श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणकर्तृकानुरोधेन श्रीरामेणेन्द्रजित् वधाय लक्ष्मणस्य प्रेषणं, लक्ष्मणस्य निकुम्भिलासमीपे गमनम् -
विभीषणांच्या अनुरोधाने श्रीरामचंद्रांचे लक्ष्मणांना इंद्रजिताच्या वधासाठी जाण्याची आज्ञा देणे आणि सेनेसहित लक्ष्मणांचे निकुम्भिला मंदिराच्या जवळ पोहोचणे -
तस्य तद्वचनं श्रुत्वा राघवः शोककर्शितः ।
नोपधारयते व्यक्तं यदुक्तं तेन रक्षसा ॥ १ ॥
भगवान्‌ श्रीराम शोकाने पीडित होते, म्हणून राक्षस विभीषणांनी जे काही सांगितले, ते त्यांचे वचन ऐकूनही ते स्पष्टरूपाने ते समजू शकले नाहीत - त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकले नाहीत. ॥१॥
ततो धैर्यं अवष्टभ्य रामः परपुरञ्जयः ।
विभीषणमुपासीनं उवाच कपिसन्निधौ ॥ २ ॥
त्यानंतर शत्रुनगरीवर विजय मिळविणारे श्रीराम धैर्य धारण करून हनुमानांच्या जवळ बसलेल्या विभीषणाला म्हणाले- ॥२॥
नैर्ऋताधिपते वाक्यं यदुक्तं ते विभीषण ।
भूयस्तच्छ्रोतुमिच्छामि ब्रूहि यत्ते विवक्षितम् ॥ ३ ॥
राक्षसराजा विभीषणा ! तुम्ही आत्ता जी गोष्ट सांगितली आहे ती मी पुन्हा ऐकू इच्छितो. सांगा, तुम्ही काय सांगू इच्छिता ? ॥३॥
राघवस्य वचः श्रुत्वा वाक्यं वाक्यविशारदः ।
यत् तत् पुनरिदं वाक्यं बभाषेऽथ विभीषणः ॥ ४ ॥
राघवांचे हे वचन ऐकून वाक्यविशारद विभीषणाने पूर्वी जी गोष्ट सांगितली होती तीच परत सांगून याप्रकारे म्हटले - ॥४॥
यथाऽऽज्ञप्तं महाबाहो त्वया गुल्मनिवेशनम् ।
तत् तथानुष्ठितं वीर त्वद्वाक्यसमनन्तरम् ॥ ५ ॥
महाबाहो ! आपण जी सेनेला यथास्थान स्थापित करण्याची आज्ञा दिली होती, वीरा ! हे काम तर मी आपली आज्ञा होताच पूर्ण केले आहे. ॥५॥
तान्यनीकानि सर्वाणि विभक्तानि समन्ततः ।
विन्यस्ता यूथपाश्चैव यथान्यायं विभागशः ॥ ६ ॥
त्या सर्व सेनेला विभक्त करून सर्व बाजूंनी लंका द्वारावर स्थापित केले आहे आणि यथोचित रीतिने तेथे वेगवेगळ्या यूथपतिंनाही नियुक्त केले आहे. ॥६॥
भूयस्तु मम विज्ञाप्यं तच्छृणुष्व महाप्रभो ।
त्वय्यकारणसन्तप्ते सन्तप्तहृदया वयम् ॥ ७ ॥
महाराज ! आता पुन्हा मला जी गोष्ट अपाल्या सेवेत निवेदन करावयाची आहे, ती ऐकावी. काही कारण नसता आपल्या संतप्त होण्याने आम्हा लोकांच्या हृदयात फार संताप होत आहे. ॥७॥
त्यज राजन्निमं शोकं मिथ्या सन्तापमागतम् ।
तदियं त्यज्यतां चिन्ता शत्रुहर्षविवर्धिनी ॥ ८ ॥
राजन्‌ ! मिथ्या प्राप्त झालेल्या या शोकाचा आणि संतापाचा त्याग करावा; त्याच बरोबर ही चिंताही आपल्या मनांतून काढून टाकावी, कारण ही शत्रूंचा हर्ष वाढविणारी आहे. ॥८॥
उद्यमः क्रियतां वीर हर्षः समुपसेव्यताम् ।
प्राप्तव्या वदि ते सीता हन्तव्याश्च निशाचराः ॥ ९ ॥
वीरा ! जर आपण सीतेची प्राप्ती आणि निशाचरांचा वध करू इच्छित असाल तर उद्योग करावा, हर्ष आणि उत्साहाचा आश्रय घ्यांवा. ॥९॥
रघुनन्दन वक्ष्यामि श्रूयतां मे हितं वचः ।
साध्वयं यातु सौमित्रिः बलेन महता वृतः ॥ १० ॥

निकुम्भिलायां सम्प्राप्तं हन्तुं रावणिमाहवे ।
रघुनंदना ! मी एक आवश्यक गोष्ट सांगत आहे. माझी ही हितकर गोष्ट ऐकावी. रावणकुमार इंद्रजित निकुम्भिला मंदिराकडे गेला आहे, म्हणून हे सुमित्राकुमार लक्ष्मण विशाल सेना बरोबर घेऊन आत्ता त्याच्यावर आक्रमण करू देत - युद्धात रावणपुत्राचा वध करण्यासाठी त्याच्यावर चढाई करू देत - हेच ठीक होईल. ॥१० १/२॥
धनुर्मण्डलनिर्मुक्तैः आशीविषविषोपमैः ॥ ११ ॥

शरैर्हन्तुं महेष्वासो रावणिं समितिञ्जयः ।
युद्धविजयी महाधनुर्धर लक्ष्मण आपल्या मण्डलाकार धनुष्याच्या द्वारा सोडल्या गेलेल्या विषधर सर्पतुल्य भयानक बाणांनी रावणपुत्राचा वध करण्यास समर्थ आहेत. ॥११ १/२॥
तेन वीर्येण तपसा वरदानात् स्वयम्भुवः ।
अस्त्रं ब्रह्मशिरः प्राप्तं कामगाश्च तुरङ्‌गमाः ॥ १२ ॥
त्या वीराने तपस्या करून ब्रह्मदेवांकडून वरदानाने ब्रह्मशिर नामक अस्त्र आणि मनास हव्या त्या गतीने चालणारे घोडे प्राप्त केले आहेत. ॥१२॥
स एष किल सैन्येन प्राप्तः किल निकुम्भिलाम् ।
यद्युत्तिष्ठेत् कृतं कर्म हतान् सर्वांश्च विद्धि नः ॥ १३ ॥
निश्चितच यासमयी तो सेनेसह निकुम्भिलेत गेला आहे. तेथून आपले हवनकर्म समाप्त करून जर तो उठला तर मग आपणा सर्वांना त्याच्या हातून मेलेलेच समजावे. ॥१३॥
निकुम्भिलां असम्प्राप्तं अहुताग्निं च यो रिपुः ।
त्वामाततायिनं हन्याद् इन्द्रशत्रोः स ते वधः ॥ १४ ॥

वरो दत्तो महाबाहो सर्वलोकेश्वरेण वै ।
इत्येवं विहितो राजन् वधस्तस्यैष धीमतः ॥ १५ ॥
महाबाहो ! संपूर्ण लोकांचे स्वामी ब्रह्मदेव यांनी त्याला वरदान देतांना सांगितले होते - इंद्रशत्रू ! निकुम्भिला नामक वटवृक्षाच्या जवळ पोहोचण्यापूर्वी आणि हवन संबंधी कार्य पूर्ण करण्यापूर्वीच जो शत्रु तुझ्यासारख्या आततायीवर तुला मारण्यासाठी आक्रमण करेल, त्याच्याच हातांनी तुझा वध होईल. राजन ! याप्रकारे बुद्धिमान्‌ इंद्रजिताच्या मृत्युचे विधान केले गेले आहे. ॥१४-१५॥
वधायेन्द्रजितो राम सन्दिशस्व महाबल ।
हते तस्मिन् हतं विद्धि रावणं ससुहृद्गीणम् ॥ १६ ॥
म्हणून रामा ! आपण इंद्रजिताचा वध करण्यासाठी महाबली लक्ष्मणाला आज्ञा द्यावी ! तो मारला गेल्यावर रावणाला आपल्या सुहृदांसहित मेलेलाच समजावे. ॥१६॥
विभीषणवचः श्रुत्वा रामोवो वाक्यमथाब्रवीत् ।
जानामि तस्य रौद्रस्य मायां सत्यपराक्रम ॥ १७ ॥
विभीषणाचे वचन ऐकून श्रीराम शोकाचा परित्याग करून म्हणाले - सत्यपराक्रमी विभीषणा ! त्या भयंकर राक्षसाची माया मी जाणतो. ॥१७॥
स हि ब्रह्मास्त्रवित् प्राज्ञो महामायो महाबलः ।
करोत्यसंज्ञान् सङ्‌ग्रामे देवान् सवरुणानपि ॥ १८ ॥
तो ब्रह्मास्त्राचा ज्ञाता, बुद्धिमान्‌, फार मोठा मायावी आणि महान्‌ बलवान्‌ आहे. वरूणसहित संपूर्ण देवतांनाही तो युद्धात अचेत करू शकतो. ॥१८॥
तस्यान्तरिक्षे चरतो सरथस्य महायशः ।
न गतिर्ज्ञायते वीर सूर्यस्येवाभ्रसम्प्लवे ॥ १९ ॥

राघवस्तु रिपोर्ज्ञात्वा मायावीर्यं दुरात्मनः ।
लक्ष्मणं कीर्तिसम्पन्नं इदं वचनमब्रवीत् ॥ २० ॥
महायशस्वी वीरा ! जेव्हा इंद्रजित रथसहित आकाशात विचरू लागतो, त्या समयी मेघांत लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या गतिचा काही पत्ताच लागत नाही. विभीषणाला असे म्हणून भगवान्‌ श्रीरामांनी आपला शत्रु दुरात्मा इंद्रजित याची मायाशक्ति जाणून यशस्वीची वीर लक्ष्मणास असे म्हटले - ॥१९-२०॥
यद् वानरेन्द्रस्य बलं तेन सर्वेण संवृतः ।
हनुमत्प्रमुखैश्चैव यूथपैः सह लक्ष्मण ॥ २१ ॥

जाम्बवेनर्क्षपतिना सह सैन्येन संवृतः ।
जहि तं राक्षससुतं मायाबलसमन्वितम् ॥ २२ ॥
ऋक्षराज जांबवान्‌ आणि अन्य सैनिकांनी घेरलेले राहून तुम्ही मायाबलाने संपन्न राक्षसराजकुमार इंद्रजिताचा वध करा. ॥२१-२२॥
अयं त्वां सचिवैः सार्धं महात्मा रजनीचरः ।
अभिज्ञस्तस्य मायानां पृष्ठतोनुगमिष्यति ॥ २३ ॥
हे महामना राक्षसराज विभीषण त्याच्या मायांशी उत्तम प्रकारे परिचित आहेत, म्हणून आपल्या मंत्र्यांसह हेही तुमच्या पाठोपाठ येतील. ॥२३॥
राघवस्य वचः श्रुत्वा लक्ष्मणः सविभीषणः ।
जाग्राह कार्मुकश्रेष्ठं अन्यद् भीमपराक्रमः ॥ २४ ॥
राघवांचे हे वचन ऐकून विभीषणासहित भयानक पराक्रमी लक्ष्मणांनी आपले श्रेष्ठ धनुष्य हातात घेतले. ॥२४॥
सन्नद्धः कवची खड्गी सशरी वामचापभृत् ।
रामपादावुपस्पृश्य हृष्टः सौमित्रिरब्रवीत् ॥ २५ ॥
ते युद्धाची सर्व सामग्री घेऊन तयार झाले, त्यांनी कवच धारण केले, तलवार बांधून घेतली आणि उत्तम बाण तसेच डाव्या हातात धनुष्य घेतले. तत्पश्चात्‌ श्रीरामचंद्रांचे चरणांस स्पर्श करून हर्षाने भरलेले सुमित्राकुमार म्हणाले - ॥२५॥
अद्य मत्कार्मुकोन्मुक्ताः शरा निर्भिद्य रावणिम् ।
लङ्‌कामभिपतिष्यन्ति हंसाः पुष्करिणीमिव ॥ २६ ॥
आर्य ! आज माझ्या धनुष्यातून सुटलेले बाण रावणकुमाराला विदीर्ण करून, हंस जसे कमलांनी भरलेल्या सरोवरात उतरतात तसे लंकेत पडतील. ॥२६॥
अद्यैव तस्य रौद्रस्य शरीरं मामकाः शराः ।
विधमिष्यन्ति भित्त्वा तं महाचापगुणच्युताः ॥ २७ ॥
या विशाल धनुष्यातून सुटलेले माझे बाण आजच त्या भयंकर राक्षसाच्या शरीराला विदीर्ण करून त्याला मृत्यु मुखात टाकतील. ॥२७॥
एवमुक्त्वा तु वचनं द्युतिमान् वचनं भ्रातुरग्रतः ।
स रावणिवधाकाङ्‌क्षी लक्ष्मणस्त्वरितं ययौ ॥ २८ ॥
इंद्रजिताच्या वधाची अभिलाषा ठेवणार्‍या लक्ष्मणांनी आपल्या भावासमोर अशी वचेन बोलून तेथून ते निघून गेले. ॥२८॥
सोऽभिवाद्य गुरोः पादौ कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
निकुम्भिलामभिययौ चैत्यं रावणिपालितम् ॥ २९ ॥
प्रथम त्यांनी आपल्या मोठ्‍या भावाच्या चरणी प्रणाम केला नंतर त्यांची परिक्रमा करून रावणकुमाराच्या पालित निकुम्भिला मंदिराकडे प्रस्थान केले. ॥२९॥
विभीषणेन सहितो राजपुत्रः प्रतापवान् ।
कृतस्वस्त्ययनो भ्रात्रा लक्ष्मणस्त्वरितो ययौ ॥ ३० ॥
भाऊ श्रीराम यांच्या द्वारा स्वस्तिवाचन केले गेल्यानंतर विभीषणासहित प्रतापी राजकुमार लक्ष्मण मोठ्‍या उतावळेपणाने बरोबर निघाले. ॥३०॥
वानराणां सहस्रैस्तु हनुमान् बहुभिर्वृतः ।
विभीषणश्च सामात्यो लक्ष्मणं त्वरितं ययौ ॥ ३१ ॥
काही हजार वानरांसह हनुमान्‌ आणि मंत्र्यासहित विभीषणही लक्ष्मणांच्या पाठोपाठ शीघ्रतापूर्वक प्रस्थित झाले. ॥३१॥
महता हरिसैन्येन सवेगमभिसंवृतः ।
ऋक्षराजबलं चैव ददर्श पथि विष्ठितम् ॥ ३२ ॥
विशाल वानर सेनेसहित घेरलेल्या लक्ष्मणांनी वेगपूर्वक पुढे जाऊन मार्गात उभ्या असलेल्या ऋक्षराज जांबवानांच्या सेनेलाही पाहिले. ॥३२॥
स गत्वा दूरमध्वानं सौमित्रिर्मित्रनन्दनः ।
राक्षसेन्द्रबलं दूराद् अपश्यद् व्यूहमास्थितम् ॥ ३३ ॥
दूरपर्यंत रस्ता पार केल्यावर मित्रांना आनंदित करणार्‍या सौमित्राने काही अंतरावरून पाहिले, राक्षसराज रावणाची सेना मोर्चा बांधून उभी होती. ॥३३॥
स संप्राप्य धनुष्पाणिः मायायोगमरिन्दमः ।
तस्थौ ब्रह्मविधानेन विजेतुं रघुनन्दनः ॥ ३४ ॥
शत्रूंचे दमन करणारे रघुनंदन लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन ब्रह्मदेवाने निश्चित केलेल्या विधानानुसार त्या मायावी राक्षसाला जिंकण्यासाठी निकुम्भिला नामक स्थानी पोहोचून एकाजागी उभे राहिले. ॥३४॥
विभीषणेन सहितो राजपुत्रः प्रतापवान् ।
अङ्‌गदेन च वीरेण तथानिलसुतेन च ॥ ३५ ॥
त्यासमयी प्रतापी राजकुमार लक्ष्मणाबरोबर विभीषण, वीर अंगद तसेच पवनकुमार हनुमानही होते. ॥३५॥
विविधममलशस्त्रभास्वरं तद्
ध्वजगहनं गहनं महारथैश्च ।
प्रतिभयतममप्रमेयवेगं
तिमिरमिव द्विषतां बलं विवेश ॥ ३६ ॥
चमकदार अस्त्र-शस्त्रांनी जी प्रकाशित होत होती, ध्वजा आणि महारथिंच्या मुळे जी गहन दिसून येत होती, जिच्या वेगाला काही मोजमाप नव्हते, तसेच जी अनेक प्रकारच्या वेषभूषेत दृष्टिगोचर होत होती, अंधःकारासमान त्या काळ्या शत्रुसेनेमध्ये विभीषण आदिंच्यासह लक्ष्मणांनी प्रवेश केला. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चाशीतितमः सर्गः ॥ ८५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा पंच्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP