श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षट्सप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण शम्बूकस्य वधः तस्य देवैः प्रशंसनम्, अगस्त्याश्रमे महर्षिणागस्त्येन तस्य सत्कारः, तदर्थं आभूषणदानं च -
श्रीरामांच्या द्वारे शंबूकाचा वध, देवतांच्या द्वारा त्यांची प्रशंसा, अगस्त्याश्रमावर महर्षि अगस्त्यांच्या द्वारे त्यांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी आभूषण दान -
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामस्याक्लिष्टकर्मणः ।
अवाक्शिरास्तथाभूतो वाक्यमेतदुवाच ह ॥ १ ॥
क्लेशरहित कर्म करणार्‍या भगवान्‌ रामांचे हे वचन ऐकून खाली मस्तक करून लटकत असलेल्या तो तथाकथित तपस्वी या प्रकारे बोलला - ॥१॥
शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः ।
देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥
महायशस्वी श्रीरामा ! मी शूद्रयोनिमध्ये उत्पन्न झालो आहे आणि सदेह स्वर्गलोकात जाऊन देवत्व प्राप्त करू इच्छित आहे; म्हणून असे उग्र तप करीत आहे. ॥२॥
न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया ।
शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥
काकुत्स्थ रामा ! मी खोटे बोलत नाही. देवलोकावर विजय मिळविण्याच्या इच्छेनेच तपस्या करीत आहे. आपण मला शूद्र समजा. माझे नाव शंबूक आहे. ॥३॥
भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् ।
निष्कृष्य कोशाद् विमलं शिरश्चिच्छेद राघवः ॥ ४ ॥
तो याप्रकारे सांगतच होता की राघवांनी म्यानांतून चमकणारी तलवार खेचून काढली आणि तिने त्याचे शिर कापून टाकले. ॥४॥
तस्मिञ्छूद्रे हते देवाः सेन्द्राः साग्निपुरोगमाः ।
साधु साध्विति काकुत्स्थं ते शशंसुर्मुहुर्मुहुः ॥ ५ ॥
त्या शूद्राचा वध होताच इंद्र आणि अग्निसहित संपूर्ण देवता फार चांगले, फार चांगले म्हणून भगवान्‌ श्रीरामांची वारंवार प्रशंसा करू लागल्या. ॥५॥
पुष्पवृष्टिर्महत्यासीद् दिव्यानां सुसुगन्धिनाम् ।
पुष्पाणां वायुमुक्तानां सर्वतः प्रपपात ह ॥ ६ ॥
त्या समयी त्यांच्यावर सर्व बाजुनी वायुदेवतेद्वारा विखुरल्या गेलेल्या दिव्य आणि परम सुगंधित पुष्पांची फार मोठी वृष्टि होऊ लागली. ॥६॥
सुप्रीताश्चाब्रुवन् रामं देवाः सत्यपराक्रमम् ।
सुरकार्यमिदं सौम्य सुकृतं ते महामते ॥ ७ ॥
त्या सर्व देवता अत्यंत प्रसन्न होऊन सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हणाल्या - देव ! महामते ! आपण हे देवतांचे कार्य केले आहे. ॥७॥
गृहाण च वरं सौम्य यत्त्वमिच्छस्यरिन्दम ।
स्वर्गभाङ्‌नहि शूद्रोऽयं त्वत्कृते रघुनन्दन ॥ ८ ॥
शत्रूंचे दमन करणार्‍या रघुनंदना, सौम्या, श्रीरामा ! आपल्या या सत्कर्मानेच हा शूद्र सशरीर स्वर्गलोकात जाऊ शकला नाही. म्हणून आपण जो हवा असेल तो वर मागून घ्या. ॥८॥
देवानां भाषितं श्रुत्वा रामः सत्यपराक्रमः ।
उवाच प्राञ्जलिर्वाक्यं सहस्राक्षं पुरंदरम् ॥ ९ ॥
देवतांचे हे वचन ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांनी दोन्ही हात जोडून सहस्त्रनेत्रधारी देवराज इंद्रांना म्हटले - ॥९॥
यदि देवाः प्रसन्ना मे द्विजपुत्रः स जीवतु ।
दिशन्तु वरमेतं मे इप्सितं परमं मम ॥ १० ॥
जर देवता माझ्यावर प्रसन्न आहेत तर तो ब्राह्मणपुत्र जीवित होवो. हाच माझ्यासाठी सर्वांत उत्तम आणि अभिष्ट वर आहे. देवता लोकांनी मला हा वर द्यावा. ॥१०॥
ममापचाराद् बालोऽसौ ब्राह्मणस्यैकपुत्रकः ।
अप्राप्तकालः कालेन नीतो वैवस्वतक्षयम् ॥ ११ ॥
माझ्याच अपराधामुळे ब्राह्मणाचा हा एकुलता एक बालक असमयीच मृत्युमुखात गेला होता. ॥११॥
तं जीवयत भद्रं वो नानृतं कर्तुमर्हथ ।
द्विजस्य संश्रुतोऽर्थो मे जीवयिष्यामि ते सुतम् ॥ १२ ॥
मी ब्राह्मणाच्या समोर ही प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या पुत्राला जीवित करून देईन. माझे बोलणे खोटे करू नये. ॥१२॥
राघवस्य तु तद् वाक्यं श्रुत्वा विबुधसत्तमाः ।
प्रत्युचू राघवं प्रीता देवाः प्रीतिसमन्वितम् ॥ १३ ॥
श्रीराघवांचे ते वाक्य ऐकून ते विबुधशिरोमणी देव त्यांना प्रसन्नतापूर्वक म्हणाले - ॥१३॥
निर्वृतो भव काकुत्स्थ सोऽस्मिन्नहनि बालकः ।
जीवितं प्राप्तवान् भूयः समेतश्चापि बन्धुभिः ॥ १४ ॥
काकुत्स्था ! आपण संतुष्ट व्हा. तो बालक आजच फिरून जिवंत होईल आणि आपल्या बंधु-बांधवांना जाऊन भेटेल. ॥१४॥
यस्मिन्मुहूर्ते काकुत्स्थ शूद्रोऽयं विनिपातितः ।
तस्मिन्मुहूर्ते बालोऽसौ जीवेन समयुज्यत ॥ १५ ॥
काकुत्स्थ ! आपण ज्या मुहूर्तामध्ये या शूद्राला धराशायी केले आहे, त्याच मुहूर्तात तो बालक जिवंत होऊन उठला आहे. ॥१५॥
स्वस्ति प्राप्नुहि भद्रं ते साधु याम नरर्षभ ।
अगस्त्यस्याश्रमपदं द्रष्टुमिच्छाम राघव ॥ १६ ॥

तस्य दीक्षा समाप्ता हि ब्रह्मर्षेः सुमहाद्युतेः ।
द्वादशं हि गतं वर्षं जलशय्यां समासतः ॥ १७ ॥
नरश्रेष्ठ ! आपले कल्याण होवो ! भले होवो ! आता आम्ही अगस्त्याश्रमाकडे जात आहोत. रघुनंदना ! आम्ही महर्षि अगस्त्यांचे दर्शन करू इच्छितो. त्यांना जलशय्या घेतल्याला पूर्ण बारा वर्षे झाली आहेत. आता त्या महातेजस्वी ब्रह्मर्षिंची ती जलाशयन संबंधी व्रताची दीक्षा समाप्त झाली आहे. ॥१६-१७॥
काकुत्स्थ तद् गमिष्यामो मुनिं समभिनन्दितुम् ।
त्वं चाप्यागच्छ भद्रं ते द्रष्टुं तमृषिसत्तमम् ॥ १८ ॥
रघुनंदना ! म्हणून आम्ही त्या महर्षिंचे अभिनंदन करण्यासाठी जाऊ. आपले कल्याण होवो. आपणही त्या मुनिश्रेष्ठांचे दर्शन करण्यासाठी चलावे. ॥१८॥
स तथेति प्रतिज्ञाय देवानां रघुनन्दनः ।
आरुरोह विमानं तं पुष्पकं हेमभूषितम् ॥ १९ ॥
तेव्हा फार चांगले म्हणून रघुनंदन श्रीराम देवतांच्या समोरच तेथे जाण्याची प्रतिज्ञा करून त्या सुवर्णभूषित पुष्पक विमानावर चढले. ॥१९॥
ततो देवाः प्रयातास्ते विमानैर्बहुविस्तरैः ।
रामोऽप्यनुजगामाशु कुम्भयोनेस्तपोवनम् ॥ २० ॥
त्यानंतर देवता बहुसंख्यक विमानांवर आरूढ होऊन तेथून प्रस्थित झाल्या. नंतर रामही त्यांच्याच बरोबर शीघ्रतापूर्वक कुम्भज ऋषिंचा तपोवनाकडे निघाले. ॥२०॥
दृष्ट्‍वा तु देवान् संप्राप्तान् अगस्त्यस्तपसां निधिः ।
अर्चयामास धर्मात्मा सर्वांस्तानविशेषतः ॥ २१ ॥
देवतांना आलेले पाहून तपस्येचे निधि धर्मात्मा अगस्त्यांनी त्या सर्वांची समानरूपाने पूजा केली. ॥२१॥
प्रतिगृह्य ततः पूजां सम्पूज्य च महामुनिम् ।
जग्मुस्ते त्रिदशा हृष्टा नाकपृष्ठं सहानुगैः ॥ २२ ॥
त्यांची पूजा ग्रहण करून त्या महामुनिंचे अभिनंदन करून त्या सर्व देवता अनुचरांसहित मोठ्‍या हर्षाने स्वर्गाला निघून गेल्या. ॥२२॥
गतेषु तेषु काकुत्स्थः पुष्पकादवरुह्य च ।
ततोऽभिवादयामास अगस्त्यं ऋषिसत्तमम् ॥ २३ ॥
त्या निघून गेल्यावर काकुत्स्थ पुष्पक विमानांतून उतरून त्यांनी मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना प्रणाम केला. ॥२३॥
सोऽभिवाद्य महात्मानं ज्वलन्तमिव तेजसा ।
आतिथ्यं परमं प्राप्य निषसाद नराधिपः ॥ २४ ॥
आपल्या तेजाने प्रज्वलित होणार्‍या महात्मा अगस्त्यांचे अभिवादन करून त्यांच्याकडून उत्तम आतिथ्य मिळून नरेश्वर श्रीराम आसनावर बसले. ॥२४॥
तमुवाच महातेजाः कुम्भयोनिर्महातपाः ।
स्वागतं ते नरश्रेष्ठ दिष्ट्या प्राप्तोऽसि राघव ॥ २५ ॥
त्यासमयी महातेजस्वी महातपस्वी कुम्भज मुनिनी म्हटले - नरश्रेष्ठ राघवा ! आपले स्वागत आहे. आपण येथे आलात ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. ॥२५॥
त्वं मे बहुमतो राम गुणैर्बहुभिरुत्तमैः ।
अतिथिः पूजनीयश्च मम राजन् हृदि स्थितः ॥ २६ ॥
महाराज श्रीरामा ! बर्‍याचशा उत्तम गुणांमुळे आपल्यासाठी माझ्या हृदयात मोठा सन्मान आहे. आपण माझे आदरणीय अतिथि आहात आणि सदा माझ्या (हृदयांत) मनात स्थित आहात. ॥२६॥
सुरा हि कथयन्ति त्वां आगतं शूद्रघातिनम् ।
ब्राह्मणस्य तु धर्मेण त्वया जीवापितः सुतः ॥ २७ ॥
देवता म्हणत होत्या की आपण अधर्मपरायण शूद्राचा वध करून येत आहात. तसेच, धर्माच्या बळाने आपण ब्राह्मणाच्या मेलेल्या पुत्राला जिवंत केले आहे. ॥२७॥
उष्यतां चेह रजनीं सकाशे मम राघव ।
प्रभाते पुष्पकेण त्वं गन्ताऽसि पुरमेव हि ॥ २८ ॥

त्वं हि नारायणः श्रीमान् त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् ।
त्वं प्रभुः सर्वदेवानां पुरुषस्त्वं सनातनः ॥ २९ ॥
राघवा ! आज रात्री आपण माझ्याजवळच या आश्रमांत निवास करावा. उद्या सकाळी पुष्पक विमानद्वारा आपल्या नगरास जावे. आपण साक्षात्‌ श्रीमान्‌ नारायण आहात. सारे जगत्‌ आपल्यामध्येच प्रतिष्ठित आहे आणि आपणच समस्त देवतांचे स्वामी तसेच सनातन पुरुष आहात. ॥२८-२९॥
इदं चाभरणं सौम्य निर्मितं विश्वकर्मणा ।
दिव्यं दिव्येन वपुषा दीप्यमानं स्वतेजसा ॥ ३० ॥
सौम्य ! हे विश्वकर्म्याने बनविलेले दिव्य आभूषण आहे, जे आपल्या दिव्य रूप आणि तेजाने प्रकाशित होत आहे. ॥३०॥
प्रतिगृह्णीष्व काकुत्स्थ मत्प्रियं कुरु राघव ।
दत्तस्य हि पुनर्दाने सुमहत् फलमुच्यते ॥ ३१ ॥
काकुत्स्थ ! राघव ! आपण हे घ्यावे आणि माझे प्रिय करावे; कारण की कुणी दिलेली वस्तु पुन्हा दान देण्याने महान्‌ फलाची प्राप्ति सांगितली जात आहे. ॥३१॥
भरणे हि भवान् शक्तः सेन्द्राणां महतामपि ।
त्वं हि शक्तस्तारयितुं सेन्द्रानपि दिवौकसः ॥ ३२ ॥

तस्मात्प्रदास्ये विधिवत् तत् प्रतीच्छ नराधिप ।
या आभूषणाला धारण करण्यास केवळ आपणच समर्थ आहात, तसेच मोठ्‍यात मोठ्‍या फळाची प्राप्ति करण्याची शक्ति आपल्यातच आहे. आपण इंद्र आदि देवतांना तारण्यासही समर्थ आहात, म्हणून नरेश्वर ! हे भूषणही मी आपल्यालाच देईन. आपण हे विधिपूर्वक ग्रहण करावे. ॥३२ १/२॥
अथोवाच महात्मानं इमिक्ष्वाकूणां महारथः ॥ ३३ ॥

रामो मतिमतां श्रेष्ठः क्षत्रधर्ममनुस्मरन् ।
प्रतिग्रहोऽयं भगवन् ब्राह्मणस्याविगर्हितः ॥ ३४ ॥
तेव्हा बुद्धिमानांत श्रेष्ठ आणि इक्ष्वाकुकुलाचे महारथी वीर श्रीरामांनी क्षत्रियधर्माचा विचार करून तेथे महात्मा अगस्त्यांना म्हटले - भगवन्‌ ! दान घेण्याचे काम तर केवळ ब्राह्मणासाठीच निंदित नाही. ॥३३-३४॥
क्षत्रियेण कथं विप्र प्रतिग्राह्यं भवेत् ततः ।
प्रतिग्रहो हि विप्रेन्द्र क्षत्रियाणां सुगर्हितः ॥ ३५ ॥

ब्राह्मणेन विशेषेण दत्तं तद् वक्तुमर्हसि ।
विप्रवर ! क्षत्रियासाठी तर प्रतिग्रह स्वीकार करणे अत्यंत निंदित म्हटले गेले आहे, मग क्षत्रिय प्रतिग्रह - विशेषतः ब्राह्मणाने दिलेला दान कसे घेऊ शकतो ? हे सांगण्याची कृपा करावी. ॥३५ १/२॥
एवमुक्तस्तु रामेण प्रत्युवाच महान् ऋषिः ॥ ३६ ॥

आसन् कृतयुगे राम ब्रह्मभूते पुरायुगे ।
अपार्थिवाः प्रजाः सर्वाः सुराणां तु शतक्रतुः ॥ ३७ ॥
श्रीरामांनी याप्रकारे विचारल्यावर महर्षि अगस्त्यांनी उत्तर दिले - रामा, पूर्वी ब्रह्मस्वरूप सत्ययुगात सारी प्रजा राजाशिवायच होती, पुढे काही काळ गेल्यावर इंद्र देवतांचे राजे बनले. ॥३६-३७॥
ताः प्रजा देवदेवेशं राजार्थं समुपाद्रवन् ।
सुराणां स्थापितो राजा त्वया देव शतक्रतुः ॥ ३८ ॥

प्रयच्छास्मासु लोकेश पार्थिवं नरपुङ्‌गवम् ।
यस्मै पूजां प्रयुञ्जाना धूतपापाश्चरेमहि ॥ ३९ ॥
तेव्हा सार्‍या प्रजा देवदेवेश्वर ब्रह्मदेवाजवळ राजासाठी गेल्या आणि म्हणाल्या - देवा ! आपण इंद्रांना देवतांच्या राजाच्या पदावर स्थापित केले आहे याच प्रकारे आमच्यासाठीही कुणा श्रेष्ठ पुरुषाला राजा बनवावे, ज्याची पूजा करून आम्ही पापरहित होऊन भूतलावर विचरण करू. ॥३८-३९॥
न वसामो विना राज्ञा एष नो निश्चयः परः ।
ततो ब्रह्मा सुरश्रेष्ठो लोकपालान् सवासवान् ॥ ४० ॥

समाहूयाब्रवीत् सर्वान् तेजोभागान् प्रयच्छत ।
ततो ददुर्लोकपालाः सर्वे भागान् स्वतेजसः ॥ ४१ ॥
आम्ही राजा शिवाय राहाणार नाही. हा आमचा उत्तम निश्चय आहे. तेव्हा सुरश्रेष्ठ ब्रह्मदेवांनी समस्त लोकपालांना बोलावून म्हटले - तुम्ही सर्व लोक आपल्या तेजाचा एकेक भाग द्या. तेव्हा समस्त लोकपालांनी आपापल्या तेजाचा भाग अर्पित केला. ॥४०-४१॥
अक्षुपच्च ततो ब्रह्मा यतो जातः क्षुपो नृपः ।
तं ब्रह्मा लोकपालानां समांशैः समयोजयत् ॥ ४२ ॥
त्याच समयी ब्रह्मदेवांना शिंक आली. जिच्यापासून क्षुप नामक राजा उत्पन्न झाला. ब्रह्मदेवांनी त्या राजाला लोकपालांनी दिलेल्या तेजाच्या त्या सर्व भागांशी संयुक्त केले. ॥४२॥
ततो ददौ नृपं तासां प्रजानामीश्वरं क्षुपम् ।
तत्रैन्द्रेण च भागेन महीमाज्ञापयन्नृपः ॥ ४३ ॥
त्यानंतर त्यांनी क्षुपालच त्या प्रजाजनांसाठी त्यांच्या शासक नरेशाच्या रूपात समर्पित केले. क्षुपाने तेथे राजा होऊन इंद्राने दिलेल्या तेजो-भागाने पृथ्वीचे शासन केले. ॥४३॥
वारुणेन तु भागेन वपुः पुष्यति पार्थिवः ।
कौबेरेण तु भागेन वित्तमासां ददौ तदा ॥ ४४ ॥

यस्तु याम्योऽभवद् भागः तेन शास्ति स्म स प्रजाः ।
वरुणाच्या तेजोभागाने ते भूपाल प्रजांच्या शरीराचे पोषण करू लागले. कुबेराच्या तेजोभागाने त्यांनी त्यांना धनपतिची आभा प्रदान केली तसेच त्यांच्यात जो यमराजाचा तेजोभाग होता, त्यायोगे ते प्रजाजनांनी अपराध केल्यावर दण्ड देऊ लागले. ॥४४ १/२॥
तत्रैन्द्रेण नरश्रेष्ठ भागेन रघुनन्दन ॥ ४५ ॥

प्रतिगृह्णीष्व भद्रं ते तारणार्थं मम प्रभो ।
नरश्रेष्ठ रघुनंदन ! आपणही राजा असल्याने सर्व लोकपालांच्या तेजाने संपन्न आहात. म्हणून प्रभो ! इंद्र -संबंधी तेजोभागाच्या द्वारा आपण माझ्या उद्धारासाठी हे आभूषण ग्रहण करावे. आपले भले होवो. ॥४५ १/२॥
तद् रामः प्रतिजग्राह मुनेस्तस्य महात्मनः ॥ ४६ ॥

दिव्याअभरणं चित्रं प्रदीप्तमिव भास्करम् ।
प्रतिगृह्य ततो रामः तदाभरणमुत्तमम् ॥ ४७ ॥

आगमं तस्य दीप्तस्य प्रष्टुमेवोपचक्रमे ।
तेव्हा भगवान्‌ श्रीरामांनी त्या महात्मा मुनिनी दिलेले ते सूर्यासमान दीप्तिमान्‌, दिव्य, विचित्र आणि उत्तम आभूषण ग्रहण करून त्याच्या उपलब्धिविषयी विचारू लागले. ॥४६-४७ १/२॥
अत्यद्‌भुतमिदं दिव्यं वपुषा युक्तमुत्तमम् ॥ ४८ ॥

कथं वा भवता प्राप्तं कुतो वा केन वाऽऽहृतम् ।
कौतूहलतया ब्रह्मन् पृच्छामि त्वां महायशः ॥ ४९ ॥

आश्चर्याणां बहूनां हि निधिः परमको भवान् ।
महायशस्वी मुने ! हे अत्यंत अद्‍भुत तसेच दिव्य आकाराने युक्त आभूषण आपल्याला कसे प्राप्त झाले अथवा हे कुणी, कोठून आणले ? ब्रह्मन्‌ ! मी कुतुहलवश ह्या गोष्टी आपल्याला विचारत आहे, कारण की आपण अनेक आश्चर्याचा उत्तम निधि आहात. ॥४८-४९ १/२॥
एवं ब्रुवति काकुत्स्थे मुनिर्वाक्यमथाब्रवीत् ॥ ५० ॥

शृणु राम यथावृत्तं पुरा त्रेतायुगे युगे ॥ ५१ ॥
काकुत्स्थ श्रीरामांनी याप्रकारे विचारल्यावर मुनिवर अगस्त्य म्हणाले - श्रीरामा ! पूर्व चतुर्युगीच्या त्रेतायुगात जसा वृत्तान्त घडला होता, तो सांगतो, ऐकावे. ॥५०-५१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षट्सप्ततितमः सर्गः ॥ ७६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा शहात्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP