[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुमन्त्रस्यायोध्यायां परावर्तनं तस्य मुखतः श्रीरामस्य संदेशं श्रुत्वा पौराणां विलापो दशरथस्य कौसल्यायाश्च मूर्छान्तःपुरस्थानां राज्ञीनां आर्तनादश्च -
सुमंत्रांचे अयोध्येला परतणे, त्यांच्या मुखाने श्रीरामांचा संदेश ऐकून पुरवासी लोकांचा विलाप, राजा दशरथ आणि कौसल्या यांची मूर्च्छा, तथा अंतःपुरातील राण्यांचा आर्तनाद -
कथयित्वा तु दुःखार्तः सुमन्त्रेण चिरं सह ।
रामे दक्षिणकूलस्थे जगाम स्वगृहं गुहः ॥ १ ॥
इकडे, ज्यावेळी श्रीराम गंगेच्या दक्षिणतटावर उतरले, तेव्हा गुह दुःखाने व्याकुळ होऊन सुमंत्राबरोबर बराच वेळपर्यत बोलत राहिला. त्यानंतर तो सुमंत्राला बरोबर घेऊनच आपल्या घरी निघून गेला. ॥१॥
भरद्वाजाभिगमनं प्रयागे च सभाजनम् ।
आ गिरेर्गमनं तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् ॥ २ ॥
श्रीरामांचे प्रयागात भरद्वाजांच्या आश्रमात जाणे, मुनिंच्या द्वारा सत्कार होणे आणि चित्रकूट पर्वतावर पोहोंचणे- हा सर्व वृत्तान्त शृंगवेरच्या निवासी गुप्तचरांनी पाहिला आणि परत येऊन गुहास या सर्व गोष्टी सांगितल्या. ॥२॥
अनुज्ञातः सुमन्त्रोऽथ योजयित्वा हयोत्तमान् ।
अयोध्यामेव नगरीं प्रययौ गाढदुर्मनाः ॥ ३ ॥
या सर्व गोष्टी जाणून घेऊन सुमंत्र गुहाचा निरोप घेऊन आपल्या उत्तम घोड्यांना रथास जुंपून अयोध्याकडेच परत निघाले. त्या समयी त्यांच्या मनास अत्यंत दुःख होत होते. ॥३॥
स वनानि सुगन्धीनि सरितश्च सरांसि च ।
पश्यन् यत्तौ ययौ शीघ्रं ग्रामाणि नगराणि च ॥ ४ ॥
ते मार्गात सुगंधित वने, नद्या, सरोवरे, गांवे आणि नगरांना पहात पहात अत्यंत सावधपणे शीघ्रतापूर्वक जात होते. ॥४॥
ततः सायाह्नसमये द्वितीयेऽहनि सारथिः ।
अयोध्यां समनुप्राप्य निरानन्दां ददर्श ह ॥ ५ ॥
शृंगवेरपुरातून परत निघाल्याच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी अयोध्येत पोहोंचल्यावर त्यांनी पाहिले की सारी पुरी आनंदशून्य झाली आहे. ॥५॥
स शून्यामिव निःशब्दां दृष्ट्‍वा परमदुर्मनाः ।
सुमन्त्रश्चिन्तयामास शोकवेगसमाहतः ॥ ६ ॥
तेथे कोठे एक शब्द ही ऐकू येत नाही. सारी पुरी इतकी निरव होती की जणु मनुष्यांवाचून शून्य होऊन गेली आहे. अयोध्येची अशी दशा पाहून सुमंत्राला मनात अत्यंत दुःख झाले. ते शोकाच्या वेगाने पीडित होऊन या प्रकारे चिंता करू लागले- ॥६॥
कच्चिन्न सगजा साश्वा सजना सजनाधिपा ।
रामसंतापदुःखेन दग्धा शोकाग्निना पुरी ॥ ७ ॥
’न जाणो असे तर झाले नाही ना की श्रीरामाच्या विरहजनित संतापाच्या दुःखाने व्यथित होऊन हत्ती, घोडे, मनुष्य आणि महाराजांसहित सारी अयोध्यापुरी शोकाग्निने दग्ध होऊन गेली आहे.’ ॥७॥
इति चिन्तापरः सूतो वाजिभिः शिघ्रयायिभिः ।
नगरद्वारमासाद्य त्वरितः प्रविवेश ह ॥ ८ ॥
या चिंतेत पडालेल्या सारथि सुमंत्रांनी शीघ्रगामी घोड्यांच्या द्वारा नगरद्वारावर पोहोचून तात्काळच पुरीच्या आत प्रवेश केला. ॥८॥
सुमन्त्रमभिधावन्तः शतशोऽथ सहस्रशः ।
क्व राम इति पृच्छन्तः सूतमभ्यद्रवन् नराः ॥ ९ ॥
सुमंत्रांना पहातांच शेकडो आणि हजारो पुरवासी लोक धावत आले आणि ’श्रीराम कोठे आहेत ?’ असे विचारत त्यांच्या रथाच्या बरोबर बरोबर धावू लागले. ॥९॥
तेषां शशंस गङ्‌गायामहमापृच्छ्य राघवम् ।
अनुज्ञातो निवृत्तोऽस्मि धार्मिकेण महात्मना ॥ १० ॥

ते तीर्णा इति विज्ञाय बाष्पपूर्णमुखा नराः ।
अहो धिगिति निश्वस्य हा रामेति विचुक्रुशुः ॥ ११ ॥
त्या समयी सुमंत्रांनी त्या लोकांना म्हटले- ’सज्जनांनो ! मी गंगेच्या किनार्‍यापर्यंत राघवांच्या बरोबर गेलो होतो. तेथून त्या धर्मनिष्ठ महात्म्याने मला परत जाण्याची आज्ञा दिली. म्हणून मी त्यांचा निरोप घेऊन येथे परत आलो आहे.’ त्या तिन्ही व्यक्ती गंगेच्या दुसर्‍या तीरास निघून गेल्या’ हे जाणून सर्व लोकांच्या मुखांवरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ’अहो ! आमचा धिक्कार असो’ असे म्हणून ते दीर्घ श्वास घेऊ लागले आणि ’हा राम !’ असा आक्रोश करून जोरजोराने करुण क्रंदन करू लागले. ॥१०-११॥
शुश्राव च वचस्तेषां वृन्दं वृन्दं च तिष्ठताम् ।
हताः स्म खलु ये नेह पश्याम इति राघवम् ॥ १२ ॥
सुमंत्रांनी त्यांची बोलणी ऐकली. ते झुंडीच्या झुंडीने उभे राहून म्हणत होते- ’हाय ! निश्चितच आम्ही मारले गेलो आहो; कारण की आता आम्ही येथे राघवास पाहू शकणार नाही. ॥१२॥
दानयज्ञविवाहेषु समाजेषु महत्सु च ।
न द्रक्ष्यामः पुनर्जातु धार्मिकं राममन्तरा ॥ १३ ॥
’दान, यज्ञ, विवाह तसेच मोठमोठे सामाजिक उत्सव यांच्या वेळी आता आम्ही कधी धर्मात्मा श्रीरामांना आमच्यामध्ये उभे असलेले पाहू शकणार नाही. ॥१३॥
किं समर्थं जनस्यास्य किं प्रियं किं सुखावहम् ।
इति रामेण नगरं पित्रेव परिपालितम् ॥ १४ ॥
’अमक्या पुरुषासाठी कोणती वस्तु उपयोगी आहे ? काय केल्याने त्याचे प्रिय होईल ? आणि कुठल्या कुठल्या वस्तुंनी त्याला सुख मिळेल इत्यादि गोष्टींचा विचार करून राम पित्याप्रमाणे या नगराचे पालन करीत होते.’ ॥१४॥
वातायनगतानां च स्त्रीणामन्वन्तरापणम् ।
रामशोकाभितप्तानां शुश्राव परिदेवनाम् ॥ १५ ॥
बाजारांतून जात असतां सारथ्यांच्या कानावर स्त्रियांच्या रडण्याचा आवाज पडला, ज्या महालाच्या खिडक्यांमधून बसून श्रीरामांसाठी संतप्त होऊन विलाप करीत होत्या. ॥१५॥
स राजमार्गमध्येन सुमन्त्रः पिहिताननः ।
यत्र राजा दशरथस्तदेवोपययौ गृहम् ॥ १६ ॥
राजमार्गाच्या मधून जातांना सुमंत्रांनी कपड्यांनी आपले तोंड झाकून घेतले. ते रथ घेऊन जेथे दशरथ विद्यमान होते त्या भवनाकडे गेले. ॥१६॥
सोऽवतीर्य रथाच्छीघ्रं राजवेश्म प्रविश्य च ।
कक्ष्याः सप्ताभिचक्राम महाजनसमाकुलाः ॥ १७ ॥
राजमहालाच्या जवळ पोहोंचताच ते शीघ्रच रथांतून उतरले आणि आत प्रवेश करून बर्‍याचशा मनुष्यांनी भरलेल्या सात देवड्या पार करून गेले. ॥१७॥
हर्म्यैर्विमानैः प्रासादैरवेक्ष्याथ समागतम् ।
हाहाकारकृता नार्यो रामादर्शनकर्शिताः ॥ १८ ॥
धनिकांच्या अट्टालिका, सात मजली घरे तथा राजभवनात बसलेल्या स्त्रिया सुमंत्र परत आलेले पाहून श्रीरामांच्या दर्शनापासून वञ्चित झाल्याने दुःखाने दुर्बल होऊन हाहाकार करू लागल्या. ॥१८॥
आयतैर्विमलैर्नेत्रैरश्रुवेगपरिप्लुतैः ।
अन्योन्यमभिवीक्षन्तेऽव्यक्तमार्ततराः स्त्रियः ॥ १९ ॥
त्यांचे काजळ आदिपासून रहित मोठे मोठे नेत्र अश्रूंच्या वेगामध्ये बुडून गेले होते. त्या स्त्रिया अत्यंत आर्त होऊन अव्यक्त भावाने एक दुसरीकडे पहात राहिल्या होत्या. ॥१९॥
ततो दशरथस्त्रीणां प्रासादेभ्यस्ततस्ततः ।
रामशोकाभितप्तानां मन्दं शुश्राव जल्पितम् ॥ २० ॥
तद्‍नंतर राजमहालात जेथून तेथून श्रीरामांच्या शोकाने संतप्त झालेल्या राजा दशरथांच्या राण्यांची मंदस्वरात बोलली गेलेली वचने ऐकू आली. ॥२०॥
सह रामेण निर्यातो विना राममिहागतः ।
सूतः किं नाम कौसल्यां क्रोशन्तीं प्रतिवक्ष्यति ॥ २१ ॥
’हे सारथी सुमंत्र श्रीरामांच्या बरोबर येथून गेले होते आणि त्यांच्या शिवायच येथे परत आले आहेत, अशा स्थितिमध्ये करुण क्रंदन करणार्‍या कौसल्येला ते काय उत्तर देणार आहेत ? ॥२१॥
यथा च मन्ये दुर्जीवं एवं न सुकरं ध्रुवम् ।
आच्छिद्य पुत्रे निर्याते कौसल्या यत्र जीवति ॥ २२ ॥
’मी समजत आहे की जसे जीवन दुःखजनित आहे, त्याचप्रमाणे निश्चितच त्याचा नाश ही सुकर नाही म्हणून तर न्यायतः प्राप्त झालेल्या अभिषेकाचा त्याग करून पुत्र वनात निघून गेल्यावरही कौसल्या अद्याप जिवंत आहे.’ ॥२२॥
सत्यरूपं तु तद् वाक्यं राजस्त्रीणां निशामयन् ।
प्रदीप्त इव शोकेन विवेश सहसा गृहम् ॥ २३ ॥
राण्यांचे हे सत्य वचन ऐकून जणु शोकाने दग्ध होत सुमंत्रांनी एकाएकी राजभवनात प्रवेश केला. ॥२३॥
स प्रविश्याष्टमीं कक्ष्यां राजानं दीनमातुरम् ।
पुत्रशोकपरिद्यूनमपश्यत पाण्डरे गृहे ॥ २४ ॥
आठव्या देवडीत प्रवेश करून त्यांनी पाहिले की राजे एका श्वेतभवनात बसलेले आहेत आणि पुत्र शोकाने मलिन, दीन एवं आतुर होत आहेत. ॥२४॥
अभिगम्य तमासीनं राजानमभिवाद्य च ।
सुमन्त्रो रामवचनं यथोक्तं प्रत्यवेदयत् ॥ २५ ॥
सुमंत्रांनी तेथे बसलेल्या महाराजांजवळ जाऊन त्यांना प्रणाम केला आणि त्यांना रामांचे वचन जसेच्या तसे ऐकविले. ॥२५॥
स तूष्णीमेव तच्छ्रुत्वा राजा विद्रुतमानसः ।
मूर्च्छितो न्यपतद्‌ भूमौ रामशोकाभिपीडितः ॥ २६ ॥
राजांनी गुपचुप ते सर्व ऐकून घेतले. ऐकून त्यांचे हृदय द्रवित (व्याकुळ) झाले आणि नंतर ते श्रीरामाच्या शोकाने अत्यंत पीडित होऊन मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले. ॥२६॥
ततोऽन्तःपुरमाविद्धं मूर्च्छिते पृथिवीपतौ ।
उच्छ्रित्य बाहू चुक्रोश नृपतौ पतिते क्षितौ ॥ २७ ॥
महाराज मूर्च्छित झाल्यावर सर्व अंतःपुर दुःखाने व्यथित झाले. राजा जमिनीवर पडताच सर्व लोक दोन्ही हात उंच करून जोरजोराने चीत्कार करू लागले. ॥२७॥
सुमित्रया तु सहिता कौसल्या पतितं पतिम् ।
उत्थापयामास तदा वचनं चेदमब्रवीत् ॥ २८ ॥
त्या समयी कौसल्येने सुमित्रेच्या सहाय्याने आपल्या खाली पडलेल्या पतिला उठविले आणि या प्रकारे म्हणाली- ॥२८॥
इमं तस्य महाभाग दूतं दुष्करकारिणः ।
वनवासादनुप्राप्तं कस्मान्न प्रतिभाषसे ॥ २९ ॥
’महाभाग ! हे सुमंत्र दुष्कर कर्म करणार्‍या श्रीरामाचे दूत होऊन त्यांचा संदेश घेऊन वनांतून परत आले आहेत. आपण त्यांच्याशी का बरे बोलत नाही ? ॥२९॥
अद्येममनयं कृत्वा व्यपत्रपसि राघव ।
उत्तिष्ठ सुकृतं तेऽस्तु शोके न स्यात् सहायता ॥ ३० ॥
’राघव ! पुत्राला वनवास देणे अन्याय आहे. हा अन्याय करून आपण लज्जित का बरे होत आहां ? उठावे. आपल्याला आपल्या सत्यपालनाचे पुण्य प्राप्त होवो. जर आपण या प्रकारे शोक कराल, तर आपल्या सहाय्यकांचा समुदायही आपल्या बरोबरच नष्ट होऊन जाईल. ॥३०॥
देव यस्या भयाद् रामं नानुपृच्छसि सारथिम् ।
नेह तिष्ठति कैकेयी विश्रब्धं प्रतिभाष्यताम् ॥ ३१ ॥
’देवा ! आपण जिच्या भयाने सुमंत्रांना श्रीरामांचा समाचार विचारत नाही; ती कैकेयी येथे उपस्थित नाही; म्हणून निर्भय होऊन बोलावे.’ ॥३१॥
सा तथोक्त्वा महाराजं कौसल्या शोकलालसा ।
धरण्यां निपपाताशु बाष्पविप्लुतभाषिणी ॥ ३२ ॥
महाराजांना असे म्हणून कौसल्येचा गळा भरून आला. अश्रुंच्यामुळे तिला बोलता आले नाही आणि ती शोकाने व्याकुळ होऊन तात्काळ पृथ्वीवर कोसळली. ॥३२॥
एवं विलपन्तीं तथा दृष्ट्‍वा कौसल्यां पतितां भुवि ।
पतिं चावेक्ष्य ताः सर्वाः समन्ताद् रुरुदुः स्त्रियः ॥ ३३ ॥
या प्रकारे विलाप करणारी कौसल्या जमिनीवर पडल्याचे पाहून आणि आपल्या पतीच्या मूर्च्छित दशेकडे दृष्टीपात करून सर्व राण्या त्यांना चारीबाजूनी घेरून रडू लागल्या. ॥३३॥
ततस्तमन्तःपुरनादमुत्थितं
     समीक्ष्य वृद्धास्तरुणाश्च मानवाः ।
स्त्रियश्च सर्वा रुरुदुः समन्ततः
     पुरं तदासीत् पुनरेव सङ्‌कुलम् ॥ ३४ ॥
अंतःपुरात उठलेला तो आर्तनाद पाहून आणि ऐकून नगरातील वृद्ध आणि तरूण पुरुषही रडू लागले. सर्व स्त्रिया ही रडू लागल्या. ते सारे नगर त्या समयी सर्व बाजूनी पुन्हा शोकाने व्याकुळ होऊन गेले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP