॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ षष्ठः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]लक्ष्मणाची मूर्च्छा, राम-रावण-युद्ध. हनुमंताने औषधी आणणे आणि रावण-कालनेमि-संवाद


श्रीमहादेव उवाच
श्रुत्वा युद्धे बलं नष्टं अतिकायमुखं महत् ।
रावणो दुःखसन्तप्तः क्रोधेन महतावृतः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, अतिकायादिकांचे आपले मोठे सैन्य युद्धात नष्ट झाले आहे, हे ऐकल्यावर, रावण दुःखाने संतप्त झाला आणि अतिशय क्रुद्ध झाला. (१)

निधायेन्द्रजितं लङ्‌का रक्षणार्थं महाद्युतिः ।
स्वयं जगाम युद्धाय रामेण सह राक्षसः ॥ २ ॥
मग लंकेच्या रक्षणासाठी इंद्रजिताला ठेवून, तो महातेजस्वी रावण रामांबरोबर युद्ध करण्यास स्वतःच निघाला. (२)

दिव्यं स्यन्दनमारुह्य सर्वशस्त्रास्त्रसंयुतम् ।
राममेवाभिदुद्राव राक्षसेन्द्रो महाबलः ॥ ३ ॥
सर्व शस्त्रे आणि अस्त्रे यांनी सुसज्ज केलेल्या एका दिव्य रथावर आरूढ होऊन, महाबळी राक्षसराज रावण रामांवरच चाल करून गेला. (३)

वानरान् बहुशो हत्वा बाणैराशीविषोपमैः ।
पातयामास सुग्रीवो प्रमुखान् यूथनायकान् ॥ ४ ॥
सर्पाप्रमाणे असणाऱ्या बाणांनी पुष्कळ वानरांना मारून, रावणाने सुग्रीवादी सेनानायकांना जमिनीवर पाडले. (४)

गदापाणिं महासत्त्वं तत्र दृष्ट्वा विभीषणम् ।
उत्ससर्ज महाशक्तिं मयदत्तां विभीषणे ॥ ५ ॥
तेथे हातात गदा घेतलेल्या महापराक्रमी बिभीषणाला पाहून रावणाने मय राक्षसाने दिलेली महाशक्ती बिभीषणावर सोडली. (५)

तां आपतन्तीमालोक्य विभीषण विघातिनीम् ।
दत्ताभयोऽयं रामेण वधार्हो नायमासुरः ॥ ६ ॥
इत्युक्‍त्वा लक्ष्मणो भीमं चापमादाय वीर्यवान् ।
विभीषणस्य पुरतः स्थोतोऽकम्प इवाचलः ॥ ७ ॥
बिभीषणाचा नाश करण्यास पुढे पुढे येणारी ती शक्ती पाहिल्यावर, 'त्याला रामांनी अभय दिले आहे. हा बिभीषण वध होण्यास योग्य नाही,' असे म्हणून महावीर्यशाली लक्ष्मण आपले भयंकर धनुष्य घेऊन, बिभीषणाच्या पुढे एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर उभाराहिला. (६-७)

सा शक्तिर्लक्ष्मणतनुं विवेशामोघशक्तितः ।
यावन्त्यः शक्तयो लोके मायायाः संभवन्ति हि ॥ ८ ॥
तासां आधारभूतस्य लक्ष्मणस्य महात्मनः ।
मायाशक्त्या भवेत्किं वा शेषांशस्य हरेस्तनोः ॥ ९ ॥
अमोघ सामर्थ्य असल्यामुळे ती महाशक्ती लक्ष्मणाच्या शरीरात घुसली. या जगात मायेपासून उत्पन्न झालेल्या जितक्या शक्ती आहेत, त्या सर्वांचा आधारभूत विष्णू आहे; आणि शेषाचा अंशावतार असणारा महात्मा लक्ष्मण हा तर विष्णुस्वरूपच होता; त्यामुळे त्या मायाशक्तीचे लक्ष्मणापुढे काय चालणार ? (८-९)

तथापि मानुषं भावं आपन्नस्तदनुव्रतः ।
मूर्च्छितः पतितो भूमौ तं आदातुं दशाननः ॥ १० ॥
हस्तैस्तोलयितुं शक्तो न बभूवातिविस्मितः ।
सर्वस्य जगतः सारं विराजं परमेश्वरम् ॥ ११ ॥
कथं लोकाश्रयं विष्णुं तोलयेत् लघुराक्षसः ।
ग्रहीतुकामं सौमित्रिं रावणं वीक्ष्य मारुतिः ॥ १२ ॥
आजघानोरसि क्रुद्धो वज्रकल्पेन मुष्टिना ।
तेनि मुष्टिप्रहारेण जानुभ्यामपतद्‌भुविः ॥ १३ ॥
तथापि या वेळी मनुष्यभावाचा अंगीकार करून लक्ष्मण मनुष्य स्वरूपास अनुसरून वागला आणि म्हणून तो मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. तेव्हा पकडण्यासाठी गेलेला रावण त्याला आपल्या हातांनी उचलू शकला नाही. त्याला अतिशय विस्मय वाटला. सर्व जगाचे सार, लोकांचा आधार, विराट, परमेश्वर अशा विष्णूला एक फडतूस राक्षस कसा बरे उचलू शकेल ? सुमित्रा-पुत्र लक्ष्मणाला घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या रावणाला पाहून, कुद्ध झालेल्या मारुतीने वज्राअप्रमाणे कठीण असणाऱ्या आपल्या मुष्टीने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्या मुष्टीच्या प्रहाराने रावण गुडघ्यावर खाली जमिनीवर आदळला. (१०-१३)

आस्यैश्च नेत्रश्रवणैअः उद्वमन् रुधिरं बहु ।
विघूर्णमाननयनो रथोपस्य उपाविशत् ॥ १४ ॥
आणि आपली तोंडे, डोळे आणि कान यांतून पुष्कळ रक्त ओकत आणि गरागरा डोळे फिरवीत तो आपल्या रथाच्या मागील भागात जाऊन बसला. (१४)

अथ लक्ष्मणमादाय हनूमान् रावणार्दितम् ।
आनयद् रामसमीप्यं बाहुभ्यां परिगृह्य तम् ॥ १५ ॥
त्यानंतर रावणा कडून घायाळ झालेल्या लक्ष्मणाला आपल्या दोन बाहूंनी उचलून घेऊन, हनुमंताने रामांजवळ आणले. (१५)

हनूमतः सुहृत्त्वेन भक्त्या च परमेश्वरः ।
लघुत्वमगमद् देवो गुरूणां गुरुरप्यजः ॥ १६ ॥
जन्मरहित, प्रकाशरूप असा परमेश्वर हा जरी जड पदार्थापेक्षा अधिक जड होता, तरी तो हनुमंताच्या प्रेमामुळे व भक्तीमुळे अगदी हलका झाला होता. (१६)

सा शक्तिरपि तं त्यक्‍त्वा ज्ञात्वा नारायणांशजम् ।
रावणस्य रथं प्रागाद् रावणोऽपि शनैस्ततः ॥ १७ ॥
संज्ञामवाप्य जग्राह बाणासनमथो रुषा ।
राममेवाभिदुद्राव दृष्ट्वा रामोऽपि तं क्रुधा ॥ १८ ॥
आरुह्य जगतां नाथो हनूमन्तं महाबलम् ।
रथस्थं रावणं दृष्ट्वा अभिदुद्राव राघवः ॥ १९ ॥
लक्ष्मण नारायणाचा अंश म्हणून उत्पन्न झाला आहे हे जाणून, आणि मग त्याला सोडून देऊन, ती शक्ती रावणाच्या रथाकडे परत गेली. त्यानंतर इकडे रावणसुद्धा हळूहळू शुद्धीवर आला. लगेच त्याने रागाने धनुष्य घेतले आणि पुनः रामांवरच चाल केली. त्याला पाहून रामसुद्धा कुद्ध झाले. मग रथात बसून येणाऱ्या रावणाला पाहून, जगाचा नाथ असलेले राघव महाबळी हनुमंताच्या खाद्यावर चढून रावणाकडे धावले. (१७-१९)

ज्याशब्दमकरोत्तीव्रं वज्रनिष्पेषनिष्ठुरम् ।
रामो गम्भीरया वाचा राक्षसेंद्रमुवाच ह ॥ २० ॥
वज्रालासुद्धा चूर्ण करू शकेल असा आपल्या प्रत्यंचेचा अतिशय तीव्र आणि कठोर शब्द रामांनी केला. आणि मग गंभीर वाणीने राम राक्षसराज रावणाला म्हणाले. (२०)

राक्षसाधम तिष्ठाद्य क्व गमिष्यसि मे पुरः ।
कृत्वापराधमेवं मे सर्वत्र समदर्शिनः ॥ २१ ॥
"अरे अधम राक्षसा, थांब. सर्वत्र समदर्शी असणाऱ्या माझा अशा प्रकारे अपराध करून, आता तू माझ्या समोरून कुठे बरे जाऊ शकशील ? (२१)

येन बाणेन निहता राक्षसास्ते जनालये ।
तेनैव त्वां हनिष्यामि तिष्ठाद्य मम गोचरे ॥ २२ ॥
आता तू असाच माझ्यापुढे उभा राहा. जनस्थानात ज्या बाणाने मी तुझ्या त्या खर इत्यादी राक्षसांना ठार केले होते, त्याच बाणाने आज मी तुला ठार करणार आहे. (२२)

श्रीरामस्य वचः श्रुत्वा रावणो मारुतात्मजम् ।
वहन्तं राघवं सङ्‌ख्ये शरैस्तीक्ष्णैरताडयत् ॥ २३ ॥
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर, राघवांना खांद्यावरून वाहून नेणाऱ्या मारुतीवर रावणाने तीक्ष्ण बाणांनी प्रहार केले. (२३)

हतस्यापि शरैस्तीक्ष्णैः वायुसूनोः स्वतेजसा ।
व्यवर्धत पुनस्तेजो ननर्द च महाकपिः ॥ २४ ॥
त्या तीक्ष्ण बाणांचे प्रहार झाले तरी वायुसुत मारुतीचे तेज रामांच्या तेजामुळे पुन्हा वाढतच गेले आणि तो महान वानर गर्जना करू लागला. (२४)

ततो दृष्टा हनूमन्तं सव्रणं रघुसत्तमः ।
क्रोधमाहारयामास कालरुद्र इवापरः ॥ २५ ॥
त्यानंतर जखमी झालेल्या हनुमंताला पाहिल्यावर, दुसऱ्या कालरुद्राप्रमाणे दिसणाऱ्या रघुश्रेष्ठ रामांना भयंकर क्रोध आला. (२५)

साश्वं रथं ध्वजं सूतं शस्त्रौघं धनुरञ्जसा ।
छत्रं पताकां तरसा चिच्छेद शितसायकैः ॥ २६ ॥
आणि आपल्या तीष्ण बाणांनी रामांनी सहजपणे रावणाचे घोड्यांसह रथ, ध्वज, सारथी, शस्त्रसमूह, धनुष्य, छत्र आणि पताका हे सर्व तोडून टाकले. (२६)

ततो महाशरेणाशु रावणं रघुसत्तमः ।
विव्याध वज्रकल्पेन पाकारिरिव पर्वतम् ॥ २७ ॥
नंतर इंद्राने ज्या प्रमाणे आपल्या वज्राने पर्वतांना विद्ध केले होते, त्याप्रमाणे रघुश्रेष्ठ रामांनी वज्राप्रमाणे असणाऱ्या एका महान बाणाने रावणाला त्वरित विद्ध वेले. (२७)

रामबाणहतो वीरः चचाल च मुमोह च ।
हस्तान्निपतितश्चापः तं समीक्ष्य रघूत्तमः ॥ २८ ॥
अर्धचंद्रेण चिच्छेद तत्किरीटं रविप्रभम् ।
अनुजानामि गच्छ त्वं इदानीं बाणपीडितः ॥ २९ ॥
रामांच्या बाणाने घायाळ झालेला तो वीर रावण कापू लागला, त्याला मूर्च्छा आली आणि त्याच्या हातातून धनुष्य गळून पडले. तेव्हा त्या स्थितीतील रावणाला पाहून रघूत्तमांनी एका अर्धचंद्राकार बाणाने त्याचा सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा मुकुट तोडून टाकला व म्हटले "हे रावणा, तू आता माझ्या बाणाने घायाळ झाला आहेस. तेव्हा तू आता परत जा. माझी तुला अनुज्ञा आहे. (२८-२९)

प्रविश्य लङ्‌कां आश्वास्य स्वः पश्यसि बलं मम ।
रामबाणेन संविद्धो हतदर्पोऽथ रावणः ॥ ३० ॥
महत्या लज्जया युक्तो लङ्‌कां प्राविशदातुरः ।
रामोऽपि लक्ष्मणं दृष्ट्वा मूर्च्छितं पतितं भुवि ॥ ३१ ॥
मानुषत्वं उपाश्रित्य लीलयानुशुशोच ह ।
ततः प्राह हनूमन्तं वत्स जीवय लक्ष्मणम् ॥ ३२ ॥
महौषधीः समानीय पूर्ववत् वानरानपि ।
तथेति राघवेणोक्तो जगामाशु महाकपिः ॥ ३३ ॥
हनूमान् वायुवेगेन क्षणात्तीर्वा महोदधिम् ।
एतस्मिन्नन्तरे चारा रावणाय न्यवेदयन् ॥ ३४ ॥
लंकेत प्रवेश करून विश्रांती घे. मग उद्या तू पुनः माझे सामर्थ्य पाहाशील." त्यानंतर रामांच्या बाणाने विद्ध झालेला, ताठा नष्ट होऊन, व्याकूळ झालेला, रावण अतिशय लज्जित होऊन लंकेत आला. इकडे मूर्च्छित होऊन पडलेल्या लक्ष्मणाला पाहून, रामसुद्धा मनुष्य स्वभावाचा आश्रय घेऊन लीलेने शोक करू लागले. त्यानंतर ते हनुमंताला म्हणाले, "वत्सा, पूर्वीप्रमाणेच (द्रोणगिरी पर्वतावरून) महौषधी आणून या लक्ष्मणाला तसेच अन्य वानरांनासुद्धा तू जिवंत कर." राघवांचे वचनानंतर 'ठीक आहे', असे म्हणून एका क्षणात महासागर ओलांडून हनुमान वायुवेगाने निघून गेला. दरम्यानच्या काळात, गुप्तहेरांनी रावणाला सांगितले की, (३०-३४)

रामेण प्रेषितो देव हनूमान् क्षीरसागरम् ।
गतो नेतुं लक्ष्मणस्य जीवनार्थं महौषधीः ॥ ३५ ॥
"महाराज, लक्ष्मणाला जिवंत करण्यास महौषधी आणण्यासाठी रामांनी पाठविलेला हनुमान क्षीरसमुद्राकडे गेला आहे." (३५)

श्रुत्वा तच्चारवचनं राजा चिन्तापरोऽभवत् ।
जगाम रात्रावेकाकी कालनेमिगृहं क्षणात् ॥ ३६ ॥
ते गुप्तहेरांचे वचन ऐकल्यावर, राजा रावण अतिशय चिंतातुर झाला. मग त्याच रात्री एका क्षणात तो एकटाच कालनेमीच्या घरी गेला. (३६)

गृहागतं समालोक्य रावणं विस्मयान्वितः ।
कालनेमिरुवाचेदं प्राञ्जलिर्भयविह्वलः ।
अर्घ्यादिकं ततः कृत्वा रावणास्यग्रतः स्थितः ॥ ३७ ॥
आपल्या घरी आलेल्या रावणाला पाहून कालनेमी आश्चर्यचकित झाला. मग त्याला अर्घ्य इत्यादी देऊन, रावणाच्यापुढे हात जोडून उभे राहून, भयाने विव्हळ झालेला कालनेमी म्हणाला. (३७)

किं ते करोमि राजेन्द्र किमागमनकारणम् ।
कालनेमिमुवाचेदं रावणो दुःखपीडितः ॥ ३८ ॥
"हे राजेंद्रा, तुमच्या आगमनाचे कारण काय ? मी तुमची काय सेवा करू ?" तेव्हा दुःखी झालेला रावण कालनेमीला म्हणाला, (३८)

ममापि कालवशतः कष्टमेतद् उपस्थितम् ।
मया शक्त्या हतो वीरो लक्ष्मणः पतितो भुवि ॥ ३९ ॥
कालवशेकरून माझ्यावरसुद्धा संकट कोसळले आहे. माझ्या शक्तीचा प्रहार झालेला तो वीर लक्ष्मण जमिनीवर पडलेला आहे. (३९)

तं जीवयितुमानेतुं ओषधीर्हनुमान् गतः ।
यथा तस्य भवेद्विघ्नः तथा कुरु महामते ॥ ४० ॥
आता त्याला जिवंत करण्यासाठी म्हणून औषधी आणण्यास हनुमान गेला आहे. तेव्हा हे महाबुद्धिमंता, असे काही तरी करा की ज्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न येईल. (४०)

मायया मुनिवेषेण मोहयस्व महाकपिम् ।
कालात्ययो यथा भूयात् तथा कृत्वैहि मन्दिरे ॥ ४१ ॥
कपटाने मुनीचा वेष धारण करून त्या महावानराला तू मोहित कर. ज्यामुळे औषधीच्या प्रयोगाचा काळ निघून जाईल, असे काही तरी करून तू मग परत ये." (४१)

रावणस्य वचः श्रुत्वा कालनेमिरुवाच तम् ।
रावणेश वचो मेऽद्य शृणु धारय तत्त्वतः ॥ ४२ ॥
रावणाचे वचन ऐकून कालनेमी त्याला म्हणाला, "हे रावण महाराज, आता तुम्ही माझे वचन ऐका आणि ते खरे आहे असे समजून ध्यानी घ्या. (४२)

प्रियं ते करवाण्येव न प्राणान् धारयाम्यहम् ।
मारीचस्य यथारण्ये पुराभून्मृगरूपिणः ॥ ४३ ॥
तथैव मे न सन्देहो भविष्यति दशानन ।
हताः पुत्राश्च पौत्राश्च बान्धवा राक्षसाश्च ते ॥ ४४ ॥
मी तुमचे प्रिय करीनच. त्यासाठी मी माझ्या प्राणांचीसुद्धा पर्वा करणार नाही. पण त्यामुळे काय होणार ? हे रावणा, पूर्वी दण्डकारण्यात मृगाचे रूप धारण केलेल्या मारीचाची जशी अवस्था झाली होती, तशीच माझीसुद्धा अवस्था होणार यात संशय नाही. आणखी असे पाहा. तुमचे पुत्र, पौत्र, बांधव आणि अन्य राक्षस आत्तापर्यंत मारले गेले आहेत. (४३-४४)

घातयित्वा सुरकुलं जीवितेनापि किं तव ।
राज्येन वा सीतया वा किं देहेन जडात्मना ॥ ४५ ॥
अशा प्रकारे राक्षसांच्या कुळाचा नाश करवून, तुमच्या जगण्याचा काय उपयोग आहे ? किंवा राज्य, सीता अथवा जडस्वरूप देह यांचा तुम्हांला काय उपयोग होणार आहे ? (४५)

सीतां प्रयच्छ रामय राज्यं देहि विभीषणे ।
वनं याहि महाबाहो रम्यं मुनिगणाश्रयम् ॥ ४६ ॥
त्यापेक्षा हे महाबाहो, सीता श्रीरामांना परत देऊन टाका. बिभीषणाला राज्य द्या. मुनि-समूहांचा आश्रय असणाऱ्या रम्य अशा तपोवनात तुम्ही जा. (४६)

स्नात्वा प्रातः शुभजले कृत्वा सन्ध्यादिकाः क्रियाः ।
तत एकान्तमाश्रित्य सुखासनपरिग्रहः ॥ ४७ ॥
विसृज्य सर्वतः सङ्‌गं इतरान् विषयान्बहिः ।
बहिःप्रवृत्ताक्षगणं शनैः प्रत्यक् प्रवाहय ॥ ४८ ॥
तेथे प्रातःकाळी निर्मल पाण्यात स्नान करून, संध्या इत्यादी नित्य कर्मे करून, नंतर एकांत स्थानी तुम्ही सुखासनावर बसा. सर्व प्रकारे आसक्ती सोडून, अन्य विषयांना मनात प्रवेश न देता बाहेरच ठेवून, बाहेर प्रवृत्त होणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला तुम्ही हळूहळू आंत वळवून घ्या. (४७-४८)

प्रकृतेर्भिन्नमात्मानं विचारय सदानघ ।
चराचरं जगत्कृत्स्नं देहबुद्धीन्द्रियादिकम् ॥ ४९ ॥
आब्रह्मस्तम्बपर्यन्तं दृश्यते श्रूयते च यत् ।
सैषा प्रकृतिरित्युक्ता सैव मायेति कीर्तिता ॥ ५० ॥
हे निष्पाप रावणा, प्रकृतीपेक्षा आत्मा भिन्न आहे, असा नेहमी विचार करा.. ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत देह, बुद्धी, इंद्रिये इत्यादी सर्व स्थावर जगमाल्मक असे जे जग पाहिले जाते व ऐकले जाते, त्या सर्वाला प्रकृती असे म्हटले जाते आणि त्या प्रकृतीलाच माया असेही म्हटले जाते. (४९-५०)

सर्गस्थितिविनाशानां जगद्‍वृक्षस्य कारणम् ।
लोहितश्वेतकृष्णादि प्रजाः सृजति सर्वदा ॥ ५१ ॥
जगरूपी वृक्षाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे कारण असणारी ही प्रकृती सात्त्विक, राजस, तामस इत्यादी प्रकारची प्रजा नेहमी उत्पन्न करते. (५१)

कामक्रोधादिपुत्राद्यान् हिंसातृष्णादिकन्यकाः ।
मोहन्त्यनिशं देवं आत्मानं स्वैर्गुणैर्विभुम् ॥ ५२ ॥
तसेच ती काम, क्रोध इत्यादी पुत्र आणि हिंसा, तृष्णा इत्यादी कन्या निर्माण करते आणि ती माया स्वतःच्या गुणांनी सर्वव्यापक अशा आत्मदेवाला रात्रंदिवस मोहित करते. (५२)

कर्तृत्वभोक्तृत्वमुखान् स्वगुणान् आत्मनीश्वरे ।
आरोप्य स्ववशं कृत्वा तेन क्रीडति सर्वदा ॥ ५३ ॥
कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी मुख्य असणारे आपले गुण हे ईश्वररूप आत्म्यावर आरोपित करून आणि त्याला स्वतःला वश करून घेऊन, ती प्रकृती सदा सर्वदा त्याच्या बरोबर खेळत असते. (५३)

शुद्धोऽप्यात्मा यया युक्तः पश्यतीव सदा बहिः ।
विस्मृत्य च स्वमात्मानं मायागुणविमोहितः ॥ ५४ ॥
जरी आत्मा शुद्ध आहे तरी जेव्हा तो त्या प्रकृतीने युक्त होतो, तेव्हा मायेच्या गुणांनी अतिशय मोहित झालेला तो स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन, नेहमी बाहेरच (बाह्य विषयांकडे) पाहात राहातो. (५४)

यदा सद्‍गुरुणा युक्तो बोध्यते बोधरूपिणा ।
निवृत्तदृष्टिरात्मानं पश्यत्येव सदा स्फुटम् ॥ ५५ ॥
परंतु ज्ञानस्वरूपी सद्‌गुरूंशी युक्त होऊन जेव्हा तो त्यांच्याकडून उपदेश घेतो, तेव्हा बाह्य विषयांकडे लागलेली त्याची दृष्टी परत मागे फिरते आणि मग तो सतत स्पष्टपणे स्वतःलाच (आत्म स्वरूपालाच) पाहू लागतो. (५५)

जीवन्मुक्त सदा देही मुच्यते प्राकृतेर्गुणैः ।
त्वमप्येवं सदात्मानं विचार्य नियतेन्द्रियः ॥ ५६ ॥
प्रकृतेरन्यमात्मानं ज्ञात्वा मुक्तो भविष्यसि ।
ध्यातुं यदि असमर्थोऽसि सगुणं देवमाश्रय ॥ ५७ ॥
अशां प्रकारे जिवंतपणीच मुक्त झालेला तो देहधारी प्राणी प्रकृतीच्या गुणांतून सुटून जातो. तेव्हां हे रावणा, इंद्रियांचे नियमन करून आणि सातत्याने आत्म्याचा विचार करून तसेच प्रकृतीपेक्षा आत्मा वेगळा आहे हे जाणून घेऊन तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मुक्त व्हाल. आता अशा या निर्गुण आत्म्याचे ध्यान करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल, तर तुम्ही सगुण रूपाचा आश्रय घेऊन भक्ती करा. (५६-५७)

हृत्पद्मकर्णिके स्वर्ण-पीठे मणिगणान्विते ।
मृदुश्लक्ष्णतरे तत्र जानक्या सह संस्थितम् ॥ ५८ ॥
वीरासनं विशालाक्षं विद्युर्पुञ्जनिभाम्बरम् ।
किरीटहारकेयूर कौस्तुभादिभिरन्वितम् ॥ ५९ ॥
नूपुरैः कटकैर्भान्तं तथैव वनमालया ।
लक्ष्मणेन धनुर्द्वन्द्व-करेण परिसेवितम् ॥ ६० ॥
एवं ध्यात्वा सदात्मानं रामं सर्वहृदि स्थितम् ।
भक्त्या परमया युक्तो मुच्यते नात्र संशयः ॥ ६१ ॥
(तो सगुण ध्यानाचा प्रकार असा आहेः -) हृदय कमळाच्या गाभाऱ्यात, तेथे रत्नसमूहांनी जडित व अतिशय मृदू आणि चकचकीत अशा सुवर्णसिंहासनावर जानकीसह राम बसले आहेत. ते वीरासन घातलेले, विशाल नेत्र असणारे, विजेच्या पुंजाप्रमाणे तेजःपुंज वस्त्र असणारे, किरीट, हार, केयूर, कौस्तुभ, इत्यादी अलंकारांनी विभूषित तसेच नुपूर, कडी आणि वनमाला यांनी सुशोभित आहेत. रामांचे एक व स्वतःचे एक अशी दोन धनुष्ये हातात धरणारा लक्ष्मण त्यांची सेवा करीत आहे. ते सर्वांच्या हृदयांत स्थित आहेत. अशा प्रकारच्या आत्मस्वरूपी रामांचे ध्यान जो कोणी श्रेष्ठ भक्तीने युक्त होऊन सतत करतो, तो मुक्त होतो, यात संशय नाही. (५८-६१)

शृणु वै चरितं तस्य भक्तैर्नित्यमनन्यधीः ।
एवं चेत्कृतपूर्वाणि पापानि च महन्त्यपि ।
क्षणादेव विनश्यन्ति यथाग्नेस्तूलराशयः ॥ ६२ ॥
त्या रामांच्या इतर भक्तांसह त्यांचे चरित्र तुम्ही अनन्य बुद्धी होऊन ऐका. असे जर तुम्ही केले, तर ज्याप्रमाणे अग्नीमुळे कापसाचे ढीग नष्ट होऊन जातात, त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी केलेली महापातकेसुद्धा एका क्षणातच नष्ट होऊन जातील. (६२)

भजस्य रामं परिपूर्णमेकं
    विहाय वैरं निजभक्तियुक्तः ।
हृदा सदा भावितभावरूपं-
    अनामरूपं पुरुषं पुराणम् ॥ ६३ ॥
तुम्ही रामा बरोबरचे वै र सोडून द्या आणि त्यांच्यावरील स्वतःच्या भक्तीने युक्त व्हा. मग परिपूर्ण, अद्वितीय, नामरूपरहित, पुराण पुरुष अशा त्या रामांच्या सगुणरूपाची आपल्या हृदयात भावना करून त्यांना भजत राहा." (६३)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वएसवादे युद्धकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥


GO TOP