[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ सप्तमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणभवनस्य पुष्पकविमानस्य च वर्णनम् -
रावणाचे भुवन आणि पुष्पक विमानाचे वर्णन -
स वेश्मजालं बलवान् ददर्श
व्यासक्तवैदूर्यसुवर्णजालम् ।
यथा महत् प्रावृषि मेघजालं
विद्युत्पिनद्धं सविहङ्‌गजालम् ॥ १ ॥
बलवान वीर हनुमन्तांनी वैडूर्य रत्‍ने ज्यात जडविलेली आहेत अशा सुवर्णमय खिडक्यांनी सुशोभित तसेच पक्षिसमूहांनी युक्त भुवनांचा समुदाय पाहिला, जो वर्षाकालीन विद्युल्लतायुक्त विशाल मेघमाळेप्रमाणे मनोहर दिसत होता. ॥१॥
निवेशनानां विविधाश्च शालाः
प्रधानशङ्‌खायुधचापशालाः ।
मनोहराश्चापि पुनर्विशाला
ददर्श वेश्माद्रिषु चन्द्रशालाः ॥ २ ॥
त्यात नाना प्रकारच्या शाळा, मुख्यतः शंख आयुधे, धनुष्यांच्या शाळा तथा पर्वतासमान उंच महालांवर मनोहर आणि विशाल चन्द्रशाळा (गच्च्या) हनुमन्तानी पाहिल्या. ॥२॥
गृहाणि नानावसुराजितानि
देवासुरैश्चापि सुपूजितानि ।
सर्वैश्च दोषैः परिवर्जितानि
कपिर्ददर्श स्वबलार्जितानि ॥ ३ ॥
कपिश्रेष्ठ हनुमतांनी, ज्या घरांची प्रशंसा देवता आणि असुरही करीत होते अशी नाना प्रकारच्या रत्‍नांनी सुशोभित घरे पाहिली. ती गृहे संपूर्ण दोषरहित होती आणि रावणाने आपल्या पुरूषार्थाने (बळाने) त्यांची प्राप्ती करून घेतली होती. ॥३॥
तानि प्रयत्‍नाभिसमाहितानि
मयेन साक्षादिव निर्मितानि ।
महीतले सर्वगुणोत्तराणि
ददर्श लङ्‌काधिपतेर्गृहाणि ॥ ४ ॥
अत्यन्त परिश्रमपूर्वक ती घरे बनविली गेली होती आणि ती अशी अद्‍भुत दिसत होती कि जणु साक्षात मयदानवानेच त्यांना निर्माण केले आहे. हनुमन्ताने पाहिले की लङ्‌कापती रावणाची ती भुवने भूतलावर सर्व गुणांमध्ये सर्वापेक्षा वरचढ होती. ॥४॥
ततो ददर्शोच्छ्रितमेघरूपं
मनोहरं काञ्चनचारुरूपम् ।
रक्षोधिपस्यात्मबलानुरूपं
गृहोत्तमं ह्यप्रतिरूपरूपम् ॥ ५ ॥
नन्तर त्याने राक्षसराज रावणाचे त्याच्या शक्तीस अनुरूप असे अत्यन्त उत्तम आणि अनुपम भवन (पुष्पक विमान) पाहिले. ते मेघाप्रमाणे उंच, सुवर्णाप्रमाणे सुन्दर कान्ति असलेले आणि मनोहर होते. ॥५॥
महीतले स्वर्गमिव प्रकीर्णं
श्रिया ज्वलन्तं बहुरत्‍नकीर्णम् ।
नानातरूणां कुसुमावकीर्णं
गिरेरिवाग्रं रजसाऽवकीर्णम् ॥ ६ ॥
ते या भूतलावर पसरलेल्या सुवर्णासारखे दिसत होते. आपल्या कान्तिने ते प्रज्वलित झाल्यासारखे भासत होते. अनेकानेक रत्‍ने जडविलेले, विविध प्रकारच्या वृक्षांच्या फुलांनी आच्छादित तसेच पुष्प परागांनी भरलेले ते विमान पर्वत शिखरासारखे शोभून दिसत होते. ॥६॥
नारीप्रवेकैरिव दीप्यमानं
तडिद्‌भिरम्भोधरमर्च्यमानम् ।
हंसप्रवेकैरिव वाह्यमानं
श्रिया युतं खे सुकृतां विमानम् ॥ ७ ॥
विद्युत माळांनी पूजित मेघाप्रमाणे ते विमानरूपी भवन, रमणीरूपी रत्‍नांनी देदिप्यमान झाले होते आणि श्रेष्ठ हंसांच्या द्वारा ओढून नेल्या जाणार्‍या विमानाप्रमाणे भासत होते. त्या दिव्य विमानाची निर्मिती फार सुन्दररीतीने केली गेली होती. ते अद्‍भुत शोभेने संपन्न असे दिसत होते. ॥७॥
यथा नगाग्रं बहुधातुचित्रं
यथा नभश्च ग्रहचन्द्रचित्रम् ।
ददर्श युक्तीकृतचारुमेघ-
चित्रं विमानं बहुरत्‍नचित्रम् ॥ ८ ॥
ज्याप्रमाणे अनेक धातुंनी संपन्न पर्वतशिखर, ग्रह आणि चन्द्रमा यांच्यायोगे आकाश, आणि अनेक वर्णानी युक्त असल्यामुळे मनोहर मेघ विचित्र शोभा धारण करतात, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या रत्‍नांनी निर्मिति झाली असल्याने ते विमानही विचित्र शोभेने संपन्न दिसत होते. ॥८॥
मही कृता पर्वतराजिपूर्णा
शैलाः कृता वृक्षवितानपूर्णाः ।
वृक्षाः कृताः पुष्पवितानपूर्णाः
पुष्पं कृतं केसरपत्रपूर्णम् ॥ ९ ॥
त्या विमानाची आधारभूमी (आरोहण करणारांचे उभे राहाण्याचे स्थान) सोने आणि रत्‍नांच्या द्वारे निर्मित कृत्रिम पर्वतमाळांनी युक्त बनविली गेली होती. ते पर्वत वृक्षांच्या विस्तृत पक्तिंनी हिरवेगार रचलेले होते. आणि ते वृक्षही फुलांच्या विपुलतेने व्याप्त बनविले गेले होते, तसेच ती फुलेही केसर आणि पाकळ्यांनी परिपूर्ण अशी निर्मिलेली होती. ॥९॥
कृतानि वेश्मानि च पाण्डुराणि
तथा सुपुष्पाण्यपि पुष्कराणि ।
पुनश्च पद्मानि सकेसराणि
वनानि चित्राणि सरोवराणि ॥ १० ॥
त्या विमानात श्वेत भुवने बनविली गेली होती. सुन्दर फुलांनी सुशोभित पुष्करिणी बनविल्या होत्या. केसरयुक्त कमळे, विचित्र वने आणि अद्‍भुत सरोवरेही निर्माण केलेली होती. ॥१०॥
पुष्पाह्वयं नाम विराजमानं
रत्‍नप्रभाभिश्च विघूर्णमानम् ।
वेश्मोत्तमानामपि चोच्चमानं
महाकपिस्तत्र महाविमानम् ॥ ११ ॥
महाकपि हनुमन्तानी तेथे जे सुन्दर विमान पाहिले त्याचे नाव पुष्पक होते. ते रत्‍नांच्या प्रभेने प्रकाशमान झालेले होते आणि इकडे तिकडे भ्रमण करणारे, ज्याच्या प्रभेत वाढच होत आहे, असे ते देवतांच्या गृहाकार विमानान्त सर्वाधिक आदर केला जाईल, असे ते महाविमान पुष्पक त्यांनी पाहिले. ॥११॥
कृताश्च वैदूर्यमया विहङ्‌गा
रूप्यप्रवालैश्च तथा विहङ्‌गाः ।
चित्राश्च नानावसुभिर्भुजङ्‌गा
जात्यानुरूपास्तुरगाः शुभाङ्‌गाः ॥ १२ ॥
त्यान्त वैडूर्य, चान्दी आणि प्रवाळ (पोवळे) यांचे आकाशगमन करणारे पक्षी बनविलेले होते. नाना प्रकारच्या रत्‍नांचे विचित्र वर्णांचे सर्प निर्माण केले गेले होते आणि उत्तम जातीच्या घोड्‍याप्रमाणेच सुन्दर अंग असणारे अश्वही बनविले गेले होते. ॥१२॥
प्रवालजाम्बूनदपुष्पपक्षाः
सलीलमावर्जितजिह्मपक्षाः ।
कामस्य साक्षादिव भान्ति पक्षाः
कृता विहङ्‌गाः सुमुखाः सुपक्षाः ॥ १३ ॥
त्या विमानावर सुन्दर मुख आणि पंख असणारे जे अनेक विहंग (पक्षी) निर्मिलेले होते ते जणु साक्षात कामदेवाचे सहाय्यक वाटत होते. त्यांचे पंख प्रवाळानी आणि सुवर्णानी बनविलेल्या फुलांनी युक्त होते आणि त्यांनी लीलापूर्वक आपल्या वक्र पंखांना संकुचित करून घेतलेले होते. ॥१३॥
नियुज्यमानाश्च गजाः सुहस्ताः
सकेसराश्चोत्पलपत्रहस्ताः ।
बभूव देवी च कृता सुहस्ता
लक्ष्मीस्तथा पद्मिनि पद्महस्ता ॥ १४ ॥
त्या विमानाच्या कमळांनी सुशोभित सरोवरात लक्ष्मीच्या अभिषेक कार्यात नियुक्त असे हत्ती बनविले गेले होते. त्यांची सोंड फार सुन्दर होती, त्यांच्या अंगाला कमळांचे केसर लागलेले होते. आणि त्यांनी आपल्या सोंडेत कमळपुष्पे धारण केलेली होती. त्यांच्या बरोबरच तेथे तेजस्वी लक्ष्मी देवीची प्रतिमाही विराजमान झालेली होती आणि त्या हत्तींच्या द्वारे तिच्यावर अभिषेक केला जात होता. तिचे हात फारच सुन्दर होते आणि तिने आपल्या हातात कमळपुष्प धारण केलेले होते. ॥१४॥
इतीव तद्गृहमभिगम्य शोभनं
सविस्मयो नगमिव चारुकन्दरम् ।
पुनश्च तत्परमसुगन्धि सुन्दरं
हिमात्यये नगमिव चारुकन्दरम् ॥ १५ ॥
या प्रकारे सुन्दर गुहांनी युक्त पर्वतासमान तथा वसन्त ऋतूतील सुन्दर घरट्‍यांनी युक्त असलेल्या सुगन्धयुक्त वृक्षासमान सुशोभित अशा त्या मनोहर भवनात (विमानात) पोहोचल्यावर हनुमान अत्यन्त विस्मीत झाले. ॥१५॥
ततः स तां कपिरभिपत्य पूजितां
चरन् पुरीं दशमुखबाहुपालिताम् ।
अदृश्य तां जनकसुतां सुपूजितां
सुदुःखितां पतिगुणवेगनिर्जिताम् ॥ १६ ॥
त्यानन्तर दशमुख रावणाच्या बाहुबळाने संरक्षित त्या प्रशंसनीय पुरीमध्ये जाऊन चारी बाजूस फिरल्यावरही, पतीच्या गुणांच्या वेगाने पराजित (विमुग्ध), अत्यन्त दुःखी आणि परम पूजनीय जनककिशोरी सीता दृष्टीस न पडल्याने कपिश्रेष्ठ हनुमान अत्यन्त चिन्तित झाले. ॥१६॥
ततस्तदा बहुविधभावितात्मनः
कृतात्मनो जनकसुतां सुवर्त्मनः ।
अपश्यतोऽभवदतिदुःखितं मनः
सुचक्षुषः प्रविचरतो महात्मनः ॥ १७ ॥
महात्मा हनुमान अनेक प्रकारे परमार्थ-चिन्तनात तत्पर असणारे (कृतात्मा) म्हणजे पवित्र अन्तःकरणाचे, सन्मार्गगामी तसेच उत्तम दृष्टी ठेवणारे असून इकडे-तिकडे खूप शोध घेऊनही जानकीचा पत्ता न लागल्याने मनान्त अत्यन्त दुःखी झाले. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सातवा सर्ग पूरा झाला. ॥७॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP