श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ दशमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावण भवनं गत्वा अपशकुनभयं प्रदर्श्य सीतानिवर्तनाय रावणं प्रति विभीषणस्य प्रार्थना; तान् अनंगीकृत्य रावणेन तस्य ततो विसर्जनम् -
विभीषणाचे रावणाच्या महालात जाणे, त्यास अपशकुनांचे भय दाखवून सीतेला परत धाडण्यासाठी प्रार्थना करणे आणि रावणाने त्याचे म्हणणे मान्य न करता त्यांना तेथून निरोप देणे -
ततः प्रत्युषसि प्राप्ते प्राप्तधर्मार्थनिश्चयः ।
राक्षसाधिपतेर्वेश्म भीमकर्मा विभीषणः ॥ १ ॥

शैलाग्रचयसंकाशं शैलशृङ्‌गमिवोन्नतम् ।
सुविभक्तमहाकक्षं महाजनपरिग्रहम् ॥ २ ॥

मतिमद्‌भिः महामात्रैः अनुरक्तैरधिष्ठितम् ।
राक्षसैराप्तपर्याप्तैः सर्वतः परिरक्षितम् ॥ ३ ॥

मत्तमातङ्‌गनिश्वासैः व्याकुलीकृतमारुतम् ।
शङ्‌खघोषमहाघोषं तूर्यसंबाधनादितम् ॥ ४ ॥

प्रमदाजनसंबाधं प्रजल्पितमहापथम् ।
तप्तकाञ्चननिर्यूहं भूषणोत्तमभूषितम् ॥ ५ ॥

गंधर्वाणामिवावासं आलयं मरुतामिव ।
रत्‍नसञ्चयसंबाधं भवनं भोगिनामिव ॥ ६ ॥

तं महाभ्रमिवादित्यः तेजोविस्तृतरश्मिवान् ।
अग्रजस्यालयं वीरः प्रविवेश महाद्युतिः ॥ ७ ॥
दुसर्‍या दिवशी दिवस उजाडतांच धर्म आणि अर्थाच्या तत्त्वाला जाणणारे भीमकर्मा महातेजस्वी वीर विभीषण आपल्या मोठ्‍या भावाच्या, राक्षसराज रावणाच्या घरी गेले. ते घर अनेक प्रासादांच्यामुळे पर्वतशिखरांच्या समूहाप्रमाणे शोभून दिसत होते. त्याची उंची पहाडाच्या शिखरांना लज्जित करत होती. त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या मोठ मोठ्‍या कक्षा (देवड्‍या) सुंदर रीतीने बनविलेल्या होत्या. बरेचसे श्रेष्ठ पुरूष तेथून ये-जा करीत होते. अनेकानेक बुद्धिमान महामंत्री, जे राजाच्या प्रति अनुराग बाळगणारे होते, तेथे बसलेले होते. विश्वसनीय, हितैषी तसेच कार्य साधण्यात कुशल, बहुसंख्य राक्षस सर्वबाजूंनी त्या भवनाचे रक्षण करत होते. तेथील हवा मदमस्त हत्तींच्या नि:श्वासाने मिश्रित होऊन वावटळी सारखी भासत होती. शंखध्वनी समान राक्षसांचा गंभीर घोष तेथे निनादत रहात होता. नाना प्रकारच्या वाद्यांचे मनोरम शब्द त्या भवनास निनादित करत होते. रूप आणि यौवन यांच्या मदाने मत्त असलेल्या युवतींची तेथे जणू गर्दी उसळली होती. तेथील मोठ मोठे मार्ग लोकांच्या वार्तालापाने मुखरित झाल्यासारखे भासत होते. तेथील द्वारे तापविलेल्या सुवर्णाची बनविलेली होती. उत्तम सजावटीच्या वस्तुंनी तो महाल उत्तम प्रकारे सजविलेला होता; म्हणून तो गंधर्वांच्या आवासाप्रमाणे आणि देवतांच्या निवासस्थानाप्रमाणे मनोरम प्रतीत होत होता. रत्‍नराशीनी परिपूर्ण असल्या कारणांनी ते नागभवना समान उद्‌भासित होत होते. जसे तेजाने विस्तृत किरणांचा सूर्य महान मेघसमुदायात प्रवेश करतो, त्याच प्रकारे तेजस्वी विभीषणांनी रावणाच्या त्या भवनात पदार्पण केले. ॥१-७॥
पुण्यान् पुण्याहघोषांश्च वेदविद्‌भिरुदाहृतान् ।
शुश्राव सुमहातेजा भ्रातुर्विजयसंश्रितान् ॥ ८ ॥
तेथे पोहोचून त्या महातेजस्वी विभीषणाने आपल्या भावाच्या विजयाच्या उद्देश्याने वेदवेत्त्या ब्राह्मणांच्या द्वारा केले गेलेले पुण्याहवाचनाचे पवित्र घोष ऐकले. ॥८॥
पूजितान् दधिपात्रैश्च सर्पिर्भिः सुमनोक्षतैः ।
मंत्रवेदविदो विप्रान् ददर्श स महाबलः ॥ ९ ॥
तत्पश्चात्‌ त्या महाबली विभीषणाने वेदमंत्रांच्या ज्ञात्या ब्राह्मणांचे दर्शन केले, ज्यांच्या हातात दही आणि तुपाची पात्रे होती. फुले आणि अक्षतांनी त्या सर्वांची पूजा केली गेली होती. ॥९॥
स पूज्यमानो रक्षोभिः दीप्यमानं स्वतेजसा ।
आसनस्थं महावाहुः ववन्दे धनदानुजम् ॥ १० ॥
तेथे गेल्यावर राक्षसांनी त्यांचा स्वागत-सत्कार केला. नंतर त्या महाबाहु विभीषणाने आपल्या तेजाने देदीप्यमान आणि सिंहासनावर विराजमान झालेल्या कुबेराचा लहान भाऊ - रावण यास प्रणाम केला. ॥१०॥
स राजदृष्टिसंपन्नं आसनं हेमभूषितम् ।
जगाम समुदाचारं प्रयुज्याचारकोविदः ॥ ११ ॥
त्यानंतर शिष्टाचाराचा ज्ञाता विभीषण ’विजयतां महाराज:’ (महाराजांचा जय होवो) इत्यादि रूपाने राजाच्या प्रति परंपराप्राप्त शुभाशंसासूचक वचनाचा प्रयोग करून राजाच्या द्वारा दृष्टिच्या संकेताने दाखविल्या गेलेल्या सुवर्णभूषित सिंहासनावर बसले. ॥११॥
स रावणं महात्मानं विजने मंत्रिसंनिधौ ।
उवाच हितमत्यर्थं वचनं हेतुनिश्चितम् ॥ १२ ॥

प्रसाद्य भ्रातरं ज्येष्ठं सान्त्वेनोपस्थितक्रमः ।
देशकालार्थसंवादी दृष्टलोकपरावरः ॥ १३ ॥
विभीषण जगतातील चांगल्या-वाईट गोष्टी उत्तम प्रकारे जाणत होते. त्यांनी प्रणाम आदि व्यवहाराचा यथार्थ रूपाने निर्वाह करून सांत्वनापूर्ण वचनांच्या द्वारे आपले मोठे भाऊ महामना रावणास प्रसन्न केले आणि त्यांच्याशी एकांतात, मंत्र्यांच्या निकट देश, काळ आणि प्रयोजनास अनुरूप, युक्तिंच्या द्वारा निश्चित तसेच अत्यंत हितकारक गोष्ट सांगितली- ॥१२-१३॥
यदाप्रभृति वैदेही संप्राप्तेह परंतप ।
तदाप्रभृति दृश्यन्ते निमित्तान्यशुभानि नः ॥ १४ ॥
शत्रूंना संताप देणारे महाराज ! जेव्हा पासून वैदेही सीता येथे आली आहे तेव्हापासून आम्हा लोकांना अनेक प्रकारचे अमंगलसूचक अपशकुन दिसून येत आहेत. ॥१४॥
सस्फुलिङ्‌गः सधूमार्चिः सधूमकलुषोदयः ।
मंत्रसन्धुक्षितोऽप्यग्निः न सम्यगभिवर्धते ॥ १५ ॥
मंत्रांच्या द्वारे विधिपूर्वक धडधडविल्यावरही अग्नि उत्तम प्रकारे प्रज्वलित होत नाही. त्यातून ठिणग्या निघू लागतात. त्याच्या ज्वालांच्या बरोबर धूर निघू लागतो आणि मंथनकाळी जेव्हा अग्नि प्रकट होतो त्यासमयीही तो धुराने मलीनच असतो. ॥१५॥
अग्निष्ठेष्वग्निशालासु तथा ब्रह्मस्थलीषु च ।
सरीसृपाणि दृश्यन्ते हव्येषु च पिपीलिकाः ॥ १६ ॥
स्वयंपाकघरात, अग्निशाळेत तसेच वेदाध्ययानाच्या स्थानीही साप दिसून येतात आणि हवन-सामग्री मध्ये मुंग्या पडलेल्या दिसून येतात. ॥१६॥
गवां पयांसि स्कन्नानि विमदा वरकुञ्जराः ।
दीनमश्वाः प्रहेषन्ते नवग्रासाभिनन्दिनः ॥ १७ ॥
गायींचे दूध आटले आहे, मोठमोठे गजराज मदरहित होऊन गेले आहेत, घोडे नवीन (गवतांनी) चार्‍यांनी आनंदित (भोजनाने संतुष्ट) होऊनही दीनतापूर्ण स्वरात खिंकाळत आहेत. ॥१७॥
खरोष्ट्राश्वतरा राजन् भिन्नरोमाः स्रवन्ति नः ।
न स्वभावेऽवतिष्ठन्ते विधानैरपि चिन्तिताः ॥ १८ ॥
राजन ! गाढवे, ऊंट आणि खेचरांच्या अंगावरील रोम उभे रहात आहेत. (त्यांच्या अंगावर काटा येत आहे) त्यांच्या नेत्रातून अश्रु वाहात आहेत. विधिपूर्वक चिकित्सा केली गेली तरी ते पूर्णत: स्वस्थ होऊ शकत नाहीत. ॥१८॥
वायसाः संघशः क्रूरा व्याहरन्ति समन्ततः ।
समवेताश्च दृश्यन्ते विमानाग्रेषु संघशः ॥ १९ ॥
क्रूर कावळे झुंडीच्या झुंडीने एकत्र जमून कर्कश स्वरात कावकाव करीत आहेत, तसेच ते सातमंजली घरांच्यावर समूहाच्या समूह करून एकत्रित झालेले दिसून येत आहेत. ॥१९॥
गृध्राश्च परिलीयन्ते पुरीमुपरि पिण्डिताः ।
उपपन्नाश्च सन्ध्ये द्वे व्याहरन्त्यशिवं शिवाः ॥ २० ॥
लंकापुरीवर गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी तिला स्पर्श करीत असल्याप्रमाणे घिरट्‍या घालीत आहेत. दोन्ही संध्यांच्या समयी कोल्हीणी नगराच्या समीप येऊन अमंगळसूचक शब्द करत आहेत. ॥२०॥
क्रव्यादानां मृगाणां च पुरद्वारेषु संघशः ।
श्रूयन्ते विपुला घोषाः सविस्फूर्जितनिःस्वनाः ॥ २१ ॥
नगराच्या सर्व फाटकांवर (द्वारांवर) मांसभक्षी पशुंचे समूहच्या समूह एकत्र होऊन जोरजोराने जो चीत्कार करीत आहेत तो वीजेच्या गडगडाटाप्रमाणे ऐकू येत आहे. ॥२१॥
तदेवं प्रस्तुते कार्ये प्रायश्चित्तमिदं क्षमम् ।
रोचये वीर वैदेही राघवाय प्रदीयताम् ॥ २२ ॥
वीरवर ! अशा परिस्थितीमध्ये मला तर हेच प्रायश्चित्त चांगले वाटत आहे की वैदेही सीतेला राघवाला परत केले जावे. ॥२२॥
इदं च यदि वा मोहात् लोभाद् वा व्याहृतं मया ।
तत्रापि च महाराज न दोषं कर्तुमर्हसि ॥ २३ ॥
महाराज ! जर ही गोष्ट मी मोहाने अथवा लोभाने सांगितली असेल तरीही आपण माझ्या ठिकाणी दोषदृष्टी ठेवता कामा नये. ॥२३॥
अयं च दोषः सर्वस्य जनस्यास्योपलक्ष्यते ।
रक्षसां राक्षसीनां च पुरस्यान्तःपुरस्य च ॥ २४ ॥
सीतेचे अपहरण तसेच यामुळे होणारा अपशकुनरूपी दोष येथील सर्व जनता, राक्षस-राक्षसिणी तसेच नगर आणि अंत:पुर - सर्वांसाठी उपलक्षित होत आहे. ॥२४॥
श्रावणे चास्य मंत्रस्य निवृत्ताः सर्वमंत्रिणः ।
अवश्यं च मया वाच्यं यद् दृष्टमथवा श्रुतम् ।
संप्रधार्य यथान्यायं तद् भवान् कर्तुमर्हति ॥ २५ ॥
ही गोष्ट आपल्या कानांपर्यंत पोहोचविण्यास प्राय: सर्व मंत्री संकोच करत आहेत, परंतु जी गोष्ट मी पाहिली अथवा ऐकली आहे ती मला तर आपल्या पुढे अवश्य निवेदन केली पाहिजे म्हणून त्यावर (समयोचित) यथोचित विचार करून आपणास जसे उचित वाटेल तसे करावे. ॥२५॥
इति स्वमंत्रिणां मध्ये भ्राता भ्रातरमूचिवान् ।
रावणं रक्षसां श्रेष्ठं पथ्यमेतद् विभीषणः ॥ २६ ॥
याप्रकारे भाऊ विभीषणाने आपल्या मंत्र्यांच्या मध्ये मोठा भाऊ राक्षसराज रावणाला ही हितकारक वचने ऐकविली. ॥२६॥
हितं महार्थं मृदु हेतुसंहितं
व्यतीतकालायतिसंप्रतिक्षमम् ।
निशम्य तद्‌वाक्यमुपस्थितज्वरः
प्रसङ्‌गवानुत्तरमेतदब्रवीत् ॥ २७ ॥

भयं न पश्यामि कुतश्चिदप्यहं
न राघवः प्राप्स्यति जातु मैथिलीम् ।
सुरैः सहेन्द्रैरपि संगरे कथं
ममाग्रतः स्थास्यति लक्ष्मणाग्रजः ॥ २८ ॥
विभीषणांची ही हितकारक, महान अर्थाची साधक, कोमल, युक्तीसंगत तसेच भूत, भविष्य आणि वर्तमान काळातही कार्यसाधण्यात समर्थ अशी वचने ऐकून रावणाला संताप चढला. राघवाशी वैर वाढविण्यात त्याला आसक्ती निर्माण झाली होती. म्हणून त्याने याप्रकारे उत्तर दिले- विभीषणा ! मला तर कोठूनही भय दिसत नाही. राम मैथिली सीतेला कधीही प्राप्त करू शकत नाही. इंद्रांसहित देवतांची मदत प्राप्त केली तरीही लक्ष्मणांचे मोठे भाऊ राम माझ्या समोर संग्रामात कसे टिकू शकतील ? ॥२७-२८॥
इत्येवमुक्त्वा सुरसैन्यनाशनो
महाबलः संयति चण्डविक्रमः ।
दशाननो भ्रातरमाप्तवादिनं
विसर्जयामास तदा विभीषणम् ॥ २९ ॥
असे म्हणून देवसेनेचे नाशक आणि समरांगणात प्रचंड पराक्रम प्रकट करणार्‍या महाबळी दशाननांनी आपल्या यथार्थवादी भावास विभीषणास तात्काळ निरोप दिला. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP