[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रयस्त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शूर्पणखाकर्तृकं रावणस्य भर्त्सनम् - शूर्पणखेने रावणास धिक्कारणे -
ततः शूर्पणखा दीना रावणं लोकरावणम् ।
आमात्यमध्ये संक्रुद्धा परुषं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
त्या समयी शूर्पणखा श्रीरामाकडून तिरस्कृत झाल्यामुळे फार दुःखी झाली होती. तिने मंत्र्यांच्या मध्ये बसलेल्या समस्त लोकांना रणविणार्‍या रावणाला अत्यंत कुपित होऊन कठोर वाणीने म्हटले - ॥१॥
प्रमत्तः कामभोगेषु स्वैरवृतो निरङ्‌कुशः ।
समुत्पन्नं भयं घोरं बोद्धव्यं नावबुद्ध्यसे ॥ २ ॥
राक्षसराज ! तू स्वेच्छाधारी आणि निरंकुश होऊन विषय भोगांत उन्मत्त होऊन राहिला आहेस. तुझ्यासाठी घोर भय उत्पन्न झाले आहे. तुला त्याची माहिती असावयास हवी होती परंतु या विषयी तू काही सुद्धा जाणत नाही आहेस. ॥२॥
सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम् ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥ ३ ॥
जो राजा निम्न श्रेणीच्या भोगात आसक्त होऊन स्वेच्छाचारी आणि लोभी होऊन जातो, त्याला स्मशानातील अग्निप्रमाणे मानून प्रजा त्याचा आदर करीत नाही. ॥३॥
स्वयं कार्याणि यः काले नानुतिष्ठति पार्थिवः ।
स तु वै सह राज्येन तैश्च कार्यैर्विनश्यति ॥ ४ ॥
जो राजा योग्य समयी स्वतः आपल्या कार्याचे संपादन करीत नाही, तो राज्य आणि त्या कार्यांच्या बरोबर नष्ट होऊन जातो. ॥४॥
अयुक्तचारं दुर्दर्शमस्वाधीनं नराधिपम् ।
वर्जयन्ति नरा दूरान्नदीपङ्‌कमिव द्विपाः ॥ ५ ॥
जो राज्याची देखरेख करण्यासाठी गुप्तचरांना नियुक्त करीत नाही, प्रजाजनांना ज्याचे दर्शन दुर्लभ होऊन जाते आणि कामिनी आदि भोगांमध्ये आसक्त होण्यामुळे जो आपली स्वाधीनता गमावून बसतो, अशा राजाला प्रजा दुरूनच त्यागते. ज्याप्रमाणे हत्ती नदीच्या चिखलापासून दूर राहातो त्याप्रमाणे. ॥५॥
ये न रक्षन्ति विषयमस्वाधीनं नराधिपाः ।
ते न वृद्ध्या प्रकाशन्ते गिरयः सागरे यथा ॥ ६ ॥
जो नरेश आपल्या राज्यातील जो प्रान्त आपल्याच बेसावधपणा मुळे दुसर्‍यांच्या अधिकारात गेलेला असत त्याला आपले रक्षणाखाली आणीत नाही त्याला पुन्हा आपल्या अधिकाराखाली आणीत नाही ते समुद्रात बुडालेल्या पर्वताप्रमाणे आपल्या अभ्युदयाने प्रकाशित होत नाहीत. ॥६॥
आत्मवद्‌भिर्विगृह्य त्वं देवगन्धर्वदानवैः ।
अयुक्तचारश्चपलः कथं राजा भविष्यसि ॥ ७ ॥
जे आपल्या मनाला काबूत ठेवणारे आणि प्रयत्‍नशील आहेत त्या देवता, गंधर्व, तसेच दानवांबरोबर विरोध करून तू आपल्या राज्याच्या देखरेखी साठी गुप्तचर नियुक्त केलेले नाहीत अशा स्थितीत तुझ्या सारखा विषयलोलुप पुरुष राजा बनून कसा राहू शकेल ? ॥७॥
त्वं तु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस ।
ज्ञातव्यं तन्न जानीषे कथं रजा भविष्यसि ॥ ८ ॥
राक्षसा ! तुझा स्वभाव बालकांप्रमाणे आहे. तू निव्वळ बुद्धिहीन आहेस. जाणण्यायोग्य गोष्टींचेही ज्ञान तुला नाही आहे. अशा स्थितीत तू कशा प्रकारे राजा बनून राहू शकशील ? ॥८॥
येषां चाराश्च कोशश्च नयश्च जयतां वर ।
अस्वाधीना नरेन्द्राणां प्राकृतैस्ते जनैः समाः ॥ ९ ॥
विजयी वीरात श्रेष्ठ निशाचरपते ! ज्या नरेशांचे गुप्तचर, कोष आणि नीति - हे सर्व त्यांच्या स्वतःच्या अधीन नाहीत, ते साधारण लोकांच्या समानच आहेत. ॥९॥
यस्मात् पश्यन्ति दूरस्थान् सर्वानर्थान् नराधिपाः ।
चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः ॥ १० ॥
गुप्तचरांच्या सहाय्याने राजेलोक दूर दूरच्या सर्व कार्यावर देखरेख करीत राहातात म्हणून त्यांना दीर्घदर्शी अथवा दूरदर्शी म्हटले जाते. ॥१०॥
अयुक्तचारं मन्ये त्वां प्राकृतैः सचिवैर्युतः ।
स्वजनं तु जनस्थानं निहतं नावबुध्यसे ॥ ११ ॥
मी समजत आहे की तू अयुक्त मंत्र्यांनी घेरला गेला आहेस म्हणून तर तू आपल्या राज्यात गुप्तचर नेमलेले नाहीस. तुझे स्वजन मारले गेले आणि जनस्थान उजाड झाले आहे आणि तरीही तुला याचा पत्ता नाही आहे. ॥११॥
चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
हतान्येकेन रामेण खरश्च सहदूषणः ॥ १२ ॥

ऋषीणामभयं दत्तं कृतक्षेमाश्च दण्डकाः ।
धर्षितं च जनस्थानं रामेणाक्लिष्टकारिणा ॥ १३ ॥
एकट्‍या रामांनी, जे विनासायास महान कर्म करणारे आहेत, त्यांनी भीमकर्मा राक्षसांच्या चौदा हजार सेनेला यमलोकी पोहोंचविले आहे, खर आणि दूषण यांचेही प्राण घेतले आहेत, ऋषिंनाही अभयदान दिले आहे तसेच दण्डकारण्यात राक्षसांकडून ज्या विघ्न-बाधा होत्या त्या सर्व दूर करून तेथे शांति स्थापित केली आहे. जनस्थानास उजाड केले आहे. ॥१२-१३॥
त्वं तु लुब्धः प्रमत्तश्च पराधीनश्च रावण ।
विषये स्वे समुत्पन्नं भयं यो नावबुद्ध्यसे ॥ १४ ॥
राक्षसा ! तू तर लोभ अणि प्रमाद यात फसून पराधीन होत आहेस म्हणून आपल्याच राज्यात उत्पन्न झालेल्या भयाचा तुला पत्ताही नाही. ॥१४॥
तीक्ष्णमल्पप्रदातारं प्रमत्तं गर्वितं शठम् ।
व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्थिवम् ॥ १५ ॥
जो राजा कठोरतापूर्ण वर्तन करतो अथवा तीक्ष्ण स्वभावाचा परिचय देतो, सेवकांना फार कमी पगार देतो, प्रमादात पडून राहातो अथवा गर्वात दंग राहातो आणि स्वभावाने दुष्ट असतो तो संकटात सापडल्यावर सर्व प्राणी त्याची साथ सोडून देतात- त्याची मदत करण्यास कोणी पुढे येत नाही. ॥१५॥
अतिमानिनमग्राह्यमात्मसम्भावितं नरम् ।
क्रोधिनं व्यसने हन्ति स्वजनोऽपि नराधिपम् ॥ १६ ॥
जो अत्यंत अभिमानी, आपलासा करण्यास अयोग्य, आपणच आपल्याला फारच मोठा मानणारा आणि क्रोधी असतो असा नर अथवा नरेश यास संकटकाळी आत्मीयजन सुद्धा मारून टाकतात. ॥१६॥
नानुतिष्ठति कार्याणि भयेषु न बिभेति च ।
क्षिप्रं राज्याच्च्युतो दीनस्तृणैस्तुल्यो भवेदिह ॥ १७ ॥
जो राजा आपल्या कर्तव्याचे पालन अथवा करणीय कार्यांचे संपादन करीत नाही तसेच भयाच्या अवसरी देखील भयभीत (तसेच आपल्या रक्षणाविषयी सावधान) होत नाही तो शीघ्रच राज्यापासून भ्रष्ट आणि दीन होऊन या भूतलावर तृणवत उपेक्षणीय होऊन जातो. ॥१७॥
शुष्ककाष्ठैर्भवेत् कार्यं लोष्ठैरपि च पांसुभिः ।
न तु स्थानात् परिभ्रष्टैः कार्यं स्याद् वसुधाधिपैः ॥ १८ ॥
लोकांना वाळलेल्या लाकडापासून, मातीच्या ढेकळापासून तसेच धुळीपासून काही प्रयोजन असते परंतु स्थानभ्रष्ट राजांपासून त्यांना काही प्रयोजन राहात नाही. ॥१८॥
उपभुक्तं यथा वासः स्रजो वा मृदिता यथा ।
एवं राज्यात् परिभ्रष्टः समर्थोऽपि निरर्थकः ॥ १९ ॥
ज्याप्रमाणे नेसलेले वस्त्र आणि कुस्करून टाकलेली फुलाची माळा दुसर्‍यांनी उपयोगात आणण्यास योग्य राहात नाही, त्या प्रकारे राज्यापासून भ्रष्ट झालेला राजा समर्थ असूनही दुसर्‍यांसाठी निरर्थक असतो. ॥१९॥
अप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः ।
कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ॥ २० ॥
परंतु जो राजा सदा सावधान राहातो, राज्यातील सर्व कार्याची माहिती करून घेतो, इंद्रियांना वश करून ठेवतो, कृतज्ञ तसेच स्वभावानेच धर्मपरायण असतो तो राजा बराच काळ पर्यत राज्य करतो. ॥२०॥
नयनाभ्यां प्रसुप्तो वा जागर्ति नयचक्षुषा ।
व्यक्तक्रोधप्रसादश्च स राजा पूज्यते जनैः ॥ २१ ॥
जो स्थूल डोळ्यांनी तर झोपतो पण नीतिच्या डोळ्यांनी सदा जागत असतो तसेच ज्याच्या क्रोधाचे आणि अनुग्रहाचे फळ प्रत्यक्ष प्रकट होते, त्याच राजाची लोक पूजा करतात. ॥२१॥
त्वं तु रावण दुर्बुद्धिर्गुणैरेतैर्विवर्जितः ।
यस्य तेऽविदितश्चारै रक्षसां समुहान् वधः ॥ २२ ॥
रावणा ! तुझी बुद्धि दूषित आहे आणि तू या सर्व राजोचित गुणांपासून वंचित आहेस, कारण की तुला आतापर्यत गुप्तचरांच्या सहाय्याने राक्षसांच्या या महान संहाराचा समाचार ज्ञात होऊ शकला नव्हता. ॥२२॥
परावमन्ता विषयेषु सङ्‌गवान्
न देशकालप्रविभागतत्त्ववित् ।
अयुक्तबुद्धिर्गुणदोषनिश्चये
विपन्नराज्यो नचिराद् विपत्स्यसे ॥ २३ ॥
तू दुसर्‍यांचा अनादर करणारा, विषयासक्त आणि देश-काळ यांच्या विभागास यथार्थरूपाने न जाणणारा आहेस. तू गुण आणि दोषाचा विचार आणि निश्चय करण्याकडे आपल्या बुद्धिचा कधी उपयोग केला नाहीस, म्हणून तुझे राज्य लवकरच नष्ट होऊन जाईल आणि तू स्वतःही मोठ्‍या विपत्तित पडशील. ॥२३॥
इति स्वदोषान् परिकीर्तितांस्तया
समीक्ष्य बुद्ध्या क्षणदाचरेश्वरः ।
धनेन दर्पेण बलेन चान्वितो
विचिन्तयामास चिरं स रावणः ॥ २४ ॥
शूर्पणखे कडून सांगितल्या गेलेल्या आपल्या दोषावर बुद्धिपूर्वक विचार करून धन, अभिमान आणि बलाने संपन्न तो निशाचर रावण बराच वेळपर्यत विचारात आणि चिंतेत पडला. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा तेहेतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP