॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय विसावा ॥
श्रीराम-सीता विवाह

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामाविषयी सीतेची उत्कंठा :

श्रीरामाचे पूर्णपण । रूपरेखागुणलावण्य ।
देखोनि सीतेचें वेधलें मन । सर्वथा आन नावडे ॥ १ ॥
सांडोनियां चम्द्रामृत । चकोर अन्य न सेवित ।
तेंवी सांडूनि रघुनाथ । सीतेचें चित्त आन न मानी ॥ २ ॥
जनकें देखोनियां रघुनाथ । चित्तीं आल्हाद अत्यंत ।
जानकी द्यावी निश्चितार्थ । साशंकित धनुष्यार्थीं ॥ ३ ॥

श्रीरामांना पाहून सभाजनांची अनेकविध अवस्था :

सभास्थियांचे नयन । रामरूपीं अति निमग्न ।
रावनासी पडलें मोहन । तटस्थ जन श्रीरामें ॥ ४ ॥
श्रीराम देखोनि ऋषिपंक्तीं । अवघे आश्चर्य मानिती ।
सीता द्यावी रघुपतिप्रती । मानलें चित्तीं सर्वांसी ॥ ५ ॥
पुढील कार्य अति कढीण । केंवी धनुष्यासी वाहील गुण ।
कळवळती सकळ जन । चाप बंधन लग्नासी ॥ ६ ॥
सत्य सीतेचा भावार्थ । राम अंतर्यामी समर्थ ।
करावया सकळांचे मनोगत । चापभंगार्थ चालिला ॥ ७ ॥
मागें ठेवोनि लक्ष्मण । राम चालिला सत्राण ।
देखोनि दचकला रावण । हा धनुष्य गुण वाहील ॥ ८ ॥
हा तंव दिसताहे बाळक । याचा पराक्रम अलोलिक ।
घायें मारीचास लाविली शीक । मारिला निःशेष सुबाहू ॥ ९ ॥
म्लान देखोनि दशवक्त्रा । उल्लास थोर विश्वामित्रा ।
वेगु करीं रामचम्द्रा । धनुर्धरां लाजवीं ॥ १० ॥

उपस्थितांना वंदन करून राम धनुष्याकडे जातात :

तेणें हरिखला रघुनंदन । विश्वामित्रा केले नमन ।
द्विजांचे घेवोनि आशीर्वचन । दिधला सन्मान सभेसी ॥ ११ ॥
जनक अतिशयें सज्जन । रामे< त्यासी केलें नमन ।
बाहूंसी आलें स्फुरण । चापग्रहण करावया ॥ १२ ॥
हेळसोनि सभा समस्त । मी एक सामर्थ्ये समर्थ ।
रावणाऐसा अति गर्वार्थ । श्रीरघुनाथ न करीतसे ॥ १३ ॥
देवोनि सकळांसी सन्मान । वृद्धवृद्धां करोनि नमन ।
अति विनीत रघुनंदन चापग्रहण करूं आला ॥ १४ ॥

धनुष्याची तपस्या :

धनुष्यीं अत्यंत जडपण । तेंही सांगेन मी निरूपण ।
श्रोतीं द्यावें अवधान । पूर्वलक्षणपर्यावो ॥ १५ ॥
चाप सदाशिवाचे हातीं । त्यासी जडत्वा शिवशक्ती ।
चापें चापजडत्वप्राप्ती । जे बोलती ते महापापी ॥ १६ ॥
चाप अति दुष्ट निर्दळी । तें पाप नये चापाजवळी ।
शिवरामनामे पाप जाळी । मग निर्दळी दुष्टातें ॥ १७ ॥
चापें केले बहुत तप व्रत । म्हणोनि पावलें शिवाचा हात ।
शिवहस्तें अति पुनीत । यालागीं रघुनाथ हातीं धरी ॥ १८ ॥
शिवाचें शिवचाप अपूर्व । तें केवीं उचलूं शकती जीव ।
तेथें अधिष्ठानें वसे शिव । चापीं जडभाव शिवशक्तीं ॥ १९ ॥
शास्त्रमर्यादा ते ऐसी । जो जड तोचि पापराशी ।
ते जडत्व नाहीं चापासी । धन्यत्व त्यासी शिवशक्तीं ॥ २० ॥
धनुष्य उचलितां रावण । चापीं प्रवेशे त्रिनयन ।
तेणें तो अपमानिला पूर्ण । चापी जडपण शिवशक्तीं ॥ २१ ॥
कोदंडाचा निजभावार्थ । शिवहस्तें मी अति पुनीत ।
श्रीरामहस्तें परममुक्त । होईन निश्चित स्वयंवरीं ॥ २२ ॥
राम सदा शिवातें ध्याय । शिव वंदी श्रीरामपाय ।
तेणें चापाचें जडत्व जाय । पुष्पप्राय तें जालें ॥ २३ ॥
असो हे धनुष्याची कथा । स्वयंवरीं वरावी सीता ।
हेंचि कार्य रघुनाथा । तत्कार्यार्था चाप पाहे ॥ २४ ॥

एका दृष्टिक्षेपात धनुष्याच्या शक्तीचे श्रीरामाकडून हरण :

रामें अवलोकितां चाप । चाप जालें निष्पाप ।
हरला जडजाड्यसंताप । स्वयें सुखरूप उचललें ॥ २५ ॥
श्रीराम पाहे जयाकडे । त्याचे आकल्प जडत्व उडे ।
तेथें काय धनुष्य बापुडें । जडत्व पुढें उरावया ॥ २६ ॥
श्रीराम म्हणतां वाचे । जड संसार तरती साचे ।
दर्शन जालिया त्या रामाचें । जडत्व कैचें धनुष्यासी ॥ २७ ॥
चापासी उपजे अनुताप । ऐसा श्रीरामप्रताप ।
अनुतापें जडत्व गेलें पाप । रामें सकृप पाहिलें ॥ २९ ॥
यापरी श्रीरघुनाथें । अवलोकोनि धनुष्यातें ।
आकळिलें वामहस्तें । सज्ज त्वरितें करावया ॥ ३० ॥

विश्वामित्रस्तु धर्मात्मा श्रुत्वा जनकभाषितम् ।
अभ्यभाषत काकुत्स्थं प्रहृष्टेनांतरात्मना ॥ १ ॥

श्रीरामांची कुमारावस्था पाहून जनक साशंक :

धनुष्य श्रीरामें धरितां हातीं । थोर आशंका जनकाचे चित्तीं ।
तो येवोनि मुनीप्रती । अति काकुळती बोलत ॥ ३१ ॥
राजा म्हणे महाऋषी । राम सौकुमार्याची राशी ।
जेणें घोळशिलें रावणासी । तें चाप यासी केंवे सज्जे ॥ ३२ ॥

विश्वामित्रांचे जनकाला आश्वासन :

ऐकतां रायाचें शंकावचन । विश्वामित्र निःशंक पूर्ण ।
काय बोलिला गर्जोन । सभेचे जन ऐकतां ॥ ३३ ॥
ऐकें बापा रघुनंदना । पुरुषामाजीं पंचानना ।
धनुष्य चढवीं आंगवणा । सावधाना निजवृत्तीं ॥ ३४ ॥
तूं तंव पुरुषार्थीं रघुनाथ । धनुष्य वाहावें निमेषार्धांत ।
जनकजानकींचा मनोरथ । कृतकार्यार्थ करावा ॥ ३५ ॥

श्रीरामाचा आत्मविश्वास :

ऐकोनि सद्‌गुरूचें वचन । धनुष्य पाहे रघुनंदन ।
वामहस्तें आकळून । चढवावया गुन सज्ज जाला ॥ ३६ ॥
राम म्हणे ऋषीप्रती । तुझिया वचनें कृपाप्राप्ती ।
धनुष्य वाहणें कार्य किती । वृथा कुंथती नरवीर्य ॥ ३७ ॥
हे शंकराचें दिव्य चाप । गुण वाहणे कार्य अल्प ।
आतां पहा माझा प्रताप । करीन आरोपण शराकर्षणेंसीं ॥ ३८ ॥

बाढमित्यब्रवीत् राजा मुनिश्च समभाषत ।
लीलया स धनुर्मध्ये जग्राह वचनान् मुनेः ॥ २ ॥
पश्यतां न्रुसहस्राणां बहूनां रघुनंदनः ।
आरोपयत्स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः ॥ ३ ॥

ऐसें बोलता रामचंद्र । हर्षें उल्लासे विश्वामित्र ।
म्हणे धन्य धन्य तुझें वक्त्र । तूं प्रतापसमुद्र रविवंशी ॥ ३९ ॥

श्रीरामांनी एका हातानेच धनुष्य उचलले :

तुझिया वचनासाठी । मज दिधलिया अयुतकोटी ।
म्हणोनियां पाठी थापटीं । धनुष्य मुष्टीं आकर्षीं ॥ ४० ॥
जनक म्हणे रघुनाथा । मजही ऐसा भ्रम होता ।
हरधनुष्य आकळिता । वीर सर्वथा असेना ॥ ४१ ॥
तो त्वां वाढिवेचा माथां । उजळ केला सभेदेखतां ।
किती वानूं पैं पुरुषार्था । धन्य रघुनाथा वाढिव ॥ ४२ ॥
बोलिलासी प्रताप गरिमा । ते सत्य करावी श्रीरामा ।
संपादीं शीघ्र चापकर्मा । पुरुषोत्तमा रघुवीरा ॥ ४३ ॥
गुरुश्वशुर उभयवचन । ऐकोनियां रघुनंदन ।
धनुष्यीं वाहावया गुण । चाप संपूर्ण आकळिले ॥ ४४ ॥
अति अतुर्बळी रघुनाथ । न लावितां दुसरा हात ।
एकेंचि हातें वाहिलें शीत । जालें विस्मित सुरासुर ॥ ४५ ॥
चाप टणत्कारितां करतळीं । नांदे रावणा दांतखिळी ।
राजे मूर्छित भूतळें । बैसली टाळीं दिग्गजांची ॥ ४६ ॥
धनुष्य ओढितां पूर्ण कानाडी । अति कडाडीं भंगलें ॥ ४७ ॥

धनुर्भंगाच्या प्रचंड आवाजानें भयावह परिणाम :

नादाचेनि घन घर्घरारीं । बैसलीं वीरांची दांतेरी ।
कीरकरोनि वाजिकुंजरीं । उभीं शरीरें उलंडलीं ॥ ४८ ॥
धनुर्भंगाचे कडकडाटी । नादें दुमदुमिली सृष्टी ।
तडा पडूं पाहे मेरुपृष्टीं । निमटे दृष्टी काळाची ॥ ४९ ॥
कोटिविजू तुटोनि पडे । चाप कडाडी तेणें पाडें ।
सुर नर किन्नर जाले वेडे । वायु उडे तेणें नादें ॥ ५० ॥
नादाचिये अत्यंत प्रौढी । पृथ्वी गेली चिरढोविरढी ।
नभीं नक्षत्रां पातझाडी । पदिलीं बुदीं डळमळिता ॥ ५१ ॥
उद्‌भट नादाची गति कैसी । पक्शी विसरले पळावयासी ।
भ्रमें भ्रमती ते आकाशीं । गति सर्वांची खुंतली ॥ ५२ ॥
काळें प्राण्यांचा घ्यावा प्राण । काळ् पळाला नादाभेणें ।
आतां येथें मारिता कोण । काळा आकर्षण श्रीरामें ॥ ५३ ॥
ऐसी दडपलीं सप्त पाताळें । उचंबळलीं समुद्रजळें ।
शेषशयन पैं आंदोळे । मेरु कुळाचळें पैं कांपती ॥ ५५ ॥
दिवि कंप भूमिकंप । सत्यलोकीं चळकांप ।
रामें भंगिलें शिवचाप । अति प्रताप तिहीं लोकीं ॥ ५६ ॥
जनक आणि विश्वामित्र । राम आणि सुमित्र ।
यांचेचि सावधान नेत्र । येर सर्व मूर्छित ॥ ५७ ॥
या चौघांही वेगळी । सावधान पाहे जनकबाळी ।
देखोनि रामप्रताप बळी । उताविळी वरावया ॥ ५८ ॥
शिवचापाचें मनोगत । रामहस्तें मी परम मुक्त ।
कडकडाट नव्हे व्यर्थ । चाप गर्जन स्वानंदें ॥ ५९ ॥
आनंदनाद अति उद्भ्ट । नादें दुमदुमिलें वैकुंठ ।
तेणें कोंदलें कैलासपीठ । नादें नीळकंठ डुल्लत ॥ ६० ॥
चापनिर्मुक्त आनंदगहिंवर । तेणें उलथला क्षीरसागर ।
शेषशयना आनंद फार । स्वर्गीं जयजयकार देवांचा ॥ ६१ ॥
रापप्रताप आनंदद्वारा । अकार उकार मकारा ।
आनंद कोंदला अर्धमात्रा । राया रघुवीरप्रतापें ॥ ६२ ॥
लागतां श्रीरामाचा हस्त । शिवचाप झाले परम मुक्त ।
तोही मुक्तीचा अर्थ । श्रीरघुनाथप्रतापें ॥ ६३ ॥
लागतां श्रीरामाचें चरण । सद्यःमुक्त होती पाषाण ।
त्याचेनि हस्तें चापग्रहण । मुक्ति संपूर्ण श्रीरामें ॥ ६४ ॥
शिवचापा परम मुक्ती । जनकसंशया विनिर्मुक्ती ।
जानकीलोचना नित्यतृप्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरी ॥ ६६ ॥
रावण गर्वाची निर्मुक्ती । आशापाशनिःशेषनिवृत्ति ।
राजाभिमाना नित्यमुक्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरीं ॥ ६७ ॥
वेदानुवादा वचनामुक्ती । शास्त्रानुवादा युक्तिप्रयुक्ती ।
जानकीलोचन दृश्यनिर्मुक्ती । ते श्रीराममूर्ति स्वयंवरीं ॥ ६८ ॥
जनसमुदाया संदेहनिर्मुक्ति । सुररमुदाया बंधमुक्ति ।
भक्तसंतापनिजात्ममुक्ति । ते श्रीराममूर्ति स्वयंवरी ॥ ६९ ॥

सीतेची मनःस्थिती :

श्रीरामप्रतापाचा सोहळा । देखावया भाग्य कैचें सकळां ।
अंध पडिलें त्यांच्या डोळां । जनकबाळा सुख भोगी ॥ ७० ॥
श्रीरामसुखाचा सोहळा । देखोनि जानकी निवाली डोळां ।
त्याचे कंठीं घालावया माळा । उताविळी भावार्थें ॥ ७१ ॥
चापभंगाचे नाद कोटी । शनैः शनैः शमले नभाचें पोटीं ।
चेतनोपलब्ध जाली सृष्टी । उघडली दृष्टी जनांची ॥ ७२ ॥
जन जाले सावधान । सभा बैसली स्वस्थस्थान ।
देखोनियां धनु भग्न । विस्मीत मन सर्वांचें ॥ ७३ ॥
गेला जनकाचा संदेहो । राम अतुर्बळी महाबाहो ।
जाला सर्वार्थीं निःसंदेहो । जाणोनि राव बोलत ॥ ७४ ॥

जनकाचे धन्योद्‌गार :

जनक अत्यंत उल्लासेंसी । हरिखें बोले विश्वामित्रासी ।
राम दाशरथि सूर्यवंशीं । पूर्वीं बहुतां ऋषीं सांगितलें मज ॥ ७५ ॥
निजतेजें अत्यद्ऽऽभुत । अचिंत्यानम्त अति समर्थ ।
दृष्टीं देखिलें इत्यंभूत । प्रतापवन्त श्रीराम ॥ ७६ ॥ ॥
जेणें शिवाचें कोदंड । अवलीळा केलें दुखंड ।
श्रीरामप्रताप प्रचंड । काळे तोंड रावणाचे ॥ ७७ ॥
पूर्ण न भरतां कानाडीं । हरचाप भंगलें कडाडीं ।
त्याच्या प्रतापाची प्रौढी । कोणें केवढी वानावीं ॥ ७८ ॥
जनककुळींची कुळात्मजा । होईल श्रीरामाची भाजा ।
तेणें वंश सार्थक माझा । हा धर्म तुझा ऋषिवर्या ॥ ७९ ॥
विश्वामित्र तूं धर्मात्मा । तुझेनि धर्मे भेटी श्रीरामा ।
तुझेनि निष्कृति सर्वां कर्मां । राम परमात्मा मज सुहृद ॥ ८० ॥
तुझें रूढ नाम विश्वामित्र । परी तूं माझा परम मित्र ।
राम परमात्मा परम पवित्र । सुहृद स्वतंत्र त्झेनि ॥ ८१ ॥
माझा पूर्वकृत संकल्प । सीता अमूल्य प्रतापचाप ।
तो त्वां केला निर्विकल्प । सत्यसंकल्प श्रीराम ॥ ८२ ॥
स्वयंवरीचा पण कठीण । राज भंगले सहरावण ।
त्यासी श्रीरामें वाहिला गुण । सीतावरण प्रतापीं ॥ ८३ ॥
सीतेसी श्रीराम भ्रतार । कार्यकरिता विश्वामित्र ।
भलें जाणसी ब्रअह्मसूत्र । अति पवित्र ऋषिवर्या ॥ ८४ ॥
विश्वामित्राचे चरणीं माथा । ठेवोनि जनक होय बोलता ।
प्राणापरीस पढियंती सीता । ते म्यां रघुनाथा अर्पिली ॥ ८५ ॥
आजि माझा याग सफळ । आजि माझें पावन कुळ ।
आजि सीतेचें भाग्य अनुकूळ । सुखकल्लोळ श्रीरामें ॥ ८६ ॥
माझी कन्या अगुण सगुण । सीता केली रामार्पण ।
विश्वामित्रा तूं सज्ञान । वेगीं लग्न लावावें ॥ ८७ ॥
ऐसी जनकाची विनवणी । विश्वामित्रें ऐकोनी ।
बरवें म्हणोनि प्रतिवचनीं । उल्हासोनी बोलिला ॥ ८८ ॥

सीतेकडून रामाला माळ समर्पण :

ऐकोनि ऋषिरायाची गोष्टी । सीतागज प्रेरिला घडघडाटीं ।
माळा घालावया श्रीरामकंठीं । आली गोरटी उल्लासें ॥ ८९ ॥
जें सीतेचे मनीं होतें । तेंचि केलें रघुनाथें ।
वेगी वरावया त्यातें । आनंदे अदभुतें पैं आली ॥ ९० ॥
घेवोनि चिद्रत्नांुची माळा । आनंदे आली जनकबाळा ।
देखतां सकळिकां भूपाळां । घाली गळां श्रीरामाच्या ॥ ९१ ॥
होतां डोळियां डोळेभेटी । लाज विराली उफराटी ।
आनंदें वोसंडली सृष्टी । सुटल्या गांठी चहूं देहां ॥ ९२ ॥
सवेंचि पाहे सावधान । डोळियां डोळे जाले वरण ।
प्राणें प्राणा परिणयन । लागलें लग्न जीवीं शिवा ॥ ९३ ॥
चापें वीराभिमाना अस्तु । मध्यान्हीं तपे आदित्यु ।
सीता वरावया रघुनाथु । आला अभिजितु सुमुहूर्तीं ॥ ९४ ॥
लग्नघटिला पाहे भास्वत । वाचा राहिल्या निजमौनांत ।
स्वबोध सावधान सांगत । काळ सावचित दोहीं भागीं ॥ ९५ ॥
धनुर्भंगाच्या गजरांत । अंतःपट निर्मुक्त ।
भावार्थ ॐपुण्या सांगत । वेगीं रघुनाथा वरावया ॥ ९६ ॥
ऐसा समय साधूनि उचित । सांडोनि उभयपक्षार्थ ।
करोनि अभिमानाचा अंत । सीता रघुनाथ वरियेला ॥ ९७ ॥
येरयेरां पाहतां अतिप्रीतीं । सुटल्या चिदचिन्महाग्रंथी ।
निजाइक्याच्या बहुल्याप्रती । दोघे बैसती एकात्मता ॥ ९८ ॥
वोहरें पाहतां परस्परां । नोवरीमाजी दिसे नोवरा ।
नोवरियाआंगी दिसे सुंदरा । वरिलें वरा या स्थितीं ॥ ९९ ॥
सीता श्रीरामीं घालिता माळा । तेचि क्षणीं त्याचि काळा ।
रावणा वरिले अवकळा । निढळीं टिळी काळिमेचा ॥ १०० ॥
अवकळां बैसतांपाठीं । रावण अपमानिला सृष्टीं ।
रामप्रताप देखतां दृष्टी । रावणाच्या पोटी धुकधुक ॥ १ ॥

इतर उपस्थितांना परमानंद :

विजयी जाला रामचंद्र । हरिखें नाचे विश्वामित्र ।
घेवोनि ऋषींचा संभार । तृप्तितत्पर स्वानंदे ॥ २ ॥
एक रोकडे एक बोडके । एक ते कवळ सुडके ।
अवघे नाचती हरिखें । सीता रघुटिळकें पर्णिली ॥ ३ ॥
आनंदे नाचती आघवे । झेलिती गोपी चम्दनाचे रवे ।
घोत्रें झेलिती घदिपालवे । सीता राघवें पर्णियेली ॥ ४ ॥
एक ओंवाळिती अंगवस्त्रें । एक ओंवाळिती जुनी ध्त्रें ।
एक ओंवाळिती दर्भपवित्रें ।सीता रामचम्द्रें जिंकिली ॥ ५ ॥
एक ओंवाळिती कौपीन । एक ओंवाळिती कुशासन ।
एक ओवाळिती कृष्णाजिन । रघुनंदन निजविहयी ॥ ६ ॥
मंत्री गर्जती ऋषीश्वर । सुरवरीं जयजयकार ।
सुमनांचे वर्षती संभार । रामचम्द्र निजविजयी ॥ ७ ॥
सुखाचिया अति तांतडीं । देव उठिन्नले लवडसवडी ।
उभविती हरिखाची पै गुढी । राम बांधवडी सोडवील ॥ ८ ॥
जनकाच्या महाद्वारीं । त्राहाटिल्या निशाणभेरी ।
गगन गर्जे मंगळतुरीं । जयजयकारीं निजगजरें ॥ ९ ॥
विश्वामित्रें उल्लासता । रथीं वाहोनियां रामसीता ।
भेटावया दशरथा । होय निघता सवेग ॥ ११० ॥
सीता जिंकिली आपण । उल्लासें नाचे लक्ष्मण ।
अश्ववाग्दोर धरोनि पूर्ण । रथारोहन तेणें केलें ॥ ११ ॥
विश्वामित्राचे अधीन । श्रीरामसीतेचें गमन ।
देखोनि जनक झाला लीन । घाली लोटांगण ऋषिराया ॥ १२ ॥
विश्वामित्रा तूं गुरुत्वें पूर्ण । स्वयंवरें केलें सीतावरण ।
आतां करावें पाणिग्रहण । विधियुक्त लग्न ऋषिवर्या ॥ १३ ॥
जनक म्हणे विश्वामित्रा । उभयपक्षीं तू सोयरा ।
जाणोनि शास्त्रविचारा । येथें वधूवरां राहवावें ॥ १४ ॥
जनकाची निजकांता । सुमेधा सती पतिव्रता ।
तीही पाहूण् धांवें रघुनाथा । वामांगी सीता बैसवोनी ॥ १५ ॥
आणावें दशरथ भूपाळा । करावा सम्भ्रमें सोहळा ।
सुख द्यावें दोहीं कुळां । ऋषिनिर्मळा कृपाळुवा ॥ १६ ॥
ऐकोनि जनकाची विनंती । कौशिक सुखावला चित्तीं ।
राहविला सीतापती । ऋषिपंक्तिसमवेत ॥ १७ ॥
धनुर्भंगें सीतावरण । समूळ जालें निरूपण ।
आतां रामसीतापाणिग्रहण । लग्नविधान अवधारा ॥ १८ ॥
एकाजनार्दना शरण । प्रकृतिपुरुशां पाणिग्रहण ।
पुढें रसाळ निरूपण । श्रोते सज्ञान परिसोत ॥ ११९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
धनुर्भंगसीतावरणं नाम विंशतितमोऽध्यायः ॥ २० ॥
॥ ओव्या ११९ ॥ श्लोक ३ ॥ एवं १२२ ॥



GO TOP