श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षट्पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हनुमताकंपनस्य वधः -
हनुमान्‌ द्वारा अकंपनाचा वध -
तद् दृष्ट्‍वा सुमहत् कर्म कृतं वानरसत्तमैः ।
क्रोधमाहारयामास युधि तीव्रमकम्पनः ॥ १ ॥
त्या वानरश्रेष्ठांकडून केला गेलेला महान पराक्रम पाहून युद्धस्थळी अकंपनाला अत्यंत भारी आणि दुःसह क्रोध आला. ॥१॥
क्रोधमूर्च्छितरूपस्तु धून्वन् परमकार्मुकम् ।
दृष्ट्‍वा तु कर्म शत्रूणां सारथिं वाक्यमब्रवीत् ॥ २ ॥
शत्रूंचे कर्म पाहून रोषाने त्याचे सारे शरीर व्याप्त झाले आणि आपल्या उत्तम धनुष्यास हलवीत त्याने सारथ्याला म्हटले- ॥२॥
तत्रैव तावत् त्वरितं रथं प्रापय सारथे ।
यत्रैते बहवो घ्नन्ति सुबहून् राक्षसान् रणे ॥ ३ ॥
सारथी ! हे बलवान्‌ वानर युद्धात बर्‍याचशा राक्षसांचा वध करत आहेत, म्हणून प्रथम तेथे शीघ्रतापूर्वक माझा रथ पोहोचवून दे. ॥३॥
एते च बलवन्तो वा भीमकोपाश्च वानराः ।
द्रुमशैलप्रहरणाः तिष्ठन्ति प्रमुखे मम ॥ ४ ॥
हे वानर बलवान्‌ तर आहेतच, यांचा क्रोधही फार भयानक आहे. हे वृक्ष आणि शिलांनी प्रहार करत माझ्या समोर उभे आहेत. ॥४॥
एतान् निहन्तुमिच्छामि समरश्लाघिनो ह्यहम् ।
एतैः प्रमथितं सर्वं रक्षसां दृश्यते बलम् ॥ ५ ॥
हे युद्धाची स्पृहा बाळगणारे आहेत म्हणून मी सर्वांचा वध करू इच्छितो. यांनी सार्‍या राक्षससेनेला मथून टाकले आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. ॥५॥
ततः प्रजवनाश्वेन रथेन रथिनां वरः ।
हरीनभ्यपतद् दूरात् शरजालैरकम्पनः ॥ ६ ॥
त्यानंतर जलद चालणारे घोडे जुंपलेल्या रथाच्या द्वारा रथींच्या मध्ये श्रेष्ठ अकंपन दूरूनच बाणसमूहाची वृष्टी करत त्या वानरांवर तुटून पडला. ॥६॥
न स्थातुं वानराः शेकुः किं पुनर्योद्धुमाहवे ।
अकम्पनशरैर्भग्नाः सर्व एवाभिदुद्रुवुः ॥ ७ ॥
अकंपनाच्या बाणांनी घायाळ होऊन सर्व वानर पळून जाऊ लागले. ते युद्धस्थळी उभेही राहू शकले नाहीत मग युद्ध करण्याची तर गोष्टच काय आहे ? ॥७॥
तान् मृत्युवशमापन्नान् अकम्पनशरानुगान् ।
समीक्ष्य हनुमान् ज्ञातीन् उपतस्थे महाबलः ॥ ८ ॥
अकंपनाचे बाण वानरांच्या मागे लागले होते आणि ते मृत्युच्या अधीन होत होते. आपल्या ज्ञाती बांधवांची ही दशा पाहून महाबली हनुमान्‌ अकंपनाजवळ आले. ॥८॥
तं महाप्लवगं दृष्ट्‍वा सर्वे ते प्लवगर्षभाः ।
समेत्य समरे वीराः संहृष्टाः पर्यवारयन् ॥ ९ ॥
महाकपि हनुमान्‌ आलेले पाहून ते समस्त वीर वानरश्रेष्ठ एकत्र येऊन हर्षपूर्वक त्यांना चारी बाजूनी घेरून उभे राहिले. ॥९॥
व्यवस्थितं हनूमन्तं ते दृष्ट्‍वा प्लवगर्षभाः ।
बभूवुर्बलवन्तो हि बलवन्तमुपाश्रिताः ॥ १० ॥
हनुमानांना युद्धासाठी उभे ठाकलेले पाहून ते सर्व श्रेष्ठ वानर त्या बलवान्‌ वीराचा आश्रय घेऊन स्वतः ही बलवान्‌ झाले. ॥१०॥
अकम्पनस्तु शैलाभं हनूमन्तमवस्थितम् ।
महेन्द्र इव धाराभिः शरैरभिववर्ष ह ॥ ११ ॥
पर्वतासमान विशालकाय हनुमानांना आपल्या समोर उपस्थित पाहून अकंपन त्यांच्यावर बाणांची परत वृष्टि करू लागला; जणु देवराज इंद्र जलधारांचा वर्षाव करत आहेत. ॥११॥
अचिन्तयित्वा बाणौघान् शरीरे पातितान् कपिः ।
अकम्पनवधार्थाय मनो दध्रे महाबलः ॥ १२ ॥
आपल्या शरीरावर पडलेल्या त्या बाण-समूहांची पर्वा न करता महाबली हनुमानांनी अकंपनाला ठार मारण्याचा विचार केला. ॥१२॥
स प्रसह्य महातेजा हनूमान् मारुतात्मजः ।
अभिदुद्राव तद्रक्षः कम्पयन्निव मेदिनीम् ॥ १३ ॥
मग तर महातेजस्वी पवनकुमार हनुमान्‌ महान अट्टाहास करून पृथ्वीला जणु कंपित करीत त्या राक्षसाकडे धावले. ॥१३॥
तस्याथ नर्दमानस्य दीप्यमानस्य तेजसा ।
बभूव रूपं दुर्धर्षं दीप्तस्येव विभावसोः ॥ १४ ॥
त्या समयी तेथे गर्जना करणार्‍या आणि तेजाने दैदिप्यमान झालेल्या हनुमानांचे रूप प्रज्वलित अग्निसमान दुर्धर्ष झाले होते. ॥१४॥
आत्मानं त्वप्रहरणं ज्ञात्वा क्रोधसमन्वितः ।
शैलमुत्पाटयामास वेगेन हरिपुङ्‌गवः ॥ १५ ॥
आपल्या हातात काही हत्यार नाही हे जाणून क्रोधाविष्ट झालेल्या वानरशिरोमणी हनुमानांनी अत्यंत वेगाने पर्वत उपटून घेतला. ॥१५॥
गृहीत्वा सुमहाशैलं पाणिनैकेन मारुतिः ।
स विनद्य महानादं भ्रामयामास वीर्यवान् ॥ १६ ॥
तो महान पर्वत एकाच हातात घेऊन पराक्रमी मारुती फार मोठ मोठ्‍याने गर्जना करीत त्याला फिरवू लागले. ॥१६॥
ततस्तमभिदुद्राव राक्षसेन्द्रमकम्पनम् ।
पुरा हि नमुचिं संख्ये वज्रेणेव पुरंदरः ॥ १७ ॥
मग त्यांनी, पूर्वकाळी देवेंद्रांनी वज्र घेऊन युद्धस्थळावर नमूचिवर जसे आक्रमण केले होते त्याप्रमाणे राक्षसराज अकंपनावर हल्ला केला. ॥१७॥
अकम्पनस्तु तद् दृष्ट्‍वा गिरिशृङ्‌गं समुद्यतम् ।
दूरादेव महाबाणैः अर्धचन्द्रैर्व्यदारयत् ॥ १८ ॥
अकंपनाने त्या उचललेल्या पर्वतशिखरास पाहून अर्धचंद्राकार विशाल बाणांच्या द्वारा त्याला दूरूनच विदीर्ण करून टाकले. ॥१८॥
तं पर्वताग्रमाकाशे रक्षोबाणविदारितम् ।
विशीर्णं पतितं दृष्ट्‍वा हनुमान् क्रोधमूर्च्छितः ॥ १९ ॥
त्या राक्षसाच्या बाणाने विदीर्ण होऊन ते पर्वतशिखर आकाशातच विखरून जाऊन खाली पडले. हे पाहून हनुमानांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. ॥१९॥
सोऽश्वकर्णं समासाद्य रोषदर्पान्वितो हरिः ।
तूर्णमुत्पाटयामास महागिरिमिवोच्छ्रितम् ॥ २० ॥
मग रोषाने आणि दर्पाने त्या वानरवीरांनी महान्‌ पर्वतासमान उंच अश्वकर्ण नामक वृक्षाजवळ जाऊन त्याला शीघ्रतापूर्वक उखडून काढले. ॥२०॥
तं गृहीत्वा महास्कन्धं सोऽश्वकर्णं महाद्युतिः ।
प्रहस्य परया प्रीत्या भ्रामयामास संयुगे ॥ २१ ॥
विशाल खोड असलेल्या त्या अश्वकर्णाला हातात घेऊन महातेजस्वी हनुमानांनी मोठ्‍या प्रसन्नतेने त्याला युद्धभूमीमध्ये गरगर फिरविण्यास आरंभ केला. ॥२१॥
प्रधावन्नूरुवेगेन बभञ्ज तरसा द्रुमान् ।
हनुमान् परमक्रुद्धश्च रणैर्दारयन् महीम् ॥ २२ ॥
प्रचण्ड क्रोधाविष्ट झालेल्या हनुमानांनी मोठ्‍या वेगाने धावत जाऊन कित्येक वृक्ष तोडून टाकले आणि पायाच्या आघाताने ते जणु पृथ्वीलाही विदीर्ण करू लागले. ॥२२॥
गजांश्च सगजारोहान् सरथान् रथिनस्तथा ।
जघान हनुमान् धीमान् राक्षसांश्च पदातिगान् ॥ २३ ॥
स्वारांसहित हत्ती, रथांसहित रथी आणि पायदळांसहित राक्षसांनाही बुद्धिमान्‌ हनुमान्‌ ठार मारू लागले. ॥२३॥
तमन्तकमिव क्रुद्धं समरे प्राणहारिणम् ।
हनुमन्तमभिप्रेक्ष्य राक्षसा विप्रदुद्रुवुः ॥ २४ ॥
क्रोधाविष्ट झालेल्या यमराजाप्रमाणे वृक्ष हातात घेतलेल्या प्राणहारी हनुमानांना पाहून राक्षस पळून जाऊ लागले. ॥२४॥
तमापतन्तं संक्रुद्धं राक्षसानां भयावहम् ।
ददर्शाकम्पनो वीरः चुक्षोभ च ननाद च ॥ २५ ॥
राक्षसांना भयभीत करणारे हनुमान्‌ अत्यंत कुपित होऊन शत्रूंवर आक्रमण करत होते. त्यासमयी वीर अकंपनाने त्यांना पाहिले. पहातांच तो क्रोधाविष्ट झाला आणि जोरजोराने गर्जना करू लागला. ॥२५॥
स चतुर्दशभिर्बाणैः निशितैर्देहदारणैः ।
निर्बिभेद महावीर्यं हनूमन्तं अकम्पनः ॥ २६ ॥
अकंपनाने देहाला विदीर्ण करून टाकणारे चौदा तीक्ष्ण बाण मारून महापराक्रमी हनुमंतास घायाळ केले. ॥२६॥
स तथा विप्रकीर्णस्तु नाराचैः शितशक्तिभिः ।
हनुमान् ददृशे वीरः प्ररूढ इव सानुमान् ॥ २७ ॥
याप्रकारे नाराच आणि तीक्ष्ण शक्तिनी विंधले गेलेले वीर हनुमान्‌ त्यासमयी वृक्षांनी व्याप्त पर्वतासमान दिसत होते. ॥२७॥
विरराज महावीर्यो महाकायो महाबलः ।
पुष्पिताशोकसंकाशो विधूम इव पावकः ॥ २८ ॥
त्यांचे सारे शरीर रक्ताने माखले गेले होते, म्हणून ते महापराक्रमी महाबली आणि महाकाय हनुमान फुललेल्या अशोकासारखे आणि धूमरहित अग्निप्रमाणे शोभून दिसत होते. ॥२८॥
ततोऽन्यं वृक्षमुत्पाट्य कृत्वा वेगमनुत्तमम् ।
शिरस्याभिजघानाशु राक्षसेन्द्रमकम्पनम् ॥ २९ ॥
त्यानंतर महान्‌ वेग प्रकट करून हनुमानांनी एक दुसरा वृक्ष उपटला आणि तात्काळच तो राक्षसराज अकंपनाच्या डोक्यावर मारला. ॥२९॥
स वृक्षेण हतस्तेन सक्रोधेन महात्मना ।
राक्षशो वानरेन्द्रेण पपात च ममार च ॥ ३० ॥
क्रोधविष्ट झालेल्या वानरश्रेष्ठ हनुमानांनी मारलेल्या त्या वृक्षाच्या प्रचंड आघाताने राक्षस अकंपन पृथ्वीवर कोसळला आणि मरून पडला. ॥३०॥
तं दृष्ट्‍वा निहतं भूमौ राक्षसेन्द्रमकम्पनम् ।
व्यथिता राक्षसाः सर्वे क्षितिकम्प इव द्रुमाः ॥ ३१ ॥
जसे भूकंप झाल्यावर सारे वृक्ष कापू लागतात, त्याप्रकारे राक्षसराज अकंपन रणभूमीवर मारला गेल्याचे पाहून समस्त राक्षस व्यथित झाले. ॥३१॥
त्यक्तप्रहरणाः सर्वे राक्षसास्ते पराजिताः ।
लङ्‌कामभिययुस्त्रासाद् वानरैस्तैरभिद्रुताः ॥ ३२ ॥
वानरांनी पिटाळून लावल्यावर तेथे परास्त झालेले ते सर्व राक्षस आपली अस्त्रे - शस्त्रे फेकून देऊन भितीमुळे लंकेत पळून गेले. ॥३२॥
ते मुक्तकेशाः संभ्रान्ता भग्नमानाः पराजिताः ।
भयाच्छ्रमजलैरङ्‌गैः प्रस्रवद्‌भिर्विदुद्रुवुः ॥ ३३ ॥
त्यांचे केस मोकळे सुटले होते. ते घाबरून गेलेले होते आणि पराजित झाल्याने त्यांचा अभिमान नष्ट झाला होता. भयामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वहात होत्या आणि याच अवस्थेत ते पळून जात होते. ॥३३॥
अन्योन्यं प्रमथ्नन्तो विविशुर्नगरं भयात् ।
पृष्ठतस्ते तु संमूढाः प्रेक्षमाणा मुहुर्मुहुः ॥ ३४ ॥
भयामुळे एक दुसर्‍यास तुडवत ते पळून लंकापुरीत घुसले. पळत असतांना ते वारंवार मागे वळून पहात होते. ॥३४॥
तेषु लङ्‌कां प्रविष्टेषु राक्षसेषु महाबलाः ।
समेत्य हरयः सर्वे हनुमन्तमपूजयन् ॥ ३५ ॥
ते राक्षस लंकेत घुसल्यावर समस्त महाबली वानरांनी एकत्र येऊन तेथे हनुमंतांचे अभिनंदन केले. ॥३५॥
सोऽपि प्रवृद्धस्तान् सर्वान् हरीन् संप्रत्यपूजयत् ।
हनुमान् सत्त्वसंपन्नो यथार्हमनुकूलतः ॥ ३६ ॥
त्या शक्तिशाली हनुमानांनीही उत्साहित होऊन यथायोग्य अनुकूल वर्तन करून त्या समस्त वानरांचा समादर केला. ॥३६॥
विनेदुश्च यथाप्राणं हरयो जितकाशिनः ।
चकृषुश्च पुनस्तत्र सप्राणानेव राक्षसान् ॥ ३७ ॥
तत्पश्चात्‌ विजयोल्हासाने सुशोभित होणार्‍या वानरांनी पूरे बळ लावून उच्च स्वरांत गर्जना केली आणि तेथे जिवंत राक्षसांनाही धरून पकडून फरफटावयास आरंभ केला. ॥३७॥
स वीरशोभामभजन्महाकपिः
समेत्य रक्षांसि निहत्य मारुतिः ।
महासुरं भीमममित्रनाशनं
विष्णुर्यथैवोरुबलं चमूमुखे ॥ ३८ ॥
जसे भगवान्‌ विष्णुंनी शत्रुनाशन, महाबली, भयंकर आणि महान असुर मधुकैटभ आदिंचा वध करून वीर-शोभेचे (विजयलक्ष्मीचे) वरण केले होते, त्याच प्रकारे महाकपि हनुमानांनी राक्षसांच्या जवळ जाऊन त्यांना मृत्युमुखी पाडून वीरोचित शोभा धारण केली होती. ॥३८॥
अपूजयन् देवगणास्तदा कपिं
स्वयं च रामोऽतिबलश्च लक्ष्मणः ।
तथैव सुग्रीवमुखाः प्लवंगमा
विभीषणश्चैव महाबलस्तदा ॥ ३९ ॥
त्यासमयी देवता, महाबली श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आदि वानर तसेच अत्यंत बलशाली विभीषणानेही कपिवर हनुमानाचा यथोचित सत्कार केला. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा छप्पनावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP