[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तदशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अत्रेराश्रमं गतानां श्रीरामादीनां तेन सत्कारोऽनसूयया च सीतायाः समादरः -
श्रीराम आदिंचे अत्रि मुनिंच्या आश्रमात जाऊन त्यांचे द्वारा सत्कृत होणे, तसेच अनसूया द्वारा सीतेचा सत्कार -
राघवस्त्वपयातेषु सर्वेष्वनुविचिन्तयन् ।
न तत्रारोचयद् वासं कारणैर्बहुभिस्तदा ॥ १ ॥
ते सर्व ऋषि निघून गेल्यावर श्रीरामचंद्रांनी जेव्हां वारंवार विचार केला तेव्हां त्यांना अशी बरीच कारणे ज्ञात झाली की ज्यामुळे त्यांना स्वतःही तेथे राहणे उचित वाटले नाही. ॥ १ ॥
इह मे भरतो दृष्टो मातरश्च सनागराः ।
सा च मे स्मृतिरन्वेति तान् नित्यमनुशोचतः ॥ २ ॥
त्यांनी मनांतल्या मनात विचार केला, या आश्रमात मी भरतांना, मातांना, तसेच पुरवासी लोकांना भेटून चुकलो आहे. ती स्मृति मला सदैव होत राहते आणि मी प्रतिदिन त्या सर्व लोकांचे चिंतन करून शोकमग्न होत असतो. ॥ २ ॥
स्कन्धावारनिवेशेन तेन तस्य महात्मनः ।
हयहस्तिकरीषैश्च उपमर्दः कृतो भृशम् ॥ ३ ॥
’महात्मा भरतच्या सेनेचा पडाव पडल्यामुळे हत्ती आणि घोड्यांच्या लीदेने येथील भूमि अधिक अपवित्र केली गेली आहे. ॥ ३ ॥
तस्मादन्यत्र गच्छाम इति संचिन्त्य राघवः ।
प्रातिष्ठत स वैदेह्या लक्ष्मणेन च सङ्‌गतः ॥ ४ ॥
’म्हणून आम्हीही येथून अन्यत्र निघून जाऊ’ असा विचार करून राघव सीता आणि लक्ष्मणासहित तेथून निघले. ॥ ४ ॥
सोऽत्रेराश्रममासाद्य तं ववन्दे महायशाः ।
तं चापि भगवानत्रिः पुत्रवत् प्रत्यपद्यत ॥ ५ ॥
तेथून ते अत्रिंच्या आश्रमावर पोहोंचून महायशस्वी रामांनी त्यांना प्रणाम केला आणि भगवान् अत्रिंनीही त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे स्नेहपूर्वक आपले म्हटले. ॥ ५ ॥
स्वयमातिथ्यमादिश्य सर्वमस्य सुसत्कृतम् ।
सौमित्रिं च महाभागं सीतां च समसान्त्वयत् ॥ ६ ॥
त्यांनी स्वतःच श्रीरामांचा संपूर्ण अतिथिसत्कार करून महाभाग लक्ष्मण आणि सीतेलाही सत्कारपूर्वक संतुष्ट केले. ॥ ६ ॥
पत्‍नीं च तमनुप्राप्तां वृद्धामामन्त्र्य सत्कृताम् ।
सान्त्वयामास धर्मज्ञः सर्वभूतहिते रतः ॥ ७ ॥

अनसूयां महाभागां तापसीं धर्मचारिणीम् ।
प्रतिगृह्णीष्व वैदेहीमब्रवीदृषिसत्तमः ॥ ८ ॥
संपूर्ण प्राण्यांच्या हितामध्ये तत्पर राहणार्‍या धर्मज्ञ मुनिश्रेष्ठ अत्रिंनी आपल्या समीप आलेल्या सर्वांच्या द्वारा सन्मानित, तापसी आणि धर्मपरायण वृद्ध पत्‍नी महाभाग्यशाली अनसूयेला संबोधित करून सांत्वनापूर्ण वचनाद्वारे संतुष्ट केले आणि म्हटले, ’देवी ! वैदेही सीतेला सत्कारपूर्वक हृदयाशी धरा.’ ॥ ७-८ ॥
रामाय चाचचक्षे तां तापसीं धर्मचारिणीम् ।
दश वर्षाण्यनावृष्ट्या दग्धे लोके निरन्तरम् ॥ ९ ॥

यया मूलफले सृष्टे जाह्नवी च प्रवर्तिता ।
उग्रेण तपसा युक्ता नियमैश्चाप्यलङ्‌कृता ॥ १० ॥

दशवर्षसहस्राणि यया तप्तं महत् तपः ।
अनसूयाव्रतैस्तात प्रत्यूहाश्च निबर्हिताः ॥ ११ ॥
त्यानंतर त्यांनी श्रीरामचंद्रांना धर्मपरायण तपस्विनी अनसूयेचा परिचय करून दिला. ते म्हणाले, "एके समयी दहा वर्षांपर्यंत वृष्टि झाली नाही, त्या समयी जेव्हां सर्व जग निरंतर दग्ध होऊ लगले, तेव्हां जिने उग्र तपस्या युक्त आणि कठोर नियमांनी अलंकृत होऊन आपल्या तपाच्या प्रभावाने येथे फळे मुळे उत्पन्न केली आणि मंदाकिनीची पवित्र धारा वाहवली; तसेच तात ! जिने दहा हजार वर्षेपर्यंत फार मोठी तपस्या करून आपल्या उत्तम व्रतांच्या प्रभावाने ऋषिंच्या समस्त विघ्नांचे निवारण केले होते, तीच ही अनसूया देवी आहे.’ ॥ ९-११ ॥
देवकार्यनिमित्तं च यया संत्वरमाणया ।
दशरात्रं कृता रात्रिः सेयं मातेव तेऽनघ ॥ १२ ॥
’निष्पाप श्रीरामा ! हिने देवतांच्या कार्यासाठी अत्यंत उतावीळ होऊन दहा रात्रींच्या बरोबर एकच रात्र बनविली होती. तीच ही अनसूयादेवी तुमच्या मातेप्रमाणे पूजनीय आहे. ॥ १२ ॥
तामिमां सर्वभूतानां नमस्कार्यां तपस्विनीम् ।
अभिगच्छतु वैदेही वृद्धामक्रोधनां सदा ॥ १३ ॥
’ती संपूर्ण प्राण्यांसाठी वंदनीय तपस्विनी आहे. क्रोध तर तिला कधी स्पर्शही करू शकलेला नाही. वैदेही सीता या वृद्ध अनसूया देवीजवळ जावो.’॥ १३ ॥
एवं ब्रुवाणं तमृषिं तथेत्युक्त्वा स राघवः ।
सीतामालोक्य धर्मज्ञामिदं वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
असे सांगणार्‍या अत्रि मुनिंना "फार चांगले" असे म्हणून श्रीरामांनी धर्मज्ञ सीतेकडे पाहून या प्रमाणे म्हटले - ॥ १४ ॥
राजपुत्रि श्रुतं त्वेतन्मुनेरस्य समीरितम् ।
श्रेयोऽर्थमात्मनः श्रीघ्रमभिगच्छ तपस्विनीम् ॥ १५ ॥
राजकुमारी ! महर्षि अत्रिंचे वचन आपण ऐकलेच आहे. आता आपल्या कल्याणासाठी तुम्ही शीघ्रच या तपस्विनी देवीजवळ जावे. ॥ १५ ॥
अनसूयेति या लोके कर्मभिः ख्यातिमागता ।
तां शीघ्रमभिगच्छ त्वमभिगम्यां तपस्विनीम् ॥ १६ ॥
’जी आपल्या सत्कर्मांनी संसाररत्‍न अनसूया नामाने विख्यात झालेली आहे ती तपस्विनी देवी तुम्ही आश्रय घेण्यास योग्य आहे, तुम्ही शीघ्र तिच्याजवळ जावे." ॥ १६ ॥
सीता त्वेतद् वचः श्रुत्वा राघवस्य यशस्विनी ।
तामत्रिपत्‍नीं धर्मज्ञामभिचक्राम मैथिली ॥ १७ ॥
श्रीरामचंद्रांचे असे वचन ऐकून यशस्विनी मैथिली सीता धर्माला जाणणार्‍या अत्रिपत्‍नी अनसूयेच्या जवळ गेली. ॥ १७ ॥
शिथिलां वलितां वृद्धां जरापाण्डरमूर्धजाम् ।
सततं वेपमानाङ्‌गीं प्रवाते कदलीमिव ॥ १८ ॥
अनसूया वृद्धावस्थेमुळे शिथिल झाली होती. तिच्या शरीरावर सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि डोक्यावरील केस पांढरे झाले होते. जोराचा वारा आला असता हलणार्‍या कदलीच्या झाडाप्रमाणे तिचे सारे अंग निरंतर कापत होते. ॥ १८ ॥
तां तु सीता महाभागामनसूयां पतिव्रताम् ।
अभ्यवादयदव्यग्रा स्वं नाम समुदाहरत् ॥ १९ ॥
सीतेने निकट जाऊन शांतभावाने आपले नाव सांगितले आणि त्या महाभागा पतिव्रता अनसूयेला प्रणाम केला. ॥ १९ ॥
अभिवाद्य च वैदेही तापसीं तां दमान्विताम् ।
बद्धाञ्जलिपुटा हृष्टा पर्यपृच्छदनामयम् ॥ २० ॥
त्या संयमशील तपस्विनीला प्रणाम करून हर्षाने भरलेल्या सीतेने दोन्ही हात जोडून तिचा कुशल समाचार विचारला. ॥ २० ॥
ततः सीतां महाभागां दृष्ट्‍वा तां धर्मचारिणीम् ।
सांत्वयन्त्यब्रवीद् वृद्धा दिष्ट्या धर्ममवेक्षसे ॥ २१ ॥
धर्माचे आचरण करणार्‍या महाभागा सीतेला पाहून वृद्ध अनसूयादेवी तिला सांत्वना देत म्हणाली - "सीते ! सौभाग्याची गोष्ट आहे की तू धर्मावरच दृष्टि ठेवून आहेस. ॥ २१ ॥
त्यक्त्वा ज्ञातिजनं सीते मानवृद्धिं च मामिनि ।
अवरुद्धं वने रामं दिष्ट्या त्वमनुगच्छसि ॥ २२ ॥
’मानिनी सीते ! बंधु-बांधवांना सोडून आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारी मान प्रतिष्ठा यांचा परित्याग करून तू वनांत धाडल्या गेलेल्या श्रीरामांचे अनुसरण करीत आहेस - ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. ॥ २२ ॥
नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वाशुभः ।
यासां स्त्रीणां प्रियो भर्ता तासां लोका महोदयाः ॥ २३ ॥
आपले स्वामी नगरात राहोत अथवा वनांत, चांगले असोत वा वाईट, ज्या स्त्रियांना ते प्रिय असतात त्यांना महान् अभ्युदयशाली लोकाची प्राप्ति होत असते. ॥ २३ ॥
दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः ।
स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥ २४ ॥
’पति वाईट स्वभावाचा, मन मानेल तसे वर्तन करणारा अथवा धनहीनही का असेना, तो उत्तम स्वभावाच्या स्त्रियांसाठी श्रेष्ठ देवतेसमान आहे. ॥ २४ ॥
नातो विशिष्टं पश्यामि बान्धवं विमृशन्त्यहम् ।
सर्वत्र योग्यं वैदेहि तपःकृतमिवाव्ययम् ॥ २५ ॥
’वैदेही ! मी खूप विचार करूनही पतिपेक्षा अधिक हितकारी कोणी बंधु पहात नाही. आपण केलेल्या तपस्येच्या अविनाशी फलाप्रमाणे तो या लोकात आणि परलोकात सर्वत्र सुख पोहोंचविणास समर्थ असतो. ॥ २५ ॥
न त्वेवमनुगच्छन्ति गुणदोषमसत्स्त्रियः ।
कामवक्तव्यहृदया भर्तृनाथाश्चरन्ति याः ॥ २६ ॥
’ज्या आपल्या पतिवर शासन करतात, त्या कामाच्या अधीन चित्त असणार्‍या असाध्वी स्त्रिया या प्रकारे पतिचे अनुसरण करीत नाहीत. त्यांना गुण-दोषाचे ज्ञान नसते; म्हणून त्या इच्छेनुसार इकडे तिकडे विचरत राहतात. ॥ २६ ॥
प्राप्नुवन्त्ययशश्चैव धर्मभ्रंशं च मैथिलि ।
अकार्यवशमापन्नाः स्त्रियो याः खलु तद्विधाः ॥ २७ ॥
’मैथिली ! अशा स्त्रिया अवश्यच अनुचित कर्मामध्ये फसून धर्मापासून भ्रष्ट होऊन जातात आणि संसारात त्यांना अपयशाची प्राप्ति होते. ॥ २७ ॥
त्वद्विधास्तु गुणैर्युक्ता दृष्टलोकपरावराः ।
स्त्रियः स्वर्गे चरिष्यन्ति यथा पुण्यकृतस्तथा ॥ २८ ॥
’परंतु ज्या तुमच्याप्रमाणे लोक-परलोकास जाणणार्‍या साध्वी स्त्रिया आहेत, त्या उत्तम गुणांनी युक्त होऊन पुण्यकर्मामध्ये संलग्न राहतात; म्हणून त्या दुसर्‍या पुण्यात्म्यांच्या प्रमाणे स्वर्गलोकात विचरण करतात. ॥ २८ ॥
तदेवमेनं त्वमनुव्रता सती
     पतिप्रधाना समयानुवर्तिनी ।
भव स्वभर्तुः सहधर्मचारिणी
     यशश्च धर्मं च ततः समाप्स्यसि ॥ २९ ॥
’म्हणून तू याच प्रकारे आपल्या या पतिदेव श्रीरामचंद्रांच्या सेवेत रत रहा. सतीधर्माचे पालन कर, पतिला प्रधान देवता समज आणि प्रत्येक समयी त्यांचे अनुसरण करीत आपल्या स्वामींची सहधर्मिणी बन. यामुळेच तुला सुयश आणि धर्म दोन्हीची प्राप्ती होईल." ॥ २९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तदशाधिकशततमः सर्गः ॥ ११७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे सतरावा सर्ग पूरा झाला ॥ ११७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP