श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ नवमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणप्रभृतीनां जन्म तेषां तपःकरणार्थं गोकर्णाश्रमे प्रवेशः -
रावण आदिंचा जन्म आणि त्याचे तपासाठी गोकर्ण आश्रमात जाणे -
कस्यचित् त्वथ कालस्य सुमाली नाम राक्षसः ।
रसातलान्मर्त्यलोकं सर्वं वै विचचार ह ॥ १ ॥

नीलजीमूतसङ्‌काशः तप्तकाञ्चनकुण्डलः ।
कन्यां दुहितरं गृह्य विना पद्ममिव श्रियम् ॥ २ ॥
काही काळानंतर नील मेघासमान श्याम वर्णाचा राक्षस सुमाली तप्त केलेल्या सोन्याच्या कुंडलांनी अलंकृत होऊन आपल्या सुंदर कन्येला, जी कमलविरहित लक्ष्मीसारखी भासत होती, घेऊन रसातलातून निघाला आणि सार्‍या मर्त्यलोकात विचरू लागला. ॥१-२॥
राक्षसेन्द्रः स तु तदा विचरन् वैन्वै महीतलम् ।
तदापश्यत्स गच्छन्तं पुष्पकेण धनेश्वरम् ॥ ३ ॥

गच्छन्तं पितरं द्रष्टुं पुलस्त्यतनयं विभुम् ।
तं दृष्ट्‍वाऽमरसङ्‌काशं गच्छन्तं पावकोपमम् ॥ ४ ॥

रसातलं प्रविष्टः सन् मर्त्यलोकात् सविस्मयः ।
त्या समयी भूतलावर विचरत असलेल्या त्या राक्षसराजाने अग्निसमान तेजस्वी तथा देवतुल्य शोभा धारण करणार्‍या धनेश्वर कुबेरांना पाहिले जे पुष्पक विमानद्वारा आपले पिता पुलस्त्यनंदन विश्रवा यांचे दर्शना साठी जात होते. त्यांना पाहून तो अत्यंत विस्मित होऊन मर्त्यलोकातून रसातलामध्ये प्रविष्ट झाला. ॥३-४ १/२॥
इत्येवं चिन्तयामास राक्षसानां महामतिः ॥ ५ ॥

किं कृतं श्रेय इत्येवं वर्धेमहि कथं वयम् ।
सुमाली अत्यंत बुद्धिमान्‌ होता. तो विचार करू लागला, काय केले असता आम्हां राक्षसांचे भले होईल ? आम्ही कशा प्रकारे उन्नति करू शकू ? ॥५ १/२॥
अथाब्रवीत् सुतां रक्षः कैकसीं नाम नामतः ॥ ६ ॥

पुत्रि प्रदानकालोऽयं यौवनं व्यतिवर्तते ।
प्रत्याख्यानाच्च भीतैस्त्वं न वरैः प्रतिगृह्यसे ॥ ७ ॥
असा विचार करून त्या राक्षसाने आपल्या कन्येला, जिचे नाव कैकसी होते म्हटले - मुली ! आता तुझ्या विवाहास योग्य समय आला आहे कारण की यावेळी तुझी युवावस्था निघून जात आहे. तू नकार तर देणार नाहीस या भीतीने श्रेष्ठ वर तुझे वरण करत नाही आहेत. ॥६-७॥
त्वत्कृते च वयं सर्वे यन्त्रिता धर्मबुद्धयः ।
त्वं हि सर्वगुणोपेता श्रीः साक्षादिव पुत्रिके ॥ ८ ॥
मुली ! तुला विशिष्ट वराची प्राप्ति व्हावी म्हणून आम्ही फार प्रयास केले आहेत; कारण कन्यादानाविषयी आम्ही धर्मबुद्धि ठेवणारे आहोत. तू तर साक्षात्‌ लक्ष्मीसमान सर्वगुणसंपन्न आहेस. (म्हणून तुझा वरही सर्वथा तुझ्या योग्यच असला पाहिजे. ॥८॥
कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाङ्‌क्षिणाम् ।
न ज्ञायते च कः कन्यां वरयेदिति कन्यके ॥ ९ ॥
मुली ! सन्मानाची इच्छा ठेवणार्‍या सर्व लोकासाठी कन्येचा पिता होणे हे दुःखालाच कारण ठरते, कारण याचा पत्ता लागत नाही की कोण आणि कसा पुरुष कन्येचे वरण करील ? ॥९॥
मातुः कुलं पितृकुलं यत्र चैव च दीयते ।
कुलत्रयं सदा कन्या संशये स्थाप्य तिष्ठति ॥ १० ॥
मातेच्या, पित्याच्या आणि जेथे कन्या दिली जाते त्या पतिच्या कुळाला ही कन्या नेहमी संशयात पाडत राहाते. ॥१०॥
सा त्वं मुनिवरं श्रेष्ठं प्रजापतिकुलोद्‌भवम् ।
भज विश्रवसं पुत्रि पौलस्त्यं वरय स्वयम् ॥ ११ ॥
म्हणून मुली ! तू प्रजापतिच्या कुळात उत्पन्न, श्रेष्ठ, गुणसंपन्न, पुलस्त्यनंदन मुनिवर विश्रवांना स्वतः जाऊन पतिच्या रूपांत वरण कर आणि त्यांच्या सेवेमध्ये रहा. ॥११॥
ईदृशास्ते भविष्यन्ति पुत्राः पुत्रि न संशयः ।
तेजसा भास्करसमो यादृशोऽयं धनेश्वरः ॥ १२ ॥
मुली ! असे केल्याने निःसंदेह तुझे पुत्रही जसे धनेश्वर कुबेर आहेत तसेच होतील. तू तर पाहिलेच आहेस की ते कसे आपल्या तेजाने सूर्यासमान उद्दीप्त होत होते ? ॥१२॥
सा तु तद्वचनं श्रुत्वा कन्यका पितृगौरवात् ।
तत्रोपागम्य सा तस्थौ विश्रवा यत्र तप्यते ॥ १३ ॥
पित्याचे हे वचन ऐकून त्यांच्या गौरवाकडे लक्ष देऊन, जेथे मुनिवर विश्रवा तप करीत होते त्या स्थानावर कैकसी गेली. तेथे जाऊन ती एका जागी उभी राहिली. ॥१३॥
एतस्मिन्नन्तरे राम पुलस्त्यतनयो द्विजः ।
अग्निहोत्रमुपातिष्ठत् चतुर्थ इव पावकः ॥ १४ ॥
श्रीरामा ! इतक्यात पुसस्त्यनंदन ब्राह्मण विश्रवा सायंकाळचे अग्निहोत्र करू लागले. ते तेजस्वी मुनि त्या समयी अग्निबरोबर स्वतःही चतुर्थ अग्निच्या समान देदीप्यमान होत होते. ॥१४॥
अविचिन्त्य तु तां वेलां दारुणां पितृगौरवात् ।
उपसृत्याग्रतस्तस्य चरणाधोमुखी स्थिता ॥ १५ ॥
पित्याच्या प्रति गौरवबुद्धि असल्यामुळे कैकसीने त्या भयंकर वेळेचा विचार केला नाही आणि निकट जाऊन त्यांच्या चरणांकडे दृष्टि लावून खाली मान घालून ती समोर उभी राहिली. ॥१५॥
विलिखन्ती मुहुर्भूमिं अङ्‌गुष्ठाग्रेण भामिनी ।
स तु तां वीक्ष्य सुश्रोणीं पूर्णचन्द्रनिभाननाम् ॥ १६ ॥

अब्रवीत्परमोदारो दीप्यमानां स्वतेजसा ।
ती भामिनी आपल्या पायाच्या अंगठ्‍याने वारंवार जमिनीवर रेखा ओढू लागली. पूर्ण चंद्रम्याप्रमाणे मुख तसेच सुंदर कटिप्रदेश असलेल्या त्या सुंदरीला, जी आपल्या तेजाने जणु उद्दीप्त होत होती पाहून त्या परम उदार महर्षिनी विचारले - ॥१६ १/२॥
भद्रे कस्यासि दुहिता कुतो वा त्वमिहागता ॥ १७ ॥

किं कार्यं कस्य वा हेतोः तत्त्वतो ब्रूहि शोभने ॥ १८ ॥
भद्रे ! तू कोणाची कन्या आहेस, कोठून आली आहेस, माझ्याशी तुझे काय काम आहे ? अथवा कोठल्या उद्देश्याने येथे तुझे येणे झाले आहे ? शोभने ! ह्या सर्व गोष्टी तू मला ठीक ठीक सांग. ॥१७-१८॥
एवमुक्ता तु सा कन्या कृताञ्जलिरथाब्रवीत् ।
आत्मप्रभावेण मुने ज्ञातुमर्हसि मे मतम् ॥ १९ ॥

किं तु मां विद्धि ब्रह्मर्षे शासनात् पितुरागताम् ।
कैकसी नाम नाम्नाहं शेषं त्वं ज्ञातुमर्हसि ॥ २० ॥
विश्रवांनी याप्रकारे विचारल्यावर त्या कन्येने हात जोडून म्हटले -मुने ! आपण आपल्याच प्रभावाने माझा मनोभाव जाणू शकता; परंतु महर्षे ! माझ्या मुखाने इतके अवश्य जाणून घ्या की आपल्या पित्याच्या आज्ञेने आपल्या सेवेसाठी आले आहे आणि माझे नाव कैकसी आहे. बाकी सर्व गोष्टी आपण स्वतः जाणून घेतल्या पाहिजेत. ॥१९-२०॥
स तु गत्वा मुनिर्ध्यानं वाक्यमेतदुवाच ह ।
विज्ञातं ते मया भद्रे कारणं यन्मनोगतम् ॥ २१ ॥

सुताभिलाषो मत्तस्ते मत्तमातङ्‌गगामिनि ।
दारुणायां तु वेलायां यस्मात् त्वं मामुपस्थिता ॥ २२ ॥

शृणु तस्मात् सुतान् भद्रे यादृशाञ्जनयिष्यसि ।
दारुणान् दारुणाकारान् दारुणाभिजनप्रियान् ॥ २३ ॥

प्रसविष्यसि सुश्रोणि राक्षसान् क्रूरकर्मणः ।
हे ऐकून मुनिनी थोडा वेळ ध्यान लावले आणि त्यानंतर म्हटले -भद्रे ! तुझा मनोभाव मला माहीत झाला. मत्त गजराजाप्रमाणे मंदगतिने चालणार्‍या सुंदरी ! तू माझ्याकडून पुत्र प्राप्त करू इच्छितेस, परंतु या दारूण वेळेमध्ये माझ्याजवळ आली आहेस म्हणून हेही ऐकून घे की तू कशा पुत्रांना जन्म देशील. सुश्रोणी ! तुझे पुत्र क्रूर स्वभावाचे आणि शरीरानेही भयंकर होतील तसेच त्यांचे क्रूरकर्मा राक्षसांशीच प्रेम राहील. तू क्रूरतापूर्ण कर्म करणार्‍या राक्षसांनाच उत्पन्न करशील. ॥२१-२३ १/२॥
सा तु तद्वचनं श्रुत्वा प्रणिपत्याब्रवीद् वचः ॥ २४ ॥

भगवन्नीदृशान् पुत्रान् त्वत्तोऽहं ब्रह्मवादिनः ।
नेच्छामि सुदुराचारान् प्रसादं कर्तुमर्हसि ॥ २५ ॥
मुनिंचे हे वचन ऐकून कैकसी त्यांच्या चरणांवर पडली आणि याप्रकारे बोलली - भगवन्‌ ! आपण ब्रह्मवादी महात्मा आहात. मी आपल्यापासून अशा दुराचारी पुत्रांना प्राप्त करण्याची अभिलाषा ठेवत नाही म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. ॥२४-२५॥
कन्यया त्वेवमुक्तस्तु विश्रवा मुनिपुङ्‌गवः ।
उवाच कैकसीं भूयः पूर्णेन्दुरिव रोहिणीम् ॥ २६ ॥
त्या राक्षसकन्येने असे म्हटल्यावर पूर्णचंद्रम्यासारख्या मुनिवर विश्रवांनी रोहिणी सारख्या सुंदरी कैकसीला परत म्हटले - ॥२६॥
पश्चिमो यस्तव सुतो भविष्यति शुभानने ।
मम वंशानुरूपः स धर्मात्मा च न संशयः ॥ २७ ॥
शुभानने ! तुझा जो सर्वात लहान आणि अंतिम पुत्र होईल, तो माझ्या वंशास अनुरूप धर्मात्मा होईल यात संशय नाही आहे. ॥२७॥
एवमुक्ता तु सा कन्या राम कालेन केनचित् ।
जनयामास बीभत्सं रक्षोरूपं सुदारुणम् ॥ २८ ॥

दशग्रीवं महादंष्ट्रं नीलाञ्जनचयोपमम् ।
ताम्रोष्ठं विंशतिभुजं महास्यं दीप्तमूर्धजम् ॥ २९ ॥
श्रीरामा ! मुनिनी असे सांगितल्यावर कैकसीने काही कालानंतर अत्यंत भयानक आणि क्रूर स्वभावाच्या एका राक्षसाला जन्म दिला, ज्याला दहा मस्तके, मोठ मोठ्‍या दाढा, तांब्यासारखे ओठ, वीस भुजा, विशाल मुख आणि चमकणारे केस होते. त्याच्या शरीराचा रंग कोळशाच्या पहाडाप्रमाणे काळा होता. ॥२८-२९॥
तस्मिञ्जाते ततस्तस्मिन् सज्वालकवलाः शिवाः ।
क्रव्यादाश्चापसव्यानि मण्डलानि प्रचक्रमुः ॥ ३० ॥
तो उत्पन्न होताच तोंडात ज्वालांची कोर असलेल्या कोल्हीणी आणि मांसभक्षी गृध्र आदि पक्षी डाव्या बाजूस मंडलाकार फिरू लागले. ॥३०॥
ववर्ष रुधिरं देवो मेघाश्च खरनिःस्वनाः ।
प्रबभौ न च सूर्यो वै महोल्काश्चापतन् भुवि ॥ ३१ ॥

चकम्पे जगती चैव ववुर्वाताः सुदारुणाः ।
अक्षोभ्यः क्षुभितश्चैव समुद्रः सरितां पतिः ॥ ३२ ॥
इंद्रदेव रक्ताची वृष्टि करू लागले. मेघ भयंकर स्वरात गर्जू लागले, सूर्याची प्रभा फिक्की पडली, पृथ्वीवर उल्कापात होऊ लागले, धरती कापू लागली, भयानक वादळ सुटले आणि जो कुणाकडूनही क्षुब्ध न केला जाणारा तो सरितांचा स्वामी समुद्र विक्षुब्ध झाला. ॥३१-३२॥
अथ नामाकरोत् तस्य पितामहसमः पिता ।
दशग्रीवः प्रसूतोऽयं दशग्रीवो भविष्यति ॥ ३३ ॥
त्या समयी ब्रह्मदेवाप्रमाणे तेजस्वी पिता विश्रवा मुनिनी पुत्राचे नामकरण केले - हा दहा ग्रीवा घेऊन उत्पन्न झाला आहे म्हणून दशग्रीव नावाने प्रसिद्ध होईल. ॥३३॥
तस्य त्वनन्तरं जातः कुम्भकर्णो महाबलः ।
प्रमाणाद् यस्य विपुलं प्रमाणं नेह विद्यते ॥ ३४ ॥
त्यानंतर महाबली कुम्भकर्णाचा जन्म झाला, ज्याच्या शरीराहून मोठे शरीर या जगतात दुसर्‍या कोणाचेही नाही. ॥३४॥
ततः शूर्पणखा नाम सञ्जज्ञे विकृतानना ।
विभीषणश्च धर्मात्मा कैकस्याः पश्चिमः सुतः ॥ ३५ ॥
यानंतर विकराल मुखाची शूर्पणखा उत्पन्न झाली. तदनंतर धर्मात्मा विभीषणाचा जन्म झाला जो कैकसीचा अंतिम पुत्र होता. ॥३५॥
तस्मिञ्जाते महासत्त्वे पुष्पवर्षं पपात ह ।
नभःस्थाने दुन्दुभयो देवानां प्राणदंस्तथा ।
वाक्यं चैवान्तरिक्षे च साधु साध्विति तत् तदा ॥ ३६ ॥
त्या महान्‌ सत्त्वशाली पुत्राचा जन्म होताच आकाशांतून पुष्पवृष्टि झाली आणि आकाशांत देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या. त्या समयी अंतरिक्षात साधु, साधु चा ध्वनि ऐकू येऊ लागला. ॥३६॥
तौ तु तत्र महारण्ये ववृधाते महौजसौ ।
कुम्भकर्णदशग्रीवौ लोकोद्वेगकरौ तदा ॥ ३७ ॥
कुम्भकर्ण आणि दशग्रीव हे दोन्ही महाबली राक्षस लोकात उद्वेग उत्पन्न करणारे होते. ते दोघेही त्या विशाल वनात पालित होऊ लागले आणि वाढू लागले. ॥३७॥
कुम्भकर्णः प्रमत्तस्तु महर्षीन् धर्मवत्सलान् ।
त्रैलोक्ये नित्यासन्तुष्टो भक्षयन् विचचार ह ॥ ३८ ॥
कुम्भकर्ण फारच उन्मत्त निघाला. त्याची भोजनाने कधी तृप्तिच होत नव्हती, म्हणून तीन्ही लोकात फिरफिरून धर्मात्मा महर्षिंना खात हिंडत होता. ॥३८॥
विभीषणस्तु धर्मात्मा नित्यं धर्मव्यवस्थितः ।
स्वाध्यायनियताहार उवास विजितेन्द्रियः ॥ ३९ ॥
विभीषण बालपणा पासूनच धर्मात्मा होते. ते सदा धर्मामध्ये स्थित रहात होते, स्वाध्याय करत आणि नियमित आहार करीत, इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवत असत. ॥३९॥
अथ वैश्रवणो देवः तत्र कालेन केनचित् ।
आगतः पितरं द्रष्टुं पुष्पकेण धनेश्वरः ॥ ४० ॥
काही काळ गेल्यावर धनाचे स्वामी वैश्रवण पुष्पक विमानावर आरूढ होऊन आपल्या पित्याच्या दर्शनासाठी तेथे आले. ॥४०॥
तं दृष्ट्‍वा कैकसी तत्र ज्वलन्तमिव तेजसा ।
आगम्य राक्षसी तत्र दशग्रीवमुवाच ह ॥ ४१ ॥
ते आपल्या तेजाने प्रकाशित होत होते. त्यांना पाहून राक्षसकन्या कैकसी आपला पुत्र दशग्रीव याच्याजवळ आली आणि याप्रकारे म्हणाली - ॥४१॥
पुत्र वैश्रवणं पश्य भ्रातरं तेजसा वृतम् ।
भ्रातृभावे समे चापि पश्यात्मानं त्वमीदृशम् ॥ ४२ ॥
मुला ! आपला भाऊ वैश्रवण याच्याकडे तर पहा. ते कसे तेजस्वी भासत आहेत. भाऊ या नात्याने तूही त्यांच्या समानच आहेस. परंतु आपल्या अवस्थेकडे पहा कशी आहे ती ? ॥४२॥
दशग्रीव तथा यत्‍नं कुरुष्वामितविक्रम ।
यथा त्वमसि मे पुत्र भवेर्वैश्रवणोपमः ॥ ४३ ॥
अमित पराक्रमी दशग्रीवा ! माझ्या मुला ! तूही असा काही प्रयत्‍न कर की ज्यायोगे वैश्रवणाप्रमाणेच तेज आणि वैभवाने संपन्न होशील. ॥४३॥
मातुस्तद् वचनं श्रुत्वा दशग्रीवः प्रतापवान् ।
अमर्षमतुलं लेभे प्रतिज्ञां चाकरोत् तदा ॥ ४४ ॥
मातेचे हे वचन ऐकून प्रतापी दशग्रीवाला अनुपम अमर्ष झाला. त्याने तात्काळ प्रतिज्ञा केली - ॥४४॥
सत्यं ते प्रतिजानामि भ्रातृतुल्योऽधिकोऽपि वा ।
भविष्याम्योजसा चैव संतापं त्यज हृद्‌गतम् ॥ ४५ ॥
आई ! तू आपल्या हृदयांतील चिंता सोड. मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आपल्या पराक्रमाने भाऊ वैश्रवणाप्रमाणे अथवा त्याच्याहूनही वरचढ होईन. ॥४५॥
ततः क्रोधेन तेनैव दशग्रीवः सहानुजः ।
चिकीर्षुर्दुष्करं कर्म तपसे धृतमानसः ॥ ४६ ॥

प्राप्स्यामि तपसा कामं इति कृत्वाध्यवस्य च ।
आगच्छदात्मसिद्ध्यर्थं गोकर्णस्याश्रमं शुभम् ॥ ४७ ॥
त्यानंतर त्याच क्रोधाच्या आवेशात भावांसहित दशग्रीवाने दुष्कर कर्माची इच्छा मनांत ठेऊन विचार केला - मी तपस्येनेच आपला मनोरथ पूर्ण करू शकेन. असा विचार करून त्याने तपस्येचाच निश्चय केला आणि आपल्या अभीष्ट-सिद्धिसाठी तो गोकर्णाच्या पवित्र आश्रमावर गेला. ॥४६-४७॥
स राक्षसस्तत्र सहानुजस्तदा
तपश्चकारातुलमुग्रविक्रमः ।
अतोषयच्चापि पितामहं विभुं
ददौ स तुष्टश्च वराञ्जयावहान् ॥ ४८ ॥
भावांसहित त्या भयंकर पराक्रमी राक्षसाने अनुपम तपस्या आरंभली. त्या तपस्येच्या द्वारा त्याने भगवान्‌ ब्रह्मदेवांना संतुष्ट केले आणि त्यांनी प्रसन्न होऊन त्याला विजय मिळवून देणारे वरदान दिले. ॥४८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा नववा सर्ग पूरा झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP