॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय एकोणिसावा ॥
श्रीरामांचा सीताशोक

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेवर राक्षसिणींचा पाहारा असतो त्याचे वर्णन :

अशोकवनीं सीतेपासी । दुष्ट दुर्धर राक्षसी ।
रावण ठेवी भेडसावयासी । भयें आपणासी वश होईल ॥ १ ॥

अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिती ।
तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः परिवारिता ॥ १ ॥

सीतासंरक्षणीं नित्यवासी । विकटा विकृता समयेंसी ।
विरुपा विक्राळा राक्षसी । अशोकवनासी त्या आल्या ॥ २ ॥
नानारुपा नानाकारा । विक्राळा कराळा अति उग्रा ।
भिंगुलवण्या भयासुरा । आल्या समग्रा सीतेपासीं ॥ ३ ॥
एकीचें विक्राळ वदन । सर्वांगासी एकचि कान ।
तीसी कानचि आच्छादन । येरवीं नग्न कराळी ॥ ४ ॥
लागतां कानाचा फडकारा । नक्षत्रें पडती जैशा गारा ।
जयाचें भय सुरसुरां । सीतेसी भेदरा देऊं आल्या ॥ ५ ॥
एकींचे उटकंटक कपाळा । थडक हाणिती लोकपाळां ।
कपाळावरी विकट डोळा । जनकबाळा छळूं आल्या ॥ ६ ॥
एकींस एक कान आंथरुण । दुसरा कान तो प्रावरण ।
कानें कापती त्रिभुवन । सीतेसी छळण करुं आल्या ॥ ७ ॥
एकी स्तनायुधा दुर्धरा । एकैक थान गांवें बारा ।
स्तनघातें मारी असुरां । सीतेसी भेदरा देऊ आली ॥ ८ ॥
भ्यासुर मुख दीर्घ दांताळी । दांतीं दिग्गजां करी रांगोळी ।
वीर निर्दाळी दांतांतळीं । सीतेजवळी भय दावी ॥ ९ ॥
एकीचे केश सलंव पूर्ण । तेंचि नेसणें तेंची पाघरुण ।
केश तिखट जैसे बाण । केशाभेणें जग पळे ॥ १० ॥
अजामुखी गजमुखी । सिंहश्वानशूकरमुखी ।
व्याघ्रवानरतरसमुखी । घोडमुखी विक्राळा ॥ ११ ॥
खरोर्ष्ट्रवक्त्रा सलंब ओष्ठ । होटें प्राण्याचा भरिती घोट ।
अवघ्या आलिया सीतेनिकट । भय उद्भट दावावया ॥ १२ ॥
विक्राळ मुख दीर्घ चांभाडी । कंटकी जिव्हा तांबडी ।
ते देखतां प्राणी प्राण सांडी । भक्षी मडीं राक्षसांचीं ॥ १३ ॥
राक्षस भक्षिती मनुष्यांसी । विक्राळा भक्षिती राक्षसांसी ।
तिसी रावण धाडी सीतेपासी । भयें आपणासी वरावया ॥ १४ ॥
वांकडें मुख दीर्घ नाक । तेंही लांबवावें विशेख ।
जिचे श्वासावर्ती जग देख । शतानुशतक तळमळत ॥ १५ ॥
नाकींचिया केसांआंत । म्हैसे गुंतले ओरडत ।
सिंह गुंतले तडफडित । गजावर्त विकटास्या ॥ १६ ॥
नखायुधा क्रूरमुख । सलंब नखें अति तिख ।
तींही लांब क्रोश एक । इंद्रादिक कांपती ॥ १७ ॥
नखाघात अति उद्भट । घायें शस्त्र करी पीठ ।
नखें पर्वत करी सपाट । दुर्धर दुष्ट नखायुधा ॥ १८ ॥
एकपादा आणि त्रिपादा । पंचपादादि हस्तपादा ।
शस्त्रास्त्रीं सन्नद्धबद्धा । आलिया उन्मादा राक्षसी ॥ १९ ॥
वाल्मीकरामायणाप्रती । राक्षसी बोलिल्या आहेत बहुती ।
तो विस्तारु न धरवे हातीं । कथा ग्रंथीं वाढेल ॥ २० ॥
पुढील कथेची संगती । कृपा करावी साधुसंती ।
स्वयें रावण राक्षसीप्रती । काय उपपत्ति बोलिला ॥ २१ ॥

तथा च तर्जनैर्घोरैः पुनः सांत्वेश्च मैथिलीम् ।
आनयध्वं मम वशे वन्यां गजवधूमीव ॥ २ ॥

रावण सांगे राक्षसीसी । दुर्धर भेडसावा सीतेसी ।
गर्जन तर्जन अति आवेशीं । अट्टहासेंसीं गर्जोनी ॥ २२ ॥
ऐसें करावें गर्जन । तिचे चळकांपे मन ।
अत्यंत होवोन उद्विग्न । मूर्च्छापन्न भयभीत ॥ २३ ॥
सुखें वरीन मी रावण । ऐसें बोले जंव आपण ।
तंववरी भय दाविजे संपूर्ण । जंव शरण मज होय ॥ २४ ॥

सीतेला भीती निर्माण करण्याची राक्षसिणींना आज्ञा :

मज आलिया अनन्यशरण । तिसी करावें सुखशांतवन ।
सीते तुझें भाग्य धन्य । जे दशानन तुज कांत ॥ २५ ॥
ऐसें सांगोनि तयांसी । धाडिल्या अशोकवनासी ।
वश जालिया सीतेसी । आणावी गजरेंसीं मजपासीं ॥ २६ ॥
मग राक्षसी मिळोनि समस्ती । कोइत्या मुद्गल त्रिशूळ हातीं ।
आल्या अशोकवनाप्रती । हाक देती दुर्धर ॥ २७ ॥
हाकीं गर्जलें अंबर । स्वर्गीं कांपती सुरवर ।
भूतळीं गर्जती नर किन्नर । ऋषीश्वर भयभीत ॥ २८ ॥
राक्षसी करिती दीर्घ रवो । सीता मारोनि मांस खावों ।
तुझें कंठीचें रुधिर पिवों । आणि हार लेवों हाडांचें ॥ २९ ॥
तुझें सर्वांगचिया शिरीं । करुं शेवयांची खिंरी ।
काळी काढोनि बाहेरी । कोशिंबिरी करुं आम्ही ॥ ३० ॥
ऐशिया गर्जती राक्षसी । अवघ्या आल्या सीतेपासीं ।
तंव तें भय भासेना सीतेसी । श्रीरामस्मरणें निःशंक ॥ ३१ ॥
देखतां सीतेचें दर्शन । राक्षसी झाल्या कंपायमान ।
सीतेनें पाहिल्या क्षोभोन । आमचा प्राण घेईल ॥ ३२ ॥
सीता देखतांचि दृष्टी । भयें पळाल्या उठाउठीं ।
राक्षसी भयभीत पोटीं । गोष्टी उफराटी येथें जाली ॥३३॥

सर्व प्रयत्‍न वाया गेल्यामुळे दुःख :

भेडसावूं जातां सीतेसी । भयभीत जाल्या राक्षसी ।
श्रीरामस्मरणाचा महिमा ऐशी । द्वंद्व भक्तांसी बाधीना ॥ ३४ ॥
मग रावणा सांगती निशाचरी । सीता आमुचें भय न धरी ।
आम्हां सीतेचे भय भारी । सर्वांपरी निःशंक ॥ ३५ ॥
तंव रावण म्हणे सती सीता । निःशंक निधडी पतिव्रता ।
हे मज भोगवेना सर्वथा । कष्ट वृथा गेले माझे ॥ ३६ ॥

राम व लक्ष्मण आश्रमाकडे येतेवेळी त्यांना मार्गांत अपशकुन होतात :

तंव येरीकडे श्रीराम सौमित्र । दोघे होवोनि एकत्र ।
आश्रमीं एकली सीता सुंदर । दोघे सत्वर निघाले ॥ ३७ ॥

व्रजतस्तत्र तस्याथ वामलोचनमस्फुरत ।
प्रास्फुरच्चास्खलद्रामो वेपथुश्चास्य जायते ॥ ३ ॥
उपालभ्य निमित्तानि सो‍ऽशुभानि मुहुर्महुः ।
अपि सीताश्रमे सा स्याद्व्याजहार पुनःपुनः ॥ ४ ॥

सीतेचे भेटीस जातां जाण । अशुभ लवें वाम नयन ।
पदोपदीं रघुनंदन । अडखळे आपण क्षणक्षणां ॥ ३८ ॥
सौमित्रा ऐकें सावधान । अशुभ होताती अपशकुन ।
आजि सीतेचें दर्शन । केंवी देखों हें न कळे ॥ ३९ ॥
लक्ष्मणा एकली सीता । आश्रमीं असेल काय आतां ।
वारंवार होय् पुसता । प्रबळ चिंता सीतेची ॥ ४० ॥

आश्रमात सीतेला एकटी ठेवून आल्याबद्दल लक्ष्मणाला दोष :

आश्रमीं एकली सीता सांडोनी । कां येथें आलासी धांवोनी ।
हरोनि नेतां राक्षसीं पत्‍नी । कोण तिजलागोनी सोडवील ॥ ४१ ॥
स्त्रियेच्या क्षुद्र बोलासाठीं । त्वां कां रागें सोडिली पंचवटी ।
सीता हरील रावण हट्टी । बुद्धि खोटी तुवां केली ॥ ४२ ॥
अशुभ होताती अपशकुन । तेणें मी अत्यंत उद्विग्न ।
सीता मागुती देखेन । हें सहसा मन मानीना ॥ ४३ ॥

ददर्श पर्णशालां च सीतया रहितां तदा ।
श्रिया विरहितां ध्वस्तां हेमंते पद्मिनीमिव ॥ ५ ॥
रुदंतमिव वृक्षैश्च ग्लानपुष्पमृगद्विजम् ।
श्रिया विहीनं विध्वस्तं संत्यक्तं वनदेवतैः॥ ६ ॥

पंचवटीत कोठेच सीता आढळेना म्हणून सर्वत्र शोधाशोध :

ऐशा मार्गी करिता गोष्टी । दोघे आले पंचवटीं ।
सुंदर कपाळेशानिकटीं । सीता गोरटी दिसेना ॥ ४४ ॥
शोधोनि पाहिली पंचवटी । शोधिली उभय गंगातटीं ।
वनीं धुंडितां परम कष्टीं । जालें जगजेठी अति श्रांत ॥ ४५ ॥
दोघे आले पंचवटीं । तंव रिती दिसे पर्णकुटी ।
जनीं वनीं हिंडतां दृष्टी । सीता गोरटी दिसेना ॥ ४६ ॥
जरी शुद्धि पुसावी ऋषिजनीं । तरी ते पळाले जीव घेवोनी ।
मनुष्यमात्र न दिसे वनीं । तंव लक्ष्मण मनीं धाकत ॥ ४७ ॥
श्रीराम धाकत होता पोटीं । तेचि येथें घडली गोष्टी ।
अपेशपात्र जालों सृष्टीं । लक्ष्मणापोटीं अति चिंता ॥ ४८ ॥
लक्ष्मणें हारविली सीता । हें अपेश बैसलें माथां ।
काय मी सांगों रघुनाथा । शोधितां सीता दिसेना ॥ ४९ ॥
शुद्धि पुसों जातां वनीं । तव वृक्ष खांकरले फळपुष्पांनीं ।
जेंवी अंतरल्या जननी । दीनवदनी अपत्यें ॥ ५० ॥
वृक्ष स्रवती संपूर्ण । पशु पक्षी करिती रुदन ।
वनश्री गेली पळोन । अवदशा पूर्ण वना आली ॥ ५१ ॥
पक्षिणी पडल्या पारधियाहातीं । पिल्लीं चरफडती फडफडितीं ।
तेंवी नेलिया सीता सती । जाली उपहती आश्रमी ॥ ५२ ॥
सीतेचेनि दुःखें जाण । सर्वांगीं द्रवती पाषाण ।
थेंबटे गाळों लागलें तृण । दुःख दारुण सर्वांसी ॥ ५३ ॥
ऐसी देखोनि उपहती । श्रीराम सुखावला चित्ती ।
करावया अवतारख्याती । निजपुरुषार्थी उद्दतु ॥ ५४ ॥

रामाचा अनावर क्रोध :

सज्ञान माझी सीता सती । जे ससैन्य रावणवधार्थी ।
स्वयें गेली लंकेप्रती । राक्षसां ख्याती लावावया ॥ ५५ ॥
समुद्रीं तारुन पाषाण । मारीन रावण कुंभकर्ण ।
श्रीरामा आले स्फुरण । कुळनिर्दळण राक्षसांचे ॥ ५६ ॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । सोडवीन देवांची बाधवडी ।
रामराज्याची निजगुढी । जगीं रोकडी उभवीन ॥ ५७ ॥
ऐसा श्रीराम सर्वज्ञ । जाणोनि भविष्याचें ज्ञान ।
सीतासुद्ध्यर्थ आपण । भ्रमलेपण स्वयें दावी ॥ ५८ ॥
जैसी अवताराची गती । तैसी अवताराची स्थिती ।
श्रीराम निघाला तैसियां रीतीं । सीताशुद्ध्यर्थी विलापत ॥ ५९ ॥
श्रीराम अवतार सुनिश्चित । त्यासीही लोकसंग्रहार्थ ।
वसिष्ठे नेमिला परमार्थ । तेंचि रघुनाथ संपादी ॥ ६० ॥

अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडः ।
अंतरत्यागी बहिःसंगी लोके विहर राघव ॥ ७ ॥
बहिः कृत्रिमसंरंभो हृदि संरंभवर्जितः ।
अकर्ता च बहिःकर्ता लोके विहर राघव ॥ ८ ॥
अंतर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखो हि वा ।
बहिस्तप्तोंऽतराशीतो लोके विहर राघव ॥ ९ ॥

श्रीरामांची मानसींची भूमिका :

अंतरीं जाणोनी परब्रह्म । बाह्य सीतार्थी विरहभ्रम ।
अंतरीं स्वतःसिद्ध निष्काम । बाह्य दुःखधर्म सीताशुद्धि ॥ ६१ ॥
अंतरी अद्वैतप्रतीती । बाह्य सीता पुसे जीवांप्रती ।
वृक्षवल्लींस ये काकुळती । सीता निश्चितीं मज सांग ॥ ६२ ॥
अंतरी निजबोध अति गोड । बाह्य सीतादुःखें अति जड ।
अंतरीं निर्विषय सुरवाड । बाह्य धुमाड विषयांचा ॥ ६३ ॥
अंतरीं अद्वैत्वें सर्वत्यागू । बाह्य सीतेसीं विषयसंगू ।
अंतरीं सुनिश्चित चांगू । बाह्य लगबगू धांवण्या धांवे ॥ ६४ ॥
अंतरी अणुमात्र नाहीं चाड । बाह्य सीतार्थी अति चरफड ।
अंतरी निजसुखसुरवाड । बाह्य दुर्वाड अति दुःखी ॥ ६५ ॥
अंतरी नित्य नैराश्य । बाह्य सीतेचा आशापाश ।
तिचेनि दुःखें अति संत्रास । पिशाचभास जगीं दावी ॥ ६६ ॥
अंतरीं संतापनिवृत्त । बाह्य संतापें अति संतप्त ।
अंतरीं सर्वार्थनिर्मुक्त । बाह्य विषयासक्त सीतार्थी ॥ ६७ ॥
अंतरीं भूतकृपा चोखडी । बाह्य युद्धार्थ पुरुषार्थपरवडी ।
मारोनि राक्षसांच्या कोडी । गजकरवडी पाडितु ॥ ६८ ॥
अंतरी बोध अकर्त्रात्मता । बाह्य दिसे युद्धकर्ता ।
मारोनि राक्षसां समस्तां । लंकानाथा निर्दळील ॥ ६९ ॥
सदगुरु वसिष्ठाचे युक्तीं । श्रीराम वर्ते निजात्मस्थितीं ।
हें न कळे लोकांप्रती । श्रीराममूर्ति परब्रह्म ॥ ७० ॥
वाल्मींकमुनीचें भाषित । सत्य करावया श्रीरघुनाथ ।
विलपत सीताशुद्ध्यर्थ । स्वयें बोलत तें ऐका ॥ ७१ ॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । वेगीं बोलावीं सीतेसी ।
माझी आज्ञा कां न मानिसी । तुज काय तिसी अबोला ॥ ७२ ॥
तूं तंव सीतेसीं क्षोभलासी । रागें तिसीं न बोलसी ।
तरी मीच पाचारितों तिसी । अतिसंभ्रमेंसीं अनुवादे ॥ ७३ ॥

किं धावसि प्रिये दूरं दृष्टासि कमलेक्षणे ।
वृक्षेणावृत्य चात्मानं कस्मान्न प्रतिभाषसे ॥ १० ॥
तिष्ठ तिष्ठ वरारोहे न तेऽस्ति करुणा मयि ।
नात्यर्थं हास्यशिलासि किमर्थ मामुपेक्षसे ॥ ११ ॥

सीतेसाठी शोक व करुणाद्र चित्तः

मी तुज देखतो वो सुंदरी । तूं कां पळतेसी दुरिचे दुरी ।
रिघोनि वृक्षगुल्मांमाझारीं । नेत्रोंतरीं कां लपसी ॥ ७४ ॥
उभी वो राहें येथें । तूं जाशील जेथें जेथें ।
मी येईन तुजसांगातें । सांडोनि मातें जाऊं नको ॥ ७५ ॥
मृगकंचुकीसाठीं । मजसीं रुसलीसी गोरटी ।
मज न देसी दृष्टिभेटी । माझी गोष्टी कां नाइकसी ॥ ७६ ॥
माझे सेवेची तुझ आवडी । मज न विसंबसी अर्धघडी ।
तें तू आजि कडोविकडी । वृक्षाबुडीं कां लपसी ॥ ७७ ॥
मृग मारोनि मज येतां । विलंब लांगता तत्वतां ।
तेणे क्षोभ जाला चित्ता । क्षमा सर्वथा मज करीं ॥ ७८ ॥
लक्ष्मण न करी तुझें वचन । तेणें जालीस क्षोभायमान ।
तदर्थीं माझें लोटांगण । क्षमा पूर्ण मज करीं ॥ ७९ ॥
कृपेनें मज द्यावी भेटी । सांगें जीवींची गुजगोष्टी ।
तूं एकाकी गोरटी । वन दिक्पुटीं कां जासी ॥ ८० ॥
तुजलांगीं मी आर्तभूत । तुझें कां वो निष्ठुर चित्त ।
कृपेनें येवोनियां येथ । माझे आर्त पुरवावें ॥ ८१ ॥
ऐसेनि न भेटे निजकांता । वृक्षवल्लीतें होय पुसतां ।
पशुपक्ष्यादि समस्तां । पुसे सीता श्रीराम ॥ ८२ ॥
तुम्ही न बोला सकोपता । तुमचे चरणीं माझा माथा ।
केउती आहे माझी सीता । मज तत्वतां सांगावी ॥ ८३ ॥
देखोनि पर्वत पाषाण । श्रीराम घाली लोटांगण ।
तुम्हीं तरी कृपा करुन । सांगावी आपण सीताशुद्धि ॥ ८४ ॥
ऐसी न देखतां सीता । श्रीरामासी परम चिंता ।
लक्ष्मणासी होय सांगत । गता मृता जानकी ॥ ८५ ॥

अव्रवील्लक्ष्मणं दीनो मुखेन परिशुष्यता ।
हता मृता गता सीता भक्षिता वा तपस्विनी ॥ १२ ॥

वाटेत सीतेचा शोध व रामांचा विलाप :

श्रीराम म्हणे सीता एकली । राक्षयभयें पळोन गेली ।
किंवा आपभयें निमाली । अथवा मारिली राक्षसी ॥ ८६ ॥
राक्षसीं सीता मारुन । स्वेच्छा केलें भक्षण ।
ऐसें बोलोनि रघुनंदन । मुर्च्छापन्न अति दुःखी ॥ ८७ ॥
सीता सीता म्हणतां वेळोवेळां । वाळले ओंठ सुकला गळा ।
अश्रु पूर्ण आले डोळां । जनकबाळ केउती आहे ॥ ८८ ॥
मूर्च्छापन्न मूर्च्छे आंत । हाय हाय सीता म्हणत ।
सीताविरहें श्रीरघुनाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥ ८९ ॥
पडे अडखळे उठे बैसे । सीता सीता म्हणे आवेशें ।
सीताविरहें लागले पिसें । क्षणक्षणां पुसे जानकी ॥ ९० ॥

क्व गता मां परित्यक्त्वा हा सीतेति पुनःपुनः ।
इत्येवं विलापंरामः पर्यधावव्दनाव्दनम् ॥ १३ ॥
क्वचिदुद्भ्रमते योगात्क्वचिद्विभ्रमते बलात् ।
क्वचिनमत्त इवाभाति कांतान्वेषणतत्परः॥ १४ ॥
क्वचित्स्खलन्क्वचिव्दीक्षन्क्वचिद्धावन्क्वचित्पतन् ।
उच्चैनीचैश्च विक्रोशन्सीता सीतेति वा वदन् ॥ १५ ॥

चराचर सृष्टीलाच सीतेविषयी पृच्छा :

आतां काय सीतेची आशा । म्हणोनि धांवे दाही दिशा ।
सीतेलागीं झाला पिसा । अति आक्रोशें विलपत ॥ ९१ ॥
हा हा सीते हा हा सीते । म्हणोनि पाहे सभोवतें ।
न देखोनियां सीतेतें । वनीं वनातें परिभ्रमे ॥ ९२ ॥
कोठे अडखळे कोठे उडे । कोठे रडे कोठें पडे ।
सीताविरहें जालें वेडें । पाहे चहूंकडे जानकी ॥ ९३ ॥
सीता सीता म्हणोनि देखा । अति आक्रोशें मारी हाका ।
लक्ष्मणा तूं माझा सखा । उगाचि तूं कां पाहतोसी ॥ ९४ ॥
सीते वेगीं तूं धांव पाव । अति संभ्रमेंसीं देई खेंव ।
मी गर्जोनि घेतों नांव । माझी करुणा कां हो नुपजेचि ॥ ९५ ॥
कां रुसलील्स सांगतिणी । म्हणोनि आंग टाकी धरणीं ।
सवेंचि धांवे उन्मत्तपणीं । वनीं काननीं गिवसित ॥ ९६ ॥

तस्य शैलस्य सानूनि गुहाश्च शिखराणि च ।
प्रयत्‍नेन विचिनवतौ नेव तामधिजग्मतुः ॥ १६ ॥
विचिंत्य सर्वतः शैलं रामो लक्ष्मणमव्रतीत् ।
न तां पश्यामि सौमित्रे वैदेहीं पर्वते शुभाम् ॥ १७ ॥

दर्‍या दरकुटें पर्वतशिखरें । गिरिगव्हरें गुहाकंदरें ।
शोधितां श्रीरामसौमित्रें । सीता सर्वत्र दिसेना ॥ ९७ ॥
श्रीराम म्हणे सौमित्रासी । शोधितां पर्वत देशोदेशीं ।
सीता न भेटे आम्हांसी । शुद्धि कोणासी पुसावी ॥ ९८ ॥
शुद्धि पुसावया जाण । हें केवळ वन विजन ।
शोधितां न भेटे जन । काय आपण करावें ॥ ९९ ॥
ऐसें बोलतां श्रीरघुनाथा । सीताविरहें संभ्रांतता ।
पुसों धांवे तो पर्वत । पर्वतामाथां वृक्षांसी ॥ १०० ॥

रे वृक्षाः पर्वतस्था गिरिगहनलता वायुना विज्यमाना ।
रामोऽहं व्याकुलात्मा दशरथतयः शोकवृत्तश्च दग्ध ।
बिंबोष्ठी चारुनेत्रा सुविपुलजघना वद्धरत्‍नाढ्यकांची ।
हा सीता केन नीता मम हृदयगता को भवान्केन दृष्टा ॥ १८ ॥

पर्वताग्रीं वृक्ष हो । तुम्हीं दुरीं देखतां पाहाहो ।
तरी माझ्या हृदयींचा संदेहो । निःसंदेहो तुम्ही करा ॥ १ ॥
म्हणाल तूं कोण कोणाचा । तरी मी राम दशरथाचा ।
सीतावियोगविरहाचा । अति दुःखाचा पर्वत ॥ २ ॥
सीता म्हणाल आहे कैसी । तिचिया निजस्वरुपासी ।
मी सांगेन तुम्हांपासीं । यथार्थेसीं सुचिन्हे ॥ ३ ॥
आरक्त नेत्र आरक्त अधर । सुंदर सुनासिका सुकुमार ।
कटीं रत्‍नाढ्य कुटिसूत्र । पीतांबरधर जानकी ॥ ४ ॥
ऐसिया लावण्याची खाणी । तुम्हांमाजी देखिली कोणीं ।
ते सांगावी मजलागोनी । तिची धांवणी मी करीन ॥ ५ ॥
वायूनें वृक्षपल्लव डोलती । श्रीराम म्हणे मज वृक्ष बोलाविती ।
ऐसें म्हणोनियां तयांप्रती । धांवोनि वेगवृत्तीं स्वये जाय ॥ ६ ॥
तेथें न भेटतां सीता । परम दुःख श्रीरघुनाथा ।
मूर्च्छित पडे मागुता । हा हा सीता विलपत ॥ ७ ॥
सीता न सांगती पर्वत । तेणें क्षोभला श्रीरघुनाथ ।
भस्म करावया गिरी समस्त । धनुष्या हात घातला ॥ ८ ॥
धनुष्य लावोनियां गुण । गुणीं लाविला वज्रबाण ।
तंव लक्ष्मणें धरिले चरण । विरुद्ध आपण न करावें ॥ ९ ॥
निरपराध हे पर्वत । यांचा करुं नये घात ।
शांत करोनि श्रीरघुनाथ । पुढें वनांत चालिले ॥ ११० ॥

इमे लक्ष्मण वैदेह्यास्तपनीये विभूषणे ।
जपापुष्पनि काशैश्च चित्रक्षत जबिन्दुभिः ॥ १९ ॥
मन्ये लक्ष्मण वैदेही राक्षसैः कामरुपिभिः ।
नीत्वा च्छित्वा विभक्ता वा भक्षिता वा तपस्विनी ॥ २० ॥

मार्गात सोन्याचा अलंकार दिसतो :

मार्गी जातां रघुनंदन । देखे सीतेचें सुवर्णभूषण ।
लक्ष्मणा धांव म्हणोन । सीता येणें मार्गे नेलीसे ॥ ११ ॥
आतं माग लागला खरा । धांवणें करुं सौमित्रवीरा ।
तंव रक्तांकित देखोनि धरा । श्रीरामचंद्रा अति चिंता ॥ १२ ॥
कपटरुपें राक्षसीं । येथवरी आणोनि सीतेसी ।
छेदोनी मारोनी तिसी । विभागेंसीं भक्षिली ॥ १३ ॥
गेलें सीतेऐसें रत्‍न । अति दुःखित श्रीरघुनंदन ।
तंच पुढें देखतसे आपण । महारण वीरांचें ॥ १४ ॥

रपोपकरणं सर्व विध्वस्तं धरणीतले ।
मुक्तामणिनिभं दिव्यं तपनीयविभूषितम् ॥ २१ ॥
पतितं भुवि पश्य त्वं भ्रातःसौम्य महाद्भुतम् ।
विशालं पतितं भूमौ कवचं यस्य कांचनम्॥ २२ ॥

जरासे पुढे चालून गेल्यावर मोडलेले धनुष्य, रथ, छत्र, भाता व बाण इत्यादी आढळते :

ते रणभूमी अवलोकिंता नयनीं । धनुष्य भंगिले हेमाभरणी ।
कवच पाडिलें दिसे धरणीं । मुक्ताभरणीं लखलखित ॥ १५ ॥
रथ भंगिला सचक्र । मारिले पिशाचवदन चर ।
दंडभंगें पाडिलें छत्र । युद्ध विचित्र वीरांचें ॥ १६ ॥
सतूणीर विखुरलें बाण । मुकुट पाडिला देचीप्यमान ।
थोर जाले रणकंदन । सीता संपूर्ण मारिली ॥ १७ ॥
सीता अतिशयें सुंदर । नितनिमित्त निशाचर ।
भिडिन्नलें परस्पर वीर । युद्ध दुर्धर तयांचे ॥ १८ ॥
ऐसिया युद्धसंकटीं । सीता मारिली गोरटी ।
राक्षस तंव महाकपटी । मांसासाठी मारिली ॥ १९ ॥
सीता मारिली राक्षसीं । काय मुख दावूं अयोध्येसी ।
काय सांगों जनकापासीं । क्षत्रियधर्मासी हे लाज ॥ १२० ॥

किंनु लक्ष्मण वक्ष्यामि समेत्य जनकं वचः ।
मातरं चैव वैदेह्या विनतामहमप्रियम् ॥ २३ ॥

काय सांगो सीतेचे मातेसी । काय सांगों निजजनन्यांसी ।
सीता हरविली वनवासीं । काय सुहृदांसी मी सांगो ॥ २१ ॥
लाज लागली यशःकीर्तीसी । लाज लागली क्षात्रवृत्तीसी ।
लाज लागली मज मानसीं । सीता वनवासीं हरविली ॥ २२ ॥
लाजविला निजपुरुषार्थ । स्वर्गी लाजेल श्रीदशरथ ।
लाज जाली तिहीं लोकांत । तेणें श्रीरघुनाथ क्षोभला ॥ २३ ॥
सुमित्रा पाहेंआंगवण । म्हणोनि घेतलें धनुष्य़बाण ।
सीतेनिमित्त पैं जाण । वाणें निर्दळीन तिन्ही लोक ॥ २४ ॥

तमुवाच ततो रामश्चित्र विस्फार्य कार्मुकम् ।
अरक्षसीमिमां लंका जगत्पश्याद्य लक्ष्मण ॥ २४ ॥

सीतेला राक्षसांनीच पळविले अशा भावनेने श्रीरामांना आलेला क्रोध व त्याचे अविष्करण :

राक्षसीं नेलिया सीता सुंदरा । सकुल सपुत्र सपरिवारा ।
अराक्षसी करीन धरा । शरधारा निवटोनी ॥ २५ ॥
सीता पाताळीं नेतां जाण । पन्नगांतें निर्दाळीन ।
दानवमानवातें विंधीन । घोळसीन त्रिदशातें ॥ २६ ॥
राक्षसीं मारिली सीता । तिसी जरी यम होय नेता ।
त्याचे करीन मी घाता । यमदूतासमवेत ॥ २७ ॥
यम दंडितो जगासी । बाणीं मीं दंडिन त्यासी ।
आणूनि नेदी जरी सीतेसी । तरी मी त्यासी दंडीन ॥ २८ ॥
यमाची मी नळीं निमटीं । कळिकाळाची फोडीन कवटी ।
दमूनियां सकळ सृष्टी । सीता गोरटी ॥ २९ ॥
मी तंव काळाचा आकळिता । अंतकातें निर्दळिता ।
मर्दोनि लोका समस्तां । आणीन सीता निमेषार्धे ॥ १३० ॥
नयनाग्रीचें कल्लोळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ ।
धनुष्य ओढिलें विक्राळ । स्वर्गीं खळबळ देवांसी ॥ ३१ ॥
देव दानव ऋषीश्वर । भेणें कांपती थरथर ।
आंदोळलें चराचर । श्रीराम दुर्धर क्षोभला ॥ ३२ ॥
सीतेचिया शुद्धीसाठीं । क्रोधें जाळूं पाहे सृष्टी ।
भयें उमा झोंबे कंठीं । धाके पोटीं सदाशिव ॥ ३३ ॥

अद्दष्टपूर्वं सक्रुद्धं द्दष्ट्वा रामं सलक्ष्मणः ।
अब्रवीत्प्रांजलिर्वाक्यं मुखेन परिशुष्यता ॥ २५ ॥
पुरा भूत्वा मृदुर्दान्तः सर्वभूतहिते रतः ।
न क्रोधवशमापन्नः प्रकृतिं हातुमर्हसि ॥ २६ ॥
चंद्रे लक्ष्मीःप्रभा सूर्ये गतिर्वायौ भुवि क्षमा ।
एकश्च नियतं नित्यं त्वयि चानुत्तमं यशः ॥ २७ ॥

लक्ष्मणाने क्रोध शांत केला :

श्रीराम काळाग्निरुप । तें देखोनि धाके लक्ष्मण ।
तोंडीचे पाणी गेले पळोन । कंपायमान भयभीत ॥ ३४ ॥
मारिली ताटका सुबाहू । तैं हा दुर्धर क्षोभ नव्हता बहूण् ।
विराध सीताग्रहणराहू । क्रोधोद्भवु तैं नव्हता ॥ ३५ ॥
होरोनि राज्यवस्त्राभरणा । पायीं कैकेयीनें धाडिलें वना ।
तैं हा क्षोम नव्हता जाणा । श्रीरघुनंदनालागोनी ॥ ३६ ॥
एक रामें आपन । वधिले त्रिशिरा खर दूषण ।
तैं ऐसा क्रोध दारुण । नाहीं आपण देखिला ॥ ३७ ॥
सीतेचिये शुद्धींसाठीं । श्रीराम क्षोभला प्रबळ सृष्टीं ।
स्वर्गीं देवां हडबड मोठी । धाके पोटीं कळिकाळ ॥ ३८ ॥
दानव मानव ऋषीश्वरा । धाकें चळकांप ।
क्षोभला देखोनि श्रीरामचंद्रा । वसुधरा चळीं कांपे ॥ ३९ ॥
श्रीराम क्षोभला निर्वाण । देखोनि सौमित्र आपण ।
धांवोनि धरिले दोन्ही चरण । क्षमा संपूर्ण करीं रामा ॥ १४० ॥
सावध ऐकें कृपामूर्ती । भूतां कृपाळु तूं रघुपती ।
तुवां निर्मिली भूरसृष्टीची स्थिती । ते वेदिक्ती अवधारी ॥ ४१ ॥
प्राण राखोनियां भूतीं । तुझेनि वायूची गती ।
चंद्रीं तुझेनि श्रीराघुपती शोभा शोभती सर्वदा ॥ ४२ ॥
तुझियेनि निजतेजस्थितीं । सूर्यासी तेज अति दीप्तीं ।
तुझिया क्षमेनें क्षिती । ते भूतें वाहिती सर्वदा ॥ ४३ ॥
समुद्र वेळा राखे सर्वदा । काळ तुझ अधीन सदा ।
अकाळ प्रळयो न करी कदा । निजमर्यादा हे तुझी ॥ ४४ ॥
तो तूं आजि स्थिति काळासी । अकाळप्रळयोअ करुं पाहसी ।
विचारुनि निजमानसीं । क्षमा क्षोभासी करीं रामा ॥ ४५ ॥
तूं सृष्टीचा आदिकर्ता । तुझेनि बाळक विधाता ।
आपली परिपूर्ण पूर्णता । श्रीरघुनाथा आठवीं ॥ ४६ ॥
ऐसें ऐकोनि सौमित्रवचन । निजक्षोभातें स्वयें प्राशून ।
संतोषोनि श्रीरघुनंदन । दिधलें अलिंगन सौमित्रा ॥ ४७ ॥
संतोषोनि श्रीरघुपती । दोघे बैसले सुखस्थिती ।
जालीं पूर्णिमा पूर्णराती । उदयप्राप्ती चंद्राची ॥ ४९ ॥
एकाजनार्दना शरण । आठविता पूर्णपण ।
श्रीराम सुखें सुखावोन । केलें शयन तृणशय्ये ॥ १५० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसीताशोकविलापनं नाम एकोनविंशतितमोऽध्यायः ॥ १९ ॥
॥ ओव्या १५० ॥ श्लोक २७ ॥ एवं १७७ ॥



GO TOP