श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकादश: सर्ग:॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य तत्सभासदां च संसदि समवायः - रावण आणि त्याचे सभासद यांचे सभाभवनात एकत्र जमणे -
स बभूव कृशो राजा मैथिलीकाममोहितः ।
असम्मानाच्च सुहृदां पापः पापेन कर्मणा ॥ १ ॥
राक्षसांचा राजा रावण मैथिली सीतेप्रति कामाने मोहित झालेला होता, त्याचे हितैषी सुहृद विभीषण आदि त्याचा अनादर करू लागले होते - त्याच्या कुकृत्यांची निंदा करत होते तसेच तो सीताहरणरूपी जघन्य पापकर्मामुळे पापी म्हणून घोषित केला गेला होता- या सर्व कारणांमुळे तो अत्यंत कृश (चिंतायुक्त आणि दुर्बळ) झाला होता. ॥१॥
अतीव कामसंपन्नो वैदेहीं अनुचिंतयन् ।
अतीतसमये काले तस्मिन् वै युधि रावणः ।
अमात्यैश्च सुहृद्‌भिश्च प्राप्तकालममन्यत ॥ २ ॥
तो अत्यंत कामाने पीडित होऊन वारंवार वैदेहीचे चिंतन करत होता; म्हणून युद्धाचा अवसर निघून गेल्यावरही त्याने त्या समयी मंत्री आणि सुहृदांच्या बरोबर सल्ला मसल्लत करून युद्धालाच समयोचित कर्तव्य मानले होते. ॥२॥
स हेमजालविततं मणिविद्रुमभूषितम् ।
उपगम्य विनीताश्वं आरुरोह महारथम् ॥ ३ ॥
तो सोन्याच्या जाळीने आच्छादित तसेच मणि आणि प्रवाळ (पोवळी) यांनी विभूषित एका विशाल रथावर चढला, ज्याला सुशिक्षित घोडे जुंपलेले होते. ॥३॥
तमास्थाय रथश्रेष्ठं महामेघसमस्वनम् ।
प्रययौ राक्षसां श्रेष्ठो दशग्रीवः सभां प्रति ॥ ४ ॥
महान्‌ मेघांच्या गर्जने प्रमाणे घडघडाट करणार्‍या त्या उत्तम रथावर आरूढ होऊन राक्षसशिरोमणि दशग्रीव सभाभवनाकडे प्रस्थित झाला. ॥४॥
असिचर्मधरा योधाः सर्वायुधधरास्ततः ।
राक्षसा राक्षसेन्द्रस्य पुरस्तात् संप्रतस्थिरे ॥ ५ ॥
त्या समयी राक्षसराज रावणाच्या पुढे ढाल-तलवार तसेच सर्व प्रकारचे आयुधे धारण करणारे बहुसंख्य राक्षस योद्धे जात होते. ॥५॥
नानाविकृतवेषाश्च नानाभूषणभूषिताः ।
पार्श्वतः पृष्ठतश्चैनं परिवार्य ययुस्तदा ॥ ६ ॥
याप्रकारे विविध प्रकारच्या आभूषणांनी विभूषित आणि नाना प्रकारचे विकराळ वेष घातलेले अगणित निशाचर त्याच्या डाव्या, उजव्या बाजूला तसेच पाठीमागूनही त्याला घेरून चालले होते. ॥६॥
रथैश्चातिरथाः शीघ्रं मत्तैश्च वरवारणैः ।
अनूत्पेतुर्दशग्रीवं आक्रीडद्‌भिश्च वाजिभिः ॥ ७ ॥
रावणाने प्रस्थान करताच बरेचसे अतिरथी आणि रथी, मत्त गजराज आणि खेळत खेळत तर्‍हेतर्‍हेच्या चाली दाखविणार्‍या घोड्‍यांच्या वर स्वार होऊन तात्काळ त्याच्या मागे मागे निघाले. ॥७॥
गदापरिघहस्ताश्च शक्तितोमरपाणयः ।
परश्वधधराश्चान्ये तथाऽन्ये शूलपाणयः।
ततस्तूर्यसहस्राणां सञ्जज्ञे निस्वनो महान् ॥ ८ ॥
कुणाच्या हातात गदा आणि परिघ शोभत होता. कोणी शक्ति आणि तोमर घेतलेले होते. काही लोकांनी परशु धारण केले होते तसेच अन्य राक्षसांच्या हातात शूल चमकत होते. नंतर तर तेथे हजारो वाद्यांचा महान्‌ घोष होऊ लागला. ॥८॥
तुमुलः शङ्‌खशब्दश्च सभां गच्छति रावणे।
स नेमिघोषेण महान् सहसाऽभिविनादयन् ॥ ९ ॥

राजमार्गं श्रिया जुष्टं प्रतिपेदे महारथः ।
रावण सभाभवनाकडे यात्रा करते समयी तुमुल शंखध्वनि होऊ लागला. त्याचा तो विशाल रथ आपल्या चाकांच्या घडघडाटाने संपूर्ण दिशांना प्रतिध्वनित करत एकाएकी शोभाशाली राजमार्गावर जाऊन पोहोचला. ॥९ १/२॥
विमलं चातपत्रं च प्रगृहीतमशोभत ॥ १० ॥

ण्डरं राक्षसेन्द्रस्य पूर्णस्ताराधिपो यथा ।
त्यासमयी राक्षसराज रावणावर निर्मल श्वेत छत्र धरलेले होते जे पूर्ण चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. ॥१० १/२॥
हेममञ्जरिगर्भे च शुद्धस्फटिकविग्रहे ॥ ११ ॥

मरव्यजने तस्य रेजतुः सव्यदक्षिणे ।
त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला स्फटिकाचे दांडे असलेली चवरी आणि व्यजन (पंखा) ज्यामध्ये सोन्याच्या मंजिरी बनविलेल्या होत्या शोभून दिसत होते. ॥११ १/२॥
ते कृताञ्जलयः सर्वे रथस्थं पृथिवीस्थिताः ॥ १२ ॥

क्षसा राक्षसश्रेष्ठं शिरोभिस्तं ववन्दिरे ।
मार्गात पृथ्वीवर उभे असलेले सर्व राक्षस दोन्ही हात जोडून रथावर बसलेल्या राक्षस शिरोमणी रावणाला मस्तक नमवून वंदना करीत होते. ॥१२ १/२॥
राक्षसैः स्तूयमानः सन् जयाशीर्भिररिन्दम ॥ १३ ॥

आससाद महातेजाः सभां विरचितां तदा ।
राक्षसांच्या द्वारे केली गेलेली स्तुती, जयजयकार आणि आशीर्वाद ऐकत शत्रुदमन महातेजस्वी रावण त्यासमयी विश्वकर्मा द्वारा निर्मित राजसभेमध्ये पोहोचला. ॥१३ १/२॥
सुवर्णरजतास्तीर्णां विशुद्धस्फटिकान्तराम् ॥ १४ ॥

राजमानो वपुषा रुक्मपट्टोत्तरच्छदाम् ।
तां पिशाचशतैः षड्‌भिः अभिगुप्तां सदाप्रभाम् ॥ १५ ॥

प्रविवेश महातेजाः सुकृतां विश्वकर्मणा ।
त्या सभेच्या फर्शीमध्ये सोनेचांदीचे काम केलेले होते तसेच मधे मधे विशुद्ध स्फटिक जडविले गेले होते. त्यात सोन्याचे काम केलेल्या रेशमी वस्त्रांच्या चादरी पसरलेल्या होत्या. ती सभा सदा आपल्या प्रभेने उद्‌भासित होत होती. सहाशे पिशाच्चे तिचे रक्षण करीत होती. विश्वकर्म्याने तिला फारच सुंदर बनविले होते. आपल्या शरीराने सुशोभित होणार्‍या महातेजस्वी रावणाने त्या सभेमध्ये प्रवेश केला. ॥१४-१५ १/२॥
तस्यां तु वैडूर्यमयं प्रियकाजिनसंवृतम् ॥ १६ ॥

महत् सोपाश्रयं भेजे रावणः परमासनम् ।
ततः शशासेश्वरवद् दूतान् लघुपराक्रमान् ॥ १७ ॥
त्या सभाभवनात वैडूर्य मण्याचे बनविलेले एक विशाल आणि उत्तम सिंहासन होते, ज्यावर अत्यंत मुलायम चामड्‍याच्या पियक नामक मृगाचे चर्म अंथरलेले होते आणि त्यावर राजगादी ठेवलेली होती. रावण त्यावर बसला नंतर त्याने आपल्या शीघ्रगामी दूतांना आज्ञा दिली- ॥१६-१७॥
समानयत मे क्षिप्रं इहैतान् राक्षसानिति ।
कृत्यमस्ति महज्जाने कर्तव्यं इति शत्रुभिः ॥ १८ ॥
तुम्ही लोक शीघ्रच येथे वसणार्‍या सुविख्यात राक्षसांना माझ्या जवळ बोलावून घेऊन या, कारण शत्रूंशी सामना करण्यायोग्य महान्‌ कार्य माझ्यावर येऊन पडले आहे, ही गोष्ट मी उत्तम प्रकारे जाणत आहे. (म्हणून यावर विचार करण्यासाठी सर्व सभासदांनी येथे येणे अत्यंत आवश्यक आहे.) ॥१८॥
राक्षसास्तद्वचः श्रुत्वा लङ्‌कायां परिचक्रमुः ।
अनुगेहमवस्थाय विहारशयनेषु च ।
उद्यानेषु च रक्षांसि चोदयन्तो ह्यभीतवत् ॥ १९ ॥
रावणाचा हा आदेश ऐकून ते राक्षस लंकेमध्ये सर्व बाजूस चकरा मारू लागले. ते एक एक घर, विहारस्थान, शयनागार आणि उद्यानामध्ये जाऊन जाऊन अत्यंत निर्भयपणे त्या सर्व राक्षसांना राजसभेत चलण्यासाठी प्रेरित करू लागले. ॥१९॥
ते रथान्तचरा एके दृप्तानेके दृढान हयान् ।
नागानेकेऽधिरुरुहुः जग्मुश्चैके पदातयः ॥ २० ॥
तेव्हां त्या राक्षसांपैकी कोणी रथावर चढून निघाले, कोणी मत्त हत्तीवर आणि कोणी मजबूत घोड्‍यांवर स्वार होऊन आपापल्या स्थानातून प्रस्थित झाले. बरेचसे राक्षस पायीच चालू लागले. ॥२०॥
सा पुरी परमाकीर्णा रथकुञ्जरवाजिभिः ।
संपतद्‌भिर्विरुरुचे गरुत्मद्‌भिरिवांबरम् ॥ २१ ॥
त्यासमयी धावत जाणार्‍या रथांनी, हत्तीनी आणि घोड्‍यांनी व्याप्त झालेली ती पुरी बहुसंख्य गरूडांनी आच्छादित झालेल्या आकाशाप्रमाणे शोभून दिसत होती. ॥२१॥
ते वाहनान्यवस्थाय यानानि विविधानि च ।
सभां पद्‌भिः प्रविविशुः सिंहा गिरिगुहामिव ॥ २२ ॥
गंतव्य स्थानापर्यंत पोहोचून आपापली वाहने आणि नाना प्रकारच्या स्वार्‍या यांना बाहेरच ठेवून ते सर्व सभासद पायीच त्या सभाभवनात प्रविष्ट झाले; जणु बरेचसे सिंह कुठल्या एखाद्या पर्वताच्या कंदरेमध्ये घुसत आहेत. ॥२२॥
राज्ञः पादौ गृहीत्वा तु राज्ञा ते प्रतिपूजिताः ।
पीठेष्वन्ये बृसीष्वन्ये भूमौ केचिदुपाविशन् ॥ २३ ॥
तेथे पोहोचल्यावर त्या सर्वांनी राजाचे पाय धरले तसेच राजाने ही त्यांचा सत्कार केला. तत्पश्चात्‌ काही लोक सोन्याच्या सिंहासनावर काही लोक कुशाच्या चटयांवर आणि काही लोक साधारण बैठकींनी झाकलेल्या भूमीवरच बसले. ॥२३॥
ते समेत्य सभायां वै राक्षसा राजशासनात् ।
यथार्हमुपतस्थुस्ते रावणं राक्षसाधिपम् ॥ २४ ॥
राजाच्या आज्ञेने त्या सभेमध्ये एकत्र जमलेले ते सर्व राक्षस राक्षसराज रावणाच्या आसपास यथायोग्य आसनांवर बसले. ॥२४॥
मंत्रिणश्च यथा मुख्या निश्चयार्थेषु पण्डिताः ।
अमात्याश्च गुणोपेताः सर्वज्ञा बुद्धिदर्शनाः ॥ २५ ॥

समीयुस्तत्र शतशः शूराश्च बहवस्तथा ।
सभायां अहेमवर्णायां सर्वार्थस्य सुखाय वै ॥ २६ ॥
यथायोग्य भिन्न-भिन्न विषयांसाठी उचित सम्मति देणारे मुख्य मुख्य मंत्री, कर्तव्य निश्चयात पांडित्याचा परिचय देणारे सचिव, बुद्धिदर्शी, सर्वज्ञ, सद्‍गुण संपन्न उपमंत्री तसेच आणखीही बरेचसे शूरवीर संपूर्ण अर्थांच्या निश्चयासाठी आणि सुखप्राप्तिच्या उपायावर विचार करण्यासाठी त्या सोनेरी कांतीच्या सभेमध्ये शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. ॥२५-२६॥
ततो महात्मा विपुलं सुयुग्यं
वरं रथं हेमविचित्रिताङ्‌गम् ।
शुभं समास्थाय ययौ यशस्वी
विभीषणः संसदमग्रजस्य ॥ २७ ॥
तत्पश्चात्‌ यशस्वी महात्मा विभीषणही एका सुवर्णजडित, सुंदर अश्वांनी युक्त विशाल, श्रेष्ठ तसेच शुभकारक रथावर आरूढ होऊन आपल्या मोठ्‍या भावाच्या सभेमध्ये जाऊन पोहोचले. ॥२७॥
स पूर्वजप्यावरजः शशंस
नामाथ पश्चाच्चरणौ ववन्दे ।
शुकः प्रहस्तश्च तथैव तेभ्यो
ददौ यथार्हं पृथगासनानि ॥ २८ ॥
लहान भाऊ विभीषणाने प्रथम आपले नाव सांगितले, नंतर मोठ्‍या भावाच्या चरणी मस्तक नमविले, याच प्रकारे शुक आणि प्रहस्त यांनीही केले. तेव्हा रावणाने त्या सर्वांना यथायोग्य पृथक-पृथक आसने दिली. ॥२८॥
सुवर्णनानामणिभूषणानां
सुवाससां संसदि राक्षसानाम् ।
तेषां परार्ध्यागरुचन्दनानां
स्रजां च गंधाः प्रववुः समन्तात् ॥ २९ ॥
सुवर्ण आणि नाना प्रकारच्या मण्यांच्या आभूषणांनी विभूषित त्या सुंदर वस्त्रे धारण करणार्‍या राक्षसांच्या सभेमध्ये सर्वत्र बहुमूल्य अगुरू, चंदन तसेच पुष्पहारांचा सुगंध पसरला होता. ॥२९॥
न चुक्रुशुर्नानृतमाह कश्चित्
सभासदो नैव जजल्पुरुच्चैः ।
संसिद्धार्थाः सर्व एवोग्रवीर्या
भर्तुः सर्वे ददृशुश्चाननं ते ॥ ३० ॥
त्या समयी त्या सभेचा कोणीही सदस्य असत्य बोलत नव्हता. ते सर्व सभासद आरडा-ओरडा करत नव्हते अथवा मोठमोठ्‍याने आपापसात वार्तालापही करत नव्हते. ते सर्वच्या सर्व सफल मनोरथ तसेच भयंकर पराक्रमी होते आणि सर्व आपले स्वामी रावण यांच्या मुखाकडे पहात राहिले होते. ॥३०॥
स रावणः शस्त्रभृतां मनस्विनां
महाबलानां समितौ मनस्वी ।
तस्यां सभायां प्रभया चकाशे
मध्ये वसूनामिव वज्रहस्तः ॥ ३१ ॥
त्या सभेमध्ये शस्त्रधारी महाबली मनस्वी वीरांचा समागम झाल्यावर त्यांच्या मध्ये बसलेला मनस्वी रावण आपल्या प्रभेने, वसुंच्या मध्ये वज्रधारी इंद्र जसे देदीप्यमान्‌ होतात त्याप्रकारे प्रकाशित होत होता. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा अकरावा सर्ग पूर्ण झाला. ॥११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP