॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय नववा ॥
दशरथ - कौसल्या विवाहाची पूर्वकथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मंदोदरीकडून रावणाचा अनुनय :

रावण सीतेसी लावितां हात । हनुमान त्याचा करिता घात ।
तों मंदोदरी येऊनि तेथ । अति अनर्थ चुकविला ॥ १ ॥
अतिकायाची जननी । रावणप्रिया वनमालिनी ।
तया रावणा आलिंगूनी । युक्तवचनीं बोलत ॥ २ ॥
स्वदारकाम मजसीं रम । मजसीं रमणें हा स्वधर्म ।
सीता अकाम चित्ता काम । परम अधर्म अधःपात ॥ ३ ॥
सांडी अकाम सीतेंसी । स्वेच्छा रमावें मजसीं ।
माझेनि कामें सुखी होसी । सीतेपासीं अति दुःख ॥ ४ ॥

सीताहरणामुळे होणारे भावी अनर्थ :

श्रीरामकांता सीता सती । तिचे कामाचे आसक्तीं ।
राक्षसांची जावया व्यक्ती । होईल समाप्ती वंशाची ॥ ५ ॥
कुमार प्रधान सेनापती । अश्व गज रथ पदाती ।
इंद्रजित कुंभकर्ण लंकापती । भस्म होती सीताक्षोभें ॥ ६ ॥
सर्व रस चाखी माशी । दीप चाखितां दाहो तिसीं ।
तेंवी सांडोनि स्वदारेसी । सीतेपासीं भस्मार्थ ॥ ७ ॥
निजपुत्राचा द्वेषकरी । खांब हाणितां शस्त्रधारीं ।
हिरण्यकशिपु नखाग्रीं । सहपरिवारीं निमाला ॥ ८ ॥
खांबी उठिला नरहरीं । येथें वनीं उठेल वनकेसरी ।
सीता सती क्षोभल्यावरी । होईल बोहरी राक्षसां ॥ ९ ॥

परस्त्री अभिलाषेची निंदा :

जानकीचे निजगुह्यांत । काय भरलें आहे अमृत ।
आमुचें गुह्य विषप्रयुक्त । कडू लागत रावणा ॥ १० ॥
स्वस्त्रीपरस्त्रीकामकामुक । समान सुखाचे परिपाक ।
स्वदारकामें परम सुख । परम दुःख परदारा ॥ ११ ॥
परदारेची आसक्ती । पूर्वजां होय अधोगती ।
आपण पावे नरकाप्रती । वंशसमाप्ती परदारें ॥ १२ ॥
वनमालिनी नानायुक्तीं । शिकवितां त्या लंकापती ।
मंदोदरीनें धरोनि हाती । नेला एकांतीं रावण ॥ १३ ॥

नारदाकडून कळलेल्या कथेचे निवेदन :

बैसवोनि प्रिया एकांती । नारदभाष्यकल्पोक्ती ।
सांगतसे रावणाप्रती । मुनि वदंती जे वदला ॥ १४ ॥
आंगींचिये बळाचे मस्ती । तुवां पुसिलें नारदाप्रती ।
मज वधी कोण त्रिजगतीं । देवीं दैत्यीं कीं दानवीं ॥ १५ ॥
देवां अटक तूं दशकंठ । दैत्यतुज पुढें फोलकट ।
दानवेशीं धीट तिखट । परी नर तुज दुर्धर संग्रामीं ॥ १६ ॥
भविष्य पुसों नको रावणा । संकल्पभावी भावना ।
भविष्य चुकवावया जाणा । नाना विंदान करिती प्राणी ॥ १७ ॥
रावणें धरिलें दोनी चरण । मज सांगावें माझें मरण ।
नारद जाणें रामायण । सत्य भाषण तो वदला ॥ १८ ॥
रावणा तुझ्या वधार्थीं । कौसल्यासुत राम दाशरथी ।
तो येवोनि लंकेप्रती । करील समाप्ती राक्षसां ॥ १९ ॥
ऐसें सांगोनि रावणाप्रती । नारद निघे ऊर्ध्वपंथीं ।
त्याचे गमनाची गती । त्रिजगतीं अनुपम्य ॥ २० ॥
रामनामें वीणा वाजत । श्रीरामनाम मुखीं गात ।
नामामृतें नित्य तृप्त । स्वयें डुल्लत स्वानंदें ॥ २१ ॥
कीर्तनाच्या संतुष्टीं । श्रीरामरूप देखें दृष्टीं ।
पदोपदीं आनंदकोटी । सुखसंतुष्टी उल्लासे ॥ २२ ॥

रावणाचा ब्रह्मदेवास प्रश्न :

ऐसें नारदें केलिया गमन । मागें रावण उद्विग्न ।
पाचारोनि चतुरानन । पुसे आपण तें ऐका ॥ २३ ॥
कौसल्या ते कोण कैसी । दशरथ तो कोण कोणाचे वंशीं ।
त्याची वस्ती कोणें देशीं । हें मजपासी सांगावें ॥ २४ ॥
नाहीं कौसल्येचा विवाह झाला । नाहीं दशरथ उपजला ।
नाहीं राम जन्माला आला । तैं बोलिला नारद ॥ २५ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । चहूं मुखें हांसें चतुरानन ।
नारदाचें जें भाषण । अन्यथा कोण करूं शकें ॥ २६ ॥

ब्रह्मदेवाचे कथन :

ब्रह्मा सांगे रावणापासीं । कौसल्या कन्या कोसलरायासीं ।
दशरथ तो सूर्यवंशीं । अयोध्येसी निजराजा ॥ २७ ॥
त्या दोहींचे पाणिग्रहण । होतां रावणे केलें विघ्न ।
अन्यथा नव्हे नारदवचन । लागलें लग्न समुद्रीं ॥ २८ ॥
कौसल्या आणि दशरथ । केंवी पां गेले समुद्राआंत ।
कैसेनि लग्न लागलें तेथ । श्रोतें वृत्तांत पुसती ॥ २९ ॥
हे तंव जुनाट परिपाटी । काळिकाखंडी गुह्य गोष्टी ।
नारदें देखोनि ज्ञानदृष्टीं । वदें जगजेठी निःशंक ॥ ३० ॥

सेतुबंधमाहात्म्यात आलेले वर्णन :

सेतुबंधमाहात्म्यांत । दुसरे एके लघुमाहात्म्यांत ।
थोरलिया माहात्म्यांआंत । ग्रंथ समस्त लिहिला असे ॥ ३१ ॥
अहिरावण महिरावण । त्यांचें जनन आणि मरण ।
कौसल्यादशरथपाणिग्रहण । तेथें संपूर्ण लिहिलें असें ॥ ३२ ॥
असो या ग्रंथाची ग्रंथोक्ती । झाडा सुचावा पैं किती ।
वदनीं वदविता श्रीरघुपती । कविता करिता श्रीराम ॥ ३३ ॥
माझें अंगी मूर्खपण । लटिकें लिहिले रामायण ।
तेंही वाचितां पैं जाण । होय क्षालन महापापा ॥ ३४ ॥
ग्रंथ असंख्य आनआन । तेथेंही आनआन निरूपण ।
माझें भावार्थरामायाण । सावधान अवधारा ॥ ३५ ॥
कौसल्यादशरथपाणिग्रहण । रावणे करितां अति विघ्न ।
समुद्रामाजी लागलें लग्न । तें अतिविंदान अवधारा ॥ ३६ ॥

कौसल्येला पेटीतून समुद्रात सोडले :

ब्रह्मा सांगे रावणापासीं । कौसल्यादशरथलग्नासी ।
वर्‍हाड जातें कोसलदेशीं । पांचवे दिवशीं लग्नसिद्धि ॥ ३७ ॥
ऐसी रावणें ऐकतां गोष्टी । कौसल्येवरी क्षोभक दृष्टी ।
धाडी घालोनि उठाउठीं । हरिली गोरटी कौसल्या ॥ ३८ ॥
रावण पोटीं भयभीत । कौसल्या न ठेवी लंकेआंत ।
देंव चिंतिती माझा घात । ते विपरीतार्थ करितील ॥ ३९ ॥
देव कामारे मजपासीं । माझा मृत्यु आवडे त्यांसी ।
ते कौसल्या दशरथापासीं । लघुलाघवेंसीं नेतील ॥ ४० ॥
ऐसा धाक रावणासीं । कौशल्या न ठेवीच लंकेसीं ।
तीतें घालोनि पेटीसीं । समुद्रापासीं ठेवणें धाडी ॥ ४१ ॥
द्वीपद्राक्षें अमृतफळें । लाडू पक्वान्नें रायकेळें ।
पात्रें भरूनि शीतळ जळें । सांठविलें पेटींत ॥ ४२ ॥
त्या पेटीमाजी कौसल्येसी । घालोनिं धाडी समुद्रापासीं ।
समुद्रें ठेविली मीनापासीं । मीनें दाढेंसीं घातली ॥ ४३ ॥
मीन क्रीडतां समुद्री । त्यासीं तिमि धावे युद्धावारीं ।
मीन म्हणे युद्धाचें संचारीं । पेटी चकचुरी होईल ॥ ४४ ॥
म्हणोनियां उठाउठीं । पेटी ठेवोनि समुद्रबेटीं ।
मीन परतला युद्धासाठीं । सक्रोधदृष्टी संग्रामा ॥ ४५ ॥
त्याप्रमाणेच दशरथावर आक्रमण व समुद्रार्पण :
दशरथ लग्नत्वरा करी । पायवाट मार्ग दुरी ।
तारूवीं बैसोनि समुद्रीं । जाऊं त्रिरात्रीं कोसलदेशा ॥ ४६ ॥
चेउलींहूनि जेंवी द्वारका । पायवाट दूरी देखा ।
तारूवीं बैसोनि जातां लोकां । दिवसा दों कां जाऊं पावती ॥ ४७ ॥
राया दशरथें यापरी । वर्‍हाड घालोनि नावेवरी ।
स्वयें निघाला समुद्रीं । त्वरेंकरीं जावया ॥ ४८ ॥
टकेपताका नावेवरी । निशाणें त्राहाटिल्या भेरी ।
वर्‍हाड चालिलें समुद्रीं । अति गजरीं उल्लासें ॥ ४९ ॥
रावणें पाळती करोनि पुरी । विमानबळें येवोनि अंधारी ।
दशरथ बैसला जें नावेवरी । ते निशाचरीं फोडिली ॥ ५० ॥
बाप होणार कैंसे बळीं । तें न चुके कदाकाळीं ।
दशरथ बुडतां पैं जळीं । जालें ते काळीं अपूर्व ॥ ५१ ॥
दशरथ बुडतां पैं तळवटीं । रामनाम स्मरे वाक्पुटीं ।
तंव सांपडली फुटकी पाटी । राम संकटी तारक ॥ ५२ ॥
दशरथ-कौसल्या मीलन, परस्परांकडून वृत्त निवेदन :
श्रीराम दसरथाचे कुशीं । म्हणोनि नाम आठवे त्यासी ।
बुडतां नव्हें कासांवीसी । नामें रायासी तारिलें ॥ ५३ ॥
नाम आठविल्या आकांती । आकांतामाजी अति विश्रांती ।
नामें तारक त्रिजगती । सुखसंवित्ती श्रीरामें ॥ ५४ ॥
सांपडतां फुटकी पाटी । समुद्रलाटांच्या पै लोटीं ।
जेथें कौसल्येची पेटी । राजा त्या बेटीं लागला ॥ ५५ ॥
दशरथ पैं उठाउठीं । सवेग चालिला त्या बेटीं ।
संमुख देखोनियां पेटी । आश्चर्य पोटीं मानिलें ॥ ५६ ॥
भोंवतीं समुद्राची घरटी । येथे कोणें ठेविली पेटी ।
पाहतां दुसरें न दिसे दृष्टी । विस्मय पोटीं अनिवार ॥ ५७ ॥
तेणें ती पेटी हातीं धरिली । होणारें किल्ली उघडली ।
भीतरीं कौसल्या देखिली । असें बैसली संचित ॥ ५८ ॥
दशरथ पुसे तूं कोण । येरी विस्मयो पावली पूर्ण ।
तुम्ही कोणाचे कोण । येथें आगमन कैसेनि ॥ ५९ ॥
राजा म्हणे तूं गोरटी । तुज कैसेनि प्राप्त पेटी ।
तुज कोणें ठेविलें ये बेटीं । समूळ गोष्टी सांगावी ॥ ६० ॥
पयोनिधि अगाध गहन । मत्स्य मगर अति दारूण ।
ऐसें दुस्तर दुर्गम स्थान । येथें आगमन कैसेनि ॥ ६१ ॥
कोसलरायाची मी राजबाळा । रायें दशरथू वरू नेमला ।
तंव रावणें घालोनि घाला । घेऊन आला मज लंके ॥ ६२ ॥
भविष्ये रावण दचकला पोटीं । भयेंचि मजला घालोनि पेटीं ।
ठेवणें धाडिले समुद्राचें पोटीं । तेणें ये बेटी ठेविलें ॥ ६३ ॥
ऐसिया सांगतां गोष्टी । कौसल्या बाष्पें दाटली कंठीं ।
भाग्यें अभाग्य मीच सृष्टीं । नव्हेचि भेटी दशरथा ॥ ६४ ॥
न व्हावें दशरथाचें लग्न । यालागीं रावणें केलें विघ्न ।
दशरथा करावया भग्न । सवेग सैन्य मोकलिलें ॥ ६५ ॥
जळो जळो तो दशानन । स्वप्नींही न व्हावे संभाषण ।
धरोनि दशरथाचें ध्यान । प्राण त्यागीन स्वानंदें ॥ ६६ ॥
ऐकोनि कौसल्येचें वचन । राजा जाला विस्मयपन्न ।
सप्तसागरीं होतां मग्न । होणार पूर्ण चुकेना ॥ ६७ ॥
राजा सांगे निजवृत्तांत । रावणें माझा करितां घात ।
रक्षिता झाला श्रीरघुनाथ । समुद्राआंत बुडवितां ॥ ६८ ॥
तो समुद्र भरिल्या आंत । येथें आलों मी दशरथ ।
येरी पुसे तूं अजाचा सुत । रघूचा नातू सूर्यवंशी ॥ ६९ ॥

दशरथ-कौसल्या विवाह :

ऐकोनि निश्चयवचन । कौसल्या जाली सुखसंपन्न ।
मज तुष्टला जनार्दन । केलें सुलग्न एकांतीं ॥ ७० ॥
नाहीं कर्माची खटपट । नाही लौकिक अंत : पट ।
नसतां लोकीं कटकट । लग्न लागलें निर्दोष ॥ ७१ ॥
दोहींचा जो निजहरिख । तोचि तयांचा मधुपर्क ।
बोल बोलिलीं जे अनेक । मंगळाष्टकें तीं तेथें ॥ ७२ ॥
विकल्पाचीं झाडिलीं पळें । संकल्पासीं मूद ओंवाळे ।
स्वधर्माचा दीप उजळे । सुखकल्लोळ लग्नार्थ ॥ ७३ ॥
अनोळखता मागें सांडे । तेचि पायीं पायमांडे ।
परमानंद वाडेकोडें । सुखसुरवाडें लग्नार्थ ॥ ७४ ॥
उदरा येईल रघुनाथ । लग्नीं पावला अभिजित ।
लग्नघटिका पाहे भास्वत । काल सांगत सावधान ॥ ७५ ॥
दोहींसी ओळखी होतां स्पष्ट । सुटोनि गेला अंत : पट ।
ॐपुण्याहंवचनें श्रेष्ठ । मौननिष्ठ होवोनि ठेले ॥ ७६ ॥
लग्नधरा समुद्रबेंटी । बोहोलें तेंचि मुख्य पेटी ।
लग्न लागलें उठाउठीं । दृष्टादृष्टी होतांचि ॥ ७७ ॥
यापरी कौसल्येनें निजकांत । लग्नीं वरिला दशरथ ।
पुढील कथेचा अर्थार्थ । आश्चर्यार्थ अवधारा ॥ ७८ ॥
कौसल्या आणि दशरथ । दोघें बैसलीं पेटीआंत ।
फळे पक्वान्नें भक्षित । जळ प्राशित स्वानंदें ॥ ७९ ॥
कौसल्या पुसे दशरथासी । पुढें निर्गती आमुची कैसी ।
राजा सांगे कौसल्येसी । रामनामेंसीं आम्हा मुक्ति ॥ ८० ॥
वसिष्ठसद्‌गुरूवचन । करितां रामनामस्मरण ।
भवभयाचें निर्दाळण । बंधमोचन तें किती ॥ ८१ ॥
आम्ही तुम्ही मिळोन आतां । सावधान एकाग्रता ।
भावें स्मरतां श्रीरघुनाथा । भय सर्वथा आम्हां नाहीं ॥ ८२ ॥
पृथ्वी बुडावया हडबडे । आकाश तुटोनियां पडे ।
तरी नामस्मरत्याकडे । भय बापुडें केंवी निघे ॥ ८३ ॥
ऐकतां रामनामगोष्टी । विघ्नें पळती बारा वाटीं ।
भिवो नकों वो गोरटीं । सुखसंतुष्टी श्रीरामें ॥ ८४ ॥
उदरा यावया श्रीरघुनाथ । निजसामर्थ्यप्रतापवंत ।
प्रवेशला दशरथाआंत । नामीं भावार्थ तेणें त्यासी ॥ ८५ ॥
ऐशीं दोघें करितां गोष्टी । मीनें मीना जोणोनि हाटीं ।
दोघांसहित घेवोनि पेटी । उठाउठीं निघाला ॥ ८६ ॥

रावणाच्या दर्पोक्तीला ब्रह्मदेवाचे उत्तर :

ब्रह्मयासी पुसे रावण । कौसल्यालग्नसमय कोण ।
आजिंचें होतें संधान । लागलें लग्न दशरथासीं ॥ ८७ ॥
ऐकोनि ब्रह्मयाची मात । रावण खदखदां हांसत ।
पहाहो सत्यलोकनाथ । असत्य वदत मजपासीं ॥ ८८ ॥
सत्यलोकीं मग असतां । असत्य मानिसी लंकानाथा ।
तरी ब्रह्मलिखितार्था । तुज तत्वतां कळलें नसे ॥ ८९ ॥
म्या केला दशरथाचा घात । कौसल्या घातली समुद्रांत ।
आतां लग्नीं कैंचा दशरथ । वचन असत्य न मानें ॥ ९० ॥
जिणें मरणें भगवत्सता । ते तुज आली लंकानाथा ।
म्हणसी म्यां मारिलें दशरथा । हें तत्वतां असत्य होय ॥ ९१ ॥

रावणाने ती पेटी आणवून पाहिले तो त्याला दशरथ-कौसल्येचे दर्शन, त्यांची निर्भयता :

ऐसी वक्रोक्ति ब्रह्मवचन । ऐकोनि कां दशानन ।
पेटी आणोनि पाहे आपण । तंव दोघां जणां देखिलें ॥ ९२ ॥
प्रथम निघतां दशरथ । दचकला तो लंकानाथ ।
त्याचा करावया घात । शस्त्रा हात घातला ॥ ९३ ॥
पुढां देखोनि रावण । दशरथा आलें स्फुरण ।
दहा कंठ विंशति नयन । भुई पाडीन करघातें ॥ ९४ ॥
ते काळीं श्रीरघुनाथ । पूर्णप्रतापें दशरथाआंत ।
यालागीं रावणा नाहीं भीत । निःशंकित पुरूषार्थे ॥ ९५ ॥

दशरथाचा वध करण्यास रावण प्रवृत्त, परंतु त्याचा मंदोदरीने प्रतिकार केला :

निःशंक देखोनि दशरथ । रावणा तद्वधीं उद्दत ।
मंदोदरी आली तेथ । निवारीत रावणा ॥ ९६ ॥
त्यासी बेवोन एकांता । बुद्धि सांगे लंकानाथा ।
मारूं जातां दशरथा । तूं अपघाता पावसी ॥ ९७ ॥
पेटी आणोनि अकस्मात । आतांचि निघाला दशरथ ।
तैसाचि निघालिया रघुनाथ । मरण प्राप्त रावणा ॥ ९८ ॥
ऐसी ऐकतां गोष्टी । रावण भय घे पाठीं पोटीं ।
डोळां देखतांचि पेटी । रामभयें पोटीं चळीं कांपे ॥ ९९ ॥
दशरथलग्नाकरितां विघ्न । रावण जाला अति उद्विग्न ।
दाहीं मुखें हीन दीन । कंपायमान भयभीत ॥ १०० ॥

मंदोदरीच्या सूचनेप्रमाणे दशरथ-कौसल्येला अयोध्येस पाठविले :

बुद्धि सांगितली रावणासी । कांहीं न चले होणारासी ।
कौसल्येसहित दशरथासी । अयोध्येसी धाडीं वेगीं ॥ १०१ ॥
कौसल्या आणि दशरथासी । मारितां न मारवे आम्हांसी ।
ठेवों नये गा लंकेसीं । अयोध्येसी धाडवीं वेगीं ॥ १०२ ॥
अन्यथा करूं जातां आपण । यांसी सर्वथा न ये मरण ।
रावणा मानलें वचन । वेगीं विमान आणविलें ॥ १०३ ॥
आणोनियां विमानासीं । कौसल्यायुक्त दशरथासी ।
विमानीं बैसवोनि दोघांसी । अयोध्येसी स्वयें धाडी ॥ १०४ ॥
राजा बुडाला समुद्रात । अयोध्यानगरीं अति आकांत ।
तंव तेथें आला दशरथ । कौसल्येसहित सुलग्न ॥ १०५ ॥
राजा आला देखोनि नगरीं । निशाणें त्राहाटिल्या भेरी ।
गुढिया मखरें घरोघरीं । नरनारी आल्हाद ॥ १०६ ॥
ऐसा पूर्वींल वृत्तांत । मंदोदरी सांगे साद्यंत ।
रावणा तूं कां होसी भ्रांत । होणारार्थ चुकेना ॥ १०७ ॥
ऐसें शिकवोनि रावणासी । सांडवू सिताप्रलोभासी ।
हातीं धरोनियां त्यासी । निजभुवनासी चालविला ॥ १०८ ॥
एकाजनार्दना शरण । कौसल्यादशरथांचे लग्न ।
परम गोड रामायण । निरूपण स्वयें वदवी ॥ १०९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
दशरथकौसल्याविवाहकथनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
॥ ओव्यां १०९ ॥ श्लोक - ॥ एवं संख्या १०९ ॥



GO TOP