श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षोडशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वालिना तारां निर्भर्त्स्य निवर्तनं, सुग्रीवेण सह योधनं च श्रीरामेण बाणेन विद्धस्य तस्य पृथ्व्यां पतनं च - वालीचे तारेला दटावून परत धाडणे, सुग्रीवाशी लढणे आणि श्रीरामांच्या बाणाने घायाळ होऊन पृथ्वीवर पडणे -
तामेवं ब्रुवतीं तारां ताराधिपनिभाननाम् ।
वाली निर्भर्त्सयामास वचनं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
चंद्रम्याप्रमाणे मुख असलेल्या तारेला अशा गोष्टी करतांना पाहून वालीने तिला फटकारले आणि याप्रमाणे म्हटले- ॥१॥
गर्जतो ऽस्य च संरंभं भ्रातुः शत्रोर्विशेषतः ।
मर्षयिष्याम्यहं केन कारणेन वरानने ॥ २ ॥
’वरानने ! या गर्जत असलेल्या भावाची, विशेषतः जो माझा शत्रु आहे, त्याची ही उत्तेजनापूर्ण कृती मी कुठल्या कारणासाठी सहन करावी ? ॥२॥
अधर्षितानां शूराणां समरेष्वनिवर्तिनाम् ।
धर्षणामर्षणं भीरु मरणादतिरिच्यते ॥ ३ ॥
 ’भीरू ! जो कधी परास्त झालेला नाही आणि ज्यांनी युद्धाच्या अवसरी कधी पाठ दाखविली नाही, त्या शूरवीरांसाठी शत्रुचे आव्हान सहन करणे मृत्युपेक्षाही अधिक दुःखदायी होत असते. ॥३॥
सोढुं न च समर्थो ऽहं युद्धकामस्य संयुगे ।
सुग्रीवस्य च संरंभं हीनग्रीवस्य गर्जतः ॥ ४ ॥
’हा हीन ग्रीवा असणारा सुग्रीव संग्राम भूमीमध्ये माझ्याशी युद्धाची इच्छा ठेवत आहे. मी त्याचा रोषावेश आणि गर्जन- तर्जन सहन करण्यास असमर्थ आहे. ॥४॥
न च कार्यो विषादस्ते राघवं प्रति मत्कृते ।
ध्रमज्ञश्च कृतज्ञश्च कथं पापं करिष्यति ॥ ५ ॥
’राघवासंबंधीचा विचार करूनही तू माझ्यासाठी विषाद करता कामा नयेस. कारण ते धर्माचे ज्ञाते आणि कर्तव्याकर्तव्याला समजणारे आहेत, म्हणून पाप कसे करतील ? ॥५॥
निवर्तस्व सह स्त्रीभिः कथं भूयो ऽनुच्छसि ।
सौहृदं दर्शितं तारे मयि भक्तिः कृता त्वया ॥ ६ ॥

प्रति योत्साम्यहं गत्वा सुग्रीवं जहि संभ्रमम् ।
दर्पमात्रं विनेष्यामि न च प्राणैर्विमोक्ष्यते ॥ ७ ॥
’तू या स्त्रियांबरोबर परत जा. का माझे मागे वारंवार येत आहेस ? तू माझ्याबद्दल आपला स्नेह दाखविलास. भक्तिचाही परिचय दिला आहेस. आता जा. घाबरटपणा सोडून दे. मी पुढे जाऊन सुग्रीवाचा सामना करीन. त्याची घमेंड चूर चूर करून टाकीन, परंतु प्राण घेणार नाही. ॥६-७॥
अहं ह्याजिस्थितस्यास्य करिष्यामि यथेप्सितम् ।
वृक्षैर्मुष्टिप्रहारैश्च पीडितः प्रतियास्यति ॥ ८ ॥
’युद्धाच्या मैदानात उभ्या असलेल्या सुग्रीवाची जी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करीन. वृक्ष आणि बुक्यांच्या माराने पीडित होऊन तो स्वतःच पळून जाईल. ॥८॥
न मे गर्वितमायस्तं सहिष्यति दुरात्मवान् ।
कृतं तारे सहायत्वं सौहृदं दर्शितं मयि ॥ ९ ॥
’तारे ! दुरात्मा सुग्रीव माझा युद्धविषयक दर्प आणि आयास सहन करू शकणार नाही. तू माझी बौद्धिक सहायता उत्तम प्रकारे केली आहेस आणि माझ्याप्रति आपले सौहार्दही दाखविले आहेस. ॥९॥
शापितासि मम प्राणैर्निवर्तस्व जयेन च ।
अहं जित्वा निवर्तिष्ये तमहं भ्रातरं रणे ॥ १० ॥
’आता मी प्राणांची शपथ घेऊन सांगतो की आता तू या स्त्रियांच्या बरोबर परत जा. आता अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. मी युद्धात आपल्या भावाला जिंकून परत येईन.’ ॥१०॥
तं तु तारा परिष्वज्य वालिनं प्रियवादिनी ।
चकार रुदती मंदं दक्षिणा सा प्रदक्षिणम् ॥ ११ ॥
हे ऐकून अत्यंत उदार स्वभावाच्या तारेने वालीला आलिंगन देऊन मंद स्वरात रडत रडत त्याची परिक्रमा केली. ॥११॥
ततः स्वस्त्ययनं कृत्वा मंत्रवद्विजयैषिणी ।
अंतःपुरं सह स्त्रीभिः प्रविष्टा शोकमोहिता ॥ १२ ॥
ती पतिचा विजय इच्छित होती आणि तिला मंत्राचेही ज्ञान होते. म्हणून तिने वालीच्या मंगल कामनेने स्वस्तीवाचन केले आणि शोकाने मोहित होऊन ती अन्य स्त्रियांच्या बरोबर अंतःपुरात निघून गेली. ॥१२॥
प्रविष्टायां तु तारायां सह स्त्रीभिः स्वमालयम् ।
नगरान्निर्ययौ क्रुद्धो महासर्प इव श्वसन् ॥ १३ ॥
स्त्रियांसहित तारा आपल्या महालात निघून गेल्यावर क्रोधाविष्ट झालेल्या महान् सर्पाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारा वाली नगरांतून बाहेर पडला. ॥१३॥
स निःश्वस्य महातेजा वाली परमरोषणः ।
सर्वतश्चारयन् दृष्टिं शत्रुदर्शनकाङ्‌क्ष्या ॥ १४ ॥
अत्यंत रोषाने युक्त आणि फारच वेगवान् वाली दीर्घ श्वास सोडत शत्रुला पहाण्याच्या इच्छेने चोहोबाजूस आपली दृष्टी फिरवू लागला. ॥१४॥
स ददर्श ततः श्रीमान् सुग्रीवं हेमपिङ्‌ग<लम् ।
सुसंवीतमवष्टब्धं दीप्यमानमिवानलम् ॥ १५ ॥
इतक्यातच श्रीमान् वालीने सुवर्णासारख्या पिंगट वर्णाच्या सुग्रीवास पाहिले जे लंगोट बांधून युद्धासाठी खिळून उभे होते आणि प्रज्वलित अग्निसमान प्रकाशित होत होते. ॥१५॥
स तं दृष्ट्‍वा महावीर्यं सुग्रीवं पर्यवस्थितम् ।
गाढं परिदधे वासो वाली परमरोषणः ॥ १६ ॥
सुग्रीवाला उभा राहिलेला पाहून महाबाहु वाली अत्यंत कुपित झाला. त्याने आपला लंगोट दृढतेने कसला. ॥१६॥
स वाली गाढसंवीतो मुष्टिमुद्यम्य वीर्यवान् ।
सुग्रीवमेवाभिमुखो ययौ योद्धुं कृतक्षणः ॥ १७ ॥
लंगोट घट्ट कसून पराक्रमी वाली प्रहाराची संधी पाहून बुक्का ताणून सुग्रीवाकडे निघाला. ॥१७॥
श्लिष्टमुष्टिं समुद्यम्य संरब्धतरमागतः ।
सुग्रीवो ऽपि तमुद्दिश्य वालिनं हेममालिनम् ॥ १८ ॥
सुग्रीवही सुवर्णमालाधारी वालीच्या उद्देश्याने बुक्का मारण्यासाठी मूठ आवळून मोठ्या आवेशाने त्याच्याकडे निघाला. ॥१८॥
तं वाली क्रोधताम्राक्षः सुग्रीवं रणपण्डितम् ।
आपतंतं महावेगमिदं वचनमब्रवीत् ॥ १९ ॥
युद्धकलेत प्रवीण महावेगधारी सुग्रीवास आपल्याकडे येतांना पाहून वालीचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि तो याप्रमाणे बोलला- ॥१९॥
एष मुष्टिर्मया बद्धो गाढः संनिहिताङ्‌गु्लिः ।
मया वेगविमुक्तस्ते प्राणानादाय यास्यति ॥ २० ॥
’सुग्रीवा ! पाहून घे ! हा फार भारी बुक्का मूठ आवळून बांधलेला आहे. यात सारी बोटे सुनियंत्रित रूपाने परस्परास चिकटलेली आहेत. माझ्याद्वारा वेगपूर्वक मारला गेलेला हा बुक्का तुझा प्राण घेऊनच जाईल.’ ॥२०॥
एवमुक्तस्तु सुग्रीवः क्रुद्धो वालिनमब्रवीत् ।
तवैव चाहरन् प्राणान् मुष्टिः पततु मूर्धनि ॥ २१ ॥
वालीने असे म्हटल्यावर सुग्रीव क्रोधपूर्वक त्यास म्हणाले- ’माझा हा बुक्काही तुझे प्राण घेण्यासाठी तुझ्या मस्तकावर पडो.’ ॥२१॥
ताडितस्तेन सङ्‌क्रुोद्धः समभिक्रम्य वेगितः ।
अभवच्छोणितोद्गादरी सोत्पीड इव पर्वतः ॥ २२ ॥
इतक्यात वालीने वेगपूर्वक आक्रमण करून सुग्रीवावर बुक्क्याचा प्रहार केला. त्या आघाताने घायाळ आणि कुपित झालेल्या सुग्रीवाने झर्‍यांनी युक्त पर्वताप्रमाणे तोंडातून रक्त ओकण्यास सुरूवात केली. ॥२२॥
सुग्रीवेण तु निस्संगं सालमुत्पाट्य तेजसा ।
गात्रेष्वभिहतो वाली वज्रेणेव महागिरिः ॥ २३ ॥
तत्पश्चात सुग्रीवानेही निःशंक होऊन बलपूर्वक एका सालवृक्षास उपटून काढले आणि त्याने वालीच्या शरीरावर प्रहार केला; जणु काही इंद्राने कुठल्या विशाल पर्वतावर वज्राचा प्रहार केला असावा. ॥२३॥
स तु वाली प्रचलितः सालताडनविह्वलः ।
गुरुभारसमाक्रांतो नौसार्थ इव सागरे ॥ २४ ॥
त्या वृक्षाच्या आघाताने वालीच्या शरीरावर जखम झाली. त्या आघाताने विव्हळ झालेला वाली, व्यापारांचा समूह चढल्यावर भारी भारामुळे दबून समुद्रात डगमगणार्‍या नौकेप्रमाणे कापू लागला. ॥२४॥
तौ भीमबलविक्रांतौ सुपर्णसमवेगिनौ ।
प्रवृद्धौ घोरवपुषौ चंद्रसूर्याविवांबरे ॥ २५ ॥
त्या दोन्ही भावांचे बल आणि पराक्रम भयंकर होते. दोघांचाही वेग गरूडासमान होता. ते दोघे भयंकर रूप धारण करून अत्यंत जोराने झुंजत होते आणि पौर्णिमेच्या आकाशात चंद्रमा आणि सूर्याप्रमाणे दिसत होते. ॥२५॥
परस्परममित्रघ्नौ छिद्रान्वेषणतत्परौ ।
ततो ऽवर्धत वाली तु बलवीर्यसमन्वितः ॥ २६ ॥

सूर्यपुत्रो महावीर्यः सुग्रीवः परिहीयते ।
ते शत्रुदमन वीर आपल्या विपक्षीला ठार मारण्याच्या इच्छेने एक दुसर्‍याची दुर्बलता शोधत होते, परंतु त्या युद्धात बल विक्रम संपन्न वाली वाढू लागला आणि महापराक्रमी सूर्यपुत्र सुग्रीवची शक्ती क्षीण होऊ लागली. ॥२६ १/२॥
वालिना भग्नदर्पस्तु सुग्रीवो मंदविक्रमः ॥ २७ ॥

वालिनं प्रति सामर्षो दर्शयामास लाघवम् ।
वालीने सुग्रीवाची घमेंड चूर करून टाकली. त्याचा पराक्रम मंद होऊ लागला. तेव्हा वालीच्या अमर्षाने भरलेल्या सुग्रीवाने श्रीरामचंद्रांकडे आपल्या अवस्थे कडे लक्ष वेधले. ॥२७ १/२॥
वृक्षैः सशाखैः सशिखैर्वज्रकोटिनिभैर्नखैः ॥ २८ ॥

मुष्टिभिर्जानुभिः पद्‌भिार्बाहुभिश्च पुनःपुनः ।
तयोर्युद्धमभूद्घोःरं वृत्रवासवयोरिव ॥ २९ ॥
त्यानंतर फाद्यांसहित वृक्ष, पर्वतांची शिखरे, वज्रासमान भयंकर नखे, बुक्के, गुडघे आणि हाताच्या मारांनी त्या दोघामध्ये इंद्र आणि वृत्रासुर यांच्या प्रमाणे भयंकर युद्ध होऊ लागले. ॥२८-२९॥
तौ शोणिताक्तौ युद्ध्येतां वानरौ वनचारिणौ ।
मेघाविव महाशब्दैस्तर्जमा(या)नौ परस्परम् ॥ ३० ॥
ते दोघे वनचारी वानर रक्ताने न्हाऊन जाऊन लढत राहिले होते आणि दोन मेघांप्रमाणे अत्यंत भयंकर गर्जना करीत एक दुसर्‍यास दटावीत होते. ॥३०॥
हीयमानमथो ऽपश्यत्सुग्रीवं वानरेश्वरम् ।
वीक्षमाणं दिशश्चैव राघवः स मुहुर्मुहुः ॥ ३१ ॥
राघवांनी पाहिले की वानरराज सुग्रीव कमजोर पडत आहेत आणि वारंवार इकडे तिकडे दृष्टि टाकीत आहेत. ॥३१॥
ततो रामो महातेजा आर्तं दृष्ट्‍वा हरीश्वरम् ।
शरं च वीक्षते वीरो वालिनो वधकाङ्‌क्षया ॥ ३२ ॥
वानरराजास पीडित पाहून महातेजस्वी रामांनी वालीच्या वधाच्या इच्छेने आपल्या बाणावर दृष्टिपात केला. ॥३२॥
ततो धनुषि संधाय शरमाशीविषोपमम् ।
पूरयामास तच्चापं कालचक्रमिवांतकः ॥ ३३ ॥
त्यांनी आपल्या धनुष्यावर विषधर सर्पासमान भयंकर बाण ठेवला आणि त्यास जोराने खेचले, जणु काही यमराजांनी कालचक्रच उचलले होते. ॥३३॥
तस्य ज्यातलघोषेण त्रस्ताः पत्ररथेश्वराः ।
प्रदुद्रुवुर्मृगाश्चैव युगांत इवमोहिताः ॥ ३४ ॥
त्यांच्या प्रत्यञ्चेच्या टणत्काराने भयभीत होऊन मोठमोठे पक्षी आणि मृग पळून दूर उभे राहिले. ते प्रलयकाला समयी मोहित झालेल्या जीवांप्रमाणे किंकर्तव्य विमूढ झाले होते. ॥३४॥
मुक्तस्तु वज्रनिर्घोषः प्रदीप्ताशनिसंनिभः ।
राघवेण महाबाणो वालिवक्षसि पातितः ॥ ३५ ॥
राघवांनी वज्राप्रमाणे गडगडाट आणि प्रज्वलित अग्निप्रमाणे प्रकाश उत्पन्न करणारा तो महान् बाण सोडला आणि त्याच्या द्वारा वालीच्या वक्षःस्थळावर जखम केली. ॥३५॥
ततस्तेन महातेजा वीर्योत्सिक्तः कपीश्वरः ।
वेगेनाभिहतो वाली निपपात महीतले ॥ ३६ ॥
त्या बाणाने वेगपूर्वक जखमी होऊन महातेजस्वी पराक्रमी वानरराज वाली तात्काळ पृथ्वीवर कोसळला. ॥३६॥
इंद्रध्वज इवोद्धूतः पौर्णमास्यां महीतेले ।
आश्वयुक्समये मासि गत श्रीको विचेतनः ॥ ३७ ॥
अश्विन पौर्णिमेच्या दिवशी, इंद्रध्वजोत्सवाच्या शेवटी वर फेकला गेलेला इंद्रध्वज जसा पृथ्वीवर पडतो, त्याप्रकारे वाली ग्रीष्म ऋतुच्या अंती श्रीहीन, अचेत आणि अश्रुंनी गद्‌गदकंठ होऊन धराशायी झाला आणि नाना प्रकारे आर्तनाद करू लागला. ॥३७॥
नरोत्तमः कालयुगांतकोपमं
शरोत्तमं काञ्चनरूप्यभूषितम् ।
ससर्ज दीप्तं तममित्रमर्दनं
सधूममग्निं मुखतो यथा हरः ॥ ३८ ॥
श्रीरामांचा तो उत्तम बाण युगांत कालासमान भयंकर तसेच सोनेचांदीने विभूषित होता. पूर्वकाळी महादेवांनी ज्याप्रमाणे आपल्या मुखमंडलाच्या अंतर्गत ललाटवर्ती नेत्राने शत्रुभूत कामदेवाचा नाश करण्यासाठी धूमयुक्त अग्निची उत्पत्ती केली होती; त्याच प्रकारे पुरुषोत्तम श्रीरामांनी सुग्रीवशत्रु वालीचे मर्दन करण्यासाठी तो प्रज्वलित बाण सोडला होता. ॥३८॥
अथोक्षितः शोणिततोयविस्रवैः
सुपुष्पिताशोक इवानलोद्धतः ।
विचेतनो वासवसूनुराहवे
प्रभ्रंशितेंद्रध्वजवत्क्षितिं गतः ॥ ३९ ॥
इंद्रकुमार वालीच्या शरीरातून पाण्याप्रमाणे रक्ताची धार वाहू लागली. तो तिच्यात न्हाऊन निघाला आणि अचेत होऊन वार्‍याने उन्मळून पडणार्‍या पुष्पित अशोकवृक्षाप्रमाणे तसेच आकाशातून खाली पडणार्‍या इंद्रध्वजाप्रमाणे समरांगणात पृथ्वीवर कोसळला. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP