[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राक्षसानामाक्रमणं श्रीरामेण तेषां संहारश्च -
राक्षसांचे श्रीरामांवर आक्रमण आणि श्रीरामचंद्रांच्या द्वारा राक्षसांचा संहार -
अवष्टब्धधनुं रामं क्रुद्धं च रिपुघातिनम् ।
ददर्शाश्रममागम्य खरः सह पुरःसरैः ॥ १ ॥

तं दृष्ट्‍वा सगुणं चापमुद्यम्य खरनिःस्वनम् ।
रामस्याभिमुखं सूतं चोद्यतामित्यचोदयत् ॥ २ ॥
खराने आपल्या अग्रगामी सैनिकांसह आश्रमाजवळ पोहोंचून क्रोधाविष्ट झालेल्या शत्रुघाती श्रीरामास पाहिले, जे हातात धनुष्य घेऊन उभे होते. त्यांना पहातांच आपल्या तीव्र टणकार करणार्‍या प्रत्यंचेसहित धनुष्याला उचलून त्यांने सूताला आज्ञा दिली- ’माझा रथ रामाच्या समोर घेऊन चल.’ ॥१-२॥
स खरस्याज्ञया सूतस्तुरगान् समचोदयत् ।
यत्र रामो महाबाहुरेको धून्वन् धनुः स्थितः ॥ ३ ॥
खराची आज्ञा होताच सारथ्याने जिकडे श्रीराम एकटेच उभे राहून आपल्या धनुष्याचा टणकार करीत होते तिकडेच घोड्यांना नेले. ॥३॥
तं तु निष्पतितं दृष्ट्‍वा सर्वतो रजनीचराः ।
नर्दमाना महानादं सचिवाः पर्यवारयन् ॥ ४ ॥
खराला श्रीरामांच्या समीप पोहोचलेला पाहून श्येनगामी आदि त्याचे निशाचर मंत्रीही मोठ्या जोराने सिंहनाद करून त्याला चहूबाजूनी घेरून उभे राहिले. ॥४॥
स तेषां यातुधानानां मध्ये रथगतः खरः ।
बभूव मध्ये ताराणां लोहिताङ्‌ग इवोदितः ॥ ५ ॥
त्या राक्षसांच्या मध्ये रथावर बसलेला खर तार्‍यांच्या मध्यभागी उगवलेल्या मंगळाप्रमाणे शोभत होता. ॥५॥
ततः शरसहस्रेण राममप्रतिमौजसम् ।
अर्दयित्वा महानादं ननाद समरे खरः ॥ ६ ॥
त्या समयी खराने समराङ्‌गणात हजारो बाणांनी अप्रतिम बलशाली श्रीरामांना पीडित करून मोठ्या जोराने गर्जना केली. ॥६॥
ततस्तं भीमधन्वानं क्रुद्धा सर्वे निशाचराः ।
रामं नानाविधैः शस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ ७ ॥
त्यानंतर क्रोधाने भरलेले समस्त निशाचर भयंकर धनुष्य धारण करणार्‍या दुर्जय वीर श्रीरामांच्या वर नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांची वृष्टी करू लागले. ॥७॥
मुद्‌गरैरायसैः शूलैः प्रासैः खड्गैः परश्वधैः ।
राक्षासाः समरे शूरं निजघ्नू रोषतत्पराः ॥ ८ ॥
त्या समरङ्‌गणात रूष्ट झालेल्या राक्षसांनी शूरवीर श्रीरामांच्या वर लोखंडाची मुद्‍गरे, शूल, प्रास, खङ्‌ग आणि कुर्‍हाडी द्वारा प्रहार केले. ॥८॥
ते बलाहकसंकाशा महाकाया महाबलाः ।
अभ्यधावन्त काकुत्स्थं रथैर्वाजिभिरेव च ॥ ९ ॥

गजैः पर्वतकूटाभै रामं युद्धे जिघांसवः ।
ते मेघांच्या समान काळे, विशालकाय आणि महाबली निशाचर रथ, घोडे आणि पर्वतशिखरा प्रमाणे गजराजांच्या द्वारा काकुत्स्थ श्रीरामांवर चारी बाजूने तुटून पडले. ते युद्धात त्यांना ठार मारू इच्छित होते. ॥९ १/२॥
ते रामे शरवर्षाणि व्यसृजन् रक्षसां गणाः ॥ १० ॥

शैलेन्द्रमिव धाराभिर्वर्षमाणा महाघनाः ।
ज्याप्रमाणे मोठ मोठे मेघ गिरिराजावर जलधारा वर्षत राहातात त्याच प्रकारे ते राक्षसगण श्रीरामांवर बाणांची वृष्टी करीत राहिले होते. ॥१० १/२॥
सर्वैः परिवृतो रामो राक्षसैः क्रूरदर्शनैः ॥ ११ ॥

तिथिष्विव महादेवो वृतः पारिषदां गणैः ।
क्रूरतापूर्ण दृष्टीने पहाणार्‍या त्या सर्व राक्षसांनी श्रीरामांना ज्याप्रमाणे प्रदोष संज्ञक तिथिमध्ये भगवान शिवाचे पार्षदगण शिवांना जसे घेरून टाकतात तसे घेरुन टाकले होते. ॥११ १/२॥
तानि मुक्तानि शस्त्राणि यातुधानैः स राघवः ॥ १२ ॥

प्रतिजग्राह विशिखैर्नद्योघानिव सागरः ।
जसा समुद्र नद्यांच्या प्रवाहाला आत्मसात करून टाकतो त्याप्रमाणे राघवांनी त्या राक्षसांनी सोडलेल्या अस्त्र-शस्त्रांना आपल्या बाणांच्या द्वारा ग्रासून टाकले होते. ॥१२ १/२॥
स तैः प्रहरणैर्घोरैर्भिन्नगात्रो न विव्यथे ॥ १३ ॥

रामः प्रादीप्तैर्बहुभिर्वज्रैरिव महाचलः ।
ज्याप्रमाणे बहुसंख्य दीप्तीमान वज्रांचे आघात सोसूनही महान पर्वत अढल (अचल) उभा असतो त्याप्रमाणे त्या राक्षसांच्या घोर अस्त्र-शस्त्रांनी जरी श्रीरामांचे शरीर क्षत-विक्षत होऊन गेले होते तरीही ते व्यथित अथवा विचलित झाले नाहीत. ॥१३ १/२॥
स विद्धः क्षतजादिग्धः सर्वगात्रेषु राघवः ॥ १४ ॥

बभूव रामः सन्ध्याभ्रैर्दिवाकर इवावृतः ।
राघवांच्या सार्‍या अंगावर अस्त्र-शस्त्रांच्या आघातानी जखमा झाल्या होत्या. ते रक्ताने माखले गेले होते म्हणून त्या समयी संध्याकाळच्या वेळी ढगांनी घेरलेल्या सूर्यदेवा प्रमाणे शोभून दिसत होते. ॥१४ १/२॥
विषेदुर्देगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ॥ १५ ॥

एकं सहस्रैर्बहुभिस्तदा दृष्ट्‍वा समावृतम् ।
श्रीराम एकटे होते. त्या समयी त्यांना अनेक सहस्त्र शत्रुनी घेरलेले पाहून देवता , सिद्ध, गंधर्व आणि महर्षि विषादात बुडून गेले. ॥१५ १/२॥
ततो रामस्तु संक्रुद्धो मण्डलीकृतकार्मुकः ॥ १६ ॥

ससर्ज विशिखान् बाणाञ्छतशोऽथ सहस्रशः ।
दुरावारान् दुर्विषहान् कालपाशोपमान् रणे ॥ १७ ॥
तत्पश्चात श्रीरामचंद्रांनी अत्यंत कुपित होऊन आपले धनुष्य इतके खेचले की ते गोलाकार दिसू लागले. नंतर तर ते त्या धनुष्याने रणभूमिमध्ये शेकडो हजारो असे तीक्ष्ण बाण सोडू लागले, की ज्यांना रोखणे कठीन होते, जे दुःसह होण्या बरोबरच कालपाशा प्रमाणे भयंकर होते. ॥१६-१७॥
मुमोच लीलया कङ्‌कपत्रान् काञ्चनभूषणान् ।
ते शराः शत्रुसैन्येषु मुक्ता रामेण लीलया ॥ १८ ॥

आददू रक्षसां प्राणान् पाशाः कालकृता इव ।
त्यांनी सहज लीलेने घारीच्या पिसांनी युक्त असंख्य सुवर्णभूषित बाण सोडले. शत्रूच्या सैनिकांवर श्रीरामांनी लीलापूर्वक सोडलेले ते बाण कालपाशा प्रमाणे राक्षसांचे प्राण घेऊ लागले. ॥१८ १/२॥
भित्त्वा राक्षसदेहांस्तांस्ते शरा रुधिराप्लुताः ॥ १९ ॥

अन्तरिक्षगता रेजुर्दीप्ताग्निसमतेजसः ।
राक्षसांच्या शरीरांना भेदून रक्ताने भरलेले ते बाण जेव्हा आकाशात पोहोंचत, तेव्हा प्रज्वलित अग्निच्या समान तेजाने प्रकाशित होऊ लागत. ॥१९ १/२॥
असङ्‌ख्येयास्तु रामस्य सायकाश्चापमण्डलात् ॥ २० ॥

विनिष्पेतुरतीवोग्रा रक्षःप्राणापहारिणः ।
श्रीरामांच्या मण्डलाकार धनुष्यातून अत्यंत भयंकर आणि राक्षसांचे प्राण घेणारे असंख्य बाण सुटू लागले. ॥२० १/२॥
तैर्धनूंषि ध्वजाग्राणि चर्माणि कवचानि च ॥ २१ ॥

बाहून् सहस्ताभरणानूरून् करिकरोपमान् ।
चिच्छेद रामः समरे शतशोऽथ सहस्रशः ॥ २२ ॥
त्या बाणांच्या द्वारा श्रीरामांनी समरंङ्‌गणात शत्रुंची शेकडो, हजारो धनुष्ये, ध्वजांचे अग्रभाग, ढाली, कवचे, आभूषणांसहित भुजा तसेच हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा कापून (छाटून) टाकल्या. ॥२१-२२॥
हयान् काञ्चनसंनाहान् रथयुक्तान् ससारथीन् ।
गजांश्च सगजारोहान् सहयान् सादिनस्तदा ॥ २३ ॥

चिच्छिदुर्बिभिदुश्चैव रामबाणा गुणच्युताः ।
पदातीन् समरे हत्वा ह्यनयद् यमसादनम् ॥ २४ ॥
प्रत्यंचेतून सुटलेल्या श्रीरामांच्या बाणांनी त्या समयी सोन्याच्या साजाने आणि कवचाने सजलेले आणि रथाला जुंपलेले घोडे, सारथी, हत्ती, हत्तीवरील स्वार, घोडे आणि घोडेस्वार यांनाही छिन्न-भिन्न करून टाकले. या प्रकारे श्रीरामांनी समरभूमीमध्ये पायदळातील सैनिकांनाही मारुन यमलोकात पोहोंचविले. ॥२३-२४॥
ततो नालीकनाराचैस्तीक्ष्णाग्रैश्च विकर्णिभिः ।
भीममार्तस्वरं चक्रुश्छिद्यमाना निशाचराः ॥ २५ ॥
त्या समयी त्यांच्या नालीक, नाराच आणि तीक्ष्ण अग्रभाग असणारे विकर्णी नामक बाणांच्या द्वारा छिन्न-भिन्न होऊन निशाचर भयंकर आर्तनाद करू लागले. ॥२५॥
तत्सैन्यं विविधैर्बाणैरर्दितं मर्मभेदिभिः ।
न रामेण सुखं लेभे शुष्कं वनमिवाग्निना ॥ २६ ॥
श्रीरामांनी सोडलेल्या नाना प्रकारच्या मर्मभेदी बाणांच्या द्वारा पीडित झालेली ती राक्षससेना आगीने जळणार्‍या वाळून गेलेल्या वनाप्रमाणे सुखशांति प्राप्त करित नव्हती. ॥२६॥
केचिद् भीद्‌भीमबलाः शूराः प्रासाञ्शूलान् परश्वधान् ।
चिक्षिपुः परमक्रुद्धा रामाय रजनीचराः ॥ २७ ॥
काही भयंकर बलशाली शूरवीर निशाचर अत्यंत कुपित होऊन श्रीरामांच्या वर प्रास, शूल आणि कुर्‍हाडीचे (परशुचे) प्रहार करू लागले. ॥२७॥
तेषां बाणैर्महाबाहुः शस्त्राण्यावार्य वीर्यवान् ।
जहार समरे प्राणांश्चिच्छेद च शिरोधरान् ॥ २८ ॥
’परंतु पराक्रमी महाबाहु श्रीरामांनी रणभूमीमध्ये आपल्या बाणांच्या द्वारा त्यांच्या त्या अस्त्र-शस्त्रांना रोखून त्यांचे गळे कापून टाकले आणि प्राण हरण केले. ॥२८॥
ते छिन्नशिरसः पेतुश्छिन्नचर्मशरासनाः ।
सुपर्णवातविक्षिप्ता जगत्यां पादपा यथा ॥ २९ ॥

अवशिष्टाश्च ये तत्र विषण्णास्ते निशाचराः ।
खरमेवाभ्यधावन्त शरणार्थं शराहताः ॥ ३० ॥
मस्तके, ढाली आणि धनुष्ये छाटली गेल्यावर ते निशाचर गरूडाच्या पंखांच्या वार्‍यामुळे तुटून पडाणार्‍या नंदनवनातील वृक्षांप्रमाणे धराशायी झाले. जे वाचले होते ते राक्षसही श्रीरामांच्या बाणांनी आहत होऊन विषादात बुडून गेले आणि आपले रक्षण व्हावे म्हणून धावत खराजवळ गेले. ॥२९-३०॥
तान् सर्वान् धनुरादाय समाश्वास्य च दूषणः ।
अभ्यधावत् सुसंक्रुद्धः क्रुद्धं क्रुद्ध इवान्तकः ॥ ३१ ॥
परंतु मध्येच दूषणाने धनुष्य घेऊन त्या सर्वांना आश्वासन दिले आणि अत्यंत कुपित होऊन रोषाने भरलेल्या यमराजा प्रमाणे तो क्रुद्ध होऊन युद्धासाठी खिळून उभे असलेल्या श्रीरामांकडे धावला. ॥३१॥
निवृत्तास्तु पुनः सर्वे दूषणाश्रयनिर्भयाः ।
राममेवाभ्यधावन्त सालतालशिलायुधाः ॥ ३२ ॥
दूषणाचा आधार मिळताच निर्भय होऊन ते सर्वच्या सर्व परत आले आणि साल, ताड आदि वृक्ष तसेच पत्थर घेऊन पुन्हा श्रीरामांच्यावरच तुटून पडले. ॥३२॥
शूलमुद्‌गरहस्ताश्च चापहस्ता महाबलाः ।
सृजन्तः शरवर्षाणि शस्त्रवर्षाणि संयुगे ॥ ३३ ॥
त्या युद्धस्थळावर आपल्या हातात शूळ, मुद्‍गर आणि पाश धारण केलेले ते महाबलवान निशाचर बाण तसेच अन्य अस्त्रे-शस्त्रे यांचा वर्षाव करू लागले. ॥३३॥
द्रुमवर्षाणि मुञ्चन्तः शिलावर्षाणि राक्षसाः ।
तद् बभूवाद्‌भुतं युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ॥ ३४ ॥

रामस्यास्य च महाघोरं पुनस्तेषां च रक्षसाम् ।
कुणी राक्षस वृक्षांची वृष्टी करू लागले तर कुणी दगड-शिळांची वृष्टी करू लागले. त्या समयी या श्रीरामात आणि त्या निशाचरात पुन्हा अत्यंत अद्‍भुत, महाभयंकर घनघोर आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. ॥३४ १/२॥
ते समन्तादभिक्रुद्धा राघवं पुनरार्दयन् ॥ ३५ ॥

ततः सर्वा दिशो दृष्ट्‍वा प्रदिशश्च समावृताः ।
राक्षसैः सर्वतः प्राप्तैः शरवर्षाभिरावृतः ॥ ३६ ॥

स कृत्वा भैरवं नादमस्रं परमभास्वरम् ।
समयोजयद् गान्धर्वं राक्षसेषु महाबलः ॥ ३७ ॥
ते राक्षस कुपित होऊन चोहोबाजूनी पुन्हा श्रीरामचंद्रांना पीडित करू लागले. तेव्हा सर्व बाजूनी आलेल्या राक्षसांनी संपूर्ण दिशा आणि उपदिशा घेरलेल्या पाहून बाणांच्या वर्षावाने आच्छादित झालेल्या महाबली श्रीरामांनी भैरवनाद करून त्या राक्षसांवर परम तेजस्वी गान्धर्व नामक अस्त्राचा प्रयोग केला. ॥३५-३७॥
ततः शरसहस्राणि निर्ययुश्चापमण्डलात् ।
सर्वा दश दिशो बाणैः आपूर्यन्त समागतैः ॥ ३८ ॥
मग तर त्यांच्या मण्डलाकार धनुष्यातून हजारो बाण सुटू लागले. त्या बाणांनी दाही दिशा पूर्णतः आच्छादित होऊन गेल्या. ॥३८॥
नाददानं शरान् घोरान् विमुञ्चन्तं शरोत्तमान् ।
विकर्षमाणं पश्यन्ति राक्षसास्ते शरार्दिताः ॥ ३९ ॥
बाणांनी पीडित राक्षस श्रीराम केव्हा भयंकर बाण हातात घेत आहेत आणि केव्हा ते उत्तम बाण सोडत आहेत हे पाहू शकत नव्हते. ते केवळ त्यांना धनुष्य खेचतांना पाहात होते. ॥३९॥
शरान्धकारमाकाशमावृणोत् सदिवाकरम् ।
बभूवावस्थितो रामः प्रक्षिपन्निव ताञ्छरान् ॥ ४० ॥
श्रीरामचंद्रांच्या बाणसमुदायरूपी अंधकाराने सूर्यासहित सार्‍या आकाश मण्डलास झाकून टाकले. त्या समयी श्रीराम त्या बाणांना एका पाठोपाठ निरंतर सोडत एकाच स्थानावर उभे होते. ॥४०॥
युगपत्पतमानैश्च युगपच्च हतैर्भृशम् ।
युगपत्पतितैश्चैव विकीर्णा वसुधाभवत् ॥ ४१ ॥
एकाच वेळी बाणांच्या द्वारा अत्यंत घायाळ होऊन एकदमच जमीनीवर पडणार्‍या आणि पडलेल्या बहुसंख्य राक्षसांच्या प्रेतांनी तेथील भूमी भरून गेली. ॥४१॥
निहताः पतिताः क्षीणाश्छिन्ना भिन्ना विदारिताः ।
तत्र तत्र स्म दृश्यन्ते राक्षसास्ते सहस्रशः ॥ ४२ ॥
जेथे जेथे दृष्टी जाईल तेथे तेथे ते हजारो राक्षस मेलेले, पडलेले, क्षीण झालेले, तुटलेले, बदडले गेलेले आणि विदीर्ण झालेले दिसून येत होते. ॥४२॥
सोष्णीषैरुत्तमाङ्‌गैश्च साङ्‌गदैर्बाहुभिस्तथा ।
ऊरुभिर्बाहुभिश्छिन्नैः नानारूपैर्विभूषणैः ॥ ४३ ॥

हयैश्च द्विपमुख्यैश्च रथैर्भिन्नैरनेकशः ।
चामरव्यजनैश्छत्रैर्ध्वजैर्नानाविधैरपि ॥ ४४ ॥

रामस्य बाणाभिहतैर्विच्छिनैः शूलपट्टिशैः ।
खड्गैः खण्डीकृतैः प्रासैर्विकीर्णैश्च परश्वधैः ॥ ४५ ॥

चूर्णिताभिः शिलाभिश्च शरैश्चित्रैरनेकशः ।
विच्छिन्नैः समरे भूमिर्विस्तीर्णाभूद् भयंकरा ॥ ४६ ॥
तेथे श्रीरामांच्या बाणांनी तुटलेली पगडींसहित मस्तके, बाजूबंदासह भुजा, जांघा, हात निरनिराळ्या प्रकारची आभूषणे, घोडे, श्रेष्ठ हत्ती, तुटलेले- मोडलेले अनेक रथ, चवर्‍या, पंखे, छत्रे, नाना प्रकारच्या ध्वजा, छिन्न-भिन्न झालेले शूल, पट्टिश, तुटलेली खङ्‌गे, विखरून पडलेले प्रास, परशु, चूर चूर झालेल्या शिला तसेच तुकडे तुकडे झालेले बरेचसे विचित्र बाण या सर्वांनी भरून गेलेली ती समरभूमी अत्यंत भयंकर दिसून येत होती. ॥४३-४६॥
तान् दृष्ट्‍वा निहतान् सर्वे राक्षसाः परमातुराः ।
न तत्र चलितुं शक्ता रामं परपुरंजयम् ॥ ४७ ॥
त्या सर्वांना मारले गेलेले पाहून शेष राक्षस अत्यंत आतुर होऊन तेथे शत्रुनगरीवर विजय मिळविणार्‍या श्रीरामांच्या सन्मुख जाण्यास असमर्थ झाले होते. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पंचवीसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP