॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ सुन्दरकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



जानकीची भेट, अशोकवनाचा विध्यंस आणि ब्रह्मपाशात बंधन


श्रीमहादेव उवाच
उद्‌बन्धनेन वा मोक्ष्ये शरीरं राघवं विना ।
जीवितेन फलं किं स्यात् मम रक्षोऽधिमध्यतः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, रडताना सीतेने विचार केला की 'आता गळफास लावून मी शरीराचा त्याग करते. राक्षसींच्या गराड्यात रामाविना माझ्या जगण्याचा काय उपयोग आहे बरे ? (१)

दीर्घा वेणी ममात्यर्थं उद्‌बन्धाय भविष्यति ।
एवं निश्चितबुद्धिं तां मरणायाथ जानकीम् ॥ २ ॥
विलोक्य हनुमान्-किञ्चिद्विचार्यै तदभाषत ।
शनैः शनैः सूक्ष्मरूपो जानक्याः श्रोत्रगं वचः ॥ ३ ॥
गळफास लावण्यास ही माझी लांब वेणी मला अतिशय उपयोगी पडेल.' अ शा प्रकारे मरण्याचा निश्चय केलेल्या जानकीला पाहून, हनुमानाने थोडा विचार केला आणि सूक्ष्मरूपाने त्याने जानकीच्या कानापर्यंत पोचेल अशा मंद आवाजात हळू हळू बोलण्यास प्रारंभ के ला. (२-३)

इक्ष्वाकुवंशसम्भूतो राजा दशरथो महान् ।
अयोध्याधिपतिस्तस्य चत्वारो लोकविश्रुताः ॥ ४ ॥
"इक्ष्वाकूच्या वंशात उत्पन्न झालेले, अयोध्या नगरीचे अधिपती, राजा दशरथ हे महान प्रतापी होते. त्यांचे चार पुत्र जगात विख्यात आहेत. (४)

पुत्रा देवसमाः सर्वे लक्षणैरुपलक्षिताः ।
रामस्यलक्ष्मणश्चैव भरतश्चैव शत्रुहा ॥ ५ ॥
राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे ते सर्व पुत्र शुभ लक्षणांनी युक्त आणि देवतुल्य आहेत. (५)

ज्येष्ठो रामः पितुर्वाक्यात् ‍दण्डकारणमागतः ।
लक्ष्मणेन सह भ्राता सीतया भार्यया सह ॥ ६ ॥
त्यांतील ज्येष्ठ पुत्र श्रीराम हे लक्ष्मण या भावासह आणि पत्नी सीता हिच्यासह पित्याच्या आज्ञेने दंडकारण्यात आले. (६)

उवास गौतमीतीरे पञ्चवट्यां महामनाः ।
तत्र नीता महाभागा सीता जनकनन्दिनी ॥ ७ ॥
रहिते रामचन्द्रेण रावणेन दुरात्मनाः ।
ततो रामोऽतिदुःखार्तो मार्गमाणोऽथ जानकीम् ॥ ८ ॥
जटायुषं पक्षिराजं अपश्यत्पतितं भुवि ।
तस्मै दत्त्वा दिवं शीघ्रं ऋष्यमूकं उपागमत् ॥ ९ ॥
सुग्रीवेण कृता मैत्री रामस्य विदितात्मनः ।
तद्‌भार्याहारिणं हत्वा वालिनं रघुनन्दनः ॥ १० ॥
राज्येऽभिषिच्य सुग्रीवं मित्रकार्यं चकार सः ।
सुग्रीवस्तु समानाप्य वानरान् वानरप्रभुः ॥ ११ ॥
प्रेषयामास परितो वानरान् परिमार्गणे ।
सीतायास्तत्र चैकोऽहं सुग्रीवसचिवो हरिः ॥ १२ ॥
थोर मनाचे श्रीराम गौतमी नदीच्या तीरावरील पंचवटीमध्ये राहात होते. तेथे असताना, श्रीरामचंद्र जेव्हां आश्रमांत नव्हते, तेव्हां दुरात्म्या रावणाने महाभागा जनककन्या सीतेला पळवून नेले. त्यानंतर अतिशय दुःखविव्हल होऊन, जानकीचा शोध करणाऱ्या श्री रामांना जमिनीवर मरणोन्मुख होऊन पडलेला पक्षिराज जटायू दिसला. त्या जटायूला स्वर्गात पोचवून, श्रीराम त्वरित ऋष्यमूक पर्वताजवळ आले. आत्मरूप जाणणाऱ्या श्रीरामांना स्वतःची परिस्थिती सांगून सुग्रीवाने त्यांच्याशी मैत्री केली. सुग्रीवाच्या भार्येचे हरण करणाऱ्या वालीचा वध करून व सुग्रीवाला राज्याभिषेक करून, रघुनंदन श्रीरामांनी आपल्या मित्राचे कार्य केले. मग वानरराज सुग्रीवाने अनेक वानरांना एकत्र बोलावून सीतेच्या शोधासाठी त्यांना सगळीकडे पाठविले. त्या वानरांपैकी मी एक वानर आहे आणि मी सुग्रीवाचा मंत्री आहे. (७-१२)

सम्पातिवचनाच्छीघ्रं उल्लङ्‌घ्य शतयोजनम् ।
समुद्रं नगरीं लङ्‌कां विचिन्वन् जानकीं शुभाम् ॥ १३ ॥
शनैः अशोकवनिकां विचिन्वन् शिंशपातरुम् ।
अद्राक्षं जानकीमत्र शोचंतीं दुःखसम्प्लुताम् ॥ १४ ॥
रामस्य महिषीं देवीं कृतकृत्योऽहमागतः ।
इत्युक्‍त्वोपररामाथ मारुतिर्बुद्धिमत्तरः ॥ १५ ॥
त्यानंतर संपातीच्या कथनानुसार शतयोजने विस्तीर्ण असणारा समुद्र सत्वर ओलांडून लंकापुरीत येऊन, मी शुभलक्षणी जानकीचा शोध करू लागलो. नंतर हळूहळू अ शोकवनात शोध घेताना मला एक अशोकाचा वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाखाली दुःखात बुडालेली, शोक करणारी, श्रीरामांची पट्टराणी देवी जानकी मला दिसली. तिला पाहिल्यावर मी आता कृतकृत्य होऊन गेलो आहे." असे बोलून तो अतिशय बुद्धिमान मारुती गप्प बसला. (१३-१५)

सीता क्रमेण तत्सर्वं श्रुत्वा विस्मयमाययौ ।
किमिदं मे श्रुतं व्योम्नि वायुना समुदीरितम् ॥ १६ ॥
स्वप्नो वा मे मनोभ्रान्तिः यदि वा सत्यमेव तत् ।
निद्रा मे नास्ति दुःखेन जानाम्येतत्कुतो भ्रमः ॥ १७ ॥
क्रमाने ते सर्व ऐकल्यावर सीतेला विस्मय वाटला. 'मी हे काय ऐकले ? हे वचन आकाशात वायूने उच्चारले काय ? की हे स्वप्न आहे ? की माझ्या मनाला भ्रम झाला आहे ? की हे सर्व खरेच आहे ? दुःखामुळे मला झोप येत नाही; तेव्हा हे स्वप्न असणार नाही आणि मला हे सर्व नीट कळले आहे; मग हा भ्रम तरी कसा असेल बरे ? (१६-१७)

येन मे कर्णपीयुषं वचनं समुदीरितम् ।
स दृश्यतां महाभागः प्रियवादी ममाग्रतः ॥ १८ ॥
माझ्या कानांना अमृताप्रमाणे वाटणारे हे वचन ज्या कुणी उच्चारले आहे, त्या प्रिय बोलणाऱ्या महाभागाने माझ्यापुढे येऊन मला दर्शन द्यावे.' (१८)

श्रुत्वा तज्जनकीवाक्यं हनुमान् पत्रखण्डतः ।
अवतीर्य शनैः सीता पुरतः समवस्थितः ॥ १९ ॥
ते जानकीचे वचन ऐकल्यावर, हनुमान पानांच्या समूहातून सावकाश खाली उतरून सीतेच्या पुढे उभा राहिला. (१९)

कलविङ्‌क-प्रमाणाङ्‌गो रक्तास्य पीतवानरः ।
ननाम शनकैः सीतां प्राञ्जलीः पुरतः स्थितः ॥ २० ॥
चिमणीच्या आकाराचे शरीर असणाऱ्या, लाल तोंड असणाऱ्या पीतवर्णी वानराने सीतेपुढे उभा राहून हात जोडून तिला प्रणाम केला. (२०)

दृष्ट्वा तं जानकी भीता रावणोऽयमुपागतः ।
मां मोहयितुमायातो मायया वानराकृतिः ॥ २१ ॥
इत्येवं चिन्तयित्वा सा तूष्णिमासीदधोमुखी ।
पुनरप्याह तां सीतां देवि यत्त्वं विशङ्‌कसे ॥ २२ ॥
नाहं तथाविधो मातः त्यज शङ्‌कां मयि स्थिताम् ।
दासोऽहं कोसलेन्द्रस्य रामस्य परमात्मनः ॥ २३ ॥
सचिवोऽहं हरिन्द्रस्य सुग्रीवस्य शुभप्रदे ।
वायोः पुत्रोऽहमखिल प्राणभूतस्य शोभने ॥ २४ ॥
त्याला पाहून जानकी भ्याली. 'मला फसविण्यास हा रावणच मायेने वानराचा आकार धारण करून माझ्यापुढे आला आहे' असा विचार करून व खाली तोंड करून ती गप्पच बसून राहिली. तेव्हा हनुमान पुन्हा म्हणाला, "हे देवी, तुला जशी शंका येत आहे तसा मी नाही. हे माते, माझ्याविषयी तुझ्या मनात जी शंका आली आहे, ती काढून टाक. कोसलाधिपती परमात्म्या श्रीरामांचा मी दास आहे. आणि हे कल्याणकारी देवी, मी वानरराज सुग्रीवाचा मंत्री आहे. तसेच हे शोभने, सर्वांना प्राणभूत असणाऱ्या वायूचा मी पुत्र आहे." (२१-२४)

तच्छ्रुत्वा जानकी प्राह हनूमन्तं कृताञ्जलिम् ।
वानराणां मनुष्याणां सङ्‌गतिर्घटते कथम् ॥ २५ ॥
यथा त्वं रामचंद्रस्य दासोऽहमिति भाषसे ।
तामाह मारुतिः प्रीतो जानकीं पुरतः स्थितः ॥ २६ ॥
ते ऐकल्यावर, हात जोडून आपल्यापुढे उभ्या असणाऱ्या हनुमानाला जानकी म्हणाली, "मी रामचंद्रांचा दास आहे, असे तू सांगतोस, तर वानर आणि मनुष्य यांची मैत्री कशी काय घडून येईल ?" तेव्हा तिच्यापुढे उभा असणारा मारुती आनंदाने तिला म्हणाला. (२५-२६)

ऋष्यमूकमगात् ‍रामः शबर्या नोदितः सुधीः ।
सुग्रीवो ऋष्यमूकस्थो दृष्टवान् रामलक्ष्मणौ ॥ २७ ॥
" शबरीने सांगितल्यावरून अतिशय बुद्धिमान श्रीराम हे ऋष्यमूक पर्वताजवळ आले. ऋष्यमूक पर्वतावर राहणाऱ्या सुग्रीवाने श्रीराम व लक्ष्मणांना (दुरून जाताना) पाहिले. (२७)

भीतो मां प्रेषयामास ज्ञातुं रामस्य हृद्‍गतम् ।
ब्रह्मचारिवपुर्धृत्वा गतोऽहं रामसन्निधिम् ॥ २८ ॥
त्यांना पाहून भ्यालेल्या सुग्रीवाने श्रीरामांचे हृदगत जाणून घेण्यासाठी मला पाठविले. तेव्हा ब्रह्मचारी बटूचे रूप धारण करून मी श्रीरामांजवळ गेलो. (२८)

ज्ञात्वा रामस्य सद्‌भावं स्कन्धोपरि निधाय तौ ।
नीत्वा सुग्रीवसामीप्यं सख्यं चाकारवं तयोः ॥ २९ ॥
श्रीरामांचा शुद्ध भाव पाहिल्यावर, त्या दोघांना माझ्या खांद्यावर बसवून आणि सुग्रीवाजवळ नेऊन, मी त्या दोघांचे सख्य घडवून आणले. (२९)

सुग्रीवस्य हृता भार्या वालिनो तं रघुत्तमः ।
जघानैकेन बाणेन ततो राज्येऽभ्यषेचयत् ॥ ३० ॥
सुग्रीवं वानराणां स प्रेषयामास वानरान् ।
दिग्भ्यो महाबलान्वीरान् भवत्याः परिमार्गणे ॥ ३१ ॥
सुग्रीवाची बायको वालीने हरण केली होती. त्याला रामांनी एका बाणाने ठार केले. मग वानरांच्या राजपदावर रामांनी सुग्रीवाचा अभिषेक केला. त्यानंतर तुझा शोध घेण्यासाठी त्याने महाबली वीर वानरांना दाही दिशांना पाठविले. (३०-३१)

गच्छन्तं राघवो दृष्ट्वा मां अभाषत सादरम् ॥ ३२ ॥
त्वयि कार्यमशेषं मे स्थितं मारुतनन्दन ।
ब्रूहि मे कुशलं सर्वं सीतायै लक्ष्मणस्य च ॥ ३३ ॥
त्या वेळी शोधासाठी निघालेल्या मला पाहून राघव आदरपूर्वक मला म्हणाले, "हे पवनपुत्रा, माझे सर्व कार्य तुझ्यावर अवलंबून आहे. तू माझे आणि लक्ष्मणाचे सर्व कुशल सीतेला सांग. (३२-३३)

अङ्‌गुलीयकमेतन्मे परिज्ञानार्थमुत्तमम् ।
सीतायै दीयतां साधु मन्नामाक्षर मुद्रितम् ॥ ३४ ॥
तसेच सीतेला ओळख पटावी म्हणून, माझ्या नावाची अक्षरे कोरलेली ही माझी सुंदर अंगठी तू सीतेला काळजीपूर्वक दे." (३४)

इत्युक्‍त्वा प्रददौ मह्यं कराग्राद् अङ्‌गुलीयकम् ।
प्रयत्‍नेन मयानीतं देवि पश्याङ्‌गुलीयकम् ॥ ३५ ॥
असे बोलून आपल्या बोटातून अंगठी उतरवून ती त्यांनी मला दिली. हे देवी, ती अंगठी मी प्रयत्नपूर्वक आणली आहे. ती तू बघ." (३५)

इत्युक्‍त्वा प्रददौ देव्यै मुद्रिकां मारुतात्मजः ।
नमस्कृत्य स्थितो दूरात् बद्धाञ्जलिपुटो हरिः ॥ ३६ ॥
असे म्हणून मारुतीने सीता देवीला ती मुद्रिका दिली आणि तिला नमस्कार करून व हात जोडून, तो दूर उभा राहिला. (३६)

दृष्ट्वा सीता प्रमुदिता रामनामाङ्‌कितां तदा ।
मुद्रिकां शिरसा धृत्वा स्रवत् आनन्दनेत्रजा ॥ ३७ ॥
त्या वेळी रामनामाने अंकित असणारी ती मुद्रिका पाहून सीता अतिशय आनंदित झाली आणि ती अंगठी मस्तकी धारण केल्यावर तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. (३७)

कपे मे प्राणदाता त्वं बुद्धिमानसि राघवे ।
भक्तोऽसि प्रियकरी त्वं विश्वासोऽति तवैव हि ॥ ३८ ॥
(नंतर सीता म्हणाली,) " हे वानरा, तू माझा प्राणदाता आहेस. तू बुद्धिमान आहेस. तू श्रीराघवांचा भक्त आणि त्यांचे प्रिय करणारा आहेस. त्यांनासुद्धा तुझाच पूर्ण विश्वास वाटतो. (३८)

नो चेन्मत्सन्निधिं चान्यं पुरुषं प्रेषयेत्कथम् ।
हनूमन् दृष्टमखिलं मम दुःखादिकं त्वया ॥ ३९ ॥
तसे नसते तर त्यांनी अन्य परपुरुषाला माझ्याजवळ कसे बरे पाठविले असते ? अरे हनुमाना, माझे दुःख इत्यादी सर्व काही तू पाहिले आहेस. (३९)

सर्वं कथय रामाय यथा मे जायते दया ।
मासद्वयावधि प्राणाः स्थास्यन्ति मम सत्तम ॥ ४० ॥
हे सर्व तू श्रीरामांना सांग. म्हणजे त्यांना माझी दया येईल. हे साधूश्रेष्ठा, आता दोन महिन्याच्या अवधीपर्यंतच माझे प्राण राहातील. (४०)

नागमिष्यति चेद्‍रामो भक्षयिष्यति मां खलः ।
अतः शीघ्रं कपीन्द्रेण सुग्रीवेण समन्वितः ॥ ४१ ॥
वानरानीकपैः सार्धं हत्वा रावणमाहवे ।
सपुत्रं सबलं रामो यदि मां मोचयेत्प्रभुः ॥ ४२ ॥
तत्तस्य सदृश्यं वीर्यं वीर वर्णय वर्णितम् ।
यथा मां तारयेद्‍रामो हत्वा शीघ्रं दशाननम् ॥ ४३ ॥
तथा यतस्व हनुमन् वाचा धर्ममवाप्नुहि ।
हनुमानपि तामाह देवि दृष्टो यथा मया ॥ ४४ ॥
रामः सलक्ष्मणः शीघ्रं आगमिष्यति सायुधः ।
सुग्रीवेण ससैन्येन हत्वा दशमुखं बलात् ॥ ४५ ॥
समानेष्यति देवि त्वां अयोध्यां नात्र संशयः ।
तमाह जानकी रामः कथं वारिधिमाततम् ॥ ४६ ॥
तीर्त्वायास्यति अमेयात्मा वानरानीकपैः सह ।
हनूमानाह मे स्कन्धौ आरुह्य पुरुषर्षभौ ॥ ४७ ॥
आयास्यतः ससैन्यश्च सुग्रीवो वानरेश्वरः ।
विहायसा क्षणेनैव तीर्त्वा वारिधिमाततम् ॥ ४८ ॥
निर्दहिष्यति रक्षौघान् त्वत्कृते मात्र संशयः ।
अनुज्ञां देहि मे देवि गच्छामि त्वरयान्वितः ॥ ४९ ॥
द्रष्टुं रामं सह भ्राता त्वरयामि तवान्तिकम् ।
देवि किञ्चितभिज्ञानं देहि मे येन राघवः ॥ ५० ॥
विश्वसेन्मां प्रयत्‍नेन ततो गन्ता समुत्सुकः ।
ततः किञ्चित् विचार्याथ सीता कमललोचना ॥ ५१ ॥
त्या काळात जर श्रीराम आले नाहीत तर तो दुष्ट रावण मला खाऊन टाकील. म्हणून वानरराज सुग्रीवसहित आणि वानरसैन्यातील मुख्यांसह येथे लवकर येऊन, जर रामांनी युद्धात पुत्र व सैन्य यांसह रावणाचा वध केला आणि जर मला येथून सोडवले, तरच हे वीरा, ते कृत्य त्यांच्या पराक्रमास साजेलसे होईल. माझे म्हणणे श्रीरामांना अशा युक्तीने सांग की, त्यामुळे रावणाला मारून राम मला घेऊन जातील; असा तू प्रयत्न कर. असे करून तू वाणीचे पुण्य प्राप्त करून घे." तेव्हा हनुमानसुद्धा तिला म्हणाला, "हे देवी, मी रामांना भेटलो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीन. तुझ्याबद्दल जे पाहिले तेही सांगेन म्हणजे सैन्यासह सुग्रीव आणि लक्ष्मण यांना घेऊन तसेच स्वतःची शस्त्रे घेऊन राम सत्वर इकडे येतील, आणि स्वतः व्या सामर्थ्याने रावणाचा वध करून, हे देवी, ते तुला अयोध्येला नेतील, यात संशय नाही." तेव्हा जानकी त्याला म्हणाली, "राम हे अमेयात्मा आहेत. वानर सैन्यातील सेनाप्रमुखांसह विस्तृत समुद्र ओलांडून येथे कसे येतील ?" हनूमानाने उत्तर दिले, "ते दोघे पुरुषश्रेष्ठ माझ्या खांद्यावर बसून येतील, तर वानरराज सुग्रीव हा आपल्या सैन्यासह एका क्षणात आकाश मार्गाने विशाल समुद्र पार करून येथे येईल आणि तुझ्यासाठी तो सर्व राक्षस समूहांना जाळून टाकील, यांत संशय नाही. हे देवी, आता मला अनुज्ञा दे म्हणजे श्रीरामांना व लक्ष्मणाला भेटण्यासाठी मी आता त्वरित जाईन. आणि मी त्यांना त्वरेने तुझ्याजवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. हे देवी, तू मला काही तरी तुझी खूण दे की ज्यामुळे राघवांचा माझ्यावर विश्वास बसेल. प्रयत्नपूर्वक मी त्या खुणेचे रक्षण करीन आणि मोठ्या उत्साहाने रामांजवळ जाईन." त्यानंतर कमलनयन सीतेने थोडा विचार केला. (४१-५१)

विमुच्य केशपाशान्ते स्थितं चूडामणिं ददौ ।
अनेन विश्वसेद्‍रामः त्वां कपीन्द्र सलक्ष्मणः ॥ ५२ ॥
तिने आपल्या केशपाशात असणारा चूडामणी बाहेर काढून त्याला दिला व ती त्याला म्हणाली, "हे कपिश्रेष्ठा, लक्ष्मणासह श्रीराम या खुणेमुळे तुझ्यावर विश्वास ठेवतील. (५२)

अभिज्ञानार्थमन्यच्च वदामि तव सुव्रत ।
चित्रकूटगिरौ पूर्वं एकदा रहसि स्थितः ।
मदङ्‌के शिर आधाय निद्राति रघुनन्दनः ॥ ५३ ॥
हे सुव्रता, ओळख पटविण्यासाठी म्हणून आणखी एक गोष्ट मी तुला सांगते. पूर्वी एकदा चित्रकूट पर्वतावर असताना एकांत स्थानी रघुनंदन माझ्या मांडीवर मस्तक ठेवून झोपले होते. (५३)

ऐन्द्रः काकस्तदागत्य नखैस्तुण्डेन चासकृत् ।
मत्पादाङ्‌गुष्ठमारक्तं विददारामिषाशया ॥ ५४ ॥
त्या वेळी इंद्राचा पुत्र (जयंत) कावळ्याच्या रूपाने तेथे आला आणि मांसाच्या लोभाने त्याने माझ्या पायाचा लालबुंद अंगठा चोचीने फोडला. (५४)

ततो रामः प्रबुद्‍ध्याथ दृष्ट्वा पादं कृतवर्णनम् ।
केन भद्रे कृतं चैतत् विप्रियं मे दुरात्मना ॥ ५५ ॥
त्यानंतर श्रीराम जेव्हा जागे झाले तेव्हा जखमी झालेला माझा पाय पाहून त्यांनी विचारले, "हे कल्याणी, कोणा दुष्टात्म्याने अत्यंत अप्रिय असे हे कर्म केले आहे ?" (५५)

इत्युक्‍त्वा पूरतोऽपश्यत् वायसं मां पुनः पुनः ।
अभिद्रवन्तं रक्ताक्त नखतुण्डं चुकोप ह ॥ ५६ ॥
ते असे बोलत होते, तितक्यात ज्याचे तोंड व नखे रक्ताने माखलेली होती, असा तो कावळा पुन्हा माझ्याकडे येत होता, तो त्यांना समोर दिसला. त्याला पाहून श्रीरामांना फार क्रोध आला. (५६)

तृणमेकमुपादाय दिव्यास्त्रेणाभियोज्य तत् ।
चिक्षेप लीलया रामो वायसोपरि तज्ज्वलत् ॥ ५७ ॥
श्रीरामांनी एक गवताची काडी घेऊन, तिच्यावर दिव्यास्त्राची योजना केली आणि ती ज्वलंत काडी त्यांनी लीलेने त्या कावळ्यावर फेकली. (५७)

अभ्यद्रवत् वायसश्च भीतो लोकान् भ्रमन्पुनः ।
इन्द्रब्रह्मादिभिश्चापि न शक्यो रक्षितुं तदा ॥ ५८ ॥
तेव्हा घाबरलेला कावळा पळत सुटला आणि तिन्ही लोकांत भटकू लागला. परंतु त्या वेळी इंद्र, ब्रह्मदेव इत्यादींसुद्धा त्याचे रक्षण करू शकले नाहीत. (५८)

रामस्य पादयोरग्रे अपतद्‌भीत्या दयानिधेः ।
शरणागतमालोक्य रामस्तं इदमब्रवीत् ॥ ५९ ॥
अमोघं एतत् अस्त्रं मे दत्वैकाक्षमितो व्रज ।
सव्यं दत्त्वा गतः काक एवं पौरुषवानपि ॥ ६० ॥
उपेक्षते किमर्थं मां इदानीं सोऽपि राघवः ।
हनूमानपि तामाह श्रुत्वा सीतानुभाषितम् ॥ ६१ ॥
तेव्हा तो भीत भीत दयानिधान अशा श्रीरामांच्या पाया पडला. तो शरण आला असे पाहून श्रीराम त्याला म्हणाले, 'माझे हे अस्त्र कधीही व्यर्थ जात नाही. तेव्हा तू आपला एक डोळा देऊन निघून जा.' तेव्हा आपला डावा डोळा देऊन तो कावळा तेधून निघून गेला. अशा प्रकारचे सामर्थ्य असूनही राघव आत्ता का बरे माझी उपेक्षा करीत आहेत ? सीतेचे हे भाषण ऐकल्यावर, हनुमानसुद्धा तिला म्हणाला. (५९-६१)

देवि त्वां यदि जानाति स्थितामत्र रघूत्तमः ।
करिष्यति क्षणाद्‌भस्म लङ्‌कां राक्षसमण्डिताम् ॥ ६२ ॥
"हे देवी, तू येथे आहेस, हे जर रघुत्तम रामांना कळले तर ते राक्षसांनी भूषित केलेल्या या लंकेचे क्षणात भस्म करून टाकतील." (६२)

जानकी प्राह तं वत्स कथं त्वं योत्स्यसेऽसुरैः ।
अतिसूक्ष्मवपुः सर्वे वानराश्च भवादृशा ॥ ६३ ॥
तेव्हा जानकी त्याला म्हणाली,"वत्सा, अतिशय लहान शरीर असणारा तू कसा बरे असुरांशी लढशील ? इतर सर्व वानरही तुझ्यासारखेच असणार." (६३)

श्रुत्वा तद्वचनं देव्यै पूर्वरूपमदर्शयत् ।
मेरुमन्दरसङ्‌काशं रक्षोगणविभीषणम् ॥ ६४ ॥
तिचे वचन ऐकल्यावर, हनुमानाने मेरु-मंदर-पर्वताप्रमाणे असणारे आणि राक्षस समूहांना भयभीत करून टाकणारे व स्वतःचे पूर्वीचे रूप जानकीला दाखविले. (६४)

दृष्ट्वा सीता हनुमन्तं महापर्वतसन्निभम् ।
हर्षेण महताविष्टा प्राह तं कपिकुञ्जरम् ॥ ६५ ॥
एखाद्या प्रंचड पर्वताप्रमाणे विशाल शरीर असणाऱ्या हनुमंताला पाहून सीता अतिशय आनंदाने भरून गेली आणि ती त्या वानरश्रेष्ठाला म्हणाली. (६५)

समर्थोऽसि महासत्त्व द्रक्ष्यन्ति त्वां महाबलम् ।
राक्षस्यस्ते शुभः पन्था गच्छ रामान्तिकं द्रुतम् ॥ ६६ ॥
"हे महाशक्तिसंपन्न मारुती, तू समर्थ आहेस. आता महाबलवान अशा तुला या राक्षसी पाहातील. तू लवकर रामांकडे जा. तुझा मार्ग शुभ होवो." (६६)

बुभुक्षितः कपिं प्राह दर्शनात्पारणं मम ।
भविष्यति फलैः सर्वैः तव दृष्टौ स्थितैर्हि मे ॥ ६७ ॥
त्या वेळी हनुमानाला भूक लागली होती. तो सीतेला म्हणाला, "देवी, तुझे दर्शन घेणे हेच माझे व्रत होते आणि ते पूर्ण झाले आहे. तेव्हा तुझ्या दृष्टीसमोर जी फळे आहेत ती खाऊन मी माझे पारणे फेडीन." (६७)

तथेत्युक्तः स जानक्या भक्षयित्वा फलं कपिः ।
ततः प्रस्थापितोऽगच्छत् जानकीं प्रणिपत्य सः ।
किञ्चित्‍दूरमथो गत्वा स्वात्मन्येवान्वचिन्तयत् ॥ ६८ ॥
'ठीक आहे' असे जानकी ने म्हटल्यावर, हनुमानाने फळे खाली. नंतर तिने निरोप दिल्यावर जानकीला प्रणाम करून तो निघाला. त्यानंतर काहीसे दूर गेल्यावर तो स्वतःच्याच मनाशी विचार करू लागला. (६८)

कार्यार्थमागतो दूतः स्वामिकार्याविरोधतः ।
अन्यत्किञ्चित् असम्पाद्य गच्छत्यधम एव सः ॥ ६९ ॥
'आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी आलेला दूत स्वामीकार्याला विरोधी होणार नाही असे अन्य काही कार्य न करताच जर परत गेला, तर तो दूत अधम प्रतीचा होय. (६९)

अतोऽहं किञ्चिदन्यच्च कृत्वा दृष्ट्वाथ रावणम् ।
सम्भाष्य च ततो राम दर्शनार्थ व्रजाम्यहम् ॥ ७० ॥
म्हणून मी अन्य काही कार्य करून, त्यानंतर रावणाला भेटून, त्याच्याशी संभाषण करून, मग रामांना भेटण्यासाठी परत जाईन' (७०)

इतिनिश्चित्य मनसा वृक्षखण्डान् महाबलः ।
उत्पाट्यशोकवनिकां निर्वृक्षां अकरोत्क्षणात् ॥ ७१ ॥
मनात असा निश्चय करून महाबली हनुमानाने झाडेच्या झाडे उपटून टाकून एका क्षणात ती अशोकवाटिका वृक्षरहित करून टाकली. (७१)

सीताश्रयनगं त्यक्‍त्वा वनं शून्यं चकार सः ।
उत्पाटयन्तं विपिनं दृष्ट्वा राक्षसयोषितः ॥ ७२ ॥
अपृच्छञ् जानकीं कोऽसौ वानराकृति उद्‌भटः ॥७३ ॥
सीता ज्या वृक्षाच्या आश्रयाने बसली होती तो वृक्ष सोडून त्याने ते संपूर्ण अशोकवन उध्वस्त केले. वृक्ष उपटून मारुती वन उजाड करीत असल्याचे पाहून, तेथल्या राक्षस स्त्रियांनी जानकीला विचारले, "वानराचा आकार असणारा हा कोण अपार पराक्रमी वीर आहे ?" (७२-७३)

जानक्युवाच
भवत्य एवं जानन्ति मायां राक्षसनिर्मिताम् ।
नाहमेनं विजानामि दुःखशोकसमाकुला ॥ ७४ ॥
जानकी म्हणाली - "हे बायांनो, राक्षसांनी निर्माण केलेली ही माया तुम्हांलाच माहीत असणार. दुःख व शोक यांनी भरलेल्या मला हा कोण आहे, हे कसे माहीत असणार ?" (७४)

इत्युक्‍त्वास्त्वरितं गत्वा राक्षस्यो भयपीडिताः ।
हनूमता कृतं सर्वं रावणाय न्यवेदयन् ॥ ७५ ॥
सीतेने असे सांगितल्यावर, भयभीत झालेल्या त्या राक्षस स्त्रिया त्वरित रावणाजवळ गेल्या आणि हनुमंताने केलेली सर्व खोडी त्यांनी रावणाला निवेदन केली. (७५)

देव कश्चिन्महासत्त्वो वानराकृतिदेहभृत् ।
सीतया सह सम्भाष्य ह्यशोकवनिकां क्षणात् ।
उत्पाट्य चैत्यप्रासादं बभञ्जामितविक्रमः ॥ ७६ ॥
प्रासादरक्षिणः सर्वान् हत्वा तत्रैव तस्थिवान् ।
तच्छ्रुत्वा तूर्णमुत्थाय वनभङ्‌गं महाप्रियम् ॥ ७७ ॥
किङ्‌करान् प्रेषयामास नियुतं राक्षसाधिपः ।
निभग्नचैत्यप्रासाद प्रथमान्तरसंस्थितः ॥ ७८ ॥
हनुमान् पर्वताकारो लोहस्तम्भकृतायुधः ।
किञ्चिल्लाङ्‌गुलचलनो रक्तायो भीषणाकृतिः ॥ ७९ ॥
(त्या रावणाला सांगू लागल्या,) "महाराज, वानराच्या आकाराप्रमाणे देह धारण करणारा कोणी एव, महासामर्थ्यसंपन्न असणारा प्राणी येथे आला आहे. सीतेबरोबर संभाषण करून झाल्यावर, एका क्षणात वृक्ष उपटून त्याने अशोकवनिका उजाड केली आहे, आणि अमर्याद पराक्रमी असणाऱ्या त्याने तेथील देवालयही फोडून टाकले आहे, आणि प्रासादाच्या रक्षणासाठी असणाऱ्या सर्व रक्षकांना ठार करून तो तेथेच बसला आहे." वनाच्या विध्यंसाचा तो अत्यंत अप्रिय समाचार ऐकल्यावर रावण झटक्यात उठला आणि त्या राक्षसांच्या राजाने दहा लाख सेवकांना (मारुतीच्या पारिपत्यासाठी) पाठविले. त्या वेळी इकडे पर्वताप्रमाणे आकार असणारा, एक लोखंडी खांब शस्त्र म्हणून वापरणारा, थोडीशी शेपटी हालविणारा, लाल तोंडाचा, भयानक आकार असणारा हनुमान भग्न केलेल्या मंदिराच्या पुढल्या भागात बसला होता. (७६-७९)

आपतन्तं महासङ्‌घं राक्षसानां ददर्श सः ।
चकार सिंहनादं च श्रुत्वा ते मुमुहुर्भृशम् ॥ ८० ॥
राक्षसांचा प्रचंड समूह आपल्यावर चालून येत आहे, हे त्याने पाहिले. तेव्हा त्याने प्रचंड सिंहनाद केला. तो ऐकून राक्षस मूर्च्छित झाले. (८०)

हनुमन्तं अथो दृष्ट्वा राक्षसा भीषणाकृतिम् ।
निर्जघ्नुर्विविधास्त्रौघैः सर्वराक्षसघातिनम् ॥ ८१ ॥
त्यानंतर सर्व राक्षसांना मारणाऱ्या व भयंकर आकार असणाऱ्या हनुमंताला पाहून राक्षसांनी विविध अस्त्रांनी त्याच्यावर प्रहार केले. (८१)

तत उत्थाय हनुमान् मुद्‍गरेण समन्ततः ।
निष्पिपेष क्षणादेव मशकानिव यूथपः ॥ ८२ ॥
तेव्हा हनुमान उठला आणि हत्तीच्या कळपाच्या प्रमुखाने ज्याप्रमाणे माश्यांना चिरडून टाकावे, त्या प्रमाणे हनुमानाने आपल्या मुद्‌गराने सर्व बाजूला असणाऱ्या राक्षसांना एका क्षणात चिरडून टाकले. (८२)

निहतान् किङ्‌करान् श्रुत्वा रावणः क्रोधमूर्च्छितः ।
पञ्च सेनापतींस्तत्र प्रेषयामास दुर्मदान् ॥ ८३ ॥
आपले सेवक मारले गेले, हे ऐकल्यावर रावण क्रोधाने बेभान झाला आणि त्याने तेथे आपले पाच मदोन्मत्त सेनापती पाठविले. (८३)

हनूमानपि तान् सर्वान् लोहस्तम्भेन चाहनत् ।
ततः क्रुद्धो मंत्रिसुतान् प्रेषयामास सप्त सः ॥ ८४ ॥
त्या सर्वांनाच हनुमानाने लोखंडी खांबाने मारून टाकले. तेव्हां रागावलेल्या रावणाने मंत्र्यांच्या रगत पुत्रांना पाठविले. (८४)

आगतानपि तान् सर्वान् पूर्ववत् वानरेश्वरः ।
क्षणान्निःशेषतो हत्वा लोहस्तभेन मारुतिः ॥ ८५ ॥
पूर्वस्थानमुपाश्रित्य प्रतीक्षन् राक्षसान् स्थितः ।
ततोजगाम बलवान् कुमारोऽक्षःप्रतापवान् ॥ ८६ ॥
त्या सर्वांना वानरश्रेष्ठ मारुतीने एका क्षणात पूर्वीप्रमाणे आपल्या लोखंडी खांबाने संपूर्णपणे नष्ट करून टाकले आणि मग आपल्या पूर्वीच्या ठिकाणाचा आश्रय घेऊन तो अन्य राक्षस येण्याची वाट पाहात बसला. त्या वेळी बलवान आणि प्रतापी असा राजकुमार अक्ष हा तेथे आला. (८५-८६)

तमुत्पपात हनुमान् दृष्ट्वाकाशे समुद्‍गरः ।
गगनात्त्वरितो मूर्ध्नि मुद्‍गरेण व्यताडयत् ॥ ८७ ॥
त्याला पाहिल्यावर, मुद्‌गर घेऊन हनुमानाने आकाशात उड्डाण केले आणि आकाशातूनच त्याने वेगाने अक्षाच्या मस्तकावर मुद्‌गराचा तडाखा दिला. (८७)

हत्वा तमक्षं निःशेषं बलं सर्वंचकार सः ॥ ८८ ॥
अक्षाचा वध करून मारुतीने त्याच्या सैन्याचाही समूळ नाश केला. (८८)

ततः श्रुत्वा कुमारस्य वधं राक्षसपुङ्‌गवः ।
क्रोधेन महताविष्ट इन्द्रजेतारमब्रवीत् ॥ ८९ ॥
तेव्हा राजकुमाराचा वध झाला, हे ऐकल्यानंतर, राक्षसश्रेष्ठ रावण अतिशय कुद्ध झाला आणि तो इंद्रजिताला म्हणाला. (८९)

पुत्र गच्छाम्यहं तत्र यत्रास्ते पुत्रहा रिपुः ।
हत्वातमथवा बद्‍ध्वा आनयिष्यामि तेऽन्तिकम् ॥९० ॥
"हे पुत्रा, माझ्या पुत्राचा वध करणाऱ्या शत्रूजवळ जातो आणि त्यास १ ठ र क रू न अ थवा बां धूर न मी तुझ्याजवळ आणतो." (९०)

इन्द्रजित् पितरं प्राह त्यज शोकं महामते ।
मयि स्थिते किमर्थं त्वं भाषसे दुःखितं वचः ॥ ९१ ॥
ततेव्हां इंद्रजित् पित्याला म्हणाला, "हे महाबुद्धिमान तात, तुम्ही शोक टाकून द्या. मी येथे असताना तुम्ही दुःखपूर्ण वचन का बरे बोलत आहात ? (९१)

बद्‍ध्वान्येष्ये द्रुतं तात वानरं ब्रह्मपाशतः ।
इत्युक्‍त्वा रथमारुह्य राक्षसैर्बहुविर्भृतः ॥ ९२ ॥
जगाम वायुपुत्रस्य समीपं वीरविक्रमः ।
ततोऽतिगर्जितं श्रुत्वा स्तम्भमुद्यस्य वीर्यवान् ॥ ९३ ॥
उत्पपात मधोदेशं गरुत्मानिव मारुतिः ।
ततो भ्रमन्तं नभसि हनूमन्तं शिलीमुखैः ॥ ९४ ॥
विद्‍ध्वा तस्य शिरोभागं इषुभिश्चाष्टभिःपुनः ।
हृदयं पादयुगलं षड्‌भिरेकेन वालधिम् ॥ ९५ ॥
भेदयित्वा ततो घोरं सिंहनादमथाकरोत् ।
ततोऽतिहर्षाद्धनुमान स्तम्भमुद्यस्य वीर्यवान् ॥ ९६ ॥
जघान सारथिं साश्वं रथं चाचूर्णयत्क्षणात् ।
ततोऽन्यं रथमादाय मेघनादो महाबलः ॥ ९७ ॥
शीघ्रं ब्रह्मास्त्रमादाय बद्‍ध्वा वानरपुङ्‌गवम् ।
निनाय निकटं रज्ञो रवणस्य महाबलः ॥ ९८ ॥
बाबा, त्या वानराला त्वरित ब्रह्मपाशाने बांधून मी घेऊन येतो." असे बोलून तो एका रथावर चढला, आणि अनेक राक्षसां समवेत तो महापराक्रमी वीर वायुपुत्राजवळ गेला. मग इंद्रजिताने केलेली प्रचंड गर्जना ऐकल्यावर पराक्रमी मारुतीने हाताने लोखंडीखांब उचलून, गरुडाप्रमाणे आकाशात उड्डाण केले. त्यानंतर आकाशात भ्रमण करणाऱ्या हनुमंताला पाहिल्यावर इंद्रजिताने काही बाणांनी त्याच्यावर प्रहार केले. नंतर पुन्हा आठ बाणांनी त्याचा शिरोभाग विद्ध केला. सहा बाणांनी त्याचे हृदय आणि दोन्ही पाय विद्ध केले. तसेच एका बाणाने शेपटीचा भेद करून, इंद्रजिताने भयानक सिंहनाद केला. मग पराक्रमी हनुमानाने अतिशय उत्साहाने खांब उचलून त्या इंद्रजिताच्या सारथ्याचा वध केला आणि एका क्षणात घोड्यांसह रथाचे चूर्ण केले. तेव्हा महाबलवान इंद्रजिताने दुसरा रथ घेऊन त्यावर आरोहण केले आणि सत्वर ब्रह्मास्त्र सोडून त्याने वानरश्रेष्ठाला बांधून रावणाच्याजवळ नेले. (९२-९८)

यस्य नाम सततं जपन्ति ये-
    अज्ञानकर्मकृतबंधनं क्षणात् ।
सद्य एव परिमुच्य तत्पदं
    यान्ति कोटिरविभासुरं शिवम् ॥ ९९ ॥
तस्यैव रामस्य पदाम्बुजं सदा
    हृत्पद्यमधे सुनिधाय मारुतिः ।
सदैव निर्मुक्तसमस्तबन्धनः
    किं तस्य पाशैरितैश्च बन्धनैः ॥ १०० ॥
ज्या श्रीरामांच्या नावाचा सतत जप करणारे भक्तजन क्षणात अज्ञानाने निर्माण केलेल्या कर्मांनी आलेले बंधन तत्काळ तोडून टाकून, कोटिसूर्याप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या, कल्याणकारक अशा श्रीरामाच्या स्थानी जातात, त्याच रामाची चरणकमळे सदा आपल्या हृदयामध्ये ठेवल्यामुळे मारुती नेहमीच सर्वच बंधनांतून मुक्त झालेला होता. त्याला ब्रह्मपाशांनी तसेच इतर बंधनांनी काय होणार बरे ? (९९-१००)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
सुन्दरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
इति श्रीमद्‌ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥


GO TOP