|
| श्रीरामाय सोपालम्भं प्रतिवचनं दत्त्वा स्वतीत्वपरीक्षार्थं सीताया अग्नौ प्रवेशः - 
 | सीतेने श्रीरामांना उपालंभपूर्ण उत्तर देऊन आपल्या सतीत्वाची परीक्षा देण्यासाठी अग्निमध्ये प्रवेश करणे - | 
| एवमुक्ता तु वैदेही परुषं रोमहर्षणम् । राघवेण सरोषेण भृशं प्रव्यथिताभवत् ।। १ ।।
 
 | राघवांनी जेव्हा रोषपूर्वक याप्रकारे अंगावर काटा आणणारे कठोर वचन उच्चारले तेव्हा ते ऐकून वैदेही सीतेच्या मनात फार व्यथा झाली. ॥१॥ | 
| सा तदश्रुतपूर्वं हि जने महति मैथिली । श्रुत्वा भर्तृवचो घोरं लज्जयावनताभवत् ।। २ ।।
 
 | इतक्या मोठ्या जनसमुदायात आपल्या स्वामींच्या मुखाने अशी भयंकर गोष्ट जी पूर्वी कधीच कानावर पडली नव्हती, ऐकून मैथिली लाजेत जणु गाडली गेली. ॥२॥ | 
| प्रविशन्तीव गात्राणि स्वानि सा जनकात्मजा । वाक् शरैस्तैः सशल्येव भृशमश्रूण्यवर्तयत् ।। ३ ।।
 
 | त्या वाग्बाणांनी पीडित होऊन जनकात्मजा सीता जणु आपल्याच अंगामध्ये विलीन होऊ लागली. तिच्या नेत्रांतून अश्रूंचा अविरत प्रवाह वाहू लागला. ॥३॥ | 
| ततो बाष्पपरिक्लिन्नं प्रमार्जन्ती स्वमाननम् । शनैर्गद्गदया वाचा भर्तारमिदमब्रवीत् ।। ४ ।।
 
 | नेत्रातील जलाने भिजलेले आपले मुख पदराने पुसून ती हळू हळू गद्गद् वाणीने पतिदेवास याप्रकारे बोलली - ॥४॥ | 
| किं मामसदृशं वाक्यं ईदृशं श्रोत्रदारुणम् । रूक्षं श्रावयसे वीर प्राकृतः प्राकृतामिव ।। ५ ।।
 
 | वीर ! आपण अशी कठोर, अनुचित, कर्णकटु रूक्ष वाक्ये मला का ऐकवीत आहात, जसे कोणी निम्न श्रेणीचा पुरुष निम्न कोटितील स्त्रीला न बोलण्यायोग्य वाक्ये ऐकवतो, त्याप्रमाणे आपण माझाशी का बोलत आहात ? ॥५॥ | 
| न तथास्मि महाबाहो यथा मामवगच्छसि । प्रत्ययं गच्छ मे स्वेन चारित्रेणैव ते शपे ।। ६ ।।
 
 | महाबाहो ! आपण मला आत्ता जशी समजत आहात, तशी मी नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा. मी स्वतःच्या सदाचाराचीच शपथ घेऊन सांगत आहे की मी संदेह करण्यायोग्य नाही आहे. ॥६॥ | 
| पृथक्स्त्रीणां प्रचारेण जातिं तां परिशङ्कसे । परित्यजैनां शङ्कां तु यदि तेऽहं परीक्षिता ।। ७ ।।
 
 | नीच स्त्रीयांचे आचरण पाहून जर आपण संपूर्ण स्त्री जातीवर संदेह करत असाल तर हे उचित नाही. जर आपण मला उत्तम प्रकारे पारखली असेल तर आपण आपल्या ह्या संदेहाला मनांतून काढून टाकावे. ॥७॥ | 
| यद्यहं गात्रसंस्पर्शं गतास्मि विवशा प्रभो । कामकारो न मे तत्र दैवं तत्रापराध्यति ।। ८ ।।
 
 | प्रभो ! रावणाच्या शरीरास जो माझ्या या शरीराचा स्पर्श झाला होता त्यात माझी विवशताच कारण आहे. मी स्वेच्छेने असे केले नव्हते. यात माझ्या दुर्भाग्याचाच दोष आहे. ॥८॥ | 
| मदधीनं तु यत् तन्मे हृदयं त्वयि वर्तते । पराधीनेषु गात्रेषु किं करिष्याम्यनीश्वरी ।। ९ ।।
 
 | जे माझ्या अधीन आहे ते माझे हृदय सदा आपल्याच ठिकाणी लागून राहिलेले आहे. (त्याच्यावर दुसरा कोणी अधिकार गाजवू शकत नाही.) परंतु माझी गात्रे तर पराधीन होती. त्यांचा जर दुसर्याशी स्पर्श झाला तर मी विवश अबला काय करू शकत होते. ॥९॥ | 
| सहसंवृद्धभावेन संसर्गेण च मानद । यदि तेऽहं न विज्ञाता हता तेनास्मि शाश्वतम् ।। १० ।।
 
 | दुसर्यांना मान देणार्या प्राणनाथा ! आपला दोघांचा परस्परांवरील अनुराग सदा बरोबरच वाढलेला आहे. आपण सदा एकत्रच राहात आलो आहोत. इतके असूनही जर आपण मला उत्तम प्रकारे जाणले नसेल तर मी कायमचीच मारली गेले आहे. ॥१०॥ | 
| प्रेषितस्ते महावीरो हनुमानवलोककः । लङ्कास्थाऽहं त्वया राजन् किं तदा न विसर्जिता ।। ११ ।।
 
 | महाराज ! लंकेत मला पहाण्यासाठी जेव्हा आपण महावीर हनुमानाला धाडले होते, त्याच वेळी माझा त्याग का केला नाहीत ? ॥११॥ | 
| प्रत्यक्षं वानरस्यास्य तद्वाक्यसमनन्तरम् । त्वया सन्त्यक्तया वीर त्यक्तं स्याज्जीवितं मया ।। १२ ।।
 
 | त्या समयी वानरवीर हनुमानाच्या मुखाने आपल्या द्वारा स्वतःच्या त्यागाची गोष्ट ऐकून तात्काळच त्यांच्या समोरच मी आपल्या प्राणांचा परित्याग केला असता. ॥१२॥ | 
| न वृथा ते श्रमोऽयं स्यात् संशये न्यस्य जीवितम् । सुहृज्जनपरिक्लेशो न चायं विफलस्तव ।। १३ ।।
 
 | मग याप्रकारे आपल्या जीवनाला संकटात घालून आपल्याला हे युद्ध आदिचे व्यर्थ परिश्रम करावे लागले नसते तसेच आपल्या या मित्रांनाही अकारण कष्ट सोसावे लागले नसते. ॥१३॥ | 
| त्वया तु नरशार्दूल रोषमेवानुवर्तता । लघुनेव मनुष्येण स्त्रीत्वमेव पुरस्कृतम् ।। १४ ।।
 
 | नृपश्रेष्ठ ! आपण हलक्या माणसाप्रमाणे केवळ रोषानेच अनुसरण करून, माझ्या शील स्वभावाचा विचार सोडून देऊन केवळ निम्न कोटितील स्त्रियांच्या स्वभावालाच आपल्या समोर ठेवले आहे. ॥१४॥ | 
| अपदेशो मे शेन जनकान् नोत्पत्तिर्वसुधातलात् । मम वृत्तं च वृत्तज्ञ बहु ते न पुरस्कृतम् ।। १५ ।।
 
 | सदाचाराचे मर्म जाणणार्या देवते ! राजा जनकांच्या यज्ञभूमीतून आविर्भूत झाल्या कारणानेच मला जानकी म्हणून संबोधले जाते. वास्तविक माझी उत्पत्ति जनकापासून झालेली नाही. मी भूतलापासून प्रकट झालेली आहे. (साधारण मानव जातिहून मी विलक्षण आहे- दिव्य आहे. त्याच प्रमाणे माझे आचार - विचार ही अलौकिक दिव्य आहेत, माझ्यामध्ये चारित्रिक बल विद्यमान आहे परंतु) आपण माझ्या या वैशिष्ट्यांना उचित महत्व दिले नाहीत - या सर्वांना स्वतःसमोर ठेवले नाहीत. ॥१५॥ | 
| न प्रमाणीकृतः पाणिः बाल्ये मम निपीडितः । मम भक्तिश्च शीलं च सर्वं ते पृष्ठतः कृतम् ।। १६ ।।
 
 | बाल्यावस्थेत आपण माझे पाणिग्रहण केले आहे, याकडेही आपण ध्यान दिले नाही. आपल्या प्रति माझ्या हृदयात जी भक्ति आहे आणि माझ्या ठिकाणी जे शील आहे, ते सर्वच आपण मागे ढकलून दिलेत - एकदमच सर्व काही विसरून गेलात ? ॥१६॥ | 
| एवं ब्रुवन्ती रुदती बाष्पगद्गदभाषिणी । उवाच लक्ष्मणं सीता दीनं ध्यानपरायणम् ।। १७ ।।
 
 | इतके बोलता बोलताच सीतेचा कंठ दाटून आला. ती रडत आणि अश्रू ढाळीत दुःखी आणि चिंतामग्न होऊन बसलेल्या लक्ष्मणांना गद्गद् वाणीने म्हणाली - ॥१७॥ | 
| चितां मे कुरु सौमित्रे व्यसनस्यास्य भेषजम् । मिथ्यापवादोपहता नाहं जीवितुमुत्सहे ।। १८ ।।
 
 | सौमित्र ! माझ्यासाठी चिता तयार करा. माझ्या या दुःखावर हेच औषध आहे. मिथ्या कलंकाने कलंकित होऊन मी जिवंत राहू शकत नाही. ॥१८॥ | 
| अप्रीतस्य गुणैर्भर्त्रा त्यक्ताया जनसंसदि । या क्षमा मे गतिर्गन्तुं प्रवेक्ष्ये हव्यवाहनम् ।। १९ ।।
 
 | माझे स्वामी माझ्या गुणांनी प्रसन्न नाहीत. त्यांनी भरसभेत माझ्या परित्याग केलेला आहे. अशा दशेमध्ये माझ्यासाठी जो उचित मार्ग आहे त्यानुसार जाण्यासाठी मी अग्निमध्ये प्रवेश करीन. ॥१९॥ | 
| एवमुक्तस्तु वैदेह्या लक्ष्मणः परवीरहा । अमर्षवशमापन्नो राघवं समुदैक्षत ।। २० ।।
 
 | वैदेहीने असे म्हटल्यावर शत्रुवीरांचा संहार करणार्या लक्ष्मणांनी अमर्षाच्या वशीभूत होऊन राघवांकडे पाहिले. (त्यांना सीतेचा हा अपमान सहन होत नव्हता.) ॥२०॥ | 
| स विज्ञाय मनश्छन्दं रामस्याकारसूचितम् । चितां चकार सौमित्रिः मते रामस्य वीर्यवान् ।। २१ ।।
 
 | परंतु श्रीरामांच्या इशार्यावरून सूचित होणारा, त्यांचा हार्दिक अभिप्राय जाणून पराक्रमी लक्ष्मणांनी त्यांच्या सम्मतिनेच चिता तयार केली. ॥२१॥ | 
| नहि रामं तदा कश्चित् कालान्तकयमोपमम् । अनुनेतुमथो वक्तुं द्रष्टुं वाप्यशकत् सुहृत् ॥ २२ ॥
 
 | त्यासमयी श्रीरघुनाथ प्रलयकालीन संहारकारी यमराजासमान लोकांच्या मनात भय उत्पन्न करीत होते. त्यांचा कोणीही मित्र त्यांना समजाविणे अथवा त्यांना काही सांगणे अथवा त्यांचाकडे पहाण्याचेही धाडस करू शकला नाही. ॥२२॥ | 
| अधोमुखं तदा रामं शनैः कृत्वा प्रदक्षिणम् । उपावर्तत वैदेही दीप्यमानं हुताशनम् ।। २३ ।।
 
 | भगवान् श्रीराम खाली मान घालून उभे होते. त्याच अवस्थेत सीतेने त्यांची परिक्रमा केली. यानंतर ती प्रज्वलित अग्निच्या जवळ गेली. ॥२३॥ | 
| प्रणम्य दैवताभ्यश्च ब्राह्मणेभ्यश्च मैथिली । बद्धाञ्जलिपुटा चेदं उवाचाग्निसमीपतः ।। २४ ।।
 
 | तेथे देवतांना आणि ब्राह्मणांना प्रणाम करून मैथिली दोन्ही हात जोडून अग्निदेवाच्या समीप जाऊन याप्रकारे बोलली - ॥२४॥ | 
| यथा मे हृदयं नित्यं नापसर्पति राघवात् । तथा लोकस्य साक्षी मां सर्वतः पातु पावकः ।। २५ ।।
 
 | जर माझे हृदय कधी एक क्षणभरासाठीही राघवांपासून दूर झाले नसेल तर संपूर्ण जगताचे साक्षी अग्निदेव सर्व बाजूने माझे रक्षण करोत. ॥२५॥ | 
| यथा मां शुद्धचारित्रां दुष्टां जानाति राघवः । तथा लोकस्य साक्षी मां सर्वतः पातु पावकः ।। २६ ।।
 
 | माझे चरित्र शुद्ध आहे तरीही राघव मला दूषित समजत आहेत. जर मी सर्वथा निष्कलंक असेन तर संपूर्ण जगताचे साक्षी अग्निदेव माझे सर्व बाजूनी रक्षण करोत. ॥२६॥ | 
| कर्मणा मनसा वाचा यथा नातिचराम्यहम् । राघवं सर्वधर्मज्ञं तथा मां पातु पावकः ।। २७ ।।
 
 | जर मी मन, वाणी आणि क्रियाद्वारा कधी संपूर्ण धर्माचे ज्ञाते राघव यांचे कधी अतिक्रमण केले नसेल तर अग्निदेव माझे रक्षण करोत. ॥२७॥ | 
| आदित्यो भगवान् वायुः दिशश्चन्द्रस्तथैव च । अहश्चापि तथा संध्ये रात्रिश्च पृथिवी तथा ।
 यथान्येऽपि विजानन्ति तथा चारित्रसंयुताम् ।। २८ ।।
 
 | जर भगवान् सूर्य, वायु, दिशा, चंद्रमा, दिवस, रात्र, दोन्ही संध्या, पृथ्वी देवी तसेच अन्य देवता मला शुद्ध चारित्र्याने युक्त जाणत असतील तर अग्निदेव सर्व बाजूनी माझे रक्षण करोत. ॥२८॥ | 
| एवमुक्त्वा तु वैदेही परिक्रम्य हुताशनम् । विवेश ज्वलनं दीप्तं निःशंकेनान्तरात्मना ।। २९ ।।
 
 | असे म्हणून वैदेहीने अग्निदेवांची परिक्रमा केली आणि निशंक चित्ताने ती त्या प्रज्वलित अग्निमध्ये प्रवेश करती झाली. ॥२९॥ | 
| जनश्च सुमहांस्तत्र बालवृद्धसमाकुलः । ददर्श मैथिलीं दीप्तां प्रविशन्तीं हुताशनम् ।। ३० ।।
 
 | बालक आणि वृद्धांनी भरलेल्या तेथील महान् जनसमुदायाने त्या दीप्तिमती मैथिलीला जळत्या आगीत प्रवेश करतांना पाहिले. ॥३०॥ | 
| सा तप्तनवहेमाभा तप्तकाञ्चनभूषणा । पपात ज्वलनं दीप्तं सर्वलोकस्य सन्निधौ ।। ३१ ।।
 
 | तापविलेल्या नूतन सुवर्णासारखी कान्ति असणारी सीता आगीत तापवून शुद्ध केले गेलेल्या सुवर्णाच्या आभूषणांनी विभूषित होती. तिने सर्व लोकांच्या निकट ते पहात असतांनाच त्या जळत्या आगीत उडी मारली. ॥३१॥ | 
| ददृशुस्तां विशालाक्षीं पतन्तीं हव्यवाहनम् । सीतां सर्वाणि रूपाणि रुक्मवेदिनिभां तदा ॥ ३२ ॥
 
 | सोन्याच्या बनविलेल्या वेदीसमान कान्तिमती विशाललोचना सीतादेवीला त्यासमयी संपूर्ण भूतांनी आगीमध्ये पडतांना पाहिले. ॥३२॥ | 
| ददृशुस्तां महाभागां प्रविशन्तीं हुताशनम् । ऋषयो देवगन्धर्वा यज्ञे पुर्णाहुतीमिव ।। ३३ ।।
 
 | ऋषि, देवता आणि गंधर्वांनी पाहिले की जसा यज्ञामध्ये पूर्णाहुतिचा होम होतो, त्याचप्रकारे सीता जळत्या आगीत प्रवेश करीत आहे. ॥३३॥ | 
| प्रचुक्रुशुः स्त्रियः सर्वाः तां दृष्ट्वा हव्यवाहने । पतन्तीं संस्कृतां मन्त्रैर्वसोर्धारामिवाध्वरे ।। ३४ ।।
 
 | जशी यज्ञात मंत्रांच्या द्वारे संस्कार केल्या गेलेल्या वसुधारेची आहुति दिली जाते, त्याच प्रकारे दिव्य आभूषणांनी विभूषित सीतेला आगीत पडतांना पाहून तेथे आलेल्या सर्व स्त्रिया ओरडू लागल्या. ॥३४॥ | 
| ददृशुस्तां त्रयो लोका देवगन्धर्वदानवाः । शप्तां पतन्तीं निरये त्रिदिवाद् देवतामिव ।। ३५ ।।
 
 | तीन्ही लोकातील दिव्य प्राणी, ऋषि, देवता, गंधर्व तसेच दानवांनीही जणु स्वर्गातून कोणी देवी शापग्रस्त होऊन नरकात जाऊन पडावी त्याप्रमाणे भगवती सीतेला आगीत पडतांना पाहिले. ॥३५॥ | 
| तस्यामग्निं विशन्त्यां तु हाहेति विपुल स्वनः । रक्षसां वानराणां च सम्बभूवाद्भुतोपमः ।। ३६ ।।
 
 | तिने अग्नित प्रवेश करते समयी राक्षस आणि वानर जोरजोराने हाहाकार करू लागले. त्यांचा तो अद्भुत आर्तनाद चोहो बाजूस निनादून गेला. ॥३६॥ | 
| इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षोडशाधिकशततमः सर्गः ।। ११६ ।। 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसोळावा सर्ग पूरा झाला. ॥११६॥ | 
 
 
|