[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ अष्टात्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीताया प्रत्यभिज्ञानतया चित्रकूटे घटितस्य काकप्रसंगस्य श्रावणं श्रीरामस्य शीघ्रमानयनयाग्रहकरणं हनुमते
चूडामणेः समर्पणं च -
सीतेने हनुमन्तास ओळख पटविण्यासाठी म्हणून चित्रकूट पर्वतावर घडलेला एका कावळ्याचा प्रसंग ऐकविणे, भगवान श्रीरामास लवकर घेऊन येण्याविषयी अनुरोध करून चूडामणि देणे -
ततः सकपिशार्दूस्तेन वाक्येन तोषितः ।
सीतामुवाच तच्छ्रुत्वा वाक्यं वक्यविशारदः ॥ १ ॥
त्यानन्तर सीतेचे वरील भाषण ऐकून वाक्यपटू (संभाषण कुशल) हनुमान प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले - ॥१॥
युक्तरूपं त्वया देवि भाषितं शुभदर्शने ।
सदृशं स्त्रीस्वभावस्य साध्वीनां विनयस्य च ॥ २ ॥
हे देवी ! तू यावेळी हे योग्यच भाषण केले आहेस. हे शुभदर्शने ! तुझे बोलणे स्त्री स्वभावाला आणि पतिव्रतांच्या विनयशीलतेला शोभणारेच आहे. ॥२॥
स्त्रीत्वान्न त्वं समर्थासि सागरं व्यतिवर्तितुम् ।
मामधिष्ठाय विस्तीर्णं शतयोजनमायतम् ॥ ३ ॥
तू स्त्री असल्यामुळे माझ्या पाठीवर बसून शंभर योजने विस्तीर्ण अशा विशाल समुद्राचे उल्लंघन करून जाण्यास समर्थ नाहीस. ॥३॥
द्वितीयं कारणं यच्च ब्रवीषि विनयान्विते ।
रामादन्यस्य नार्हामि संसर्गमिति जानकि ॥ ४ ॥

एतत् ते देवि सदृशं पत्‍न्यास्तस्य महात्मनः ।
का ह्यन्या त्वामृते देवि ब्रूयाद् वचनमीदृशम् ॥ ५ ॥
हे विनयसंपन्न जनकनन्दिनी सीते ! तू दुसरे जे कारण सांगत आहेस की रामाशिवाय दुसर्‍या कुणाच्या शरीरास मी स्वेच्छेने स्पर्श करणार नाही हे तुलाच योग्य आहे. हे देवी ! महात्मा श्रीरामचन्द्रांच्या धर्मपत्‍नीच्या मुखान्तूनच अशी गोष्ट बोलली जाते. तुझ्याशिवाय दुसरी कोणती स्त्री इतका कठीण प्रसंग येऊनही अशा प्रकारचे भाषण करू शकेल ? ॥४-५॥
श्रोष्यते चैव काकुत्स्थः सर्वं निरवशेषतः ।
चेष्टितं यत् त्वया देवि भाषितं न ममाग्रतः ॥ ६ ॥
हे देवी ! माझ्या समोर तू जे जे पवित्र आचरण केलेस आणि माझ्या समक्ष जे उत्तम भाषण केलेस त्यान्तील शब्द न शब्द काकुत्स्थकुलोत्पन्न श्रीरामांच्या कानावर मी घालीन. ॥६॥
कारणैर्बहुभिर्देवि रामप्रियचिकीर्षया ।
स्नेहप्रस्कन्नमनसा मयैतत् समुदीरितम् ॥ ७ ॥।
हे देवी ! मी तुला आपल्या बरोबर घेऊन जाण्यासंबन्धी आग्रह केला त्याला अनेक कारणे आहेत. एक तर मी श्रीरामचन्द्रांचे अत्यन्त लवकर प्रिय करण्याची इच्छा करीत होतो त्यामुळे त्यांच्या विषयींच्या स्नेहामुळे अन्तःकरणात जो ओलावा उत्पन्न झाला होता, त्यामुळे स्नेहशिथिल मनामुळेच मी असे बोललो. ॥७॥
लङ्‌काया दुष्प्रवेशत्वाद् दुस्तरत्वान्महोदधेः ।
सामर्थ्यादात्मनश्चैव मयैतत् समुदीरितम् ॥ ८ ॥
दुसरे कारण असे आहे की लंकेत प्रवेश करणे सर्वांसाठी अत्यन्त कठीण आहे. तिसरे कारण म्हणजे हा महासागर अति दुस्तर आहे आणि तुला घेऊन जाण्याचे सामर्थ माझ्या ठिकाणी असल्यामुळे मी असे बोललो. ॥८॥
इच्छामि त्वां समानेतुं अद्यैव रघुनन्दिना ।
गुरुस्नेहेन भक्त्या च नान्यथा तदुदाहृतम् ॥ ९ ॥
रघुनन्दन जे श्रीराम त्यांच्याशी तुझी भेट आजच्या आज घडवून आणावी अशी माझी इच्छा होती, म्हणून आपले परमाराध्य गुरू श्रीराम यांच्या विषयीचा स्नेह आणि तुझ्याविषयी भक्ती यामुळे मी असे भाषण केले. त्यान्त दुसरा काहीही उद्देश नव्हता. ॥९॥
यदि नोत्सहसे यातुं मया सार्धमनिन्दिते ।
अभिज्ञानं प्रयच्छ त्वं जानीयाद् राघवो हि यत् ॥ १० ॥
परन्तु हे सती साध्वी ! हे देवी ! जर तुझ्या मनात माझ्याबरोबर येण्याचा उत्साह नसेल तर रामाला ओळखू येईल अशी काही तरी तुझ्याजवळची वस्तु तू खूण म्हणून माझ्याजवळ दे म्हणजे मी तुझे दर्शन केले आहे, हे श्रीरामाला कळून येईल. ॥१०॥
एवमुक्ता हनुमता सीता सुरसुतोपमा ।
उवाच वचनं मन्दं बाष्पप्रग्रथिताक्षरम् ॥ ११ ॥
हनुमन्तानी असे म्ह्टल्यावर देवकन्येप्रमाणे तेजस्वी असलेली सीता अश्रुगद्‍गद वाणीने हळू हळू याप्रमाणे बोलू लागली - ॥११॥
इदं श्रेष्ठमभिज्ञानं ब्रूयास्त्वं तु मम प्रियम् ॥
शैलस्य चित्रकूटस्य पादे पूर्वोत्तरे पदे ॥ १२ ॥

तापसाश्रमवासिन्याः प्राज्यमूलफलोदके ।
तस्मिन् सिद्धाश्रमे देशे मन्दाकिन्यविदूरतः ॥ १३ ॥

तस्योपवनखण्डेषु नानापुष्पसुगन्धिषु ।
विहृत्य सलिले क्लिन्ना ममाङ्‌के समुपाविशः ॥ १४ ॥
हे वानरश्रेष्ठा ! चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी ईशान्येच्या बाजूला मन्दाकिनी नदीच्या समीप तापसाश्रमाध्ये वास्तव्य करीत असतांना जी गोष्ट घडून आली तीच गोष्ट मुख्य खूण म्हणून तू माझ्या प्रिय रामाला कथन कर. तू त्याला माझा असा निरोप सांग की, हे रामा ! मन्दाकिनी जवळच्या सिद्धांनी वास्तव्य केलेल्या प्रदेशातील नाना प्रकारच्या पुष्पांनी सुगन्ध युक्त झालेल्या उपवनातून विहार करतांना मी पाण्याने चिंब भिजून गेले आणि तशीच तुझ्याजवळ येऊन तुझ्या अंकावर बसले. ॥१२-१४॥
ततो मांससमायुक्तो वायसः पर्यतुण्डयत् ।
तमहं लोष्टमुद्यम्य वारयामि स्म वायसम् ॥ १५ ॥

दारयन् स च मां काकस्तत्रैव परिलीयते ।
न चाप्युपारमन्मांसाद् भक्षार्थी बलिभोजनः ॥ १६ ॥
त्यानन्तर तेथे एक मांसलोलुप कावळा आला आणि चोचीने मला टोचू लागला. तेव्हा मी मातीचे एक ढेकूल उगारून त्याला हाकलवून लावले. परन्तु मला वारंवार चोच मारून तो तेथेच घोटाळू लागला. (तेथेच लपून बसून परत येऊ लागला) त्याला बळी भोजनाची इच्छा असल्याने तो माझ्या वक्षःस्थळांतील मांस काढण्याचे कामापासून निवृत्त होईना. ॥१५-१६॥
उत्कर्षन्त्यां च रशनां क्रुद्धायां मयि पक्षिणे ।
स्रंसमाने च वसने ततो दृष्टा त्वया ह्यहम् ॥ १७ ॥
तेव्हा मी त्या पक्ष्यावर रागावून आपल्या कटिवस्त्राला दृढतापूर्वक बान्धण्यासाठी वर खेचू लागले असता माझे वस्त्र सुटू लागले आणि अशा वेळी तुझी दृष्टी माझ्याकडे गेली. ॥१७॥
त्वया विहसिता चाहं क्रुद्धा संलज्जिता तदा ।
भक्ष्यगृध्रेन काकेन दारिता त्वामुपागता ॥ १८ ॥
तेव्हा तू मला हसलास, त्यामुळे प्रथम तर मी रागावले पण नन्तर लज्जित झाले. इतक्यात त्या भक्ष्य लोलुप कावळ्याने परत चोच मारून मला जखमी केले आणि त्याच अवस्थेत मी तुझ्याजवळ आले. ॥१८॥
ततः श्रान्ताहमुत्संगमासीनस्य तवाविशम् ।
क्रुद्ध्यन्ती च प्रहृष्टेन त्वयाहं परिसान्त्विता ॥ १९ ॥
नन्तर मी श्रमले होते म्हणून तू जेथे बसला होतास तेथे तुझ्याजवळ येऊन तुझ्या अंकावर (मांडीवर) बसले. मला तर राग आला होता पण तू हसत हसत माझे सान्त्वन केलेस. ॥१९॥
बाष्पपूर्णमुखी मन्दं चक्षुषी परिमार्जती ।
लक्षिताहं त्वया नाथ वायसेन प्रकोपिता ॥ २० ॥
नाथ ! कावळ्याने त्रास दिल्यामुळे मी त्रस्त झाले होते, माझे मुख अश्रूनी भरून गेले होते आणि मी हळू हळू आपले डोळे पुसत होते. अशा वेळी तुझे लक्ष माझ्याकडे गेले. ॥२०॥
परिश्रमाच्च सुप्ता हे राघवाङ्‌केऽस्म्यहं चिरम् ।
पर्यायेण प्रसुप्तश्च ममाङ्‌के भरताग्रजः ॥ २१ ॥
हनुमान ! खूप थकलेली, श्रमलेली असल्याने त्या दिवशी मी खूप उशीरापर्यत राघवाच्या मांडीवर झोपून राहिले नन्तर त्याची पाळी आली तेव्हा तो भरताचा मोठा भाऊ माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला. ॥२१॥
स तत्र पुनरेवाथ वायसः समुपागमत् ।
ततः सुप्तप्रबुद्धां मां रामवाङ्‌कात् समुत्थिताम् ।
वायसः सहसागम्य विददार स्तनान्तरे ॥ २२ ॥
त्याचवेळी तो काकपक्षी फिरून तेथे आला. मी झोपेतून जागी होऊन रामाच्या मांडीवर उठून बसले होते तोच त्याने एकाएकी माझ्याकडे येऊन माझ्या वक्षःस्थळावर ओरबाडले. ॥२२॥
पुनः पुनरथोत्पत्य विददार स मां भृशम् ।
ततः समुक्षितो रामो मुक्तैः शोणितबिन्दुभिः ॥ २३ ॥
अशा रीतीने वारंवार चोंच मारून त्याने मला अत्यन्त घायाळ करून टाकले. माझ्या शरीरातून रक्ताचे थेंब ठिबकू लागले. त्यामुळे श्रीरामांची झोप मोडली आणि ते जागे होऊन उठून बसले. ॥२३॥
स मां दृष्ट्‍वा महाबाहुर्वितुन्नां स्तनयोस्तदा ।
आशीविष इव क्रुद्धः श्वसन् वाक्यमभाषत ॥ २४ ॥
इतक्यात मला स्तनांच्या मध्यभागी ओरखडलेले आहे हे पाहून तो महाबाहु राम त्या समयी अत्यन्त कुपित होऊन विषधर सर्पाप्रमाणे फुस्कारू लागला आणि जोरजोराने श्वास घेत याप्रमाणे म्हणाला - ॥२४॥
केन ते नागनासोरु विक्षतं वै स्तनान्तरम् ।
कः क्रीडति सरोषेण पञ्चवक्त्रेण भोगिना ॥ २५ ॥
हे हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा असणार्‍या सुन्दरी, तुझ्या स्तनांमध्ये कोणी ओरबाडलेले आहे ? पंचमुखी क्रुद्ध नागाशी अशा प्रकारे खेळणारा कोण बरे आहे ? ते मला कळू दे. ॥२५॥
वीक्षमाणस्ततस्तं वै वायसं समवैक्षत ।
नखैः सरुधिरैस्तीक्ष्णैर्मामेवाभिमुखं स्थितम् ॥ २६ ॥
असे म्हणून जेव्हा त्याने इकडे तिकडे दृष्टी टाकली तेव्हा ज्याची तीक्ष्ण नखे रक्तानी भरलेली आहेत असा तो माझ्या समोरच बसलेला काकपक्षी त्याच्या दृष्टीस पडला. ॥२६॥
पुत्रः किल स शक्रस्य वायसः पततां वरः ।
धरान्तरगतः शीघ्रं पवनस्य गतौ समः ॥ २७ ॥
तो पक्षामध्ये श्रेष्ठ कावळा इन्द्राचा पुत्र (जयन्त) होता. वायूसारखी गति असलेला तो पक्षी रामाला पहाताच शीघ्रच उडून पृथ्वीवर येऊन पोहोंचला. (एकदम जमिनीतील एका बिळात शिरला.) ॥२७॥
ततस्तस्मिन् महाबाहुः कोपसंवर्तितेक्षणः ।
वायसे कृतवान् क्रूरां मतिं मतिमतां वरः ॥ २८ ॥
त्यावेळी महाबाहु श्रीरामांचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीरामांनी त्या कावळाल्या कठोर दण्ड देण्याचा विचार केला. ॥२८॥
स दर्भं संस्तराद् गृह्य ब्रह्मणोऽस्त्रेण योजयत् ।
स दीप्त इव कालाग्निर्जज्वलाभिमुखो द्विजम् ॥ २९ ॥
तेव्हा दर्भाच्या चटईतून एक दर्भ काढून घेऊन रामांनी तो ब्रह्मशास्त्रे अभिमन्त्रित केला. अभिमन्त्रित करताच तो काळाग्नीप्रमाणे प्रज्ज्वलित झाला. त्याचे लक्ष्य तो पक्षीच होता. ॥२९॥
स तं प्रदीप्तं चिक्षेप दर्भं तं वायसं प्रति ।
ततस्तं वायसं दर्भः सोऽम्बरेऽनुजगाम ह ॥ ३० ॥
रामाने तो प्रज्ज्वलित दर्भ त्या काकपक्षावर सोडला तेव्हा तो पक्षी जमिनीतील बिळातून निघाला. त्याने आकाशामध्ये उड्‍डाण केले तर तो दर्भही त्याचा पाठलाग करू लागला. ॥३०॥
अनुसृष्टस्तदा काको जगाम विविधां गतिम् ।
त्राणकाम इमं लोकं सर्वं वै विचचार ह ॥ ३१ ॥
याप्रमाणे दर्भ मागे लागला तेव्हा तो कावळा नानाप्रकारच्या गतींचे अवलंबन करुन उडू लागला आणि आपले प्राण वाचावेत म्हणून संपूर्ण जगतामध्ये फिरला परन्तु त्या बाणाने त्याचा पिच्छा सोडला नाही. ॥३१॥
स पित्रा च परित्यक्तः सर्वैश्च परमर्षिभिः ।
त्रीँल्लोकान् सम्परिक्रम्य तमेव शरणं गतः ॥ ३२ ॥
त्याच्या माता-पित्याने तसेच सर्व देवांनी आणि समस्त श्रेष्ठ महर्षिंनीही त्याचा परित्याग केला तेव्हा तीन्ही लोकात हिंडून शेवटी तो परत तुलाच (भगवान श्रीरामालाच) शरण आला. ॥३२॥
स तं निपतितं भूमौ शरण्यः शरणागतम् ।
वधार्हमपि काकुत्स्थः कृपया पर्यपालयत् ॥ ३३ ॥
श्री रघुनाथ शरणागत वत्सल आहेत. त्यांना शरण येऊन ज्यावेळी तो भूमीवर पडला (देवजातीचा असल्याने भूमीला स्पर्श करणे योग्य नसूनही तो भूमीवर व्याकुळ होऊन पडला.) तेव्हा त्यांना त्याची दया आली आणि म्हणून त्याचा वध करणेच योग्य असून त्यांनी त्या कावळ्यास मारले नाही, कृपेने त्याचे रक्षण केले. ॥३३॥
परिद्यूनं विवर्णं च पतमानं तमब्रवीत् ।
मोघमस्त्रं न शक्यं तु ब्राह्मं कर्तुं तदुच्यताम् ॥ ३४ ॥
त्याची शक्ति क्षीण झाली होती आणि तो विषण्ण होऊन समोर भूमीवर पडलेला होता. त्याची ती अवस्था पाहून भगवान राम म्हणाले- ब्रह्मस्त्राला तर व्यर्थ करता येत नाही म्हणून याच्या द्वारे तुझे कुठले अंग भंग केले जावे हे तू सांग. ॥३४॥
ततस्तस्याक्षि काकस्य हिनस्ति स्म स दक्षिणम् ।
दत्त्वा स दक्षिणं नेत्रं प्राणेभ्यः परिरक्षितः ॥ ३५ ॥
तेव्हा तो म्हणाला की तुझ्या शराने माझा उजवा डोळा नष्ट केला जावो. तेव्हा त्याच्या सम्मतीस अनुसरून श्रीरामाने त्या अस्त्राने त्या कावळ्याचा उजवा डोळा नाहीसा केला अशा प्रकारे आपला उजवा नेत्र देऊन त्या कावळ्याने आपले प्राण वाचविले. ॥३५॥
स रामाय नमस्कृत्वा राज्ञे दशरथाय च ।
विसृष्टस्तेन वीरेण प्रतिपेदे स्वमालयम् ॥ ३६ ॥
नन्तर त्या इन्द्रपुत्र जयन्ताने रामाला, त्या दशरथनन्दन राजाला नमस्कार करून वीर रामांची परवानगी घेऊन, निरोप घेऊन तो आपल्या स्वस्थानी निघून गेला. ॥३६॥
मत्कृते काकमात्रेऽपि ब्रह्मास्त्रं समुदीरितम् ।
कस्माद् यो माहरत् त्वत्तः क्षमसे तं महीपते ॥ ३७ ॥
हे हनुमान ! म्हणून तू माझा असा निरोप रामाला कळव की हे प्राणनाथ ! हे भूपते ! आपण माझ्यासाठी एका यत्कश्चित (सामान्य) अपराध करणार्‍या कावळ्यावरही ब्रह्मस्त्राचा प्रयोग केला होतात, तर ज्याने तुमच्यापासून मला हरण करून नेले, त्याला तुम्ही कशाकरिता क्षमा करीत आहा ? ॥३७॥
स कुरुष्व महोत्साहां कृपां मयि नरर्षभ ।
त्वया नाथवती नाथ ह्यनाथा इव दृश्यते ॥ ३८ ॥
हे पुरुषश्रेष्ठा ! महान उत्साहाने आपण माझ्यावर पूर्ण कृपा करा. हे नाथ ! तुमच्यामुळे मी सदा सनाथ असून आज अनाथाप्रमाणे झाले आहे (अनाथासारखी दिसते आहे) ॥३८॥
आनृशंस्यं परो धर्मस्त्वत्त एव मया श्रुतम् ।
जानामि त्वां महावीर्यं महोत्साहं महाबलम् ॥ ३९ ॥
दया करणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे मी तुमच्या मुखांतूनच ऐकलेले आहे. मी तुम्हाला उत्तम प्रकारे जाणते. तुमचे बळ, पराक्रम आणि उत्साह महान आहे. ॥३९॥
अपारवरमक्षोभ्यं गाम्भीर्यात् सागरोपमम् ।
भर्तारं ससमुद्रायाधरण्या वासवोपमम् ॥ ४० ॥
तुम्ही आदि-अन्त न लागणारे असे अपार, असीम आहात. तुम्हांला कुणी क्षुब्ध अथवा पराजित करू शकत नाही. तुम्ही गांभीर्यात सागराची बरोबरी करणारे आहात आणि इन्द्राप्रमाणे तेजस्वी आहात. मी तुमचा प्रभाव जाणून आहे. ॥४०॥
एवमस्त्रविदां श्रेष्ठः बलवान् सत्त्ववानपि ।
किमर्थमस्त्रं रक्षःसु न योजयसि राघवः ॥ ४१ ॥
हे राघवा ! याप्रकारे अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ, बलवान आणि शक्तिशाली असूनही तुम्ही राक्षसांवर आपल्या अस्त्रांचा प्रयोग का बरे करीत नाही ? ॥४१॥
न नागा नापि गन्धर्वा नासुरा न मरुद्ऽगणाः ।
रामस्य समरे वेगं शक्ताः प्रतिसमीहितुम् ॥ ४२ ॥
हे पवनपुत्र ! नाग, गन्धर्व, देवता आणि मरूद्‍गण कोणीही समरांगणात श्रीरामांचा वेग सहन करण्यास समर्थ नाही. ॥४२॥
तस्य वीर्यवतः कश्चिद् यद्यस्ति मयि संभ्रमः ।
किमर्थं न शरैस्तीक्ष्णैः क्षयं नयति राक्षसान् ॥ ४३ ॥
त्या अत्यन्त पराक्रमी रामांना माझ्या सध्याच्या स्थितिमुळे जर हृदयात क्षोभ उत्पन्न होत असेल तर आपल्या तीक्ष्ण बाणांनी ते या राक्षसांचा नाश का करून टाकीत नाहीत. ॥४३॥
भ्रातुरादेशमादाय लक्ष्मणो वा परन्तपः ।
कस्य हेतोर्न मां वीरः परित्राति महाबलः ॥ ४४ ॥
अथवा आपल्या ज्येष्ठ बन्धूची अनुज्ञा घेऊन तो शत्रूंना सन्ताप देणारा महाबलाढ्‍य वीर लक्ष्मणही कोणत्या कारणामुळे माझे रक्षण करण्यास पुढे येत नाही ? ॥४४॥
यदि तौ पुरुषव्याघ्रौ वाय्विन्द्रसमतेजसौ ।
सुराणामपि दुर्धर्षौ किमर्थं मामुपेक्षतः ॥ ४५ ॥
ते दोन्ही पुरुषसिंह वायु आणि इन्द्राप्रमाणे तेजस्वी आहेत. ते देवतांनाही दुर्जय आहेत तर ते कुठल्या कारणामुळे माझी उपेक्षा करीत आहेत. ॥४५॥
ममैव दुष्कृतं किंचिन्महदस्ति न संशयः ।
समर्थावपि तौ यन्मां नावेक्षते परन्तपौ ॥ ४६ ॥
निःसंशयच माझे कुठले तरी महान पाप फळास आले असले पाहिजे म्हणूनच ते दोन्ही शत्रुतापन महान वीर माझा उद्धार करण्यास समर्थ असूनही माझ्यावर कृपादृष्टी करीत नाहीत. ॥४६॥
वैदह्या वचनं श्रत्वा करुणं साश्रु भाषितम् ।
अथाब्रवीन्महातेजा हनूमान् हरियूथपः ॥ ४७ ॥
वैदेही सीतेने अश्रु ढाळीत करूण स्वराने केलेले हे भाषण ऐकून पवनपुत्र महातेजस्वी हनुमान तिला याप्रमाणे म्हणाले- ॥४७॥
त्वच्छोकविमुखो रामो देवि सत्येन मे शपे ।
रामे दुःखाभिपन्ने च लक्ष्मणः परितप्यते ॥ ४८ ॥
हे देवी ! मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीराम तुझ्या विरह-शोकाने पीडित होऊन अन्य सर्व कार्यापासून विमुख झाले आहेत. केवळ तुझेच चिन्तन करीत असतात. श्रीराम दुःखी असल्याने लक्ष्मणही सदा अत्यन्त चिन्ताक्रान्त झाले आहेत. ॥४८॥
कथंचिद् भवती दृष्टा न कालः परिशोचितुम् ।
इमं मुहूर्तं दुःखानामन्तं द्रक्ष्यसि शोभने ॥ ४९ ॥
आता कसे का होईना मला तुझे दर्शन झाले आहेत. तेव्हा आता शोक करण्याची वेळ राहिलेली नाही. हे शोभने ! तू आता तुझ्या दुःखाचा नाश झाला आहे, असे लवकरच पाहशील. ॥४९॥
तावुभौ पुरुषव्याघ्रौ राजपुत्रौ महाबलौ ।
त्वद्दर्शनकृतोत्साहौ लोकान् भस्मीकरिष्यतः ॥ ५० ॥
ते दोन्ही पुरुषसिंह राजकुमार फार बलवान आहेत आणि तुला पाहण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत. ते सर्व राक्षस जगतास भस्म करून टाकतील. ॥५०॥
हत्वा च समरक्रूरं रावणं सहबान्धवम् ।
राघवस्त्वां विशालाक्षि स्वां पुरीं प्रति नेष्यषति ॥ ५१ ॥
हे विशाल लोचने ! राघव समरांगणात क्रूरता प्रकट करणार्‍या रावणाला त्याच्या बन्धुबान्धवांसहित मारून तुला आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील. ॥५१॥
ब्रूहि यद् राद्राघवो वाच्यो लक्ष्मणश्च महाबलः ।
सुग्रीवो वापि तेजस्वी हरयो वा समागताः ॥ ५२ ॥
आता तुला राघवाला आणि महाबलाढ्‍य लक्ष्मणाला काय सांगायचे असेल, ते सांग. ॥५२॥
इत्युक्तवति तस्मिंश्च सीता पुनरथाब्रवीत् ।
कौसल्या लोकभर्तारं सुषुवे यं मनस्विनी ॥ ५३ ॥

तं ममार्थे सुखं पृच्छ शिरसा चाभिवादय ।
देवकन्येप्रमाणे तेजस्वी असलेली पण शोकाने सन्तप्त झालेली सीता कपि हनुमन्तास म्हणाली- हे कपिश्रेष्ठ ! मनस्विनी कौसल्या देवीने ज्यास जन्म दिला आहे आणि जो संपूर्ण जगाचा स्वामी आहे, त्या रघुनाथाला माझ्या वतीने मस्तक नमवून प्रणाम करा आणि त्यांचे कुशल विचारा. ॥५३ १/२॥
स्रजश्च सर्वरत्‍नानि प्रिया याश्च वराङ्‌गनाः ॥ ५४ ॥

ऐश्वर्यं च विशालायां पृथिव्यामपि दुर्लभम् ।
पितरं मातरं चैव सम्मान्याभिप्रसाद्य च ॥ ५५ ॥

अनुप्रव्रजितो रामं सुमित्रा येन सुप्रजाः ।
आनुकूल्येन धर्मात्मा त्यक्त्वा सुखमनुत्तमम् ॥ ५६ ॥

अनुगच्छति काकुत्स्थं भ्रातरं पालयन् वने ।
सिंहस्कन्धो महाबाहुर्मनस्वी प्रियदर्शनः ॥ ५७ ॥

पितृवद् वर्तते रामे मातृवन्मां समाचरन् ।
ह्रियमाणां तदा वीरो न तु मां वेद लक्ष्मणः ॥ ५८ ॥

वृद्धोपसेवी लक्ष्मीवाञ्शक्तो न बहुभाषिता ।
राजपुत्रप्रियश्रेष्ठः सदृशः श्वशुरस्य मे ॥ ५९ ॥

मम प्रियतरो नित्यं भ्राता रामस्य लक्ष्मणः ।
नियुक्तो धुरि यस्यां तु तामुद्वहति वीर्यवान् ॥ ६० ॥

यं दृष्ट्‍वा राघवो नैव वृत्तमार्यमनुस्मरत् ।
स ममार्थाय कुशलं वक्तव्यो वचनान्मम ॥ ६१ ॥

मृदुर्नित्यं शुचिर्दक्षः प्रियो रामस्य लक्ष्मणः ।
यथा हि वानरश्रेष्ठ दुःखक्षयकरो भवेत् ॥ ६२ ॥
त्यानन्तर सर्व प्रकारची रत्‍ने, भूमण्डलातही ज्याची प्राप्ती होणे कठीण असे उत्तम ऐश्वर्य, नाना प्रकारचे हार तसेच मनोहर सुन्दर स्त्रियांचाही त्याग करून माता-पित्यांना सन्मानपूर्वक प्रसन्न करून घेऊन जो रामाबरोबर वनात निघून आला, ज्याच्यामुळे देवी सुमित्रा सुपुत्रवती म्हणून ओळखली जाते, ज्याचे चित्त सदा धर्माचे ठिकाणी असते, ज्याच्या भुजा सिंहाप्रमाणे असून विशाल आहेत, जे प्रियदर्शन आणि मनाला वश ठेवणारे आहेत, ज्यांचे श्रीरामाच्या ठिकाणी पित्यासमान आणि माझ्या ठिकाणी मातेसमान भाव आणि आचरण आहे आणि ज्या वीर लक्ष्मणांना त्यावेळी माझे हरण झाल्याचे वृत्त ज्ञात होऊ शकले नाही, असे वृद्धोपसेवी, शोभाशाली, शक्तिमान आणि मितभाषी असून राजकुमार श्रीरामांच्या प्रिय व्यक्तिंच्या मध्ये ज्यांचे स्थान सर्वोच्च आहे, तसेच जे माझ्या श्वसुरांसारखे पराक्रमी आहेत आणि ज्यांच्यावर श्रीरामांचे सदा माझ्यापेक्षाही अधिक प्रेम आहे, ते त्यांचे लहान बन्धु लक्ष्मण, जे पराक्रमी वीर त्यांच्यावर सोपविलेल्या कार्याचा भार अत्यन्त जबाबदारीने संभाळतात आणि ज्यांना पाहून श्रीरघुनाथ आपल्या मृत पित्यालाही विसरून गेले (अर्थात जे पित्यासमान श्रीरामांचे पालन करण्यात दत्तचित्त राहातात) त्या लक्ष्मणासही तू माझ्या वतीने कुशल प्रश्न विचार आणि हे वानरश्रेष्ठा ! माझ्या सांगण्यावरून तुम्ही अशा गोष्टी सांगा की ज्या ऐकून नित्य कोमल, पवित्र, दक्ष तसेच श्रीरामाचे प्रिय बन्धु लक्ष्मण माझे दुःख दूर करण्यासाठी तत्पर होतील. ॥५४-६२॥
त्वमस्मिन् कार्यनिरवाहे प्रमाणं हरियूथपसत्तम ।
राघवस्त्वत्समारम्भान्मयि यत्‍नपरो भवेत् ॥ ६३ ॥
हे वानरश्रेष्ठा ! अधिक काय सांगू ? ज्याप्रकारे हे कार्य सिद्ध होईल असा उपाय तुला केला पाहिजे. तू याविषयात प्रमाण आहेस आणि याचा सर्व भार तुझ्यावरच आहे. तू प्रोत्साहन दिलेस तरच राघव माझ्या उद्धारासाठी प्रयत्‍नशील होऊ शकतील. ॥६३॥
इदं ब्रूयाश्च मे नाथं शूरं रामं पुनः पुनः ।
जीवितं धारयिष्यामि मासं दशरथात्मज ॥ ६४ ॥

ऊर्ध्वं मासान्न जीवेयं सत्येनाहं ब्रवीमि ते ।
तू माझे स्वामी शूरवीर श्रीरामास वारंवार सांग की हे दशरथनन्दन ! माझ्या जीवनाच्या अवधिसाठी जे महिने ठरविले गेले आहेत, त्यातील जितके बाकी आहेत तितक्याच काळावधिपर्यत मी माझे जीवन धारण करीन. या शिल्लक असलेल्या दोन महिन्यानन्तर मी जिवन्त राहू शकत नाही. हे मी आपल्याला सत्याची शपथ घेऊन सांगत आहे. ॥६४ १/२॥
रावणेनोपरुद्धां मां निकृत्या पापकर्मणा ।
त्रातुमर्हसि वीर त्वं पातालादिव कौशिकीम् ॥ ६५ ॥
हे वीर ! पापाचारी रावणाने मला कैद करून ठेवले आहे. म्हणून राक्षसींच्या द्वारा शठतापूर्वक मला फार त्रास दिला जात आहे. जसा भगवान विष्णूने इन्द्राच्या लक्ष्मीचा पाताळातून उद्धार केला, त्याप्रकारे तुम्ही येथून माझा उद्धार करा. ॥६५॥
ततो वस्त्रगतं मुक्त्वा दिव्यं चूडामणिं शुभम् ।
प्रदेयो राघवायेति सीता हनुमते ददौ ॥ ६६ ॥
असे म्हणून सीतेने वस्त्रात बान्धलेला दिव्य सुन्दर चूडामणी गांठ सोडून बाहेर काढला आणि हा राघवास द्या; असे म्हणून तिने तो चूडामणी हनुमन्ताच्या हाती दिला. ॥६६॥
प्रतिगृह्य ततो वीरो मणिरत्‍नमनुत्तमम् ।
अङ्‌गुल्या योजयामास न ह्यस्य प्राभवद्‌ भुजः ॥। ६७ ॥
ते परम उत्तम मणिरत्‍न घेऊन हनुमन्ताने ते आपल्या बोटामध्ये घातले. त्यांची भुजा अत्यन्त सूक्ष्म असूनही त्या चूडामणिच्या छिद्रात गेली नाही. (यावरून असे दिसून येते की हनुमन्तानी आपले विशाल रूप दाखवून झाल्यावर परत सूक्ष्म रूप धारण केले होते.) ॥६७॥
मणिरत्‍नं कपिवरः प्रतिगृह्याभिवाद्य च ।
सीतां प्रदक्षिणं कृत्वा प्रणतः पार्श्वतः स्थितः ॥ ६८ ॥
ते मणिरत्‍न घेतल्यावर कपिवर हनुमन्तानी सीतेला प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घालून ते विनीतभावाने तिच्या समोर उभे राहिले. ॥६८॥
हर्षेण महता युक्तः सीतादर्शनजेन सः ।
हृदयेन गतो रामं लक्ष्मणं च सलक्षणम् ॥ ६९ ॥
सीतेचे दर्शन झाल्याने त्यांना महान हर्ष झाला होता. तो शरीराने तेथे असून मनाने मात्र भगवान श्रीराम आणि शुभलक्षणसंपन्न लक्ष्मणाच्या जवळ पोहोचला होता. (त्या दोघांचे चिन्तन करू लागला होता). ॥६९॥
मणिवरमुपगृह्य तं महार्हं
जनकनृपात्मजया धृतं प्रभावात् ।
गिरिवरपवनावधूतमुक्तः
सुखितमनाः प्रतिसंक्रमं प्रपेदे ॥ ७० ॥
राजा जनकाची कन्या सीता हिने आपल्या विशेष प्रभावाने ज्याला लपवून धारण करून ठेवले होते तो बहुमूल्य चूडामणी (मणिरत्‍न) घेऊन मनान्तल्या मनात हनुमान इतके हर्षित झाले की जणु एखाद्या पुरुषाला कुठल्या तरी श्रेष्ठ पर्वताच्या वरील भागातून निर्माण झालेल्या प्रबल वायुच्या वेगाने कंपित होऊन परत त्याच्या प्रभावातून मुक्त झाल्यावर जसा आनन्द होतो तसा त्यांना झाला. त्यानन्तर हनुमन्तानी तेथून परत फिरण्याची तयारी केली. ॥७०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे अष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP