[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
त्रिसप्ततितमः सर्गः
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन कैकेय्या धिक्कारणं तां प्रति महतो रोषस्य प्रकटनं च -
भरताने कैकेयीला धिक्कारणे आणि तिच्या प्रति महान रोष प्रकट करणे -
श्रुत्वा च स पितुर्वृत्तं भ्रातरौ च विवासितौ ।
भरतो दुःखसन्तप्त इदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
पित्याचा परलोकवास आणि दोन्ही भावांच्या वनवासाचे वृत्त ऐकून भरत दुःखाने संतप्त झाले आणि याप्रकारे बोलले - ॥ १ ॥
किंनु कार्यं हतस्येह मम राज्येन शोचतः ।
विहीनस्याथ पित्रा च भ्रात्रा पितृसमेन च ॥ २ ॥
’हाय ! तू मला मारून टाकलेस. माझा पित्याशी कायमचा वियोग झाला आहे आणि पितृतुल्य भावापासून माझी ताटातूट झाली आहे. आता तर मी शोकात बुडून गेलो आहे, मला येथे राज्य घेऊन काय करायचे आहे ? ॥ २ ॥
दुःखे मे दुःखमकरोर्व्रणे क्षारमिवाददाः ।
राजानं प्रेतभावस्थं कृत्वा रामं च तापसम् ॥ ३ ॥
’तू राजांना परलोकवासी आणि रामांना तपस्वी बनवून मला दुःखावर दुःख दिले आहेस, जखमेवर मीठ चोळले आहेस. ॥ ३ ॥
कुलस्य त्वमभावाय कालरात्रिरिवागता ।
अङ्‌गारमुपगूह्य स्म पिता मे नावबुद्धवान् ॥ ४ ॥
’तू या कुळाचा विनाश करण्यासाठी काळरात्र बनून आली होतीस. माझ्या पित्याने तुला पत्‍नी काय बनवले, जणु जळता निखारा हृदयाशी धरला होता, परंतु त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. ॥ ४ ॥
मृत्युमापादितो राजा त्वया मे पापदर्शिनि ।
सुखं परिहृतं मोहात् कुलेऽस्मिन् कुलपांसनि ॥ ५ ॥
’पापावर दृष्टी ठेवणार्‍या कुलकलङ्‌किनी ! तू माझ्या महाराजांना मृत्युमुखात ढकललेस आणि मोहवश होऊन या कुळाचे सुख कायमचे हिरावून घेतलेस. ॥ ५ ॥
त्वां प्राप्य हि पिता मेऽद्य सत्यसन्धो महायशाः ।
तीव्रदुःखाभिसन्तप्तो वृत्तो दशरथो नृपः ॥ ६ ॥
’तुझी प्राप्ती झाल्याने माझे सत्यप्रतिज्ञ महायशस्वी पिता महाराज दशरथ या दिवसात दुःसह दुःखाने संतप्त होऊन प्राणत्याग करण्यास विवश झाले. ॥ ६ ॥
विनाशितो महाराजः पिता मे धर्मवत्सलः ।
कस्मात् प्रव्राजितो रामः कस्मादेव वनं गतः ॥ ७ ॥
’सांग तू माझ्या धर्मवत्सल पिता महाराज दशरथांचा विनाश का केलास ? माझे वडील बंधु श्रीराम यांना घरांतून का घालवलेस आणि ते ही का बरे तुझ्या सांगण्यावरून वनात निघून गेले ? ॥७ ॥
कौसल्या च सुमित्रा च पुत्रशोकाभिपीडिते ।
दुष्करं यदि जीवेतां प्राप्य त्वां जननीं मम ॥ ८ ॥
’कौसल्या आणि सुमित्रा ही, माझी माता म्हणविणार्‍या तुला कैकेयीला प्राप्त करून पुत्रशोकाने पीडित झाल्या आहेत. आता त्या जिवंत राहाणे अत्यंत कठीण आहे. ॥ ८ ॥
नन्वार्योऽपि च धर्मात्मा त्वयि वृत्तिमनुत्तमाम् ।
वर्तते गुरुवृत्तिज्ञो यथा मातरि वर्तते ॥ ९ ॥
’मोठे बंधु श्रीराम धर्मात्मा आहेत, गुरूजनांशी कसे आचरण करावे- केले पाहिजे हे ते उत्तम प्रकारे जाणतात, म्हणून आपल्या स्वतःच्या मातेशी त्यांचे जसे आचरण होते तसाच उत्तम व्यवहार ते तुझ्याशीही करीत होते. ॥ ९ ॥
तथाज्येष्ठा हि मे माता कौसल्या दीर्घदर्शिनी ।
त्वयि धर्मं समास्थाय भगिन्यामिव वर्तते ॥ १० ॥
माझी मोठी माता कौसल्याही फार दूरदर्शी आहे. ती धर्माचा आश्रय घेऊन तुझ्या बरोबर बहिणी सारखे आचरण करीत आहे. ॥ १० ॥
तस्याः पुत्रं महात्मानं चीरवल्कलवाससम् ।
प्रस्थाप्य वनवासाय कथं पापे न शोचसे ॥ ११ ॥
’पापिणी ! तिच्या महात्मा पुत्राला चीर आणि वल्कले नेसवून तू वनात राहण्यासाठी धाडून दिलेस ! आणि तरीही तुला शोक का बरे होत नाही. ॥ ११ ॥
अपापदर्शिनं शूरं कृतात्मानं यशस्विनम् ।
प्रव्राज्य चीरवसनं किं नु पश्यसि कारणम् ॥ १२ ॥
’श्रीराम कुणाचे वाईट विंतीत नाहीत. ते शूरवीर, पवित्रात्मा आणि यशस्वी आहेत. त्यांना चीर नेसवून वनवास देण्यात तू कोणता लाभ पहात आहेस ? ॥ १२ ॥
लुब्धाया विदितो मन्ये न तेऽहं राघवं यथा ।
तथा ह्यनर्थो राज्यार्थं त्वयाऽऽनीतो महानयम् ॥ १३ ॥
’तू लोभी आहेस. मला वाटते म्हणूनच माझा श्रीरामचन्द्रांप्रति कसा भाव आहे याचा तुला पत्ताच नाही, त्यामुळेच तर तू राज्याच्यासाठी महान अनर्थ करून ठेवला आहेस. ॥ १३ ॥
अहं हि पुरुषव्याघ्रावपश्यन् रामलक्ष्मणौ ।
केन शक्तिप्रभावेन राज्यं रक्षितुमुत्सहे ॥ १४ ॥
’मी पुरूषसिंह राम लक्ष्मणांना न पाहता कुठल्या शक्तिच्या प्रभावाने या राज्याचे रक्षण करू शकतो ? (माझे बंधु हेच माझे बळ आहे.) ॥ १४ ॥
तं हि नित्यं महाराजो बलवन्तं महौजसम् ।
अपाश्रितोऽभूद् धर्मात्मा मेरुर्मेरुवनं यथा ॥ १५ ॥
’माझे धर्मात्मा पिता महाराज दशरथही सदा त्या महातेजस्वी बलवान श्रीरामांचाच आश्रय घेत असत. (त्यांच्याकडूनच आपल्या लोकपरलोक सिद्धीची आशा करीत असत. मेरूपर्वत ज्याप्रमाणे आपल्या रक्षणासाठी आपल्यावरच उत्पन्न झालेल्या वनाचाच आश्रय घेतो अगदी त्याप्रमाणे. (जर तो दुर्गम वनानी घेरलेला नसेल तर दुसरे लोक निश्चितच त्याच्यावर आक्रमण करू शकतात.) ॥ १५ ॥
सोऽहं कथमिमं भारं महाधुर्यसमुद्यतम् ।
दम्यो धुरमिवासाद्य वहेयं केन चौजसा ॥ १६ ॥
’ज्या कुणी महाधुरंधर पुरूषांनी या राज्याचा भार धारण केला होता, तो मी कुठल्या बलाने धारण करू शकेन ? ज्या प्रमाणे कुणी लहानसे वासरू मोठ-मोठ्या बैलांच्या द्वारे वाहून नेण्यास योग्य असा महान भार ओढू शकत नाही, त्याप्रमाणे ह्या राज्याचा महान भार माझ्यासाठी असह्य आहे. ॥ १६ ॥
अथवा मे भवेच्छक्तिर्योगैर्बुद्धिबलेन वा ।
सकामां न करिष्यामि त्वामहं पुत्रगर्द्धिनीम् ॥ १७ ॥
’अथवा नाना प्रकारच्या उपायांनी तसेच बुद्धीच्या बळाने माझ्या ठिकाणी राज्याच्या भरण पोषणाची शक्ती असली तरीही केवळ आपल्या मुलासाठी राज्याची इच्छा करणार्‍या तुझी कैकेयीची ही कामना मी पूरी होऊ देणार नाही. ॥ १७ ॥
न मे विकाङ्‌क्षा जायेत त्यक्तुं त्वां पापनिश्चयाम् ।
यदि रामस्य नावेक्षा त्वयि स्यान्मातृवत् सदा ॥ १८ ॥
’जर श्रीराम तुला सदा आपल्या माते समान पहात नसते तर तुझ्या सारख्या पापपूर्ण विचाराच्या मातेचा त्याग करण्यात मला जराही अनमान वाटले नसते. ( त्याग करण्यास मी जराही मागे पुढे पाहिले नसते. ) ॥ १८ ॥
उत्पन्ना तु कथं बुद्धिस्तवेयं पापदर्शिनि ।
साधुचारित्रविभ्रष्टे पूर्वेषां नो विगर्हिता ॥ १९ ॥
’उत्तम चारित्र्यापासून पतन पावलेल्या पापिणी ! माझ्या पूर्वजांनी जिची सदा निंदा केली ती पापावरच दृष्टी ठेवणारी बुद्धी तुझ्या ठिकाणी कशी उत्पन्न झाली ? ॥ १९ ॥
अस्मिन् कुले हि सर्वेषां ज्येष्ठो राज्येऽभिषिच्यते ।
अपरे भ्रातरस्तस्मिन् प्रवर्तन्ते समाहिताः ॥ २० ॥
’या कुळात जो सर्वात मोठा असतो त्याचाच राज्याभिषेक होतो, दुसरे भाऊ सावधपणे मोठ्याच्या आज्ञेच्या आधीन राहून कार्य करतात. ॥ २० ॥
न हि मन्ये नृशंसे त्वं राजधर्ममवेक्षसे ।
गतिं वा न विजानासि राजवृत्तस्य शाश्वतीम् ॥ २१ ॥
’क्रूर स्वभावाच्या कैकेयी ! माझी अशी समजूत आहे की तू राजधर्मावर दृष्टी ठेवीत नाहीस, अथवा तो मुळीच जाणत नाहीस. राजांच्या आचरणाचे जे सनातन स्वरूप आहे, त्याचे ही तुला ज्ञान नाही. ॥ २१ ॥
सततं राजपुत्रेषु ज्येष्ठो राजाभिषिच्यते ।
राज्ञामेतत् समं तत् स्यादिक्ष्वाकूणां विशेषतः ॥ २२ ॥
’राजकुमारांमध्ये जो ज्येष्ठ असतो , सदा त्याचाच राजाच्या पदावर अभिषेक केला जातो. सर्व राजांच्या येथे समान रूपाने या नियमाचे पालन होत असते. इक्ष्वाकुवंशीय नरेशांच्या कुळात या नियमाचा विशेष आदर केला जातो. ॥ २२ ॥
तेषां धर्मैकरक्षाणां कुलचारित्रशोभिनाम् ।
अत्र चारित्रशौटीर्यं त्वां प्राप्य विनिवर्तितम् ॥ २३ ॥
ज्यांचे एकमात्र धर्मानेच रक्षण होत आले आहे तसेच जे कुलोचित सदाचाराचा पालनानेच सुशोभित झाले आहेत त्यांचा हा चरित्राविषयक अभिमान आज तुझ्या प्राप्तिमुळे - तुझ्याशी असलेल्या संबंधाच्या कारणामुळे दूर झाला आहे. ॥ २३ ॥
तवापि सुमहाभागे जनेन्द्रकुलपूर्वके ।
बुद्धिर्मोहः कथमयं सम्भूतस्त्वयि गर्हितः ॥ २४ ॥
’महाभागे ! तुझा जन्मही तर महाराज केकयांच्या कुळात झाला आहे, मग तुझ्या हृदयात हा निंदित बुद्धिमोह कसा उत्पन्न झाला ? ॥ २४ ॥
न तु कामं करिष्यामि तवाहं पापनिश्चये ।
यया व्यसनमारब्धं जीवितान्तकरं मम ॥ २५ ॥
’अग ! तुझा विचार अत्यंत पापपूर्ण आहे. मी तुझी इच्छा कदापि पूर्ण करणार नाही. तू माझ्यासाठी अशा विपत्तिचा पाया घातला आहेस की जी माझे प्राणसुद्धा घेऊ शकते. ॥ २५ ॥
एष त्विदानीमेवाहमप्रियार्थं तवानघम् ।
निवर्तयिष्यामि वनाद् भ्रातरं स्वजनप्रियम् ॥ २६ ॥
’हे घे ! मी आत्ताच तुझे अप्रिय करण्याचा निश्चय केला आहे. मी स्वजनांना जे प्रिय आहेत त्या निष्पाप बंधु श्रीरामांना परत घेऊन येईन. ॥ २६ ॥
निवर्तयित्वा रामं च तस्याहं दीप्ततेजसः ।
दासभूतो भविष्यामि सुस्थितेनान्तरात्मना ॥ २७ ॥
’श्रीरामांना परत घेऊन येऊन उद्दीप्त तेज असलेल्या त्या महापुरूषाचा दास बनून स्वस्थचित्ताने मी जीवन व्यतीत करीन.’ ॥ २७ ॥
इत्येवमुक्त्वा भरतो महात्मा
     प्रियेतरैर्वाक्यगणैस्तुदंस्ताम् ।
शोकातुरश्चापि ननाद भूयः
     सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः ॥ २८ ॥
असे म्हणून महात्मा भरत शोकाने पीडीत होऊन पुनः कैकेयीला मर्मभेदक वचनांनी व्यभित करीत तिला जोरजोराने धिक्कारू लागले जणु मन्दराचलाच्या गुहेत बसलेला सिंहच गर्जना करीत आहे. ॥ २८ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रिसप्ततितमः सर्गः ॥ ७३ ॥

याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतिल अयोध्याकाण्डाचा त्र्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP