[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतया रावणाय पत्युरात्मनश्च परिचयं दत्त्वा वनागमने कारणस्य प्रतिपादनं रावणेन तां स्वपट्टमहिषीपदे प्रतिष्ठापयितुं स्वविचारस्य प्रकटनं सीतया तस्य भर्त्सनं च -
सीतेचे रावणास आपला आणि पतिचा परिचय देऊन वनात येण्याचे कारण सांगणे, रावणाने तिला आपली पट्टराणी बनविण्याची इच्छा प्रकट करणे आणि सीतेने त्याला धिक्कारणे -
रावणेन तु वैदेही तथा पृष्टा जिहीर्षुणा ।
परिव्राजकरूपेण शशंसात्मानमात्मना ॥ १ ॥
सीतेचे हरण करण्याच्या इच्छेने परिव्राजकाच्या (संन्याशाच्या) रूपाने आलेल्या रावणाने त्या समयी जेव्हा वैदेहीला याप्रकारे विचारले, त्यावेळी तिने स्वतःच आपला परिचय करून दिला. ॥१॥
ब्राह्मणश्चातिथिश्चैष अनुक्तो हि शपेत माम् ।
इति ध्यात्वा मुहूर्तं तु सीता वचनमब्रवीत् ॥ २ ॥
ती एक मुहूर्तपर्यंत असा विचार करीत राहिली की हे ब्राह्मण आणि अतिथि आहेत, जर यांना उत्तर दिले गेले नाही तर हे मला शाप देतील. हा विचार करून सीतेने याप्रकारे सांगण्यास आरंभ केला- ॥२॥
दुहिता जनकस्याहं मैथिलस्य महात्मनः ।
सीता नाम्नास्मि भद्रं ते रामस्य महिषी प्रिया ॥ ३ ॥
ब्रह्मन ! आपले भले होवो ! मी मिथिला नरेश महात्मा जनकांची कन्या आणि अवध नरेश श्रीरामचंद्रांची प्रिय राणी आहे. माझे नाव सीता आहे. ॥३॥
उषित्वा द्वादश समा इक्ष्वाकूणां निवेशने ।
भूञ्जाना मानुषान् भोगान् सर्वकामसमृद्धिनी ॥ ४ ॥
विवाहनंतर बारा वर्षेपर्यत इक्ष्वाकुवंशी महाराज दशरथांच्या महालात राहून मी आपल्या पतिसह सर्व मानवोचित भोग भोगले आहेत. तेथे सदा मी मनोवांछित सुखसुविधांनी संपन्न राहिले आहे. ॥४॥
तत्र त्रयोदशे वर्षे राजाऽमन्त्रयत प्रभुः ।
अभिषेचयितुं रामं समेतो राजमन्त्रिभिः ॥ ५ ॥
तेराव्या वर्षाच्या प्रारंभी सामर्थ्यशाली दशरथ महाराजांनी राजमंत्र्यांशी मिळून सल्ला मसलत केली आणि श्रीरामांचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा निश्चय केला. ॥५॥
तस्मिन् सम्भ्रियमाणे तु राघवस्याभिषेचने ।
कैकेयी नाम भर्तारं ममार्या याचते वरम् ॥ ६ ॥
जेव्हा राघवांच्या राज्याभिषेकाची सामग्री एकत्र केली जाऊ लागली या समयी माझी सासू कैकेयी हिने आपल्या पतिकडे वर मागितला. ॥६॥
प्रतिगृह्य तु कैकेयी श्वशुरं सुकृतेन मे ।
मम प्रव्राजनं भर्तुर्भरतस्याभिषेचनम् ॥ ७ ॥

द्वावयाचत भर्तारं सत्यसन्धं नृपोत्तमम् ।
कैकेयीने माझ्या श्वसुरांना पुण्याची शपथ घालून वचनबद्ध करून घेतले, आणि नंतर आपल्या सत्यप्रतिज्ञ पतिकडे,त्या राजश्रेष्ठांकडे दोन वर मागितले- माझ्या पतिसाठी वनवास आणि भरतासाठी राज्याभिषेक. ॥७ १/२॥
नाद्य भोक्ष्ये न च स्वप्स्ये न पास्ये च कदाचन ॥ ८ ॥

एष मे जीवितस्यान्तो रामो यदभिषिच्यते ।
कैकेयी ह्ट्टाने म्हणू लागली - जर आज श्रीरामाचा अभिषेक केला गेला तर मी खाणार नाही, पिणार नाही आणि कधी झोपणार नाही. हाच माझ्या जीवनाचा अंत ठरेल. ॥८ १/२॥
इति ब्रुवाणां कैकेयीं श्वशुरो मे स पार्थिवः ॥ ९ ॥

अयाचतार्थैरन्वर्थैर्न च याञ्चां चकार सा ।
असे म्हणणार्‍या कैकेयीकडे माझे श्वसुर दशरथ महाराज यांनीही याचना केली की तू सर्व प्रकारच्या उत्तम वस्तु घे परंतु श्रीरामाच्या अभिषेकात विघ्न आणू नको. परंतु कैकेयीने त्यांची ही याचना सफल केली नाही. ॥९ १/२॥
मम भर्ता महातेजा वयसा पञ्चविंशकः ॥ १० ॥

अष्टादश हि वर्षाणि मम जन्मनि गण्यते ।
त्यासमयी माझ्या महातेजस्वी पतिचे वय पंचवीस वर्षाच्या वर होते आणि माझ्या जन्मकालापासून वनगमन कालापर्यंत माझे वय वर्षगणनेसुसार अठ्ठरा वर्षाचे झाले होते. ॥१० १/२॥
रामेति प्रथितो लोके सत्यवाञ्शीलवाञ्शुचिः ॥ ११ ॥

विशालाक्षो महाबाहुः सर्वभूतहिते रतः
श्रीराम जगतात सत्यवादी, सुशील आणि पवित्र रूपाने विख्यात आहेत. त्यांचे नेत्र मोठे मोठे आणि भुजा विशाल आहेत. ते समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहात असतात. ॥११ १/२॥
कामार्तस्तु महातेजाः पिता दशरथः स्वयम् ॥ १२ ॥

कैकेय्याः प्रियकामार्थं तं रामं नाभ्यषेचयत् ।
त्यांचे पिता महाराज दशरथ यांनी स्वयं कामपीडित झाल्यामुळे कैकेयीचे प्रिय करण्याच्या इच्छेने श्रीरामांचा अभिषेक केला नाही. ॥१२ १/२॥
अभिषेकाय तु पितुः समीपं राममागतम् ॥ १३ ॥

कैकेयी मम भर्तारमित्युवाच द्रुतं वचः ।
श्रीरामचंद्र ज्यावेळी अभिषेकासाठी पित्याच्या समीप आले तेव्हा कैकेयीने माझ्या पतिदेवांना तात्काळ ही गोष्ट सांगितली. ॥१३ १/२॥
तव पित्रा समाज्ञप्तं ममेदं शृणु राघव ॥ १४ ॥

भरताय प्रदातव्यमिदं राज्यमकण्टकम् ।
त्वया हि खलु वस्तव्यं नव वर्षाणि पञ्च च ॥ १५ ॥

वने प्रव्रज काकुत्स्थ पितरं मोचयानृतात् ।
राघवा ! तुमच्या पित्याने जी आज्ञा दिली आहे ती माझ्या मुखाने ऐका. हे निष्कण्टक राज्य भरतास दिले जाईल, तुम्हाला तर चौदा वर्षेपर्यत वनात निवास करावा लागेल. काकुत्स्थ ! तुम्ही वनात जा आणि पित्याला असत्याच्या बंधना पासून सोडवा. ॥१४-१५ १/२॥
तथेत्युवाच तां रामः कैकेयीमकुतोभयः ॥ १६ ॥

चकार तद्वचः श्रुत्वा भर्ता मम दृढव्रतः ।
कुणाचे ही भय न मानणार्‍या श्रीरामांनी कैकेयीचे ते बोलणे ऐकून म्हटले - फारच छान ! त्यांनी ते वचन स्वीकारले. माझे पति दृढतापूर्वक आपल्या प्रतिज्ञेचे पालन करणारे आहेत. ॥१६ १/२॥
दद्यान्न प्रतिगृह्णीयात् सत्यं ब्रूयान्न चानृतम् ॥ १७ ॥

एतद् ब्राह्मण रामस्य ध्रुवं धृतमनुत्तमम् ।
श्रीराम केवळ देतात, कुणाकडून काही घेत नाहीत. ते सदा सत्य बेलतात, खोटे बोलत नाहीत. ब्राह्मणा ! हे श्रीरामचंद्रांचे सर्वोत्तम व्रत आहे; जे त्यांनी धारण करून ठेवले आहे. ॥१७ १/२॥
तस्य भ्राता तु वैमात्रो लक्ष्मणो नाम वीर्यवान् ॥ १८ ॥

रामस्य पुरुषव्याघ्रः सहायः समरेऽरिहा ।
स भ्राता लक्ष्मणो नाम ब्रह्मचारी दृढव्रतः ॥ १९ ॥
श्रीरामांचे सावत्र भाऊ लक्ष्मण फार पराक्रमी आहेत. समरभूमीवर शत्रूंचा संहार करणारे पुरुषसिंह लक्ष्मण श्रीरामांचे सहाय्यक आहेत. बंधु आहेत, ब्रह्मचारी आणि उत्तम व्रताचे दृढतापूर्वक पालन करणारे आहेत. ॥१८-१९॥
अन्वगच्छद् धनुष्पाणिः प्रव्रजन्तं मया सह ।
जटी तापसरूपेण मया सह सहानुजः ॥ २० ॥

प्रविष्टो दण्डकारण्यं धर्मनित्यो दृढव्रतः ।
श्रीराम माझ्यासह जेव्हा वनात येऊ लागले तेव्हा लक्ष्मणही हातात धनुष्य घेऊन त्यांच्या पाठोपाठ निघाले. याप्रकारे माझ्यासह आणि आपला लहान भाऊ लक्ष्मणासह श्रीराम या दण्डकारण्यात आले आहेत. ते दृढप्रतिज्ञ तसेच नित्य निरंतर धर्मात तत्पर राहाणारे आहेत आणि जटा धारण करून तपस्व्याच्या वेषात येथे राहात आहेत. ॥२० १/२॥
ते वयं प्रच्युता राज्यात् कैकेय्यास्तु कृते त्रयः ॥ २१ ॥

विचराम द्विजश्रेष्ठ वनं गम्भीरमोजसा ।
समाश्वस मुहुर्तं तु शक्यं वस्तुमिह त्वया ॥ २२ ॥

आगमिष्यति मे भर्ता वन्यमादाय पुष्कलम् ।
द्विजश्रेष्ठ ! याप्रमाणे आम्ही तिघेही कैकेयीमुळे राज्यापासून वंचित होऊन या गंभीर वनात आपल्याच बळाच्या भरवशावर विचरत आहोत. आपण येथे थांबू शकत असाल तर मुहूर्तभर विश्राम करावा. आत्ता माझे स्वामी प्रचुर प्रमाणात जंगली- फळे- मुळे घेऊन येऊन पोहोंचतील. ॥२१-२२ १/२॥
रुरून् गोधान् वराहांश्च हत्वाऽऽदायामिषं बहु ॥ २३ ॥

स त्वं नाम च गोत्रं च कुलं चाचक्ष्व तत्त्वतः ।
एकश्च दण्डकारण्ये किमर्थं चरसि द्विज ॥ २४ ॥
रूरू, गोह आणि जंगली डुक्कर आदि हिंस्त्र पशुंचा वध करून तपस्वी जनांच्या उपभोगात आणण्या योग्य फळे-मुळे घेऊन ते आत्ता येतील. (त्यावेळी आपला विशेष सत्कार होईल.) ब्रह्मन्‌ ! आता आपणही आपले नाम- गोत्र आणि कुळाचा ठीक- ठीक (यथायोग्य) परिचय करून द्यावा. आपण एकटे या दण्डकारण्यात कशासाठी विचरत आहात ? ॥२३-२४॥
एवं ब्रुवत्यां सीतायां रामपत्‍न्यां महाबलः ।
प्रत्युवाचोत्तरं तीव्रं रावणो राक्षसाधिपः ॥ २५ ॥
श्रीराम पत्‍नी सीतेने असे विचारल्यावर महाबली राक्षसराज रावणाने अत्यंत कठोर शब्दात उत्तर दिले - ॥२५॥
येन वित्रासिता लोकाः सदेवासुरमानुषाः ।
अहं स रावणो नाम सीते रक्षोगणेश्वरः ॥ २६ ॥
सीते ! ज्याचे नाव ऐकून देवता, असुर आणि मनुष्यांसहित तीन्ही लोक भयभीत होतात, तोच मी राक्षसांचा राजा रावण आहे. ॥२६॥
त्वां तु काञ्चनवर्णाभां दृष्ट्‍वा कौशेयवासिनीम् ।
रतिं स्वकेषु दारेषु नाधिगच्छाम्यनिन्दिते ॥ २७ ॥
अनिंद्य सुंदरी ! तुझ्या अंगाची कांति सुवर्णा समान असून त्यावर रेशमी वस्त्र शोभून दिसत आहे. तुला पाहून आता माझे मन आपल्या स्त्रियांकडे जात नाही आहे. ॥२७॥
बह्वीनामुत्तमस्त्रीणामाहृतानामितस्ततः ।
सर्वासामेव भद्रं ते ममाग्रमहिषी भव ॥ २८ ॥
मी इकडून- तिकडून बर्‍याच सुंदर स्त्रियांना हरण करून आणलेले आहे. त्या सर्वांमध्ये तू माझी पट्टराणी बन. तुझे भले होवो. ॥२८॥
लङ्‌का नाम समुद्रस्य मध्ये मम महापुरी ।
सागरेण परिक्षिप्ता निविष्टा गिरिमूर्धनि ॥ २९ ॥
माझ्या राजधानीचे नाव लंका आहे. ती महापुरी समुद्राच्या मध्ये एका पर्वताच्या शिखरावर बसलेली आहे. समुद्राने तिला चारी बाजूने वेढून टाकलेले आहे. ॥२९॥
तत्र सीते मया सार्धं वनेषु विहरिष्यसि ।
न चास्य वनवासस्य स्पृहयिष्यसि भामिनि ॥ ३० ॥
सीते ! तेथे राहून तू माझ्यासह नाना प्रकारच्या वनातून विचरण करशील. भामिनी ! नंतर तुझ्या मनात या वनवासाची इच्छा कधीही होणार नाही. ॥३०॥
पञ्च दास्यः सहस्त्राणि सर्वाभरणभूषिताः ।
सीते परिचरिष्यन्ति भार्या भवसि मे यदि ॥ ३१ ॥
सीते ! जर तू माझी भार्या होशील तर सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित पाच हजार दासी सदा तुझी सेवा करीत राहातील. ॥३१॥
रावणेनैवमुक्ता तु कुपिता जनकात्मजा ।
प्रत्युवाचानवद्याङ्‌गी तमनादृत्य राक्षसम् ॥ ३२ ॥
रावणाने असे म्हटल्यावर निर्दोष अंगे असलेली जनकनंदिनी सीता अत्यंत कुपित झाली आणि राक्षसाचा तिरस्कार करीत त्याला याप्रकारे उत्तर देऊ लागली- ॥३२॥
महागिरिमिवाकम्प्यं महेन्द्रसदृशं पतिम् ।
महोदधिमिवाक्षोभ्यं अहं राममनुव्रता ॥ ३३ ॥
माझे पतिदेव भगवान्‌ श्रीराम महान पर्वतासमान अविचल आहेत. इंद्राप्रमाणे पराक्रमी आहेत आणि महासागरासमान प्रशान्त आहेत; त्यांना कोणी क्षुब्ध करू शकत नाही. मी तन-मन- प्राणांनी त्यांचेच अनुसरण करणारी तसेच त्यांचीच अनुरागिणी आहे. ॥३३॥
सर्वलक्षणसम्पन्नं न्यग्रोधपरिमण्डलम् ।
सत्यसन्धं महाभागमहं राममनुव्रता ॥ ३४ ॥
श्रीरामचंद्र समस्त शुभ लक्षणांनी संपन्न वटवृक्षाप्रमाणे सर्वांना आपल्या छायेमध्ये आश्रय देणारे, सत्यप्रतिज्ञ आणि महान सौभाग्यशाली आहेत. मी त्यांच्यावरच अनन्य अनुराग करणारी आहे. ॥३४॥
महाबाहुं महोरस्कं सिंहविक्रान्तगामिनम् ।
नृसिंहं सिंहसङ्‌काशमहं राममनुव्रता ॥ ३५ ॥
त्यांच्या भुजा मोठमोठ्‍या आहेत आणि छाती रूंद आहे. ते सिंहाप्रमाणे पावले टाकीत अत्यंत अभिमानाने चालतात आणि सिंहासमानच पराक्रमी आहेत. मी त्या पुरुषसिंह श्रीरामांच्या ठिकाणीच अनन्य भक्ती ठेवणारी आहे. ॥३५॥
पूर्णचन्द्राननं रामं राजवत्सं जितेन्द्रियम् ।
पृथुकीर्तिं महाबाहुमहं राममनुव्रता ॥ ३६ ॥
राजकुमार श्रीरामांचे मुख पूर्ण चंद्रासारखे मनोहर आहे. ते जितेन्द्रिय आहेत आणि त्यांचे यश महान्‌ आहे. त्या महाबाहु श्रीरामांच्या ठिकाणीच माझे मन दृढतापूर्वक जडलेले आहे. ॥३६॥
त्वं पुनर्जम्बुकः सिंहीं मामिच्छसि सुदुर्लभाम् ।
नाहं शक्या त्वया स्प्रष्टुमादित्यस्य प्रभा यथा ॥ ३७ ॥
पापी निशाचरा ! तू कोल्हा आहेस आणि मी सिंहीण आहे. मी तुझ्यासाठी सर्वथा दुर्लभ आहे. काय येथे तू मला प्राप्त करण्याची इच्छा करीत आहेस ? अरे ! जसे सूर्याच्या प्रभेला कुणी हात लावू शकत नाही त्याप्रमाणे तू मला स्पर्शही करू शकत नाहीस. ॥३७॥
पादपान् काञ्चनान् नूनं बहून् पश्यसि मन्दभाक् ।
राघवस्य प्रियां भार्यां यस्त्वमिच्छसि राक्षस ॥ ३८ ॥
अभागी राक्षसा ! तुझे इतके साहस ! तू राघवाच्या प्रिय पत्‍नीचे अपहरण करू इच्छितोस ? निश्चितच तुला बरेचसे सोन्याचे वृक्ष दिसू लागले आहेस- आता तू मृत्युच्या निकट पोहोचला आहेस. ॥३८॥
क्षुधितस्य च सिंहस्य मृगशत्रोस्तरस्विनः ।
आशीविषस्य वदनाद् दंष्ट्रामादातुमिच्छसि ॥ ३९ ॥

मन्दरं पर्वतश्रेष्ठं पाणिना हर्तुमिच्छसि ।
कालकूटं विषं पीत्वा स्वस्तिमान् गन्तुमिच्छसि ॥ ४० ॥

अक्षि सूच्या प्रमृजसि जिह्वया लेढि च क्षुरम् ।
राघवस्य प्रियां भार्यामधिगन्तुं त्वमिच्छसि ॥ ४१ ॥
तू राघवांच्या प्रिय पत्‍नीला हस्तगत करू इच्छित आहेस. असे कळून येत आहे की तू अत्यंत वेगवान्‌ मृगवैरी भुकेल्या सिंहाच्या आणि विषधर सर्पाच्या मुखातून त्यांचे दात पाडण्याची इच्छा करीत आहेस, पर्वतश्रेष्ठ मंदराचलाला हाताने उचलून घेऊन जाण्याची इच्छा करीत आहेस, कालकूट विष पिऊन कुशलतापूर्वक परत येण्याची अभिलाषा बाळगत आहेस, तसेच डोळा सुईने पुसण्याची आणि सुर्‍याला जीभेने चाटू पहात आहेस. ॥३९-४१॥
अवसज्य शिलां कण्ठे समुद्रं तर्तुमिच्छसि ।
सूर्याचन्द्रमसौ चोभौ पाणिभ्यां हर्तुमिच्छसि ॥ ४२ ॥

यो रामस्य प्रियां भार्यां प्रधर्षयितुमिच्छसि ।
काय तू आपल्या गळ्यात धोंडा बांधून समुद्र पार करू इच्छित आहेस ? सूर्य आणि चंद्र या दोन्हींना आपल्या दोन्ही हातांनी हरण करून आणू इच्छित आहेस ? म्हणून श्रीरामांच्या प्रिय पत्‍नीचे बळाने हरण करण्यास तयार झाला आहेस ? ॥४२ १/२॥
अग्निं प्रज्वलितं दृष्ट्‍वा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि ॥ ४३ ॥

कल्याणवृत्तां यो भार्यां रामस्याहर्तुमिच्छसि ।
जर तू कल्याणमय आचाराचे पालन करणार्‍या श्रीरामांच्या भार्येचे अपहरण करू इच्छित असशील तर मग अवश्यच जळत्या आगीला पाहूनही तू तिला वस्त्रात बांधून घेऊन जाण्याची इच्छा करीत आहेस. ॥४३ १/२॥
अयोमुखानां शूलानामग्रे चरितुमिच्छसि ।
रामस्य सदृशीं भार्यां योऽधिगन्तुं त्वमिच्छसि ॥ ४४ ॥
अरे तू श्रीरामांच्या भार्येला की जी सर्वथा त्यांच्याच योग्य आहे, हस्तगत करू इच्छितोस तर मग निश्चितच लोहमय मुख असलेल्या शूळांच्या टोंकावरून चालण्याची अभिलाषा करीत आहेस. ॥४४॥
यदन्तरं सिंहसृगालयोर्वने
यदन्तरं स्यन्दिनिकासमुद्रयोः ।
सुराग्य्रसौवीरकयोर्यदन्तरं
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ४५ ॥
वनात राहाणारा सिंह आणि कोल्हा, समुद्र आणि लहान नदी, तसेच अमृत आणि कांजी यात जे अंतर आहे तेच अंतर दशरथनंदन श्रीरामांमध्ये आणि तुझ्यामध्ये आहे. ॥४५॥
यदन्तरं काञ्चनसीसलोहयो-
र्यदन्तरं चन्दनवारिपङ्‌कयोः ।
यदन्तरं हस्तिबिडालयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ४६ ॥
सोने आणि शिसे, चंदनमिश्रित जल आणि चिखल, तसेच वनात राहाणारा हत्ती आणि बोका यांच्यामध्ये जे अंतर आहे तेच अंतर दशरथनंदन श्रीरामांत आणि तुझ्यात आहे. ॥४६॥
यदन्तरं वायसवैनतेययो-
र्यदन्तरं मद्‌गुमयूरयोरपि ।
यदन्तरं हंसकगृध्रयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ४७ ॥
गरूड आणि कावळा, मोर आणि जलकाक तसेच वनवासी हंस आणि गिधाड यात जे अंतर आहे तेच अंतर दशरथनंदन श्रीरामांत आणि तुझ्यात आहे. ॥४७॥
तस्मिन् सहस्राक्षसमप्रभावे
रामे स्थिते कार्मुकबाणपाणौ ।
हृतापि तेऽहं न जरां गमिष्ये
आज्यं यथा मक्षिकयावगीर्णम् ॥ ४८ ॥
ज्यासमयी सहस्त्र नेत्रधारी इंद्राप्रमाणे प्रभावशाली श्रीराम हातांत धनुष्य आणि बाण घेऊन उभे राहातील त्या समयी तू माझे अपहरण करूनही मला पचवू शकणार नाही, ज्याप्रमाणे माशी ही तूप प्राशन करून त्याला पचवू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे. ॥४८॥
इतीव तद्‌वाक्यमदुष्टभावा
सुदुष्टमुक्त्वा रजनीचरं तम् ।
गात्रप्रकम्पाद् व्यथिता बभूव
वातोद्धता सा कदलीव तन्वी ॥ ४९ ॥
सीतेच्या मनात कुठलाही वाईट भाव नव्हता तरीही त्या राक्षसास याप्रमाणे अत्यंत दुःखजनक वचने बोलून सीता रोषाने कापू लागली. शरीराच्या कंपनामुळे कृशांगी सीता वार्‍याने हलविल्या गेलेल्या कदळी समान व्यथित होऊन गेली. ॥४९॥
तां वेपमानामुपलक्ष्य सीतां
स रावणो मृत्युसमप्रभावः ।
कुलं बलं नाम च कर्म चात्मनः
समाचचक्षे भयकारणार्थम् ॥ ५० ॥
सीतेला कापत असलेली पाहून मृत्यु प्रमाणे प्रभाव असणारा रावण तिच्या मनात भय उत्पन्न करण्यासाठी आपले कुळ, बळ, नाम आणि कर्म यांचा परिचय करून देऊ लागला. ॥५०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सत्तेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP