श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकोनपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पितृभिर्मेषवृषणसंयोगेनेन्द्रस्य सवृषणत्वकरणं, श्रीरामेणाहल्यायाः समुद्धारोऽहल्यागौतमाभ्यां श्रीरामस्य सत्कारश्च - पितृदेवतांच्या द्वारा इंद्राला अण्डकोशाने युक्त करणे, तथा भगवान् श्रीरामांच्या द्वारा अहल्येचा उद्धार आणि त्या दोन्ही दंपतिंच्या द्वारा श्रीरामांचा सत्कार -
अफलस्तु ततः शक्रो देवान् अग्निपुरोगमान् ।
अब्रवीत् त्रस्तनयनः सिद्धगन्धर्वचारणान् ॥ १ ॥
तद्‍नंतर इंद्र अण्डकोषरहित झाल्याने फार घाबरले. त्यांचे नेत्र त्रस्त झाले. ते अग्नि आदि देवता, सिद्ध, गंधर्व आणि चारण यांना या प्रकारे म्हणाले - ॥ १ ॥
कुर्वता तपसो विघ्नं गौतमस्य महात्मनः ।
क्रोधमुत्पाद्य हि मया सुरकार्यमिदं कृतम् ॥ २ ॥
'देवतांनो ! महात्मा गौतमाच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी मी त्यांना क्रोध आणविला आहे. असे करून मी हे देवतांचेच कार्य सिद्ध केले आहे. ॥ २ ॥
अफलोऽस्मि कृतस्तेन क्रोधात् सा च निराकृता ।
शापमोक्षेण महता तपोऽस्यापहृतं मया ॥ ३ ॥
'मुनिने क्रोधपूर्वक भारी शाप देऊन मला अण्डकोषरहित केले आहे आणि आपल्या पत्‍नीचाही परित्याग केला आहे. यामुळे माझ्याद्वारे त्यांच्या तपस्येत खण्ड पडला आहे. ॥ ३ ॥
तन्मां सुरवराः सर्वे सर्षिसङ्‍घाः सचारणाः ।
सुरकार्यकरं यूयं सफलं कर्तुमर्हथ ॥ ४ ॥
जर मी त्यांच्या तपस्येत विघ्न आणले नसते तर त्यांनी देवतांचे राज्यच हिरावून घेतले असते. तेव्हां असे करून मी देवतांचेच कार्य सिद्ध केले आहे. म्हणून श्रेष्ठ देवतांनो ! तुम्ही सर्व लोक, ऋषिसमुदाय आणि चारणगण मिळून मला वृषणयुक्त करण्याचा प्रयत्‍न करा.' ॥ ४ ॥
शतक्रतोर्वचः श्रुत्वा देवाः साग्निपुरोगमाः ।
पितृदेवानुपेत्याहुः सर्वे सह मरुद्‍गणैः ॥ ५ ॥
इंद्राचे हे वचन ऐकून मरुद्‍गणांसहित अग्नि आदि समस्त देवता, कव्यवाहन आदि पितृदेवतांजवळ जाऊन म्हणाल्या - ॥ ५ ॥
अयं मेषः सवृषणः शक्रो ह्यवृषणः कृतः ।
मेषस्य वृषणौ गृह्य शक्रायाशु प्रयच्छत ॥ ६ ॥
'पितृगणहो ! हा आपला मेष अण्डकोषाने युक्त आहे आणि इंद्र अण्डकोष रहित केले गेले आहेत. म्हणून या मेषाचे दोन्ही अण्डकोष घेऊन आपण शीघ्र इंद्रास अर्पित करा. ॥ ६ ॥
अफलस्तु कृतो मेषः परां तुष्टिं प्रदास्यति ।
भवतां हर्षणार्थं च ये च दास्यन्ति मानवाः ।
अक्षयं हि फलं तेषां यूयं दास्यथ पुष्कलम् ॥ ७ ॥
'अण्डकोष रहित केला गेलेला हा मेष याच स्थानी आपल्याला परम संतोष प्रदान करेल. म्हणून जो मनुष्य आपल्या लोकांच्या प्रसन्नतेसाठी अण्डकोषरहित मेष दान करेल, त्यास आपण त्या दानाचे उत्तम एवं पूर्ण फल प्रदान कराल. ॥ ७ ॥
अग्नेस्तु वचनं श्रुत्वा पितृदेवाः समागताः ।
उत्पाट्य मेषवृषणौ सहस्राक्षे न्यवेशयन् ॥ ८ ॥
'अग्निचे असे म्हणणे ऐकून पितृदेवतांनी एकत्र येऊन मेषाचे वृषण उपटून इंद्राच्या शरीरात योग्य स्थानी जोडून दिले. ॥ ८ ॥
तदाप्रभृति काकुत्स्थ पितृदेवाः समागताः ।
अफलान् भुञ्जते मेषान् फलैस्तेषामयोजयन् ॥ ९ ॥
'ककुत्स्थनन्दन श्रीरामा ! तेव्हांपासून तेथे आलेल्या समस्त पितृदेवता, अण्डकोषरहित मेषालाच उपयोगात आणतात, आणि दात्यांना त्यांच्या दानजनित फलांचे भागी बनवितात. ॥ ९ ॥
इन्द्रस्तु मेषवृषणस्तदाप्रभृति राघव ।
गौतमस्य प्रभावेण तपसा च महात्मनः ॥ १० ॥
'रघुनन्दन ! त्या वेळेपासून महात्मा गौतमांच्या तपस्याजनित प्रभावामुळे इंद्राला मेषाचे वृषण धारण करावे लागले. ॥ १० ॥
तदागच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः ।
तारयैनां महाभागामहल्यां देवरूपिणीम् ॥ ११ ॥
'महातेजस्वी श्रीरामा ! आता तू पुण्यकर्मी महर्षि गौतमाच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी महाभागा अहल्येचा उद्धार कर. ॥ ११ ॥
विश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य आश्रमं प्रविवेश ह ॥ १२ ॥
विश्वामित्रांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामांनी महर्षिंच्या मागोमाग त्या आश्रमात प्रवेश केला. ॥ १२ ॥
ददर्श च महाभागां तपसा द्योतितप्रभान् ।
लोकैरपि समागम्य दुर्निरीक्ष्यां सुरासुरैः ॥ १३ ॥
तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले - महासौभाग्यशालिनी अहल्या आपल्या तपस्येने दैदीप्यभान होत आहे. या लोकातील मनुष्य तसेच संपूर्ण देवता आणि असुरही तेथे येऊन तिला पाहू शकत नव्हते. ॥ १३ ॥
प्रयत्‍नान्निर्मितां धात्रा दिव्यां मायामयीमिव ।
धूमेनाभिपरीताङ्‌गीं दीप्तामग्निशिखामिव ॥ १४ ॥

सतुषारावृतां साभ्रां पूर्णचन्द्रप्रभामिव ।
मध्येऽम्भसो दुराधर्षां दीप्तां सूर्यप्रभामिव ॥ १५ ॥
तिचे स्वरूप दिव्य होते विधात्याने फार प्रयत्‍नाने तिच्या अंगांची निर्मिति केली होती. ती मायामयी असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. धूमाने घेरलेल्या प्रज्वलित अग्निशिखेप्रमाणे ती वाटत होती. आणि ढगांनी झाकल्या गेलेल्या पूर्ण चंद्राच्या प्रभेसारखी दिसत होती. तसेच जलामध्ये उद्‍भासित होणार्‍या सूर्याच्या दुर्धर्ष प्रभेसमान दृष्टिगोचर होत होती. ॥ १४-१५ ॥
सा हि गौतमवाक्येन दुर्निरीक्ष्या बभूव ह ।
त्रयाणामपि लोकानां यावद् रामस्य दर्शनम् ।
शापस्यान्तमुपागम्य तेषां दर्शनमागता ॥ १६ ॥
गौतमांच्या शापामुळे श्रीरामचंद्रांचे दर्शन होण्यापूर्वी तिन्ही लोकातील कुठल्याही प्राण्याला तिचे दर्शन होणे कठीण होते. श्रीरामांचे दर्शन होताच ज्यावेळी तिच्या शापाचा अंत झाला तेव्हां ती सर्वांना दिसू लागली. ॥ १६ ॥
राघवौ तु तदा तस्याः पादौ जगृहतुर्मुदा ।
स्मरन्ती गौतमवचः प्रतिजग्राह सा हि तौ ॥ १७ ॥

पाद्यमर्घ्यं तथाऽऽतिथ्यं चकार सुसमाहिता ।
प्रतिजग्राह काकुत्स्थो विधिदृष्टेन कर्मणा ॥ १८ ॥
त्या समयी श्रीराम आणि लक्ष्मण यांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक अहल्येच्या दोन्ही चरणांना स्पर्श केला. महर्षि गौतमांच्या वचनांचे स्मरण करून अहल्येने अत्यंत सावधानपूर्वक त्या दोन्ही भावांना आदरणीय अतिथीच्या रूपाने स्विकारले आणि पाद्य, अर्घ्य आदि अर्पित करून त्यांचा अतिथिसत्कार केला. श्रीरामचंद्रांनी शास्त्रीय विधिस अनुसरून अहल्येचे आतिथ्य ग्रहण केले. ॥ १७-१८ ॥
पुष्पवृष्टिर्महत्यासीद् देवदुन्दुभि निःस्वनैः ।
गन्धर्वाप्सरसां चैव महानासीत् समुत्सवः ॥ १९ ॥
त्यावेळी देवतांच्या दुन्दुभि वाजू लागल्या. त्याबरोबरच आकाशांतून फुलांची भारी वृष्टि होऊ लागली. गंधर्व आणि अप्सरांच्या द्वारा महान उत्सव साजरा केला जाऊ लागला. ॥ १९ ॥
साधु साध्विति देवास्तामहल्यां समपूजयन् ।
तपोबलविशुद्धाङ्‍गीं गौतमस्य वशानुगाम् ॥ २० ॥
महर्षि गौतमांच्या अधीन राहणारी अहल्या आपल्या तपःशक्तिने विशुद्ध स्वरूपास प्राप्त झाली हे पाहून सर्व देवता तिला साधुवाद देऊन तिची भारी प्रशंसा करू लागल्या. ॥ २० ॥
गौतमोऽपि महातेजा अहल्यासहितः सुखी ।
रामं सम्पूज्य विधिवत् तपस्तेपे महातपाः ॥ २१ ॥
महातेजस्वी महातपस्वी गौतमही अहल्येला आपल्याबरोबर पाहून सुखी झाले. त्यांनी श्रीरामांची विधिवत् पूजा करून तपस्येस आरंभ केला. ॥ २१ ॥
रामोऽपि परमां पूजां गौतमस्य महामुनेः ।
सकाशाद् विधिवत् प्राप्य जगाम मिथिलां ततः ॥ २२ ॥
महामुनि गौतमांकडून विधिपूर्वक उत्तम पूजा, आदर-सत्कार पावून श्रीराम मुनिवर विश्वामित्रांबरोबर मिथिला नगरीस निघून गेले. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP