसादनात् ॥ १७ ॥
’आपल्याकडून अपराध झाला आहे. म्हणून हात जोडून लक्ष्मणांना प्रसन्न करण्याशिवाय आपल्यासाठी दुसरे आणखी काही उचित कर्तव्य मला दिसत नाही. ॥१७॥
नियुक्तैर्मंत्रिभिर्वाच्यो ह्यवश्यं पार्थिवो हितम् ।
अत एव भयं त्यक्त्वा ब्रवीम्यवधृतं वचः ॥ १८ ॥
’राजाच्या चांगलेपणाच्या (हिताच्या, कल्याणाच्या) कामावर नियुक्त केले गेलेल्या मंत्र्यांचे हे कर्तव्य आहे की राजाला त्याच्या हिताची गोष्ट अवश्य सांगावी. म्हणून मी भय सोडून आपला निश्चित विचार सांगत आहे. ॥१८॥
अभिक्रुद्धः समर्थो हि चापमुद्यम्य राघवः ।
सदेवासुरगंधर्वं वशे स्थापयितुं जगत् ॥ १९ ॥
’भगवान् राघव जर क्रोध करून हातात धनुष्य घेतील तर देवता, असुर, गंधर्वासहित संपूर्ण जगतास आपल्या वश करू शकतात. ॥१९॥
न स क्षमः कोपयितुं यः प्रसाद्यः पुनर्भवेत् ।
पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः ॥ २० ॥
’ज्यांना नंतर हात जोडून विनवावे लागते अशा पुरुषांना क्रोध उत्पन्न करणे कदापि उचित नाही आहे. विशेषतः जो पुरुष मित्राने पूर्वी केलेल्या उपकाराची आठवण ठेवतो आणि कृतज्ञ असतो, त्याने या गोष्टीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. ॥२०॥
तस्य मूर्ध्ना प्रणम्य त्वं सपुत्रः ससुहृज्जनः ।
राजंस्तिष्ठ स्वसमये भर्तुर्भार्येव तद्वशे ॥ २१ ॥
’राजन ! यासाठी आपण पुत्र आणि मित्रांसह मस्तक नमवून त्यांना प्रणाम करावा आणि आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहावे. ज्याप्रमाणे पत्‍नी आपल्या पतिच्या स्वाधीन राहाते त्याप्रकारे आपण सदा श्रीरामांच्या अधीन राहावे. ॥२१॥
न रामरामानुजशासनं त्वया
कपींद्र युक्तं मनसाप्यपोहितुम् ।
मनो हि ते ज्ञास्यति मानुषं बलं
सराघवस्यास्य सुरेंद्रवर्चसः ॥ २२ ॥
’वानरराज ! राम आणि रामानुज यांच्या आदेशाची आपण मनानेही उपेक्षा करता कामा नये. देवराज इंद्राप्रमाणे तेजस्वी लक्ष्मणासहित श्रीराघवांच्या अलौकिक बळाचे ज्ञान तर आपल्या मनाला आहेच.’ ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP