[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकोनचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मारीचेन रावणस्य प्रबोधनम् - मारीचाचे रावणास समजाविणे -
एवमस्मि तदा मुक्तः कथञ्चित् तेन संयुगे ।
इदानीमपि यद् वृत्तं तच्छृणुष्व यदुत्तरम् ॥ १ ॥
याप्रकारे त्या वेळी तर मी कुठल्याही प्रकारे श्रीरामचंद्रांच्या हातून जिवंत राहिलो. त्यानंतर त्या काळात जी घटना घडली तीही ऐका. ॥१॥
राक्षसाभ्यामहं द्वाभ्यामनिर्विण्णस्तथाकृतः ।
सहितो मृगरूपाभ्यां प्रविष्टो दण्डकावने ॥ २ ॥
श्रीरामांनी माझी अशी दुर्दशा करून टाकली तरीही मी त्यांचा विरोध करण्याचे सोडले नाही. एक दिवस मृगरूपधारी दोन राक्षसांच्या बरोबर मी मृगाचे च रूप धारण करून दण्डकवनात गेलो. ॥२॥
दीप्तजिह्वो महादंष्ट्रस्तीक्ष्णशृङ्‌गो महाबलः ।
व्यचरन् दण्डकारण्यं मांसभक्षो महामृगः ॥ ३ ॥
मी महान बलशाली तर होतोच, माझी जीभ आगी प्रमाणे उद्दीप्त होत होती. दाढा ही खूप मोठ्‍या होत्या. शिंगे तीक्ष्ण होती आणि महान्‌ मृगाच्या रूपात मांस खात दण्डकवनात हिंडू लागलो. ॥३॥
अग्निहोत्रेषु तीर्थेषु चैत्यवृक्षेषु रावण ।
अत्यन्तघोरो व्यचरंस्तापसांस्तान् प्रधर्षयन् ॥ ४ ॥
रावणा ! मी अत्यंत भयंकर रूप धारण करून अग्निशाळेत, जलाशयांच्या घाटांवर तसेच देववृक्षांच्या खाली बसलेल्या तपस्वी जनांना तिरस्कृत करीत सर्व बाजूस विचरण करीत होतो. ॥४॥
निहत्य दण्डकारण्ये तापसान् धर्मचारिणः ।
रुधिराणि पिबंस्तेषां तन्मासानि च भक्षयन् ॥ ५ ॥
दण्डकारण्यात धर्मानुष्ठानात लागलेल्या तापसांना मारून त्यांचे रक्त पिणे आणि मांस खाणे हेच माझे काम होते. ॥५॥
ऋषिमांसाशनः क्रूरस्त्रासयन् वनगोचरान् ।
तदा रुधिरमत्तोऽहं व्यचरं दण्डकावनम् ॥ ६ ॥
माझा स्वभाव क्रूर होताच, मी ऋषिंचे मांस खाऊन आणि वनात विचरण करणार्‍या प्राण्यांना भिती दाखवीत रक्तपान करून उन्मत्त होऊन दण्डकवनात हिंडू लागलो. ॥६॥
तदाहं दण्डकारण्ये विचरन् धर्मदूषकः ।
आसादयं तदा रामं तापसं धर्ममाश्रितम् ॥ ७ ॥

वैदेहीं च महाभागां लक्ष्मणं च महारथम् ।
तापसं नियताहारं सर्वभूतहिते रतम् ॥ ८ ॥
याप्रकारे त्या समयी दण्डकारण्यात विचरत असता धर्माला कलंकित करणारा मी मारीच तापस धर्माचा आश्रय घेणार्‍या श्रीराम, वैदेही सीता तसेच मिताहारी तपस्व्याच्या रूपात समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहाणार्‍या महारथी लक्ष्मणाजवळ जाऊन पोहोंचलो. ॥७-८॥
सोऽहं वनगतं रामं परिभूय महाबलम् ।
तापसोऽयमिति ज्ञात्वा पूर्ववैरमनुस्मरन् ॥ ९ ॥

अभ्यधावं सुसंक्रुद्धस्तीक्ष्णशृङ्‌गो मृगाकृतिः ।
जिघांसुरकृतप्रज्ञस्तं प्रहारमनुस्मरन् ॥ १० ॥
वनात आलेल्या महाबली श्रीरामांना हा एक तपस्वी आहे असे जाणून त्यांची अवहेलना करीत मी पुढे गेलो आणि पहिल्या वैराचे वारंवार स्मरण करून अत्यंत कुपित होऊन त्यांच्याकडे धावलो. त्यासमयी माझी आकृती मृगासारखीच होती. माझी शिंगे टोंकदार होती. त्यांच्या पहिल्या प्रहाराची आठवण करून मी त्यांना ठार मारू इच्छित होतो. माझी बुद्धि शुद्ध नसल्याने मी त्यांची शक्ती आणि प्रभावास विसरून गेलो होतो. ॥९-१०॥
तेन मुक्तास्त्रयो बाणाः शिताः शत्रुनिबर्हणाः ।
विकृष्य सुमहच्चापं सुपर्णानिलतुल्यगाः ॥ ११ ॥
आम्हा तिघांना येतांना पाहून श्रीरामांनी आपले विशाल धनुष्य खेचून तीन टोकदार बाण सोडले, जे गरूड किंवा वायुप्रमाणे शीघ्रगामी आणि शत्रुंचे प्राण घेणारे होते. ॥११॥
ते बाणा वज्रसंकाशाः सुमुक्ता रक्तभोजनाः ।
आजग्मुः सहिताः सर्वे त्रयः संनतपर्वणः ॥ १२ ॥
वाकलेल्या गांठीचे ते सर्व तीन्ही बाण वज्रासारखे दुःसह, अत्यंत भयंकर तसेच रक्त पिणारे होते एकाच वेळी आमच्या कडे आले. ॥१२॥
पराक्रमज्ञो रामस्य शरो दृष्टभयः पुरा ।
समुत्क्रान्तस्ततो मुक्तस्तावुभौ राक्षसौ हतौ ॥ १३ ॥
मी तर श्रीरामांचा पराक्रम जाणत होतो आणि पूर्वी एकवेळ त्यांच्या भयाचा सामना करून चुकलो होतो, म्हणून शठतापूर्वक उडी मारून पळून गेलो. पळून गेल्याने मी तर वाचलो पण माझे ते दोन्ही साथीदार राक्षस मारले गेले. ॥१३॥
शरेण मुक्तो रामस्य कथञ्चित् प्राप्य जीवितम् ।
इह प्रव्राजितो युक्तस्तापसोऽहं समाहितः ॥ १४ ॥
यावेळी श्रीरामांच्या बाणापासून माझी कशीतरी सुटका झाली आणि मला नवीन जीवन मिळाले आणि सर्वांपासून संन्यास घेऊन समस्त दुष्कर्मांचा परित्याग करून स्थिरचित्त होऊन योगाभ्यासात तत्पर राहून मी तपस्या करू लागलो. ॥१४॥
वृक्षे वृक्षे हि पश्यामि चीरकृष्णाजिनाम्बरम् ।
गृहीतधनुषं रामं पाशहस्तमिवान्तकम् ॥ १५ ॥
आता मला एकेका वृक्षात चीर, काळे मृगचर्म आणि धनुष्य धारण केलेले- श्रीरामच दिसत असतात, जे मला पाशधारी यमराजा समान प्रतीत होत आहेत. ॥१५॥
अपि रामसहस्राणि भीतः पश्यामि रावण ।
रामभूतमिदं सर्वमरण्यं प्रतिभाति मे ॥ १६ ॥
रावणा ! मी भयभीत होऊन हजारो रामांना आपल्या समोर उभे असलेले पहात आहे. हे सर्व वनच मला राममय प्रतीत होत आहे. ॥१६॥
राममेव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर ।
दृष्ट्‍वा स्वप्नगतं राममुद्‌भ्रमामि विचेतनः ॥ १७ ॥
राक्षसराज ! जेव्हा मी एकांतात बसतो तेव्हा मला श्रीरामांचे दर्शन होत असते. स्वप्नात (ही) श्रीरामांना पाहून मी उद्‌भ्रान्त आणि अचेतसा होऊन उठत असतो. ॥१७॥
रकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण ।
रत्‍नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥ १८ ॥
रावणा ! मी रामापासून इतका भयभीत झालो आहे की रत्‍न आणि रथ आदि जितकी म्हणून रकारादि नामे आहेत ती माझ्या कानावर पडली की माझ्या मनात भारी भय उत्पन्न करतात. ॥१८॥
अहं तस्य प्रभावज्ञो न युद्धं तेन ते क्षमम् ।
बलिं वा नमुचिं वापि हन्याद्धि रघुनन्दनः ॥ १९ ॥
मी त्यांचा प्रभाव उत्तम प्रकारे जाणतो म्हणून म्हणतो की श्रीरामांशी तुझे युद्ध करणे कदापि उचित नाही. रघुनंदन राम राजा बळी अथवा नमुचिचा ही वध करू शकतात. ॥१९॥
रणे रामेण युध्यस्व क्षमां वा कुरु रावण ।
न ते रामकथा कार्या यदि मां द्रष्टुमिच्छसि ॥ २० ॥
रावणा ! तुझी इच्छा असेल तर रणभूमीमध्ये श्रीरामाबरोबर युद्ध कर अथवा त्यांना क्षमा कर, परंतु जर मला जीवित पाहू इच्छित असलास तर माझ्या समोर श्रीरामांची चर्चा करु नको. ॥२०॥
बहवः साधवो लोके युक्ता धर्ममनुष्ठिताः ।
परेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥ २१ ॥
लोकात बरेचसे साधुपुरुष जे योगयुक्त होऊन केवळ धर्माच्याच अनुष्ठानात लागलेले असतात, दुसर्‍यांच्या अपराधानेही परिकरांसहित नष्ट झाले आहेत. ॥२१॥
सोऽहं परापराधेन विनश्येयं निशाचर ।
कुरु यत्ते क्षमं तत्त्वमहं त्वा नानुयामि वै ॥ २२ ॥
निशाचरा ! मीही कुठल्याही प्रकारे दुसर्‍याच्या अपराधाने नष्ट होऊ शकतो, म्हणून तुम्हांला जे उचित वाटेल ते करा. मी या कार्यात तुम्हाला सहकार्य देऊ शकत नाही. ॥२२॥
रामश्च हि महातेजा महासत्त्वो महाबलः ।
अपि राक्षसलोकस्य न भवेदन्तकोऽपि हि ॥ २३ ॥
कारण की श्रीरामचंद्र अत्यंत तेजस्वी, महान आत्मबलाने संपन्न तसेच अधिक बलशाली आहेत. ते समस्त राक्षस-जगताचा संहार करू शकतात. ॥२३॥
यदि शूर्पणखाहेतोर्जनस्थानगतः खरः ।
अतिवृत्तो हतः पूर्वं रामेणाक्लिष्टकर्मणा ।
अत्र ब्रूहि यथातत्त्वं को रामस्य व्यतिक्रमः ॥ २४ ॥
जर शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी जनस्थान निवासी खर प्रथम श्रीरामांवर चढाई करण्यासाठी गेला आणि अनायासे महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांच्या हातून मारला गेला तर तू खरे खरे सांग की यात श्रीरामांचा काय अपराध आहे ? ॥२४॥
इदं वचो बन्धुहितार्थिना मया
यथोच्यमानं यदि नाभिपत्स्यसे ।
सबान्धवस्त्यक्ष्यसि जीवितं रणे
हतोऽद्य रामेण शरैरजिह्मगैः ॥ २५ ॥
तुम्ही माझे बंधु आहात. मी तुमचे हित करण्याच्या इच्छेने या गोष्टी सांगत आहे. जर मानल्या नाहीत तर युद्धात आज रामांच्या सरळ जाणार्‍या बाणांद्वारा घायाळ होऊन तुम्हांला बंधु-बांधवांसहित प्राणांचा परित्याग करावा लागेल. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP