श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रिचत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भगीरथस्य तपसा तुष्टेन शिवेन गङ्गां शिरसि धारयित्वा तस्या बिन्दुसरोवरे त्यागस्तत्र स्वात्मानं सप्तसु धारासु संविभज्य भागीरथ्या भगीरथमनुगम्य तत्पितॄणामुद्धरणं च - भगीरथाच्या तपस्येने संतुष्ट झालेल्या भगवान् शंकरांनी गंगेला आपल्या मस्तकावर धारण कऊन बिन्दुसरोवरात सोडणे आणि तिचे सात धारात विभक्त होऊन भगीरथाबरोबर जाऊन पितरांचा उद्धार करणे -
देवदेवे गते तस्मिन् सोऽङ्‍गुष्ठाग्रनिपीडिताम् ।
कृत्वा वसुमतीं राम वत्सरं समुपासत ॥ १ ॥
'श्रीरामा ! देवाधिदेव ब्रह्मदेव निघून गेल्यावर राजा भगीरथ केवळ अंगठ्याचा अग्रभाग टेकून उभा राहिला आणि अनेक वर्षे शंकरांची उपासना करीत राहिला. ॥ १ ॥
अथ संवत्सरे पूर्णे सर्वलोकनमस्कृतः ।
उमापतिः पशुपती राजानमिदमब्रवीत् ॥ २ ॥
बराच काळ लोटल्यावर सर्वलोकविद्वत उमावल्लभ भगवान् पशुपति प्रकट होऊन राजास या प्रमाणे म्हणाले - ॥ २ ॥
प्रीतस्तेऽहं नरश्रेष्ठ करिष्यामि तव प्रियम् ।
शिरसा धारयिष्यामि शैलराजसुतामहम् ॥ ३ ॥
'नरश्रेष्ठ ! मी तुझ्यावर फार प्रसन्न झालो आहे. तुझे प्रिय कार्य मी अवश्य करीन. मी गिरिराजकुमारी गंगादेवीला आपल्या मस्तकावर धारण करीन. ॥ ३ ॥
ततो हैमवती ज्येष्ठा सर्वलोकनमस्कृता ।
तदा सातिमहद्‌रूपं कृत्वा वेगं च दुःसहम् ॥ ४ ॥

आकाशादपतद् राम शिवे शिवशिरस्युत ।
'श्रीरामा ! शंकरांचे अनुमोदन मिळताच, जिच्या चरणी सर्व संसार मस्तक नमवितो ती हिमालयाची ज्येष्ठ कन्या उग्र रूप धारण करून आपल्या वेगाला दुःसह बनवून आकाशांतून भगवान शंकरांच्या शोभायमान मस्तकावर झेपावली. ॥ ४ १/२ ॥
अचिन्तयच्च सा देवी गङ्‍गा परमदुर्धरा ॥ ५ ॥

विशाम्यहं हि पातालं स्रोतसा गृह्य शङ्‍करम् ।
त्यावेळी परम दुर्धर गंगादेवीने असा विचार केला की मी आपल्या प्रखर प्रवाहाबरोबर शंकरांनाही बरोबर घेऊन पाताळात घुसून जाईन. ॥ ५ १/२ ॥
तस्यावलेपनं ज्ञात्वा क्रुद्धस्तु भगवान् हरः ॥ ६ ॥

तिरोभावयितुं बुद्धिं चक्रे त्रिनयनस्तदा ।
तिचा हा अहंकार जाणून त्रिनेत्रधारी भगवान हर कुपित झाले आणि त्यांनी गंगेला अदृश्य करून टाकण्याचा विचार केला. ॥ ६ १/२ ॥
सा तस्मिन् पतिता पुण्या पुण्ये रुद्रस्य मूर्धनि ॥ ७ ॥

हिमवत् प्रतिमे राम जटामण्डलगह्वरे ।
सा कथञ्चिन्महीं गन्तुं नाशक्नोद् यत्‍नमास्थिता ॥ ८ ॥
पुण्यस्वरूपा गंगा भगवान रुद्रांच्या पवित्र मस्तकावर झेपावली. त्यांचे मस्तक जटामण्डलरूपी गुफेने सुशोभित हिमायाप्रमाणे वाटत होते. त्याच्यावर झेपावल्यानंतर विशेष प्रयत्‍न करूनही ती कुठल्याही प्रकारे पृथ्वीवर उतरू शकली नाही. ॥ ७-८ ॥
नैव सा निर्गमं लेभे जटामण्डलमन्ततः ।
तत्रैवाबभ्रमद् देवी संवत्सरगणान् बहून् ॥ ९ ॥
भगवान् शिवाच्या जटाजालात अडकून किनार्‍यास येऊनही गंगादेवी जटेतून बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त करू शकली नाही आणि बरीच वर्षे त्या जटांतूनच भटकत राहिली. ॥ ९ ॥
तामपश्यत् पुनस्तत्र तपः परममास्थितः ।
स तेन तोषितश्चासीदत्यन्तं रघुनन्दन ॥ १० ॥
'रघुनन्दन ! भगीरथाने पाहिले की गंगा भगवान शंकरांच्या जटामण्डलात अदृश्य झाली आहे. तेव्हां ते पुन्हा घोर तपस्या करू लागले. त्या तपस्येमुळे त्यांनी भगवान् शिवांना फार प्रसन्न करून घेतले. ॥ १० ॥
विससर्ज ततो गङ्‍गां हरो बिन्दुसरः प्रति ।
तस्यां विसृज्यमानायां सप्त स्रोतांसि जज्ञिरे ॥ ११ ॥
तेव्हां महादेव गंगेला बिन्दुसरोवराजवळ घेऊन आले आणि त्यांनी तिला तेथे सोडून दिले. तेथे सुटका होताच तिच्या सात धारा झाल्या. ॥ ११ ॥
ह्लादिनी पावनी चैव नलिनी च तथैव च ।
तिस्रः प्राचीं दिशं जग्मुर्गङ्‍गाः शिवजलाः शुभाः ॥ १२ ॥
ह्लादिनी, पावनी आणि नलिनी या कल्याणमयी जलाने सुशोभित गंगेच्या तीन मंगलमय धारा पूर्वेकडे वहात निघाल्या. ॥ १२ ॥
सुचक्षुश्चैव सीता च सिन्धुश्चैव महानदी ।
तिस्रश्चैता दिशं जग्मुः प्रतीचीं तु दिशं शुभाः ॥ १३ ॥
सुचक्षु, सीता आणि महानदी सिंधु या तीन शुभ धारा पश्चिम दिशेकडे प्रवाहित झाल्या. ॥ १३ ॥
सप्तमी चान्वगात् तासां भगीरथरथं तदा ।
भगीरथोऽपि राजर्षिर्दिव्यं स्यन्दनमास्थितः ॥ १४ ॥

प्रायादग्रे महातेजा गङ्‍गा तं चाप्यनुव्रजत् ।
गगनाच्छङ्‍करशिरस्ततो धरणिमागता ॥ १५ ॥
त्याहून वेगळी जी सातवी धारा ती महाराज भगीरथांच्या रथाच्या मागे मागे चालू लागली. महातेजस्वी राजर्षि भगीरथही दिव्य रथावर आरूढ होऊन पुढे पुढे जाऊ लागले आणि गंगा त्यांच्या पथाचे अनुसरण करू लागली. या प्रकारे ती आकाशातून भगवान् शंकरांच्या मस्तकावर आणि तेथून पृथ्वीवर आली. ॥ १४-१५ ॥
असर्पत जलं तत्र तीव्रशब्दपुरस्कृतम् ।
मत्स्य कच्छपसङ्‍घैश्च शिंशुमारगणैस्तथा ॥ १६ ॥

पतद्‌भिः पतितैश्चैव व्यरोचत वसुंधरा ।
गंगेची जलराशि महान् कलकल नादासह तीव्र गतीने प्रवाहित झाली. मत्स्य, कच्छप, आणि शिशुमार (घोरपड) यांच्या झुंडीच्या झुंडी तिच्यात पडू लागल्या. त्या वरून येऊन पडलेल्या जलजंतूंनी वसुंधरेची शोभा फार सुंदर दिसू लागली. ॥ १६ १/२ ॥
ततो देवर्षिगन्धर्वा यक्षसिद्धगणास्तथा ॥ १७ ॥

व्यलोकयन्त ते तत्र गगनाद् गां गतां तदा ।
विमानैर्नगराकारैर्हयैर्गजवरैस्तदा ॥ १८ ॥
तद्‌नंतर देवता, ऋषि, गंधर्व, यक्ष आणि सिद्धगण, नगरासारख्या आकाशाची विमाने, घोडे आणि गजराज आदिवर आरूढ होऊन आकाशांतून पृथ्वीवर आलेल्या गंगेची शोभा न्याहाळू लागले. ॥ १७-१८ ॥
पारिप्लवगताश्चापि देवतास्तत्र विष्ठिताः ।
तदद्‍भुतमिमं लोके गङ्‍गावतरमुत्तमम् ॥ १९ ॥

दिदृक्षवो देवगणाः समीयुरमितौजसः ।
देवता आश्चर्यचकित होऊन तेथे उभ्या होत्या. जगात गंगावतरणाच्या या अद्‌भुत आणि मनोरम दृष्यास बघण्याच्या इच्छेने अमित तेजस्वी देवतांचा समुदाय तेथे एकत्रित झाला होता. ॥ १९ १/२ ॥
सम्पतद्‌भिः सुरगणैस्तेषां चाभरणौजसा ॥ २० ॥

शतादित्यमिवाभाति गगनं गततोयदम् ।
तीव्र गतीने येणार्‍या देवतांच्या दिव्य आभूषणांच्या द्वारे पसरणार्‍या प्रकाशामुळे तेथील मेघरहित निर्मल आकाश जणु शेंकडो सूर्य एकदम उदित व्हावेत त्याप्रमाणे प्रकाशित झाले होते. ॥ २० १/२ ॥
शिंशुमारोरगगणैर्मीनैरपि च चञ्चलैः ॥ २१ ॥

विद्युद्‌भिरिव विक्षिप्तैराकाशमभवत् तदा ।
शिंशुमार, सर्प आणि चंचल मत्यसमूहांच्या उसळ्या मारण्याने गंगेच्या जलावरील आकाश जणु तेथे चंचल चपलांचाच प्रकाश सर्व बाजूस व्याप्त होत आहे की काय असे भासत होते. ॥ २१ १/२ ॥
पाण्डुरैः सलिलोत्पीडैः कीर्यमाणैः सहस्रधा ॥ २२ ॥

शारदाभ्रैरिवाकीर्णं गगनं हंससम्प्लवैः ।
वायुमुळे हजारो तुकड्यात विभागलेला फेस आकाशात सर्वत्र पसरत होता. जणु शरद ऋतुतील पांढरे ढग अथवा हंसच उडत आहेत. ॥ २२ १/२ ॥
क्वचिद् द्रुततरं याति कुटिलं क्वचिदायतम् ॥ २३ ॥

विनतं क्वचिदुद्‌भूतं क्वचिद् याति शनैः शनैः ।
सलिलेनैव सलिलं क्वचिदभ्याहतं पुनः ॥ २४ ॥
गंगेची ती धारा कुठे तीव्र, कुठे वाकडी तर कुठे मंद होत वहात होती. काही ठिकाणी अत्यंत खालच्या बाजूस पडताना दिसत होती, तर काही ठिकाणी वरील बाजूस उठल्यासारखी दिसत होती. कधी समतल भूमिवर ती हळूहळू वहात होती, तर काही काही ठिकाणी आपल्याच जलांनी आपल्याच जलाला वारंवार टकरा देत रहात होती. ॥ २३-२४ ॥
मुहुरूर्ध्वपथं गत्वा पपात वसुधां पुनः ।
तच्छङ्‍करशिरोभ्रष्टं भ्रष्टं भूमितले पुनः ॥ २५ ॥

व्यरोचत तदा तोयं निर्मलं गतकल्मषम् ।
गंगेचे जल वारंवार उंच मार्गावरून वहात होते आणि पुन्हा सखल भूमिवर पडत होते. आकाशांतून शंकरांच्या मस्तकावर आणि तेथून पृथ्वीवर पडलेले ते निर्मल आणि पवित्र गंगाजल त्यावेळी फारच सुशोभित दिसत होते. ॥ २५ १/२ ॥
तत्रर्षिगणगन्धर्वा वसुधातलवासिनः ॥ २६ ॥

भवाङ्‍गपतितं तोयं पवित्रमिति पस्पृशुः ।
त्या समयी भूतल निवासी ऋषि आणि गंधर्व, हे जल भगवान् शंकरांच्या मस्तकावरून खाली आलेले आहे, म्हणून अत्यंत पवित्र आहे असे मनांत आणून त्याचे आचमन करू लागले. ॥ २६ १/२ ॥
शापात् प्रपतिता ये च गगनाद् वसुधातलम् ॥ २७ ॥

कृत्वा तत्राभिषेकं ते बभूवुर्गतकल्मषाः ।
धूतपापाः पुनस्तेन तोयेनाथ शुभान्विताः ॥ २८ ॥

पुनराकाशमाविश्य स्वाँल्लोकान् प्रतिपेदिरे ।
जे शापभ्रष्ट होऊन आकाशातून पृथ्वीवर आले होते, ते गंगेच्या जलात स्नान करून निष्पाप झाले आणि त्या जलाने पापे धुतली गेल्याने पुन्हा शुभ पुण्याने संयुक्त होऊन अकाशांत पोहोचून आपल्या लोकाला प्राप्त झाले. ॥ २७-२८ १/२ ॥
मुमुदे मुदितो लोकस्तेन तोयेन भास्वता ॥ २९ ॥

कृताभिषेको गङ्‍गायां बभूव विगतकल्मषः ।
त्या प्रकाशमय जलाच्या संपर्काने आनन्दित झालेले सर्व जगत् त्या कायमस्वरूपी आनन्द प्रदान करणार्‍या स्त्रोतामुळे अति प्रसन्न झाले. सर्व लोक पुण्यसलिला गंगेत स्नान करून पापमुक्त झाले. ॥ २९ १/२ ॥
भगीरथो हि राजर्षिर्दिव्यं स्यन्दनमास्थितः ॥ ३० ॥

प्रायादग्रे महाराजस्तं गङ्‍गा पृष्टतोऽन्वगात् ।
आधीच कथन केल्याप्रमाणे राजर्षि महाराज भगीरथ दिव्य रथावर आरूढ होऊन पुढे पुढे जात होते आणि गंगा त्यांच्या मागे मागे जात होती. ॥ ३० १/२ ॥
देवाः सर्षिगणाः सर्वे दैत्यदानवराक्षसाः ॥ ३१ ॥

गन्धर्वयक्षप्रवराः सकिन्नरमहोरगाः ।
सर्पाश्चाप्सरसो राम भगीरथरथानुगाः ॥ ३२ ॥

गङ्‍गामन्वगमन् प्रीताः सर्वे जलचराश्च ये ।
'श्रीरामा ! त्या समयी समस्त देवता, ऋषि, दैत्य, दानव, राक्षस, गंधर्व, यक्षप्रवर, किन्नर, मोठे मोठे नाग, सर्प तथा अप्सरा हे सर्व लोक अत्यंत प्रसन्नतेने राजा भगीरथाच्या मागे मागे गंगेच्या बरोबर चालत जात होते. सर्व प्रकारचे जलचरही गंगेच्या जलराशिबरोबर सानन्द जात होते. ॥ ३१-३२ १/२ ॥
यतो भगीरथो राजा ततो गङ्‍गा यशस्विनी ॥ ३३ ॥

जगाम सरितां श्रेष्ठा सर्वपापप्रणाशिनी ।
ज्या ज्या मार्गाने राजा भगीरथ जात होते त्या त्या प्रांतातील समस्त पापांचा नाश करणारी, सरितांमध्ये श्रेष्ठ, यशस्विनी गंगाही जात होती. ॥ ३३ १/२ ॥
ततो हि यजमानस्य जह्नोरद्‍भुतकर्मणः ॥ ३४ ॥

गङ्‍गा सम्प्लावयामास यज्ञवाटं महात्मनः ।
त्या समयी मार्गात, अद्‌भुत पराक्रमी महामना, राजा जह्नु यज्ञ करीत होता. गंगेने आपल्या जलप्रवाहाने त्याच्या यज्ञमंडपास वाहून नेले. ॥ ३४ १/२ ॥
तस्यावलेपनं ज्ञात्वा क्रुद्धो जह्नुश्च राघव ॥ ३५ ॥

अपिबत् तु जलं सर्वं गङ्‍गायाः परमाद्‍भुतम् ।
रघुनन्दना ! राजा जह्नुने हा गंगेचा गर्व आहे असे समजून ते फार कुपित झाले आणि त्यांनी गंगेचे ते समस्त जल पिऊन टाकले. संसारासाठी ही फार मोठी अद्‌भुत गोष्ट घडली. ॥ ३५ १/२ ॥
ततो देवाः सगन्धर्वा ऋषयश्च सुविस्मिताः ॥ ३६ ॥

पूजयन्ति महात्मानं जह्नुं पुरुषसत्तमम् ।
तेव्हां देवता, गंधर्व आणि ऋषि अत्यंत विस्मित होऊन पुरुषप्रवर महात्मा जह्नुची स्तुति करू लागले. ॥ ३६ १/२ ॥
गङ्‍गां चापि नयन्ति स्म दुहितृत्वे महात्मनः ॥ ३७ ॥

ततस्तुष्टो महातेजाः श्रोत्राभ्यामसृजत् प्रभुः ।
तस्माज्जह्नुसुता गङ्‍गा प्रोच्यते जाह्नवीति च ॥ ३८ ॥
त्यांनी गंगेला त्या महात्मा नरेशाची कन्या बनविले. अर्थात त्यांना पटविले की परत गंगेला प्रकट करून आपण तिचे पिता म्हणून प्रसिद्धी पावाल. त्यामुळे सामर्थ्यशाली महातेजस्वी जह्नु अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या कानांच्या छिद्रावाटे गंगेला पुन्हा प्रकट केले. याकरिता गंगा जह्नुची पुत्री म्हणजे जाह्नवी या नावानेही ओळखली जाते. ॥ ३७-३८ ॥
जगाम च पुनर्गङ्‍गा भगीरथरथानुगा ।
सागरं चापि सम्प्राप्ता सा सरित्प्रवरा तदा ॥ ३९ ॥

रसातलमुपागच्छत् सिद्ध्यर्थं तस्य कर्मणः ।
तेथून परत गंगा भगीरथांच्या रथाचे अनुसरण करीत पुढे चालली. त्यावेळे सरितांमध्ये श्रेष्ठ जाह्नवी समुद्रापर्यंत पोहोचली आणि राजा भगीरथाच्या पितरांच्या उद्धाररूपी कार्याची सिद्धि व्हावी म्हणून रसातलांत गेली. ॥ ३९ १/२ ॥
भगीरथोऽपि राजर्षिर्गङ्‍गां आदाय यत्‍नतः ॥ ४० ॥

पितामहान् भस्मकृतानपश्यद् गतचेतनः ।
राजर्षि भगीरथही यत्‍नपूर्वक गंगेला बरोबर घेऊन तेथे गेले. त्यांनी शापाने दग्ध झालेल्या आपल्या पितामहांना निश्चेष्ट होऊन पाहिले. ॥ ४० १/२ ॥
अथ तद्‍भस्मनां राशिं गङ्‍गासलिलमुत्तमम् ।
प्लावयत् पूतपाप्मानः स्वर्गं प्राप्ता रघूत्तम ॥ ४१ ॥
'रघुत्तमा ! त्यानंतर गंगेच्या उत्तम जलाने सगरपुत्रांच्या त्या भस्मराशीला आप्लवित करून टाकले आणि ते सर्व सगरपुत्र निष्पाप होऊन स्वर्गांत जाऊन पोहोंचले. ॥ ४१ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा त्रेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP