श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। नवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतभरद्वाजयोः समागमे मुनिना स्वाश्रम एव वासं कर्तुं तं प्रत्यादेशस्य प्रदानम् -
भरत आणि भरद्वाज मुनींची भेट आणि संभाषण तसेच मुनींनी आपल्या आश्रमावरच उतरण्याचा आदेश देणे -
भरद्वाजाश्रमं गत्वा क्रोशादेव नरर्षभः ।
जनं सर्वमवस्थाप्य जगाम सह मन्त्रिभिः ॥ १ ॥

पद्‌भ्यामेव तु धर्मज्ञो न्यस्तशस्त्रपरिच्छदः ।
वसानो वाससी क्षौमे पुरोधाय पुरोहितम् ॥ २ ॥
धर्माचे ज्ञाता नरश्रेष्ठ भरतांनी भरद्वाज आश्रमाच्या जवळ पोहोचल्यावर आपल्या बरोबरच्या सर्व लोकांना आश्रमापसून एक कोस अंतरावरच उतरविले होते आणि आपली ही अस्त्रे-शस्त्रे तसेच राजोचित वस्त्रे उतरवून तेथेच ठेवून दिली. केवळ दोन रेशमी वस्त्रे धारण करून पुरोहितांना पुढे करून ते मन्त्र्यांच्या बरोबरच पायीच गेले. ॥ १-२ ॥
ततः संदर्शने तस्य भरद्वाजस्य राघवः ।
मन्त्रिणस्तानवस्थाप्य जगामानुपुरोहितम् ॥ ३ ॥
आश्रमात प्रवेश करून जेथून दुरूनच मुनीवर भरद्वाजांचे दर्शन होऊ लागले तेथेच त्यांनी त्या मन्त्र्यांना उभे केले आणि पुरोहित वसिष्ठांना पुढे करून ते त्यांच्या मागोमाग ‌ऋषिंच्या जवळ गेले. ॥ ३ ॥
वसिष्ठमथ दृष्ट्वैव भरद्वाजो महातपाः ।
सञ्चचालासनात् तूर्णं शिष्यानर्घ्यमिति ब्रुवन् ॥ ४ ॥
महर्षि वसिष्ठांना पाहाताच महातपस्वी भरद्वाज आसनावरून उठून उभे राहिले आणि शिष्यानां त्वरीत अर्ध्य घेऊन येण्यास सांगितले. ॥ ४ ॥
समागम्य वसिष्ठेन भरतेनाभिवादितः ।
अबुध्यत महातेजाः सुतं दशरथस्य तम् ॥ ५ ॥
नंतर ते वसिष्ठांना भेटले. तत्पश्चात भरतांनी त्यांच्या चरणी प्रणाम केला. महातेजस्वी भरद्वाज समजून गेले की हे राजा दशराथांचे पुत्र आहेत. ॥ ५ ॥
ताभ्यामर्घ्यं च पाद्यं च दत्त्वा पश्चात् फलानि च ।
आनुपूर्व्याच्च धर्मज्ञः पप्रच्छ कुशलं कुले ॥ ६ ॥
धर्मज्ञ ‌ऋषिनीं क्रमशः वसिष्ठ आणि भरतांना अर्ध्य, पाद्य तसेच फल आदि निवेदन करून त्या दोघांच्या कुलांचा कुशल-समाचार विचारला. ॥ ६ ॥
अयोध्यायां बले कोशे मित्रेष्वपि च मन्त्रिषु ।
जानन् दशरथं वृत्तं न राजानमुदाहरत् ॥ ७ ॥
त्यानंतर अयोध्या, सेना, खजिना, मित्रवर्ग तसेच मन्त्रीमंडलाची चौकशी केली. राजा दशरथांच्या मृत्युचा वृत्तांत ते जाणत होते म्हणून त्या विषयासंबंधी त्यांनी काहीही विचारले नाही. ॥ ७ ॥
वसिष्ठो भरतश्चैनं पप्रच्छतुरनामयम् ।
शरीरेऽग्निषु शिष्येषु वृक्षेषु मृगपक्षिषु ॥ ८ ॥
वसिष्ठ आणि भरतांनी ही महर्षिंचे शरीर-स्वास्थ्य, अग्निहोत्र , शिष्यवर्ग , झाडे, पाने तसेच मृग-पक्षी आदिंचा कुशल- समाचार विचारला. ॥ ८ ॥
तथेति तु प्रतिज्ञाय भरद्वाजो महायशाः ।
भरतं प्रत्युवाचेदं राघवस्नेहबन्धनात् ॥ ९ ॥
महायशस्वी भरद्वाजांनी ’ सर्व ठीक आहे’ असे म्हणून श्रीरामाविषयी स्नेह असल्यामुळे भरतास याप्रकारे म्हटले - ॥ ९ ॥
किमिहागमने कार्यं तव राज्यं प्रशासतः ।
एतदाचक्ष्व मे सर्वं न हि मे शुद्ध्यते मनः ॥ १० ॥
’तुम्ही तर राज्य करीत आहात ना ? तुम्हाला येथे येण्याची काय आवश्यकता पडली ? हे सर्व मला सांगा कारण की माझे मन तुमच्या विषयी शुद्ध होत नाही. मला तुमच्या विषयी विश्वास वाटत नाही आहे. ॥ १० ॥
सुषुवे यममित्रघ्नं कौसल्या नन्दवर्धनम् ।
भ्रात्रा सह सभार्यो यश्चिरं प्रव्राजितो वनम् ॥ ११ ॥

नियुक्तः स्त्रीनिमित्तेन पित्रा योऽसौ महायशाः ।
वनवासी भवेतीह समाः किल चतुर्दश ॥ १२ ॥

कच्चिन्न तस्यापापस्य पापं कर्तुमिहेच्छसि ।
अकण्टकं भोक्तुमना राज्यं तस्यानुजस्य च ॥ १३ ॥
’जे शत्रूंचा नाश करणारे आहेत, ज्या आनंदवर्धक पुत्राला कौसल्येने जन्म दिला आहे तसेच तुमच्या पित्याने स्त्रीच्या कारणाने ज्या महायशस्वी पुत्राला चौदा वर्षेपर्यंत वनात राहाण्याची आज्ञा देऊन त्यास भाऊ आणि पत्‍नी यांच्यासह दीर्घकाळासाठी वनात धाडून दिले आहे त्या निरपराध श्रीरामाचे आणि त्याचा लहान भाऊ लक्ष्मणाचे तू अकण्टक राज्य भोगण्याच्या इच्छेने काही अनिष्ट तर करू इच्छित नाहीस ना ?’ ॥ ११-१३ ॥
एवमुक्तो भरद्वाजं भरतः प्रत्युवाच ह ।
पर्य्यश्रुनयनो दुःखाद् वाचा संसज्जमानया ॥ १४ ॥
भरद्वाजांनी असे म्हटलावर दुःखामुळे भरतांचे डोळे अश्रूंनी डबडबले. ते अडखळत- अडखळत भरद्वाजांना या प्रमाणे बोलले - ॥ १४ ॥
हतोऽस्मि यदि मामेवं भगवानपि मन्यते ।
मत्तो न दोषमाशङ्केः मैवं मामनुशाधि हि ॥ १५ ॥
’भगवन ! जर आपण पूज्यपाद महर्षिही मला असे समजत असाल तर मग मी हर प्रकारे मारलाच गेलो आहे. हे तर मी निश्चित जाणतो आहे की श्रीरामांच्या वनवासात माझ्या कडून कुठला ही अपराध झालेला नाही, म्हणून आपण मला असे कठोर वचन बोलू नये. ॥ १५ ॥
न चैतदिष्टं माता मे यदवोचन्मदन्तरे ।
नाहमेतेन तुष्टश्च न तद्‌वचनमाददे ॥ १६ ॥
’माझा आडोसा घेऊन माझ्या मातेने जे काही सांगितले अथवा केले आहे, हे मला अभीष्ट नाही. मी त्यामुळे संतुष्ट नाही आणि मातेच्या त्या गोष्टीचा मी स्वीकारही करीत नाही. ॥ १६ ॥
अहं तु तं नरव्याघ्रमुपयातः प्रसादकः ।
प्रतिनेतुमयोध्यायां पादौ तस्याभिवन्दितुम् ॥ १७ ॥
’मी तर त्या पुरूषसिंह श्रीरामांना प्रसन्न करून अयोध्येत परत घेऊन येण्यासाठी आणि त्यांच्या चरणांना वन्दन करण्यासाठी जात आहे’. ॥ १७ ॥
त्वं मामेवंगतं मत्वा प्रसादं कर्तुमर्हसि ।
शंस मे भगवन् रामः क्व सम्प्रति महीपतिः ॥ १८ ॥
’या उद्देश्यानेच मी येथे आलो आहे, असे समजून आपण माझ्यावर कृपा केली पाहिजे. भगवन ! आपण मला हे सांगा की यावेळी महाराज श्रीराम कोठे आहेत ? ॥ १८ ॥
वसिष्ठादिभिर्ऋत्विग्भिः याचितो भगवांस्ततः ।
उवाच तं भरद्वाजः प्रसादाद् भरतं वचः ॥ १९ ॥
यानंतर वसिष्ठ आदि ‌ऋत्विजांनी ही प्रार्थना केली की भरताचा काही दोष नाही. आपण यांच्यावर प्रसन्न व्हावे.’ तेव्हा भगवान भरद्वाजांनी प्रसन्न होऊन भरतास म्हटले - ॥ १९ ॥
त्वय्येतत् पुरुषव्याघ्र युक्तं राघववंशजे ।
गुरुवृत्तिर्दमश्चैव साधूनां चानुयायिता ॥ २० ॥
’पुरुषसिंह ! तुम्ही रघुकुळात उत्पन्न झाला आहात. तुमच्या ठिकाणी गुरूजनांची सेवा, इन्द्रियसंयम तसेच श्रेष्ठ पुरुषांच्या अनुसरणाचा भाव असणे उचितच आहे. ॥ २० ॥
जाने चैतन्मनःस्थं ते दृढीकरणमस्त्विति ।
अपृच्छं त्वां तथात्यर्थं कीर्तिं समभिवर्धयन् ॥ २१ ॥
’तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती मी जाणत आहे तथापि मी हे अशासाठी विचारले की तुमचा हा भाव अधिक दृढ व्हावा आणि तुमच्या कीर्तीचा अधिकाधिक विस्तार व्हावा. ॥ २१ ॥
जाने च रामं धर्मज्ञं ससीतं सहलक्ष्मणम् ।
असौ वसति ते भ्राता चित्रकूटे महागिरौ ॥ २२ ॥
’मी सीता आणि लक्ष्मणासहित धर्मज्ञ श्रीरामांचा पत्ता जाणतो. हे तुमचे बंधु श्रीरामचंद्र महापर्वत चित्रकूटावर निवास करीत आहेत. ॥ २२ ॥
श्वस्तु गन्तासि तं देशं वसाद्य सह मन्त्रिभिः ।
एतं मे कुरु सुप्राज्ञ कामं कामार्थकोविद ॥ २३ ॥
’ आता उद्या तुम्ही त्या स्थानाची यात्रा करा. आज आपल्या मन्त्र्यांसहित या आश्रमातच राहा. महाबुद्धिमान भरत ! तुम्ही माझी ही अभिष्ट वस्तु देण्यास समर्थ आहात म्हणून माझी ही अभिलाषा पूरी करा. ॥ २३ ॥
ततस्तथेत्येवमुदारदर्शनः
    प्रतीतरूपो भरतोऽब्रवीद् वचः ।
चकार बुद्धिं च तदा तदाश्रमे तदा
    निशानिवासाय नराधिपात्मजः ॥ २४ ॥
तेव्हा ज्यांच्या स्वरूपाचा आणि स्वभावाचा परिचय झाला होता, त्या उदार दृष्टिच्या भरतांनी ’ तथास्तु’ म्हणून मुनिंची आज्ञा शिरोधार्य मानली. तसेच त्या राजकुमाराने त्या समयी रात्री त्या आश्रमातच निवास करण्याचा विचार केला. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे नवतितमः सर्गः ॥ ९० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा नव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥ ९० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP