 
        
        | ॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ किष्किन्धाकाण्ड ॥ ॥ सप्तमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]  वानरांचे प्रायोपवेशन आणि संपातीची भेट -  श्रीमहादेव उवाच  अथ तत्र समासीना वृक्षखण्डेषु वानराः । चिन्तयन्तो विमुह्यन्तः सीतामार्गणकर्शिताः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, नंतर त्या वनात सीतेचा शोध करताना थकून गेलेले वानर सीतेचा शोध न लागल्याने दुःखी झाले. तेव्हा झाडांवर बसून ते विचार करू लागले. (१)  तत्रोवाचाङ्गदः कांश्चिद् वानरान् वानरर्षभः ।  भ्रमतां गह्वरेऽस्माकं मासो नूनं गतोऽभवत् ॥ २ ॥ त्यावेळी वानरश्रेष्ठ अंगद काही वानरां ना म्हणाला, "सीतेच्या शोधासाठी आपण गिरिकंदरांमध्ये फिरत असताना नक्कीच एक महिना होऊन गेला असणार. (२)  सीता नाधिगतास्माभिः न कृतं राजशासनम् ।  यदि गच्छाम किष्किन्धां सुग्रीवोऽस्मान् हनिष्यति ॥ ३ ॥ आपल्याला सीता सापडली नाही. साहजिकच राजाची आज्ञा आपल्याकडून पाळली गेली नाही. तेव्हा आता जर आपण किष्किंधा नगरीत परत गेलो तर सुग्रीव आपणास नक्कीच ठार करील. (३)  विशेषतः शत्रुसुतं मां मिषान्निहनिष्यति ।  मयि तस्य कुतः प्रीतिः अहं रामेण रक्षितः ॥ ४ ॥ विशेषतः त्याच्या वाली या शत्रूचा पुत्र असणार्या मला तो या निमित्ताने निश्चितच ठार करील. माझ्याबद्दल त्याला प्रेम का बरे वाटावे ? माझे रक्षण तर श्रीरामांनीच केलेले आहे. (४)  इदानीं रामकार्यं मे न कृतं तन्मिषं भवेत् ।  तस्य मद्धनने नूनं सुग्रीवस्य दुरात्मनः ॥ ५ ॥ आता श्रीरामांचे कार्य मी केले नाही. तेव्हा मला ठार करण्यास त्या दुरात्म्या सुग्रीवाला खरोखर हे आयते निमित्त मिळेल. (५)  मातृकल्पां भ्रातृभार्यां पापात्मानुभवत्यसौ ।  न गच्छेयं अतः पार्श्वं तस्य वानरपुङ्गवाः ॥ ६ ॥ तो पापी मनाचा सुग्रीव हा आईप्रमाणे असणार्या आपल्या भावाच्या भार्येचा उपभोग घेत आहे. म्हणून हे वानरश्रेष्ठांनो, मी आता त्याच्याजवळ जाणार नाही. (६)  त्यक्ष्यामि जीवितं चात्र येन केनापि मृत्युना ।  इत्यश्रुनयनं केचित् दृष्ट्वा वानरपुङ्गवाः ॥ ७ ॥ व्यथिताः साश्रुनयना युवराजमथाब्रूवन् ॥ ८ ॥ तेव्हा येथेच कशाही रीतीने मृत्यू ओढवून घेऊन मी माझ्या जीविताचा त्याग करीन." त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. अंगदाला पाहून, काही श्रेष्ठ वानर व्यथित झाले, त्यांच्याही डोळ्यांत अश्रू आले आणि मग ते युवराज अंगदाला म्हणाले, (७-८)  किमर्थं तव शोकोऽत्र वयं ते प्राणरक्षकाः ।  भवामो निवसामोऽत्र गुहायां भयवर्जिताः ॥ ९ ॥ "तू येथे का बरे शोक करीत आहेस ? आम्ही सर्व जण तुझ्या प्राणांचे रक्षण करू. आपण सारेच येथे गुहेत निर्भयपणे राहू या. (९)  सर्वसौभाग्यसहितं पुरं देवपुरोपमम् ।  शनैः परस्परं वाक्यं वदतां मारुतात्मजः ॥ १० ॥ श्रुत्वाङ्गदं समालिङ्ग्य प्रोवाच नयकोविदः । विचार्यते किमर्थं ते दुर्विचारो न युज्यते ॥ ११ ॥ या गुहेत जे नगर आहे ते सर्व भोगसामग्रींनी भरलेले असून ते देवांच्या अमरावती नगरीप्रमाणे आहे." परस्परांशी हळूहळू बोलणार्या त्या वानरांचे हे वचन नीती जाणणार्या हनुमानाने ऐकले. तेव्हा अंगदाला दृढ आलिंगन देऊन त्याने म्हटले, "तू असा विचार का करीत आहेत बरे ? वाईट विचार करणे हे तुला शोभत नाही. (१०-११)  राज्ञोऽत्यनतप्रियस्त्वं हि तारापुत्रोऽतिवल्लभः ।  रामस्य लक्ष्मणात्प्रीतिः त्वयि नित्यं प्रवर्धते ॥ १२ ॥ कारण तू तारेचा अतिशय लाडका पुत्र आहेस आणि म्हणून तू राजा सुग्रीवालासुद्धा अतिशय प्रिय आहेस. आणि श्रीरामांची तुझ्यावरील प्रीती ही त्यांच्या लक्ष्मणावरील प्रेमापेक्षाही अधिक असून ती वाढत आहे. (१२)  अतो न राघवाद्भीतिः तव राज्ञो विशेषतः ।  अहं तव हिते सक्तो वत्स नान्यं विचारय ॥ १३ ॥ म्हणून तुला श्रीराघवांकडून भीती नाही. आणि विशेषतः राजा सुग्रीवाकडून तुला मुळीच भीती नाही. तसेच, बाळा अंगदा, मी तुझे हित करण्यात सतत तत्पर आहे. म्हणून तू अन्य कशाचाही विचार करू नकोस. (१३)  गुहावासश्च निर्भेद्य इत्युक्तं वानरैस्तु यत् ।  तदेतद् राबाणानां अभेद्यं किं जगत्त्रये ॥ १४ ॥ तसेच येथे राहणे, ही गुहा अभेद्य असल्याने निर्भय आहे, असे जे काही वानर म्हणतात ते योग्य नाही. कारण या तिन्ही जगात असे काय आहे की जे श्रीरामांच्या बाणांना अभेद्य आहे ? (१४)  ये त्वां दुर्बोधयन्त्येते वानरा वानरर्षभ ।  पुत्रदारादिकं त्यक्त्वा कथं स्थास्यन्ति ते त्वया ॥ १५ ॥ आणखी असे की हे वानर श्रेष्ठा, हे जे वानर तुला चुकीचा सल्ला देत आले ते वानर स्वतःचे पुत्र, पत्नी इत्यादींचा त्याग करून, तुझ्याबरोबर कसे बरे राहतील ? (१५)  अन्यद्गुह्यतमं वक्ष्ये रहस्यं शृणु मे सुत ।  रामो न मानुषो देवः साक्षान्नारायणोऽव्ययः ॥ १६ ॥ बाळा, आणखी अत्यंत गुप्त असे एक रहरय मी तुला सांगतो. ते तू ऐक. राम हे सामान्य मनुष्य नाहीत. तर ते साक्षात अविनाशी असे परमेश्वर नारायण आहेत. (१६)  सीता भगवती माया जनसम्मोहकारिणी ।  लक्ष्मणो भुवनाधारः साक्षाच्छेषः फणिश्वरः ॥ १७ ॥ सीता ही सर्व लोकांना मोहित करणारी भगवती माया आहे आणि लक्ष्मण म्हणजे सर्व जगाला आधार देणारा साक्षात नागराज शेष आहे. (१७)  ब्रह्मणा प्रार्थिताः सर्वे रक्षोगणविनाशने ।  मायामानुषभावेन जाता लोकैकरक्षकाः ॥ १८ ॥ ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे हे सर्व राक्षससमुदायांचा नाश करण्यासाठी मायामनुष्य रूपाने जन्माला आले आहेत. त्यांतील प्रत्येक जण तिन्ही लोकांचे रक्षण करण्यास समर्थ आहे. (१८)  वयं च पार्षदाः सर्वे विष्णोर्वैकुण्ठवासिनः ।  मनुष्यभावमापन्ने स्वेच्छया परमात्मनि ॥ १९ ॥ वयं वानररूपेण जातास्तस्यैव मायया । वयं तु तपसा पूर्वं आराध्य जगतां पतिम् ॥ २० ॥ तेनैवानुगृहीताः स्मः पार्षदत्वमुपागताः । इदानीमपि तस्यैव सेवां कृत्वैव मायया ॥ २१ ॥ पुनर्वैकुण्ठमासाद्य सुखं स्थास्यामहे वयम् । इत्यङ्गदमथाश्वास्य गता विन्ध्यं महाचलम् ॥ २२ ॥ वैकुंठात वास करणार्या विष्णूचे आपण सर्व वानरगण पार्षद आहोत. परमात्मा हा स्वतःच्या इच्छेने मानवी रूपात आला आहेतेव्हा त्याच्याच मायेने आपण सर्व जण वानर रूपाने जन्माला आलो आहोत. पूर्वी आपण जगांच्या स्वामीची तपस्येद्वारे आराधना केली होती; तेव्हा त्यानेच आपणांवर अनुग्रह केल्याने आपण त्याचे पार्षद झालेलो आहोत. तेव्हा आत्तासुद्धा मायेच्या प्रेरणेनुसार त्या विष्णूचीच सेवा करूनच शेवटी आपण वैकुंठात जाऊन सुखाने राहाणार आहोत." अशा प्रकारे अंगदाचे सांत्वन करून, ते सर्व वानर विंध्य नावाच्या महापर्वतावर गेले. (१९-२२)  विचिन्वन्तोऽथ शनकैः जानकीं दक्षिणाम्बुधेः ।  तीरे महेन्द्राख्यगिरेः पवित्रं पादयाययुः ॥ २३ ॥ त्यानंतर सावकाशपणे जानकीचा शोध घेत ते वानर दक्षिण समुद्राच्या तीरावरील महेंद्र नावाच्या पर्वताच्या पवित्र पायथ्याशी येऊन पोचले. (२३)  दृष्ट्वा समुद्रं दुष्पारं अगाधं भयवर्धनम् ।  वानरा भयसंत्रस्ताः किं कुर्म इति वादिनः ॥ २४ ॥ निषेदुरुदधेस्तीरे सर्वे चिन्तासमन्विताः । मंत्रयामासुरन्योन्यं अङ्गदाद्या महाबलाः ॥ २५ ॥ भ्रमतो मे वने मासो गतोऽत्रैव गुहान्तरे । न दृष्टो रावणो वाद्य सीता वा जनकात्मजा ॥ २६ ॥ तेथे पार करण्यास कठीण, अथांग आणि भीतिदायक समुद्र पाहून, ते सर्व वानर भयाने त्रस्त झाले. 'आताआपण काय करायचे ?' असे परस्परांशी बोलत, ते सर्वजण चिंताग्रस्त होऊन समुद्राच्या किनार्यावरबसून राहिले. मग अंगद इत्यादी महाबलवान वानर परस्परांशी विचार विनिमय करू लागले- "अहो, सीतेच्या शोधासाठी वनात हिंडता हिंडता त्या गुहेतच एक महिना निघून गेला आहे. आजपर्यंत आपणास रावणही दिसला नाही आणि जनककन्या सीतासुद्धा आपणास दिसली नाही. २४-२६)  सुग्रीवस्तीक्ष्णदण्डऽस्मान् निहत्येव न संशयः ।  सुग्रीववधतोऽस्माकं श्रेयः प्रायोपवेशनम् ॥ २७ ॥ सुग्रीव हा भयंकर शिक्षा देणारा आहे. तो आपणास ठार करेल, यात संदेह नाही. तेव्हा सुग्रीवाकडून वध करून घेण्यापेक्षा आपण प्रायोपवेशन करून मरून जाणे हे अधिक श्रेयस्कर आहे." (२७)  इति निश्चित्य तत्रैव दर्भानास्तीर्य सर्वतः ।  उपाविवेशुस्ते सर्वे मरणे कृतनिश्चयाः ॥ २८ ॥ अशा प्रकारे प्रायोपवेशन करण्याचा निश्चय करून, सगळीकडे दर्भ पसरून, मरून जाण्याचा निश्चय करून ते सर्व वानर तेथे बसून राहिले. (२८)  एतस्मिन्नन्तरे तत्र महेन्द्रादिगुहान्तरात् ।  निर्गत्य शनकैरागाद् गृध्रः पर्वतसन्निभः ॥ २९ ॥ दरम्यानच्या काळात, महेंद्र पर्वताच्या एका गुहेतून बाहेर पडून एक पर्वतप्राय शरीराचे गिधाड हळूहळू तेथे आले. (२९)  दृष्ट्वा प्रावोपवेशेन स्थितान्वानरपुङ्गवान् ।  उवाच शनकैर्गृध्रः प्राप्तो भक्ष्योऽद्य मे बहुः ॥ ३० ॥ श्रेष्ठ वानर प्रायोपवेशनास बसले आहेत हे पाहून ते गिधाड हळू आवाजात म्हणू लागले, "आज मला पुष्कळ भक्ष्य प्राप्त झाले आहे. (३०)  एकैकशः क्रमात्सर्वान् भक्षयामि दिने दिने ।  श्रुत्वा तद्गृध्रवचनं वानरा भीतमानसाः ॥ ३१ ॥ आता रोज या सर्वांना एकेक करून मी खाईन." ते गिधाडाचे वचन ऐकल्यावर त्या वानरांची मने भीतीने ग्रस्त झाली. (३१)  भक्षयिष्यति नः सर्वान् असौ गृध्रो न संशयः ।  रामकार्यं च नास्माभिः कृतं किञ्चिद्धरीश्वराः ॥ ३२ ॥ सुग्रीवस्यापि च हितं न कृतं स्वात्मनामपि । वृथानेन वधं प्राप्ता गच्छामो यमसादनम् ॥ ३३ ॥ ते वानर आपापसात बोलू लागले - "हे गिधाड आम्हा सर्वांना खाऊन टाकील यात संशय नाही. हे वानर प्रमुखांनो, आपण श्रीरामांचे कोणतेही कार्य केले नाही. तसेच सुग्रीवाचेही काही कार्य आपण केले नाही आणि आपलेही हित आपण साधले नाही. आता मात्र या गिधाडाकडून फुकटच आपण मारले जाऊ आणि यमसदनास जाऊ. (३२-३३)  अहो जटायुर्धर्मात्मा रामस्यार्थे मृतः सुधीः ॥  मोक्षं प्राप दुरावापं योगिनामप्यरिन्दमः ॥ ३४ ॥ अहो, तो जटायू किती बुद्धिमान् आणि धर्मात्मा होता ! तो श्रीरामांच्या कार्यासाठी मरण पावला. आणि योगिजनांनासुद्धा मिळण्यासाठी कठीण असा मोक्ष त्या शत्रूचे दमन करणार्या जटायूला मिळाला." (३४)  सम्पातिस्तु तदा वाक्यं श्रुत्वा वानरभाषितम् ।  के वा यूयं मम भ्रातुः कर्णपीयूषसन्निभम् ॥ ३५ ॥ जटायुरिति नामद्य व्याहरन्तः परस्परम् । उच्यतां वो भयं मा अभूत् मत्तः प्लवगसत्तमाः ॥ ३६ ॥ त्या वेळी वानरांनी उच्चारलेली ती वाक्ये ऐकून संपाती म्हणाला, "हे वानरश्रेष्ठांनो, माझ्या कानांना अमृताप्रमाणे वाटणारे, माझ्या भावाचे जटायू हे नाव आत्ता परस्परांशी बोलताना उच्चारणारे तुम्ही कोण आहात ? माझ्यापासून कोणतेही भय न बाळगता तुम्ही हकीगत सांगा." (३५-३६)  तमुवाचाङ्गदः श्रीमान् उत्थितो गृध्रसन्निधौ ।  रामो दाशरथिः श्रीमान् लक्ष्मणेन समन्वितः ॥ ३७ ॥ सीतया भार्यया सार्धं विचचार महावने । तस्य सीता हृता साध्वी रावणेन दुरात्मना ॥ ३८ ॥ तेव्हा श्रीमान् अंगद उठला आणि त्या गिधाडाजवळ जाऊन म्हणाला "राजा दशरथांचे पुत्र श्रीमान श्रीराम हे लक्ष्मणासह आणि सीता या पत्नीसह घोर वनामध्ये फिरत होते. त्या वेळी त्यांची साध्वी सीता ही दुरात्म्या रावणाने हरण करून नेली. (३७-३८)  मृगयां निर्गते रामे लक्ष्मणे च हृता बलात् ।  रामरामेति क्रोशन्ती श्रुत्वा गृध्रः प्रतापवान् ॥ ३९ ॥ जटायुर्नाम पक्षीन्द्रो युद्धं कृत्वा सुदारुणम् । रावणेन हतो वीरो राघवार्थं महाबलः ॥ ४० ॥ राम आणि लक्ष्मण हे दोघेही मृगयेसाठी गेले असताना बळजबरीने रावणाने तिला पळविले. तेव्हा ती 'हे रामा, हे रामा,' असा आक्रोश करीत होती. तिचा आक्रोश ऐकून, प्रतापी पक्षिराज अशा जटायू नावाच्या गिधाडाने श्रीरामासाठी रावणाबरोबर फार घनघोर युद्ध केले. परंतु तो महाबलवान वीर रावणाकडून मारला गेला. (३९-४०)  रामेण दग्धो रामस्य सायुज्यं अगमत्क्षणात् ।  रामः सुग्रीवमासाद्य सख्यं कृत्वाग्निसाक्षिकम् ॥ ४१ ॥ नंतर स्वतः श्रीरामांनी त्याचा दहन-संस्कार केला. तो तत्काळ श्रीरामांमध्ये लीन झाला. त्याने सायुज्य मुक्ती मिळविली. त्यानंतर श्रीराम सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी अग्नीला साक्षी ठेवून सुग्रीवाशी मैत्री केली. (४१)  सुग्रीवचोदितो हत्वा वालिनं सुदुरासदम् ।  राज्यं ददौ वानराणां सुग्रीवाय महाबलः ॥ ४२ ॥ पुढे सुग्रीवाच्या प्रेरणेने महाबळी श्रीरामांनी जिंकण्यास अत्यंत कठीण असणार्या वालीला ठार करून सुग्रीवाला वानरांचे राज्य दिले. (४२)  सुग्रीवः प्रेषयामास सीतायाः परिमार्गणे ।  अस्मान् वानरवृन्दान्वै महासत्त्वान् महाबलः ॥ ४३ ॥ नंतर महाबलवान् सुग्रीवाने सीतेचा शोध करण्यासाठी आम्हा महापराक्रमी वानरांच्या समूहांना पाठविले आहे. (४३)  मासाद् अर्वाङ्निवर्तध्वं नोचेत्प्राणान्हरामि वः ।  इत्याज्ञया भ्रमन्तोऽस्मिन् वने गह्वरमध्यगाः ॥ ४४ ॥ सुग्रीवाने आम्हांला सांगितले की 'एक महिन्याच्या आत तुम्ही सर्व परत या. तसे न घडल्यास मी तुमचे प्राण हरण करीन.' सुग्रीवाच्या अशा आज्ञेने आम्ही वनात हिंडत असता एका गुहेत गेलो. (४४)  गतो मासो न जानीमः सीतां वा रावणं च वा ॥  मर्तुं प्रायोपविष्टा स्मस्तीरे लवणवारिधेः ॥ ४५ ॥ एक महिना निघून गेला आणि आम्हांला सीतेचा किंवा रावणाचा काहीच पत्ता लागलेला नाही. म्हणून या खार्या समुद्राच्या तीरावर आम्ही प्रायोपवेशन करून मरून जाण्यास बसलो आहोत. ४५  यदि जानासि हे पक्षिन् सीतां कथय नः शुभाम् ।  अङ्गदस्य वचः श्रुत्वा सम्पातिर्हृष्टमानसः ॥ ४६ ॥ हे गृधपक्ष्या, सुलक्षणी सीतेबद्दल तुला काही माहिती असल्यास ती तू आम्हांला सांग." अंगदाचे वचन ऐकून संपातीचे मन संतुष्ट झाले. (४६)  उवाच मत्प्रियो भ्राता जटायुः प्लवगेश्वराः ।  बहुवर्षसहस्रान्ते भ्रातृवार्ता श्रुता मया ॥ ४७ ॥ तो म्हणाला "हे वानरश्रेष्ठांनो, जटायू हा माझा फार लाडका भाऊ होता. हजारो वर्षांनी मला आज भावाची वार्ता ऐकावयास मिळाली आहे. (४७)  वाक्यसाहाय्यं करिष्येऽहं भवतां प्लवगेश्वराः ।  भ्रातुः सलिलदानाय नयध्वं मां जलान्तिकम् ॥ ४८ ॥ हे वानरश्रेष्ठ हो, मी तुम्हांला माहिती देऊन तोंडी साहाय्य करीन. पण तत्पूर्वी आधी माझ्या बंधूला जलांजली देण्यासाठी मला तुम्ही पाण्याजवळ न्या. (४८)  पश्चात्सर्वं शुभं वक्ष्ये भवतां कार्यसिद्धये ।  तथेति निन्युस्ते तीरं समुद्रस्य विहङ्गमम् ॥ ४९ ॥ त्यानंतर तुमच्या कार्यसिद्धीसाठी जे कल्याणकारक असेल ते सर्व मी तुम्हांला सांगेन." 'ठीक आहे' असे म्हणून त्या वानरांनी संपाती पक्ष्याला समुद्राच्या तीरावर नेले. (४९)  सोऽपि तत्सलिले स्न्वात्वा भ्रातुर्दत्त्वा जलाञ्जलिम् ।  पुनः स्वस्थानमासाद्य स्थितो नीतो हरीश्वरैः । सम्पातिः कथयामास वानरान् परिहर्षयन् ॥ ५० ॥ तेथे त्याने समुद्राच्या पाण्यात स्नान केले व मग भावाला जलांजली दिली. त्यानंतर श्रेष्ठ वानरांनी त्याला पुनः त्याच्या पूर्वीच्या स्थानी नेले. तेथे तो व्यवस्थित बसला आणि वानरांना आनंदित करीत सांगू लागला. (५०)  लङ्का नाम नगर्यास्ते त्रिकूटगिरिमूर्धनि ।  तत्राशोकवने सीता राक्षसीभिः सुरक्षिता ॥ ५१ ॥ "त्रिकूट नावाच्या पर्वताच्या माथ्यावर लंका नावाची नगरी आहे. तेथे राक्षसिणींच्या पहार्यात सीता अशोक वनात राहात आहे. (५१)  समुद्रमध्ये सा लङ्का शतयोजनदूरतः ।  दृश्यते मे न सन्देहः सीता च परिदृश्यते ॥ ५२ ॥ येथून शंभर योजने अंतरावर समुद्रामध्ये ती लंका आहे. तरी ती सीता मला येथून दिसत आहे, तुम्ही यात शंका बाळगू नका. (५२)  गृध्रत्वाद्दूरदृष्टिर्मे नात्र संशयितुं क्षमम् ।  शतयोजनविस्तीर्णं समुद्रं यस्तु लङ्घयेत् ॥ ५३ ॥ स एव जानकीं दृष्ट्वा पुनरायास्यति ध्रुवम् । अहमेव दुरात्मानं रावणं हन्तुमुत्सहे । भ्रातुर्हन्तारमेकाकी किन्तु पक्षविवर्जितः ॥ ५४ ॥ मी गिधाड असल्याने मला दूरवरचे दिसणारी दृष्टी आहे. म्हणून या बाबतीत शंका घेणे योग्य नाही. तुमच्यापैकी जो कुणी शत योजने विस्तीर्ण असा हा समुद्र ओलांडून जाईल, तोच निश्चितपणे जानकीची भेट घेऊन पुनः परत येईल. माझ्या भावाचा वध करणार्या त्या दुरात्म्या रावणाला मी एकट्यानेच ठार करण्यास उत्सुक आहे. परंतु काय करू ? मला पंख नाहीत. (५३-५४)  यतध्वं अतियत्नेन लङ्घितुं सरतां पतिम् ।  ततो हन्ता रघुश्रेष्ठो रावणं राक्षसाधिपम् ॥ ५५ ॥ हे वानरांनो, तुम्ही अतिशय प्रयत्नपूर्वक समुद्र ओलांडण्याचा प्रयत्न करा. तेव्हा रघुश्रेष्ठ राम राक्षसराज रावणाला ठार करू शकतील. (५५)  उल्लङ्घ्य सिन्धुं शतयोजनायतं  लङ्कां प्रविश्याथ विदेहकन्यकाम् । दृष्ट्वा समाभाष्य च वारिधिं पुनः- तर्तुं समर्थः कतमो विचार्यताम् ॥ ५६ ॥ शंभर योजने विस्तार असणार्या समुद्राचे उल्लंघन करून, लंकेत प्रवेश करायचा आणि विदेह राजकन्या सीतेला भेटून व तिच्याशी बोलून, नंतर पुनः समुद्र ओलांडून परत येण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे, याचा तुम्ही विचार करा." (५६)  इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे  किष्किन्धाकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥ इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किंधाकाण्डे सप्तमः सर्गः॥ ७ ॥ |