॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय चौर्‍याहत्तरावा ॥
श्री शंकर - हनुमंत भेट -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामाचें निजचरित्र गहन । सांगतां सौमित्र विचक्षण ।
ऐकती जानकी सावधान । सर्वांगश्रवण करोनी ॥ १ ॥
धन्य श्रवणार्थीं सादर सीता । धन्य धन्य तो सौमित्र वक्ता ।
धन्य चरित्र रामकथा । अनागतवक्ता वाल्मीकी ॥ २ ॥
कलियुगीं धन्य जन ते । अखंड गाती रामचरित्रातें ।
धन्य धन्य ते सादर श्रोते । कथामृत सेविती ॥ ३ ॥
श्रवणद्वारें कथामृत । सेवितां अंतर निर्वृत ।
प्रकटोनियां रघुनाथ । उद्धरीत जडजीवां ॥ ४ ॥
श्रीरामाचें चरित्र गहन । क्रमें संपलें सेतुबंधन ।
पुढे रामेश्वराचे आख्यान । वर्णी कोण साकल्यें ॥ ५ ॥
अनंत कथा सेतुमाहात्म्यीं असती । तितुकी आकळावया कैंची मती ।
किंचित सांगेन कथासंगती । क्षमा श्रोतीं करावी ॥ ६ ॥
क्षमा करा म्हणावयालागीं । सामर्थ्य कैंचे माझ्या अंगीं ।
जनार्दनकृपा सत्संगीं । केलो जगीं पै सरता ॥ ७ ॥
तेणें एका एकपणा । पैठा जालों संतचरणां ।
तये धीटवेकरोनि जाणा । निःशंक विनवणा करीतसे ॥ ८ ॥


सेतुमाहात्म्यात आलेली रामेश्वराच्या निर्मितीची पूर्वकथा :


किष्किंधेहूनि श्रीरघुवीर । सवें वानरांचा भार ।
नामें गर्जती अपार । मुमु कार गोळांगुळी ॥ ९ ॥
भुभुःकार जयकारध्वनी । वानरांच्या उड्डाणकिराणीं ।
राम निघाला गजरेंकरोनी । खांदीं बैसोनी हनुमंताच्या ॥ १० ॥
हनुमंत झाला श्रीरामवाहन । मज अंगदें उचलोन । ?
खांदीं घेतलें प्रीति करून । आले ठाकून समुद्रतीरा ॥ ११ ॥
अपूर्व झालें तेये ठायीं । श्रीरामा शिवदर्शनाचा नेम पाहीं ।
समुद्रतीरीं तें नाहीं । न चले कांही सर्वथा ॥ १२ ॥
गुंती पडली फळआहारा । तटस्थ सर्वही वानरा ।
संमुख येती रघुवीरा । वाग्व्यापारा न करवे ॥ १३ ॥


शिवदर्शनावाचून रामांचे भोजनादि व्यवहार थांबले :


शिवदर्शनेंवीण जाण । श्रीराम न करी फळभोजन ।
गुंती पडली दारुण । कांही विंदाण चाळेना ॥ १४ ॥
जरी स्वयें आत्माराम । तरी स्थापावया भजनधंर्म ।
शिवदर्शनाचा नित्य नेम । अति नि सीम चालविता ॥ १५ ॥
सकळ तीर शोधितां पाहीं । प्रतिमालिंग न दिसे कांहीं ।
तेणें सचिंत होवोनि अवघेही । करणी काही चालेना ॥ १६ ॥
जरी स्वयें आत्माराम । तरी स्थापावा भजनधर्म ।
स्वयें करिताहे कर्म । पुरुषोत्तम आपण ॥ १७ ॥
सचिंत होवोनि अवघे । विचार करिती निजभावें ।
स्वतां युक्ती न संभवे । हें पुसों जावें श्रीरामा ॥ १८ ॥
कैसेनि होईल लिंगप्राप्ती । कोण उपाव कैशा स्थिती ।
हे न पुसतां रघुपती । आणीक युक्ती स्फुरेना ॥ १९ ॥


सर्वांची मारुतीला प्रार्थना :


पुसावया श्रीरघुनंदना । येवढी आंगवण कोणा ।
तुजवांचून वायुनंदना । आणिका वदन पै कैंचे ॥ २० ॥
मिळोनियां सकळ जुत्पती । विनविते झाले मारुती ।
आहारासीं पडली गुंती । विचार रघुपती पुसे वेगीं ॥ २१ ॥
ऐकोनियां तें वचन । पुढें झाला वायुनंदन ।
लोटांगणीं रघुनंदन । कर जोडून विनविला ॥ २२ ॥
ऐकें स्वामी रघुनाथा । अवघे वीर विचारितां ।
शिवलिंग नाहीं सर्वथा । त्यासी आतां काय करणें ॥ २३ ॥
खुंटल्या वानरांच्या युक्ती । बुद्धि न स्फुरे लिंगार्थी ।
स्वामी सांगती जया स्थितीं । त्याच रीतीं साधेल ॥ २४ ॥
गुरुमुखें तत्वतां । वस्तुनिश्चय दृढ न होतां ।
कोटि जन्म फेरे खातां । न पवे सर्वथा कल्पांतीं ॥ २५ ॥
ऐसें विनवितां हनुमंता । अति संतोष नाथा ।
हृदयी आलिंगोनि तत्वतां । होय सांगता लिंगप्राप्रि ॥ २६ ॥
सेतुबंधाची ख्याती । विस्तारावया त्रिजगतीं ।
जडजीवां उद्धारगती । करावया युक्ती योजिली ॥ २७ ॥
नाहीं वेदशास्त्रव्युत्पत्ती । गाठीं नाही तपःसंपत्ती ।
गंध नाहीं सत्संगती । त्यांसी गती कैसेनि ॥ २८ ॥
ऐसी पुढिलांची चिंता । उपजली श्रीरघुनाथा ।
तये कृपेस्तव तत्वतां । होय योजिता उपाव ॥ २९ ॥
अति प्रीतीं हनुमंताप्रती । सांगता होय रघुपती ।
अति कठिण लिंगप्राप्ती । दुर्गम स्थिति तयाची ॥ ३० ॥
स्थावर लिंगासी चळण । सर्वथा करों नये जाण ।
म्हणोनि मांडिलें कठिण । दुर्गम जाण लिंगप्राप्ति ॥ ३१ ॥


श्रीरामांनी शिवदर्शन घेऊन येतो असे म्हणताच सर्वजण भयभीत :


तुम्हीं समस्तीं रहावे येथें । मी जाईन शिवदर्शनातें ।
पूजोनिया सदाशिवातें । शीघ्र येथें येईन ॥ ३२ ॥
ऐकतां श्रीरामवचन । हनुमान झाला मूर्च्छापन्न ।
हातींचा गेलिया रघुनंदन । वृथा जीवोन भूमिभार ॥ ३३ ॥
कठिण ऐकतां वचनार्थ । सुग्रीवादि समस्त ।
वानर झाले मूर्च्छाभूत । मजही तेथ मूर्च्छा आली ॥ ३४ ॥
कांही न चले विवंचन । सकळ झाले मूर्च्छापन्न ।
तें देखोनियां रघुनंदन । स्वयें आपण कळवळला ॥ ३५ ॥
कुरवाळूनि अमृतहस्तीं । रामें उठविला मारुती ।
लिंगप्राप्तीसीं एक युक्ती । माझ्या चित्तीं स्कृरलीसे ॥ ३६ ॥
परी ते कष्ट तुम्हांसी । म्हणोनि शंका मानसीं ।
काल आणिलें सीताशुद्धीसी । अति कष्टेसीं रणमारें ॥ ३७ ॥
सवेंचि आजि दुसरें । संकट घालावे एकसरे ।
म्हणोनि सांगतां न सरे । मन घाबिरें होतसे ॥ ३८ ॥


रामाज्ञा पाळणे ही मारुतीची उत्कंठा :


ऐकोनियां तें वचन । हनुमान पाली लोटांगण ।
देह तुझे कृपेंकरून । वर्तत जाण श्रीरामा ॥ ३९ ॥
तुझिया नामस्मरणापुढें । संकट कायसें बापुडें ।
फोडून काळाचे दाभाडे । नामें माकडें अनिवारा ॥ ४० ॥
वैकुंठ कैलास सत्यलोक । पाटां वाटीनमृस्तुलोक ।
लिंगप्राप्तीलागीं देख । पाताळलोका भेदीन ॥ ४१ ॥
आज्ञा करितां रघुपती । जैशा रीतीं होय प्राप्ती ।
तैसी तैसी साधीन युक्ती । नामें मारुति गर्जत ॥ ४२ ॥
पाडून काळाचे दांत । ख्याती करीन त्रैलोक्यांत ।
आज्ञा करितां श्रीरघुनाथ । शोधीन समस्तब्रह्मांडा ॥ ४३ ॥
तुझे नामें रघुपती । कोण दुष्कर त्रिजगतीं ।
आज्ञा द्यावी शीघ्रगती । लिंगप्राप्ती होय कैसी ॥ ४४ ॥


मारूतीला काशीविश्वेश्वराचे माहात्म्य सांगतात :


ऐकोनियां तें वचन । संतोषला रघुनंदन ।
हृदयी धरिला आलिंगून । दुंर्लंध्य कोण तुज लागीं ॥ ४५ ॥
आनंदवन महाश्मशाना । अविमुक्त वाराणसीस्थान ।
मोक्षपुरींमध्ये मणि जाण । वेदपुराणसंमत ॥ ४६ ॥
तये काशीपुरीमाझारीं । कृपाळु राजा त्रिपुरारी ।
तारक ब्रह्माच्या निजगजरीं । जन उद्धरी चतुर्विध ॥ ४७ ॥
अंडज जारज स्वेदज पूर्ण । चौथे उद्‌भिज पैं जाण ।
तितुकें शिवकृपें करून । मोक्षसद्‍गन पावे ॥ ४८ ॥
महापापें हो कां पतित । देह ठेवितां काशी आंत ।
यमयातने देवोनि लात । नित्य निर्मुक्त स्वयें होती ॥ ४९ ॥
अगाध वाराणसीची थोरी । शिवें धरिली त्रिशूळावरी ।
लागली दिसताहे वसुंधरी । अलिप्त निर्धारीं धरेसीं ॥ ५० ॥
देव पदाभिमानें शिणले । ते मोक्ष पावावया वहिले ।
शंकरासी शरण गेले । धरणे केलें आनंदवनीं ॥ ५१ ॥
ब्रह्मा विष्णु मरूद्‌गण । लोकपाळेंसीं पाकशासन ।
सनकादिकसिद्ध जाण । ऋषिगण वसिष्ठादि ॥ ५२ ॥
यक्ष किन्नर सिद्ध चारण । वाराणसीचे किंकर जाण ।
शोभा कैलांसाहून गहन । वैकुंठ जाण पुढें सरेना ॥ ५३ ॥
क्षेत्रपाळांचें नित्य रक्षण । अहर्निशीं सावधान ।
विघ्नांसी प्रवेश तेथें कैसेन । दारुण शासन दंड पाणीचें ॥ ५४ ॥


काशीला जाऊन शंकरांना दंर्शनार्थ लिंग देण्याची
विनंती करण्यास श्रीराम हनुमंताला सांगतात :


येथें जावोनि आपण । सदाशिवासी लोटांगण ।
अति प्रीतीं घालोनि पूर्ण । माझें विनवण सांगावें ॥ ५५ ॥
सीताशुद्धीचे कार्यार्थ । साधावया श्रीरघुनाथ ।
वानरसैन्यासमवेत । आला त्वरितसमुद्रतीरा ॥ ५६ ॥
शिवदर्शनावीण तत्वतां । फळमूळ श्रीरघुनाथा ।
नाहीं घेणें सर्वथा । तरी पाहतां शिवलिंग न मिळे ॥ ५७ ॥
म्हणोनियां स्वामीप्रती । मज पाठविलें लिंगप्राप्ती ।
ऐसें सांगतां शिवाप्रती । लिंग निश्चित देईल ॥ ५८ ॥
ऐसे जरी योजेल । तरी लिंगप्राति होईल ।
अन्यथा श्रमचि उरेल । परी न होईल लिंगप्राप्ती ॥ ५९ ॥
ऐसें सांगतां रघुनाथा । आवेश आला हनुमंता ।
नमन करोनियां तत्वतां । होय विनविता श्रीराम । ॥ ६० ॥


हनुमंताची काशीस जाण्याची तत्परता :


तुझेनि प्रतापें रघुनाथा । कोणे पदार्थीं दुर्गमता ।
आम्हां नाहीं गा सर्वथा । जाईन आतां क्षणमात्रें ॥ ६१ ॥
कोणीकडे तें काशीपुर । मज सांगावें सत्वर ।
कृपा करोनि रघुवीर । आज्ञा सत्वर मज देई ॥ ६२ ॥
ऐकतां हनुम्याचें वचन । संतोषला रघुनंदन ।
अति-प्रीती आलिंगून । निजविवंचन सांगत ॥ ६३ ॥
येथोनि थेट उत्तरेसीं । विंध्याद्रीचे पैलदेशीं ।
अति विशाळ नगर काशी । तेथें विश्वेश्वरासी निवास ॥ ६४ ॥


मारुतीच्या आवेशपूर्ण उड्डाणाने चराचर आंदोळले :


अयोध्येचा निजप्रदेश । अंतर त्यासी योजनेवीस ।
ऐकतांच वानरेश । केलें सावेश उड्डाण ॥ ६५ ॥
नमन करितां तयेवेळीं । पिंजारल्या रोमावळी ।
मस्तक नेला मुंडपातळीं । विचित्र शैली नेत्रांची ॥ ६६ ॥
भुभुःकार देतां वानरें । बैसली काळांची दातेरें ।
दिग्गज झाले पै घाबरे । टाळी एकसरें बैसली ॥ ६७ ॥
ऐकतांचि भुभुःकारासी । धाकें शारें आलें मेघांसी ।
दांतखिली बैसली त्यांसी । गडगर्जनेसी विसरले ॥ ६८ ॥
वळोनि पुच्छाचा आंकोडा । उडतां आवेश माकडा ।
सागर खळबळिला गाढा । पडिला तडा पृथ्वीसीं ॥ ६९ ॥
जवळी होता रघुनाथ । म्हणोनि भ्याला अंगवात ।
तेणें वानर जीवें जीत । राहिले स्वस्थ रामबळें ॥ ७० ॥
वृक्षां लागतां तो वारा । वेगें उडाले अंबरा ।
भ्रमण करितां गरगरां । विस्मयो रघुवीरा उड्डाणे ॥ ७१ ॥
मागें सांडोनि चंद्र । गगना उसळला कपींद्र ।
लोकपतीचेंही नगर । अति सत्वर डावलिलें ॥ ७२ ॥
शेषाद्रि आणि श्रीशैलगिरी । किष्किंधाद्रि प्रस्रवणगिरी ।
मागें सांडोनियां सह्याद्री । ब्रह्मगिरी ओलांडिला ॥ ७३ ॥


मारुती काशीत येऊन रामनाम संकर्तिन
करीत विद्यनाथाच्या दर्शनार्थ निघाला :


विंध्याद्रिआदि सकळ गिरी । क्षणमात्रें कपिकेसरी ।
लंघोनियां झडकरी । काशीपुरी पावला ॥ ७४ ॥
रामनामाचे कल्लोळ । ऐकतां तटस्थ झाले रक्षपाळ ।
देखतांचि गोळांगुळा । आश्चर्य सकळ मानिती ॥ ७५ ॥
श्रीरामनाम ऐकतां । निषेध न करवे सर्वथा ।
सकळा झाली तटस्थता । कपि देखतां विस्मित ॥ ७६ ॥
पाहतां दिसे वानर । मुखी रामनामोच्चार ।
पराक्रमें महावीर । कालाग्निरुद्र दिसताहे ॥ ७७ ॥
आमुच्या स्वामीचें ध्येय जाण । याच्या मुखी त्याचें स्मरण ।
यासी निषेधितां आपण । शिव संपूर्ण क्षोभेल ॥ ७८ ॥
ऐसे जाणोनि समस्त । उगेच राहिले तटस्थ ।
हनुमान निघाला नगरांत । श्रीविश्वनाथदर्शना ॥ ७९ ॥


वाराणशीचे सौंदर्य वर्णन :


हाटवटिया चौबारे । सप्तखणांचीं दामोदरे ।
पंचप्रकारें विचित्रें । रचिली शंकरे त्रिशूळावरी ॥ ८० ॥
प्रतिराउळीं परिकरीं । कोठडिया बाह्यांतरीं ।
प्रतिहारिका नवनारी । निगमागम साचारीं द्वारे नव ॥ ८१ ॥
सुंदर उभवणी चिंतामणींची । घरीं दुभती कामधेनूंची ।
वनें उद्यानें कल्पतरूंचीं । शोभा नगरीचीं अनुपम ॥ ८२ ॥
तेथीचे जे निजजन । त्यां अखंड शंकराचें ध्यान ।
रुद्राक्षांचें आभरण । भस्मोद्‌धूलन सर्वांगी ॥ ८३ ॥
शिवनामाची मुद्रा सार । सुखरूपचि व्यवहार ।
शिवनामें निरंतर । गर्जती नर सर्वदा ॥ ८४ ॥
तेथे राजा श्रीशंकर । मथूनियां श्रुतिसागर ।
उपनिषद्‌वनीतसार । वेगवत्तर काढिलें ॥ ८५ ॥
तेंचि उपनिषद्‌नवनीत । बोधाग्नी करोनि तप्त ।
रामनाम सार घृत । परमामृत जीवांसीं ॥ ८६ ॥


पायं पायं श्रुतिचलकितं रामनामामृतं यद्-
ध्यायं ध्यायं मनसि सततं ब्रह्म तत्तारकाख्यम् ।
जापं जापं प्रकृतिविकृतौ प्राणिनां कर्णमूले
वीथ्यां वीथ्यामटति जटिल: कोपि काशीनिवासी ॥ १ ॥


श्री शिवशंकरांची रामप्रीती :


जटाधारी दिगंबर । उमाकांत कर्पूरगौर ।
काशीपुरीं श्रीशंकर । राजा निरंतर नांदत ॥ ८७ ॥
तेणें रामनाम परमामृत । श्रुतीच्या चुळी प्राशूनि प्रीतियुक्त ।
काशीच्या बिदोबिदीं धांवत । पुकारित डांगोरा ॥ ८८ ॥
श्रीराम परम कल्याण । पूर्णब्रह्म चैतन्यघन ।
माझें जीवींचें निज गुह्य पूर्ण । समाधान मज तेणें ॥ ८९ ॥
श्रीरामें जीवा जीवपण । श्रीरामें शिवा शिवपण ।
जीव:शिवांची बोळवण । चैतन्यघन श्रीराम ॥ ९० ॥
तें माझें निजगुह्य पूर्ण । निजकृपेंकरोन जाण ।
सांगतसे हाक फोडून । अति प्रीतीनें निजभक्तां ॥ ९१ ॥
प्रकृतित्यागाचे अंती । श्रवणीं उपदेशी एकांतीं ।
ब्रह्म तारक ज्यातें म्हणती । तें हे निश्चितीं रामनाम ॥ ९२ ॥
श्रवणद्वारें करितां प्राशन । चित्ताचें होय चैतन्यघन ।
मन तेचि उन्मन जाण । अहं तें सोहं संपूर्ण श्रीरामें ॥ ९३ ॥
बुद्धि तेंचि समाधिधन । इंद्रियांचें मोडलें भान ।
अनुभवितां पै चिद्धन । परिच्छिन्नपण मग कैचें ॥ ९४ ॥
एवढा उपदेशाचा बडिवार । देवचतुष्टयाचा संहार ।
वचनमात्रें साक्षात्कार । चिदचिन्मात्र स्वयें होणे ॥ ९५ ॥
कृमिकीटकपतंगादि पहाहो । काशीमाजीं सांडितां देहो ।
सांडोनियां देहभावो । परब्रह्म पहाहो स्वयें होती ॥ ९६ ॥
अगाध स्मरणाचा बडिवार । देखतांचि तो वानर ।
करितां रामनामाचा भुभुःकार । दर्शना सत्वर चालिला ॥ ९७ ॥
श्रीरामभजनीं अति आदर । नित्य सावधान शंकर ।
पळें पळें एकाकार । ध्यान निरंतर रामाचें ॥ ९८ ॥
बाप ध्यानाचा बडिवार । येरे वेधियेला येर ।
ध्यानबळें पै साचार । वर्ण सत्वर पालटले ॥ ९९ ॥
महादेव तमोगुण । मेघश्याम त्याचा वर्ण ।
श्रीरामाचें करितां ध्यान । झाला पूर्ण कर्पूरगौर ॥ १०० ॥
श्रीराम शुद्ध सत्वात्मक निर्मळ । तो शंकरध्यानें प्रबळ ।
मेघश्यामता अविकळ । बाणली तत्काळ श्रीरामा ॥ १०१ ॥


श्रीशंकरांचे स्वरूपवर्णन :


तैसा श्रीरामध्यानें प्रबळ । शिवगोक्षीरधामधवळ ।
पंचवक्त्र जटाविशाळ । दीप्ति प्रबळ त्रिनेत्रा ॥ १०२ ॥
दशमुजा अति विस्तीर्ण । श्मशानरजउधळण ।
सर्वांगीं पन्नगभूषण । त्याचेंही लक्षण अवधारीं ॥ १०३ ॥
विषयत्यागें जी साचार । सर्वेद्रियें निर्विकार ।
तेचि शिवाअंगीं अलंकार । अति परिकर शोभत ॥ १०४ ॥
निवडूनि अहं गजासुर । सोहं चर्म सनखाग्र ।
काढोनि प्रीतिपुरःसर । बहिर्वस्त्र प्रावरणा ॥ १०५ ॥
सिद्ध साधका नागवे पूर्ण । क्षणें नागवती तपोधन ।
तो निवटोनि क्रोधपंचानन । शांतिचर्म जाण काढिलें ॥ १०६ ॥
सबाह्मभ्यंतरी अढळ शांती । सनख चर्म निश्चितीं ।
तेंचि प्रावरण पशुपती । अंतरस्थिती अंतरवास ॥ १०७ ॥


श्रीशंकरांच्या दहा आयुष्यांचे रूपकात्मक वर्णन :


दशभुजांसीं परिकर । दशायुधें अति विचित्र ।
नांवें सांगेन सविस्तर । श्रोते सादर परिसोत ॥ १०८ ॥
त्रिगण त्रिपुर अति दारुण । त्यासी निवटितां संपूर्ण ।
बोधाचा त्रिशूळ जाण । अति तीक्ष्ण तिधारा ॥ १०९ ॥
मूळ वेद तोचि डमरु । अनुहताचा नाद गंभीरु ।
सात्विकाचे निज अंतरु । प्रीतिपुरःसरु जागवित ॥ ११० ॥
समूळ आशा छेदी सत्वर । द्वैतदळणी सतेज धार ।
असिलता मुष्टीसीं परिकर । सुरासुर कांपती ॥ १११ ॥
स्वानुभवाचे वोडण जाण । सर्वेद्रियीं सावधान ।
अन्य भासों नेदी भान । संरक्षण निजबळें ॥ ११२ ॥
आच्छादोनि स्वपक्षासी । शोधोनि निरासी द्वैतासी ।
वोडणखड्गांची कळा ऐसी । विपक्षासी उरों नेदी ॥ ११३ ॥
पाषांडी सैरा भरती रान । त्यांसी भक्तिपाशीं आकळून ।
स्वधर्मा आणोन पूर्ण । भावफरशें खंडन तर्कांचे ॥ ११४ ॥
सायुज्याचा मेढा संपूर्ण । अनुसंधानाचा तीश्ण बाण ।
निजसामर्ध्ये करोनि जाण । करीत कंदन अनंगाचें ॥ ११५ ॥
प्रमादें अधःपातासी । जातां कृपेच्या अंकुशासीं ।
ओढून आणी निजपदासी । छेदी दोषांसी खट्वांगें ॥ ११६ ॥
मनोहर दिगंबरशैली । अर्धांगीं शैलबाळी ।
नंदिकेश्वर दृष्टीतळीं । मेढा वळी आसनस्थ ॥ ११७ ॥
चंडीशादि भृंगी बाण । सकळां मुख्य गजवदन ।
महाविध्नांचें निवारण । नामस्मरण केलिया ॥ ११८ ॥


श्रीशिवशंकर -हनुमंताची भेट :


ऐसें देखतां हनुमंतासी । आल्हाद झाला निजमानसीं ।
गर्जोनियां जयजयकारासी । लोटांगणासी घातलें ॥ ११९ ॥
शिवें जाणोनि निजव्रत । उठोनि आलिंगिला हनुमंत ।
होय साचार रामदूत । हद्‌गत सर्व कळलें तें ॥ १२० ॥
माझा स्वामी रघुनाथ । तेणें पाठविला दूत ।
म्हणोनि आलिंगिला हनुमंत । प्रेमा अद्‌भुत श्रीरामीं ॥ १२१ ॥
हनुमान सहज श्रीरामभक्त । शंकरा सबाह्य रघुनाथ ।
दोघांही प्रेम अद्‌भुत । दोघेही मूर्च्छित पडियेले ॥ १२२ ॥
हनुमान रुद्राचा अवतार । स्वयें तोचि श्रीशंकर ।
उभयध्येय श्रीरामचंद्र । रूपें साचार अद्वय ॥ १२३ ॥
आपआपणां खेव पडिलें । आपुलेनि सुखें सुखावले ।
आपआपणा विसरले । बुडोनि गेले निजरूपीं ॥ १२४ ॥
गूळ भेटे गोडीसीं । दीप आलिंगी प्रभेसीं ।
कनकाअंगीं कांती जैसी । भेटी तैसी दोघांसी ॥ १२५ ॥
येरयेरां विसरले । गणसमुदाय तटस्थ ठेले ।
कोणी कोणासी न बोले । अवघे राहिले चित्ररूप ॥ १२६ ॥
देखोनियां निजचिन्ह । गिळून समाधि उत्थान ।
शंकर नित्य सावधान । प्रभावेंकरून रामाच्या ॥ १२७ ॥


श्रीशंकरांनी मारुतीचा सत्कार करून, येण्याचे कारण विचारले :


तेणें चेतविली चेतना । सावध केलें वायुनंदना ।
करोनियां पूजाविधाना । विवंचना होय पूसता ॥ १२८ ॥
कोठोनि येणें जालें स्वामी । कवण देश कवण भूमी ।
कवण तुमचा निजस्वामी । कवणे हेतू तुम्हीं बीजे केलें ॥ १२९ ॥
तनु दिसताहे वानर । मुखीं रामनामोच्चार ।
तुम्ही वनचर तो परात्पर । केंवी उच्चार नामाचा ॥ १३० ॥


हनुमंताने श्रीरामकार्याचा पूर्ववृत्तांत निवेदन केला :


ऐकती श्रीशंकरवचन । हनुमान पाली लोटांगण ।
माथां वंदोनि आज्ञापन । यथामति जाण सांगत ॥ १३१ ॥
जो सृष्टीपूर्वी सनातन । सृष्टिरूपें जो आपण ।
सुष्टीच्या अवसानीं अनवच्छिन्न । उरे परिपूर्ण अद्वय ॥ १३२ ॥
जो नामरूपातीत । पूर्णब्रह्म सदोदित ।
तोचि झाला मूर्तिमंत । निजभक्तकैवारा ॥ १३३ ॥
पौलस्तीचा रावण । लंकापति दारुण ।
राक्षसी तनु उन्मत्त पूर्ण । बंदी सुरगण घातले ॥ १३४ ॥
विरोध केला सकळांसी । उच्छेदिलें गोब्राह्मणांसी ।
पीडों आदरिलें अवनीसी । शरण रामासीं ते आली ॥ १३५ ॥
जो सच्चिदानंदघन । जो अरूप अपार निर्गुण ।
ज्यातें ध्याती योगिजन । त्याचें अभिधान श्रीराम ॥ १३६ ॥
जो सच्चिदानंदघन दुर्गम । ज्यासीं निजरूपीं आराम ।
ज्ञानरूप ज्ञानगम्य । त्यातें श्रीराम बोलती ॥ १३७ ॥
तो भक्तकामकल्पद्रुम । नियत करोनि वैकुंठधाम ।
नांदतसे आत्माराम । अविश्रम समेसहित ॥ १३८ ॥
मिळोनियां सुरगण । त्यासीं आले अनन्य शरण ।
सकळां अपराधी रावण । त्याचें निर्दळण करावया ॥ १३९ ॥
अत्यंत भाकितां करुणा । कृपा उपजली रघुनंदना ।
आश्वासिलें सुरगणां । वध रावण मी करीन ॥ १४० ॥
तुम्हीं सकळ सुरवर । रूपे व्हावें वानर ।
मूळमाया कलहसूत्र । जानकी सत्वर होईल ॥ १४१ ॥
मी स्वयें सूर्यवंशाप्रती । नामें श्रीराम दाशरथी ।
अवतरेन शीघगतीं । निमेषगतीं न लागतां ॥ १४२ ॥
रावण करील सीताहरण । तोचि अपराध ठेवोनि जाण ।
क्षणें निवटीन रावण । ऐकतां वचन सर्व सुखमय ॥ १४३ ॥
जो व्यक्ताव्यक्तातीता । पूर्णब्रह्म सदोदित ।
तो अवतरला रघुनाथ । सूर्यवंशात दाशरथी ॥ १४४ ॥
पितृआज्ञेकरोनि जाण । दंडकारण्या वनप्रयाण ।
तेथें त्रिशिग खर दूषण । विंधोनि बाण निवटिले ॥ १४५ ॥
मुक्त करोनि जनस्थान । श्रीरामें द्विजां दिधलें दान ।
तेणें तळमळिला रावण । करोनि छळण सीता नेली ॥ १४६ ॥
श्रीरामाचे दृष्टी पडता । तरी क्षणें निवटिता लंकानाथा ।
संन्यासिरूपें परोक्षता । चोरोनि सीता पै नेली ॥ १४७ ॥
श्रीरामापासीं दुर्धर बाण । परंतु एकला न मारीच रावण ।
करावें सकळनिर्दळण । म्हणोनि प्राण राखिले ॥ १४८ ॥
दर्भशिखेभेणें देखा । काक हिंडविला तिहीं लोकां ।
तेथें मारितां दशमुखा । रघुकुळटिळका काय नवल ॥ १४९ ॥
मारिलिया लंकानाथ । सकळ खंडेल वनवासव्रत ।
म्हणोनि राखिला हात । बहुत कार्यार्थ वनवासी ॥ १५० ॥
सीताशुद्धीचेनि मिषें जाण । सकळ उद्धरावें दंडकारण्य ।
म्हणोनि चालिला रघुनंदन । जगदुद्धरण करावया ॥ १५१ ॥
जटायु उद्धरिला पक्षी । वनस्पति अनेकी ।
गुल्युलता सकळिकी । तृणपाषाण शेखीं उद्धरिले ॥ १५२ ॥
शरभंग आणि शबरी पहाहो । रामें उद्धरिला ऋषिसमुदावो ।
ब्रह्मराक्षसांचा क्रूर भावो । तेही रामरावो उद्धरी ॥ १५३ ॥
सीतेचेनि स्पर्शें विराध । त्याचा श्रीरामें केला वध ।
ताटिका संकळमार्गरोध । करोनी वध उद्धरिली ॥ १५४ ॥
पायीं उद्धरिली शिळा । गुरूचा याग सिद्धी नेला ।
हनुमान सांगतां भुलला । जाश्वनीळा देखूनी ॥ १५५ ॥
जो राम तोचि शकर । तेणें हनुमत प्रेमा थोर ।
सांगता विसरला चरित्र । पूर्वापर नाठवेचि ॥ १५६ ॥
स्वस्थ करोनियां चित्ता । सिंहावलोकनें रामकथा ।
सांगतां उल्लास हनुमंता । होय सांगता मागुतेनि ॥ १५७ ॥
तुझें चाप त्रिपुरारी । भार्गवें ठेविलें जनकमंदिरीं ।
जानकीच्या स्वयंवरीं । पण निर्धारीं हाचि राया ॥ १५८ ॥
भार्गाव आज्ञेकरोनि पहाहो । स्वयंवर मांडी जनकरावो ।
मूळें पाठविलीं पहा वो । दिग्मंडळीचें रावभूपाळां ॥ १५९ ॥
स्वयंवर मांडिलें कोडें । पणास चाप आणविलें पुढें ।
ज्याचेनि हातें यासीं गुण चढे । जानकी रोकडे वरील त्यासी ॥ १६० ॥
विश्वामित्राची प्रीति थोरी । जनक त्यासी मूळ करी ।
तोही पातला झडकरी । समयासारी ठाकोनी ॥ १६१ ॥
परिवारला ऋषिगणीं । शिष्यवर्गाची मांडणी ।
त्यांमाजी बंधु हे दोन्ही । राम आणि सौमित्र ॥ १६२ ॥
तेथें पातला रावण । गर्वनिधी अतिदारुण ।
पुसोनि धनुष्याचा पण । स्वयें आपण सज्जूं पाहे ॥ १६३ ॥
आणविली नोवरी । गजस्कंधी सालंकारीं ।
देखतां विस्मयसुखकरी । रावण धरी अभिलाष ॥ १६४ ॥
खेचर भूचर विखार । जानकीवरणीं तत्पर ।
रावण दुरात्मा दुराचार । विषयबुद्धीं पामर अभिलाषी ॥ १६५ ॥
जानकीभांगींचा वहिला । शेंदुरचर्चित तीक्ष्ण भाला ।
रावणहृदयीं खोंचला । तेणें तो झाला विव्हळ ॥ १६६ ॥
विश्वार्चित विश्वमाता । विषयबुद्धीं अभिलान्नितां ।
दुर्दशा आली लंकानाथा । भ्रम तत्वतां चढिन्नला ६७ ॥
भ्रमाचे मदें जाण । चापीं चढवूं जाय गुण ।
तेणें क्षोभला त्रिनयन । विपरीत चिन्ह पैं झालें ॥ १६८ ॥
माथा राहिला तळवटीं । तळ धरिला वरिले मुष्टी ।
कोपें क्षोभला धूर्जटी । गर्वे दृष्टी अंध झाली ॥ १६९ ॥
अभिलाषितां विश्वमाता । विमुख झाली इंद्रियदेवता ।
धनुष्य बळें फिरवूं जातां । पडिलें तत्वतां उरावरी ॥ १७० ॥
चंद्री लागली नेत्रीं विसी । खरसी आली दशमुखांसी ।
प्राण रोधिला कंठदेशीं । दुःख कोणासी न सांगवे ॥ १७१ ॥
कृपाळु जनक चक्रवर्ती । तेणें काढविलें शीघगतीं ।
उठवोनि लंकापती । उदक सिंपिती मुखावरी ॥ १७२ ॥
दुर्दशा देखोनि लंकापती । राजे माथा तळीं करिती ।
अभिलाषितां सीतासती । घात निश्चितीं दिसतसे ॥ १७३ ॥
रायांकडे पाहे नृपती । तंव ते माथा नुधविती ।
तेणें उद्वेगला भूपती । वीर निश्चितीं दिसेना ॥ १७४ ॥
निर्वीर हें उर्वीतळ । ऐसें बोलतां भूपाळ ।
आवेशला घननीळ । स्फुरण प्रबळ चालिले ॥ १७५ ॥
बाहु थरकती आवेशीं । रोम उभारिले वेगेंसीं ।
आला पुसोनि गुरूसी । होय धनुष्यासी उचलितां ॥ १७६ ॥
आधींच शिवहस्तें पुनीत । वरी धरिता झाला रघुनाथ ।
तेणें होवोनि कृतार्थ । जीवन्मुक्त पै झालें ॥ १७७ ॥
हातीं धरोनि रघुनंदन । धनुष्या चढवितां गुण ।
स्वयें मोडले कडकडोन । नादें त्रिभुवन गर्जिन्नलें ॥ १७८ ॥
संतोष झाला सकळां । कुढाविलें भूपाळा ।
जनक स्वयें संतोषला । जनकबाळा आनंदली ॥ १७९ ॥
गज पेलोनि पुढारां । माळ घातली रघुवीरा ।
आनंद झाला सुरवरां । सुमनसंभारा वर्षती ॥ १८० ॥
जनकनंदिनी साधोन । विजयी झाला रघुनंदन ।
तें देखतांचि रावण । हदयीं बाण खोंचला ॥ १८१ ॥
झाला अत्यंत लजायमाना । नुघडीच काळें वदना ।
अधोवदनें केलें गमन । हृदयी बाण खोंचलें ॥ १८२ ॥
तें देखोनि संतापला । रावणा संनिपात झाला ।
कामाभिलाषें भुलला । बरळों लागला सीते सीते ॥ १८३ ॥
तिये देखोनि अहर्निशीं । आधि लागली रावणासी ।
आले ऐकोनि पंचवटीसीं । करी कपटासी साक्षेपें ॥ १८४ ॥
निजमातुळा मारीचासीं । मृगवेष देवोनि त्यासी ।
सीता त्वचा मागे कंचुकीसीं । श्रीराम त्यासी मारूं गेला ॥ १८५ ॥
सौमित्र गेला श्रीरामापासीं । सीता एकली गुंफेसीं ।
रावण येवोनि संन्यासवेषीं । बळें जानकीसीं घेवोनि गेला ॥ १८६ ॥
जानकहिरणादि वृत्तांत । सांगीतला कबंधवधपर्यंत ।
पुढें वाळीचा केला निःपात । तोही वृत्तांत अवधारीं ॥ १८७ ॥
वाळी सुग्रीव बंधु वानर । राज्यलोभें दोघां वैर ।
सुग्रीवाची हरोनि दार । राज्यभ्रष्ट पैं केला ॥ १८८ ॥
स्त्रीराज्याचेनि दुःखे देखा । शरण आला रघुकुळटिळका ।
पावला देखोनि अति दुःखा । कृपापीयूखीं शिंपिलें ॥ १८९ ॥
विलग मरण वाळीचें । विषम ताल कूर्मपृष्ठींचे ।
छेदिलिया मरण त्याचें । ऐसें वरदाचें महिमान ॥ १९० ॥
तितुके छेदोनि राघवें । वाळी निवटिला बाणलाघवें ।
सुग्रीव स्वदारेंशीं राज्यपावे । कृपावैभवें रामाच्या ॥ १९१ ॥
तेणें झाला कृतोपकारा । ससैन्य सुग्रीव वीर ।
झालों श्रीरामाचे किंकर । हनुमान वीर नाम माझें ॥ १९२ ॥
तेथोनि सीताशुद्धिविचार । युवराज वाळिकुमर ।
पाठविला अंगद वीर । सवें वानर देवोनी ॥ १९३ ॥
वेगीं शुद्धि आणिली तिहीं । मग चालिले लवलाहीं ।
समुद्रतीरा येवोनि पाही । उपाय कांही योजिला ॥ १९४ ॥
काढोनियां अग्निबाण । सागर शोषावा संपूर्ण ।
चरणचालीं वानरगण । समुद्र लंघन करावया १९५ ॥
म्हणोनि क्षोभला श्रीरघुवीर । तंवशरण आला सागर ।
सेतुबंधनप्रकार । सविस्तर सांगितला ॥ १९६ ॥
शिळीं बांधला सेत । ऐकतां सुखावे रधुनाथा ।
वानरीं आणोनि पर्वत । निमेषें सेतु बांधिला ॥ १९७ ॥
पुढेंकरोनियां फळहार । उतरावया परपार ।
शिवपूजेलागी सादर । श्रीरघुवीर पै झाला ॥ १९८ ॥


शिवलिंगदर्शन न झाल्यामुळे राम भोजनाविण खोळंबले आहेत :


मारुती: शोधितां उभय तीरांतें । स्थावर लिंग न दिसे तेथें ।
अवघी झालीं सचिंतें । राम फळहारातें नेघे ॥ १९९ ॥
शिवदर्शनालागीं जाण । श्रीराम करूं पाहे गमन ।
तेणें गजबजिले वानरगण । वचनें प्राण जाऊं पाहो ॥ २०० ॥
सुग्रीवादि सकळ वानरगण । शरणागत बिभीषण ।
घालोनिया लोटांगण । रघुनंदन प्रार्थिला ॥ २०१ ॥
कोणेपरी लिंगप्राप्ती । होय ते सांगावी स्थिती ।
उपाय योजूं तदर्थी । कृपामूर्ती श्रीरामा ॥ २०२ ॥


श्रीरामांनीच मला तुमच्या भेटीसाठीं पाठवलें आहे मारुती :


तेणें कळवळोनि मानसीं । सांगीतलें उपायासी ।
जावोनियां वाराणसीसी । विश्वेश्वरासी भेटाचे ॥ २०३ ॥
होवोनियां वानरवेषी । भाग्य उद्‌भट आम्हांसी ।
श्रीरामसेवा आली फळासी । शिवचरणासी पावलां ॥ २०४ ॥
फळहारालागीं रघुनाथ । बैसला असे तिष्ठत ।
विचारोनियां कार्यार्थ । आज्ञा त्वरित मज द्यावी ॥ २०५ ॥
म्हणोनि घाली लोटांगणा । शीघ्र करावी सूचना ।
विलंब करितां नये जाणा । रघुनंदन जाणा तिष्ठत ॥ २०६ ॥


रामकथा श्रवणाने शिवपार्वती आनंदरूप झाले :


ऐकानि तें वचन । संतोषला त्रिनयन ।
आलिंगोनि वायुनंदन । प्रीती करोन पूजिला ॥ २०७ ॥
नित्य करीत ज्याचें स्मरण । आला देखोनि त्याचा गण ।
आनद उथळला पूर्ण । उचलोन नाचत ॥ २०८ ॥
विसरोनि देहभावासी । नाचतां देखोनि शंकरासी ।
हर्ष दाटला गणांसी । ते प्रीतीसीं नाचती ॥ २०९ ॥
प्रेम उथळलें उमेसीं । तेही नाचो लागली कैसी ।
विसरोनि देहभावासी । उल्लासेंसीं नाचत ॥ २१० ॥
गणांसी नाठवे गणपण । उमा विसरली उमापण ।
शिव भुलला शिवपण । रघुनंदन निजनामें ॥ २११ ॥
अगाध स्थिती सदाशिवाची । अगाध प्रीति पार्वतीची ।
अगाध भक्ति हनुमंताची । कीर्ति रामाची वानितां ॥ २१२ ॥
एका शरण जनार्दनासी । तिघे विसरले तीनपणासी ।
अद्वैतबोधें झाली पिसीं । एकत्वेंसीं डुल्लत ॥ २१३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतशंकरदर्शनं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः ॥ ७४ ॥
ओंव्या २१३ ॥ श्लोक ॥ १ ॥ एवं ॥ २१४ ॥


GO TOP