[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चतुर्थः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमतो लङ्‌कायां रावणस्यान्तःपुरे च प्रवेशः -
हनुमन्तांचा लङ्‌कापुरीत आणि रावणाच्या अन्तःपुरात प्रवेश -
स निर्जित्य पुरीं लङ्‌कां श्रेष्ठां तां कामरूपिणीम् ।
विक्रमेण महातेजा हनूमान् कपिसत्तमः ॥ १ ॥
स्वतःच्या इच्छेप्रमाणे हवे ते रूप धारण करणार्‍या त्या श्रेष्ठ लङ्‌कानगरीला स्वतःच्या पराक्रमाने जिंकल्यानन्तर महातेजस्वी, महापराक्रमी आणि महाधैर्यवान वानराधिपती हनुमानांनी विनाद्वारानेच रात्री प्राकारावर उडी मारून लंकेत प्रवेश केला. या प्रमाणे जरी त्यांनी नगरीत प्रवेश केला तरी कपिराज सुग्रीवाचे हित करणार्‍या त्या हनुमन्तानी प्रथमतः डावा पाय लंकेमध्ये ठेवला कारण या रीतीने ठेवलेला तो वामपद शत्रूच्या मस्तकी ठेवल्याप्रमाणेच होता(*+). ॥१-२॥
(*+ प्रमाणकाले स्वगृह प्रवेशे विवाहकाळेऽपिच दक्षिणाङ्‌अघ्रिम्‌ ।
कृत्वाग्रतः शत्रुपुर प्रवेशे वामं निदध्याच्चरणं नृपालयंम्‌॥
प्रयाणसमयी, स्वगृही प्रवेश कर्तव्य असतांना, आणि विवाहार्थ गमन करतेवेळी उजवा पाय पुढे टाकून जावे, परन्तु राजवाड्‍यात अथवा शत्रूच्या नगरामध्ये प्रवेश कर्तव्य असल्यास डावा पाय प्रथम पुढे टाकावा.)
अद्वारेण महावीर्यः प्राकारमवपुप्लुवे ।
निशि लङ्‌कां महासत्त्वो विवेश कपिकुञ्जरः ॥ २ ॥
रात्री लंकेमध्ये प्रविष्ट झाल्यावर ते सत्वगुणसंपन्न पवनपुत्र हनुमान तटाच्या आत प्रवेश करून वर पुष्पे अन्थरलेल्या सुशोभित राजमार्गानेच त्या रमणीय लङ्‌कापुरीकडे निघाले. ॥३-४ १/२॥
प्रविश्य नगरीं लङ्‌कां कपिराजहितंकरः ।
चक्रेऽथ पादं सव्यं च शत्रूणां स तु मूर्धनि ॥ ३ ॥

प्रविष्टः सत्त्वसम्पन्नो निशायां मारुतात्मजः ।
स महापथमास्थाय मुक्तपुष्पविराजितम् ॥ ४ ॥

ततस्तु तां पुरीं लङ्‌कां रम्यामभिययौ कपिः ।
जसे आकाश श्वेत मेघांनी सुशोभित होते, त्या प्रमाणे ती रमणीय नगरी आपल्या श्वेत मेघसदृश्य गृहांनी उत्तम प्रकारे शोभत होती. ती गृहे नृत्यसंगीत विषयक वाद्यांच्या ध्वनींनी मिश्र झालेल्या हास्यांच्या उत्कृष्ट ध्वनींनी निनादित (मुखरित) झाली होती. त्यांच्यावर ध्वज आणि अंकुश यांची चित्रे काढलेली होती आणि रत्‍नखचित झरोक्यांनी (खिडक्यांनी) ती सुशोभित होती. ॥५-६॥
हसितोत्कृष्टनिनदैः तूर्यघोषपुरस्कृतैः ॥ ५ ॥

वज्राङ्‌कुशनिकाशैश्च वज्रजालविभूषितैः ।
गृहमेधैः पुरी रम्या बभासे द्यौरिवाम्बुदैः ॥ ६ ॥

प्रजज्वाल तदा लङ्‌का रक्षोगणगृहैः शुभै ।
सिताभ्रसदृशैश्चित्रैः पद्मस्वस्तिकसंस्थितैः ॥ ७ ॥

वर्धमानगृहैश्चापि सर्वतः सुविभूषितैः ।
त्यावेळी लङ्‌का श्वेत मेघांप्रमाणे सुन्दर आणि विचित्र राक्षस गृहांनी प्रकाशित होत होती. त्या गृहांपैकी काही कमलाच्या आकाराची बनविलेली होती तर काही स्वस्तिक (**) चिह्न अथवा आकारांनी युक्त होती. काहीं निर्मिती वर्धमानसञ्ज्ञक (**) गृहांच्या रूपाने करण्यात आली होती. ती गृहे सर्व बाजूनी सजविण्यात आली होती. मुख्यता त्या गृहांमुळे आकाश श्वेत मेघांनी सुशोभित व्हावे त्या प्रमाणे ती नगरी अत्यन्त रमणीय भासत होती. ॥७ १/२॥
(** वराहमिहिर संहितेत गृहांच्या भिन्न भिन्न आकृतिंचे वर्णन केले गेले आहे. त्या अनुसार त्यांचे नामकरण केले गेले होते. जिथे स्वस्तिक आणि वर्धमानसञ्ज्ञक गृहांचा उल्लेख आहे, त्यांच्या गुणांना स्पष्ट करण्यास हे श्लोक उद्धृत केले गेले आहेत-
चतुःशालं चतुर्द्वारं सर्वतोभद्र्सञ्ज्ञितम्‌।
पश्चिमद्वाररहितं नन्द्यावर्ताह्वयन्तु तत्‌ ॥
दक्षिणद्वाररहितं वर्धमानं धनप्रदम्‌।
प्राग्द्वाररहितं स्वस्तिकाख्यं पुत्रधनप्रदम्‌॥
चार खोल्यांनी युक्त गृहाला, ज्याच्या प्रत्येक दिशेला एक-एक असे चार द्वार असतात त्यास सर्वतोभद्र म्हणतात. ज्या गृहाला तीनच द्वार असतात आणि पश्चिम दिशेला द्वार नसते, त्याला नन्द्यावर्त म्हणतात. ज्या गृहाला दक्षिण दिशा वगळून अन्य तीन दिशांना द्वार असतात, त्याला वर्धमान गृह म्हणतात, तो धनाची प्राप्ति करवून देणारा असतो; आणि ज्या गृहाच्या फक्त पूर्व दिशेकडे द्वार नसते, त्या गृहाला स्वस्तिक म्हणतात. असे गृह पुत्र आणि धन दोघांची प्राप्ति करवून देणारा असतो.)
तां चित्रमाल्याभरणां कपिराजहितंकरः ॥ ८ ॥

राघवार्थे चरञ्श्रीमान् ददर्श च ननन्द च ।
रामकार्याकरिता संचार करणार्‍या आणि वानरराज सुग्रीवाचे हित करणार्‍या श्रीमान्‌ हनुमानांनी चित्रविचित्र पुष्पमय अलङ्‌काराने विभूषित अशी ती नगरी अवलोकन करून प्रसन्नतेचा अनुभव घेतला. ॥८ १/२॥
भवनाद् भवनं गच्छन् ददर्श कपिकुञ्जरः ॥ ९ ॥

विविधाकृतिरूपाणि भवनानि ततस्ततः ।
शुश्राव रुचिरं गीतं त्रिस्थानस्वरभूषितम् ॥ १० ॥
नन्तर या घरावरून त्या घरावर जाता जाता कपिश्रेष्ठ हनुमानांनी विविध आकाराची घरे ठिकठिकाणी अवलोकन केली आणि हृदय, कण्ठ आणि मूर्धा या तीन स्थानान्तून निघणारे मन्द्र, मध्य आणि तार स्वरांनी भूषित मनोहर गायनही ऐकले. ॥९-१०॥
स्त्रीणां मदनविद्धानां दिवि चाप्सरसामिव ।
शुश्राव काञ्चीनिनदं नूपुराणां च निःस्वनम् ॥ ११ ॥
तसेच स्वर्गातील अप्सराच की काय अशा दिसणार्‍या आणि मदोन्मत्त स्त्रियांच्या तोरड्‍यांचा (नुपुरांचा) आणि कमर पट्‍टांचा शब्द ही त्यांचा कानावर आला (झंकार त्यांने ऐकला). ॥११॥
सोपाननिनदांश्चापि भवनेषु महात्मनाम् ।
अस्फोटितनिनादांश्च क्ष्वेडितांश्च ततस्ततः ॥ १२ ॥
जिथे तिथे महामनस्वी राक्षसांच्या घरान्तील जिन्याच्या पायर्‍यांवरून चढ-उतार करणार्‍या स्त्रियांच्या भूषणांचा ध्वनिही ऐकला. त्या प्रमाणे मोठमोठ्‍या लोकांच्या घरांमध्ये चाललेल्या टाळ्यांची गर्जना आणि होत असलेले सिंहनादही त्यांने ऐकले. ॥१२॥
शुश्राव जपतां तत्र मन्त्रान् रक्षोगृहेषु वै ।
स्वाध्यायनिरतांश्चैव यातुधानान् ददर्श सः ॥ १३ ॥
काही राक्षसांच्या घरांमध्ये अध्ययन करीत असलेले त्यांचे मन्त्रही त्याला ऐकू येऊ लागले. त्यानन्तर स्वाध्यायात तत्पर असलेल्या कित्येक निशाचरांना त्याने पाहिले. ॥१३॥
रावणस्तवसंयुक्तान् गर्जतो राक्षसानपि ।
राजमार्गं समावृत्य स्थितं रक्षोगणं महत् ॥ १४ ॥
काही राक्षस रावणाची स्तुति करीत गर्जना करीत होते. तर राजमार्गास अडवून उभे असलेले प्रचंड राक्षस-सैन्यही त्यांच्या दृष्टीस पडले. ॥१४॥
ददर्श मध्यमे गुल्मे राक्षसस्य चरान् बहून् ।
दीक्षिताञ्जटिलान् मुण्डान् गोजिनाम्बरवाससः ॥ १५ ॥

दर्भमुष्टिप्रहरणानग्निकुण्डायुधांस्तथा ।
कूटमुद्‌गरपाणींश्च दण्डायुधधरानपि ॥ १६ ॥
नगराच्या मध्यभागी त्याला (रावणाचे) राक्षसांचे अनेक गुप्तहेरही दृष्टीस पडले. त्यान्तील काही दीक्षा घेतलेले तर काही मस्तके मुंडन केलेले, काही जटाधारी तर गोचर्म वा मृगचर्म परिधान केलेले होते. तर काही नग्न तर काही दर्भमुष्टीरूप आयुधे (अस्त्रे) धारण केलेले आणि अग्निकुंड हेच ज्यांचे आयुध होते असे दिसले. काहींच्या हातात कूट अथवा मुद्‍गर होते तर काहींच्या हातान्तील दंडे अथवा काठ्‍या हीच आयुधे होती. ॥१५-१६॥
एकाक्षानेककर्णांश्च लम्बोदरपयोधरान् ।
करालान् भुग्नवक्त्रांश्च विकटान् वामनांस्तथा ॥ १७ ॥
काही एकाक्ष होते तर काही अनेक वर्णांचे (बहुरंगी) होते. कित्येकांची पोटे व स्तन फार सुटलेली (मोठी) होती. कित्येक अत्यन्त विकराळ होते, तर कित्येकांची तोंडे वेडीवाकडी होती. काही अत्यन्त विक्राळ तर काही अत्यन्त ठेंगणे (वामन) होते. ॥१७॥
धन्विनः खङ्‌गिनश्चैव शतघ्नीमुसलायुधान् ।
परिघोत्तमहस्तांश्च विचित्रकवचोज्ज्वलान् ॥ १८ ॥
काहींच्या जवळ धनुष्य, खड्ग, शतघ्नी, मुसळ रूपी आयुधे होती. काहींच्या हातात परिघ विद्यमान होते तर कुणी विचित्र कवचांमुळे झळकत होते. ॥१८॥
नातिस्थूलान् नातिकृशान् नातिदीर्घातिह्रस्वकान् ।
नातिगौरान् नातिकृष्णान्नातिकुब्जान्न वामनान् ॥ १९ ॥
कुणी निशाचर जास्त लठ्‍ठही नव्हते वा अधिक कृशही नव्हते, अधिक उंच नव्हते वा अधिक ठेंगणेही नव्हते. अति गौर नव्हते वा अधिक काळे नव्हते, तसेच अधिक कुबडे नव्हते अथवा अधिक बुटकेही नव्हते. ॥१९॥
विरूपान् बहुरूपांश्च सुरूपांश्च सुवर्चसः ।
ध्वजिनः पताकिनश्चैव ददर्श विविधायुधान् ॥ २० ॥
कुणी अत्यन्त कुरूप होते तर कुणी अनेक प्रकारचे रूप धारण करणारे होते. कित्येक सुन्दर रूपाचे होते तर कुणी अत्यन्त तेजस्वीही होते. काही जणांच्या जवळ ध्वजा, पताका आणि नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे होती. ॥२०॥
शक्तिवृक्षायुधांश्चैव पट्टिशाशनिधारिणः ।
क्षेपणीपाशहस्तांश्च ददर्श स महाकपिः ॥ २१ ॥
तर कुणी शक्ति आणि वृक्षरूपी आयुधे आणि पट्‌टीश, वज्र वगैरे धारण केले होते. काहीच्या हातात गोफणी आणि पाश होते. महाकपि हनुमानांनी त्या सर्वांना पाहिले. ॥२१॥
स्रग्विणस्त्वनुलिप्तांश्च वराभरणभूषितान् ।
नानावेषसमायुक्तान् यथास्वैरचरान् बहून् ॥ २२ ॥
कित्येकांच्या गळ्यात फुलांचे हार होते तर कित्येकांच्या अंगाला चन्दनाची उटी लावलेली होती, तर कित्येक अति उत्कृष्ट अलङ्‌कारांनी भूषित होते. कित्येकांनी नाना प्रकारची वेषभूषा केली होती तर अनेक स्वेच्छेनुसार संचार करीत असलेले दिसून येत होते. ॥२२॥
तीक्ष्णशूलधरांश्चैव वज्रिणश्च महाबलान् ।
शतसाहस्रमव्यग्रमारक्षं मध्यमं कपिः ॥ २३ ॥

रक्षोऽधिपतिनिर्दिष्टं ददर्शान्तः पुराग्रतः ।
कित्येकांनी तीक्ष्णशूल आणि वज्र धारण केले होते व ते सर्वच्या सर्व महान बलसंपन्न होते. या शिवाय रावणाच्या अन्तःपुराजवळ त्या राक्षसाधिपतिच्या आदेशावरून मोठ्‍या दक्षतेने नगरीच्या मध्यभागाचे रक्षण करणारे एक लाख सैन्य कपिश्रेष्ठ हनुमानाने पाहिले. हे सर्व सैनिक रावणाच्या अन्तःपुराच्या अग्रभागी स्थित होते. ॥२३ १/२॥
स तदा तद् गृहं दृष्ट्‍वा महाहाटकतोरणम् ॥ २४ ॥

राक्षसेन्द्रस्य विख्यातंमद्रिमूर्ध्नि प्रतिष्ठितम् ।
पुण्डरीकावतंसाभिः परिघाभिः समावृतम् ॥ २५ ॥

प्राकारावृतमत्यन्तं ददर्श स महाकपिः ।
त्रिविष्टपनिभं दिव्यं दिव्यनादविनादितम् ॥ २६॥
रक्षक सैन्यासाठी जे विशाल भवन बनविलेले होते, त्याचे द्वारतोरण बहुमूल्य सुवर्णाचे केलेले होते. स्थान पाहिल्यानन्तर उत्कृष्ट सुवर्णमय तोरणांनी युक्त आणि त्रिकूट पर्वत शिखरावर असलेले राक्षसेन्द्र रावणाचे प्रख्यात गृह हनुमानांने पाहिले. ते सर्व बाजूंनी श्वेत कमलांनी अलंकृत अशा खन्दकांनी वेढलेले होते. त्याच्या चारी बाजूस अत्यन्त उंच तटबन्दी होती आणि तिने ते परिवेष्टित झालेले आहे असे महाकपि हनुमानास दिसले. ते भव्य भवन स्वर्गतुल्य दिव्य संगीताच्या नादाने नादित झाले होते. ॥२४-२६॥
वाजिह्रेषितसंघुष्टं नादितं भूषणैस्तदा ।
रथैर्यानैर्विमानैश्च तथा हयगजैः शुभैः ॥ २७ ॥

वारणैश्च चतुर्दन्तैः श्वेताभ्रनिचयोपमैः ।
भूषितै रुचिरद्वारं मत्तैश्च मृगपक्षिभिः ॥ २८ ॥
घोड्‍यांच्या खिंकाळण्याने ते चारी बाजूने निनादित झाले होते आणि अलङ्‌कारांचा रूणझुण ध्वनीही ऐकू येत होता. नाना प्रकारचे रथ, पालख्या आदि विविध वाहने, विमाने, सुन्दर हत्ती घोडे आणि पांढर्‍या शुभ्र ढगांप्रमाणे शोभणारे चार दातांनी युक्त शृंगारलेले हत्ती यांनी ते शोभून दिसत होते. त्या राजमहालाचे द्वार मदमत्त पशु-पक्ष्यांच्या संचरणामुळे फार सुन्दर दिसत होते. ॥२७-२८॥
रक्षितं सुमहावीर्यैर्यातुधानैः सहस्रशः ।
राक्षसाधिपतेर्गुप्तमाविवेश गृहं कपिः ॥ २९॥
हजारो महापराक्रमी निशाचर राक्षसराजाच्या त्या महालाचे रक्षण करीत होते. त्या गुप्त भुवनातही कपिश्रेष्ठ हनुमान जाऊन पोहोंचले. ॥ २९ ॥
स होमजाम्बूनदचक्रवालं
महार्हमुक्तामणिभूषितान्तम् ।
परार्ध्यकालागरुचन्दनार्हं
स रावणान्तःपुरमाविवेश ॥ ३० ॥
त्या अन्तःपुराभोवती हेम आणि जाम्बूनद या दोन प्रकारच्या सुवर्णाचा एक तट बान्धलेला होता. त्याचा वरचा भाग अत्यन्त मूल्यवान मोत्यांनी आणि हिर्‍यांनी भूषित होता आणि कृष्णा गुरू आणि चन्दन यांनी त्याचे पूजन केलेले होते. अशा त्या रावणाच्या अन्तःपुरात हनुमानांनी प्रवेश केला. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP