[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
नासौ सीतेति निश्चित्य हनुमता पुनरन्तःपुरे पानभूमौ च सीताया अनुसन्धानं तन्मनसि धर्मलोपाशंका तस्याः स्वतो निवारणं च -
ही सीता नाही असा निश्चय झाल्यवर हनुमानांचे पुन्हा अन्त:पुरात आणि त्याच्या पानभूमीमध्ये सीतेचा शोध घेणे, त्यांच्या मनामध्ये धर्मलोपाची आशंका उत्पन्न होणे आणि स्वत: त्या शंकेचे निवारण करणे -
अवधूय च तां बुद्धिं बभूवावस्थितस्तदा ।
जगाम चापरां चिन्तां सीतां प्रति महाकपिः ॥ १ ॥
नन्तर त्या समयी हा विचार सोडून देऊन महाकपि हनुमान आपल्या स्वाभाविक स्थितिमध्ये झाला आणि सीतेविषयी दुसर्‍या प्रकारची चिन्ता करू लागला. ॥१॥
न रामेण वियुक्ता सा स्वप्तुमर्हति भामिनी ।
न भोक्तुं नाप्यलङ्‌कर्तुं न पानमुपसेवितुम् ॥ २ ॥
(त्याने विचार केला कि) भामिनी सीता श्रीरामचन्द्रापासून दूर केली गेली आहे. अशा स्थितीत तिला झोप येणे शक्य नाही, अथवा ती भोजन करणे ही शक्य नाही. ती शृंगार करू शकत नाही अथवा अलङ्‌कारही धारण करू शकणार नाही. मग मदिरासेवन तर ती कुठल्याही प्रकारे करणे शक्यच नाही. ॥२॥
नान्यं नरमुपस्थातुं सुराणामपि चेश्वरम् ।
न हि रामसमः कश्चिद् विद्यते त्रिदशेष्वपि ॥ ३ ॥
ती दुसर्‍या कुठल्याही पुरूषाजवळ जाणे शक्य नाही मग तो सर्व देवतांचा ईश्वर जरी असला तरी ते शक्य नाही. शिवाय देवतांमध्येही असा कुणीही नाही कि जो श्रीरामाची बरोबरी करू शकेल. ॥३॥
अन्येयमिति निश्चित्य भूयस्तत्र चचार सः ।
पानभूमौ हरिश्रेष्ठः सीतासन्दर्शनोत्सुकः ॥ ४ ॥
म्हणून ही सीता असणे शक्यच नाही. ही कोणी दुसरी स्त्री आहे. असा निश्चय करून तो कपिश्रेष्ठ सीतेच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन परत त्या पानभूमीत संचार करू लागला. ॥४॥
क्रीडितेनापराः क्लान्ता गीतेन च तथापराः ।
नृत्तेन चापराः क्लान्ताः पानविप्रहतास्तथा ॥ ५ ॥
तेथे काही स्त्रिया क्रीडा करण्यामुळे थकलेल्या होत्या तर काही गीत गाण्यामुळे थकल्या होत्या. दुसरी कोणी नृत्य करून थकली होती तर कित्येक स्त्रिया अधिक मद्यपान करण्याने बेशुद्ध झाल्या होत्या. ॥५॥
मुरजेषु मृदङ्‌गेषु पीठिकासु च संस्थिताः ।
तथाऽऽस्तरणमुख्येषु संविष्टाश्चापराः स्त्रियः ॥ ६ ॥
अनेक स्त्रिया ढोल, मृदुंग आणि चेलिका नामक वाद्यांवर आपले अंग टाकून झोपी गेल्या होत्या. तर दुसर्‍या काही स्त्रिया चांगल्या चांगल्या आस्तरणांवर झोपी गेल्या होत्या. ॥६॥
अङ्‌गनानां सहस्रेण भूषितेन विभूषणैः ।
रूपसंलापशीलेन युक्तगीतार्थभाषिणा ॥ ७ ॥

देशकालाभियुक्तेन युक्तवाक्याभिधायिना ।
रताधिकेन संयुक्तां ददर्श हरियूथपः ॥ ८ ॥
हजारो स्त्रिया विविध प्रकारच्या आभूषणांनी अलंकृत, रूप लावण्याची चर्चा करणार्‍या, गीतातील समुचित अभिप्राय आपल्या वाणीद्वारा प्रकट करणार्‍या, देश-काळ आदि जाणणार्‍या, उचित भाषण करणार्‍या आणि रतिक्रिडेत अधिक भाग घेणार्‍या, झोपलेल्या होत्या; असे वानरयूथपति हनुमन्तानी पाहिले. ॥७-८॥
अन्यत्रापि वरस्त्रिणां रूपसंलापशायिनाम्
सहस्रं युवतीनां तु प्रसुप्तं स ददर्श ह ॥ ९ ॥
दुसर्‍या स्थानावरही हनुमानांनी अशा हजारो सुन्दर युवतींना झोपलेल्या पाहिल्या कि ज्या आपापसान्त पडल्या पडल्या रूप सौदर्यांचा चर्चा करीत होत्या. ॥९॥
देशकालाभियुक्तं तु युक्तवाक्याभिधायि तत् ।
रताविरतसंसुप्तं ददर्श हरियूथपः ॥ १० ॥
वानर यूथपति पवनकुमारांनी अशाही अनेक स्त्रियांना पाहिले की ज्या देश-काळ यांना जाणणार्‍या, उचित गोष्टी बोलणार्‍या आणि रतिक्रीडे नन्तर गाढ झोपी गेलेल्या होत्या. ॥१०॥
तासां मध्ये महाबाहुः शुशुभे राक्षसेश्वरः ।
गोष्ठे महति मुख्यानां गवां मध्ये यथा वृषः ॥ ११ ॥
त्या सर्वांमध्ये महाबाहु राक्षसराज रावण विशाल गोशाळेमध्ये श्रेष्ठ गायींच्या मध्ये झोपलेला बैलाप्रमाणे शोभत होता. ॥११॥
स राक्षसेन्द्रः शुशुभे ताभिः परिवृतः स्वयम् ।
करेणुभिर्यथारण्ये परिकीर्णो महाद्विपः ॥ १२ ॥
ज्या प्रमाणे वनामध्ये हत्तींनी घेरलेला महान गजराज झोपलेला असतो, त्याप्रमाणेच त्या भुवनात त्या सुन्दर स्त्रियांनी वेढलेला स्वयं राक्षसराज रावण शोभत होता. ॥१२॥
सर्वकामैरुपेतां च पानभूमिं महात्मनः ।
ददर्श कपिशार्दूलस्तस्य रक्षःपतेर्गृहे ॥ १३ ॥

मृगाणां महिषाणां च वराहाणां च भागशः ।
तत्र न्यस्तानि मांसानि पानभूमौ ददर्श सः ॥ १४ ॥
त्या महाकाय राक्षसराजाच्या भुवनात संपूर्ण मनोवांछित भोगांनी संपूर्ण अशी पानभूमी कपिश्रेष्ठ हनुमानाने पाहिली. त्या मधुशाळेत निरनिराळ्या मृगांचे, रेड्यांचे आणि डुकरांचे मांस ठेवले गेले आहे, असेही त्याने पाहिले. ॥१३-१४॥
रौक्मेषु च विशालेषु भाजनेष्वप्यभक्षितान् ।
ददर्श कपिशार्दूलो मयूरान् कुक्कुटांस्तथा ॥ १५ ॥

वराहवाध्रीणसकान् दधिसौवर्चलायुतान् ।
शल्यान् मृगमयूरांश्च हनुमानन्ववैक्षत ॥ १६ ॥
वानरसिंह हनुमानांनी तेथे सोन्याच्या मोठ मोठ्या पात्रात मोर, कोंबडे, डुक्कर. गेंडे, साही, हरिण आणि मयूरांचे मांस दही आणि लवण (मीठ) चोपडून (मिसळून) ठेवलेले पाहिले, जे अद्याप कुणी खाल्लेले नव्हते. ॥१५-१६॥
कृकलान् विविधांश्छागाञ्छशकानर्धभक्षितान् ।
महिषानेकशल्यांश्च मेषांश्च कृतनिष्ठितान् ॥ १७ ॥

लेह्यानुच्चावचान् पेयान् भोज्यान्युच्चावचानि च ।
तथाऽम्ललवणोत्तंसैर्विविधै रागखाण्डवैः ॥ १८ ॥
कृकळ नामक पक्षी, अनेक प्रकारचे बोकड, ससे, अर्धवट खाल्लेले रेडे, एकशल्य नामक मत्स्य आणि छेद नावांचे मासे, आणि महिष हे सर्व शिजवून तेथे ठेवलेले होते. तसेच अनेक प्रकारची पेये तथा भक्ष्य पदार्थही तेथे विद्यमान होते. जीभेची शिथिलता दूर करण्याचासाठी आम्ल, लवण आदि बरोबर अनेकानेक राग आणि खाण्डवही तेथे ठेवलेले होते. बहुमूल्य मोठ मोठे नुपूर आणि बाजूबन्दही जिथे तिथे पडलेले होते. ॥१७-१८॥
महानूपुरकेयूरैरपविद्धैर्महाधनैः ।
पानभाजनविक्षिप्तैः फलैश्च विविधैरपि ॥ १९ ॥

कृतपुष्पोपहारा भूरधिकां पुष्यति श्रियम् ।
मद्यपानाची पात्रे जिथे तिथे लवडलेली होती, अनेक प्रकारची फळेही विखुरलेली होती. या शिवाय जिला फुलांनी सजविले होते अशी ती पानभूमी या सर्व गोष्टींच्या मुळे अधिकच शोभायमान होत होती. ॥१९ १/२॥
तत्र तत्र च विन्यस्तै: सुश्लिष्टशयनासनैः ॥ २० ॥

पानभूमिर्विना वह्निं प्रदीप्तेवोपलक्ष्यते ।
जिथे तिथे ठेवलेल्या सुदृढ शय्या आणि सुन्दर सुवर्णमय सिंहासनामुळे सुशोभित झालेली ती मधुशाळा जणु आगी शिवाय जळत असल्याप्रमाणे झगमगत होती. ॥२० १/२॥
बहुप्रकारैर्विविधैर्वरसंस्कारसंस्कृतै: ॥ २१ ॥

मांसैः कुशलसंयुक्तै: पानभूमिगतैः पृथक् ।
दिव्याः प्रसन्ना विविधाः सुराः कृतसुरा अपि ॥ २२ ॥

शर्करासवमाध्वीकाः पुष्पासवफलासवाः ।
वासचूर्णैश्च विविधैर्मृष्टास्तैस्तै: पृथक् पृथक् ॥ २३ ॥
नाना प्रकारचे पदार्थ ज्यात मिश्रित केलेले आहेत आणि उत्तम प्रकारचे मसाले घालून जी तयार केलेली आहेत अशी निष्णान्त आचार्यांनी शिजवलेले विविध मांसपदार्थ पानभूमीत वेगवेगळी ठेवण्यात आली होती. नाना प्रकारच्या दिव्य आणि स्वच्छ सुरा (कदम्ब आदि वृक्षांपासून स्वाभाविक उत्पन्न झालेल्या होत्या) आणि कृत्रिम सुरा (ज्यांना मद्य बनविणारे लोक तयार करतात) तेथे ठेवल्या गेल्या होत्या. याशिवाय शर्करासव, माध्वीक पुष्पासव, फलासव हेही तेथे होते. या सर्वांना नाना प्रकारच्या सुगन्धित चूर्णांनी पृथक वासयुक्त केले गेले होते. ॥२१-२३॥
सन्तता शुशुभे भूमिर्माल्यैश्च बहुसंस्थितैः ।
हिरण्मयैश्च कलशैः भाजनैः स्फाटिकैरपि ॥ २४ ॥

जाम्बूनदमयैश्चान्यैः करकैरभिसंवृता ।
तेथे अनेक ठिकाणी ठेवलेली फुले, सुवर्णमय कलश, स्फटिकमण्यांची पात्रे तसेच जाम्बूनदाचे बनविलेले कमण्डलु आदि अन्यान्य पात्रे यांनी व्याप्त ती पानभूमी अत्यन्त शोभून दिसत होती. ॥२४ १/२॥
राजतेषु च कुम्भेषु जाम्बूनदमयेषु च ॥ २५ ॥

पानश्रेष्ठां तदा भूरि कपिस्तत्र ददर्श सः ।
चान्दी, सोने आणि जाम्बूनदाच्या घड्यांमध्ये जेथे श्रेष्ठ पेय पदार्थ ठेवलेले होते अशी ती पानभूमी कपिश्रेष्ठ हनुमन्तांनी सर्वत्र फिरून पाहिली. ॥२५ १/२॥
सोऽपश्यच्छातकुम्भानि सीधोर्मणिमयानि च ॥ २६ ॥

तानि तानि च पूर्णानि भाजनानि महाकपिः ।
तेथे मद्यांनी भरलेली सोन्याची आणि मण्यांची अनेक भिन्न भिन्न पात्रे महाकपिने पाहिली. ॥२६ १/२॥
क्वचिदर्धावशेषाणि क्वचित् पीतान्यशेषतः ॥ २७ ॥

क्वचिन्नैव प्रपीतानि पानानि स ददर्श ह ।
काही घड्यातील अर्धी मदिरा शेष होती तर काही घड्यान्तील सर्वच्या सर्व प्यायली गेलेली होती तर काही काही घड्यातील मद्य अजिबात प्यायले गेले नव्हते. हनुमानांनी हे सर्व पाहिले. ॥२७ १/२॥
क्वचिद् भक्ष्यांश्च विविधान् क्वचित्पानानि भागशः ॥ २८ ॥

क्वचिदर्धावशेषाणि पश्यन् वै विचचार ह ।
काही ठिकाणी नाना प्रकारचे भक्ष्य पदार्थ व पेये वेगळे वेगळे ठेवली गेली होती. आणि त्यान्तील अर्धी अर्धी सामग्रीच शिल्लक राहिलेली होती. हे सर्व पहात हनुमान तेथे सर्वत्र विचरण करू लागले. ॥२८ १/२॥
शयनान्यत्र नारीणां शून्यानि बहुधा पुनः ।
परस्परं समाश्लिष्य काश्चित् सुप्तावरांगनाः ॥ २९ ॥
त्या ठिकाणी स्त्रियांच्या पुष्कळ शय्या मोकळ्याच पडलेल्या होत्या तर काही श्रेष्ठ श्रेष्ठ स्त्रिया एकमेकीला आलिंगन देऊन एकत्रच झोपी गेल्या होत्या. ॥२९॥
काश्चिच्च वस्त्रमन्यस्या अपहृत्योपगुह्य च ।
उपगम्याबला सुप्ता निद्राबलपराजिता ॥ ३० ॥
निद्रेच्या बळाने पराजित झालेली कुणी एखादी अबला दुसर्‍या एखाद्या सवतीचे वस्त्र परिधान करून झोपली होती तर कुणी दुसर्‍या एखादीचे वस्त्र ओढून घेऊन तेच परिधान करून झोपली होती. ॥३०॥
तासामुच्छ‍्वासवातेन वस्त्रं माल्यं च गात्रजम् ।
नात्यर्थं स्पन्दते चित्रं प्राप्य मन्दमिवानिलम् ॥ ३१ ॥
त्यांच्या श्वासोश्वासाच्या वायुने त्यांच्या शरीरावरील विविध प्रकारची वस्त्रे आणि पुष्पमाळा आदि वस्तु अत्यन्त मन्द वाहणार्‍या वार्‍याने हलाव्या तशा हलत होत्या. ॥३१॥
चन्दनस्य च शीतस्य सीधोर्मधुरसस्य च ।
विविधस्य च माल्यस्य धूपस्य विविधस्य च ॥ ३२ ॥

बहुधा मारुतस्तस्य गन्धं विविधमुद्वहन् ।
स्नानानां चन्दनानां च धूपानां चैव मूर्छितः ॥ ३३ ॥

प्रववौ सुरभिर्गन्धो विमाने पुष्पके तदा ।
त्या समयी पुष्पक विमानात, शीतल चन्दन, मद्य, मधुरस, विविध प्रकारच्या माळा, नाना प्रकारची फुले, विविध रस, चन्दन आणि धूपाचा अनेक प्रकारच्या गन्धांचा भार वहन करणारा सुगन्धित वायु सर्व बाजूस प्रवाहित होत होता. ॥३२-३३ १/२॥
श्यामावदातास्तत्रान्याः काश्चित् कृष्णा वराङ्‌गनाः ॥ ३४ ॥

काश्चित् काञ्चनवर्णाङ्‌ग्यः प्रमदा राक्षसालये ।
त्या राक्षसराजाच्या भुवनात कोणी सावळी, कोणी गोरी, कुणी काळी तर कुणी सुवर्णासारखी कान्ति असलेली अशा अनेक सुन्दर युवती झोपी गेलेल्या होत्या. ॥३४ १/२॥
तासां निद्रावशत्वाच्च मदनेन विमूर्छितम् ॥ ३५ ॥

पद्मिनीनां प्रसुप्तानां रूपमासीद् यथैव हि ।
निद्रावश झाल्याने त्यांचे काममोहित रूप, मिटलेले मुख असलेल्या कमळ पुष्पांप्रमाणे भासत होते. ॥३५ १/२॥
एवं सर्वमशेषेण रावणान्तःपुरं कपिः ।
ददर्श स महातेजा न ददर्श च जानकीम् ॥ ३६ ॥
या प्रकारे महातेजस्वी हनुमानानी रावणाचे संपूर्ण अन्त:पुर शोधले तरीही त्यांना जनकनन्दिनी सीतेचे दर्शन झाले नाही. ॥३६॥
निरीक्षमाणश्च ततस्ताः स्त्रियः स महाकपिः ।
जगाम महतीं शङ्‌कां धर्मसाध्वसशङ्‌कितः ॥ ३७ ॥
त्या झोपी गेलेल्या स्त्रियांना बघता बघता महाकपि हनुमान धर्मलोप झाला किं काय या भयाने चिन्तित झाले. त्यांच्या ह्रदयात फार मोठी चिन्ता उत्पन्न झाली. ॥३७॥
परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणम् ।
इदं खलु ममात्यर्थं धर्मलोपं करिष्यति ॥ ३८ ॥
ते विचार करू लागले कि या प्रकारे गाढ निद्रेत झोपलेल्या परस्त्रियांना बघणे योग्य नाही. यामुळे तर माझ्या धर्माचा अत्यन्त विनाश होऊन जाईल. ॥३८॥
न हि मे परदाराणां दृष्टिर्विषयवर्तिनी ।
अयं चात्र मया दृष्टः परदारपरिग्रहः ॥ ३९ ॥
माझी दृष्टी आतापर्यन्त कधीही परस्त्रियांवर पडलेली नव्हती. येथे आल्यवर मला परदारांचे अपहरण करणार्‍या या पापी रावणाचेही दर्शन झाले आहे. (अशा पाप्याला पहाणे हेही धर्मलोप करणारे असते.) ॥३९॥
तस्य प्रादुरभूच्चिन्ता पुनरन्या मनस्विनः ।
निश्चितैकान्तचित्तस्य कार्यनिश्चयदर्शिनी ॥ ४० ॥
त्यानन्तर मनस्वी (मननशील) हनुमन्तांच्या मनात दुसरी ही एक विचारधारा उत्पन्न झाली. त्यांचे चित्त आपल्या लक्ष्यावर सुस्थिर होते, म्हणून ही नवी विचारधारा त्यांना आपल्या कर्तव्यासंबन्धी निश्चय (करविणारीच) करण्यास सहाय्यभूत अशीच होती. ॥४०॥
कामं दृष्टा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः ।
न तु मे मनसा किञ्चिद् वैकृत्यमुपजायते ॥ ४१ ॥
(ते विचार करू लागले कि-) यात शंका नाही की रावणाच्या स्त्रिया नि:शंक झोपी गेलेल्या होत्या आणि मी त्यांना त्याच अवस्थेत सर्वांना नीटपणे पाहिले आहे. तथापि माझ्या मनात कुठलाही विकार उत्पन्न झालेला नाही. ॥४१॥
मनो हि हेतुः सर्वेषां इन्द्रियाणां प्रवर्तने ।
शुभाशुभास्ववस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम् ॥ ४२ ॥
संपूर्ण इन्द्रियांना शुभ अथवा अशुभ अवस्थामध्ये प्रवृत्त होण्याची प्रेरणा देण्यास मनच कारण असते, परन्तु माझे ते मन पूर्णत: स्थिर आहे. त्यात कशाही बद्दल राग अथवा द्वेष नाही. म्हणून माझे हे परस्त्री-दर्शन धर्माचा लोप करणारे होऊ शकत नाही. ॥४२॥
नान्यत्र हि मया शक्या वैदेही परिमार्गितुम् ।
स्त्रियो हि स्त्रीषु दृश्यन्ते सदा सम्परिमार्गणे ॥ ४३ ॥
विदेहनन्दिनी सीतेला मी दुसर्‍या कुठल्याही ठिकाणी तर शोधूच शकत नव्हतो कारण स्त्रियांचा शोध घेण्यासाठी त्यांना स्त्रियांमध्येच शोधावे (पहावे) लागते. ॥४३॥
यस्य सत्त्वस्य या योनिस्तस्यां तत्परिमार्गते ।
न शक्यं प्रमदा नष्टा मृगीषु परिमार्गितुम् ॥ ४४ ॥
ज्या जीवाची जी जात असेल त्या जातीतच त्याला शोधावे लागते. हरवलेल्या युवती स्त्रीला हरिणींच्या समुदायात तर शोधता येत नाही. ॥४४॥
तदिदं मार्गितं तावच्छुद्धेन मनसा मया ।
रावणान्तःपुरं सर्वं दृश्यते न च जानकी ॥ ४५ ॥
म्हणून मी रावणाच्या या सार्‍या अन्त:पुरात शुद्ध हृदयाने शोध घेतला आहे (अन्वेषण केले आहे) परन्तु येथे मला जानकी कोठेही आढळून आली नाही. ॥४५॥
देवगन्धर्वकन्याश्च नागकन्याश्च वीर्यवान् ।
अवेक्षमाणो हनुमान् नैवापश्यत जानकीम् ॥ ४६ ॥
अन्त:पुराचे निरीक्षण करतांना पराक्रमी हनुमानास देवता, गन्धर्व आणि नाग इत्यादिंच्या कन्या तर तेथे दिसल्या परन्तु जनकनन्दिनी सीता मात्र दिसली नाही. ॥४६॥
तामपश्यन् कपिस्तत्र पश्यञ्श्चान्या वरस्त्रियः ।
अपक्रम्य तदा वीरः प्रस्थातुमुपचक्रमे ॥ ४७ ॥
दुसर्‍या सुन्दर स्त्रियांना पाहूनही वीर वानर हनुमन्तास ज्यावेळी तेथे सीता दिसली नाही तेव्हा तेथून दूर सरून अन्यत्र जाण्यास ते प्रवृत्त झाले. ॥४७॥
स भूयः सर्वतः श्रीमान् मारुतिर्यत्‍नमास्थितः ।
आपानभूमिमुत्सृज्य तां विचेतुं प्रचक्रमे ॥ ४८ ॥
नन्तर त्या श्रीमान पवनपुत्राने त्या पानभूमीचा त्याग करून अन्य सर्व ठिकाणी मोठ्या प्रयत्‍नपूर्वक सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला. ॥४८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकादशः सर्गः ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अकरावा सर्व पूरा झाला. ॥११॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP