[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ विंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणकर्तृकं सीतायाः प्रलोभनम् -
रावणाचे सीतेस प्रलोभन दाखविणे -
स तां परिवृतां दीनां निरानन्दां तपस्विनीम् ।
साकारैर्मधुरैर्वाक्यैर्न्यदर्शयत रावणः ॥ १ ॥
राक्षसीणींनी घेरलेल्या दीन आणि आनन्दरहित तपस्विनी सीतेला संबोधून रावण अभिप्राययुक्त मधुर वचनांच्या द्वारा आपल्या मनातील भाव प्रकट करू लागला- ॥१॥
मां दृष्ट्‍वा नागनासोरु गूहमाना स्तनोदरम् ।
अदर्शनमिवात्मानं भयान्नेतुं त्वमिच्छसि ॥ २ ॥
'हत्तींच्या सोंडेप्रमाणे सुन्दर मांड्या असणार्‍या सीते ! मला पाहून तू आपले स्तन आणि उदर अशाप्रकारे झांकून घेत आहेस की जणु भयामुळे तूं स्वत:स अदृश्य करण्याचीच इच्छा करीत आहेस. ॥२॥
कामये त्वां विशालाक्षि बहुमन्यस्व मां प्रिये ।
सर्वाङ्‌गगुणसपन्ने सर्वलोकमनोहरे ॥ ३ ॥
'परन्तु विशाल लोचने ! मी तर तुझीच इच्छा करीत आहे - तुझ्यावरच प्रेम करीत आहे. समस्त संसाराचे (जगाचे) मन मोहून टाकणार्‍या सर्वांगसुन्दर प्रिये ! तूही मला विशेष आदर दे - माझी प्रार्थना स्वीकार कर. ॥३॥
नेह केचिन्मनुष्या वा राक्षसाः कामरूपिणः ।
व्यपसर्पतु ते सीते भयं मत्तः समुत्थितम् ॥ ४ ॥
येथे तुला काहीही भय नाही. या ठिकाणी मनुष्यही येऊ शकत नाही अथवा इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे दुसरे कुणी राक्षसही येऊ शकत नाहीत. केवळ मीच येथे येऊ शकतो. परन्तु सीते ! माझ्यापासून तुला जे भय वाटत आहे ते तर दूर झालेच पाहिजे. ॥४॥
स्वधर्मो रक्षसां भीरु सर्वथैव न संशयः ।
गमनं वा परस्त्रीणां हरणं संप्रमथ्य वा ॥ ५ ॥
'भीरू ! तू असे समजू नकोस की मी काही अधर्म केला आहे. दुसर्‍यांच्या स्त्रियाञ्जवळ जाणे अथवा बळाने त्यांचे हरण करणे हा राक्षसांचा सर्वथा स्वधर्मच आहे - यात सन्देह नाही. ॥५॥
एवं चैवमकामां त्वां न च स्प्रक्ष्यामि मैथिलि ।
कामं कामः शरीरे मे यथाकामं प्रवर्तताम् ॥ ६ ॥
'हे मैथिली ! अशा अवस्थेतही जो पर्यन्त तू माझी इच्छा करीत नाहीस तो पर्यन्त मी तुला स्पर्शही करणार नाही. भलेही कामदेव माझ्या शरीरावर त्याच्या इच्छेनुसार अत्याचार करो. ॥६॥
देवि नेह भयं कार्यं मयि विश्वसिहि प्रिये ।
प्रणयस्व च तत्त्वेन मैवं भूः शोकलालसा ॥ ७ ॥
'देवी ! या बाबतीत तू भय बाळगता उपयोगी नाही. प्रिये ! माझ्यावर विश्वास ठेव आणि यथार्थ रूपाने प्रेमदान दे. या प्रमाणे शोकाने व्याकुळ होऊ नको. ॥७॥
एकवेणी अधःशय्या ध्यानं मलिनमम्बरम् ।
अस्थानेऽप्युपवासश्च नैतान्यौपयिकानि ते ॥ ८ ॥
'एक वेणी धारण करणे, खाली जमिनीवर झोपणे, चिन्तामग्न राहाणे, मलीन वस्त्रे धारण करणे आणि विना अवसर उपवास करणे - या गोष्टी तुझ्या योग्य नाहीत. ॥८॥
विचित्राणि च माल्यानि चन्दनान्यगुरूणि च ।
विविधानि च वासांसि दिव्यान्याभरणानि च ॥ ९ ॥

महार्हाणि च पानानि शयनान्यासनानि च ।
गीतं नृत्यं च वाद्यं च लभ मां प्राप्य मैथिलि ॥ १० ॥
'हे मिथिलेशकुमारी ! माझी प्राप्ती करून घेऊन तू विचित्र पुष्पमाळा, चन्दन, अगुरू, नाना प्रकारची वस्त्रे, दिव्य आभूषणे, बहुमूल्य पेये, शय्या, आसने, नाच-गाणे अथवा वाद्ये यांच्या सुखाचा उपभोग घे. ॥९-१०॥
स्त्रीरत्‍नमसि मैवं भूः कुरु गात्रेषु भूषणम् ।
मां प्राप्य हि कथं वा स्यास्त्वमनर्हा सुविग्रहे ॥ ११ ॥
'तू ! स्त्रियांमध्ये रत्‍न आहेस. या प्रकारे मलीन वेषात राहू नको. आपल्या अंगावर अलङ्‌कार धारण कर. हे सुन्दरी ! माझी प्राप्ती होऊनही तू भूषण आदि पासून असन्मानीत कशी बरे राहशील ?' ॥११॥
इदं ते चारु सञ्जातं यौवनं व्यतिवर्तते ।
यदतीतं पुनर्नैति स्रोतः स्रोतस्विनामिव ॥ १२ ॥
'हे तुझे नवोदित सुन्दर तारूण्य शीघ्रच नष्ट होऊन जाईल. जे निघून जात आहे ते नदीचा प्रवाहाप्रमाणेच परत उलट फिरत नाही. (त्याची फिरून प्राप्ती होऊ शकत नाही.) ॥१२॥
त्वां कृत्वोपरतो मन्ये रूपकर्ता स विश्वकृत् ।
न हि रूपोपमा ह्यन्या तवास्ति शुभदर्शने ॥ १३ ॥
'हे शुभदर्शने ! मला तर असे वाटत आहे की रूपाची रचना करणारा लोकस्त्रष्टा विधाता तुझी निर्मिती केल्यावर त्या कार्यान्तून निवृत्त झाला असावा, कारण की तुझ्या रूपाची बरोबरी करू शकेल अशी दुसरी एकही स्त्री नाही. ॥१३॥
त्वां समासाद्य वैदेहि रूपयौवनशालिनीम् ।
कः पुनर्नातिवर्तेत साक्षादपि पितामहः ॥ १४ ॥
'विदेहनन्दिनी ! रूप आणि यौवनाने सुशोभित अशा तुझी प्राप्ती झाली असता असा कोण पुरूष असू शकेल की जो धैर्यापासून विचलित होणार नाही ? भले, मग तो साक्षात ब्रह्मदेवही का असेना ! ॥१४॥
यद् यत् पश्यामि ते गात्रं शीतांशुसदृशानने ।
तस्मिन् तस्मिन् पृथुश्रोणि चक्षुर्मम निबध्यते ॥ १५ ॥
'चन्द्रासारखे मुख असलेल्या सुमध्यमे ! मी तुझ्या ज्या ज्या अंगाकडे नजर टाकतो तेथे तेथे माझी दृष्टी खिळून राहाते. ॥१५॥
भव मैथिलि भार्या मे मोहमेतं विसर्जय ।
बह्वीनामुत्तमस्त्रीणां ममाग्रमहिषी भव ॥ १६ ॥
'हे मौथिली ! तू माझी भार्या हो. पतिव्रत्याचा हा मोह सोडून दे. माझ्या जवळ अनेक सुन्दर स्त्रिया आहेत. तू त्यांच्यात सर्वश्रेष्ठ पट्टराणी हो. ॥१६॥
लोकेभ्यो यानि रत्‍नानि सम्प्रमथ्याहृतानि मे ।
तानि मे भीरु सर्वाणि राज्यं चैव ददामि ते ॥ १७ ॥
'हे भीरू ! मी अनेक लोकान्तून त्यांचे मन्थन करून जी जी रत्‍ने आणलेली आहेत ती तुझीच होतील आणि हे राज्यही मी तुलाच समर्पित करीन. ॥१७॥
विजित्य पृथिवीं सर्वां नानानगरमालिनीम् ।
जनकाय प्रदास्यामि तव हेतोर्विलासिनि ॥ १८ ॥
'हे विलासिनी ! तुझ्या प्रसन्नतेसाठी मी विभिन्न नगरींच्या माळांनी अलंकृत असलेली ही सर्व पृथ्वी जिंकून तिला राजा जनकाच्या हाती सुपूर्द करीन (सोपवीन). ॥१८॥
नेह पश्यामि लोकेऽन्यं यो मे प्रतिबलो भवेत् ।
पश्य मे सुमहद्वीर्यमप्रतिद्वन्द्वमाहवे ॥ १९ ॥
'या लोकात माझा सामना करू शकेल असा दुसरा एकही पुरूष मला दिसत नाही. तू युद्धात माझा तो महान पराक्रम पहा. म्हणजे तुला कळून येईल की माझ्या समोर कुणीही प्रतिद्वन्दी टिकू शकत नाही. ॥१९॥
असकृत् संयुगे भग्ना मया विमृदितध्वजाः ।
अशक्ताः प्रत्यनीकेषु स्थातुं मम सुरासुराः ॥ २० ॥
'मी ज्यांची ध्वजा युद्धस्थळावर तोडून टाकली होती असे देव आणि असुर माझ्या समोर उभे ठाकण्यास असमर्थ असल्याने कित्येक वेळां मला पाठ दाखवून पळून गेले आहेत. ॥२०॥
इच्छ मां क्रियतामद्य प्रतिकर्म तवोत्तमम् ।
सुप्रभाण्यवसज्जन्तां तवाङ्‌गे भूषणानि च ॥ २१ ॥
'तू माझा स्वीकार कर आणि आजच आपले शरीर उत्तम शृंगाराने आणि तेजस्वी चमकदार आभूषणांनी भूषित करून घे. ॥२१॥
साधु पश्यामि ते रूपं सुयुक्तं प्रतिकर्मणा ।
प्रतिकर्माभिसंयुक्ता दाक्षिण्येन वरानने ॥ २२ ॥
'हे सुमुखी ! आज शृंगाराने सुसज्जित झालेले तुझे सुन्दर रूप मी पहात आहे (येथे भविष्यातील कल्पनेचे वर्णन वर्तमानाप्रमाणे केले असल्याने 'भाविक' अलङ्‌कार आहे.) तू उदारतेने माझ्यावर कृपा करून शृंगाराने संपन्न हो. ॥२२॥
भुंक्ष्व भोगान् यथाकामं पिब भीरु रमस्व च ।
यथेष्टं च प्रयच्छ त्वं पृथिवीं वा धनानि च ॥ २३ ॥
(श्रीगोविन्दराजीय आणि रामानुजीय संस्कृत व्याख्येत रावणाच्या सर्व भाषणान्तून तो सीतेला आपली इष्टदेवता मानून तिची स्तुती, प्रार्थना करीत आहे. त्याने आपले सर्वस्व आपल्या इष्टदेवतेच्या चरणी समर्पित केले आहे असा भाव व्यक्त करण्यात आला आहे) 'हे भीरू ! नन्तर तू इच्छेनुसार अनेक प्रकारच्या भोगांचा उपभोग घे, दिव्य रसांचे पान कर आणि विहार कर. तसेच या पृथ्वीचे अथवा धनाचे यथेष्ट रूपाने दान कर. ॥२३॥
ललस्व मयि विस्रब्धा धृष्टमाज्ञापयस्व च ।
मत्प्रसादाल्ललन्त्याश्च ललतां बान्धवस्तव ॥ २४ ॥
'तू माझ्यावर विश्वास ठेवून भोग भोगण्याची इच्छा कर आणि निर्भय होऊन मला आपली सेवा करण्याची आज्ञा दे. माझ्यावर कृपा करून इच्छेनुसार भोग भोगणारी तू पट्टराणी प्रमाणे तुझ्या बन्धुबान्धवांचे मनोरथही पूर्ण करू शकतेस. ॥२४॥
ऋद्धिं ममानुपश्य त्वं श्रियं भद्रे यशस्विनि ।
किं करिष्यसि रामेण सुभगे चीरवासिना ॥ २५ ॥
'हे भद्रे ! हे यशस्विनी ! तू माझ्या समृद्धि आणि धन-संपत्तिकडे तरी बघ. हे सुभगे ! वल्कले परिधान करणार्‍या रामाशी तुला काय बरे कर्तव्य आहे ? ॥२५॥
निक्षिप्तविजयो रामो गतश्रीर्वनगोचरः ।
व्रती स्थण्डिलशायी च शङ्‌के जीवति वा न वा ॥ २६ ॥
'रामाने विजयाच्या आशेचाही त्याग केला आहे. तो श्रीहीन होऊन वनावनान्तून विचरण करीत आहे, व्रताचे पालन करून मातीच्या वेदीवर शयन करीत आहे. तेव्हा अशा अवस्थेत तो जिवन्त तरी राहिला असेल की नाही याची मला शंका येत आहे. ॥२६॥
न हि वैदेहि रामस्त्वां द्रष्टुं वाप्युपलभ्यते ।
पुरोबलाकैरसितैर्मेघैर्ज्योत्स्नामिवावृताम् ॥ २७ ॥
'बगळे ज्यांचे अग्रसर आहेत अशा काळ्याकुट्ट मेघांनी झाकून टाकलेल्या चन्द्रिकेप्रमाणे या राक्षस स्त्रियांनी तुला पूर्णपणे आच्छादून टाकली आहे त्यामुळे तुझ्या प्राप्तीची गोष्ट तर दूर राहिली पण तुझे नुसते दर्शन घेण्यासाठी राम समर्थ होणार नाही. ॥२७॥
न चापि मम हस्तात् त्वां प्राप्तुमर्हति राघवः ।
हिरण्यकशिपुः कीर्तिमिन्द्रहस्तगतामिव ॥ २८ ॥
'ज्या प्रमाणे हिरण्यकशिपू इन्द्राने हस्तगत केलेली आपली कीर्ती (येथे भार्या या अर्थी) परत प्राप्त करू शकला नाही त्याप्रमाणे रामही माझ्या हातातून तुला पराक्रमाचे जोरावर प्राप्त करून घेण्यास समर्थ नाही. (हिरण्यकशिपूला केवळ नारदमुनींच्या मार्फत प्रार्थना केल्यामुळे ती परत प्राप्त झाली होती.) ॥२८॥
चारुस्मिते चारुदति चारुनेत्रे विलासिनि ।
मनो हरसि मे भीरु सुपर्णः पन्नगं यथा ॥ २९ ॥
'मनोहर स्मित, सुन्दर दन्तपंक्ती आणि रमणीय नेत्र असणार्‍या विलासिनी ! भीरू ! ज्याप्रमाणे गरूड सर्पास उचलून घेऊन जातो त्याप्रमाणेच तू माझे मन हरण करून घेत आहेस. ॥२९॥
क्लिष्टकौशेयवसनां तन्वीमप्यनलङ्‌कृताम् ।
त्वां दृष्ट्‍वा स्वेषु दारेषु रतिं नोपलभाम्यहम् ॥ ३० ॥
'तुझे रेशमी पीतांबर (पीतवस्त्र) मलीन झाले आहे, तू अत्यन्त कृश झाली आहेस, तुझ्या अंगावर अलङ्‌कारही नाहीत, तरीही तुला पाहिल्यानन्तर आपल्या अन्य स्त्रियांमध्ये माझे मन लागत नाही. ॥३०॥
अन्तःपुरनिवासिन्यः स्त्रियः सर्वगुणान्विताः ।
यावत्यो मम सर्वासामैश्वर्यं कुरु जानकि ॥ ३१ ॥
'हे जनकनन्दिनी ! माझ्या अन्त:पुरात निवास करणार्‍या जितक्या म्हणून सर्वगुण संपन्न स्त्रिया (राण्या) आहेत त्या सर्वांची तू स्वामिनी हो. ॥३१॥
मम ह्यसितकेशान्ते त्रैलोक्यप्रवरस्त्रियः ।
तास्त्वां परिचरिष्यन्ति श्रियमप्सरसो यथा ॥ ३२ ॥
'काळेभोर केस असणार्‍या हे सुन्दर स्त्रिये ! अप्सरा ज्याप्रमाणे लक्ष्मीची सेवा करीत असतात त्याप्रमाणे त्रिभुवनातील श्रेष्ठ सुन्दर स्त्रिया येथे तुझी परिचर्या करतील. ॥३२॥
यानि वैश्रवणे सुभ्रु रत्‍नानि च धनानि च ।
तानि लोकांश्च सुश्रोणि मया भुङ्‌क्ष्व यथासुखम् ॥ ३३ ॥
'हे सुभ्रु, सुश्रोणी ! कुबेराजवळ जितकी म्हणून उत्कृष्ट रत्‍ने आणि धन आहे त्या सर्वांचा तथा संपूर्ण लोकांचा तू माझ्याबरोबर सुखपूर्वक उपभोग घे. ॥३३॥
न रामस्तपसा देवि न बलेन न विक्रमैः ।
न धनेन मया तुल्यस्तेजसा यशसापि वा ॥ ३४ ॥
'देवि ! राम तपाने, बलाने, पराक्रमाने, धनाने, तेजाने अथवा यशाने कुठल्याही प्रकारे माझी बरोबरी करू शकत नाही. ॥३४॥
पिब विहर रमस्व भुङ्‌क्ष्व भोगान्
धननिचयं प्रदिशामि मेदिनीं च ।
मयि लल ललने यथासुखं त्वं
त्वयि च समेत्य ललन्तु बान्धवास्ते ॥ ३५ ॥
'तू दिव्य रसांचे पान कर, विहार कर अथवा रमण कर तथा अभिष्ट भोगांचा उपभोग घे. मी तुला धनाची राशी एवढेच नव्हे तर सर्व पृथ्वी समर्पित करतो. हे ललने ! तू मजजवळ राहून मौजेने मनोवांछित वस्तूंचे ग्रहण कर आणि तुझ्या जवळ येऊन तुझे बन्धुबान्धवही सुखपूर्वक इच्छित भोग आदि प्राप्त करोत. ॥३५॥
कुसुमिततरुजालसन्ततानि
भ्रमरयुतानि समुद्रतीरजानि ।
कनकविमलहारभूषिताङ्‌गी
विहर मया सह भीरु काननानि ॥ ३६ ॥
'हे भीरू ! तू सोन्याच्या निर्मळ हारांनी आपले अंग विभूषित करून माझ्या बरोबर समुद्राच्या तटवर्ती अरण्यान्त, ज्यामध्ये फुललेल्या वृक्षांचे समुदाय सर्वत्र पसरलेले असून त्यावर भ्रमर गुञ्जारव करीत आहेत, विहार कर. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे विंशः सर्गः ।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा विसावा सर्ग पूरा झाला. ॥२०॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP