|
| श्रीरामः सीतां चित्रकूटशोभामदर्शयत् - 
 | श्रीरामांचे सीतेला चित्रकूटची शोभा दाखविणे - | 
| दीर्घकालोषितस्तस्मिन् गिरौ गिरिवनप्रियः । वैदेह्याः प्रियमाकांक्षन् स्वं च चित्तं विलोभयन् ॥ १ ॥
 
 अथ दाशरथिश्चित्रं चित्रकूटमदर्शयत् ।
 भार्याममरसङ्काशः शचीमिव पुरंदरः ॥ २ ॥
 
 | गिरीवर चित्रकूट, दाशरथि रामांना फारच प्रिय वाटत होता. ते त्या पर्वतावर बरेच दिवसापासून राहात होते. एके दिवशी अमरतुल्य श्रीरामांनी वैदेही सीतेचे प्रिय करण्याच्या इच्छेने तसेच आपलेही मन रमविण्यासाठी आपल्या भार्येला विचित्र चित्रकूटाच्या शोभेचे दर्शन करविण्याचे ठरविले. जणु देवराज इंद्रच आपली पत्नी शची हिला पर्वतीय सुषमेचे दर्शन करवित आहेत. ॥ १-२ ॥ | 
| न राज्यभ्रंशनं भद्रे न सुहृद्भिर्विनाभवः । मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयमिमं गिरिम् ॥ ३ ॥
 
 | (ते म्हणाले) भद्रे ! जरी मी राज्यापासून भ्रष्ट झालो आहे; तसेच मला आपल्या सुहृदांपासून विलग राहावे लागत आहे, तथापि जेव्हा मी या रमणीय पर्वताकडे पाहतो तेव्हा माझे सारे दुःख दूर होऊन जाते. राज्य न मिळणे आणि सुहृदांचा वियोग होणे ही माझ्या मनाला व्यथित करीत नाहीत. ॥ ३ ॥ | 
| पश्येममचलं भद्रे नानाद्विजगणायुतम् । शिखरैः खमिवोद्विद्धैर्धातुमद्भिर्विभूषितम् ॥ ४ ॥
 
 | ’कल्याणी ! या पर्वतावर दृष्टिपात तर कर. नाना प्रकारचे असंख्य पक्षी येथे कलरव करीत आहेत. नाना प्रकारच्या धातुंनी मंडित याची गगनचुंबी शिखरे जणु आकाशाचा वेध घेत आहेत. या शिखरांनी विभूषित झालेला हा चित्रकूट कसा शोभून दिसत आहे. ॥ ४ ॥ | 
| केचिद् रजतसङ्काशाः केचित् क्षतजसन्निभाः । पीतमाञ्जिष्ठवर्णाश्च केचिन्मणिवरप्रभाः ॥ ५ ॥
 
 पुष्पार्ककेतकाभाश्च केचिज्ज्योतीरसप्रभाः ।
 विराजन्तेऽचलेन्द्रस्य देशा धातुविभूषिताः ॥ ६ ॥
 
 | ’धातूंनी अलंकृत अचलराज चित्रकूट प्रदेश किती सुंदर वाटत आहे. त्यापैकी काही तर चांदीप्रमाणे चमकत आहेत. काही रक्तासारख्या लाल आभेचा विस्तार करीत आहेत. काही प्रदेशांचे रंग पिवळे आणि मंजिष्ठ वर्णांचे आहेत. काही श्रेष्ठ मण्यांच्या प्रमाणे उद्भासीत होत आहेत. काही पुष्कराजाप्रमाणे, काही स्फैक सदृश आणि काही केवड्याच्या फुलाप्रमाणे कांती असणारे आहेत तर काही प्रदेश नक्षत्रांप्रमाणे अथवा काही पार्याप्रमाणे प्रकाशित होत आहेत. ॥ ५-६ ॥ | 
| नानामृगगणैर्द्वीपितरक्ष्वृक्षगणैर्वृतः । अदुष्टैर्भात्ययं शैलो बहुपक्षिसमाकुलः ॥ ७ ॥
 
 | ’हा पर्वत बहुसंख्य पक्ष्यांनी व्याप्त आहे आणि नाना प्रकारच्या मृगांनी, मोठमोठ्या व्याघ्रांनी, चित्ते आणि अस्वलांनी भरलेला आहे. ते व्याघ्र आदि हिंस्र प्राणी आपल्या दुष्टभावाचा परित्याग करून येथे राहात आहेत आणि या पर्वताची शोभा वाढवीत आहेत. ॥ ७ ॥ | 
| आम्रजंब्वसनैर्लोध्रैः प्रियालैः पनसैर्धवैः । अङ्कोलैर्भव्यतिनिशैर्बिल्वतिन्दुकवेणुभिः ॥ ८ ॥
 
 काश्मर्यारिष्टवरणैर्मधूकैस्तिलकैरपि ।
 बदर्यामलकैर्नीपैर्वेत्रधन्वनबीजकैः ॥ ९ ॥
 
 पुष्पवद्भिः फलोपेतैश्छायावद्भिर्मनोरमैः ।
 एवमादिभिराकीर्णः श्रियं पुष्यत्ययं गिरिः ॥ १० ॥
 
 | ’आंबा, जांभूळ, असन, लोध, प्रियाल, फणस, धव, अकोल, भव्य, तिनिश, बेल, तिंदुक वेणु, काश्मिरी (मधुपर्णिका), अरिष्ट (कडुनिंब) वरण, महुआ, तिलक, बोरी, आवळा, कदंब, वेत, धन्वन, बीजक (डाळिंब) आदि घनदाट छाया असणार्या वृक्षांनी आणि फुला-फळांनी लगडलेला असल्याने मनोरम प्रतीत होत असून त्यांना व्याप्त झालेला हा पर्वत अनुपम शोभेचे पोषण आणि विस्तार करून राहिला आहे. ॥ ८-१० ॥ | 
| शैलप्रस्थेषु रम्येषु पश्येमान् कामहर्षणान् । किन्नरान् द्वंद्वशो भद्रे रममाणान् मनस्विनः ॥ ११ ॥
 
 | ’या रमणीय शैल शिखरांवरील त्या प्रदेशांना पहा, जे प्रेम मिलनाच्या भावनांचे उद्दीपन करून आंतरिक हर्ष वाढविणारे आहेत. तेथे मनस्वी किन्नर जोडीने एकत्र येऊन हिंडत आहेत. ॥ ११ ॥ | 
| शाखावसक्तान् खड्गांश्च प्रवराण्यम्बराणि च । पश्य विद्याधरस्त्रीणां क्रीडोद्देशान् मनोरमान् ॥ १२ ॥
 
 | ’या किन्नरांची खड्गे झाडांच्या फांद्यावर लटकत राहिली आहेत. इकडे विद्याधरांच्या स्त्रिया मनोरम क्रीडास्थळांकडे तसेच वृक्षांच्या शाखांवर ठेवलेल्या त्यांच्या सुंदर वस्त्रांकडेही पहा. ॥ १२ ॥ | 
| जलप्रपातैरुद्भेदैर्निष्पन्दैश्च क्वचित् क्वचित् । स्रवद्भिर्भात्ययं शैलः स्रवन्मद इव द्विपः ॥ १३ ॥
 
 | ’याच्यावर काही उंचीवरून निर्झर खाली पडत आहेत, काही ठिकाणी जमिनीतून स्त्रोत निघालेले आहेत आणि कोठे कोठे छोटे छोटे स्त्रोत प्रवाहित होत आहेत. या सर्वांच्या द्वारा हा पर्वत मदाची धारा वाहणार्या हत्तीच्या प्रमाणे शोभत आहे. ॥ १३ ॥ | 
| गुहासमीरणो गन्धान् नानापुष्पभवान् बहून् । घ्राणतर्पणमभ्येत्य कं नरं न प्रहर्षयेत् ॥ १४ ॥
 
 | ’गुफांतून निघालेला वायु नाना प्रकारच्या पुष्पांचा प्रचुर गंध घेऊन नासिकेला तृप्त करीत कुणा पुरुषाजवळ येऊन त्याचा हर्ष वाढविणार नाही ? ॥ १४ ॥ | 
| यदीह शरदोऽनेकास्त्वया सार्धमनिन्दिते । लक्ष्मणेन च वत्स्यामि न मां शोकः प्रधर्षति ॥ १५ ॥
 
 | ’सती-सध्वी सीते ! जर तुझ्याबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर मी येथे अनेक वर्षेपर्यंत राहीन तरीही नगर त्यागाचा शोक मला पीडित करणार नाही. ॥ १५ ॥ | 
| बहुपुष्पफले रम्ये नानाद्विजगणायुते । विचित्रशिखरे ह्यस्मिन् रतवानस्मि भामिनि ॥ १६ ॥
 
 | ’भामिनी ! बर्याचशा फुलांनी आणि फळांनी युक्त तसेच नाना प्रकारच्या पक्ष्यांनी सेवित या विचित्र शिखरे असलेल्या रमणीय पर्वतावर माझं मन खूप रमत आहे. ॥ १६ ॥ | 
| अनेन वनवासेन मम प्राप्तं फलद्वयम् । पितुश्चानृण्यता धर्मे भरतस्य प्रियं तथा ॥ १७ ॥
 
 | ’या वनवासाने मला दोन फळे प्राप्त झाली आहेत. दोन लाभ झाले आहेत. एक तर धर्मानुसार पित्याची आज्ञापालनरूप ऋण चुकते झाले आणि दुसरे बंधु भरताचे प्रिय झाले. ॥ १७ ॥ | 
| वैदेहि रमसे कच्चिच्चित्रकूटे मया सह । पश्यन्ती विविधान् भावान् मनोवाक्कायसम्मतान् ॥ १८ ॥
 
 | ’चित्रकूट पर्वतावर माझ्याबरोबर मन, वाणी आणि शरीरास प्रिय वाटणारे नाना पदार्थ पाहून तुला आनंद प्राप्त होत आहे ना ? ॥ १८ ॥ | 
| इदमेवामृतं प्राहू राज्ञि राजर्षयः परे । वनवासं भवार्थाय प्रेत्य मे प्रपितामहाः ॥ १९ ॥
 
 | ’माझे प्रपितामह मनु आदि उत्कृष्ट राजर्षिंनी नियमपूर्वक केल्या गेलेल्या या वनवासालाच अमृत म्हटले आहे. या योगे शरीरत्यागाच्या नंतर परम कल्याणाची प्राप्ती होत असते. ॥ १९ ॥ | 
| शिलाः शैलस्य शोभन्ते विशालाः शतशोऽभितः । बहुला बहुलैर्वर्णैर्नीलपीतसितारुणैः ॥ २० ॥
 
 | ’चोहोबाजूस या पर्वताच्या शेकडो विशाल शिला शोभून दिसत आहेत; ज्या निळ्या, पिवळ्या, पांढर्या, लाल आदि विविध रंगामुळे अनेक प्रकारच्या दिसत आहेत. ॥ २० ॥ | 
| निशि भान्त्यचलेन्द्रस्य हुताशनशिखा इव । ओषध्यः स्वप्रभालक्ष्म्या भ्राजमानाः सहस्रशः ॥ २१ ॥
 
 | ’रात्री या पर्वतावर लावलेल्या हजारो औषधी आपल्या प्रभारूपी संपत्तीने प्रकाशित होऊन अग्निशिखेप्रमाणे उद्भासित होत आहेत. ॥ २१ ॥ | 
| केचित् क्षयनिभा देशाः केचिदुद्यानसन्निभाः । केचिदेकशिला भान्ति पर्वतस्यास्य भामिनि ॥ २२ ॥
 
 | या पर्वतावरील काही स्थाने घराप्रमाणे दिसून येत असतात (कारण ती वृक्षांच्या घनदाट छायेने आच्छादित आहेत) आणि काही स्थाने चंपा, मालती आदि फुलांच्या विपुलतेमुळे उद्यानाप्रमाणे सुशोभित होत आहेत. तसेच कित्येक स्थाने अशी आहेत जेथे खूप अंतरापर्यंत एकच शिला पसरलेली आहे. या सर्वांचीच फार शोभा दिसत असते. ॥ २२ ॥ | 
| भित्त्वेव वसुधा भाति चित्रकूटः समुत्थितः । चित्रकूटस्य कूटोऽयं दृश्यते सर्वतः शुभः ॥ २३ ॥
 
 | असे वाटते आहे की हा चित्रकूट पर्वत पृथ्वीला फाडून वर आला आहे. चित्रकूटाचे हे शिखर सर्व बाजूनी सुंदर दिसून येत आहे. ॥ २३ ॥ | 
| कुष्ठस्थगरपुन्नागभूर्जपत्रोत्तरच्छदान् । कामिनां स्वास्तरान् पश्य कुशेशयदलायुतान् ॥ २४ ॥
 
 | प्रिये ! पहा, हे विलासी लोकांचे अंथरूण आहे; ज्यांच्यावर उत्पल, पुत्रजीवक, पुन्नाग आणि भोजपत्र यांची पानेच चादरीचे काम करतात आणि त्याच्यावर सर्व बाजूनी कमळांची पाने पसरलेली आहेत. ॥ २४ ॥ | 
| मृदिताश्चापविद्धाश्च दृश्यन्ते कमलस्रजः । कामिभिर्वनिते पश्य फलानि विविधानि च ॥ २५ ॥
 
 | प्रियतमे ! ह्या कमळांच्या माळा दिसून येत आहेत, ज्या विलासी लोकांच्या द्वारा चुरगळून फेकल्या गेला आहेत. तिकडे पहा, वृक्षांमध्ये नाना प्रकारची फळे लागलेली आहेत. ॥ २५ ॥ | 
| वस्वौकसारां नलिनीमतीत्यैवोत्तरान् कुरून् । पर्वतश्चित्रकूटोऽसौ बहुमूलफलोदकः ॥ २६ ॥
 
 | बर्याचशा फल, मूल आणि जलाने संपन्न हा चित्रकूट पर्वत कुबेरनगरी वस्वौकसारा (अलका), इंद्रपुरी नलिनी (अमरावती अथवा नलिनी नामाने प्रसिद्ध कुबेराची सौगंधिक कमलांनी युक्त पुष्करिणी) तसेच उत्तर कुरुलाही आपल्या शोभेने तिरस्कृत करीत आहे. ॥ २६ ॥ | 
| इमं तु कालं वनिते विजह्रिवां- स्त्वया च सीते सह लक्ष्मणेन ।
 रतिं प्रपत्स्ये कुलधर्मवर्धिनीं
 सतां पथि स्वैर्नियमैः परैः स्थितः ॥ २७ ॥
 
 | सीते ! आपल्या उत्तम नियमांचे पालन करीत सन्मार्गावर स्थित राहून जर तुझ्या बरोबर आणि लक्ष्मणबरोबर हा चौदा वर्षांचा काळ मी आनंदाने व्यतीत करीन तर मला ते सुख प्राप्त होईल जे कुलधर्माला वाढविणारे आहे. ॥ २७ ॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुर्नवतितमः सर्गः ॥ ९४ ॥ 
 | या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा चौर्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९४ ॥ | 
|