श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । एकचत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य वनगमनेनान्तःपुरस्त्रीणां विलापः पुरवासिनां सशोकावस्था च - श्रीरामांच्या वनवासामुळे राणीवशातील स्त्रियांचा विलाप तथा नगरवासी लोकांची शोकाकुल अवस्था -
तस्मिंस्तु पुरुषव्याघ्रे विनिर्याते कृताञ्जलौ ।
आर्तशब्दो हि सञ्जज्ञे स्त्रीणामन्तःपुरे महान् ॥ १ ॥
पुरुषसिंह रामांनी मातांसहित पित्यासाठी दुरूनच हात जोडून ठेवले होते, त्याच अवस्थेत जेव्हा ते रथद्वारा नगरातून बाहेर पडू लागले त्यासमयी अंतःपुरातील स्त्रियांमध्ये मोठा हाहाकार उडाला. ॥१॥
अनाथस्य जनस्यास्य दुर्बलस्य तपस्विनः ।
यो गतिः शरणं चासीत् स नाथः क्व नु गच्छति ॥ २ ॥
त्या रडत रडत म्हणू लागल्या - 'हाय ! जो आम्हा अनाथ, दुर्बल आणि शोचनीय जनांची गति (सर्व सुखांची प्राप्ति करविणारे), आणि शरण (समस्त आपत्तिपासून रक्षण करणारे) , होते ते आमचे नाथ, आमचे मनोरथ पुरविणारे श्रीराम कोठे निघून जात आहेत ? ॥२॥
न क्रुध्यत्यभिशस्तोऽपि क्रोधनीयानि वर्जयन् ।
क्रुद्धान् प्रसादयन् सर्वान् समदुःखः क्व गच्छति ॥ ३ ॥
जे कुणा कडून खोटा कलंक लावला गेल्यावरही क्रोध करीत नव्हते, क्रोध उत्पन्न होईल अशी गोष्टच कधी बोलत नाहीत, आणि रुसलेल्या सर्व लोकांची मनधरणी करून त्यांना प्रसन्न करीत होते, ते दुसर्‍यांच्या दुःखात संवेदना प्रकट करणारे राम कोठे जात आहेत ? ॥३॥
कौसल्यायां महातेजा यथा मातरि वर्तते ।
तथा यो वर्ततेऽस्मासु महात्मा क्व नु गच्छति ॥ ४ ॥
जे महातेजस्वी महात्मा श्रीराम आपली माता कौसल्या हिच्याशी जसे वर्तन करीत असत तसेच वर्तन आमच्याशीही करीत असत ते कोठे निघून जात आहेत ? ॥४॥
कैकेय्या क्लिश्यमानेन राज्ञा सञ्चोदितो वनम् ।
परित्राता जनस्यास्य जगतः क्व नु गच्छति ॥ ५ ॥
कैकेयीच्या द्वारा क्लेश प्राप्त झलेल्या महाराजांनी वनात जाण्यास सांगितल्यावर आम्हा लोकांचे आणि समस्त जगताचे रक्षण करणारे श्रीरघुवीर कोठे निघून जात आहेत ? ॥५॥
अहो निश्चेतनो राजा जीवलोकस्य संक्षयम् ।
धर्म्यं सत्यव्रतं रामं वनवासे प्रवत्स्यति ॥ ६ ॥
'अहो ! हे राजे मोठेच बुद्धिहीन आहेत कि ज्यांनी जीवजगताचे आश्रयभूत, धर्मपरायण, सत्यवती रामाला वनवासासाठी देशातून बाहेर घालविले आहे.' ॥६॥
इति सर्वा महिष्यस्ता विवत्सा इव धेनवः ।
रुरुदुश्चैव दुःखार्ताः सस्वरं च विचुक्रुशुः ॥ ७ ॥
याप्रकारे त्या सर्वच्या सर्व राण्या वासरांपासून ताटातूट झालेल्या गायींच्या प्रमाणे दुःखाने आर्त होऊन रडू लागल्या आणि उच्च स्वराने क्रंदन करू लागल्या. ॥७॥
स तमन्तःपुरे घोरमार्तशब्दं महीपतिः ।
पुत्रशोकाभिसन्तप्तः श्रुत्वा चासीत् सुदुःखितः ॥ ८ ॥
अंतःपुरातील तो घोर आर्तनाद ऐकून पुत्रशोकाने संतप्त झालेले महाराज दशरथ फरच दुःखी झाले. ॥८॥
नाग्निहोत्राण्यहून्त नापचन् गृहमेधिनः ।
अकुर्वन् न प्रजाः कार्यं सूर्यश्चान्तरधीयत ॥ ९ ॥

व्यसृजन् कवलान् नागा गावो वत्सान् न पाययन् ।
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाभ्यनन्दत ॥ १० ॥।
त्या दिवशी अग्निहोत्र बंद झाले, गृहस्थांच्या घरी अन्न शिजले नाही, प्रजांनी काही काम केले नाही, सूर्यदेव अस्ताचलास निघून गेले. हत्तीनी मुखात (सोंडेत) घेतलेला चारा सोडून दिला, गाईनी वासरांना दूध पाजले नाही आणि अगदी प्रथमच पुत्राला जन्म देऊनही कोणी माता प्रसन्न झाली नाही. ॥९-१०॥
त्रिशङ्‍कुर्लोहिताङ्‍गश्च बृहस्पतिबुधावपि ।
दारुणाः सोममभ्येत्य ग्रहाः सर्वे व्यवस्थिताः ॥ ११ ॥
त्रिशंकु, मंगळ, गुरु, बुध तथा अन्य समस्त ग्रह शुक्र, शनी आदि रात्री वक्रगतिने चंद्रम्याजवळ पोहोंचून दारूण (क्रूर कांतीयुक्त) होऊन स्थित झाले. ॥११॥
नक्षत्राणि गतार्चींषि ग्रहाश्च गततेजसः ।
विशाखास्तु सधूमाश्च नभसि प्रचकाशिरे ॥ १२ ॥
नक्षत्रांचे तेज फिके पडले आणि ग्रह निस्तेज झाले. ते सर्वच्या सर्व आकाशात विपरित मार्गावर स्थित होऊन धूमाच्छन्न प्रतीत होऊ लागले. ॥१२॥
कालिकानिलवेगेन महोदधिरिवोत्थितः ।
रामे वनं प्रव्रजिते नगरं प्रचचाल तत् ॥ १३ ॥
आकाशात पसरलेली मेघमाला वायुच्या वेगाने खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होती. श्रीरामाच्या वनगमन प्रसंगी ते सारे नगर जोरजोरात हलू लागले. तेथे भूकंप होऊ लागला. ॥१३॥
दिशः पर्याकुलाः सर्वास्तिमिरेणेव संवृताः ।
न ग्रहो नापि नक्षत्रं प्रचकाशे न किञ्चन ॥ १४ ॥
सर्व दिशा व्याकुळ होऊन गेल्या, त्यांच्यात अंधकार पसरल्या सारखा झाला. कुठलाही ग्रह अथवा नक्षत्र प्रकाशित होत नव्हते. ॥१४॥
अकस्मान्नागरः सर्वो जनो दैन्यमुपागमत् ।
आहारे वा विहारे वा न कश्चिदकरोन्मनः ॥ १५ ॥
एकाएकी सर्व नागरीक दीन दशेला प्राप्त झाले. कुणाचेही मन आहार अथवा विहारात लागेना. ॥१५॥
शोकपर्यायसन्तप्तः सततं दीर्घमुच्छ्वसन् ।
अयोध्यायां जनः सर्वश्चुक्रोश जगतीपतिम् ॥ १६ ॥
अयोध्यावासी सर्व लोक शोकपरंपरेने संतप्त होऊन निरंतर दीर्घ श्वास घेत दशरथ महाराजांना दोष देऊ लागले. ॥१६॥
बाष्पपर्याकुलमुखो राजमार्गगतो जनः ।
न हृष्टो लभ्यते कश्चित् सर्वः शोकपरायणः ॥ १७ ॥
राजमार्गावरून जाणारा कोणीही मनुष्य प्रसन्न दिसून येत नव्हता. सर्वांची मुखे अश्रूंनी भिजून गेली होती आणि सर्व शोकमग्न झाले होते. ॥१७॥
न वाति पवनः शीतो न शशी सौम्यदर्शनः ।
न सूर्यस्तपते लोकं सर्वं पर्याकुलं जगत् ॥ १८ ॥
शीतल वारा वहात नव्हता. चंद्रमा सौम्य वाटत नव्हता. सूर्यही जगतास उचित मात्रेमध्ये ताप अथवा प्रकाश देत नव्हता. सारा संसारच व्याकुळ होऊन गेला होता. ॥१८॥
अनर्थिनः सुताः स्त्रीणां भर्तारो भ्रातरस्तथा ।
सर्वे सर्वं परित्यज्य राममेवान्वचिन्तयन् ॥ १९ ॥
बालकांना माता- पित्यांचा विसर पडला. पतींना स्त्रियांची आठवण येत नव्हती, आणि भाऊ भावाची आठवण काढेनासा झाला होता. सर्वजण सर्व काही सोडून देऊन केवळ रामांचेच चिंतन करू लागले. ॥१९॥
ये तु रामस्य सुहृदः सर्वे ते मूढचेतसः ।
शोकभारेण चाक्रान्ताः शयनं नैव भेजिरे ॥ २० ॥
जे श्रीरामांचे मित्र होते ते तर सर्वच आपली शुद्धच हरवून बसलेले होते. शोकाच्या भाराने आक्रांत झाल्याने ते रात्री झोपूही शकले नाहीत. ॥२०॥
ततस्त्वयोध्या रहिता महात्मना
     पुरन्दरेणेव मही सपर्वता ।
चचाल घोरं भयशोकदीपीता
     सनागयोधाश्वगणा ननाद च ॥ २१ ॥
या प्रकारे सारी अयोध्यापुरी रामरहित होऊन भय आणि शोकाने प्रज्वलित झाल्या प्रमाणे, देवराज इंद्ररहित झालेली ही पृथ्वी जशी मेरूपर्वतासह डगमगू लागते त्याप्रमाणे घोर हलकल्लोळात बुडून गेली. हत्ती, घोडे आणि सैनिकांसह त्या नगरीत भयंकर आर्तनाद होऊ लागला. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP