श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
यज्ञैर्मेघनादस्य साफल्यं, विभीषणेन रावणं प्रति परस्त्रीदोषाणां वर्णनं, कुम्भीनसीमाश्वासस्य मधुना सह रावणस्य देवलोकोपरि आक्रमणम् -
यज्ञांच्या द्वारा मेघनादाची सफलता, विभीषणाने रावणास परस्त्री-हरणाचा दोष सांगणे, कुम्भीनसीला आश्वासन देऊन मधुला बरोबर घेऊन रावणाचे देवलोकावर आक्रमण करणे -
स तु दत्त्वा दशग्रीवो वनं घोरं स्वरस्य तत् ।
भगिनीं च समाश्वास्य हृष्टः स्वस्थतरोऽभवत् ॥ १ ॥
खराला राक्षसांची भयंकर सेना देऊन आणि बहिणीला धीर देऊन रावण फारच प्रसन्न आणि स्वस्थचित्त झाला. ॥१॥
ततो निकुम्भिला नाम लङ्‌कोपवनमुत्तमम् ।
तद् राक्षसेन्द्रो बलवान् प्रविवेश सहानुगः ॥ २ ॥
त्यानंतर बलवान्‌ राक्षसराज रावण लंकेच्या निकुम्भिला नामक उत्तम उपवनात गेला. त्याच्या बरोबर बरेचसे सेवकही होते. ॥२॥
ततो यूपशताकीर्णं सौम्यचैत्योपशोभितम् ।
ददर्श विष्ठितं यज्ञं श्रिया सम्प्रज्वलन्निव ॥ ३ ॥
रावण आपली शोभा आणि तेजाने अग्निसमान प्रज्वलित होत होता. त्याने निकुम्भिलेमध्ये पोहोचून पाहिले, एक यज्ञ होत आहे, जो शेकडो यूपांनी व्याप्त आणि सुंदर देवालयांनी सुशोभित आहे. ॥३॥
ततः कृष्णाजिनधरं कमण्डलुशिखाध्वजम् ।
ददर्श स्वसुतं तत्र मेघनादं भयावहम् ॥ ४ ॥
नंतर तेथे त्याने आपला पुत्र मेघनाद याला पाहिले, जो काळे मृगचर्म नेसून तसेच कमण्डलु, शिखा आणि ध्वज धारण करून फारच भयंकर वाटत होता. ॥४॥
तं समासाद्य लङ्‌केशः परिष्वज्वाथ बाहुभिः ।
अब्रवीत् किमिदं वत्स वर्तसे ब्रूहि तत्त्वतः ॥ ५ ॥
त्याच्या जवळ जाऊन लंकेश्वराने आपल्या भुजांनी त्यास आलिंगन दिले आणि विचारले -मुला, हे काय करीत आहेस ? ठीक-ठीक सांग. ॥५॥
उशना त्वब्रवीत् तत्र यज्ञसम्पत्समृद्धये ।
रावणं राक्षसश्रेष्ठं द्विजश्रेष्ठो महातपाः ॥ ६ ॥
(मेघनाद यज्ञाच्या नियमानुसार मौन राहिला.) त्या समयी पुरोहित, महातपस्वी द्विजश्रेष्ठ शुक्राचार्यांनी, जे यज्ञ-संपत्तिच्या समृद्धिसाठी तेथे आले होते, राक्षसश्रेष्ठ रावणास म्हणाले - ॥६॥
अहमाख्यामि ते राजन् श्रूयतां सर्वमेव तत् ।
यज्ञास्ते सप्त पुत्रेण प्राप्तास्ते बहुविस्तराः ॥ ७ ॥
राजन्‌ ! मी सर्व गोष्टी सांगतो, आपण ध्यान देऊन ऐकावे. आपल्या पुत्राने फार विस्तारासह सात यज्ञांचे अनुष्ठान केले आहे. ॥७॥
अग्निष्टोमोऽश्वमेधश्च यज्ञो बहुसुवर्णकः ।
राजसूयस्तथा यज्ञो गोमेधो वैष्ववस्तथा ॥ ८ ॥

माहेश्वरे प्रवृत्ते तु यज्ञे पुम्भिः सुदुर्लभे ।
वरांस्ते लब्धवान् पुत्रः साक्षात् पशुपतेरिह ॥ ९ ॥
अग्निष्टोम, अश्वमेघ, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध तसेच वैष्णव. हे सहा यज्ञ पूर्ण करून जेव्हा याने सातवा माहेश्वर यज्ञ ज्याचे अनुष्ठान अत्यंत दुष्कर आहे, आरंभ केले तेव्हा आपल्या या पुत्राला साक्षात्‌ भगवान्‌ पशुपतिंच्या कडून बरेचसे वर प्राप्त झाले. ॥८-९॥
कामगं स्यन्दनं दिव्यं अंतरिक्षचरं ध्रुवम् ।
मायां च तामसीं नाम यया सम्पद्यते तमः ॥ १० ॥
त्याच बरोबर इच्छेनुसार चालणारा एक दिव्य आकाशचारी रथही प्राप्त झाला आहे. याशिवाय तामसी नावाची माया उत्पन्न झाली आहे, जिच्या योगे अंधकार उत्पन्न केला जाऊ शकतो. ॥१०॥
एतया किल संग्रामे मायया राक्षसेश्वर ।
प्रयुक्तया गतिः शक्या नहि ज्ञातुं सुरासुरैः ॥ ११ ॥
राक्षसेश्वर ! संग्रामात या मायेचा प्रयोग करण्याने देवता आणि असुरही या मायेचा प्रयोग करणार्‍या पुरुषाच्या गतिविधीचा पत्ता लावू शकत नाहीत. ॥११॥
अक्षयाविषुधी बाणैः चापं चापि सुदुर्जयम् ।
अस्त्रं च बलवद् राजन् शत्रुविध्वंसनं रणे ॥ १२ ॥
राजन्‌ ! बाणांनी भरलेले दोन अक्षय तरकस, अतूट धनुष्य तसेच रणभूमीमध्ये शत्रुंचा विध्वंस करणारी प्रबल अस्त्रे यांचीही प्राप्ति झाली आहे. ॥१२॥
एतान् सर्वान् वरांल्लब्ध्वा पुत्रस्तेऽयं दशानन ।
अद्य यज्ञसमाप्तौ च त्वां दिदृक्षम् स्थितो ह्यहम् ॥ १३ ॥
दशानना ! तुझा हा पुत्र या सर्व मनोवांछित वरांना प्राप्त करून आज यज्ञाच्या समाप्तिच्या दिवशी तुझ्या दर्शनाच्या इच्छेने येथे उभा आहे. ॥१३॥
ततोऽब्रवीदृशग्रीवो न शोभनमिदं कृतम् ।
पूजिताः शत्रवो यस्माद् द्रव्यैरिन्द्रपुरोगमाः ॥ १४ ॥
हे ऐकून दशग्रीवाने म्हटले - मुला ! तू हे चांगले केले नाहीस. कारण की या यज्ञासंबंधी द्रव्यांच्या द्वारा माझ्या शत्रुभूत इंद्र आदि देवतांचे पूजन झाले आहे. ॥१४॥
एहीदानीं कृतं विद्धि सुकृतं तन्न संशयः ।
आगच्छ सौम्य गच्छामः स्वमेव भवनं प्रति ॥ १५ ॥
अस्तु, जे केलेस ते ठीकच केलेस, यात संशय नाही. सौम्या, आता ये, चल, आपण आपल्या घरी जाऊ या. ॥१५॥
ततो गत्वा दशग्रीवः सपुत्रः सविभीषणः ।
स्त्रियोऽवतारयामास सर्वास्ता बाष्पगद्‌गदाः ॥ १६ ॥
त्यानंतर दशग्रीवाने आपला पुत्र आणि विभीषण यांच्यासह जाऊन पुष्पक विमानातून त्या सर्व स्त्रियांना, ज्यांना त्याने हरण करून आणले होते, खाली उतरविले. त्या अद्यापही अश्रु ढाळीत गद्‍गद कण्ठांनी विलाप करीत होत्या. ॥१६॥
लक्षिण्यो रत्‍नभूताश्च देवदानवरक्षसाम् ।
तस्य तासु मतिं ज्ञात्वा धर्मत्मा वाक्यमब्रवीत् ॥ १७ ॥
त्या उत्तम लक्षणांनी सुशोभित होत्या आणि देवता, दानव आणि राक्षसांच्या घरांतील रती होत्या. त्यांच्या ठिकाणी रावणाची आसक्ति जाणून धर्मात्मा विभीषणाने म्हटले - ॥१७॥
ईदृशैस्त्वं समाचारैः यशोऽर्थकुलनाशनैः ।
धर्षणं ज्ञातिनां ज्ञात्वा स्वमतेन विचेष्टसे ॥ १८ ॥
राजन्‌ ! हे आचरण यश, धन आणि कुळाचा नाश करणारे आहे. याच्या द्वारे प्राण्यांना जी पीडा दिली जात आहे, त्यामुळे फार मोठे पाप होत आहे. ही गोष्ट जाणत असूनही आपण सदाचाराचे उल्लंघन करून स्वेच्छाचारात प्रवृत्त होत आहात. ॥१८॥
ज्ञातींस्तान् धर्षयित्वेमाः त्वयाऽऽनीता वराङ्‌गनाः ।
त्वामतिक्रम्य मधुना राजन् कुम्भीनसी हृता ॥ १९ ॥
महाराज ! या बिचार्‍या अबलांच्या बंधु-बांधवांना मारून आपण यांचे हरण करून घेऊन आलात आणि इकडे आपले उल्लंघन करून आपल्या मस्तकावर लाथ मारून मधुने मावस बहीण कुम्भीनसीचे अपहरण केले आहे. ॥१९॥
रावणस्त्वब्रवीद् वाक्यं नावगच्छामि किं त्विदम् ।
कोऽयं यस्तु त्वयाऽऽख्यातो मधुरित्येव नामतः ॥ २० ॥
रावण म्हणाला - तू काय म्हणतो आहेस हे मला समजत नाही ! ज्याचे नाव तू मधु सांगितलेस, तो कोण आहे ? ॥२०॥
विभीषणस्तु सङ्‌क्रुद्धो भ्रातरं वाक्यमब्रवीत् ।
श्रूयतामस्य पापस्य कर्मणः फलमागतम् ॥ २१ ॥
तेव्हा विभीषणाने अत्यंत कुपित होऊन भाऊ रावणास म्हटले -ऐका, तुमच्या या पापकर्माचे फळ आपल्याला बहीणीच्या अपहरणाच्या रूपाने प्राप्त झाले आहे. ॥२१॥
मातामहस्य योऽस्माकं ज्येष्ठो भ्राता सुमालिनः ।
माल्यवानिति विख्यातो वृद्धः प्राज्ञो निशाचरः ॥ २२ ॥

पिता ज्येष्ठो जनन्या नो ह्यस्माकं चार्यकोऽभवत् ।
तस्य कुम्भीनसी नाम दुहितुर्दुहिताऽभवत् ॥ २३ ॥

मातृष्वसुरथास्माकं सा च कन्याऽनलोद्‌भवा ।
भवत्यस्माकमेवैषा भ्रातॄणां धर्मतः स्वसा ॥ २४ ॥
आपले आजोबा सुमाली यांचे मोठे भाऊ माल्यवान्‌ नावाने विख्यात बुद्धिमान्‌ आणि वृद्ध श्रेष्ठ निशाचर आहेत. ते आपली माता कैकसीचे वडील चुलते आहेत. या नात्याने ते आपलेही ज्येष्ठ आजोबाच आहेत. त्यांची पुत्री अनला ही आपली मावशी आहे. तिचीच पुत्री कुम्भीनसी आहे. आपली मावशी अनला हिची मुलगी असल्यानेच ही कुम्भीनसी आपणा सर्व भावांची धर्मतः बहीण होत आहे. ॥२२-२४॥
सा हृता मधुना राजन् राक्षसेन बलीयसा ।
यज्ञप्रवृत्ते पुत्रे तु मयि चान्तर्जलोषिते ॥ २५ ॥

कुम्भकर्णे महाराज निद्रामनुभवत्यथ ।
निहत्य राक्षसश्रेष्ठान् अमात्यानिह सम्मतान् ॥ २६ ॥
राजन्‌ ! आपल पुत्र मेघनाद जेव्हा यज्ञात तत्पर झाला, मी तपस्येसाठी पाण्यात राहू लागलो आणि महाराज ! भाऊ कुम्भकर्णही जेव्हा निद्रेचा आनंद घेऊ लागले, त्या समयी महाबली राक्षस मधुने येथे येऊन आपल्या आदरणीय राक्षसश्रेष्ठ अमात्यांना ठार मारले आणि कुम्भीनसीचे अपहरण केले. ॥२५-२६॥
धर्षयित्वा हृता सा तु गुप्ताप्यन्तःपुरे तव ।
श्रुत्वाऽपि तन्महाराज क्षान्तमेव हतो न सः ॥ २७ ॥

यस्मादवश्यं दातव्या कन्या भर्त्रे हि भ्रातृभिः ।
महाराज ! यद्यपि कुम्भीनसी अंतःपुरात उत्तम प्रकारे सुरक्षित होती तरीही त्याने आक्रमण करून बलपूर्वक तिचे अपहरण केले. नंतर ही घटना ऐकूनही आम्ही लोकांनी क्षमा केली. मधुचा वध केला नाही, कारण की जेव्हा कन्या विवाहाचा योग्य होते तेव्हा तिला कुणा योग्य पतिच्या हाती सोपविणेच उचित आहे. आपण भावांनी अवश्यच हे कार्य पूर्वीच करावयास हवे होते. ॥२७ १/२॥
तदेतत् कर्मणो ह्यस्य फलं पापस्य दुर्मते ॥ २८ ॥

अस्मिन्नेवाभिसम्प्राप्तं लोके विदितमस्तु ते ।
आपल्या येथून जे बलपूर्वक कन्येचे अपहरण झाले हे आपल्या या दूषित बुद्धिचे आणि पापकर्माचे फळ आहे. जे आपल्याला याच लोकात प्राप्त झाले आहे. ही गोष्ट आपल्याला उत्तम प्रकारे विदित व्हावयास हवी. ॥२८ १/२॥
विभीषणवचः श्रुत्वा राक्षसेन्द्रः स रावणः ॥ २९ ॥

दौरात्म्येनात्मनोद्धूतः तप्ताम्भ इव सागरः ।
ततोऽब्रवीद् दशग्रीवः क्रुद्धः संरक्तलोचनः ॥ ३० ॥
विभीषणाचे हे वचन ऐकून राक्षसराज रावण आपण केलेल्या दुष्टतेने पीडित होऊन तापलेले जल असलेल्या समुद्रासमान संतप्त झाला. तो रोषाने जळू लागला आणि त्याचे डोळे लाल झाले. तो म्हणाला - ॥२९-३०॥
कल्प्यतां मे रथः शीघ्रं शूराः सज्जीभवन्तु नः ।
भ्राता मे कुम्भकर्णश्च ये च मुख्या निशाचराः ॥ ३१ ॥

वाहनान्यधिरोहन्तु नानाप्रहरणायुधाः ।
अद्य तं समरे हत्वा मधुं रावणनिर्भयम् ॥ ३२ ॥

सुरलोकं गमिष्यामि युद्धकाङ्‌क्षी सुहृद्‌वृतः ।
माझा रथ शीघ्र जुंपून आवश्यक सामग्रीसह सुसज्जित केला जाऊ दे. माझे शूरवीर सैनिक रणयात्रेसाठी तयार होवोत. भाऊ कुम्भकर्ण तसेच अन्य मुख्य मुख्य निशाचर नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित होऊन वाहनात बसूं देत. आज रावणाचे भय न मानणार्‍या मधुचा समरांगणात वध करून मित्रांसह युद्धाच्या इच्छेने मी देवलोकाची यात्रा करीन. ॥३१-३२ १/२॥
अक्षौहिणीसहस्राणि चत्वार्यग्र्याणि रक्षसाम् ॥ ३३ ॥

नानाप्रहरणान्याशु निर्ययुर्युद्धकांक्षिणाम् ।
रावणाच्या आज्ञेने युद्धाबद्दल उत्साह बाळगणारी श्रेष्ठ राक्षसांची चार हजार अक्षौहिणी सेना नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे घेऊन शीघ्र लंकेतून बाहेर पडली. ॥३३ १/२॥
इन्द्रजित् त्वग्रतः सैन्यान् सैनिकान् परिगृह्य च ॥ ३४ ॥

जगाम रावणो मध्ये कुम्भकर्णश्च पृष्ठतः ।
मेघनाद समस्त सैनिकांना बरोबर घेऊन सेनेच्या पुढे पुढे चालला. रावण मध्ये होता आणि कुम्भकर्ण पाठोपाठ चालू लागला. ॥३४ १/२॥
विभीषणश्च धर्मात्मा लङ्‌कायां धर्मामाचरत् ॥ ३५ ॥

शोषाः सर्वे महाभागा ययुर्मधुपुरं प्रति ।
विभीषण धर्मात्मा होते. म्हणून ते लंकेतच राहून धर्माचरण करू लागले. शेष सर्व महाभाग निशाचर मधुपुराकडे चालू लागले. ॥३५ १/२॥
खरैरुष्ट्रैर्हयैर्दीप्तैः शिंशुमारैर्महोरगैः ॥ ३६ ॥

राक्षसाः प्रययुः सर्वे कृत्वाऽऽकाशं निरन्तरम् ।
गाढवे, ऊंट, घोडे, शिशुमार (घोरपड) आणि मोठ मोठे नाग आदि दीप्तिमान्‌ वाहनांवर आरूढ होऊन सर्व राक्षस आकाशाला अवकाशरहित करीत चालू लागले. ॥३६ १/२॥
दैत्याश्च शतशस्तत्र कृतवैराश्च दैवतैः ॥ ३७ ॥

रावणं प्रेक्ष्य गच्छन्तं अन्वगच्छन् हि पृष्ठतः ।
रावणाला देवलोकावर आक्रमण करतांना पाहून शेकडो दैत्यही त्याच्या मागोमाग निघाले; ज्यांचे देवतांशी (पूर्वीच) वैर उत्पन्न झालेले होते. ॥३७ १/२॥
स तु गत्वा मधुपुरं प्रविश्य च दशाननः ॥ ३८ ॥

न ददर्श मधुं तत्र भगिनीं तत्र दृष्टवान् ।
मधुपुरात पोहोचून दशमुख रावणाने तेथे कुम्भीनसीला तर पाहिले, परंतु मधुचे दर्शन त्याला झाले नाही. ॥३८ १/२॥
सा च प्रह्वाञ्जलिर्भूत्वा शिरसा चरणौ गता ॥ ३९ ॥

तस्य राक्षसराजस्य त्रस्ता कुम्भीनसी तदा ।
त्यासमयी कुम्भीनसीने भयभीत होऊन हात जोडून राक्षसराजाच्या चरणांवर मस्तक ठेवले. ॥३९ १/२॥
तां समुत्थापयामास न भेतव्यमिति ब्रुवन् ॥ ४० ॥

रावणो राक्षसश्रेष्ठः किं चापि करवाणि ते ।
तेव्हा राक्षसराज रावणाने म्हटले -घाबरू नको ! नंतर त्याने कुम्भीनसीला उठवले आणि म्हटले - मी तुझे कोणते प्रिय कार्य करूं ? ॥४० १/२॥
साब्रवीद् यदि मे राजन् प्रसन्नस्त्वं महाभुज ॥ ४१ ॥

भर्तारं न ममेहाद्य हन्तुर्महसि मानद ।
न हीदृशं भयं किञ्चित् कुलस्त्रीणामिहोच्यते ॥ ४२ ॥

भयानामपि सर्वेषां वैधव्यं व्यसनं महत् ।
ती म्हणाली -दुसर्‍यांना मान देणार्‍या राक्षसराजा ! महाबाहो ! जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आज येथे माझ्या पतिचा वध करू नये; कारण की कुलवधूसाठी वैधव्यासमान दुसरे कोठलेही भय सांगितले जात नाही. वैधव्य हेच नारीसाठी सर्वांत मोठे भय आणि सर्वात महान संकट आहे. ॥४१-४२ १/२॥
सत्यवाग्भव राजेन्द्र मामवेक्षस्व याचतीम् ॥ ४३ ॥

त्वयाप्युक्तं महाराज न भेतव्यमिति स्वयम् ।
राजेंद्र ! आपण सत्यवादी आहात - आपले वचन सत्य करा. मी आपल्यापाशी पतीच्या जीवनाची भीक मागत आहे. आपण माझ्याकडे आपल्या या दुःखी बहिणीकडे पहा, माझ्यावर कृपा करावी ! महाराज ! आपण स्वतःच मला आश्वासन देऊन म्हटले होते की घाबरू नको ! म्हणून आपण त्याच वचनाची लाज राखावी. ॥४३ १/२॥
रावणस्त्वब्रवीद् धृष्टः स्वसारं तत्र संस्थिताम् ॥ ४४ ॥

क्व चासौ तव भर्ता वै मम शीघ्रं निवेद्यताम् ।
सह तेन गमिष्यामि सुरलोकं जयाय हि ॥ ४५ ॥
हे ऐकून रावण प्रसन्न झाला. तो तेथे उभ्या असलेल्या आपल्या बहिणीला म्हणाला - तुझा पति कोठे आहे ? त्याला शीघ्र मजकडे सोपव. मी त्याला बरोबर घेऊन देवलोकावर विजय मिळविण्यासाठी जाईन. ॥४४-४५॥
तव कारुण्यसौहार्दान् निवृत्तोऽस्मि मधोर्वधात् ।
इत्युक्ता सा समुत्थाप्य प्रसुप्तं तं निशाचरम् ॥ ४६ ॥

अब्रवीत् सम्प्रहृष्टेव राक्षसी सा पतिं वचः ।
तुझ्या प्रति सौहार्द आणि करुणेमुळे मी मधुच्या वधाचा विचार सोडून दिला आहे. रावणाने असे म्हटल्यावर राक्षसकन्या कुम्भीनसी अत्यंत प्रसन्न झाल्याप्रमाणे आपल्या झोपलेल्या पतिजवळ गेली आणि त्या निशाचरास उठवून म्हणाली - ॥४६ १/२॥
एष प्राप्तो दशग्रीवो मम भ्राता महाबलः ॥ ४७ ॥

सुरलोकजयाकाङ्‌क्षी साहाय्ये त्वां वृणोति च ।
तदस्य त्वं सहायार्थं सबन्धुर्गच्छ राक्षस ॥ ४८ ॥
राक्षसप्रवर ! हे माझे भाऊ महाबली दशग्रीव आले आहेत आणि देवलोकावर विजय मिळविण्याची इच्छा घेऊन तिकडे जात आहेत. या कार्यासाठी ते आपल्यालाही सहायक बनवू इच्छित आहेत. म्हणून आपण आपल्या बंधु-बांधवांसह यांच्या सहाय्यासाठी जावे. ॥४७-४८॥
स्निग्धस्य भजमानस्य युक्तमर्थाय कल्पितुम् ।
तस्यास्तद्वचनं श्रुत्वा तथेत्याह मधुर्वचः ॥ ४९ ॥
माझ्या नात्याने आपल्यावर यांचा स्नेह आहे. आपल्याला जावई मानून हे आपल्या प्रति अनुराग ठेवत आहेत. म्हणून आपण यांच्या कार्याच्या सिद्धिसाठी अवश्य मदत केली पाहिजे. पत्‍नीचे हे वचन ऐकून मधुने तथास्तु म्हणून सहायता देणे स्वीकार केले. ॥४९॥
ददर्श राक्षसश्रेष्ठं यथान्यायमुपेत्य सः ।
पूजयामास धर्मेण रावणं राक्षसाधिपम् ॥ ५० ॥
नंतर तो न्यायोचित रीतिने निकट जाऊन राक्षसाधिप रावणास भेटला. भेटून त्याने धर्मास अनुसरून त्याचा स्वागत-सत्कार केला. ॥५०॥
प्राप्य पूजां दशग्रीवो मधुवेश्मानि वीर्यवान् ।
तत्र चैकां निशामुष्य गमनायोपचक्रमे ॥ ५१ ॥
मधुच्या भवनात यथोचित आदर-सत्कार प्राप्त करून पराक्रमी दशग्रीव तेथे एक रात्र राहिला, नंतर सकाळी उठून तेथून जाण्यास उद्यत झाला. ॥५१॥
ततः कैलासमासाद्य शैलं वैश्रवणालयम् ।
राक्षसेन्द्रो महेन्द्राभः सेनामुपनिवेशयत् ॥ ५२ ॥
मधुपुराहून यात्रा करून महेंद्राच्या बरोबरीने पराक्रमी राक्षसराज रावण सायंकाळ पर्यंत कुबेराचे निवासस्थान कैलास पर्वतावर जाऊन पोहोचला. तेथे त्याने आपल्या सेनेची छावणी ठोकण्याचा विचार केला. ॥५२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंचविसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP