॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ षष्ठः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]सीतेचा शोध. वानरांचा गुहेत प्रवेश आणि स्वयंप्रभेचे चरित्र -


दृष्ट्‍वा रामं समासिनं गुहाद्वारि शिलातले ।
चैलाजिनधरं श्यामं जटामौलिविराजितम् ॥ १ ॥
विशालनयनं शान्तं स्मितचारुमुखाम्बुजम् ।
सीताविरहसन्तप्तं पश्यन्तं मृगपक्षिणः ॥ २ ॥
रथाद्दूरात्समुत्पत्य वेगात्सुग्रीवलक्ष्मणौ ।
रामस्य पादयोरग्रे पेततुर्भक्तिसंयुतौ ॥ ३ ॥
श्रीमहादेव - हे पार्वती, मृगचर्म आणि वल्कले परिधान केलेले, श्यामवर्ण, जटारूपी मुकुटाने शोभणारे, विशालनयन, शांत, स्मितयुक्त सुंदर मुख असणारे आणि पशुपक्ष्यांकडे पाहाणारे सीतेच्या विरहाने अत्यंत दुःखी झालेले श्रीराम गुहेच्या दाराशी एका शिलेवर बसलेले आहेत, हे पाहून सुग्रीव आणि लक्ष्मण दुरूनच रथातून वेगाने उडी मारून खाली उतरले आणि भक्तियुक्त अंतःकरणाने ते दोघे श्रीरामांच्या पाया पडले. (१-३)

रामः सुग्रीवमालिङ्‌ग्य पृष्ट्‍वानामयमन्तिके ।
स्थापयित्वा यथान्यायं पूजयामास धर्मवित् ॥ ४ ॥
धर्म्यज्ञ श्रीरामांनी सुग्रीवाला आलिंगन दिले, त्याचे कुशल विचारले आणि त्याला आपल्याजवळ बसवून घेऊन, त्याचे यथायोग्य आदरातिथ्य केले. (४)

ततोऽब्रवीत् रघुश्रेष्ठं सुग्रीवो भक्तिनम्रधीः ।
देव पश्य समायान्तीं वानराणां महाचमूम् ॥ ५ ॥
तेव्हा भक्तीने नम्र होऊन सुग्रीव रघुश्रेष्ठांना म्हणाला,"देवा, पाहा, वानरांची प्रचंड सेना येत आहे. (५)

कुलाचलाद्रिसम्भूता मेरुमन्दरसन्निभाः ।
नानाद्वीपसरिच्छैल वासिनः पर्वतोपमाः ॥ ६ ॥
असङ्‌ख्याताः समायान्ति हरयः कामरूपिणः ।
सर्वे देवांशसम्भूताः सर्वे युद्धविशारदाः ॥ ७ ॥
कुलाचल पर्वतावर जन्माला आलेले, देहाने मेरू किंवा मंदर पर्वताप्रमाणे असणारे, नाना बेटे, नद्या आणि पर्वत यांवर राहाणारे, पर्वताप्रमाणे प्रचंड असणारे, असे असंख्य वानर येत आहेत. ते सर्व देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेले असून स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणतेही रूप धारण करू शकतात आणि ते सर्व युद्ध करण्यात तरबेज आहेत. (६-७)

अत्र केचिद्‌गजबलाः केचित् दशगजोपमाः ।
गजायुतबलाः केचित् अन्येऽमितबलाः प्रभो ॥ ८ ॥
हे प्रभो, या वानरांतील काही एका हत्तीचे बळ असणारे, काही दहा हत्तींचे सामर्थ्य असणारे, काही दहा हजार हत्तींचे बळ असणारे, तर इतर अपरिमित बल असणारे आहेत. (८)

केचितञ्जनकूटाभाः केचित्कनकसन्निभाः ।
केचित् रक्तान्तवदना दीर्घवालास्तथापरे ॥ ९ ॥
कित्येकांची कांती ही काजळाच्या पर्वताप्रमाणे आहे; काही जण सोन्याप्रमाणे पिवळे आहेत; काहींचे मुख तांबड्या रंगाचे आहे; आणि काही वानरांचे केस लांब आहेत. (९)

शुद्धस्फटिकसङ्‌काशाः केचित् राक्षससन्निभाः ।
गर्जन्तः परितो यान्ति वानरा युद्धकाङ्‌क्षिणः ॥ १० ॥
काही वानर शुभ्र स्फटिकाप्रमाणे दिसतात, तर काही राक्षसाप्रमाणे दिसून येतात. हे सर्व वानर युद्ध करू इच्छितात. ते गर्जना करीत सर्व बाजूंनी येत आहेत. (१०)

त्वदाज्ञाकारिणः सर्वे फलमूलाशनाः प्रभो ।
ऋक्षाणामधिपो वीरो जाम्बवान्नाम बुद्धिमान् ॥ ११ ॥
हे प्रभो, हे सर्व वानर तुमची आज्ञा पालन करणारे असून ते फळे, मुळे खाऊन राहाणारे आहेत. या सर्वांच्यामध्ये अस्वलांचा राजा जांबवान नावाचा असून तो शूर आणि बुद्धिमान आहे. (११)

एष मे मंत्रिणां श्रेष्ठ कोटिभल्लूकवृन्दपः ।
हनूमानेष विख्यातो महासत्त्वपराक्रमः ॥ १२ ॥
हा जांबवान माझ्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ आहे. तो कोट्यवधी अस्वलांच्या समूहाचा नायक आहे. तसेच हा हनुमान महान् सामर्थ्य आणि पराक्रम असणारा म्हणून विख्यात आहे. (१२)

वायुपुत्रोऽतितेजस्वी मंत्री बुद्धिमतां वरः ।
नलो नीलश्च गवयो गवाक्षो गन्धमादनः ॥ १३ ॥
शरभो मैन्दवश्चैव गजः पनस एव च ।
बलिमुखो दधिमुखः सुषेणास्तार एव च ॥ १४ ॥
केसरी च महासत्त्वः पिता हनुमतो बली ।
एते ते यूथपा राम प्राधान्येन मयोदिताः ॥ १५ ॥
तो वायूचा पुत्र, अतिशय तेजस्वी, माझा मंत्री, आणि बुद्धिमंतामध्ये वरिष्ठ आहे. याखेरीज माझ्या वानर सैन्यात नल, नील, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ, मैंदव, गज, पनस, बलीमुख, दधिमुख, सुषेण, तार, तसेच हनुमानाचा पिता असणारा बलवान महान् सामर्थ्यसंपन्न केसरी हे सर्व आहेत. हे रामा, हे माझ्या सैन्यातील समूहांचे मुख्य वानर मी तुम्हांला प्राधान्याने सांगितले आहेत. (१३-१५)

महात्मनो महावीर्याः शक्रतुल्यपराक्रमाः ।
एते प्रत्येकतः कोटि-कोटिवानरयूथपाः ॥ १६ ॥
हे सर्व महात्मे, महावीर्यशाली, इंद्राप्रमाणे पराक्रम असणारे असून, त्यांतील प्रत्येक जण कोटी कोटी वानर समूहाचे नायक आहेत. (१६)

तवाज्ञाकारिणः सर्वे सर्वे देवांशसम्भवाः ।
एष वालिसुतः श्रीमानङ्‌गदो नाम विश्रुतः ॥ १७ ॥
हे सर्व वानर तुमची आज्ञा पाळणारे असून ते देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेले आहेत. हा वालीचा अंगद नावाचा पुत्र वैभवसंपन्न आणि विख्यात आहे. (१७)

वालितुल्यबलो वीरो राक्षसानां बलान्तकः ।
एते चान्ये च बहवः त्वदर्थे त्यक्तजीविताः ॥ १८ ॥
हा वालीप्रमाणे सामर्थ्य असणारा वीर असून तो राक्षसांच्या सैन्याचा नाश करणारा आहे. हे आणि इतर पुष्कळ वानर तुमच्यासाठी प्राण अर्पण करण्यास तयार आहेत. (१८)

योद्धारः पर्वताग्रैश्च निपुणाः शत्रुघातने ।
आज्ञापय रघुश्रेष्ठ सर्वे ते वशवर्तिनः ॥ १९ ॥
हे वानर पर्वतांची शिखरे उचलून युद्ध करतात आणि शत्रूचा वध करण्यात ते निपुण आहेत. ते सर्व तुमच्या स्वाधीन आहेत. हे रघुश्रेष्ठा, तुम्ही त्यांना आज्ञा करा." (१९)

रामः सुग्रीवमालिङ्‌ग्य हर्षपूर्णाश्रुलोचनः ।
प्राह सुग्रीव जानासि सर्वं त्वं कार्यगौरवम् ॥ २० ॥
तेव्हा श्रीरामांचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांनी सुग्रीवाला आलिंगन देऊन म्हटले, "हे सुग्रीवा, माझ्या कार्याचे महत्त्व तुला माहीत आहेच. (२०)

मार्गणार्थं हि जानक्या नियुङ्‌क्ष्व यदि रोचते ।
श्रुत्वा रामस्य वचनं सुग्रीवः प्रीतमानसः ॥ २१ ॥
प्रेषयामास बलिनो वानरान् वानरर्षभ ।
दिक्षु सर्वासु विविधान् वानरान् प्रेष्य सत्वरम् ॥ २२ ॥
दक्षिणां दिशमत्यर्थं प्रयत्‍नेन महाबलान् ।
युवराजं जाम्बवन्तं हनूमन्तं महाबलम् ॥ २३ ॥
नलं सुषेणं शरभं मैन्दं द्विविदमेव च ।
प्रेषयामास सुग्रीवो वचनं चेतमब्रवीत् ॥ २४ ॥
तेव्हा जर तुला इष्ट वाटत असेल तर तू सीतेच्या शोधासाठी यांची योजना कर." रामांचे वचन ऐकल्यावर, मन आनंदित झालेल्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाने बलवान वानरांना सीतेच्या शोधासाठी पाठविले. सर्व दिशांना अनेक वानरांना सत्वर पाठवून, त्याने अधिक प्रयत्‍नपूर्वक, महाबलवान अशा युवराज अंगद, जांबवान, महाबली हनुमान, नल, सुषेण, श२भ, मैंद, द्विविद यांना दक्षिण दिशेला पाठविले. व सुग्रीव त्यांना म्हणाला, (२१-२४)

विचिन्वन्तु प्रयत्‍नेन भवन्तो जानकीं शुभाम् ।
मासादर्वाङ्‌निवर्तध्वं मच्छासनपुरःसराः ॥ २५ ॥
"माझी आज्ञा शिरोधार्थ मागून तुम्ही प्रयत्‍नपूर्वक शुभलक्षणी जानकीचा शोध घ्या आणि एक महिन्याच्या आत परत या. (२५)

सीतामदृष्ट्‍वा यदि वो मासादूर्ध्वं दिनं भवेत् ।
तदा प्राणान्तिकं दण्डं मत्तः प्राप्स्यथ वानराः ॥ २६ ॥
सीतेचा शोध लावण्यास जर एक महिन्यापेक्षा एक दिवस जरी जास्त लागला, तर हे वानरांनो, तुम्हांला माझ्याकडून प्राणांतिक दंड भोगावा लागेल." (२६)

इति प्रस्थाप्य सुग्रीवो वानरान् भीमविक्रमान् ।
रामस्य पार्श्वे श्रीरामं नत्वा चोपविवेश सः ॥ २७ ॥
अशा प्रकारे महापराक्रम असणार्‍या वानरांना पाठवून, सुग्रीवाने श्रीरामांना नमस्कार केला आणि तो त्यांच्या शेजारी बसला. (२७)

गच्छन्तं मारुतिं दृष्ट्‍वा रामो वचनमब्रवीत् ।
अभिज्ञानार्थमेतन्मे ह्यङ्‌गुलीयकमुत्तमम् ॥ २८ ॥
मन्नामाक्षरसंयुक्तं सीतायै दीयतां रहः ।
अस्मिन् कार्ये प्रमाणं हि त्वमेव कपिसत्तम ।
जानामि सत्त्वं ते सर्वं गच्छ पन्थाः शुभस्तव ॥ २९ ॥
मारुती निघाला हे पाहून श्रीराम त्याला म्हणाले, "हे वानरश्रेष्ठा, ओळख पटण्यासाठी म्हणून माझ्या नावाच्या अक्षरांनी अंकित अशी ही माझी उत्तम अंगठी तू सीतेला एकांतात दे. हे कपिश्रेष्ठा, या कार्यात तूच सर्व समर्थ आहेस. तुझे संपूर्ण सामर्थ्य मला माहीत आहे. जा, तुझा मार्ग तुला कल्याणकारक होवो." (२८-२९)

एवं कपिनां राज्ञा ते विसृष्टाः परिमार्गणे ।
सीताया अङ्‌गदमुखा बभ्रमुस्तत्र तत्र ह ॥ ३० ॥
अशा प्रकारे वानरराज सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी पाठविलेले अंगद इत्यादी वानर इकडे तिकडे भ्रमण करू लागले. (३०)

भ्रमन्तो विन्ध्यगहने ददृशुः पर्वतोपमम् ।
राक्षसं भीषणाकारं भक्षयन्तं मृगान् गजान् ॥ ३१ ॥
रावणोऽयमिति ज्ञात्वा केचिद्वानरपुङ्‌गवाः ।
जघ्नु किलकिलाशब्दं मुञ्चतो मुष्टिभिः क्षणात् ॥ ३२ ॥
फिरत असताना काही वानरांना विंध्य पर्वताच्या गहन अरण्यात, पर्वताप्रमाणे प्रचंड आणि भीषण आकार असणारा आणि जंगलातील पशू व हत्ती यांना खाणारा एक राक्षस दिसला. तो रावण आहे असे समजून काही श्रेष्ठ वानरांनी कलकलाट करीत, मुठीच्या प्रहारांनी त्याला एका क्षणात ठार केले. (३१-३२)

नायं रावण इत्युक्त्वा ययुरन्यन्महद्वनम् ।
तृषार्ता सलिलं तत्र नाविन्दन् हरिपुङ्‌गवाः ॥ ३३ ॥
तो सहजासहजी मेल्यामुळे 'तो रावण नाही,' असे म्हणून ते वानर दुसर्‍या एका मोठ्या अरण्यात शिरले. परंतु तहानेने व्याकूळ झालेल्या त्या वानरश्रेष्ठांना तेथे कुठेच पाणी मिळाले नाही. (३३)

विभ्रमन्तो महारण्ये शुष्ककण्ठोष्ठतालुकाः ।
ददृशुर्गह्वरं तत्र तृणगुल्मावृतं महत् ॥ ३४ ॥
आर्द्रपक्षान् क्रौञ्चहंसान् निःसुतान्ददृशुस्ततः ।
अत्रास्ते सलिलं नूनं प्रविशामो महागुहाम् ॥ ३५ ॥
इत्युक्‍त्वा हनुमानग्रे प्रविवेश तमन्वयुः ।
सर्वे परस्परं ध्रुत्वा बाहून्बाहुभिरुत्सुकाः ॥ ३६ ॥
त्या महान अरण्यामध्ये फिरत असताना त्या वानरांचे कंठ, ओठ आणि ताळू सुकून गेले. तितक्यात गवत आणि झुडुपे यांनी झाकलेली एक मोठी गुहा त्यांना तेथे दिसली. भिजलेले पंख असणारे क्रौंच, हंस इत्यादी पक्षी त्या गुहेतून बाहेर येताना त्यांना दिसले. तेव्हा 'येथे नक्की पाणी आहे; आपण या गुहेत प्रवेश करूया.' असे म्हणून हनुमान प्रथम त्या गुहेत शिरला. त्याच्या मागोमाग इतर सर्व वानर एकमेकांचे हात आपल्या हातांत धरून, मोठ्या उत्सुकतेने त्या गुहेत शिरले. (३४-३६)

अन्धकारे महद्दूरं गत्वापश्यन् कपीश्वराः ।
जलाशयान्मणिनिभ तोयान् कल्पद्रुमोपमान् ॥ ३७ ॥
वृक्षान्पक्वफलैर्नम्रान् मधुद्रोणसमन्वितान् ।
गृहान् सर्वगुणोपेतान् मणिवस्त्रादिपूरितान् ॥ ३९ ॥
दिव्यभक्ष्यान्नसहितान् मानुषैः परिवर्जितान् ।
विस्मितास्तत्र भवने दिव्ये कनकविष्टरे ॥ ३९ ॥
प्रभया दीप्यमानां तु ददृशुः स्त्रियमेककाम् ।
ध्यायन्तीं चीरवसनां योगिनीं योगमास्थिताम् ॥ ४० ॥
त्या गुहेतील अंधारात पुष्कळ दूर गेल्यावर त्या कपिश्रेष्ठांना दिसले की स्फटिक मण्यासमान स्वच्छ पाणी असणारी सरोवरे; पिकलेल्या फलांनी वाकलेले कल्पवृक्षाप्रमाणे असणारे आणि मधाच्या पोळ्यांनी युक्त असे वृक्ष तेथे आहेत; सर्व गुणांनी युक्त, रत्‍ने, वस्त्रे इत्यादींनी भरलेली, दिव्य खाद्य, अन्न इत्यादींनी युक्त परंतु मनुष्यरहित अशी घरे आहेत. ते सर्व पाहून सर्व वानर आश्चर्यचकित झाले. तेथेच एका दिव्य भवनात सोन्याच्या आसनावर बसलेली एकटी स्त्री त्यांना दिसली; स्वतःच्या प्रभेने देदीप्यमान, वल्कल-वस्त्रे परिधान करणारी, आणि योगाभ्यासात रत होऊन ध्यान करणारी अशी ती योगिनी होती. (३७-४०)

प्रणेमुस्तां महाभागां भक्‍त्या भीत्या च वानराः ।
दृष्ट्‍वा तान् वानरान् देवी प्राह यूयं किमागताः ॥ ४१ ॥
कुतो वा कस्य दूता वा मत्स्थानं किं प्रधर्षथ ।
तच्छ्रुत्वा हनुमानाह शृणु वक्ष्यामि देवि ते ॥ ४२ ॥
त्या महाभागा स्त्रीला वानरांनी भक्तीने आणि भीतीने प्रणाम केला. त्या वानरांना पाहून ती देवी म्हणाली, 'अहो, तुम्ही का व कोठून आला आहात ? तुम्ही कुणाचे दूत आहात ? तुम्ही माझ्या स्थानात जबरदस्तीने का घुसला आहात ?' ते ऐकून हनुमान म्हणाला, ' हे देवी, ऐक. मी सर्व काही तुला सांगतो. (४१-४२)

अयोध्याधिपतिः श्रीमान् राजा दशरथः प्रभुः ।
तस्य पुत्रो महाभागो ज्येष्ठो राम इति श्रुतः ॥ ४३ ॥
ऐश्वर्यसंपन्न आणि समर्थ असे महाराज दशरथ हे अयोध्येचा अधिपती होते. त्यांचे महाभागशाली ज्येष्ठ चिरंजीव श्रीराम या नावाने विख्यात आहेत. (४३)

पितुराज्ञां पुरस्कृत्य सभार्यः सानुजो वनम् ।
गतस्तत्र हृता भार्या तस्य साध्वी दुरात्मना ॥ ४४ ॥
रावणेन ततो रामः सुग्रीवं सानुजो ययौ ।
सुग्रीवो मित्रभावेन रामस्य प्रियवल्लभाम् ॥ ४५ ॥
मृगयध्वमिति प्राह ततो वयमुपागताः ।
ततो वनं विचिन्वन्तो जानकीं जलकाङ्‌क्षिणः ॥ ४६ ॥
प्रविष्टा गह्वरं घोरं दैवादत्र समागताः ।
त्वं वा किमर्थमत्रासि का वा त्वं वद नः शुभे ॥ ४७ ॥
पित्याची आज्ञा शिरोधार्य मागून, पत्‍नी व धाकटा भाऊ यांसह ते वनात गेले. तेथे त्यांची साधी पत्‍नी दुरात्म्या रावणाने हरण करून नेली. त्यानंतर लहान भावासह ते सुग्रीवाकडे गेले. श्रीरामांशी मैत्रीचा संबंध जुळल्याने, सुग्रीवाने आम्हांला आज्ञा दिली की त्यांच्या प्रिय पत्‍नीचा शोध करा. म्हणून आम्ही तेथून आलो आहोत. त्यानंतर वनात जानकीचा शोध घेताना, आम्हाला तहान लागली. तेव्हा आम्ही या भयंकर गुहेत शिरलो आणि दैवयोगाने येथे आलो आहोत. हे कल्याणी, तू कोण आहेस आणि येथे का राहात आहेस, ते तू आम्हांला सांग बरे. " (४४-४७)

योगीनी च तथा दृष्ट्‍वा वानरान प्राह हृष्टधीः ।
यथेष्टं फलमूलानि जग्ध्वा पीत्वामृतं पयः ॥ ४८ ॥
आगच्छत ततो वक्ष्ये मम वृत्तन्तमादितः ।
तथेति भुक्‍त्वा पीत्वा च हृष्टास्ते सर्ववानराः ॥ ४९ ॥
देव्याः समीपं गत्वा ते बद्धाञ्जलिपुटाः स्थिताः ।
ततः प्राह हनूमन्तं योगिनी दिव्यदर्शना ॥ ५० ॥
अशा प्रकारे तहानलेल्या वानरांना पाहून ती योगिनी आनंदित मनाने म्हणाली, "प्रथम तुम्ही यथेच्छ फळे व मुळे खाऊन अमृताप्रमाणे गोड पाणी पिऊन या. मग मी प्रथमपासून माझा वृत्तांत तुम्हांला सांगेन." 'ठीक आहे' असे म्हणून खाऊन आणि पिऊन संतुष्ट झालेले ते सर्व वानर तिच्याजवळ आले आणि हात जोडून उभे राहिले. तेव्हा दिव्यदर्शन असणारी ती योगिनी हनुमंताला सांगू लागली. (४८-५०)

हेमा नाम पुरा दिव्य-रूपिणि विश्वकर्मणः ।
पुत्री महेशं नृत्येन तोषयामास भामिनी ॥ ५१ ॥
"पूर्वी विश्वकर्म्याची हेमा नावाची दिव्य रूप असणारी कन्या होती. त्या तेजस्वी स्त्रीने नृत्याने श्रीमहादेवांना प्रसन्न करून घेतले. (५१)

तुष्टो महेशः प्रददौ विदं दिव्यपुरं महत् ।
अत्र स्थिता मा सुदती वर्षाणामयुतायुतम् ॥ ५२ ॥
संतुष्ट झालेल्या श्रीशंकरांनी तिला राहाण्यास हे अतिशय मोठे दिव्य नगर दिले. सुंदर दात असणारी ती हेमा येथे हजारो वर्षे राहिली. (५२)

तस्या अहं सखी विष्णु तत्परा मोक्षकाङ्‍क्षिणी ।
नाम्ना स्वयम्प्रभा दिव्य-गन्धर्वतनया पुरा ॥ ५३ ॥
गच्छन्ती ब्रह्मलोकं सा मामाहेदं तपश्चर ।
अत्रैव निवसन्ती त्वं सर्वप्राणिविवर्जिते ॥ ५४ ॥
तिची मी मैत्रीण आहे. मी दिव्य नावाच्या गंधर्वाची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा आहे. मला मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे म्हणून मी नेहमी विष्णूच्या भक्तीत तत्पर असते. ब्रह्मलोकी जाताना हेमा मला म्हणाली होती की, 'तू येथेच सर्व प्राण्यांनी रहित अशा स्थानी राहून तपश्चर्या कर. (५३-५४)

त्रेता युगे दाशरथिः भूत्वा नारायणोऽव्ययः ।
भूभारहरणार्थाय विचरिष्यति कानने ॥ ५५ ॥
त्रेतायुगात अविनाशी नारायण हे दशरथाचे पुत्र श्रीराम होऊन, भूमीचा भार हरण करण्यासाठी अरण्यात हिंडणार आहेत. (५५)

मार्गन्तो वानरास्तस्य भार्यामायान्ति ते गुहाम् ।
पूजयित्वाथ तान् नत्वा रामं स्तुत्वा प्रयत्‍नतः ॥ ५६ ॥
यातासि भवनं विष्णोः योगिगम्यं सनातनम् ।
इतोऽहं गन्तुमिच्छामि रामं द्रष्टुं त्वरान्विता ॥ ५७ ॥
श्रीरामांच्या पत्‍नीचा शोध करीत वानर तुझ्या गुहेत येतील, तेव्हा त्यांचा सत्कार कर, श्रीरामांकडे जाऊन व त्यांना नमन करून, तू त्यांची मनःपूर्वक स्तुती कर. मग योगी लोकांनाच जाण्यास योग्य अशा विष्णूच्या सनातन धामाला तू जाशील,' तेव्हा श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मी त्वरेने येथून जाऊ इच्छिते. (५६-५७)

यूयं पिदध्वमक्षीणि गमिष्यथ बहिर्गुहाम् ।
तथैव चक्रुस्ते वेगाद् गताः पूर्वस्थितं वनम् ॥ ५८ ॥
तुम्ही आता डोळे मिटा. मग तुम्ही या गुहेच्या बाहेर जाऊन पोचाल." त्या वानरांनी तसे केले. ते त्वरित पूर्वीच्याच वनात जाऊन पोहोचले. (५८)

सापि त्यक्‍त्वा गुहां शीघ्रं ययौ राघवसन्निधिम् ।
तत्र रामं ससुग्रीवं लक्ष्मणं च ददर्श ह ॥ ५९ ॥
इकडे तीसुद्धा गुहेतून बाहेर आली आणि लगेच राघवांच्याजवळ गेली. तेथे तिने सुग्रीवासह असणार्‍या श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाहिले. (५९)

कृत्वा प्रदक्षिणं रामं प्रणम्य बहुशः सुधीः ।
आह गद्‍गदया वाचा रोमाञ्चित तनूरुहा ॥ ६० ॥
त्या बुद्धिमान् स्त्रीने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वारंवार प्रणाम केला. मग शरीर रोमांचित झालेली ती गदगद वाणीने म्हणाली, (६०)

दासी तवाहं राजेन्द्र दर्शनार्थं इहागता ।
बहुवर्षसहस्त्राणि तप्तं मे दुश्चरं तपः ॥ ६१ ॥
गुहायां दर्शनार्थं ते फलितं मेऽद्य तत्तपः ।
अद्य हि त्वां नमस्यामि मायायाः परतः स्थितम् ॥ ६२ ॥
सर्वभूतेषु चालक्ष्यं बहिरन्तरवस्थितम् ।
योगमायाजवनिकात् छन्नो मानुषविग्रहः ॥ ६३ ॥
न लक्ष्यसेऽज्ञानदृशां शैलूष इव रूपधृक् ।
महाभागवतानां त्वं भक्तियोगविधित्सया ॥ ६४ ॥
अवतीर्णोऽसि भगवन् कथं जानामि तामसी ।
लोके जानातु यः कश्चित्तव तत्त्वं रघूत्तम ॥ ६५ ॥
ममैतदेव रूपं ते सदा भातु हृदालये ।
राम ते पादयुगलं दर्शितं मोक्षदर्शनम् ॥ ६६ ॥
अदर्शनं भवार्णानां सन्मार्गपरिदर्शनम् ।
धनपुत्रकलत्रादि विभूतिपरिदर्पितः ।
अकिञ्चनधनं त्वाद्य नाभिधातुं जनोऽर्हति ॥ ६७ ॥
'हे राजेंद्रा, मी तुमची दासी आहे. तुमचे दर्शन घेण्यास मी येथे आले आहे. तुमचे दर्शन व्हावे म्हणून मी गुहेत राहून कित्येक सहस्र वर्षे दुश्चर तपाचे आचरण केले आहे. ते माझे तप आज फळाला आले आहे. मायेच्या पलीकडे असणार्‍या तसेच सर्व प्राण्यांचे बाबतीत आत बाहेर असूनही न दिसणार्‍या अशा तुम्हांला मी नमरकार करीत आहे. योगमायारूपी पडद्यामागे तुम्ही दडलेले आहात आणि आता तुम्ही माणसाचा देह धारण केला आहे; म्हणून नाना रूपे धारण करणारा जादुगार ज्याप्रमाणे खर्‍या रूपाने समजून येत नाही, त्याप्रमाणे अज्ञानाची दृष्टी असणार्‍या माणसांना तुमचे खरे रूप दिसत नाही. हे भगवन, महान भगवद्-भक्तांसाठी भक्तियोग प्रस्थापित करण्याच्या इच्छेने तुम्ही अवतीर्ण झाला आहात. तमोगुणी मी तुम्हांला कशी बरे जाणू शकेन ? हे रघूत्तमा, या जगात तुमचे तत्त्व जर कोणी जाणत असेल, तर तो जाणू दे. माझ्या हृरुदयमंदिरात मात्र तुमचे हेच रूप सदा प्रकाशत राहो. हे रामा, तुमच्या चरणयुगलाचे दर्शन म्हणजे मोक्षदर्शनच होय; त्यामुळे संसाररूपी जन्ममरणाचा नाश होतो आणि सन्मार्गाचे दर्शन होते. हे आद्य, या जगातील धन, पुत्र, पत्‍नी व वैभव यांनी उन्मत्त झालेला माणूस अपरिग्रही लोकांचे धन असणार्‍या तुमची स्तुती करण्यास पात्र ठरत नाही. (६१-६७)

निवृत्तगुणमार्गाय निष्किञ्चनधनाय ते ॥ ६८ ॥
नमः स्वात्माभिरामाय निर्गुणाय गुणात्मने ।
कालरूपिणमीशानं आदिमध्यान्तवर्जितम् ॥ ६९ ॥
समं चरन्तं सर्वत्र मन्ये त्वां पुरुषं परम् ।
देव ते चेष्टितं कश्चिन् न वेद नृविडम्बनम् ॥ ७० ॥
जो गुण-मार्गापासून निवृत्त झाला आहे, जो सर्वसंगपरित्यागी माणसाचे सर्वस्व असतो, जो स्वतःच्या स्वरूपातच रममाण झालेला असतो आणि जो निर्गुण असूनही सगुण असतो, अशा तुम्हाला माझा नमरकार असो. जो कालस्वरूप आहे, जो सर्वांचा नियंता आहे, जो आदी, मध्य व अंत यांनी रहित आहे, जो सर्व ठिकाणी समभावाने व्यापून असतो, असे तुम्ही परम पुरुष आहात, असे मी मानते. हे देवा, मनुष्यरूपात आल्यावर तुम्ही ज्या ज्या लीला करता त्या त्या कोणालाही कळत नाहीत. (६८-७०)

नतेऽस्ति कश्चिद्दयितो द्वेष्यो वापर एव च ।
त्वन्मायापिहितात्मानः त्वां पश्यन्ति तथाविधम् ॥ ७१ ॥
तुम्हाला कोणीही प्रिय नाही, शत्रू नाही, तसेच त्यापेक्षा वेगळा उदासीन नाही. तथापि तुमच्या मायेने ज्यांचे अंत करण झाकले गेले आहे, असे लोक तुम्हांला आपल्या भावनेप्रमाणे मानतात. (७१)

अजस्याकर्तुरीशस्य देवतिर्यङ्नरादिषु ।
जन्मकर्मादिकं यद्यत् तदत्यन्तविडम्बनम् ॥ ७२ ॥
तुम्ही जन्मरहित, अकर्ता आणि ईश्वर आहात. देव, तिर्यक् प्राणी आणि मानव इत्यादी योनींमध्ये तुम्ही जे जन्म घेता आणि कर्म इत्यादी करता, ते सर्व त्या योनीचे अनुकरण असते, ती सर्व तुमची महान लीला होय. (७२)

त्वामाहुरक्षरं जातं कथाश्रवणसिद्धये ।
केचित् कोसलराजस्य तपसः फलसिद्धये ॥ ७३ ॥
असे म्हणतात की तुम्ही अविनाशी असूनही भक्तांना तुमच्या कथा ऐकण्यास मिळाव्यात, म्हणून तुम्ही अवतार घेता. तर काही जण असे म्हणतात की कोसल देशाच्या राजा दशरथांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आहे. (७३)

कौसल्यया प्रार्थ्यमानं जातमाहुः परे जनाः ।
दुष्टराक्षसभूभार हरणायार्थितो विभुः ॥ ७४ ॥
ब्रह्मणा नररूपेण जातोऽयमिति केचन ।
शृण्वन्ति गायन्ति च ये कथास्ते रघुनन्दन ॥ ७५ ॥
पश्यन्ति तव पादाब्जं भवार्णवसुतारणम् ।
त्वं मायागुणबद्धाहं व्यतिरिक्तं गुणाश्रयम् ॥ ७६ ॥
कथं त्वां देव जानीयां स्तोतुं वाविषयं विभुम् ।
नमस्यामि रघुश्रेष्ठं बाणासनशरान्वितम् ।
लक्ष्मणेन सह भ्राता सुग्रीवादिभिरन्वितम् ॥ ७७ ॥
इतर लोक असे म्हणतात की कौसल्येने प्रार्थना केल्यावरून तुम्ही जन्म घेतला आहे. तर काही जण असे म्हणतात की दुष्ट राक्षसांचा भूमीला झालेला भार हरण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विभू असलेले तुम्ही नररूपाने जन्माला आला आहात. हे रघुनंदना, जे लोक तुमच्या कथा गातात व ऐकतात ते तुमचे पदकमल हे संसार सागर तरून जाण्यास उत्तम नौका आहे, असे मानतात. हे देवा, तुमच्या मायेच्या गुणांनी मी बद्ध आहे; म्हणून गुणांपेक्षा वेगळ्या आणि गुणांचा आश्रय असणार्‍या तुम्हांला मी कशी बरे जाणू शकते ? तसेच वाणीचा विषय नसणार्‍या आणि व्यापक असणार्‍या तुमची स्तुती करण्यास मी कशी बरे समर्थ होईन ? म्हणून तुमचा भाऊ लक्ष्मण आणि सुग्रीव इत्यादींसह असणार्‍या, धनुष्य व बाण धारण करणार्‍या अशा तुम्हा रघुश्रेष्ठांना मी नमरकार करते. (७४-७७)

एवं स्तुतो रघुश्रेष्ठः प्रसन्नः प्रणताघहृत् ।
उवाच योगिनीं भक्तां किं ते मनसि काङ्‍क्षितम् ॥ ७८ ॥
अशा प्रकारे स्वयंप्रभेकडून स्तुती केली गेली, तेव्हा शरणगतांची पापे हरण करणारे ते रघुश्रेष्ठ प्रसन्न झाले आणि आपली भक्त असणार्‍या त्या योगिनीला ते म्हणाले, "तुझ्या मनात काय इच्छा आहे ? " (७८)

सा प्राह राघवं भक्‍त्या भक्तिं ते भक्तवत्सल ।
यत्र कुत्रापि जाताया निश्चलां देहि मे प्रभो ॥ ७९ ॥
भक्तिपूर्वक ती राघवांना म्हणाली, "हे भक्तवत्सल प्रभो, जेथे कोठे मी जन्माला येईन, त्या जन्मी तुम्ही मला तुमची निश्चल भक्ती द्या. (७९)

त्वद्‌भक्तेषु सदा सङ्‌गो भूयान्मे प्राकृतेषु न ।
जिह्वा मे रामरामेति भक्‍त्या वदतु सर्वदा ॥ ८० ॥
तसेच जन्मोजन्मी तुमच्या भक्तांशी माझी सदा संगती होवो, सामान्य संसारी माणसाशी नको. आणि माझी जीभ नेहमी भक्तीने ' राम राम ' असा तुमच्या नावाचा उच्चार करो. (८०)

मानसं श्यामलं रूपं सीतालक्ष्मणसंयुतम् ।
धनुर्बाणधरं पीत-वाससं मुकुटोज्ज्वलम् ॥ ८१ ॥
अङ्‌गदैर्नूपुरैर्मुक्ता-हारैः कौस्तुभकुण्डलैः ।
भान्तं स्मरतु मे राम वरं नान्यं वृणे प्रभो ॥ ८२ ॥
आणि हे प्रभू रामा, माझे मन सदा तुमच्या रूपाचे स्मरण करो. तुमचे रूप सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणारे, श्यामवर्ण, धनुष्यबाण धारण करणारे, पीतांबर परिधान करणारे, मुकुटाने विभूषित, तसेच बाहुभूषणे, नूपुर, मोत्याचे हार, कौस्तुभमणी आणि कुंडले यांनी शोभायमान आहे. याखेरीज मी अन्य कोणताही वर मागत नाही." (८१-८२)

श्रीराम उवाच
भवत्वेवं महाभागे गच्छ त्वं बदरीवनम् ।
तत्रैव मां स्मरन्ती त्वं त्यक्‍त्वेदं भूतपञ्चकम् ।
मामेव परमात्मानं अचिरात्प्रतिपद्यसे ॥ ८३ ॥
श्रीराम म्हणाले - "हे महाभागे, असेच होईल. आता तू बदरिकाश्रमात जा. तेथेच तू माझे स्मरण करीत असताना हे तुझे पांचभौतिक शरीर टाकून देऊन तू लौकरच मज परमात्म्यालाच प्राप्त करून घेशील." (८३)

श्रुत्वा रघूत्तमवचोऽमृतसारकल्पं
    गत्वा तदैव बदरीतरुखण्डजुष्टम् ।
तीर्थं तदा रघुपतिं मनसा स्मरन्ती
    त्यक्‍त्वा कलेवरमवाप परं पदं सा ॥ ८४ ॥
अमृताच्या साराप्रमाणे असणारे ते रघूत्तमांचे वचन ऐकल्यावर, स्वयंप्रभा त्याच वेळी बदरी वृक्षांच्या समूहांनी युक्त असणार्‍या बदरिकाश्रमात गेली, आणि तेथे मनाने ती रघुपतीचे स्मरण करू लागली, आणि शेवटी स्वतःचे शरीर टाकून देऊन तिने परम पद प्राप्त करून घेतले. (८४)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किंधाकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥


GO TOP