॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ प्रथमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



भगवान श्रीरामांजवळ नारदांचे आगमन -


श्रीमहादेव उवाच -
एकदा सुखमासीनं रामं स्वान्तःपुराजिरे ।
सर्वाभरणसंपन्नं रत्‍नसिंहासने स्थितम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, सर्व अलंकारांनी विभूषित श्रीरामचंद्र एके दिवशी आपल्या अंतःपुरातील अंगणात रत्‍नजडित सिंहासनावर सुखाने बसले होते. (१)

नीलोत्पलदलश्यामं कौस्तुभामुक्तकन्धरम् ।
सीतया रथदण्डेन चामरेणाथ वीजितम् ॥ २ ॥
विनोदयन्तं ताम्बूलचर्वणादिभिरादरात् ।
नारदोऽवतरद्‌द्रष्टुमम्बराद्यत्र राघवः ॥ ३ ॥
नीलकमळाप्रमाणे त्यांचा श्याम वर्ण होता व कौस्तुभ मणी त्यांच्या गळ्यांत शोभत होता. अशा रघुनाथांना श्रीसीता ही रत्‍नखचित दंडाच्या चवरीने वारा घालीत होती. आदरपूर्वक दिलेल्या तांबूलाचे चर्वण करीत श्रीराम सीतेला आनंदित करीत होते. त्या वेळी त्यांचे दर्शन घेण्यास, देवर्षी नारद आकाशातून खाली आले. (२-३)

शुद्धस्फटिकसङ्‌काशः शरच्चन्द्र इवामलः ।
अतर्कितमुपायातो नारदो दिव्यदर्शनः ॥ ४ ॥
शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ आणि दिव्य दृष्टी असणारे श्रीनारद अचानक तेथे आले. (४)

तं दृष्ट्‍वा सहसोत्थाय रामः प्रीत्या कृताञ्जलिः ।
ननाम शिरसा भूमौ सीतया सह भक्तिमान् ॥ ५ ॥
त्यांना पाहून भगवान श्रीराम लगबगीने उठून उभे राहिले आणि सीतेसह भक्तियुक्त होऊन रामांनी प्रेमाने हात जोडले आणि जमिनीवर मस्तक ठेवून नारदांना प्रणाम केला. (५)

उवाच नारदं रामः प्रीत्या परमया युतः ।
संसारिणां मुनिश्रेष्ठ दुर्लभं तव दर्शनम् ।
अस्माकं विषयासक्तचेतसां नितरां मुनेः ॥ ६ ॥
अवाप्तं मे पूर्वजन्मकृतपुण्यमहोदयैः ।
संसारिणापि हि मुने लभ्यते सत्समागमः ॥ ७ ॥
परम प्रीतीने भगवान श्रीरामांनी नारदांना म्हटले, "हे मुनिश्रेष्ठा, विषयांमध्ये ज्यांची मने अतिशय आसक्त झाली आहेत, अशा आमच्यासारख्या संसारी माणसांना तुमचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे मुने, मी पूर्व जन्मात केलेल्या पुण्याच्या संचयाचा उदय झाल्यामुळेच मला आज तुमचे दर्शन झाले आहे. कारण पुण्याचा उदय झाल्यावरच संसारी पुरुषांनासुद्धा सत्संगाचा लाभ होतो. (६-७)

अतस्त्वद्दर्शनादेव कृतार्थोऽस्मि मुनीश्वर ।
किं कार्यं ते मया कार्यं ब्रूहि तत्करवाणि भोः ॥ ८ ॥
म्हणून हे मुनीश्वरा, आज तुमच्या दर्शनानेच मी कृतार्थ होऊन गेलो आहे. आता तुमचे अभीष्ट कार्य मला सांगा. हे मुने, ते मी पूर्ण करतो." (८)

अथ तं नारदोऽप्याह राघवं भक्तवत्सलम् ।
किं मोहयसि मां राम वाक्यैर्लोकानुसारिभिः ॥ ९ ॥
तेव्हा नारदांनी भक्तवत्सल भगवान श्रीरामांना सांगितले, प्रभू रामा, सामान्य माणसांप्रमाणे बोलून तुम्ही मला का बरे मोहित करीत आहात ? (९)

संसार्यहमिति प्रोक्तं सत्यमेतत्त्वया विभोः ।
जगतामादिभूता या सा माया गृहिणी तव ॥ १० ॥
हे विभो, मी संसारी आहे, असे जे तुम्ही म्हणालात, ते अगदी खरे आहे. कारण संपूर्ण जगताचे आदिकारण जी माया ती तुमची गृहिणी आहे. (१०)

त्वत्सन्निकर्षाज्जायन्ते तस्यां ब्रह्मादयः प्रजाः ।
त्वदाश्रया सदा भाति माया या त्रिगुणात्मिका ॥ ११ ॥
हे प्रभो, तुमच्या केवळ सान्निध्यानेच त्या मायेपासून ब्रह्मदेव इत्यादी सर्व प्रजा उत्पन्न होते. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त जी माया आहे, ती तुमच्या आश्रयानेच सदा भासमान होते. (११)

सूतेऽजस्रं शुक्लकृष्णलोहिताः सर्वदा प्रजाः ।
लोकत्रयमहागेहे गृहस्थस्त्वमुदाहृतः ॥ १२ ॥
तसेच स्वगुणांना अनुसरून ती नेहमी शुक्ल, लाल आणि कृष्ण वर्ण असणारी प्रजा निर्माण करीत असते. त्रैलोक्याच्या समूहरूपी मोठ्या घरात तुम्हीच गृहस्थाश्रमी आहात, असे म्हटले जाते. (१२)

त्वं विष्णुर्जानकी लक्ष्मीः शिवस्त्वं जानकी शिवा ।
ब्रह्मा त्वं जानकी वाणी सूर्यस्त्वं जानकी प्रभा ॥ १३ ॥
भवान् शशाङ्‌कः सीता तु रोहिणी शुभलक्षणा ।
शक्रस्त्वमेव पौलोमी सीता स्वाहानलो भवान् ॥१४ ॥
यमस्त्वं कालरूपश्च सीता संयमिनी प्रभो ।
निर्ऋतिस्त्वं जगन्नाथ तामसी जानकी शुभा ॥ १५ ॥
राम त्वमेव वरुणो भार्गवी जानकी शुभा ।
वायुस्त्वं राम सीता तु सदागतिरितीरिता ॥ १६ ॥
कुबेरस्त्वं राम सीता सर्वसंपत्प्रकीर्तिता ।
रुद्राणी जानकी प्रोक्ता रुद्रस्त्वं लोकनाशकृत् ॥१७ ॥
लोके स्त्रीवाचकं यावत्तत्सर्वं जानकी शुभा ।
पुन्नामवाचकं यावत्तत्सर्वं त्वं हि राघव ॥ १८ ॥
तस्माल्लोकत्रये देव युवाभ्यां नास्ति किञ्चन ॥ १९ ॥
तुम्ही भगवान विष्णू आहात आणि जानकी ही लक्ष्मी आहे. तुम्ही शंकर आहात तर जानकी ही पार्वती आहे. तुम्ही ब्रह्मदेव आहात आणि जानकी सरस्वती आहे. तुम्ही सूर्य आहात तर जानकी ही प्रभा आहे. तुम्ही चंद्र आहात तर शुभ लक्षणे असणारी जानकी ही रोहिणी आहे. तुम्ही इंद्र आहात आणि सीता ही पुलोमकन्या शची (इंद्राणी) आहे. तुम्ही अग्नी आहात तर सीता ही स्वाहा आहे. हे प्रभो, कालरूप असा सर्वांचा यम तुम्ही आहात तर सीता ही संयमिनी आहे. हे जगन्नाथा, तुम्ही निर्ऋती आहात तर मंगलस्वरूप असणारी जानकी ही तामसी आहे. हे श्रीरामा, तुम्हीच वरुण आहात आणि शुभ लक्षणांनी संपन्न जानकी ही भृगु-कन्या वारुणी आहे. हे श्रीरामा, तुम्ही वायू आहात तर सीता ही सदागती आहे, असे म्हटले जाते. हे रामा, तुम्ही कुबेर आहात तर सीता ही त्याची सर्व संपत्ती आहे. लोकांचा नाश करणारे रुद्र तुम्ही आहात तर जानकी ही रुद्राणी आहे. हे राघवा, या जगात जे जे काही पुरुषवाचक नाम असलेले आहे ते ते सर्व तुम्ही आहात आणि जे काही स्त्रीवाचक नाम असलेले आहे ते सर्व म्हणजे शुभ लक्षणांनी संपन्न अशी जानकी आहे, यात संशय नाही. म्हणून हे देवा, तिन्ही लोकांत तुम्हा दोघांखेरीज अन्य काहीही नाही. (१३-१९)

त्वदाभासोदिताज्ञानमव्याकृतमितीर्यते ।
तस्मान्महांस्ततः सूत्रं लिङ्‌गं सर्वात्मकं ततः ॥ २०
तुमच्या आभासामुळे उत्पन्न होणा-या अज्ञानाला अव्याकृत असे म्हटले जाते. त्यापासून महत् हे तत्त्व. त्या महत्-तत्त्वापासून सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्या सूत्रात्म्यापासून सर्वात्मक लिंग देह उत्पन्न होतो. (२०)

अहङ्‌कारश्च बुद्धिश्च पञ्चप्राणेन्द्रियाणि च ।
लिङ्‌गमित्युच्यते प्राज्ञैर्जन्ममृत्युसुखादिमत् ॥ २१ ॥
अहंकार, बुद्धी, पाच प्राण, दहा इंद्रिये यांच्या समूहालाच शहाणे लोक जन्म, मरण, सुख, दुःख इत्यादी धर्म असणारे लिंगशरीर असे म्हणतात. (२१)

स एव जीवसंज्ञश्च लोके भाति जगन्मयः ।
अवाच्यानाद्यविद्यैव कारणोपाधिरुच्यते ॥ २२ ॥
लिंग देहाचा अभिमानी या जगात जगव्यापक जीव या नावाने विख्यात आहे. अनिर्वचनीय आणि अनादी अशी अविद्या ही या जीवाची कारण उपाधी आहे, असे सांगितले जाते. (२२)

स्थूलं सूक्ष्मं कारणाख्यमुपाधित्रितयं चितेः ।
एतैर्विशिष्टो जीवः स्याद्वियुक्तः परमेश्वरः ॥ २३ ॥
शूद्ध चैतन्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तीन देहांच्या उपाधी आहेत. जीव या उपाधींनी युक्त आहे. या उपाधींनी रहित झाल्यावर तोच जीव परमेश्वर आहे, असे म्हटले जाते. (२३)

जाग्रत्स्वप्नसुषुप्ताख्या संसृतिर्या प्रवर्तते ।
तस्या विलक्षणः साक्षी चिन्मात्रस्त्वं रघूत्तम ॥ २४ ॥
हे रघुश्रेष्ठा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति अशी जी तीन प्रकारची सृष्टी आहे, तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णपणे विलक्षण आहात. केवळ चैतन्यरूप असे तुम्ही तिचे साक्षी आहात. (२४)

त्वत्त एव जगज्जातं त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् ।
त्वय्येव लीयते कृत्स्नं तस्मात्त्वं सर्वकारणम् ॥ २५ ॥
हे संपूर्ण जगत तुमच्यापासूनच निर्माण झाले आहे, ते तुमच्या ठिकाणी स्थित आहे आणि ते संपूर्णपणे तुमच्याच ठिकाणी लीन होऊन जाते. म्हणून तुम्हीच सर्वांचे कारण आहात. (२५)

रज्जावहिमिवात्मानं जीवं ज्ञात्वा भयं भवेत् ।
परात्माहं इति ज्ञात्वा भयदुःखैर्विमुच्यते ॥ २६ ॥
रज्जूच्या ठिकाणी दिसणार्‍या सापाप्रमाणे स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्याला भय वाटते. परंतु 'मीच परमात्मा आहे,' असे जेव्हा माणूस जाणून घेतो तेव्हा संपूर्ण भय आणि दुःख यांतून मुक्त होऊन जातो. (२६)

चिन्मात्रज्योतिषा सर्वाः सर्वदेहेषु बुद्धयः ।
त्वया यस्मात्प्रकाश्यन्ते सर्वस्यात्मा ततो भवान् ॥२७ ॥
चिन्मात्र ज्योतिःस्वरूपाने तुम्ही सर्व देहांत राहून सर्व देहांतील सर्व बुद्धींना प्रकाशित करता, म्हणून तुम्हीच सर्वांचे आत्मा आहात. (२७)

अज्ञानान् न्यस्यते सर्वं त्वयि रज्जो भुजङ्‌गवत् ।
त्वज्ज्ञानाल्लीयते सर्वं तस्माज्ज्ञानं सदाभ्यसेत् ॥ २८ ॥
रज्जूवर भासणार्‍या सर्पाप्रमाणे, अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जगाची कल्पना केली जाते. तुमचे ज्ञान झाल्यावर सर्व काही लीन होऊन जाते. म्हणून मनुष्याने नेहमी ज्ञान-प्राप्तीचा अभ्यास करावयास हवा. (२८)

त्वत्पादभक्तियुक्तानां विज्ञानं भवति क्रमात् ।
तस्मात्त्वद्‌भक्तियुक्ता ये मुक्तिभाजस्त एव हि ॥ २९ ॥
तुमच्या चरणकमळांवरील भक्तीने युक्त असणार्‍या पुरुषांनाच क्रमाने ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून जे पुरुष तुमच्यावरील भक्तीने युक्त आहेत, तेच मुक्तीला पात्र आहेत. (२९)

अहं त्वद्‌भक्तभक्तानां तद्‌भक्तानां च किङ्‌करः ।
अतो मामनुगृह्णीष्व मोहयस्व न मां प्रभो ॥ ३० ॥
हे प्रभो, जे तुमच्या भक्तांचे भक्त आणि त्यांचेही भक्त आहेत, त्यांचा मी दास आहे. म्हणून मला मोहित न करता तुम्ही माझ्यावर अनुग्रह करा. (३०)

त्वन्नाभिकमलोत्पन्नो ब्रह्मा मे जनकः प्रभो ।
अतस्तवाहं पौत्रोऽस्मि भक्तं मां पाहि राघव ॥ ३१ ॥
हे प्रभो, तुमच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव हा माझा पिता आहे. म्हणून मी तुमचा नातू आहे. हे राघवा, तुमचा भक्त असणार्‍या माझे तुम्ही रक्षण करा." (३१)

इत्युक्त्वा बहुशो नत्वा स्वानन्दाश्रु परिप्लुतः ।
उवाच वचनं राम ब्रह्मणा नोदितोऽस्म्यहम् ॥ ३२ ॥
अशा प्रकारे बोलून आणि वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूंनी भरून येऊन नारदांनी पुढे म्हटले, "हे रामा, ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने मी तुमच्याकडे आलो आहे. (३२)

रावणस्य वधार्थाय जातोऽसि रघुसत्तम ।
इदानीं राज्यरक्षार्थं पिता त्वामभिषेक्ष्यति ॥ ३३ ॥
हे रघुश्रेष्ठा, रावणाचा वध करण्यासाठी तुमचा अ वतार जाला आहे. दशरथ राज्याच्या रक्षणासाठी तुमच्यावर राज्याभिषेक करणार आहेत. (३३)

यदि राज्याभिसंसक्तो रावणं न हनिष्यसि ।
प्रतिज्ञा ते कृता राम भूभारहरणाय वै ॥ ३४ ॥
हे श्रीरामा, जर तुम्ही राज्यामध्ये आसक्त होऊन, रावणाचा वध केला नाही तर भूमीचा भार हरण करण्याची जी प्रतिज्ञा तुम्ही केली होती, तिचे काय ? (३४)

तत्सत्यं कुरु राजेन्द्र सत्यसंधस्त्वमेव हि ।
श्रुत्वैतद्‍गदितं रामो नारदं प्राह सस्मितम् ॥ ३५ ॥
ती खरी करा. कारण हे राजेंद्रा, तुम्ही सत्यप्रतिज्ञ आहात." नारदांचे हे भाषण ऐकल्यावर श्रीरामचंद्र स्मित करून नारदांना म्हणाले. (३५)

शृणु नारद मे किञ्चिद्विद्यतेऽविदितं क्वचित् ।
प्रतिज्ञातं च यत्पूर्वं करिष्ये तन्न संशयः ॥ ३६ ॥
"नारदमुनी, ऐका. अशी एखादी गोष्ट आहे का की जी मला ज्ञात नाही ? पूर्वी मी जी प्रतिज्ञा केली होती ती मी पूर्ण करीन, यात कोणताही संशय नको. (३६)

किन्तु कालानुरोधेन तत्तत्प्रारब्धसंक्षयात् ।
हरिष्ये सर्वभूभारं क्रमेणासुरमण्डलम् ॥ ३७ ॥
परंतु कालक्रमाने ज्यांचे प्रारब्ध क्षीण होईल, त्या सर्व असुरांना मारून पृथ्वीचा सर्व भार मी हरण करीन. (३७)

रावणस्य विनाशार्थं श्वो गन्ता दण्डकाननम् ।
चतुर्दश समास्तत्र ह्युषित्वा मुनिवेषधृक् ॥ ३८ ॥
रावणाचा वध करण्यासाठी मी उद्याच दंडकारण्यात जाईन आणि तेथे मुनीचा वेष धारण करून चौदा वर्षे राहीन. (३८)

सीतामिषेण तं दुष्टं सकुलं नाशयाम्यहम् ।
एवं रामे प्रतिज्ञाते नारदः प्रमुमोद ह ॥ ३९ ॥
आणि मग सीतेला निमित्त करून मी त्या दुष्टांचा त्यांच्या कुळासह नाश करीन." श्रीरामचंद्रांनी अशी प्रतिज्ञा केल्यावर नारदांना अतिशय आनंद झाला. (३९)

प्रदक्षिणत्रयं कृवा दण्डवत्प्रणिपत्य तम् ।
अनुज्ञातश्च रामेण ययौ देवगतिं मुनिः ॥ ४० ॥
त्यानंतर श्रीरामांना तीन प्रदक्षिणा घालून, दण्डवत प्रणाम करून व श्रीरामांची आज्ञा घेऊन नारद मुनी आकाश मार्गाने देवलोकात निघून गेले. (४०)

संवादं पठति शृणोति संस्मरेद्वा
     यो नित्यं मुनिवररामयोः सभक्त्या ।
संप्राप्नोत्यमरसुदुर्लभं विमोक्षं
     कैवल्यं विरतिपुरःसरं क्रमेण ॥ ४१ ॥
मुनिश्रेष्ठ नारद आणि रामचंद्र यांचा हा संवाद जो कोणी माणूस भक्तिपूर्वक वाचेल, ऐके किंवा स्मरण करील, तो वैराग्यपूर्वक देवांनाही अतिशय दुर्लभ असणारे कैवल्यरूपी मोक्षपद क्रमाक्रमाने प्राप्त करून घेईल. (४१)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
अयोध्याकाण्डातील पहिला सर्ग समाप्त ॥ १ ॥


GO TOP