श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकोनसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सबलस्य दशरथस्य मिथिलायां गमनं तत्र जनकेन तस्य सत्कारश्च - दल बल सहित राजा दशरथांची मिथिला-यात्रा आणि तेथे राजा जनकांच्या द्वारा त्यांचा स्वागत सत्कार -
ततो रात्र्यां व्यतीतायां सोपाध्यायः सबान्धवः ।
राजा दशरथो हृष्टः सुमन्त्रमिदमब्रवीत् ॥ १ ॥
त्यानंतर रात्र व्यतीत झाल्यावर उपाध्याय आणि बंधुबांधवांसह राजा दशरथ अत्यंत आनन्दित होऊन सुमंत्रास म्हणाले - ॥ १ ॥
अद्य सर्वे धनाध्यक्षा धनमादाय पुष्कलम् ।
व्रजन्त्वग्रे सुविहिता नानारत्‍नसमन्विताः ॥ २ ॥
आज आमचे सर्व धनाध्यक्ष बरेचसे धन घेऊन नाना प्रकारच्या रत्‍नांनी संपन्न होऊन सर्वांच्या पुढे निघू देत. त्यांच्या संरक्षणाची सर्व प्रकारे सुव्यवस्था झाली पाहिजे. ॥ २ ॥
चतुरङ्‍गबलं चापि शीघ्रं निर्यातु सर्वशः ।
ममाज्ञासमकालं च यानं युग्यमनुत्तमम् ॥ ३ ॥
सर्व चतुरंगिणी सेनाही येथून शीघ्र कूच करो. आता माझी आज्ञा ऐकताच सुंदर सुंदर पालख्या आणि चांगले घोडे आदि वाहनेही तयार होऊन चालू लागोत. ॥ ३ ॥
वसिष्ठो वामदेवश्च जाबालिरथ काश्यपः ।
मार्कण्डेयस्तु दीर्घायुर्ऋषिः कात्यायनस्तथा ॥ ४ ॥

एते द्विजाः प्रयान्त्वग्रे स्यन्दनं योजयस्व मे ।
यथा कालात्ययो न स्याद् दूता हि त्वरयन्ति माम् ॥ ५ ॥
'वसिष्ठ, वामदेव, जाबालि, कश्यप, दीर्घजीवी मार्कंडेय मुनि तथा कात्यायन - हे सर्व ब्रह्मर्षि पुढे पुढे चालोत. माझाही रथ तयार करा. उशीर होता कामा नये. राजा जनकांचे दूत मला घाई करण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. ॥ ४-५ ॥
वचनाच्च नरेन्द्रस्य सेना च चतुरङ्‌गिणी ।
राजानमृषिभिः सार्धं व्रजन्तं पृष्ठतोऽन्वयात् ॥ ६ ॥
राजाच्या आज्ञेस अनुसरून चतुरंगिणी सेना तयार झाली आणि ऋषिंच्यासह यात्रा करणार्‍या महाराज दशरथांच्या मागे मागे चालू लागली. ॥ ६ ॥
गत्वा चतुरहं मार्गं विदेहानभ्युपेयिवान् ।
राजा च जनकः श्रीमाञ्श्रुत्वा पूजामकल्पयत् ॥ ७ ॥
चार दिवसांचा मार्ग पार करून ते सर्व लोक विदेह देशात येऊन पोहोंचले. त्यांच्या आगमनाचा समाचार ऐकून श्रीमान् राजा जनकांनी त्यांच्या स्वागत सत्काराची तयारी केली. ॥ ७ ॥
ततो राजानमासाद्य वृद्धं दशरथं नृपम् ।
मुदितो जनको राजा प्रहर्षं परमं ययौ ॥ ८ ॥
तत्पश्चात आनन्दमग्न झालेले राजा जनक वृद्ध महाराज दशरथांपाशी गेले. त्यांना भेटून त्यांना फार हर्ष झाला. ॥ ८ ॥
उवाच वचनं श्रेष्ठो नरश्रेष्ठं मुदान्वितम् ।
स्वागतं ते नरश्रेष्ठ दिष्ट्या प्राप्तोऽसि राघव ॥ ९ ॥
राजांमध्ये श्रेष्ठ मिथिला नरेशांनी आनन्दमग्न झालेल्या पुरुषप्रवर राजा दशरथांना म्हटले - "नरश्रेष्ठ रघुनन्दन ! आपले स्वागत आहे. माझे मोठे भाग्य आहे की आपण येथे आलात. ॥ ९ ॥
पुत्रयोरुभयोः प्रीतिं लप्स्यसे वीर्यनिर्जिताम् ।
दिष्ट्या प्राप्तो महातेजा वसिष्ठो भगवानृषिः ॥ १० ॥

सह सर्वैर्द्विजश्रेष्ठैर्देवैरिव शतक्रतुः ।
'आपण येथे आपल्या दोन्ही पुत्रांची प्रीति प्राप्त कराल जी त्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकून प्राप्त केली आहे. महातेजस्वी भगवान् वसिष्ठ मुनिंनी सुद्धा आमच्या सौभाग्यामुळेच येथे पदार्पण केले आहे. हे या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांसह, इंद्र जसे देवतांसह सुशोभित होतात तसे शोभा प्राप्त करीत आहेत. ॥ १० १/२ ॥
दिष्ट्या मे निर्जिता विघ्ना दिष्ट्या मे पूजितं कुलम् ॥ ११ ॥

राघवैः सह संम्बन्धाद् वीर्यश्रेष्ठैर्महाबलैः ।
सौभाग्याने माझ्या सार्‍या विघ्न-बाधा पराजित झाल्या आहेत. रघुकुलाचे महापुरुष महान् बलाने संपन्न आणि पराक्रमात सर्वांत श्रेष्ठ असातात. या कुलाशी संबंध होत असल्यामुळे आज माझ्या कुलाचा सन्मान वाढला आहे. ॥ ११ १/२ ॥
श्वः प्रभाते नरेन्द्र त्वं संवर्तयितुमर्हसि ॥ १२ ॥

यज्ञस्यान्ते नरश्रेष्ठ विवाहमृषिसत्तमैः ।
'नरश्रेष्ठ नरेंद्र ! उद्या सकाळी या सर्व महर्षिंच्या समवेत उपस्थित होऊन माझ्या यज्ञाच्या समाप्तिनंतर आपण श्रीरामाच्या विवाहाचे शुभकार्य संपन्न करू.' ॥ १२ १/२ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्या ऋषिमध्ये नराधिपः ॥ १३ ॥

वाक्यं वाक्यविदां श्रेष्ठः प्रत्युवाच महीपतिम् ।
ऋषि मंडळींमध्ये राजा जनकांचे हे भाषण ऐकून संभाषणज्ञ, वाक्यमर्मज्ञ व विद्वानांमध्ये श्रेष्ठ महाराज दशरथांनी मिथिला नरेशांना या प्रकारे म्हटले - ॥ १३ १/२ ॥
प्रतिग्रहो दातृवशः श्रुतमेतन्मया पुरा ॥ १४ ॥

यथा वक्ष्यसि धर्मज्ञ तत्करिष्यामहे वयम् ।
'धर्मज्ञ ! मी पहिल्यापासूनच असे ऐकले आहे की प्रतिग्रही दात्यांच्या अधीन असतो. म्हणून आपण जसे म्हणाल, आम्ही तसेच करू.' ॥ १४ १/२ ॥
तत् धर्मिष्ठं यशस्यं च वचनं सत्यवादिनः ॥ १५ ॥

श्रुत्वा विदेहाधिपतिः परं विस्मयमागतः ।
सत्यवादी राजा दशरथांचे असे धर्मानुकूल तथा यशोवर्धक वचन ऐकून विदेहराज जनकांना मोठा विस्मय वाटला. ॥ १५ १/२ ॥
ततः सर्वे मुनिगणाः परस्परसमागमे ॥ १६ ॥

हर्षेण महता युक्तास्तां रात्रिमवसन् सुखम् ।
त्यानंतर सर्व महर्षि एक दुसर्‍याला भेटून अत्यंत प्रसन्न झाले आणि सर्वांनी फार सुखाने ती रात्र घालविली. ॥ १६ १/२ ॥
अथ रामो महातेजा लक्ष्मणेन समं ययौ ॥ १७ ॥

विश्वामित्रं पुरस्कृत्य पितुः पादावुपस्पृशन् ।
इकडे महातेजस्वी श्रीराम विश्वामित्रांना पुढे करून लक्ष्मणासह आपल्या पित्याजवळ गेले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. ॥ १७ १/२ ॥
राजा च राघवौ पुत्रौ निशाम्य परिहर्षितः ॥ १८ ॥

उवास परमप्रीतो जनकेनाभिपूजितः ।
राजा दशरथांनीही जनकद्वारा आदर सत्कार मिळाल्याने मोठ्या प्रसन्नतेचा अनुभव घेतला आणि आपल्या दोन्ही रघुकुलरत्‍न पुत्रांना सकुशल पाहून त्यांना अपार हर्ष झाला. ते रात्री मोठ्या सुखाने तेथे राहिले. ॥ १८ १/२ ॥
जनकोऽपि महातेजाः क्रिया धर्मेण तत्त्ववित् ।
यज्ञस्य च सुताभ्यां च कृत्वा रात्रिमुवास ह ॥ १९ ॥
महातेजस्वी तत्त्वज्ञ राजा जनकांनीही धर्माच्या अनुसार यज्ञकार्य संपन्न केले, तथा आपल्या दोन्ही कन्यांसाठी मंगलाचाराचे संपादन करून सुखाने ती रात्र व्यतीत केली. ॥ १९ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनसप्ततितमः सर्गः ॥ ६९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP