श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रयस्त्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कुशनाभेन कन्यानां धैर्यक्षमयोः प्रशंसनं ब्रह्मदत्तस्योत्पत्तिस्तेन सह कुशनाभकन्यानां विवाहश्च -
राजा कुशनाभ द्वारा कन्यांच्या धैर्य आणि क्षमाशीलतेची प्रशंसा, ब्रह्मदत्ताची उत्पत्ति तथा त्याच्याबरोबर कुशनाभाच्या कन्यांचा विवाह -
तस्य तद् वचनं श्रुत्वा कुशनाभस्य धीमतः ।
शिरोभिश्चरणौ स्पृष्ट्‍वा कन्याशतमभाषत ॥ १ ॥
बुद्धिमान महाराज कुशनाभाचे हे वचन ऐकून त्या शंभर कन्यांनी पित्याच्या चरणांवर मस्तक ठेऊन प्रणाम केला आणि या प्रकारे म्हणाल्या - ॥ १ ॥
वायुः सर्वात्मको राजन् प्रधर्षयितुमिच्छति ।
अशुभं मार्गमास्थाय न धर्मं प्रत्यवेक्षते ॥ २ ॥
राजन् ! सर्वत्र संचार करणार्‍या वायुदेवाने अशुभ मार्गाचा अवलंब करून आमच्यावर बलात्कार करण्याची इच्छा धरली होती. त्यांची दृष्टि धर्मावर नव्हती. ॥ २ ॥
पितृमत्यः स्म भद्रं ते स्वच्छन्दे न वयं स्थिताः ।
पितरं नो वृणीष्व त्वं यदि नो दास्यते तव ॥ ३ ॥
'आम्ही त्यांना म्हटले - "देवा ! आपले कल्याण असो ! आमचे पिता विद्यमान आहेत. आम्ही स्वतंत्र वा स्वच्छंदी नाही आहोत. आपण पित्याजवळ जाऊन आमचे वरण करावे. जर त्यांनी आम्हाला आपल्याकडे सोपविले तर आम्ही आपल्या होऊ.' ॥ ३ ॥
तेन पापानुबन्धेन वचनं न प्रतीच्छता ।
एवं ब्रुवन्त्यः सर्वाः स्म वायुनाभिहता भृशम् ॥ ४ ॥
'परंतु त्यांचे मन पापाने विद्ध झालेले होते. त्यांनी आमचे म्हणणे मान्य केले नाही. आम्ही सर्व बहिणी याप्रमाणे धर्मसंगत गोष्टच सांगत होतो, तरी पण त्यांनी आम्हाला आमचा अपराध नसतानाही अत्यंत पीडा दिली आहे." ॥ ४ ॥
तासां तु वचनं श्रुत्वा राजा परमधार्मिकः ।
प्रत्युवाच महातेजाः कन्याशतमनुत्तमम् ॥ ५ ॥
त्यांचे हे म्हणणे ऐकून परम धर्मात्मा महातेजस्वी राजाने त्या आपल्या परम उत्तम कन्यांना म्हटले - ॥ ५ ॥
क्षान्तं क्षमावतां पुत्र्यः कर्तव्यं सुमहत् कृतम् ।
ऐकमत्यमुपागम्य कुलं चावेक्षितं मम ॥ ६ ॥
"मुलिंनो ! क्षमाशील महापुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याप्रमाणेच क्षमा तुम्हीही केली आहे. तुमच्याकडून महान् संयमाचे प्रदर्शन घडले आहे. तुम्ही सर्वजणींनी एकमत करून जी माझ्या कुलाच्या मर्यादेवर दृष्टि ठेवली, कामभावाला आपल्या मनांत स्थान दिले नाही - हेच तुम्ही फार मोठे काम केले आहे. ॥ ६ ॥
अलङ्‍कारो हि नारीणां क्षमा तु पुरुषस्य वा ।
दुष्करं तच्च वै क्षान्तं त्रिदशेषु विशेषतः ॥ ७ ॥

यादृशी वः क्षमा पुत्र्यः सर्वासामविशेषतः ।
'स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांच्यासाठी क्षमा हेच आभूषण आहे. मुलिंनो ! तुम्हा सर्व जणींच्या ठिकाणी समान रूपाने क्षमा अथवा सहिष्णुता आहे ती विशेषतः देवतांसाठी दुष्कर आहे. ॥ ७ १/२ ॥
क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः ॥ ८ ॥

क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत् ।
मुलिंनो ! क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." ॥ ८ १/२ ॥
विसृज्य कन्याः काकुत्स्थ राजा त्रिदशविक्रमः ॥ ९ ॥

मन्त्रज्ञो मन्त्रयामास प्रदानं सह मन्त्रिभिः ।
देशे काले च कर्तव्यं सदृशे प्रतिपादनम् ॥ १० ॥
'काकुत्स्थनंदन श्रीरामा ! देवतुल्य पराक्रमी राजा कुशनाभाने असे म्हणून मुलिंना अंतःपुरात जाण्याची आज्ञा दिली आणि मंत्रणेच्या तत्त्वाला जाणणार्‍या त्या नरेशाने स्वतः मंत्र्यांच्या बरोबर बसून कन्यांच्या विवाहाविषयी विचार करण्यास प्रारंभ केला. विचारणीय विषय हा होता की कुठल्या देशात, कुठल्या समयी, कुठल्या सुयोग्य वराशी त्यांचा विवाह करावा ? ॥ ९-१० ॥
एतस्मिनेव काले तु चूली नाम महाद्युतिः ।
ऊर्ध्वरेताः शुभाचारो ब्राह्मं तप उपागमत् ॥ ११ ॥
त्याच काळात चूली नावाने प्रसिद्ध एक महातेजस्वी, सदाचारी आणि ऊर्ध्वरेता (नैष्ठिक ब्रह्मचारी) मुनि वेदोक्त तपाचे अनुष्ठान करीत होते (ब्रह्मचिंतनरूप तपस्येमध्ये संलग्न होते). ॥ ११ ॥
तपस्यन्तमृषिं तत्र गन्धर्वी पर्युपासते ।
सोमदा नाम भद्रं ते ऊर्मिलातनया तदा ॥ १२ ॥
श्रीरामा ! तुमचे भले होवो. त्या समयी एक गंधर्वकुमारी तेथे राहून अनुग्रहाच्या इच्छेने त्या तपस्वी मुनिंची सेवा करीत होती. तिचे नाव होते सोमदा. ती ऊर्मिलेची कन्या होती. ॥ १२ ॥
सा च तं प्रणता भूत्वा शुश्रूषणपरायणा ।
उवास काले धर्मिष्ठा तस्यास्तुष्टोऽभवद् गुरुः ॥ १३ ॥
ती प्रतिदिन मुनिंना प्रणाम करून त्यांच्या सेवेमध्ये तत्पर रहात होती; आणि धर्मात स्थित राहून वेळोवेळी सेवेसाठी उपस्थित होत होती. म्हणून तिच्यावर ते गौरवशाली मुनि फार संतुष्ट झाले. ॥ १३ ॥
स च तां कालयोगेन प्रोवाच रघुनन्दन ।
परितुष्टोऽस्मि भद्रं ते किं करोमि तव प्रियम् ॥ १४ ॥
'रघुनंदन ! शुभ समय आल्यावर चूलीनी त्या गंधर्वकन्येस म्हटले - 'शुभे ! तुझे कल्याण होवो. मी तुझ्यावर फार संतुष्ट आहे. बोल, मी तुझे कोणते प्रिय कार्य सिद्ध करूं ?' ॥ १४ ॥
परितुष्टं मुनिं ज्ञात्वा गन्धर्वी मधुरस्वरम् ।
उवाच परमप्रीता वाक्यज्ञा वाक्यकोविदम् ॥ १५ ॥
मुनिंना संतुष्ट झालेले पाहून गंधर्वकन्या फार प्रसन्न झाली. ती बोलण्याची कला जाणत होती. तिने वाणीचे मर्मज्ञ जाणणार्‍या मुनिंना मधुर स्वराने म्हटले - ॥ १५ ॥
लक्ष्मया समुदितो ब्राह्म्या ब्रह्मभूतो महातपाः ।
ब्राह्मेण तपसा युक्तं पुत्रमिच्छामि धार्मिकम् ॥ १६ ॥
'महर्षि ! आपण ब्रह्मतेजाने संपन्न होऊन ब्रह्मस्वरूप झाला आहात. अतएव आपण महातपस्वी आहात. मी आपल्यापासून ब्रह्मज्ञान एवं वेदोक्त तपाने युक्त असा धर्मात्मा पुत्र प्राप्त करण्याची इच्छा करीत आहे. ॥ १६ ॥
अपतिश्चास्मि भद्रं ते भार्या चास्मि न कस्यचित् ।
ब्राह्मेणोपगतायाश्च दातुमर्हसि मे सुतम् ॥ १७ ॥
'मुने आपले कल्याण असो ! माझा कुणी पति नाही. अथवा मी कुणाची पत्‍नीही झालेली नाही आणि पुढेही होणार नाही. आपल्या सेवेत आलेली आहे. आपण आपल्या ब्रह्मबलाने (तपःशक्तिने) मला पुत्र प्रदान करावा.' ॥ १७ ॥
तस्याः प्रसन्नो ब्रह्मर्षिर्ददौ ब्राह्ममनुत्तमम् ।
ब्रह्मदत्त इति ख्यातं मानसं चूलिनः सुतम् ॥ १८ ॥
त्या गंधर्वकन्येच्या सेवेने संतुष्ट झालेल्या ब्रह्मर्षि चूलीनी तिला परम उत्तम ब्राह्म तपाने संपन्न असा पुत्र प्रदान केला. तो त्यांच्या मानसिक संकल्पाने प्रकट झालेला मानसपुत्र होता. त्याचे नाव 'ब्रह्मदत्त' झाले. ॥ १८ ॥
स राजा ब्रह्मदत्तस्तु पुरीमध्यवसत् तदा ।
काम्पिल्यां परया लक्ष्म्या देवराजो यथा दिवम् ॥ १९ ॥
(कुशनाभाच्या येथे ज्यावेळी कन्यांच्या विवाहासंबंधी विचार चाललेला होता) त्या समयी राजा ब्रह्मदत्त उत्तम लक्ष्मीने संपन्न होऊन 'काम्पिल्या' नामक नगरीत, स्वर्गातील आमरावती पुरीमध्ये जसा देवराज इंद्र राहतो, त्याप्रमाणे निवास करीत होता. ॥ १९ ॥
स बुद्धिं कृतवान् राजा कुशनाभः सुधार्मिकः ।
ब्रह्मदत्ताय काकुत्स्थ दातुं कन्याशतं तदा ॥ २० ॥
'काकुत्स्थकुलभूषण श्रीरामा ! तेव्हां परम धर्मात्मा राजा कुशनाभाने ब्रह्मदत्ताबरोबर आपल्या शंभर कन्यांचा विवाह करून देण्याचा निश्चय केला. ॥ २० ॥
तमाहूय महातेजा ब्रह्मदत्तं महीपतिः ।
ददौ कन्याशतं राजा सुप्रीतेनान्तरात्मना ॥ २१ ॥
महातेजस्वी भूपाल राजा कुशनाभाने ब्रह्मदत्ताला बोलावून घेऊन अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या शंभर कन्यांना त्यांच्या हाती सोपविल्या. ॥ २१ ॥
यथाक्रमं तदा पाणिं जग्राह रघुनन्दन ।
ब्रह्मदत्तो महीपालस्तासां देवपतिर्यथा ॥ २२ ॥
'रघुनंदन ! त्या वेळी देवराज इंद्रासमान तेजस्वी पृथ्वीपति ब्रह्मदत्ताने क्रमशः त्या सर्व कन्यांचे पाणिग्रहण केले ॥ २२ ॥
स्पृष्टमात्रे तदा पाणौ विकुब्जा विगतज्वराः ।
युक्ताः परमया लक्ष्म्या बभौ कन्याशतं तदा ॥ २३ ॥
विवाहकाली त्या सर्व कन्यांच्या हाताचा ब्रह्मदत्ताच्या हातास स्पर्श होताच सर्वच्या सर्व कन्या कुब्जदोषरहित, निरोगी आणि सौंदर्य संपन्न प्रतीत होऊ लागल्या. ॥ २३ ॥
स दृष्ट्‍वा वायुना मुक्ताः कुशनाभो महीपतिः ।
बभूव परमप्रीतो हर्षं लेभे पुनः पुनः ॥ २४ ॥
वातरोगाच्या रूपाने आलेल्या वायुदेवाने त्या कन्यांना सोडून दिले हे पाहून पृथ्वीपति राजा कुशनाभ अत्यंत प्रसन्न झाला आणि वारंवार हर्षाचा अनुभव करू लागला. ॥ २४ ॥
कृतोद्वाहं तु राजानं ब्रह्मदत्तं महीपतिम् ।
सदारं प्रेषयामास सोपाध्यायगणं तदा ॥ २५ ॥
भूपाल राजा ब्रह्मदत्ताचे विवाह कार्य संपन्न होताच महाराज कुशनाभाने त्यांना पत्‍नींसह आणि पुरोहितासह आदरपूर्वक निरोप दिला. ॥ २५ ॥
सोमदापि सुतं दृष्ट्‍वा पुत्रस्य सदृशीं क्रियाम् ।
यथान्यायं च गन्धर्वी स्नुषास्ताः प्रत्यनन्दत ।
स्पृष्ट्‍वा स्पृष्ट्‍वा च ताः कन्याः कुशनाभं प्रशस्य च ॥ २६ ॥
गंधर्वकन्या सोमदाने आपल्या पुत्राला आणि त्याच्या योग्य विवाह संबंधास पाहून आपल्या पुत्रवधूंचे यथोचित् रूपाने अभिनंदन केले. तिने एकेक करून त्या सर्व राजकन्यांना हृदयाशी धरले आणि महाराज कुशनाभाची प्रशंसा करून तेथून प्रस्थान केले. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा तेहतिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP