श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देवेभ्यो लब्धवरस्य शत्रुघ्नस्य मधुपुरीं निवेश्य ततः श्रीरामपार्श्वे गन्तुं विचारः -
देवतांकडून वरदान प्राप्त करून शत्रुघ्नांचे मधुरापुरी वसवून बाराव्या वर्षी तेथून श्रीरामांजवळ जाण्याचा विचार करणे -
हते तु लवणे देवाः सेन्द्राः साग्निपुरोगमाः ।
ऊचुः सुमधुरां वाणीं शत्रुघ्नं शत्रुतापनम् ॥ १ ॥
लवणासुर मारला गेल्यावर इंद्र आणि अग्नि आदि देवता येऊन शत्रुंना संताप देणार्‍या शत्रुघ्नांना अत्यंत मधुर वाणीमध्ये बोलले - ॥१॥
दिष्ट्या ते विजयो वत्स दिष्ट्या लवणराक्षसः ।
हतः पुरुषशार्दूल वरं वरय सुव्रत ॥ २ ॥
वत्स ! सौभाग्याची गोष्ट आहे की तुला विजय प्राप्त झाला आहे आणि लवणासुर मारला गेला आहे. सुव्रत ! पुरुषसिंह ! तू वर माग. ॥२॥
वरदास्तु महाबाहो सर्व एव समागताः ।
विजयाकाङ्‌क्षिणस्तुभ्यं अमोघं दर्शनं हि नः ॥ ३ ॥
महाबाहो ! आम्ही सर्व लोक तुला वर देण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही तुझा विजय इच्छित होतो. आमचे दर्शन अमोघ आहे. (म्हणून तू कुठलाही वर माग.) ॥३॥
देवानां भाषितं श्रुत्वा शूरो मूर्ध्नि कृताञ्जलिः ।
प्रत्युवाच महाबाहुः शत्रुघ्नः प्रयतात्मवान् ॥ ४ ॥
हे देवतांचे वचन ऐकून मनाला वश ठेवणार्‍या शूरवीर महाबाहू शत्रुघ्नांनी मस्तकावर अंजलि बांधून याप्रकारे म्हटले - ॥४॥
इयं मधुपुरी रस्या मधुरा देवनिर्मिता ।
निवेशं प्राप्नुयाच्छीघ्रं एष मेऽस्तु वरः परः ॥ ५ ॥
देवतांनो ! ही देवनिर्मित रमणीय मधुपुरी शीघ्रच मनोहर राजधानीच्या रूपात वसली जावी. हाच माझ्यासाठी श्रेष्ठ वर आहे. ॥५॥
तं देवाः प्रीतमनसो बाढमित्येव राघवम् ।
भविष्यति पुरी रम्या शूरसेना न संशयः ॥ ६ ॥
तेव्हा देवतांनी त्या राघव शत्रुघ्नावर प्रसन्न होऊन म्हटले - फार चांगले, असेच होवो. ही रमणीय पुरी निःसंदेह शूरवीरांच्या सेनेने संपन्न होऊन जाईल. ॥६॥
ते तथोक्त्वा महात्मानो दिवमारुरुहुस्तदा ।
शत्रुघ्नोऽपि महातेजाः तां सेनां समुपानयत् ॥ ७ ॥
असे म्हणून महामनस्वी देवता त्यासमयी स्वर्गाला निघून गेल्या. महातेजस्वी शत्रुघ्नानेही गंगेच्या तटावरून आपल्या त्या सेनेला बोलावले. ॥७॥
सा सेना शीघ्रमागच्छत् श्रुत्वा शत्रुघ्नशासनम् ।
निवेशनं च शत्रुघ्नः श्रावणेन समारभत् ॥ ८ ॥
शत्रुघ्नांचा आदेश मिळताच ती सेना शीघ्र निघून आली. शत्रुघ्नांनी श्रावण महिन्यापासून ती पुरी वसविण्यास आरंभ केला. ॥८॥
सा पुरा दिव्यसंकाशो वर्षे द्वादशमे शुभे ।
निविष्टा शूरसेनानां विषयश्चाकुतोभयः ॥ ९ ॥
तेव्हांपासून बाराव्या वर्षापर्यंत ती पुरी तसेच ते शूरसेन जनपद पूर्णरूपाने वसवले गेले. तेथे कोठेही कुणापासून भय नव्हते. तो देश दिव्य सुखसुविधांनी संपन्न होता. ॥९॥
क्षेत्राणि सस्ययुक्तानि काले वर्षति वासवः ।
अरोगवीरपुरुषा शत्रुघ्नभुजपालिता ॥ १० ॥
तेथील शेते पिकांनी हिरवीगार झालेली होती. इंद्र तेथे वेळेवर वृष्टि करू लागले. शत्रुघ्नांच्या बाहुबलाने सुरक्षित मधुपुरी निरोगी तसेच वीर पुरुषांनी भरून गेली. ॥१०॥
अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता ।
शोभिता गृहमुख्यैश्च चत्वरापणवीथिकैः ।
चातुर्वर्ण्यसमायुक्ता नानावाणिज्यशोभिता ॥ ११ ॥
ती पुरी यमुनेच्या तटावर अर्धचंद्राकार वसलेली होती आणि अनेकानेक सुंदर गृहे, चौक, बाजार आणि गल्ल्यांनी सुशोभित झालेली होती. तिच्यात चारी वर्णांचे लोक निवास करत होते. तसेच नाना प्रकारचे वाणिज्य-व्यवसाय तिची शोभा वाढवीत होते. ॥११॥
यच्च तेन पुरा शुभ्रं लवणेन कृतं महत् ।
तच्छोभयति शत्रुघ्नो नानावर्णोपशोभिताम् ॥ १२ ॥
पूर्वकाळी लवणासुराने ज्या विशाल गृहांची निर्मिति केलेली होती, त्यांच्यात सफेदी करून त्यांना नाना प्रकारच्या चित्रांनी सुसज्जित करून शत्रुघ्न त्यांची शोभा वाढवू लागले. ॥१२॥
आरामैश्च विहारैश्च शोभमानं समन्ततः ।
शोभितां शोभनीयैश्च तथाऽन्यैर्दैवमानुषैः ॥ १३ ॥
अनेकानेक उद्याने आणि विहारस्थळे सर्व बाजुनी त्या पुरीला सुशोभित करीत होती. देवता आणि मनुष्यांशी संबंध ठेवणार्‍या अन्य शोभनीय पदार्थांनीही त्या नगरीची शोभावृद्धि झाली होती. ॥१३॥
तां पुरीं दिव्यसंकाशां नानापण्योपशोभिताम् ।
नानादेशागतैश्चापि वणिग्भिरुपशोभिताम् ॥ १४ ॥
नाना प्रकारच्या क्रय-विक्रय योग्य वस्तुनी सुशोभित दिव्य पुरी अनेकानेक देशातून आलेल्या वणिग्जनांच्या योगे शोभा प्राप्त करत होती. ॥१४॥
तां समृद्धां समृद्धार्थः शत्रुघ्नो भरतानुजः ।
निरीक्ष्य परमप्रीतः परं हर्षमुपागमत् ॥ १५ ॥
तिला पूर्णतः समृद्धिशालिनी पाहून सफल मनोरथ झालेले भरतानुज शत्रुघ्न अत्यंत प्रसन्न होऊन अत्यंत हर्षाचा अनुभव करू लागले. ॥१५॥
तस्य बुद्धिः समुत्पन्ना निवेश्य मधुरां पुरीम् ।
रामपादौ निरीक्षेऽहं वर्षे द्वादश आगते ॥ १६ ॥
मधुरापुरीला वसवून त्यांच्या मनात हा विचार उत्पन्न झाला की अयोघ्येहून येऊन बारावे वर्ष झाले, आता मला तेथे जाऊन श्रीरामांच्या चरणाकमलांचे दर्शन केले पाहिजे. ॥१६॥
ततः स ताममरपुरोपमां पुरीं
निवेश्य वै विविधजनाभिसंवृताम् ।
नराधिपो रघुपतिपाददर्शने
दधे मतिं रघुकुलवंशवर्धनः ॥ १७ ॥
याप्रकारे नाना प्रकारच्या मनुष्यांनी भरलेली त्या देवपुरीसमान मनोहर मधुरापुरीला वसवून रघुकुलवंशवर्धन राजा शत्रुघ्नांनी रघुपतिंच्या चरणांच्या दर्शनाचा विचार केला. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP