श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुरशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणेन श्रीरामं प्रति इन्द्रजितो मायाया रहस्यं वर्णयित्वा सीता जीवतीति विश्वासस्य दृढीकरणं लक्ष्मणं च निकुम्भिलां गमयितुं प्रार्थनम् -
विभीषणाचे श्रीरामांस इंद्रजिताच्या मायेचे रहस्य सांगून सीता जिवंत असल्याचा विश्वास व्यक्त करणे आणि लक्ष्मणांस सेनेसहित निकुम्भिला मंदिरात धाडण्यासाठी अनुरोध करणे -
राममाश्वासयाने तु लक्ष्मणे भ्रातृवत्सले ।
निक्षिप्य गुल्मान् स्वस्थाने तत्रागच्छद् विभीषणः ॥ १ ॥
भ्रातृवत्सल लक्ष्मण जेव्हा श्रीरामांना याप्रकारे आश्वासित करत होते त्याचवेळी विभीषण वानर सैनिकांना आपापल्या स्थानावर स्थापित करून तेथे आले. ॥१॥
नानाप्रहरणैः वीरैः चतुर्भिरभिसंवृतः ।
नीलाञ्जनचयाकारैः मातङ्‌गैरिव यूथपैः ॥ २ ॥
नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे धारण केलेले चार निशाचर वीर जे काळ्या काजळाच्या राशीप्रमाणे काळ्या शरीराच्या यूथपति गजराजासमान भासत होते, चोहो बाजूनी घेरून त्यांचे रक्षण करत होते. ॥२॥
सोऽभिगम्य महात्मानं राघवं शोकलालसम् ।
वानरांश्चैव ददृशे बाष्पपर्याकुलेक्षणान् ॥ ३ ॥
तेथे येऊन त्यांनी पाहिले की महात्मा लक्ष्मण शोकात बुडलेले आहेत तसेच वानरांच्या डोळ्यातही अश्रु दाटले आहेत. ॥३॥
राघवं च महात्मानं इक्ष्वाकुकुलनन्दनम् ।
ददर्श मोहमापन्नं लक्ष्मणस्याङ्‌कमाश्रितम् ॥ ४ ॥
त्याच बरोबर इक्ष्वाकु कुलनंदन महात्मा राघवावर त्यांची दृष्टि पडली जे मूर्च्छित होऊन लक्ष्मणांच्या मांडीवर झोपलेले होते. ॥४॥
व्रीडितं शोकसन्तप्तं दृष्ट्‍वा रामं विभीषणः ।
अन्तर्दुःखेन दीनात्मा किमेतदिति सोऽब्रवीत् ॥ ५ ॥
श्रीरामांना लज्जित आणि शोकाने संतप्त पाहून विभीषणांचे हृदय आंतरिक दुःखाने दीन झाले. त्यांनी विचारले - ही काय गोष्ट आहे ? ॥५॥
विभीषणमुखं दृष्ट्‍वा सुग्रीवं तांश्च वानरान् ।
लक्ष्मणोवाच मन्दार्थं इदं बाष्पपरिप्लुतः ॥ ६ ॥
तेव्हा लक्ष्मणांनी विभीषणाच्या मुखाकडे पाहून तसेच सुग्रीव आणि दुसर्‍या इतर वानरांवर दृष्टिपात करून अश्रु ढाळीत मंदस्वरात म्हटले - ॥६॥
हता इन्द्रजिता सीता इति श्रुत्वैव राघवः ।
हनुमद्वचनात् सौम्य ततो मोहमुपाश्रितः ॥ ७ ॥
सौम्य ! हनुमानाच्या मुखाने इंद्रजिताने सीतेला ठार मारले आहे हे ऐकून राघव तात्काळ मूर्च्छित झाले आहेत. ॥७॥
कथयन्तं तु सौमित्रिं सन्निवार्य विभीषणः ।
पुष्कलर्थं इदं वाक्यं विसंज्ञं राममब्रवीत् ॥ ८ ॥
याप्रकारे बोलणार्‍या लक्ष्मणांना विभीषणाने अडविले आणि अचेत होऊन पडलेल्या श्रीरामांना ही निश्चित गोष्ट सांगितली - ॥८॥
मनुजेन्द्रार्तरूपेण यदुक्तं च हनूमता ।
तदयुक्तमहं मन्ये सागरस्येव शोषणम् ॥ ९ ॥
महाराज ! हनुमानांनी दुःखी होऊन तुम्हांला जो समाचार सांगितला आहे त्याला मी समुद्र सुकून जाण्याप्रमाणे असंभव मानतो. ॥९॥
अभिप्रायं तु जानामि रावणस्य दुरात्मनः ।
सीतां प्रति महाबाहो न च घातं करिष्यति ॥ १० ॥
महाबाहो ! दुरात्मा रावणाचा सीतेप्रति काय भाव आहे हे मी उत्तम प्रकारे जाणतो. तो तिचा वध कदापिही करू देणार नाही. ॥१०॥
याच्यमानस्तु सुबहुशो मया हितचिकीर्षुणा ।
वैदेहीमुत्सृजस्वेति न च तत् कृतवान् वचः ॥ ११ ॥
मी त्याचे हित करण्याच्या इच्छेने अनेक वेळा असा अनुरोध केला होता की वैदेहीला सोडून दे; परंतु त्याने माझे म्हणणे मानले नाही. ॥११॥
नैव साम्ना न दानेन न भेदेन कुतो युधा ।
सा द्रष्टुमपि शक्येत नैव चान्येन केनचित् ॥ १२ ॥
सीतेला दुसरा कोणी पुरूष साम, दाम आणि भेदनीतिच्या द्वाराही पाहू शकत नाही; मग युद्धद्वारा कसा पाहू शकेल ? ॥१२॥
वानरान् मोहयित्वा तु प्रतियातः स राक्षसः ।
मायामयीं महाबाहो तां विद्धि जनकात्मजाम् ॥ १३ ॥
महाबाहो ! राक्षस इंद्रजित वानरांना मोहात पाडून निघून गेला आहे. जिचा त्याने वध केला होता ती मायामयी जानकी होती, असे निश्चित समजावे. ॥१३॥
चैत्यं निकुम्भिलामद्य प्राप्य होमं करिष्यति ।
हुतवानुपयातो हि देवैरपि सवासवैः ॥ १४ ॥

दुराधर्षो भवत्येव सङ्‌ग्रामे रावणात्मजः ।
तो यावेळी निकुम्भिला मंदिरात जाऊन होम करील आणि जेव्हा होम करून परत येईल त्यावेळी त्या रावणकुमाराला संग्रामात परास्त करणे इंद्रासहित संपूर्ण देवतांनाही कठीण होईल. ॥१४ १/२॥
तेन मोहयता नूनं एषा माया प्रयोजिता ॥ १५ ॥

विघ्नमन्विच्छता तत्र वानराणां पराक्रमे ।
निश्चितच त्याने आपल्याला मोहात पाडण्यासाठीच हा मायेचा प्रयोग केला आहे. त्याने विचार केला असेल की जर वानरांचा पराक्रम चालूच राहिला तर माझ्या या कार्यात विघ्न येईल. म्हणून त्याने असे केले आहे. ॥१५ १/२॥
ससैन्यास्तत्र गच्छामो यावत्तन्न समाप्यते ॥ १६ ॥

त्यजेमं नरशार्दूल मिथ्यासन्तापमागतम् ।
जो पर्यंत त्याचे होम कर्म समाप्त होत नाही, त्यापूर्वीच आपण सेनेसहित निकुम्भिला मंदिरात जाऊ या. नरश्रेष्ठ ! या मिथ्या संतापाचा त्याग करावा. ॥१६ १/२॥
सीदते हि बलं सर्वं दृष्ट्‍वा त्वां शोककर्शितम् ॥ १७ ॥

इह त्वं स्वस्थहृदयः तिष्ठ सत्त्वसमुच्छ्रितः ।
लक्ष्मणं प्रेषयास्माभिः सह सैन्यानुकर्षिभिः ॥ १८ ॥
प्रभो ! आपणास शोकाने संतप्त झालेले पाहून सारी सेना दुःखात पडली आहे. आपण तर धैर्यात सर्वांपेक्षा वरचढ आहात म्हणून स्वस्थचित्त होऊन येथे थांबावे आणि सेनेला घेऊन जाणार्‍या आम्हां लोकांबरोबर लक्ष्मणांना धाडावे. ॥१७-१८॥
एष तं नरशार्दूलो रावणिं निशितैः शरैः ।
त्याजयिष्यति तत् कर्म ततो वध्यो भविष्यति ॥ १९॥
हे नरश्रेष्ठ लक्ष्मण आपल्या तीक्ष्ण बाणांनी विंधून रावणकुमाराला ते होमकर्म त्यागण्यास विवश करतील. यायोगेच तो मारला जाऊ शकेल. ॥१९॥
तस्यैते निशितास्तीक्ष्णाः पत्रिपत्राङ्‌गवाजिनः ।
पतत्रिण इवासौम्याः शराः पास्यन्ति शोणितम् ॥ २० ॥
लक्ष्मणांचे हे तीक्ष्ण बाण जे पक्ष्यांच्या अंगभूत पिसांनी युक्त होण्यामुळे अत्यंत वेगशाली आहेत, कंक आदि क्रूर पक्ष्यांप्रमाणे इंद्रजिताच्या रक्ताचे पान करतील. ॥२०॥
तं सन्दिश महावाहो लक्ष्मणं शुभलक्षणम् ।
राक्षसस्य विनाशाय वज्रं वज्रधरो यथा ॥ २१ ॥
म्हणून महाबाहो ! ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र दैत्यांच्या वधासाठी वज्राचा प्रयोग करतात त्या प्रकारे आपण त्या राक्षसाच्या विनाशासाठी शुभलक्षण संपन्न लक्ष्मणांना जाण्याची आज्ञा द्यावी. ॥२१॥
मनुजवर न कालविप्रकर्षो
रिपुनिधनं प्रति यत् क्षमोऽद्य कर्तुम् ।
त्वमतिसृज रिपोर्वधाय वज्रं
दिविजरिपोर्मथने यथा महेन्द्रः ॥ २२ ॥
नरेश्वर ! शत्रुचा विनाश करण्यात आता हा कालक्षेप करणे उचित नाही, म्हणून आपण शत्रुवधासाठी, देवद्रोही दैत्यांच्या विनाशासाठी देवराज इंद्र ज्याप्रमाणे वज्राचा प्रयोग करतात, त्याप्रमाणे लक्ष्मणांना धाडावे. ॥२२॥
समाप्तकर्मा हि स राक्षसार्षभो
भवत्यदृश्यः समरे सुरासुरैः ।
युयुत्सता तेन समाप्तकर्मणा
भवेत् सुराणामपि संशयो महान् ॥ २३ ॥
तो राक्षसशिरोमणी इंद्रजित जेव्हा आपले अनुष्ठान पूर्ण करील तेव्हा समरांगणात देवता आणि असुरही त्याच्याकडे पाहू शकणार नाहीत. आपले कर्म पूरे करून जेव्हा तो युद्धाच्या इच्छेने रणभूमीत उभा राहील त्या समयी देवतांनाही आपल्या जीवनाच्या रक्षणाविषयी संदेह होऊ लागेल. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुरशीतितमः सर्गः ॥ ८४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा चौर्‍याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP