श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकोनत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता बोधितेन सुग्रीवेण नीलं प्रति वानर-सैनिकानां एकत्रकरणाय आदेशदानम् - हनुमानांनी समजाविल्यावर सुग्रीवांनी नीलाला वानर- सैनिकांना एकत्र करण्याचा आदेश देणे -
समीक्ष्य विमलं व्योम गतविद्युद्बनलाहकम् ।
सारसाकुलसंघुष्टं रम्यज्योत्स्नानुलेपनम् ॥ १ ॥
समृद्धार्थं च सुग्रीवं मंदधर्मार्थसंग्रहम् ।

अत्यर्थं चासतां मार्गं एकांतगतमानसम् ॥ २ ॥

निर्वृत्तकार्यं सिद्धार्थं प्रमदाभिरतं सदा ।
प्राप्तवंतमभिप्रेतान् सर्वानेव मनोरथान् ॥ ३ ॥

स्वां च पत्‍नीमभिप्रेतां तारां चापि समीप्सिताम् ।
विहरंतमहोरात्रं कृतार्थं विगतज्वरम् ॥ ४ ॥

क्रीडंतमिव देवेशं गंधर्वाप्सरसां गणैः ।
मंत्रिषु न्यस्तकार्यं च मंत्रिणामनवेक्षकम् ॥ ५ ॥

उच्छिन्नराज्यसंदेहं कामवृत्तमिव स्थितम् ।
निश्चितार्थोऽर्थतत्त्वज्ञः कालधर्मविशेषवित् ॥ ६ ॥

प्रसाद्य वाक्यैविविधैः हेतुमद्‌भिर्मनोरमैः ।
वाक्यविद् वाक्यतत्त्वज्ञं हरीशं मारुतात्मजः ॥ ७ ॥

हितं तथ्यं च पथ्यं च सामधर्मार्थनीतिमत् ।
प्रणयप्रीतिसंयुक्तं विश्वासकृतनिश्चयम् ॥ ८ ॥

हरीश्वरमुपागम्य हनुमान् वाक्यमब्रवीत् ।
पवनकुमार हनुमान् शास्त्राच्या निश्चित सिद्धांताला जाणणारे होते. काय करावयास पाहिजे आणि काय नाही- या सर्व गोष्टींचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. कुठल्या समयी कुठल्या विशेष धर्माचे पालन केले पाहिजे- हेही ते ठीक-ठीक जाणत होते. त्यांना संभाषण करण्याच्या कलेचेही चांगले ज्ञान होते. त्यांनी पाहिले आकाश निर्मल झाले आहे. आता त्यात वीज चमकत नाही अथवा ढगही दिसून येत नाहीत. अंतरिक्षात सर्वत्र सारस उडत आहेत आणि त्यांची बोली ऐकू येत आहे. चंद्रोदय झाल्यावर आकाश असे भासत आहे की जणु त्याच्यावर श्वेत चंदनसदृश रमणीय चांदण्याचा लेप चढविला गेला आहे. सुग्रीवाचे प्रयोजन सिद्ध झाल्यामुळे आता ते धर्म आणि अर्थ संग्रहात शिथिलता दाखवू लागले आहेत. असाधु पुरुषांच्या मार्गाचा, कामसेवनात अधिक रममाण होत आहेत. जेथे स्त्रियांच्या संगतीत राहण्यात बाधा येणार नाही, अशा जागीच त्यांचे मन लागत आहे. त्यांची कामेच्छा पूर्ण झाली आहे. त्यांच्या अभीष्ट प्रयोजनाची सिद्धि होऊन चुकली आहे. आता ते सदा युवती स्त्रियांसह क्रीडा-विलासातच लागून राहिले आहेत. त्यांनी आपल्या सर्व अभिलषित मनोरथांना प्राप्त केलेले आहे. आपली मनोवांछित पत्‍नी रूमा तसेच अभीष्ट सुंदरी तारेलाही प्राप्त करून आता ते कृतकृत्य एवं निश्चिंत होऊन दिवस-रात्र भोग-विलासातच दंग राहात आहेत. ज्याप्रमाणे देवराज इंद्र गंधर्व आणि अप्सरांच्या समुदायाबरोबर क्रीडेत तत्पर राहातात; त्या प्रकारे सुग्रीवही आपल्या मंत्र्यांवर राज्यकार्याचा भार ठेवून क्रीडा-विहारात तत्पर आहेत. मंत्र्यांच्या कार्यावर ते देखरेखही करीत नाहीत. मंत्र्यांच्या सज्जनतेमुळे जरी राज्याला कुठल्याही प्रकारची हानि पोहोचण्याचा संदेह नाही आहे तथापि स्वतः सुग्रीवच स्वेच्छाचारी झाल्यासारखे आहेत. या सर्वांचा विचार करून हनुमान् वानरराज सुग्रीवांजवळ गेले आणि त्यांना युक्तियुक्त विविध आणि मनोरम वचनांच्या द्वारा प्रसन्न करून वाक्यतत्त्वज्ञ त्या सुग्रीवाला हितकर, सत्य, लाभदायक, साम, धर्म आणि अर्थनीतिने युक्त शास्त्रविश्वासी पुरुषाच्या सदृढ निश्चयाने संपन्न तसेच प्रेम आणि प्रसन्नतायुक्त वचन बोलले- ॥१- ८ १/२॥
राज्यं प्राप्तं यशश्चैव कौली श्रीरभिवर्धिता ॥ ९ ॥

मित्राणां संग्रहः शेषः तद् भवान् कर्तुमर्हति ।
’राजन् ! आपण राज्य आणि यश प्राप्त केले आहे तसेच कुलपरंपरेने आलेल्या लक्ष्मीलाही वाढविले आहे; परंतु आता मित्रास आपलेसे कार्य शेष राहिले आहे. ते आपणाला या समयी पूर्ण केले पाहिजे. ॥९ १/२॥
यो हि मित्रेषु कालज्ञः सततं साधु वर्तते ॥ १० ॥

तस्य राज्यं च कीर्तिश्च प्रतापश्चापि वर्धते ।
’जो राजा प्रत्युपकार केव्हा केला पाहिजे’ ही गोष्ट जाणून मित्रांच्या प्रति सदा साधुतापूर्ण आचरण करतो, त्याच्या राज्य, यश आणि प्रतापाची वृद्धि होते. ॥१० १/२॥
यस्य कोशश्च दण्डश्च मित्राण्यात्मा च भूमिप ।
समान्येतानि सर्वाणि स राज्यं महदश्नुते ॥ ११ ॥
’पृथ्वीनाथ ! ज्या राजाचा कोश, दण्ड, सेना, मित्र आणि स्वतःचे शरीर - ही सर्वच्या सर्व समान रूपाने त्याच्या वश राहातात, तो विशाल राज्याचे पालन आणि उपभोग करतो. ॥११॥
तद् भवन् वृत्तसंपन्नः स्थितः पथि निरत्यये ।
मित्रार्थमभिनीतार्थं यथावत् कर्तुमर्हति ॥ १२ ॥
’आपण सदाचाराने संपन्न आणि नित्य सनातन धर्माच्या मार्गावर स्थित आहात. मित्राच्या कार्याला सफल बनविण्यासाठी जी प्रतिज्ञा केली आहे, ती यथोचित रूपाने पूर्ण करावी. ॥१२॥
संत्यज्य सर्वकर्माणि मित्रार्थे यो न वर्तते ।
संभ्रमाद् विकृतोत्साहः सोऽनर्थेनावरुध्यते ॥ १३ ॥
’जो आपली सर्व कार्ये सोडून मित्राचे कार्य सिद्ध करण्यासाठी विशेष उत्साहपूर्वक शीघ्रतेने लागत नाही त्याला अनर्थाचे भागी व्हावे लागते. ॥१३॥
यो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते ।
स कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥ १४ ॥
’कार्य साधण्याचा उपयुक्त अवसर निघून गेल्यावर जो मित्राच्या कार्याच्या मागे लागतो, तो मोठ्यात मोठी कार्ये सिद्ध करूनही मित्राचे प्रयोजन सिद्ध करणारा मानला जात नाही. ॥१४॥
तदिदं मित्रकार्यं नः कालातीतमरिंदम ।
क्रियतां राघवस्यैतद् वैदेह्याः परिमार्गणम् ॥ १५ ॥
’शत्रुदमना ! भगवान् राघव आपले परम सुहृद आहेत. त्यांच्या या कार्याचा समय निघून जात आहे. म्हणून वैदेही सीतेच शोध घेण्यास आरंभ केला पाहिजे. ॥१५॥
न च कालमतीतं ते निवेदयति कालवित् ।
त्वरमाणोऽपि सन् प्राज्ञः तव राजन् वशानुगः ॥ १६ ॥
’राजन् ! परम बुद्धिमान् श्रीराम समयाचे ज्ञान राखतात आणि त्यांना आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी घाई झालेली आहे, तरीही ते आपल्या अधीन होऊन राहिले आहेत. संकोचवश, ते माझ्या कार्याचा समय निघून चालला आहे असे आपल्याला सांगत नाहीत. ॥१६॥
कुलस्य हेतुः स्फीतस्य दीर्घबंधुश्च राघवः ।
अप्रमेयप्रभावश्च स्वयं चाप्रतिमो गुणैः ॥ १७ ॥

तस्य त्वं कुरु वै कार्यं पूर्वं तेन कृतं तव ।
हरीश्वर कपिश्रेष्ठान् आज्ञापयितुमर्हसि ॥ १८ ॥
’वानरराज ! भगवान् राघव दीर्घकाळपर्यंत मैत्री निभावणारे आहेत. ते आपल्या समृद्धिशाली कुलाच्या अभ्युदयाचे हेतु आहेत. त्यांचा प्रभाव अतुलनीय आहे. ते गुणांमध्ये आपली बरोबर करणारा कुणी राखत नाहीत. आता आपण त्यांचे कार्य सिद्ध करावे, कारण त्यांनी आपले काम आधीच सिद्ध केलेले आहे. आपण प्रधान प्रधान वानरांना या कार्यासाठी आज्ञा द्यावी. ॥१७-१८॥
न हि तावद् भवेत् कालो व्यतीतश्चोदनादृते ।
चोदितस्य हि कार्यस्य भवेत् कालव्यतिक्रमः ॥ १९ ॥
’श्रीरामांनी सांगण्यापूर्वीच जर आम्ही या कार्याचा प्रारंभ केला तर वेळ निघून गेली असे मानले जाणार नाही, परंतु जर त्यांना यासाठी प्रेरणा करावी लागली तर मग असेच समजले जाईल की आपण वेळ घालविला आहे- त्यांच्या कार्यास फारच उशीर लावला आहे. ॥१९॥
अकर्तुरपि कार्यस्य भवान् कर्ता हरीश्वर ।
किं पुनः प्रतिकर्तुस्ते राज्येन च वधेन च ॥ २० ॥
’वानरराज ! ज्याने आपला काही उपकार केलेला नाही त्याचे कार्य सुद्धा सिद्ध करणारे आपण आहात; मग ज्यांनी वालीचा वध तसेच राज्य प्रदान करून आपल्यावर उपकार केले आहेत, त्यांचे कार्य आपण शीघ्र सिद्ध कराल हे काय सांगायला हवे कां ? ॥२०॥
शक्तिमानतिविक्रांतो वानरर्क्षगणेश्वर ।
कर्तुं दाशरथेः प्रीतिमां आज्ञायां किं न सज्जसे ॥ २१ ॥
’वानर आणि अस्वल -समुदायाचे स्वामी सुग्रीव ! आपण शक्तिमान् आणि अत्यंत पराक्रमी आहात, तरीही दाशरथि रामांचे प्रिय कार्य करण्यासाठी वानरांना आज्ञा देण्यास का विलंब करीत आहात ? ॥२१॥
कामं खलु शरैः शक्तः सुरासुरमहोरगान् ।
वशे दाशरथिः कर्तुं त्वत् प्रतिज्ञां अवेक्षते ॥ २२ ॥
’यात संदेह नाही की दशरथकुमार भगवान् श्रीराम आपल्या बाणांनी समस्त देवता, असुर आणि मोठमोठ्या नागांनाही आपल्या वश करू शकतात तथापि आपण जी त्यांचे कार्यास सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याचीच ते वाट पहात आहेत. ॥२२॥
प्राणत्यागाविशङ्‌केःन कृतं तेन महत् प्रियम् ।
तस्य मार्गाम वैदेहीं पृथिव्यामपि चांबरे ॥ २३ ॥
’त्यांनी आपल्यासाठी वालीचे प्राण घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. ते आपले फार मोठे प्रिय कार्य करून चुकले आहेत, म्हणून आता आपण त्यांची पत्‍नी वैदेही सीतेचा या भूतलावर आणि आकाशात ही पत्ता लावू या. ॥२३॥
देवदानवगंधर्वा असुराः समरुद्गिणाः ।
न च यक्षा भयं तस्य कुर्युः किमिव राक्षसाः ॥ २४ ॥
’देवता, दानव, गंधर्व, असुर, मरूद्‌गण तसेच यक्षही श्रीरामांना भय पोहोचवू शकत नाहीत, मग राक्षसांची तर बिशदच काय आहे ? ॥२४॥
तदेवं शक्तियुक्तस्य पूर्वं प्रतिकृतस्तथा ।
रामस्यार्हसि पिङ्‌गे्श कर्तुं सर्वात्मना प्रियम् ॥ २५ ॥
’वानरराज ! असे शक्तिशाली आणि प्रथमच उपकार करणार्‍या भगवान् रामांचे प्रिय कार्य आपल्याला आपली सर्व शक्ति पणाला लावून केले पाहिजे. ॥२५॥
नाधस्तादवनौ नाप्सु गतिर्नोपरि चांबरे ।
कस्यचित् सज्जतेऽस्माकं कपीश्वर तवाज्ञया ॥ २६ ॥
’कपीश्वर ! आपली आज्ञा झाली तर जलात, स्थळात, खाली (पाताळात) तसेच वर आकाशात - कुठेही आम्हां लोकांची गति रूद्ध होऊ शकत नाही. ॥२६॥
तदाज्ञापय कः किं ते कृते कुत्र व्यवस्यतु ।
हरयो ह्यप्रधृष्यास्ते संति कोट्यग्रतोऽनघ ॥ २७ ॥
’निष्पाप कपिराज ! म्हणून आपण आज्ञा द्यावी की कोणी कोठून आपल्या कुठल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी उद्योग करावा. आपल्या अधीन करोडोपेक्षांही अधिक असे वानर उपस्थित आहेत; ज्यांना कुणीही परास्त करू शकत नाही.’ ॥२७॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा काले साधु निवेदितम् ।
सुग्रीवः सत्त्वसंपन्नः चकार मतिमुत्तमाम् ॥ २८ ॥
सुग्रीव सत्वगुणांनी संपन्न होते. त्यांनी हनुमान् द्वारा योग्य समयी चांगल्या प्रकारे सांगितली गेलेली उपर्युक्त गोष्ट ऐकून भगवान् श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्यासाठी अत्यंत उत्तम निश्चय केला. ॥२८॥
संदिदेशातिमतिमान्तं नीलं नित्यकृतोद्यमम् ।
दिक्षु सर्वासु सर्वेषां सैन्यानामुपसंग्रहे ॥ २९ ॥

यथा सेना समग्रा मे यूथपालाश्च सर्वशः ।
समागच्छंत्यसंगेन सेनाग्र्येण तथा कुरु ॥ ३० ॥
ते परम बुद्धिमान् होते. म्हणून नित्य उद्यमशील नील नामक वानराला त्यांनी समस्त दिशांमधून संपूर्ण वानरसेनांना एकत्र करण्यासाठी आज्ञा दिली आणि म्हटले - ’तुम्ही असा प्रयत्‍न करा की ज्यायोगे माझी सर्व सेना येथे एकत्रित होईल आणि सर्व यूथपति आपली सेना तसेच सेनापतिंसह अविलंब येथे उपस्थित होतील. ॥२९-३०॥
ये त्वंतपालाः प्लवगाः शीघ्रगा व्यवसायिनः ।
समानयंतु ते शीघ्रं त्वरिताः शासनान्मम ।
स्वयं चानंतरं सैन्यं भवानेवानुपश्यतु ॥ ३१ ॥
’राज्य-सीमेचे रक्षण करणारे जे जे उद्योगी आणि शीघ्रगामी वानर आहेत, ते सर्व माझ्या आज्ञेने शीघ्र येथे यावेत. त्यानंतर जे काही कर्तव्य असेल त्यावर तुम्ही लक्ष द्यावे. ॥३१॥
त्रिपञ्चरात्रादूर्ध्वं यः प्राप्नुयादिह वानरः ।
तस्य प्राणांतिको दण्डो नात्र कार्या विचारणा ॥ ३२ ॥
जो वानर पंधरा दिवसानंतर येथे पोहोचेल, त्याला प्राणांत दंड दिला जाईल. यात कुठलाही अन्यथा विचार करतां कामा नाही. ॥३२॥
हरींश्च वृद्धानुपयातु साङ्‌गेदो
भवान्ममाज्ञामधिकृत्य निश्चिताम् ।
इति व्यवस्थां हरिपुंगवेश्वरो
विधाय वेश्म प्रविवेश वीर्यवान् ॥ ३३ ॥
’ही माझी निश्चित आज्ञा आहे. हिच्या अनुसार या व्यवस्थेचा अधिकार घेऊन अंगदासह तू स्वतः ज्येष्ठ वानरांजवळ जा. असा प्रबंध करून महाबली वानरराज सुग्रीव आपल्या महालात निघून गेले. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणतिसावा सर्ग पूरा झाला. ॥२९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP