[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षट्पञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वनस्य शोभायां पश्यतां मिथो दर्शयतां च श्रीरामप्रभृतीनां चित्रकूटे गमनं वाल्मीकिदर्शनं कृत्वा श्रीरामस्याज्ञया लक्ष्मणेन वने पर्णशालाया निर्माणं तस्या वास्तुशान्ति कृत्वा तेषां सर्वेषां तत्र प्रवेशः -
वनाची शोभा पहात आणि दाखवीत श्रीराम आदिंचे चित्रकूटला पोहोंचणे, वाल्मीकिंचे दर्शन करून श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणा द्वारा पर्णशालेची निर्मिति तथा तिची वास्तुशान्ति करून त्या सर्वांचा कुटीमध्ये प्रवेश -
अथ रात्र्यां व्यतीतायामवसुप्तमनन्तरम् ।
प्रबोधयामास शनैर्लक्ष्मणं रघुपुङ्‌गवः ॥ १ ॥
त्यानंतर रात्र व्यतीत झाल्यावर रघुपुंगव श्रीरामांनी आपण जागे झाल्यानंतर तेथे झोपलेल्या लक्ष्मणास हळूच जागे केले (आणि या प्रकारे म्हणाले-) ॥१॥
सौमित्रे शृणु वन्यानां वल्गु व्याहरतां स्वनम् ।
संप्रतिष्ठामहे कालः प्रस्थानस्य परंतप ॥ २ ॥
’परंतप सौमित्र ! मधुर बोली बोलणार्‍या शुक-पिक आदि जंगली पक्ष्यांचा कलरव ऐक. आता आपण येथून प्रस्थान करू या; कारण प्रस्थानास योग्य समय आलेला आहे.’ ॥२॥
प्रसुप्तस्तु ततो भ्रात्रा समये प्रतिबोधितः ।
जहौ निद्रां च तन्द्रां च प्रसक्तं च परिश्रमम् ॥ ३ ॥
झोपलेल्या लक्ष्मणाने आपल्या मोठ्या भावाकडून योग्य समयी उठविले गेल्यानंतर निद्रा, आलस्य तसेच रस्ता चालून आलेला थकवा यांना दूर केले. ॥३॥
तत उत्थाय ते सर्वे स्पृष्ट्‍वा नद्याः शिवं जलम् ।
पन्थानमृषिभिर्जुष्टं चित्रकूटस्य तं ययुः ॥ ४ ॥
नंतर सर्व जण उठले आणि यमुना नदीच्या शीतल जलात स्नान आदि करून ऋषि-मुनिंच्या द्वारा सेवित चित्रकूटच्या मार्गावर चालू लागले. ॥४॥
ततः सम्प्रस्थितः काले रामः सौमित्रिणा सह ।
सीतां कमलपत्राक्षीमिदं वचनमब्रवीत् ॥ ५ ॥
त्या समयी लक्ष्मणासह तेथून प्रस्थित झालेल्या रामांनी कमलनयनी, कमलपत्राक्षी सीतेला या प्रमाणे म्हटले- ॥५॥
आदीप्तानिव वैदेहि सर्वतः पुष्पितान् नगान् ।
स्वैः पुष्पैः किंशुकान् पश्य मालिनः शिशिरात्यये ॥ ६ ॥
’वैदेही ! या वसंत ऋतुमध्ये सर्व बाजूस फुललेल्या या पलाश वृक्षांना तर पहा ! ते आपल्याच पुष्पांनी पुष्पमालाधारी झाल्याप्रमाणे प्रतीत होत आहेत आणि त्या फुलांच्या अरुण प्रभेमुळे प्रज्वलित झाल्यासारखे दिसून येत आहेत. ॥६॥
पश्य भल्लातकान् बिल्वान् नरैरनुपसेवितान् ।
फलपुष्पैरवनतान् नूनं शक्ष्याम जीवितुम् ॥ ७ ॥
’पहा, हे भल्लातकाचे आणि बेलाचे वृक्ष आपल्या फुलांच्या आणि फळांच्या भाराने झुकलेले आहेत. दुसर्‍या मनुष्यांचे येथपर्यत येणे संभव नसल्याने ते त्यांच्या द्वारा उपयोगात आणले गेलेले नाहीत, म्हणून निश्चितच या फळांवर आपण जीवन निर्वाह करू शकू.’ ॥७॥
पश्य द्रोणप्रमाणानि लम्बमानानि लक्ष्मण ।
मधूनि मधुकारीभिः सम्भृतानि नगे नगे ॥ ८ ॥
(नंतर लक्ष्मणास म्हटले-) ’लक्ष्मण ! पहा येथील एकेका वृक्षाला मधमाशांच्या द्वारा लावलेल्या आणि पुष्ट केलेल्या मधांची पोळी कशी लटकत आहेत. या सर्वात एक-एक द्रोण (अंदाजे सोळा शेर) मध भरलेला आहे.’ ॥८॥
एष क्रोशति नत्यूहस्तं शिखी प्रतिकूजति ।
रमणीये वनोद्देशे पुष्पसंस्तरसङ्‌कटे ॥ ९ ॥
’वनाचा हा भाग अत्यंत रमणीय आहे, येथे फुलांची जणु काही वृष्टिच होत आहे आणि सारी भूमि पुष्पांनी आच्छादित झालेली दिसून येत आहे. या वनप्रान्तात चातक ("श्रीराम -जयराम ...पियू पियू ") ची तान लावीत आहे, तिकडे तो मोर बोलत आहे जणु तो चातकाला प्रत्युत्तरच देत आहे. ॥९॥
मातङ्‌गयूथानुसृतं पक्षिसङ्‌घानुनादितम् ।
चित्रकूटमिमं पश्य प्रवृद्धशिखरं गिरिम् ॥ १० ॥
’हा आला चित्रकूट पर्वत - याचे शिखर खूप उंच आहे. हत्तींच्या झुंडीच्या झुंडी तिकडे जात आहेत आणि तेथे बरेचसे पक्षी किलबिलाट करत आहेत. ॥१०॥
समभूमितले रम्ये द्रुमैर्बहुभिरावृते ।
पुण्ये रंस्यामहे तात चित्रकूटस्य कानने ॥ ११ ॥
’तात ! जेथील भूमि समतल आहे आणि जे बर्‍याच वृक्षांनी भरलेले आहे, त्या चित्रकूटच्या पवित्र काननात आम्ही आनंदाने विचरण करूं.’ ॥११॥
ततस्तौ पादचारेण गच्छन्तौ सह सीतया ।
रम्यमासेदतुः शैलं चित्रकूटं मनोरमम् ॥ १२ ॥
सीतेसह ते दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण पायीच यात्रा (प्रवास) करीत यथासमय रमणीय तसेच मनोरम चित्रकूट पर्वतावर जाऊन पोहोंचले. ॥१२॥
तं तु पर्वतमासाद्य नानापक्षिगणायुतम् ।
बहुमूलफलं रम्यं सम्पन्नसरसोदकम् ॥ १३ ॥
तो पर्वत नाना प्रकारच्या पक्ष्यांनी परिपूर्ण होता. तेथे फलमूलांची विपुलता होती आणि स्वादिष्ट जल पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होते. त्या रमणीय शैलासमीप जाऊन श्रीराम म्हणाले- ॥१३॥
मनोज्ञोऽयं गिरिः सौम्य नानाद्रुमलतायुतः ।
बहुमूलफलो रम्यः स्वाजीवः प्रतिभाति मे ॥ १४ ॥
’सौम्य ! हा पर्वत फार मनोहर आहे. नाना प्रकारचे वृक्ष आणि लता याची शोभा वाढवित आहेत. येथे फळे, मुळे भरपूर आहेत, शिवाय हा रमणीय तर आहेच. मला वाटते येथे अत्यंत सुखाने जीवन निर्वाह होऊ शकेल. ॥१४॥
मुनयश्च महात्मानो वसन्त्यस्मिञ्शिलोच्चये ।
अयं वासो भवेत् तात वयमत्र वसेमहि ॥ १५ ॥
’या पर्वतावर अनेक महात्मा मुनि निवास करीत आहेत. तात ! हाच आपले निवासस्थान होण्यास योग्य आहे. आपण येथेच निवास करूं.’ ॥१५॥
इति सीता च रामश्च लक्ष्मणश्च कृताञ्जलिः ।
अभिगम्याश्रमं सर्वे वाल्मीकिमभिवादयन् ॥ १६ ॥
असा निश्चय करून सीता, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी हात जोडून महर्षि वाल्मीकींच्या आश्रमात प्रवेश केला आणि सर्वांनी त्यांच्या चरणी मस्तक नमविले. ॥१६॥
तान् महर्षिः प्रमुदितः पूजयामास धर्मवित् ।
आस्यतामिति चोवाच स्वागतं तु निवेद्य च ॥ १७ ॥
धर्माला जाणणारे महर्षि त्यांच्या आगमनामुळे अत्यंत प्रसन्न झाले आणि ’आपणा सर्वांचे स्वागत आहे ! यावे ! बसावे !’ असे म्हणून त्यांनी त्यांचा आदर-सत्कार केला. ॥१७॥
ततोऽब्रवीन्महाबाहुर्लक्ष्मणं लक्ष्मणाग्रजः ।
सन्निवेद्य यथान्यायमात्मानमृषये प्रभुः ॥ १८ ॥
तद्‌नंतर महाबाहु लक्ष्मणाग्रज भगवान रामांनी महर्षिला यथोचित परिचय करून दिला आणि लक्ष्मणाला म्हणाले- ॥१८॥
लक्ष्मणानय दारूणि दृढानि च वराणि च ।
कुरुष्वावसथं सौम्य वासे मेऽभिरतं मनः ॥ १९ ॥
’सौम्य लक्ष्मणा ! तू जंगलातून चांगली चांगली मजबूत लाकडे आण आणि राहण्यासाठी एक कुटी तयार कर. येथेच निवास करावा असे माझ्या मनाला वाटते आहे.’ ॥१९॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा सौमित्रिर्विविधान् द्रुमान् ।
आजहार ततश्चक्रे पर्णशालामरिंदमः ॥ २० ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून शत्रुदमन सौमित्रीने अनेक प्रकारच्या वृक्षांच्या फांद्या तोडून आणल्या आणि त्यांच्या द्वारा एक पर्णशाला तयार केली. ॥२०॥
तां निष्ठितां बद्धकटां दृष्ट्‍वा रामः सुदर्शनाम् ।
शुश्रूषमाणमेकाग्रमिदं वचनमब्रवीत् ॥ २१ ॥
ती कुटी आतून-बाहेरून लाकडाच्या भिंतीनीच सुस्थिर बनवली गेली होती आणि वरून ती शाकारलेली होती, ज्यायोगे पाऊस आदिचे निवारण व्हावे. ती दिसण्यात फार सुंदर वाटत होती. ती तयार झालेली पाहून एकाग्रचित्त होऊन आपले बोलणे ऐकणार्‍या लक्ष्मणास श्रीरामांनी याप्रकारे म्हटले - ॥२१॥
ऐणेयं मांसमाहृत्य शालां यक्ष्यामहे वयम् ।
कर्त्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः ॥ २२ ॥
’सौमित्रा ! आम्ही गजकंदाचा गर घेऊन त्यानेच पर्णशाळेच्या अधिष्ठाता देवतांचे पूजन करूं. **कारण कि दीर्घ जीवनाची इच्छा करणार्‍या पुरुषांनी वास्तुशान्ति अवश्य केली पाहिजे. ॥२२॥
[** "येथे ’ऐणेयं मांसम’ चा अर्थ आहे - गाजकंद नामक कंद- विशेषाचा गर. या प्रसंगात मांसपरक अर्थ घेता कामा नये, कारण असा अर्थ घेतल्यावर ’हित्वा मुनिवदामिषम्’ (२/२०/२९) ’फलानि मूलानि च भक्षयन् वने’(२/३४/५९), तथा ’धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मूल फलाशनाः’ (२/५४/१६) इत्यादि रूपाने केल्या गेलेल्या श्रीरामांच्या प्रतिज्ञांशी विरोध उत्पन्न होईल. या वचनात निरामिष रहाणे आणि फल-मूल खाऊन धर्माचरण करण्याची गोष्ट सांगितली गेली आहे. ’रामो द्विर्नाभिभाषते’ (श्रीराम दोन प्रकारे बोलत नाहीत. एकदा जे सांगतात ते अटळ आहे.) या कथनानुसार श्रीरामांची प्रतिज्ञा टळणारी नसते.]
मृगं हत्वानय क्षिप्रं लक्ष्मणेह शुभेक्षण ।
कर्त्तव्यः शास्त्रदृष्टो हि विधिर्धर्ममनुस्मर ॥ २३ ॥
’कल्याणदर्शी लक्ष्मणा ! तू ’गजकंद नामक कंदाला % उपटून किवा खोदून शीघ्र येथे घेऊन ये; कारण की शास्त्रोक्त विधिचे अनुष्ठान आमच्यासाठी अवश्य कर्तव्य आहे. तू धर्माचेच सदा चिंतन करीत जा.’ ॥२३॥
[% ’मदनपाल निघण्टुच्या अनुसार ’मृग’चा अर्थ गजकंद आहे.]
भ्रातुर्वचनमाज्ञाय लक्ष्मणः परवीरहा ।
चकार स यथोक्तं हि तं रामः पुनरब्रवीत् ॥ २४ ॥
भावाचे हे वचन समजून घेऊन शत्रुवीरांचा वध करणार्‍या लक्ष्मणांनी त्यांच्या कथनानुसार कार्य केले. तेव्हा रामांनी पुन्हा त्यास म्हटले- ॥२४॥
ऐणेयं श्रपयस्वैतच्छालां यक्ष्यामहे वयम् ।
त्वर सौम्य मुहूर्तोऽयं ध्रुवश्च दिवसो ह्ययम् ॥ २५ ॥
’लक्ष्मणा ! या गजकंदाला शिजव. आपण पर्णशालेच्या अधिष्ठात देवतांचे पूजन करू या. त्वरा कर. हा सौम्य मुहूर्त आहे. हा दिवस ही ’ध्रुव’** संज्ञक आहे. (म्हणून यातच हे शुभ कार्य झाले पाहिजे.)’ ॥२५॥
[** ’उत्तरात्रयरोहिण्यो भास्करश्च ध्रुवं स्थिरम्’ (मुहूर्त चिंतामणि) अर्थात तिन्ही उत्तरा आणि रोहिणी नक्षत्र तथा रविवार- हे ’ध्रुव’ एवं ’स्थिर’ संज्ञक आहेत. यात गृहशांति अथवा वास्तुशांति आदि कार्य चांगले मानले गेले आहे.]
स लक्ष्मणः कृष्णमृगं हत्वा मेध्यं प्रतापवान् ।
अथ चिक्षेप सौमित्रिः समिद्धे जातवेदसि ॥ २६ ॥
प्रतापी सौमित्राने पवित्र आणि काळ्या सालीच्या गजकंदाला उपटून प्रज्वलित अग्नित टाकून दिले. ॥२६॥
तं तु पक्वं समाज्ञाय निष्टप्तं छिन्नशोणितम् ।
लक्ष्मणः पुरुषव्याघ्रमथ राघवमब्रवीत् ॥ २७ ॥
रक्तविकाराचा नाश करणार्‍या** त्या गजकंदाला उत्तम प्रकारे शिजलेला जाणून लक्ष्मणांनी पुरुषसिंह राघवास म्हटले- ॥२७॥
[**’छिन्नशोणितम’ ची वुत्पत्ति या प्रकारे आहे- ’छिन्नं शोणितं रक्तविकाररूपं रोगजात येन सः तम्’ ’गजकंद; रोगविकाराचा नाशक आहे हे वैद्यकात प्रसिद्ध आहे. मदनपाल निघण्टुच्या ’षड्दोषादिकुष्टहंता’ आदि वचनांनी देखील ही हा चर्मदोष तथा कुष्ट आदि रक्तविकारांचा नाशक सिद्ध होत आहे.]
अयं सर्वः समस्ताङ्‌गः शृतः कृष्णमृगो यथा ।
देवतां देवसङ्‌काश यजस्व कुशलो ह्यसि ॥ २८ ॥
’देवोपम तेजस्वी श्रीरघुनाथा ! हा काळ्या सालीचा गजकंद ’जो बिघडलेल्या सर्व अंगांना ठीक करतो(*), माझ्या द्वारे पूर्ण शिजविला गेला आहे. आता आपण वास्तुदेवतांचे यजन करावे कारण आपण या कर्मात कुशल आहात.’ ॥२८॥
[(*)’समस्तांगः’ ची व्युत्पत्ति याप्रकारे समजली पाहिजे. "सम्यग भवंति अस्तानि अंगानि येन सः।"]
रामः स्नात्वा तु नियतो गुणवाञ्जपकोविदः ।
संग्रणाकरोत् सर्वान् मन्त्रान् सत्रावसानिकान् ॥ २९ ॥
सद्‌गुणसंपन्न तथा जपकर्माचे ज्ञाते श्रीरामचंद्रांनी स्नान करून शौच-संतोषादि नियमांच्या पालनपूर्वक संक्षेपाने त्या सर्व मंत्रांचा पाठ आणि जप केला, ज्यायोगे वास्तुयज्ञाची पूर्ती होते. ॥२९॥
इष्ट्‍वा देवगणान् सर्वान् विवेशावसथं शुचिः ।
बभूव च मनोह्लादो रामस्यामिततेजसः ॥ ३० ॥
समस्त देवतांचे पूजन करून पवित्र भावाने श्रीरामांनी पर्णकुटीत प्रवेश केला. त्या समयी अमित तेजस्वी श्रीरामांच्या मनास मोठा आल्हाद वाटला. ॥३०॥
वैश्वदेवबलिं कृत्वा रौद्रं वैष्णवमेव च ।
वास्तुसंशमनीयानि मङ्‌गलानि प्रवर्तयन् ॥ ३१ ॥
तत्पश्चात बलिवैश्वदेव कर्म, रूद्रयाग तथा वैष्णवयाग करून श्रीरामांनी वास्तुदोषाच्या शान्तिसाठी मंगलपाठ केला. ॥३१॥
जपं च न्यायतः कृत्वा स्नात्वा नद्यां यथाविधि ।
पापसंशमनं रामश्चकार बलिमुत्तमम् ॥ ३२ ॥
नदीमध्ये विधिपूर्वक स्नान करून न्यायतः गायत्री आदि मंत्रांचा जप केल्यानंतर श्रीरामांनी पञ्चसूना आदि दोषांच्या शान्तिसाठी उत्तम बलिकर्म केले. ॥३२॥
वेदिस्थलविधानानि चैत्यान्यायतनानि च ।
आश्रमस्यानुरूपाणि स्थापयामास राघवः ॥ ३३ ॥
राघवांनी आपल्या लहानशा कुटीच्या अनुरूपच वेदिकस्थळे (आठ दिक्पालासाठी बलि-समर्पणाची स्थाने) चैत्य (गणेश आदिची स्थाने) तथा आयतने (विष्णु आदि देवांची स्थाने) यांची निर्मिति आणि स्थापना केली. ॥३३॥
तां वृक्षपर्णच्छदनां मनोज्ञां
     यथाप्रदेशं सुकृतां निवाताम् ।
वासाय सर्वे विविशुः समेताः
     सभां यथा देवगणाः सुधर्माम् ॥ ३४ ॥
ती मनोहर कुटी उपयुक्त स्थानावर बनविली गेली होती. तिला वृक्षांच्या पानांनी शाकारलेले होते आणि तिच्या आत प्रचण्ड वायुपासून बचाव होईल याची पूरी व्यवस्था करण्यात आली होती. सीता, लक्ष्मण आणि श्रीराम सर्वांनी बरोबरच (एकत्रच) तिच्यात निवास करण्यासाठी प्रवेश केला. देवता ज्याप्रमाणे सुधर्मा सभेत एकदमच प्रवेश करतात त्याप्रमाणेच. ॥३४॥
सुरम्यमासाद्य तु चित्रकूटं
     नदीं च तां माल्यवतीं सुतीर्थाम् ।
ननन्द हृष्टो मृगपक्षिजुष्टां
     जहौ च दुःखं पुरविप्रवासात् ॥ ३५ ॥
चित्रकूट पर्वत फारच रमणीय होता. तेथे उत्तम तीर्थांनी (तीर्थस्थाने, पायर्‍या आणि घाट यांनी) सुशोभित माल्यवती (मंदाकिनी) नदी वहात होती, जिचे अनेक पशु-पक्षी सेवन करीत होते. तो पर्वत आणि ती नदी यांचे सान्निध्य मिळाल्याने श्रीरामांना फारच हर्ष आणि आनंद झाला. ते नगरापासून दूर वनांत येण्यामुळे होणार्‍या कष्टांना विसरून गेले. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा छप्पनावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP